मुक्त संवाद: अभिरुचिसंपन्न प्रकाशकाशी

ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व ‘पॉप्युलर प्रकाशन’चे संचालक डॉ. रामदास भटकळ यांची मुलाखत

फोटो सौजन्य: मैत्री फिल्म्स

जगभर 23 एप्रिल हा दिवस 'जागतिक पुस्तक दिवस' म्हणून साजरा केला जातो. जगभरातील उत्तमोत्तम साहित्यकृतींना स्वभाषेत अनुवादित करून अनुवादक भाषा, समाज आणि संस्कृती यांच्या उन्नतीसाठी महत्त्वाचे योगदान देत असतात. तर जागतिक पुस्तक दिवसाच्या निमित्ताने 'अनुवादक आणि पुस्तके' या विषयावरील चार लेख व एक मुलाखत काल, आज आणि उद्या असे तीन दिवस प्रसिद्ध करत आहोत. त्यापैकीच ही  मुलाखत ...

‘पॉप्युलर प्रकाशन’ ही मराठीतील नामवंत प्रकाशन संस्था. रामदास भटकळ हे या प्रकाशन संस्थेचे संचालक. अत्यंत कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व. मराठीतील ग्रंथव्यवहारक्षेत्रातील ‘पॉप्युलर प्रकाशन’चे स्थान अग्रगण्य स्वरूपाचे, हे काही वेगळे सांगायला नको. मराठी ग्रंथजगतात ‘मौज प्रकाशन गृह’, ‘व्हीनस प्रकाशन’, ‘कॉन्टिनेन्टल प्रकाशन’, ‘कर्नाटक पब्लिशिंग हाऊस’, ‘ह. वि. मोटे प्रकाशन’ व ‘मॅजेस्टिक प्रकाशन या जुन्या-जाणत्या प्रकाशन संस्थांपासून त्यानंतरच्या ‘राजहंस प्रकाशन’, ‘ग्रंथाली’, ‘लोकवाङ्‌मय गृह’ आणि ‘पद्मगंधा प्रकाशन’ इत्यादी प्रकाशन संस्थांनी स्वत:ची ठसठशीत नाममुद्रा उमटविली आहे. नागपूर येथील ‘साहित्य प्रसार केंद्र’ व ‘अमेय प्रकाशन’, औरंगाबाद येथील ‘साकेत प्रकाशन’ या प्रकाशन संस्थांनी ग्रंथप्रसाराचे कार्य आजवर केलेले आहे.

‘पॉप्युलर प्रकाशन’ने 1951 मध्ये मराठीच्या प्रकाशनक्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले, त्याला आता अडुसष्ट वर्षे लोटली आहेत. ‘पॉप्युलर प्रकाशना’च्या या वर्धिष्णू यशाला रामदास भटकळ यांच्या प्रज्ञेची, प्रतिभेची आणि परिश्रमांची जोड मिळाली आहे. ‘पॉप्युलर बुक डेपो’ला ‘बॉम्बे बुक डेपो’ या समवयस्क संस्थेची साथ मिळाली आणि या पुस्तकविक्री केंद्राचा खऱ्या अर्थाने विस्तार झाला. इंग्रजी ग्रंथजगताचीही ओळख मराठी वाचकांना झाली.

रामदास भटकळ यांनी वडिलोपार्जित वारसा जोपासला आणि त्याचबरोबर नव्या गतिमान युगातील नवी स्वप्ने पाहिली. या क्षेत्रातील नवी क्षितिजे धुंडाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वास्तविक पाहता, त्यांची जडण-घडण कॉस्मोपॉलिटन संस्कृतीत झाली. इंग्रजी हे त्यांच्या शिक्षणाचे माध्यम होते. पण वाचनाचे त्यांचे वेड मात्र जबरदस्त होते. शालेय वयातच त्यांनी वॉल्टर स्कॉट, चार्ल्स डिकन्स आणि अलेक्झांडर ड्युमा यांच्या कादंबऱ्यांचे वाचन केले. मराठीतील ना. सी. फडके, वि. स. खांडेकर आणि साने गुरुजी यांचे साहित्य त्यांनी वाचले.

महाविद्यालयीन विश्वात प्रवेश केल्यावर त्यांच्या अभिरुचीत पूर्णत: परिवर्तन झाले. भालचंद्र कृष्ण देसाई या त्यांच्या मित्रामुळे मर्ढेकरांच्या कवितेशी त्यांचा परिचय झाला. ‘सत्यकथा’ आणि ‘अभिरुची’ या वाङ्‌मयीन प्रवृत्तींचा व प्रवाहांचा प्रभाव पडला. त्यांच्या संवेदनशीलतेवर नववाङ्‌मयीन प्रवृत्तींचा आणि प्रवाहांचा प्रभाव पडला. त्यांच्यासमोर आदर्श होता तो वि. पु. भागवत, प्रा. श्री. पु. भागवत, प्रा. गंगाधर गाडगीळ आणि प्रा. वा. ल. कुलकर्णी यांचा. त्यांच्या संपर्कामुळे वाङ्‌मयीनक्षेत्रात नवे काही तरी करून दाखवण्याची उर्मी त्यांच्या मनात निर्माण झाली. गंगाधर गाडगीळ यांचा ‘कबुतरे’ आणि अरविंद गोखले यांचा ‘कमळण’ हे कथासंग्रह प्रकाशित करून मराठी प्रकाशनव्यवसायाला त्यांनी प्रारंभ केला.

‘पॉप्युलर प्रकाशन’ने आजवर घेतलेली उत्तुंग झेप पाहता, मन विस्मयाने भारले जाते. विशिष्ट वाङ्‌मयप्रकारापुरती दृष्टी सीमित न ठेवता वाङ्‌मयक्षेत्र बहुशाखांनी कसे पल्लवित करता येईल, याचा रामदास भटकळ यांनी सदैव विचार केला. निर्मितिशील कवी-लेखकांचा संचय ते करीत गेले. त्यांच्याकडेही निर्मितिशील प्रतिभा होती, हे त्यांनी केलेल्या लेखनातून दिसून येते. ‘जिगसॉ’ आणि ‘जिव्हाळा’मध्ये निकटच्या सहवासातील व्यक्तींविषयीची संस्मरणे ज्या समर्थपणे त्यांनी लिहिली आहेत, त्यावरून त्यांच्या लेखनकौशल्याची झलक पाहावयास मिळते.

त्यांच्या प्रज्ञेचा पल्ला किती तरी व्यापक आहे. गांधीविचार हा त्यांच्या दीर्घकालीन चिंतनाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. परिणतप्रज्ञ वयापर्यंत या विषयाचा ध्यास त्यांनी सोडला नाही. या विषयावर संशोधन करून त्यांनी मुंबई विद्यापीठाची पीएच. डी.ची पदवी प्राप्त केली. गांधीजींच्या जीवनाविषयीचे ‘मोहनमाया’ हे सकस लेखन हा त्यांच्या गांधीविषयक अभ्यासाचा परिपाक होय. 

शास्त्रीय संगीतक्षेत्रात त्यांनी दीर्घ काळ निष्ठेने साधना केली. जिथे गांधीविचार आहे आणि गाणे आहे, तिथे जायला माझ्या तब्येतीचीदेखील मी पर्वा करीत नाही, असे ते गमतीने म्हणतात. यावरून त्यांच्या जीवनविषयक धारणांची निश्चित कल्पना येते. डॉ. रामदास भटकळांचे गुणवैशिष्ट्य असे की, वाङ्‌मयीन गुणवत्तेशी ते कधीही तडजोड करीत नाहीत. प्रकाशनयोग्य पुस्तकाची निवड करताना, त्यांनी हाच निकष सातत्याने पाळलेला आहे. व्यवस्थापनकौशल्य हा त्यांचा मोठाच गुण आहे. परिपूर्णतेचा ध्यास हा त्यांचा स्थायिभाव. ज्या प्रतिभावंतांची पुस्तके त्यांनी मराठीत प्रकाशित केली, त्यांपैकी वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि डॉ. भालचंद्र नेमाडे यांना ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ प्राप्त झाला. प्रौढ वाङ्‌मयाबरोबरच लहान मुलांची मने घडविणाऱ्या बालवाङ्‌मयाकडे त्यांनी तेवढेच लक्ष पुरवले आहे. या दृष्टीने त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण रीतीने प्रसिद्ध केलेल्या विंदा करंदीकर, रत्नाकर मतकरी, मंगेश पाडगावकर, सदानंद रेगे आणि शिरीष पै यांच्या पुस्तकांकडे अंगुलिनिर्देश करता येईल.

डॉ. रामदास भटकळ यांचे चतुरस्र व्यक्तिमत्त्व विशिष्ट चौकटीत मावणारे नाही. त्यांचा विविध क्षेत्रांतील समृद्ध प्रवास संक्षेपाने सांगणे कठीण. ‘आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र’ सुरू करण्यात त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. महात्मा गांधींनी लिहलेली ‘हिंद स्वराज’ ही पुस्तिका मूळ गुजरातीतून मराठीत अनुवादित करण्याचे कार्य डॉ. रामदास भटकळ यांनी केले. नाट्य, संगीत आणि राजकारण या क्षेत्रांत जी थोडीफार भ्रमंती त्यांनी केली, त्यावर आधारलेले ‘रिंगणाबाहेरून’ हे पुस्तक त्यांनी लिहिले. प्रकाशनक्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवावर आधारलेले त्यांचे ‘पॉप्युलर रीतिपुस्तक’ प्रकाशित झाले आहे.

‘गोमंत विद्या निकेतन’ या मान्यवर संस्थेत 10 जानेवारी 2018 रोजी ‘गांधीविचार’ या विषयावर ‘विचारवेध’ व्याख्यानमालेत व्याख्यान द्यायला डॉ. रामदास भटकळ आले होते. निवांत क्षणी त्यांची ही मुलाखत घेता आली. ते अत्यंत मनमोकळेपणाने बोलले.

प्रश्न: सर, आपल्या या चर्चेची सुरुवात गांधीजींपासून करू या. आपण गांधीविचाराकडे कसे काय आकर्षित झालात?

- गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाविषयी सुरुवातीपासूनच मला आकर्षण होते. त्यांच्या जीवनाचा मी जेव्हा विचार करतो, तेव्हा तो त्यांच्यापुरता सीमित राहू शकत नाही. राष्ट्रजीवनाच्या संदर्भात विचार करणारे गांधी-सावरकर-डॉ. आंबेडकर या त्रयीचा विचार करावा लागतो. दक्षिण आफ्रिकेहून येताना गांधीजींनी ‘हिंद स्वराज’ ही पुस्तिका प्रसिद्ध केली. हिंसेचे समर्थन करणारी जी मंडळी होती, त्यांना गांधीजींनी दिलेले हे उत्तर होते. तरीदेखील ब्रिटिशांनी त्या पुस्तिकेवर बंदी आणली. गांधीजींच्या विचारसरणीत आत्मिक शक्ती (सोलफोर्स) होती, प्रेमाची शक्ती (लव्हफोर्स) होती. गांधीजी आणि पंडित नेहरू वेगवेगळ्या प्रेरणांनी जगत होते, पण एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. गांधीजी हा विलक्षण सामर्थ्य असलेला माणूस होता. साधनशुचिता हे त्यांच्या जीवनाचे मूलतत्त्व होते.

एम. ए.ला माझा राज्यशास्त्र हा अभ्यासाचा विषय असल्यामुळे हिंदुस्थानचा गतेतिहास मला समजून घ्यावासा वाटला. आपल्या राष्ट्रातील समाजव्यवस्थेशी निगडित प्रश्न समजून घ्यावेसे वाटले. मी अनेक लेख लिहिले, पण ते कुणी फारसे मनावर घेतले नाहीत. गांधीजींना तुम्ही शिव्या देऊ शकता; पण या देशाच्या प्रत्येक प्रश्नाशी गांधीजींचा संबंध आहे, हे विसरता कामा नये. म्हणून गांधीजीचे मोठेपण अधोरेखित करण्याचा मी प्रयत्न केला. त्याचबरोबर स्तुतिपाठक होऊ न देण्याची काळजी घेतली.

भारताबाहेर नेल्सन मंडेला, मार्टिन ल्यूथर किंग आणि दलाई लामा यांनी गांधीजींचा स्वीकार केला. त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वात विभूतिमत्वाची लक्षणे आढळली. गांधीवादी विचारांत व्यवस्थापन आहे. सर्वधर्मसमभाव आहे. सर्वभाषासमभाव आहे. पुढच्या पिढ्यांसाठी ‘विश्वस्त’ संकल्पना आहे. हरितक्रांती आहे. सर्वोदय आहे. ग्रामराज्य आहे.

प्रश्न: ‘पॉप्युलर प्रकाशन’ संस्था कशी घडत गेली?

- बालपणी वाचन करताना साने गुरुजी, वि. स. खांडेकर यांचा संस्कार माझ्या मनावर होता. इंग्रजी वाङ्‌मय सपाटून वाचले. यासंबंधीचा तपशील किशोर आरस यांनी संकलित केलेल्या ‘पॉप्युलरचे अंतरंग’ या ग्रंथात ‘चिरंतनाच्या मागावर’ या प्रकरणात मी सविस्तरपणे सांगितला आहे, तरी संक्षेपाने सांगतो. 1952 मध्ये ‘पॉप्युलर’चा मराठी प्रकाशन विभाग सुरू झाला तो गंगाधर गाडगीळ यांच्या ‘कबुतरे’ आणि अरविंद गोखले यांच्या‘कमळण’ या कथासंग्रहांच्या प्रकाशनाने. प्रा. वा. ल. कुलकर्णी, प्रा. श्री. पु. भागवत, प्रा. राम पटवर्धन, श्री. ना. पेंडसे, प्रभाकर पाध्ये, प्रा. माधव मनोहर आणि माधव आचवल यांचे या बाबतीत मला मिळालेले प्रोत्साहन महत्त्वाचे. माझ्या ‘जिव्हाळा’ या व्यक्तिचित्रात्मक पुस्तकात यासंबंधीची संस्मरणे आहेत. कुणी काय दिले याच्यापेक्षा, आपण स्वत: काय घेतले ते महत्त्वाचे. कुसुमाग्रज, विश्राम बेडेकर, दुर्गाबाई भागवत, मालतीबाई बेडेकर माझ्यापेक्षा वयाने किती तरी ज्येष्ठ. पण माझ्यावरील प्रेमामुळे त्यांची पुस्तके मला प्रसिद्ध करता आली. बेडेकरांचे ‘एक झाड आणि दोन पक्षी’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. मालतीबाई बेडेकर यांची ‘खरे मास्तर’ ही कादंबरी प्रसिद्ध केली. मामा वरेरकर यांचे ‘भूमिकन्या सीता’ हे नाटक प्रसिद्ध केले. ही वाटचाल मकरंद साठे यांच्या नाटकांपर्यंत चालू राहिली.

प्रश्न: कोणत्या लेखकाच्या साहित्यकृती प्रकाशित करताना आपणास अतीव समाधान वाटले?

- स्वतंत्रपणे विचार करणारे लेखक मला आवडतात. भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध करताना समाधान वाटले. तीच गोष्ट विजय तेंडुलकरांच्या नाटकांच्या बाबतीत. त्यांची तीस नाटके ‘पॉप्युलर प्रकाशन’ने प्रकाशित केली.

प्रश्न: शल्य कोणते राहिले?

- श्री. ना. पेंडसे यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध करता आल्या नाहीत याचे. ‘मौज प्रकाशन’ला मी मोठी बहीण मानले. म्हणून ‘मौज’च्या वाटेला गेलो नाही. प्रा. श्री. पु. भागवत यांची भेट रोज व्हायची. ‘पॉप्युलर’च्या वाटचालीत 1952 पासून सातत्याने वीस वर्षे ते माझ्या पाठीशी उभे राहिले.

प्रश्न: ‘पॉप्युलर’ने प्रसिद्ध केलेल्या कवितासंग्रहांविषयी थोडेसे सांगाल?

- विंदा करंदीकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर यांनी मराठी कविता लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला, त्याच काळात ‘पॉप्युलर’ने त्या तिघांचे काव्यदर्शन प्रकाशित केले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘नवे कवी... नवी कविता’ या मालेत ग्रेस, ना. धों. महानोर, अनुराधा पोतदार, शंकर वैद्य, वसंत सावंत, केशव मेश्राम या कवी-कवयित्रींचे कवितासंग्रह क्रमाने आमच्याकडून प्रसिद्ध केले गेले. नव्या संवेदनशीलतेची कविता 1960 नंतरच्या काळात जनमानसात रुजविण्यात ‘पॉप्युलर’ला यश प्राप्त झाले. दिलीप पुरुषोत्तम चित्रे आणि नारायण सुर्वे यांचे कवितासंग्रह ‘पॉप्युलर’ने प्रसिद्ध केले. नामदेव ढसाळ आणि अरुण कोलटकर यांची कविता वगळता अन्य महत्त्वाच्या कवींचे कवितासंग्रह आमच्याकडून प्रसिद्ध केले गेले. कवितेचे माझे शिक्षण प्रा. शंकर वैद्य यांच्याकडून झाले.

वैयक्तिक दृष्ट्या सांगायचे झाल्यास, मला कुणी ‘पॉप्युलर प्रकाशन’चे सर्वेसर्वा म्हटले तर दु:ख होते. आमच्या या वाटचालीत मृदुला जोशी पंचवीस वर्षे होत्या. रघुनाथ गोकर्ण, कृष्णा करवार, अस्मिता मोहिते, डॉ. अंजली कीर्तने, शुभांगी पांगे, नीता भिसे आणि मेधा भगत यांचा संपादनकार्यात मोलाचा वाटा होता.

प्रश्न: ‘पॉप्युलर प्रकाशन’च्या इंग्रजी प्रकाशनांविषयी आपण सांगाल?

- ‘पॉप्युलर’चे इंग्रजी प्रकाशनक्षेत्रातील काम अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक विषयांत दूरगामी स्वरूपाचे काम या विभागाने केले आहे. प्रा. दामोदर धर्मानंद कोसंबी यांचे इतिहास व मानववंशशास्त्र या विषयांवरचे महत्त्वपूर्ण ग्रंथ, डॉ. गो. स. घुर्ये यांचे समाजशास्त्रावरील महत्त्वाचे ग्रंथ, जयप्रकाश नारायण यांची ‘प्रिझन डायरी’ ‘पॉप्युलर’ने प्रसिद्ध केली. शिवाय जयप्रकाशजींचे समग्र लेखन चार खंडांत प्रकाशित केले, तेही प्रतिकूल काळात. इंग्रजीतून लिहिणारे चरित्रकार धनंजय कीर यांनी डॉ. भीमराव आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर आदी राष्ट्रपुरुषांची चरित्रे लिहिली. ती चरित्रे आणि त्यांचे मराठी अनुवाद ‘पॉप्युलर’ने प्रसिद्ध केले. महत्त्वाचे संदर्भग्रंथ म्हणून ते ओळखले जातात. या चरित्रथांमुळे आणि त्यांच्या अन्य चरित्रग्रंथांमुळे भारतीय प्रबोधनाचा कालखंड उभा राहतो. वैद्यकीय विषयावरील प्रकाशनांची आपल्या देशात सुरुवात ‘पॉप्युलर प्रकाशन’ने केली, हे सांगायला अभिमान वाटतो.

प्रश्न: ‘पॉप्युलर प्रकाशन’च्या समीक्षाग्रंथांबद्दल आणि समीक्षेच्या वेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या समीक्षकांबद्दल थोडेसे...

- मामा वरेरकरांनी आपल्या नाटकांच्या वाटचालीचा आलेख ‘माझा नाटकी संसार’ या पुस्तकात रेखाटला. ‘पॉप्युलर’ने हा ग्रंथ प्रसिद्ध केला. प्रा. वा. ल. कुलकर्णी यांचे विविध विषयांवरील सर्व समीक्षाग्रंथ ‘पॉप्युलर’ने प्रसिद्ध केले. विद्यापीठीय शिक्षणाला आणि संशोधनाला या अभ्यासामुळे वेगळे वळण लागले. प्रा. श्री. के. क्षीरसागर (टीकाविवेक), डॉ. ग. त्र्यं. देशपांडे (भारतीय साहित्यशास्त्र), प्रा. गंगाधार गाडगीळ (साहित्याचे मानदंड, खडक आणि पाणी), दि. के. बेडेकर (साहित्य : निर्मिती आणि समीक्षा) या समीक्षकांचा मराठी समीक्षेच्या वाटचालीत आवर्जून उल्लेख करावा लागेल. हे ग्रंथ ‘पॉप्युलर प्रकाशन’ने प्रसिद्ध केले.

द. ग. गोडसे हे समीक्षेच्या वेगळ्या वाटा चोखाळणारे समीक्षक. लोकपरंपरा, मानववंशशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र इत्यादी अक्षांना स्पर्श करणारी आंतरविद्याशाखीय स्वरूपाची त्यांची समीक्षा. ‘पोत’, ‘गतिमानी’, ‘शक्तिसौष्ठव’, ‘मातावळ’, ‘लोकधाटी’, ‘ऊर्जायन’ आणि ‘समदे तलाश’ असे विविध प्रकृतींचे समीक्षाग्रंथ ‘पॉप्युलर’ने प्रसिद्ध केले. गोडसे साहित्यसिद्धान्त मांडत नाहीत, मूलग्राही विवेचन करतात.  समीक्षा हा प्रवाह आहे; विचार सारखा सुरू आहे, असे त्यांचे मत. हैदराबादचे अभ्यासक डॉ. पद्माकर दादेगावकर यांनी रसविचारावरील ‘रसचर्चा’ हा ग्रंथ लिहिला. तो आम्ही प्रसिद्ध केला.

डॉ. रामदास भटकळ यांच्याशी झालेल्या तास-दीड तासाच्या गप्पा-गोष्टी रूढ मुलाखतीच्या स्वरूपाच्या नव्हत्या. त्यांच्या विवेचनात संक्षेप होता. सूत्रबद्धता होती. विचारांची स्पष्टता आणि स्पष्टवक्तेपणा हे त्यांचे गुणविशेष या चर्चेतून मला दिसून आले. गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाविषयी अथवा त्यांच्या विचारांविषयीचा भाबडेपणा त्यांच्या बोलण्यात कुठेही आढळून आला नाही. डोळस परिशीलनातून त्यांना जीवनदृष्टी प्राप्त झाली.

ग्रंथसंस्कृतीविषयीचा अपार जिव्हाळा हाच डॉ. रामदास भटकळ यांच्या चिंतनाचा केंद्रबिंदू होय. या क्षेत्रातील पूर्वसूरींविषयीची आणि ज्येष्ठांविषयीची आदराची भावना त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत गेली. पण त्यांनी या क्षेत्रात स्वतंत्र विचार आणि स्वयंनिर्णय नेहमीच निर्णायक मानला आहे. ग्रंथजगतात आज निराशेचे सावट असले, तरी त्यांचा या क्षेत्राविषयीचा सूर आशावादी आणि अनुभव उत्साहवर्धक वाटला. ‘करू नये ते करावे लागले नाही’ आणि ‘करावेसे वाटले ते सगळेच करता आले, असेही नाही’ या त्यांच्या उद्‌गारांत प्रांजळपणा आहे, पारदर्शी वृत्ती आहे. आपल्या कुटुंबातील वडिलधाऱ्यांविषयीची कृतज्ञतेची भावना त्यांनी अंत:करणात निरंतर जोपासलेली आहे. वयपरत्वे त्यांनी ‘पॉप्युलर प्रकाशन’च्या संचालकाची जबाबदारी आपले सुपुत्र हर्ष भटकळ यांच्याकडे सोपविली आहे.

डॉ. रामदास भटकळ यांनी इंग्लंडमध्ये जाऊन ग्रंथविश्वविषयक प्रशिक्षण घेतले. नंतर अमेरिकेत जाऊन तेथील ग्रंथजगताचा मागोवा घेतला. संभाषणाच्या ओघात त्यांनी पुस्तक प्रकाशनातील तांत्रिक बाबींविषयी विवेचन केले. त्यांचा हा संवाद ऐकणे हा एक आनंदानुभव होता. पुस्तक कसे काढावे, करारपत्र, लेखकाचे मानधन आणि ‘ब्लर्ब’ची अत्यावश्यकता इत्यादी घटकांविषयी ते आपल्या अनुभवसिद्ध वाणीत बोलले. त्यांच्या बोलण्यातून ‘पॉप्युलर’च्या मांदियाळीचे स्वरूप ध्यानात आले आणि भटकळांची या क्षेत्रातील परिक्रमा सिद्ध होत गेली. डॉ. भटकळांचे हे बोलणे संपू नये, अशी भावना मनात असतानाच मी त्यांचा निरोप घेतला.

- डॉ. सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा.
somnathpant@gmail.com

वाचा 'जागतिक पुस्तक दिवस' निमित्त विशेष लेख:

अनुवाद आणि उत्तम अनुवाद - संजय भास्कर जोशी
अनुवादकाचे वाचन... - चंद्रकांत भोंजाळ
केल्याने भाषांतर... - डॉ. शंतनू अभ्यंकर

Tags:Load More Tags

Comments:

Leena Pandhare

Very inspiring interview.

Anup Priolkar

Nice article towards the journey of Dr. Ramdas Bhatkal in print and publication field by Dr Somnath Komarpant. Very much informative. Thanks

Add Comment