केशवसुतांची विविधरुपिणी कविता म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील मराठी कवितेचे तेजस्वी स्फुरण आहे. या क्रांतदर्शी कवीने आपल्या प्रेरक शक्तीने पुढील कालखंडातील कवितेची दिशा दाखवून दिली. हे सारे घडले कसे? खूप विस्ताराने ते मांडले गेले पाहिजे... आता संक्षेपाने त्याची नोंद करणे औचित्याचे होईल.
केशवसुतांसारखा कवी प्रबोधनकाळात जन्मला. काळाच्या मुशीत घडला. तारुण्याच्या ऐन उमेदीत युगमानसाचा अंतरात्मा त्याने ओळखला. युगप्रवर्तनाची अंतःप्रेरणा या कवीला वेळीच झाली. ही जाणीव एखाद्यालाच होते म्हणूनच त्याला ‘द्रष्टा’ म्हणतात. ते जीवनाचे कोणतेही क्षेत्र असो... ही जाणीव कशी असते...
नांगरल्याविण भुई बरी
असे कितितरी! पण शेतकरी-
सनदी तेथे कोण वदा?-
हजारांतुनी एखादा!
सहस्रावधी जनांपैकी अशी जाणीव असलेले केशवसुत होते म्हणूनच तर...
प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा.
निजनामे त्यावरती नोंदा,
बसुनी का वाढविता मेदा?
विक्रम काही करा, चला तर!
असे मानवी पुरुषार्थाला प्रेरणा देणारे शब्द ते निर्माण करू शकले. (त्यांच्या लेखणीतून झरले.) प्रतिकूल-अनुकूल अशा संघर्षाच्या भुईत अशा प्रकारचे विचारबीज पडल्यानंतर ती तरारून येते. कृतकृत्यतेची अनुभूती अवतरते. केशवसुतांच्या प्रज्ञा-प्रतिभेच्या रूपाने या भूमीत हे घडून आले.
केशवसुत 7 ऑक्टोबर 1866 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड गावी जन्माला आले आणि 7 नोव्हेंबर 1905 रोजी हुबळी इथे त्यांचे चुलत चुलते हरी सदाशिव दामले यांच्याकडे असताना 39वर्षी ते प्लेगमुळे मृत्यू पावले. ते अल्पायुषी ठरले. दुर्दैवाच्या आघातामुळे एक प्रतिभासंपन्न जीवन संपुष्टात आले. 39 वर्षे हे काही लौकिक जीवनाचा निरोप घेण्याचे वय नव्हे. दैववशात ते घडले... पण त्यांची कविता कालजयी ठरली. केशवसुतांचे नाव घेतल्याशिवाय आपल्याला आधुनिकतेच्या पर्वाला सुरुवात करता येत नाही.
केशवसुतांच्या कवितेचा परामर्श घेण्यापूर्वी त्यांचा संक्षिप्त जीवनपट समजून घेणे आवश्यक आहे. केशवसुतांचे वडील केशव विठ्ठल दामले. त्यांची आई वासिष्ठी नदीकाठच्या मालदौली गावातील गणेश उर्फ गणूभाऊ करंदीकर यांची मुलगी. त्यांचे वडील खेड इथे शिक्षक होते. केशवसुतांचे खेड इथे चार-पाच इयत्तांपर्यंतचे मराठी शिक्षण वडिलांच्या देखरेखीखाली झाले. 1880मध्ये चौदाव्या वर्षी त्यांचा विवाह चिपळूण परिसरातील केशव गंगाधर चितळे यांच्या मुलीशी झाला. बडोद्याच्या कॉलेजमध्ये गणित आणि संस्कृत या विषयांचे प्राध्यापक असलेले थोरले बंधू श्रीधरपंत दामले यांच्याकडे मोरो केशव आणि कृष्णाजी केशव (केशवसुत), दोघे आठदहा महिनेच राहिले.
श्रीधरपंतांचे अकाली निधन झाल्यामुळे वर्ध्याला वकिली करणारे केशवसुतांचे मामा रामचंद्र गणेश करंदीकर यांच्याकडे दोघे गेले. तिथे शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे दोघे नागपूरला गेले. मोरो केशव यांनी तिथे राहून आपले शिक्षण पूर्ण केले... पण कृष्णाजी केशव यांना नागपूरचा उन्हाळा सहन झाला नाही म्हणून ते पुण्याला आले.
नागपूरच्या पाचसात महिन्यांच्या वास्तव्यात कवी ना. वा. टिळकांशी त्यांची मैत्री जुळून आली. त्यांनी केशवसुतांच्या कवित्वशक्तीला प्रोत्साहन दिले. याच काळात केशवसुतांना तिथे प्रा. वा. ब. पटवर्धन भेटले. केशवसुतांनी पुण्याला विश्रामबागवाड्यातील सरकारी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. नंतर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला. गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक हे त्यांचे शिक्षक होते.
पुण्यात हुजुरपागेसमोरच्या खासगीवाले यांच्या वाड्यात राहत असताना हरी नारायण आपटे यांच्याशी त्यांची दृढ मैत्री जुळून आली. आपटेंनी केशवसुतांच्या कवितेचे संपादन केले. प्रा. वा. ब. पटवर्धन हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून आले. त्यांची केशवसुतांशी पुनर्भेट झाली. त्यांच्याशी काव्य-शास्त्र-विनोद करण्यात केशवसुतांनी अनेक घटका घालवल्या. नमूद करण्यासारखी बाब म्हणजे केशवसुतांनी ‘पण लक्षांत कोण घेतो?च्या कर्त्यास’ आणि ‘रा. वा. ब. पटवर्धन, मु. नागपूर, यांस’ या कविता लिहून या दोघांच्या संदर्भातील संस्मरणे जागवली आहेत.
1889मध्ये केशवसुत मॅट्रिक्युलेशनची परीक्षा उत्तीर्ण झाले. 1890 ते 1893 या कालावधीत त्यांनी मुंबईत निरनिराळ्या प्रकारच्या नोकर्या केल्या. त्यांच्या आयुष्यातील भ्रमंतीचे हे खडतर पर्व होते. त्यांनी मिशनरी आणि खासगी शाळेत नोकरी केली. खासगी शिकवण्या केल्या. तारमास्तरचे काम शिकण्याचा प्रयत्न केला. कमिसरिएट ऑफिसमध्ये हंगामी स्वरूपाची नोकरी केली.
अमुचा प्याला दुःखाचा
डोळे मिटुनी प्यायाचा
हा त्यांच्या स्वानुभूतीचा उद्गार होता. 1892मध्ये सावंतवाडीच्या आर. पी. डी. स्कूलमध्ये त्यांनी अध्यापनास प्रारंभ केला. ‘मरणानंतर’, ‘माझे ठेवुनि चित्त घे’, ‘पुष्पाप्रत’, ‘फुलपाखरू’, ‘शब्दांनो! मागुते या!’, ‘दिवा आणि तारा’, ‘पण लक्षांत कोण घेतो?च्या कर्त्यास’, ‘मयूरासन' आणि ताजमहाल’, ‘चिरवियुक्ताचा उद्गार’, ‘स्वप्नामध्यें स्वप्न’ आणि ‘संध्याकाळ’ या कविता त्यांनी सावंतवाडीच्या मुक्कामातच लिहिल्या.
1893मध्ये केशवसुतांनी मुंबईत बिर्हाड थाटले. त्याच वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. दुर्दैवाचा फेरा चालूच होता. प्लेगची साथ असल्यामुळे ते मुंबई सोडून खानदेशातील फैजपूर इथे शिक्षक म्हणून रुजू झाले. भडगाव इथल्या अँग्लो व्हर्नाक्युलर शाळेत त्यांनी सहायक शिक्षकाची नोकरी केली. 1902मध्ये त्यांच्या आईचा मृत्यू झाला. 1903मध्ये धारवाड इथल्या सरकारी हायस्कूलमध्ये ते शिक्षक झाले. तिथे असताना आपल्या चुलत चुलत्यांकडे हुबळीला गेलेले असताना 7 नोव्हेंबर 1905 रोजी त्यांना मृत्यू आला. केशवसुतांच्या जीवनाचा हा एकूण प्रवास पाहताना त्यात दुःखांची मालिका अधिक प्रमाणात आढळते. आनंदाचे फार कमी क्षण त्यांच्या आयुष्यात आले... पण ‘क्षणांत नाहींसे होणारे दिव्य भास’ त्यांच्या सौंदर्योपासक मनाची तार छेडीत राहिले. ते पकडताना त्यांना संघर्ष सतत सहन करावा लागला म्हणूनच विमनस्कपणे...
काळोखाच्या जगामध्यें या
मृत आशांच्या चितांवरुनिया
पिशाच माझें भटकत आहे-
शांति नसेचि तया!
असे उद्गार त्यांना काढावे लागले. समाजमनस्क कवी या नात्याने केशवसुतांनी समाजाला उन्नयनाची दिशा दाखवली... पण व्यक्तिगत जीवनात मात्र त्यांना होरपळच अनुभवावी लागली.
कविमन हे हिमनगासारखे असते. केशवसुतांच्या भावजीवनातील दुःखाचा बराच अंश आत बुडालेला होता. त्यांच्या आत्मनिष्ठ कवितेत हे अंतःसूर उत्कटतेने व्यक्त झाले आहेत.
केशवसुतांच्या कवितेतील ही दोन्ही रूपे तत्कालीन समाजमानसाच्या संदर्भात अभ्यसनीय वाटतात. मानवी दुःखावर मात करून जीवनेच्छा अभंग ठेवणारी सकारात्मक अनुभूती केशवसुतांनी मराठी कवितेला दिली यात त्यांच्या कवित्वशक्तीची महत्ता आहे.
केशवसुतांच्या कवितेची महत्ता आणखी कोणकोणत्या घटकांत आहे?
कवितेची अविभाज्य अंगे- आशय आणि अभिव्यक्ती या घटकांत केशवसुतांचे क्रांतदर्शित्व दिसून येते. पारमार्थिक कल्पनांच्या आवर्तात घुटमळणार्या मराठी मनाला त्यांनी बाहेर काढले. ऐहिक जीवनाचे भावसौंदर्य न्याहाळायला लावले. निसर्गानुभूतीतून मानवी मनाचे चिंतन करायला लावणारा नवा नेत्र दिला. सौंदर्यदृष्टी दिली. परंपरेतील जीर्णशीर्ण बंधनांतून मुक्त होऊ इच्छिणार्या आणि स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या जीवनमूल्यांचा पुरस्कार करणार्या नव्या क्षितिजावरील ध्येयधुंद युवामनाचे चित्र त्यांनी द्रष्टेपणाने आणि आत्मनिर्भर वृत्तीने रेखाटले.
केशवसुतांनी मनःपूत स्वीकारलेल्या मानवी मूल्यांविषयीचा विचार केवळ बहिर्मुखतेतून स्वीकारला होता की हे शब्दशिल्प अंतःप्रेरणेतून ओथंबलेले होते याच्या जागा त्यांच्या मूळ संहितेतून शोधाव्या लागतील.
शतकाहून अधिक काळ लोटल्यावरदेखील केशवसुतांनी मांडलेली भावसत्ये आजच्या जीवनातील मार्गदशक तत्त्वे म्हणून स्वीकारता येतात. त्यांत सुभाषितांचे सामर्थ्य आणि रमणीयत्व आजही आढळून येते म्हणजेच काळाच्या मुशीतून घडलेला तत्त्वचिंतक कवी केशवसुतांच्या व्यक्तिमत्त्वात ठासून भरलेला होता असा त्याचा अर्थ आहे.
त्यांनी श्रुतिसुभग आणि सांकेतिक शब्दांचा त्याग केला. गतिमान युगमानसाचे प्रामाण्य मानले. रूढी, अंधश्रद्धा, कर्मकांड यांवर हल्ला चढवला. माणसामधील ‘माणूस’ जाणण्याची संवेदनशीलता निर्माण करण्याचे कार्य केशवसुतांनी केले. त्यांच्या विचारशक्तीला विवेकाची मिती होती. संकुचिततावादाला थारा नव्हता. शब्दांचे जडजंबाल निर्माण न करता आपल्या मनातील भावनाशय साध्यासरळ शब्दांत पण तितक्याच उत्कटतेने मांडण्याची शक्ती होती.
जिकडे जावें तिकडे माझी भावंडे आहेत
सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत
कोठेंही जा - पायाखालीं तृणावृता भू दिसते
कोठेंही जा - डोईवरतें दिसतें नीलांबर तें!
या नवनिर्माणाची क्षमता असलेली संवेदनशीलता आणि शब्दशक्ती विधात्याने कवीला दिलेली आहे. याविषयीची आत्मनिर्भर वृत्ती व्यक्त करताना केशवसुत म्हणतात...
पद्यपंक्तीची तरफ आमुच्या करीं विधीनें दिली असे!
टेकुनि ती जनताशीर्षावरी जग उलथून या देऊं कसे!
आपल्या अंगीकृत कर्तव्याविषयीची आत्यंतिक निष्ठा व्यक्त करताना कवी उद्गारतो...
गाठ मारुनी वैराची गोफण केली छान
कठिण शब्द या धोंड्यांनी करितो हाणाहाण
‘तुतारी’, ‘स्फूर्ति’, ‘मूर्तिभंजन’, ‘नवा शिपाई’, ‘निशाणाची प्रशंसा’, ‘गोफण केली छान!’ आणि ‘रूढि-सृष्टि-कलि’ या केशवसुतांच्या सामाजिक आशयाच्या कवितांची मंथनप्रक्रिया समाजमानसात आकलन-आस्वादन-मूल्यमापन इत्यादी पद्धतींनी गेल्या सव्वा शतकापासून होत आलेली आहे. त्याविषयी मत-मतांतरे असली तरी या तेजस्वी विचारांच्या ठिणग्या आहेत. याविषयी दुमत होण्याचे कारण नाही.
या बुद्धिप्रामाण्यवादी विचारधारेमुळे समाजमानसातील हीन नाहीसे होण्याच्या प्रक्रियेला मोलाचा हातभार लागलेला आहे... पण अंतर्मुख होऊन विचार केला तर असे दिसून येते की, ती पृष्ठभागापुरती मर्यादित राहिली आहे. खोलवर झिरपलेली नाही. ज्या जातिवर्णाधिष्ठित आणि अभावग्रस्त समाजस्थितीच्या संदर्भात ‘अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न -’ आणि ‘मजुरावर उपासमारीची पाळी’ या कविता केशवसुतांनी लिहिल्या त्यातून त्यांचा समाजसन्मुख मनःपिंड दिसून येतो. ते काळाच्या कितीतरी पुढे होते असे म्हणावेसे वाटते.
‘गावी गेलेल्या मित्राची खोली लागलेली पाहून’ या कवितेत त्यांच्या संवेदनक्षम विद्यार्थिदशेतील संस्मरणे दिसतात. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्यासाने मित्रासमवेत कैक घटका केशवसुतांनी घालवल्या होत्या. त्यांचे पुनःस्मरण या कवितेत त्यांनी उत्कटपणे केले आहे.
तेव्हां आम्ही म्हटलें, ‘ही र्हासाची
रजनी केव्हां जाइल विरूनी साची?
स्वतंत्रतेची पहाट ती येईल,
उत्कर्षाचा दिन केव्हां सुचवील?
या डोळ्यांनी पहाय ती बघण्याचे
असेल का हो नशिबी दुर्दैव्याचे?
किंवा तींत आणायचें कांही
यत्न आमुच्या होतिल काय करांही?’
या कवितेत केशवसुतांनी स्व-भावनांबरोबरच तत्कालीन पिढीच्या भावस्पंदनांना वाट करून दिली आहे... त्यामुळे या कवितेला सामाजिक दस्तऐवजाचे मोल प्राप्त झाले आहे.
आम्हां डोळे नसति बघण्या पारतंत्र्यामुळें हो!
ऐकायाला श्रुतिहि नसती पारतंत्र्यामुळें हो!
(एका भारतीयाचे उद्गार)
या ओळींतूनही हाच भाव प्रकट होतो.
केशवसुतांनी आपल्या एकोणचाळीस वर्षांच्या आयुष्यात एकशे बत्तीस कविता लिहिल्या. हे अमर्याद क्षितिज आहे. व्यक्तिस्वातंत्र्याच्या युगाच्या पाऊलखुणा नुकत्याच दिसायला लागल्या होत्या. जॉन स्टुअर्ट मिलसारख्या विचारवंताने ‘ऑन लिबर्टी’ या ग्रंथामधून हा विचार अधोरेखित केला होता. केशवसुतांच्या आत्मपर कविता या दृष्टीने विचारात घ्यायला हव्यात. त्यांनी प्रेभभावनेचा मुक्त आविष्कार केला आहे. शारीर प्रेमाला त्यांनी नाकारलेले नाही.
केशवसुतांनी काही चिंतनशील वृत्तीच्या आणि गूढगुंजनपर कविता लिहिल्या आहेत. ‘झपूर्झा’, ‘सतारीचे बोल’, ‘हरपलें श्रेय’, ‘वातचक्र’ आणि ‘म्हातारी’ या कविता या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. गूढगंजनपर कवितेतील आशय सामान्य पातळीवर राहू शकत नाही. शब्द-अर्थ-भाव यांच्यापलीकडे जाऊन तात्त्विक अंगाने जीवनाचा गूढार्थ सांगण्याची प्रेरणा तिच्यात असते.
उदाहरणार्थ- ‘झपूर्झा’ या कवितेत लौकिकाच्या सीमारेषेपलीकडील भावावस्थेचे चित्र कवीने चित्रित केले आहे. चिद्शक्तीच्या परमोच्च बिंदूपर्यंत पोहोचल्यावर उन्नयनशील आत्म्याच्या अंतरंगात कोणते तरंग उमटतात याचे वर्णन केशवसुत तन्मयतेने करतात. अर्थात आध्यात्मिक अंगाने या कवितेकडे पाहायचे नसून विशुद्ध काव्यानंदाच्या पराकोटीच्या अवस्थेचा हा शोध आहे. ही जाणीव मनाशी बाळगून तिचा आस्वाद घ्यायचा असतो.
या कवितांविषयीचा विचार स्वतंत्रपणे करणे अधिक योग्यच. मराठी समीक्षेत प्रा. भवानीशंकर पंडित, दि. के. बेडेकर आणि प्रा. वसंत दावतर इत्यादी नामवंत समीक्षकांनी तो केलेला आहे.
केशवसुतांनी ‘स्वर्ग, पृथ्वी आणि माणूस’, ‘कल्पकता’, ‘सृष्टी, तत्त्व आणि दिव्य दृष्टी’, ‘कविता आणि कवी’, ‘क्षणांत नाहीसे होणारे दिव्य भास’, ‘प्रतिभा’, ‘फिर्याद’, ‘आम्ही कोण’, ‘कवितेचे प्रयोजन’, ‘रुष्ट सुंदरीस’, ‘काव्य कोणाचें’ आणि ‘कवी’ इत्यादी काव्यविषयक चिंतन करणार्या कविता केल्या आहेत.
सर्जनप्रक्रियेविषयीची नवी जाणीव व्यक्त करणारे आधुनिक मराठी काव्यपर्वातील ते पहिले कवी. प्रतिभा ही दिव्य शक्ती आहे. जे मृण्मय आहे ते हिरण्मय करण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे. या दृष्टीने केशवसुतांनी कवितेशी तसाच रसिकांशी केलेला हृदयसंवाद हा विस्ताराने सांगण्यासारखा विषय आहे. काव्यदेवतेविषयीची त्यांची निष्ठा शब्दातीत आहे.
केशवसुतांच्या कवित्वशक्तीचे आणखी एक विलोभनीय रूप म्हणजे त्यांच्या आत्मचरित्रपर स्वरूपाच्या ‘गोष्टी घराकडील’, ‘आईकरिता शोक’ व ‘दुर्मुखलेला’ या कविता. ‘नैर्ऋत्येकडील वारा’ या कवितेतही गहिरे आत्मरंग मिसळलेले आहेत... पण आपल्या परिसरातील निसर्गाचे रंगविभ्रम तन्मयतेने रेखाटणारी अशी ती कविता आहे. त्या अर्थाने ती निसर्गानुभूतीची कविता आहे.
मालगुंडच्या भूमीशी, तिथल्या सह्यगिरीच्या पायथ्याशी, समुद्राशी, घनदाट जंगलांशी आणि वृक्षवल्लरींशी केशवसुतांचे भावबंध जडलेले आहेत. वैचारिकदृष्ट्या केशवसुतांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे तत्कालीन प्रबोधनाचे अपत्य आणि भावनिकदृष्ट्या तिथल्या निसर्गसंपदेचे तसेच सांस्कृतिक संचिताचे देणे. या दोन्हींचा संयोग घडून आल्यामुळे केशवसुतांचा आत्मस्वर मराठी काव्यजगतालाच नव्हे तर मराठी साहित्यविश्वाला ऐकू आला.
‘नैर्ऋत्येकडील वारा’ या कवितेचा मनःपूत आस्वाद घेताना त्या काळाची आणि त्या परिसराची गुंजने स्पष्ट ऐकू येतात आणि आत्मानंदाची लय आपल्याही मनावर पसरते. कवी आणि रसिक यांच्या संवादाचा हा आनंदमय क्षण होय.
- डॉ. सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा.
somnathpant@gmail.com
Tags: सोमनाथ कोमरपंत व्यक्तिवेध केशवसुत कविता Somnath Komarpant Keshavsut Marathi Load More Tags
Add Comment