मराठीतले ऋषितुल्य साहित्यिक वि. स. खांडेकर यांची आज 44वी पुण्यतिथी. 19 व्या शतकाचा अस्त होत असताना 11 जानेवारी 1898 रोजी त्यांचा जन्म झाला. उणेपुरे 78 वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. प्रकृतिअस्वास्थ्याने त्यांना जीवनाच्या मध्यावधीपासूनच छळले... पण शारीरिक आधिव्याधींवर मात करून त्यांनी आपले लेखनव्रत चालू ठेवले. दृष्टी अधू झाल्यामुळे त्यांना लेखनिकांचे साह्य घ्यावे लागले... पण त्यांची चिंतनशीलता अभंग राहिली. वाङ्मयनिर्मितीचा ध्यास आणि साहित्यकृतींचा अभ्यास कायम राहिला.
कथा, कादंबरी, कविता, नाटक, वैचारिक निबंध, लघुनिबंध, समीक्षा, व्यक्तिचित्रे, विनोद, अनुवाद अशा अनेक वाङ्मयप्रकारांत त्यांनी विपुल लेखन केले. मराठी कथाक्षेत्रात रूपककथेचा प्रयोग करण्यात त्यांचे योगदान फार मोठे आहे. त्यांनी पटकथा लिहिल्या. मराठीतल्या प्रथितयश लेखककवींच्या पुस्तकांना प्रारंभकाली अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहून त्यांनी पाठराखण केली. त्या किती पथदर्शक होत्या हे आपण मराठी वाङ्मयेतिहासाच्या पाऊलखुणा न्याहाळताना अजमावून पाहू शकतो... पण त्यासाठी पूर्वग्रहविरहित दृष्टी हवी. वाङ्मयाकडे पाहण्याचा निखळ अन् वस्तुनिष्ठ दृष्टीकोन हवा.
ज्या काळात विश्वसाहित्याचा चोखंदळपणे धांडोळा घेतला जात नव्हता त्या काळात खांडेकरांनी विपुल वाचन केले. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत. हा साहित्यकृतींचा रसास्वाद त्यांना वाचकांच्या मनापर्यंत पोहोचवावासा वाटला. गतिमान काळात पिढीनुसार मते बदलतात, वाङ्मयाभिरुची बदलते, संवेदनशीलता बदलते, भाषा नवी रूपकळा धारण करते... यात गैर काहीच नाही. ती काळाची अटळ प्रक्रिया आहे... पण वाङ्मयीन परंपरेचे काही मानदंड असतात. डोळस परिशीलनाने त्यांच्या विचारांतले सत्त्व स्वीकारण्याची मानसिकता आपल्याकडे असायला हवी. यातूनच नवतेच्या वाटांचा शोध घेता येतो. आपल्याला नव्या क्षितिजांकडे झेप घेता येते.
वि. स. खांडेकरांनी त्यांच्या अथक जीवनप्रवासातल्या साहित्यसाधनेतून आपल्याला काय दिले? खांडेकरांनी आपल्याला हे आत्मभान दिले. समाजभान दिले. ही तरफ लेखककवींनी आजच्या युगातही सांभाळायला हवी हे वेगळे सांगायला नको. साहित्यनिर्मिती ही नीतिनिरपेक्ष, प्रचारी मूल्ये न मानणारी आणि कलात्मक सत्य मांडणारी हवी याविषयी दुमत होण्याचे फारसे कारण नाही... पण साहित्यनिर्मितीचा ध्यास अंतिमतः राष्ट्रनिर्मितीच्या विधायकतेशी जोडलेला असतो याचे विस्मरण होता कामा नये. यासंदर्भात आपल्याला वि. स. खांडेकर, साने गुरुजी, आचार्य विनोबा भावे, आचार्य शं. द. जावडेकर, कुसुमाग्रज, नानासाहेब गोरे आणि प्रा. ग. प्र. प्रधान या व्यक्ती का आठवाव्यात?
वि. स. खांडेकरांनी सर्जनशील साहित्यनिर्मितीबरोबर आपली लेखणी आणि वाणी यांच्या साहाय्याने सर्जनात्मक वृत्तिप्रवृत्तींना पोषक असे पर्यावरण निर्माण केले. मे. द. शिरोडकर स्वातंत्र्यसंग्रामात व्यग्र असताना खांडेकरांनी ‘वैनेतेय’ साप्ताहिकाला आधार दिला. समानधर्मी साहित्यिक मित्रांसह ‘ज्योत्स्ना’ या वाङ्मयीन नियतकालिकाच्या संपादनकार्यात त्यांनी भाग घेतला. ‘भौतिक समृद्धीच्या झगमगाटात मानवतेच्या मूल्यांचा नंदादीप विझू देऊ नका.’ हा त्यांचा अंतःसूर वेळोवेळी प्रकट होत राहिला. बदलत्या मूल्यांच्या होरपळीत सर्जनशीलतेची अमृतवेल त्यांनी सुकू दिली नाही.
कठोर वास्तवाच्या अनुभूतीचा स्पर्श त्यांच्या संवेदनशील मनाला झाला होता... पण जीवनश्रद्धेचे उत्कट रंग देऊन आणि नव्या स्वप्नांचे पंख देऊन खांडेकरांनी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी मनाला संजीवक शक्ती दिली. हे मन अस्सल भारतीय असल्यामुळे मराठी वाचकवर्गाबरोबर अन्य भाषकही त्यांच्या साहित्याकडे आकृष्ट झाले. त्यांच्या मृत्यूनंतरही हा प्रभाव कायम राहिला. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाचा मराठी विभाग आणि साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या चर्चासत्रात गुजराती, तमीळ, मल्याळम, तेलुगु आणि अन्य भाषांतले साहित्यिक आले होते. खांडेकर हे आम्ही आमचेच लेखक मानतो असे उद्गार त्यांनी मुक्त मनाने काढले होते. खांडेकरांच्या ‘कांचनमृग’, ‘अश्रू’ आणि ‘क्रौंचवध’ यांसारख्या कादंबऱ्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात प्रेरणास्रोत होऊन राहिल्या होत्या.
वि. स. खांडेकरांच्या वाङ्मयीन पैलूबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातल्या शिक्षकाच्या तेजस्वी पैलूचा संदर्भ ध्यानात घ्यायला हवा. खांडेकरांच्या लौकिक जीवनाची होरपळच झाली. 1913मध्ये मॅट्रिकच्या परीक्षेत आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या या बुद्धिमान विद्यार्थ्याच्या जीवनात दुर्दैवाची मालिकाच सुरू झाली. फर्ग्युसन महाविद्यालयासारख्या नामांकित शिक्षणसंस्थेत इंटरच्या वर्गात असताना प्रा. वा. ब. पटवर्धन, डॉ. गुणे यांच्यासारख्या प्राध्यापकांनी त्यांच्यावर वाङ्मयीन संस्कार केले. इथल्या वास्तव्यात राम गणेश गडकरी, बालकवी, गणपतराव बोडस, अच्युतराव कोल्हटकर, का. र. मित्र या नामवंतांशी त्यांचा परिचय झाला... पण त्यांचे अचानक दत्तकविधान झाल्यामुळे त्यांना पुणे सोडून कोकणात नानेलीला यावे लागले. त्यांचा शिक्षणक्रम तर खंडित झालाच... शिवाय दत्तक पित्याला त्यांच्या भवितव्याविषयी स्वारस्य वाटले नाही... पण शिरोड्याला ते शिक्षक म्हणून आल्यामुळे त्यांच्या जीवनाला नवी मिती मिळाली.
शिरोडा ही त्यांच्या दृष्टीने प्रयोगभूमी ठरली. एक शिक्षक आणि मुख्याध्यापक या नात्याने ‘ट्युटोरियल इंग्लिश स्कूल’ या शिक्षणसंस्थेला त्यांनी नवी उभारी प्राप्त करून दिली. तिथल्या जनसामान्यांच्या शिक्षणविषयक गरजा त्यांनी भागवल्या. नवी इमारत उभी करण्याचे आव्हान पेलले. तिथल्या जनजीवनाशी ते एकरूप झाले. 1920 ते 1938 या काळात ते शिरोड्याला होते. उत्तम शिक्षक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. विद्यार्थ्यांवर त्यांनी निरतिशय प्रेम केले. त्यांच्या वाङमयीन कर्तृत्वाच्या बहराचा हा काळ होय. शिरोड्याच्या वास्तव्यात भेटलेल्या माणसांनी खांडेकरांच्या साहित्यप्रवासाला जीवनरस पुरवला. शिरोड्याविषयीची कृतज्ञतेची भावना शेवटपर्यंत त्यांच्या अंतःकरणात कायम होती.
शिरोड्याच्या वास्तव्यातल्या उत्तरार्धात नाडकर्णी वाड्यातल्या रेगे यांच्या घरात खांडेकर राहत असत. त्यांच्या घराने मराठी साहित्यक्षेत्रातल्या आणि नाट्यक्षेत्रातल्या थोरामोठ्यांचे स्वागत केले. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, तात्यासाहेब केळकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, कविवर्य यशवंत, माधव जूलियन, गिरीश, कृ. बा. मराठे, प्रि. गो. चिं. भाटे, आचार्य अत्रे, मास्टर विनायक आणि बाबूराव पेंढारकर यांचे पाय शिरोड्याला लागले. खांडेकरांवरच्या अकृत्रिम लोभामुळे आणि उत्कट साहित्यप्रेमामुळे ही सारी मंडळी इथे आली. बा. भ. बोरकरांच्या काव्यमैफली इथे रंगल्या. ती संस्मरणे बा. भ. बोरकरांनी ‘एका पिढीचे आत्मकथन’ या वा. रा. ढवळे गौरवग्रंथामध्ये आणि त्यानंतर ‘कौतुक तूं पाहे संचिताचें’ या आपल्या आत्मचरित्रामध्ये जागवली आहेत.
1920 ते 1930 या दशकातल्या ललित वाङ्मयाच्या उत्कर्षाला मासिकांची फार मदत झाली. मासिक ‘मनोरंजना’चा 1908-1918 या काळातला बहर नंतरच्या काळात ओसरला होता... पण त्याची उणीव ‘उद्यान’, ‘नवयुग’, ‘अरविंद’, ‘महाराष्ट्र साहित्य’, ‘रत्नाकर’, ‘यशवंत’ व ‘किर्लोस्कर’ या मासिकांनी भरून काढली. लेखकांच्या नव्या पिढीला त्यांनी प्रोत्साहन दिले. खांडेकरांनी याच कालखंडात लिहायला सुरुवात केली. गडकऱ्यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने निघालेल्या ‘नवयुग’च्या खास अंकासाठी ‘हा हन्त हन्त’ हा लेख खांडेकरांनी लिहिला. तो श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांना आवडला. त्यांनी आस्थापूर्वक पत्र लिहून चौकशी केली. लिहायला लागल्यापासून त्यांनी कोल्हटकरांना एकलव्यनिष्ठेने गुरू मानलेच होते. त्याला आता खरा अर्थ प्राप्त झाला. ‘श्रीपाद कृष्णांच्या गादीचे वारस’ असा त्यांचा नावलौकिक साहित्यजगतात होऊ लागला.
शिरोड्याचा समुद्रकिनारा आणि भिकेडोंगरीची टेकडी खांडेकरांना अत्यंत प्रिय होती. ही स्थळे त्यांच्या चिंतनशील प्रतिभेला आवाहन करायची. त्यांच्या ध्येयप्रवण मनातल्या वाङ्मयीन संकल्पांना आणि साहित्यनिर्मितिपूर्व मानसिक अस्वस्थतेच्या क्षणांना त्यांची साक्ष होती. निसर्गसहवास हा त्यांच्या साहित्यनिर्मितीला प्रेरक ठरणारा घटक होता.
कादंबरीलेखनामुळे वि. स. खांडेकरांचा नावलौकिक वाढला. आपल्या काळाच्या स्पंदनांशी ते प्रामाणिक राहिले. कादंबरीकार खांडेकर हा स्वतंत्र विवेचनाचा विषय आहे... पण त्याची तोंडओळख करून घेणे क्रमप्राप्त आहे. जीवनातील भव्य, दिव्य आणि उदात्त जे आहे ते खांडेकरांना स्वीकारावेसे वाटे. श्रीपाद कृष्णांना त्यांनी गुरुस्थानी मानले खरे... पण त्यांनी आपली श्रद्धास्थाने तेवढ्यापुरती मर्यादित ठेवली नाहीत. कादंबरीक्षेत्रात त्यांना हरी नारायण आपटे आदर्श वाटत. नाट्यक्षेत्रात राम गणेश गडकरी आणि कवितेच्या क्षेत्रात केशवसुत. वैचारिक क्षेत्रात त्यांना गोपाळ गणेश आगरकर आदरणीय वाटायचे. त्यांची बुद्धिप्रामाण्यवादी विचारधारा आणि समाजप्रबोधनाची अंतःप्रेरणा घेऊन ते कादंबरी क्षेत्रात उतरले.
1930मध्ये ‘हृदयाची हाक’ लिहून त्यांनी कादंबरीक्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले. त्यानंतर ‘कांचनमृग’ (1931), ‘दोन ध्रुव’ (1934), ‘उल्का’ (1934), ‘हिरवा चाफा’ (1938), ‘रिकामा देव्हारा’ (1939), ‘सुखाचा शोध’ (1939), ‘पांढरे ढग’ (1939), ‘पहिले प्रेम’ (1940), ‘जळलेला मोहर’ (1941), ‘क्रौंचवध’ (1942), ‘नवी स्त्री’ (अपूर्ण, 1950), ‘अश्रू’ (1954), ‘ययाती’ (1959), ‘अमृतवेल’ (1967) आणि ‘सोनेरी स्वप्नं भंगलेली’ (अपूर्ण, 1977) अशा सतरा कादंबऱ्या लिहिल्या. मराठी कादंबरीत स्वतःचे ‘खांडेकर युग’ निर्माण केले.
परिणतप्रज्ञ अवस्थेत लिहिलेल्या ‘ययाती’ आणि ‘अमृतवेल’ या कादंबऱ्यांचा गौरव केवळ मराठी साहित्यजगतात नव्हे... तर भारतीय स्तरावरही झाला. आपल्या जीवननिष्ठांचा उच्चार आणि आयुष्यभराच्या चिंतनाचे सार त्यांनी या कादंबऱ्यांतून मांडले. ‘ययाती’ची मूळ कथा महाभारतातली असली तरी आधुनिक जगातल्या माणसाच्या प्रश्नांशी निगडित राहून खांडेकरांनी तिची मांडणी केली. एका परीने समकालीन जीवनावर आधारलेले प्रमेयात्मक स्वरूपाचे तिचे आशयसूत्र आहे. आजच्या भौतिक समृद्धीच्या काळातल्या उपभोगवादी वृत्तीवरचे ते कलात्म भाष्य होय. ‘खांडेकरांची ‘ययाती’ ही अशी आधुनिक माणसाच्या नव्या आकांक्षांची कथा आहे’ असे प्रा. नरहर कुरुंदकरांना वाटते. प्रेम मानवी जीवनातली अमृतवेल असून नवस्वप्नांचा ध्यास असेल तर ती बहरल्याशिवाय राहत नाही हे आशयसूत्र ‘अमृतवेल’मधून अधोरेखित होते.
एक काळ असा होता की, खांडेकरांच्या कादंबरीवाचनाने तत्कालीन तरुणवर्गाला भारावून टाकले होते. स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेण्यासाठी अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली होती. आपण राजकीय, सामाजिक चळवळीत आले पाहिजे असे प्रा. ग. प्र. प्रधानांना ‘उल्का’ वाचून वाटायला लागले होते. जयप्रकाश नारायणांसारख्या राष्ट्रीय नेत्याला खांडेकरांच्या कादंबऱ्या प्रभावी वाटल्या होत्या. ध्येयवादी तरुणांची अंतर्धुनी प्रज्वलित करण्याचे कार्य खांडेकरांनी केले हे निश्चित.
कालौघात निर्माण झालेल्या नव्या जाणिवांबरोबर, मतप्रवाहांमुळे खांडेकरांची आशयसूत्रे, निवेदनपद्धतीतली आलंकारिकता, कोटिबाज रचना, जीवनजाणिवेचे आकलन यांसंबंधी प्रतिकूल टीका भरपूर प्रमाणात झालेली आहे... पण ही टीका त्या काळाच्या संदर्भात विचारात घेऊन ती तारतम्याने स्वीकारायला हवी.
1946 ते 1976 या कालावधीत वि. स. खांडेकरांनी कथालेखन केले. त्यांचे ‘भाऊबीज’, ‘स्वप्न आणि सत्य’, ‘विकसन’ आणि ‘सरत्या सरी’ हे चार कथासंग्रह प्रसिद्ध झाले. ‘क्षितिजस्पर्श’ हा त्यांच्या रूपककथांचा संग्रह आहे. वृत्तिगांभीर्याने लिहिलेल्या त्यांच्या या कथेत ओ हेन्रीचे कलाटणी तंत्र, चेकॉव्हची चिकित्सक वृत्ती, फ्रॉईडचे मनोविश्लेषण, कार्ल मार्क्सचा समाजसत्तावाद, महात्मा गांधींची मूल्यधारणा आणि समाजवादाची मूलतत्त्वे इत्यादी वृत्तिप्रवृत्तींचा आणि विचारप्रवाहांचा समवाय आढळतो. सुरुवातीच्या त्यांच्या काही कथा नर्मविनोदी होत्या. नंतरच्या कथांचे वळण अधिकाधिक अंतर्मुख करणारे ठरले. त्यांच्या रूपकात्मक कथेत अल्पाक्षररमणीयत्व, प्रतीकात्मकता आणि चिंतनगर्भता ही गुणवैशिष्ट्ये आढळतात.
लघुनिबंधकार या नात्याने खांडेकरांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. ‘मराठी लघुनिबंधाचे जनक कोण?’ या वादविषयाला स्पर्श न करता खांडेकरांनी आपल्या उत्कट आत्माविष्कारामधून कल्पनाशक्ती, अभिजातता आणि चिंतनगर्भ शैली या गुणविशेषांमुळे मराठीतल्या लघुनिबंधाला समृद्ध केले असे निर्विवादपणे म्हणता येईल. त्यांच्या भाषाप्रभुत्वाचे किती नमुने करावेत? खांडेकरांचा आत्माच इथे बोलतो, ‘माणूस’ हा त्यांच्या चिंतनाचा केंद्रबिंदू आहे याची प्रचिती इथे येते. खांडेकर हे शिक्षक तर होतेच; इथे तर ते समाजशिक्षकाची व्यापक भूमिका स्वीकारतात.
लघुनिबंध हा सैलसर वाङ्मयप्रकार मानला जातो... पण इथे तो मुक्त मनाचा मनमोकळा आविष्कार झाल्यामुळे आपाततः त्याला स्वतःचे असे सौष्ठव प्राप्त झाले आहे. रामायण-महाभारतासारख्या आर्ष महाकाव्यातले संदर्भ, भास-भवभूती-कालिदास यांच्या अभिजात काव्यातले संदर्भ, बाणभट्टाच्या ‘कादंबरी’तले संदर्भ आणि किर्लोस्कर-देवल-खाडिलकर-कोल्हटकर-गडकरी यांच्या नाट्यसंपदेचे झालेले संस्कार यांमुळे वि. स. खांडेकरांचे भावचिंतन चिररुचिर झालेले आहे.
खांडेकरांनी हाताळलेल्या ललित वाङ्मयप्रकारांइतकेच त्यांचे समीक्षालेखन विलोभनीय स्वरूपाचे झालेले आहे. त्यांनी वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वांसंबंधी लिहिले, ग्रंथाविषयी तर विपुल लिहिले. याबाबतीत ते चतुःसीमादेखील उल्लंघून गेले. समाजप्रबोधनकारांविषयी त्यांनी आत्मीयतेने लिहिले. जीवन आणि कला यांच्यातला समवाय त्यांनी मान्य केला होता. जीवनाच्या समग्रतेची पक्की बैठक मारूनच त्यांनी आपल्या आयुष्यभराचा प्रचंड लेखनप्रपंच मांडला. याबाबतीत आपली लेखणी प्रारंभीच्या काळात धारदार होती, क्रमाक्रमाने ती सौम्य होत गेली हे त्यांनी स्वतःच कबूल केले आहे. त्याची कारणेही त्यांनी विशद केली आहेत. यावरून कठोर आत्मविश्लेषण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती असे दिसून येते. ‘बाल वॉशिंग्टनप्रमाणे आपण कुऱ्हाड चालविली’ असे ते म्हणतात.
‘गडकरी - व्यक्ती आणि वाङ्मय’, ‘आगरकर - चरित्र, व्यक्ती व कार्य’ आणि ‘केशवसुत - काव्य आणि कला’, ‘वामन मल्हार जोशी - व्यक्ती आणि विचार’, आणि ‘मराठीचा नाट्यसंसार’ यांसारख्या समीक्षाग्रंथांतून त्यांनी आपल्या चिकित्सक आणि व्यासंगी वृत्तीचा प्रत्यय आणून दिला. ‘वनभोजन’, ‘धुंधुर्मास’, ‘रेषा आणि रंग’ आणि ‘रंग आणि गंध’ यांसारख्या आस्वादक अंगाने विविधतापूर्ण साहित्यकृतींचा परामर्श घेणाऱ्या ग्रंथांमुळे साहित्यविश्वात त्यांना फार मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली. परिणतावस्थेत त्यांनी ‘एका पानाची कहाणी’ हे आत्मचरित्र लिहिले. ते अत्यंत वाचनीय आहे.
या साऱ्या लेखनगुणांबरोबरच ते प्रभावी वक्तेही होते. आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनामुळे आणि वाङ्मयीन संदर्भ देत बोलण्यामुळे ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांच्या भाषणांचे संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. वि. स. खांडेकरांच्या लेखनातल्या अपूर्व यशामुळे त्यांना अमाप लोकप्रियता प्राप्त झाली. लोकमान्यतेबरोबर त्यांना राजमान्यताही मिळाली.
मडगावला 1935मध्ये झालेल्या पहिल्या ‘गोमंतक मराठी साहित्यसंमेलना’चे ते अध्यक्ष झाले. सोलापूर इथे 1941मध्ये भरलेल्या अ. भा. मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान त्यांना प्राप्त झाला. 1968मध्ये त्यांना भारत सरकारने ‘पद्मभूषण’ या पदवीने गौरवले. 1974मध्ये खांडेकरांच्या रूपात मराठीला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाबद्दल ‘साहित्य अकादमी’ने त्यांना फेलोशिप बहाल केली. 1976मध्ये शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. पदवी प्रदान केली.
शिवाजी विद्यापीठाने खांडेकर कुटुंबीयांच्या साह्याने डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली ‘वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय’ 2004मध्ये उभे केले आहे. साहित्यिकाचे उचित स्मारक कसे असावे याचा तो आदर्श नमुना आहे. ‘खांडेकर रजतस्मृती’चा प्रकल्प म्हणून खांडेकरांचं अप्रकाशित साहित्य २५ नव्या पुस्तकांद्वारे डॉ. लवटे यांच्या अथक परिश्रमांमुळे प्रकाशित झाले आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने ते प्रकाशित केले आहे.
- डॉ. सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा.
somnathpant@gmail.com
Tags: मराठी सोमनाथ कोमरपंत वि. स. खांडेकर Literature Marathi Somnath Komarpant Vi Sa Khandekar V. S. Khandekar Load More Tags
Add Comment