प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांच्या 111 व्या जयंतीच्या निमित्ताने ‘धवलरेषा’ हा त्यांच्याविषयीच्या आठवणींचा, छायाचित्रांचा आणि त्यांच्या कुंचल्यातून साकार झालेल्या निसर्गचित्रांचा संग्रह असलेल्या ग्रंथ प्रकाशित झाला. त्यांचे जामात चित्रकार प्रा. किसन कामत यांनी त्याचे कुशलतेने संपादन केले आहे. उत्कृष्ट निर्मितीमूल्ये असलेल्या या ग्रंथाला ‘स्मृतिग्रंथ’ न म्हणता त्यांनी ‘रंगग्रंथ’ म्हटले आहे. ते सर्वार्थाने सार्थ वाटते. कारण तो मुळात रंगविभ्रमांनी विनटलेला आहे. तो हातात घेताक्षणीच प्रा. प्रल्हाद अनंत धोंड या मनस्वी व्यक्तीच्या अनेक आठवणी मनात जाग्या होतात.
प्रा. प्रल्हाद अनंत धोंड हे प्रख्यात निसर्गचित्रकार. ते मूळचे मालवणचे. तेथील समुद्राची विलसिते पाहून, निसर्गापासून प्रेरणा घेऊन आणि तिथल्या भूमीतील कलासंस्कार घेऊन संवेदनक्षम वयातच त्यांनी चित्रकलेच्या साधनेस प्रारंभ केला. नंतर मुंबईच्या ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मध्ये त्यांनी शिक्षण घेतले. त्याच संस्थेमध्ये चित्रकलेचे उत्तम अध्यापक असा नावलौकिक मिळवला. पुढे जे. जे. स्कूलचे ते अधिष्ठाता (डीन) झाले. ‘कलेचा इतिहास आणि मानसशास्त्र’ हे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करून त्यांनी महत्त्वपूर्ण भर घातली. महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालयाच्या संचालकपदाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली.
मुंबईच्या विराट विश्वात ते आत्मविश्वासाने वावरले. त्यांचा मित्रपरिवार फार मोठा होता. जीवनाच्या सर्व क्षेत्रांतील अभिरुचिसंपन्न मित्रांच्या या मांदियाळीत ते मनापासून रमले. आपल्या कलासंपन्न जीवनाचा लाभ त्यांनी तन्मयवृत्तीने आपल्या विद्यार्थ्यांना करून दिला. 92 वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. त्यांच्या जीवनाचा कलासंपन्न कलश अखेरच्या क्षणापर्यंत चैतन्याने ओसंडत राहिला. असे भाग्य अवघ्याच व्यक्तींना लाभत असते.
गोवा ही त्यांची पूर्वजांची, कुलदैवताची भूमी. या भूमीविषयी, येथील निसर्गाविषयी त्यांना फार ओढ. त्यांच्या शब्दाशब्दांमधून ती व्यक्त व्हायची. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात एक निरागस मूल दडलेले होते. तल्लख स्मरणशक्तीची देणगी त्यांना लाभलेली होती. ‘रापण’ या मौज प्रकाशन गृहाने प्रकाशित केलेल्या आत्मचरित्राला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगस्पर्श झालेला आहे. मराठीतील वाचनीय आत्मचरित्रांपैकी ते एक आहे. शिवाय गतकाळाचा समृध्द पट त्यात येऊन जातो.
प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांच्या 111 व्या जयंतीच्या निमित्ताने 2019 मध्ये ‘धवलरेषा’ हा त्यांच्याविषयीच्या आठवणींचा, छायाचित्रांचा आणि त्यांच्या कुंचल्यातून साकार झालेल्या निसर्गचित्रांचा संग्रह असलेल्या ग्रंथ प्रकाशित झाला. त्यांचे जामात चित्रकार प्रा. किसन कामत यांनी त्याचे कुशलतेने संपादन केले आहे. उत्कृष्ट निर्मितीमूल्ये असलेल्या या ग्रंथाला ‘स्मृतिग्रंथ’ न म्हणता त्यांनी ‘रंगग्रंथ’ म्हटले आहे. ते सर्वार्थाने सार्थ वाटते. कारण तो मुळात रंगविभ्रमांनी विनटलेला आहे. तो हातात घेताक्षणीच प्रा. प्रल्हाद अनंत धोंड या मनस्वी व्यक्तीच्या अनेक आठवणी मनात जाग्या होतात.
ग्रंथाच्या अंतरंगात प्रवेश केल्यावर धोंड सरांकडून चित्रकलेचे संस्कार घेतलेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि सहवासात आलेल्या सुहृदांनी एक कलातपस्वी म्हणून, जीवनावर मन:पूत प्रेम करणारा माणूस म्हणून, कुटुंबवत्सल वक्ती म्हणून त्यांच्या विलोभनीय व्यक्तिमत्त्वाचे समरसून चित्रण केलेले आढळून येते. अनेक व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने मोठ्या होतात. पण आपणासारखी अन्य माणसे घडविण्याची प्रेरणा आणि धारणा फार थोड्या व्यक्तींमध्ये असते. प्रा. धोंड अशा अपवादभूत व्यक्तींपैकी एक आहेत हे जाणवते. ज्या नामवंत चित्रकारांनी प्रा. धोंड यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परामर्श घेतला आहे, त्यापैकी बहुतांश ‘जे. जे.’चे विद्यार्थी आहेत. शिवाय त्या प्रत्येकाला स्वत:ची अशी ओळख आहे.
प्रा. धोंड यांच्या निसर्गचित्रातील धवलरेषा वैशिष्ट्यपूर्ण असायची त्यामुळे या ‘रंगग्रंथा’ला ‘धवलरेषा’ हे दिलेले नाव त्यांच्या कलात्म व्यक्तिमत्त्वाचा मर्मबंध पकडणारे आहे, असे वाटते.
प्रा. प्रभाकर कोलते यांनी ‘अद्भूत अधिष्ठाता आणि प्रतिभाशाली चित्रकार’ या लेखात सुरुवातीला लिहिले आहे, ‘‘धोंड सरांना आठवावे लागत नाही. ते माझ्या, त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांच्या आठवणींच्या कोशात कायमचे विराजमान झाले आहेत. एखादे उत्कृष्ट निसर्गचित्र किंवा पावसाळ्याच्या दिवसांत निसर्गातील एखादी झलक पाहिली की ते आमच्या आठवणींच्या कोशातून बाहेर येतात. आम्हाला निसर्गचित्राविषयीच्या खास कथा शब्दांशिवाय सांगतात.’’
अगदी खरे आहे हे! कवीने शब्दांच्या माध्यमातून साकार केलेल्या काव्यातून नेमकी अशीच अनुभूती मनात स्मरणोज्जीवित होत असते. माध्यम भिन्न असले तरी परिणाम तोच असतो.
'जे जे स्कूल'मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंसमवेत धोंड सर
सरांच्या स्वभावातील बारकाव्यांचे चित्रण करताना कोलते म्हणतात, ‘‘ते मनस्वी वृत्तीचे शिक्षक होते. त्यांचे आम्हा विद्यार्थ्यांशी असलेले नाते समवयस्क मित्रासारखे होते. त्यांना ऐकताना आम्हाला वर्गामध्ये तर घरातच असल्यासारखे वाटे. एखाद्या चित्राचे किंवा प्रसंगाचे वर्णन ते अभिनयपूर्ण आविर्भावात असे काही करत की, ते आम्हाला त्यांच्यासोबत त्यांच्या भूतकाळात घेऊन जात.’’ इथे कोलते यांनी त्यांच्या कलादृष्टीचा मर्मदृष्टीने घेतलेला मागोवा अधोरेखित करावासा वाटतो, ‘‘कोकणानेच त्यांच्यातील निसर्ग जागा केला असावा. भातशेतीचं हिरवेपण आणि त्याच्या विविध छटा, उंच-उंच माड आणि त्यांच्या सावली देणाऱ्या पसरट झावळ्या, फेसाळत किनाऱ्यावर येणाऱ्या लहान-मोठ्या लाटा आणि घोंघावणाऱ्या वाऱ्याच्या आवाजाला खडकाळ किनाऱ्याकडून मिळणारी नैसर्गिक संगीताची साथ, चालणाऱ्यांच्या पायांना रुतण्याचे आमंत्रण देणारी मऊ-मऊ वाळू आणि देवीदेवतांवर आधारित सादर केले जाणारे गावकऱ्यांचे ‘खेळे’ इत्यादी सर्व सरांच्या कल्पनाविश्वाचा तथा सांस्कृतिक अस्तित्वाचा अविभाज्य भाग होता.’’
त्यांनी पुढे म्हटले आहे, ‘‘सरांचा मास्टर स्ट्रोक म्हणजे त्यांनी लिहिलेले ‘रापण’ हे अभिजात पुस्तक. स्वत:मधल्या कलावंताचे बहुरूपी दर्शन तर त्यातून होतेच, त्याचबरोबर त्यांनी बहुमिती शोध घेतलाय तो आपल्या सहकाऱ्यांच्या स्वभावांचा, गुणांचा आणि कर्तृत्वाचा. त्यांनी शब्दांनी रेखाटले आहे, सहकाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे, त्यांच्यातल्या मनुष्यत्वाचे, सात्विकतेचे आणि त्यांच्यातल्या विकसनशील चित्रकाराचे चित्र.’’ हे सारे वाचताना प्रा. कोलते यांच्या ‘मास्टर स्ट्रोक’चीही झलक पाहायला मिळते.
‘श्रेष्ठ जलरंगचित्रकार’ या लेखात प्रा. डॉ. नलिनी भागवत यांनी सुरुवातीलाच संक्षेपाने आणि साक्षेपाने धोंड सरांची कलावैशिष्ट्ये टिपलेली आहेत. त्या लिहितात, ‘‘कला विद्यार्थ्यांमध्ये आपल्या खेळकर स्वभावामुळे व संभाषणचातुर्यामुळे (ते) अत्यंत लोकप्रिय होते. त्यांच्या जलरंगचित्रांमुळे ते अतिशय वाखाणले गेले. त्यांच्या कार्यकाळात साधारण 1940 नंतर भारतीय चित्रकारांत पाश्चात्त्य कलेतील इंप्रेशनिझम अर्थात दृकप्रत्ययवादी चित्रशैलीचा प्रभाव पडून महाराष्ट्रातील चित्रकारांत तेजस्वी रंगसंगती आणि प्रभावी छायाप्रकाशाचा परिणाम दाखवणारी चित्रशैली निर्माण झाली. त्यात धोंड सरांच्या विशेषत: सागरी जलचित्रांचा समावेश होता.”
सरांच्या जाण्याने चित्रकला क्षेत्र काय गमावून बसले? त्या म्हणतात, ‘‘तल्लख स्मरणशक्ती, संभाषण चातुर्य, अप्रतिम विनोदबुध्दी, विषय अध्यापन कौशल्य, जलरंगातील प्राविण्य, सागरी निसर्गचित्रातले वेगळेपण असलेल्या ‘धोंड सरां’च्या नव्हे ‘धोंड मास्तरां’च्या निधनाने कलाक्षेत्राची अपरिमित हानी झाली, हे नक्की.’’
‘चित्रकार धोंड यांची सागरचित्रे आणि रापण’ या लेखात ज्योत्स्ना कदम यांनी सरांची जलरंगांची अप्रतिम स्वरूपाची चित्रे आणि कला जगताच्या हृद्य आठवणी सांगणारे त्यांचे ‘रापण’ हे पुस्तक ही त्यांची कलाजगताला लाभलेली अनमोल अशी देणगी आहे, असे म्हटले आहे. मनस्वी कलावंत या दृष्टीने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ज्ञात-अज्ञात पैलू तन्मयतेने उलगडून दाखवले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक दृश्य कलावंत होता, तसाच एक साहित्यिकही दडलेला होता. त्यामुळे व्यक्तिचित्रणाला त्यांनी ‘रापण’मध्ये कसे प्राधान्य दिले, हे त्यांनी विविध तपशील देऊन सांगिते आहे. ‘‘… ‘रापण’मध्ये भाईंनी हे जगण्याचे विविध विभ्रम अगदी सहजतेने आणि तितक्याच जिवंतपणे शब्दांकित केले आहेत. ते वाचताना वाचक त्यात समरसून जातो.’’ असे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे.
‘आल्हाददायक, प्रल्हाद अनंत धोंड’ या लेखात साधना बहुळकर यांनी सरांच्या अनेक हृद्य आठवणी ओघवत्या शैलीत सांगितल्या आहेत. उदाहरणार्थ, ‘‘सर चित्र रंगवण्यापूर्वी हँडमेड पेपर ओला करून घेत व त्यावर अलगदपणे रंग सोडल्याप्रमाणे कुंचल्याने लावत. रंग किती घ्यायचा व कसा सोडायचा यावर त्यांची इतकी हुकमत होती की, रंगांनी इकडे तिकडे ओघळू न देता विवक्षित जागी ते सहजतेने थांबत. ओलसर कागदावरचे त्यांनी दिलेले ते ओघवते नितळ रंग टवटवीत व सुंदर दिसत. त्यांची चित्रे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाइतकीच आल्हाददायक असत. वाणी ओघवती, मन नितळ आणि त्यांचे असणे हे अवतीभोवतीच्यांना खुलवणारे, आल्हाद देणारे!’’ 1940 पासूनच चित्रकला जगताला धोंड सरांनी काय काय दिले याचा मागोवाही त्यांनी सजग वृत्तीने घेतला आहे.
सुप्रसिध्द कलासमीक्षक, चित्रकार आणि मराठीतील नामवंत कथाकार ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा ‘Cresting the Waves’ हा इंग्रजी लेख या ग्रंथात आहे. प्रा. धोंड यांच्या जडणघडणीचा आलेख त्यांनी या छोटेखानी लेखात मांडलेला आहे. सरांची जलरंगातील सागरचित्रे वैशिष्ट्यपूर्ण कशी आहेत आणि तरुण चित्रकारांवर त्यांच्या चित्रशैलीचा प्रभाव कसा पडला, हे त्यांनी सांगितले आहे.
हर्ष राजाराम पाटकर हे प्रा. धोंड यांचे कलानगरीतील शेजारी. सर किती प्रेमळ होते आणि त्यांचा सहवास त्यांना कसा आल्हाददायी वाटला, हे त्यांनी आपल्या ‘Water Colour Painting Badashaha’ या आपल्या इंग्रजी लेखात सांगितले आहे. कलानगर संकुल सभागृहात त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरले होते. त्याची तयारी करण्याची जबाबदारी हर्ष पाटकर यांच्याकडे होती. बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील या संपूर्ण कार्यक्रमाची प्रशंसा केल्याची आठवण त्यांनी सांगितली आहे.
‘ती धवल रेषा’ या लेखात प्रा. प्रतिभा वाघ यांनी धोंड सरांच्या कलाजीवनाचा, निसर्गचित्रणाच्या रंग टाकण्याच्या त्यांच्या पध्दतीचा आणि त्यांनी स्वीकारलेल्या ‘मॉडर्निझम’चा सविस्तर आढावा घेतला आहे. तो मुळातून समजावून घेण्यासारखा आहे. ‘‘प्रत्येक चित्रकराच्या शैलीत, नकळत याने निवडलेल्या माध्यमात त्याचे व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित होत असते.’’ असे त्यांनी म्हटलेले आहे.
शेवटी त्यांनी असे म्हटलेले आहे, ‘‘चित्रातील घनाकाराचे महत्त्व पटल्यामुळे आपल्या चित्रातून धोंड सर झाडी दाखवत, ती घनाकारात. भरपूर पाणी स्पंजने कागदावर सोडायचे, पाण्याचा आवाका सांभाळत जमीन, समुद्र साकारायचा. एक एक रंग पसरू द्यायचा. हे झाल्यावर झाड, होड्या, माणसे अशा आकृत्या काळसर करड्या छटेत चटकन ब्रशने ठेवून द्यायच्या, की चित्र तयार! हे करत असतानाच एक पांढरी रेषा इथून तिथे पसरलेली दिसते. कधी ती वीज असेल, कधी पाण्याची धार तर कधी क्षितिजरेषा. रंगकाम करता करता एकदम स्फूर्तीचा झटका येऊन ती पांढरी रेषा भाई सोडीत. त्यांच्या चित्रातील खरी गंमत आहे, ती सफाईदारपणे सोडलेली ही पांढरी रेषाच… ती धवल रेषा!’’
जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे जून 2019 मध्ये राज ठाकरे, प्रभाकर कोलते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत 'धवलरेषा'चे प्रकाशन झाले.
नीना रेगे यांचा ‘Bhai! Bhai!’ हा छोटासा इंग्रजी लेख जिव्हाळ्याने ओथंबलेला आहे. त्या म्हणतात, भाई नावाच्या दोन अविस्मरणीय व्यक्तींचा सहवास त्यांना लाभला. दोघांचेही आपापल्या क्षेत्रांत विलक्षण प्रभुत्व. दोघांकडे विनोदबुध्दी आणि प्रेमळपणा. धोंड सरांनी मालवणच्या समुद्रावर अतिशय प्रेम केले. त्यांनी जलरंगात साकार केलेल्या समुद्रचित्रांतून कोकणच्या भाईंनी त्यावर प्रभुत्व मिळवले आणि समुद्रकिनाऱ्याचा कलानिर्मितीच्या अंगाने आस्वाद कसा घ्यावा, याविषयीची वातावरणनिर्मिती केली असे त्या म्हणतात.
सुलेखा नायर यांचा ‘The master’s stroke’ हा इंग्रजी लेख उद्बोधक आहे. कारण तरुण वयापासून आपल्या कलाविकासासाठी प्रा. धोंड कसे सातत्याने प्रयत्नशील राहिले, त्याचा मागोवा त्यांनी येथे घेतलेला आहे. निवृत्तीनंतरदेखील त्यांच्या कुंचल्याने आणि पॅलेटने विश्रांती घेतली नाही. त्यांच्य घरातील भिंती समुद्राच्या भावमुद्रा दर्शवणाऱ्या चित्रांनी भरलेल्या होत्या, असे त्या म्हणतात.
वसंत सोनवणे यांचा ‘धोंड सर… जलरंगातील चित्रकार’ हा लेख या ग्रंथात आहे. ते सरांचे विद्यार्थी. विद्यार्थीदशेत चौथ्या वर्षाला असताना प्रा. संभाजी कदम यांनी चिं. त्र्यं. खानोलकरांची एक नाटिका बसवली होती. तिच्यात अमोल पालेकर, उषा भट, दत्ता नावेलकर आणि वसंत सोनावणे असे कलाकार होते, अशी आठवण त्यांनी सांगितली आहे. सर तिथे येऊन स्वत: अभिनय करून दाखवत. ‘सर चित्रकार झाले नसते, तर एक उत्कृष्ट नट झाले असते.’ असे त्यांनी म्हटलेले आहे.
दृश्यकला अभ्यासक आणि कला समीक्षक श्रीराम खाडिलकर यांचा ‘माझे गाईड धोंड सर’ हा लेख या ग्रंथात आहे. सुरुवातीलाच सरांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे. त्यांच्याकडे विशेष गुण होता, तो म्हणजे ते संवेदनशील मनाचे होते. वय विसरून मैत्री संबंध निर्माण करणे त्यांना सहजतेने जमत असे. सर विल्यम रसेल पिलंट आणि ज्यूलियस ऑल्सन यांची निसर्गचित्रे त्यांनी पाहिली. आपण आयुष्यात फक्त समुद्रचित्रणच करायचे असे त्यांनी ठरवले, अशी माहिती त्यांनी दिलेली आहे.
‘आठवणीतले भाई’ या लेखात सरोज अशोक आचरेकर यांनी रेखाटलेले प्रा. धोंडसरांचे व्यक्तिचित्र हृद्य आहे. डॉ. आशाताई गेल्यापासून भाईंनी आपले दु:ख कोणाला कळू दिले नाही. आपल्या कार्यक्षेत्रात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. चित्रे काढण्यात मन रमवले. ते कधी भावूक झाले नाहीत अथवा रागावले नाहीत, त्यांना एकाकीपणा जाणवत नव्हता, असे नव्हे. त्यांचा 90 वा वाढदिवस बाळासाहेब ठाकरे यांनी साजरा केला. त्यासाठी जॉनी लिव्हरला आमंत्रित केले.
‘आमचे भाई’ या प्रकरणाने या ग्रंथाची सांगता झाली आहे. अनेक आठवणींची साखळी येथे गुंफली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची अनेक रूपे येथे उलगडली गेली आहेत. या लेखाचा कर्ता अज्ञात आहे. बहुधा कुटुंबीयांनी या आठवणी सांगितलेल्या असाव्यात.
‘‘कोणालाही हेवा वाटावा असा वृध्दापकाळ भाईंनी अनुभवला. आपली मुले, नातवंडे, पतवंडे यांच्या गोतावळ्यात, तसेच आपले छंद, कला जोपासत भाई नेहमी आनंदी असत. या दैदीप्यमान आयुष्याचा अखेरचा निरोप घेतानाही त्यांचे आपल्या कलेवरचे प्रेम जराही कमी झाले नाही. थरथरत्या हातांनी कुंचला धरून अतिशय प्रेमाने त्यांनी साकारलेले त्यांचे शेवटचे पेंटिंग ‘लास्ट सनसेट’ हे अजूनही त्यांच्या घरात ‘कलाप्रेमी हृदयाचे’ स्मरण करून देते.’’
धोंड सरांचे शेवटच्या काळातील एक चित्र.
आणि उगवती लाट दाखवणारी त्यांची खास 'धवलरेषा'
हे झाले कुटुंबचित्र. पण ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळही पाहिला, हा दीर्घकालीन प्रवास समृध्द अशा चित्रकलेच्या माध्यमातून अनुभवला, त्या समर्थ चित्रकाराचे भावजीवन येथे रेखाटले गेले आहे. ‘‘भाई हे ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’चे चालते बोलते एन्सायक्लोपीडिया होते. शेवटपर्यंत स्मरणशक्ती जबरदस्त असल्यमुळे संपूर्ण ‘जे. जे.’चा इतिहास त्यांना मुखोद्गत होता. अगदी शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत सर्वांशी त्यांची आत्मिक जवळीक होती. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी शिक्षक व वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये मोकळेपणा आणला. गोष्टीवेल्हाळ व वक्तृत्वावर प्रभुत्व असलेल्या या आपल्या धोंड मास्तरांच्या ‘जे. जे.’च्या याच आवारात गप्पा रंगत असत.’’
कोकणच्या निसर्गाच्या समतानतेमुळे त्यांनी निर्माण केलेली प्रतिसृष्टी कोणत्या प्रकारची होती? ‘‘कोकणातील कोळी समाज, तेथील समुद्रकिनारा, त्यांचे मासे पकडण्याचे मचवे हे भाईंच्या खास आवडीचे विषय होते. निसर्गाला आव्हान देऊन त्यांनी निर्माण केलेला हा प्रतिनिसर्गच असे.’’ 90 व्या वर्षी केरळला जाऊन त्यांनी तेथील बॅकवॉटर्सची बरीच स्केचेस काढली. याला म्हणतात आपल्या कलेविषयीची असीम निष्ठा!
या ग्रंथातील 46 निसर्गचित्रे या निस्सीम कलोपासकाची केलेली साधना समजून घेण्याच्या दृष्टीने पोषक आहेत. त्यातील अधिकतम समुद्रचित्रे आहेत. आयुष्याच्या उत्तरायणातील केरळच्या बॅकवॉटर्सची दहा स्केचेस यात आहेत. या चित्रसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी स्वतंत्र लेख लिहावा लागेल. पण प्रा. धोंड यांची कलासाधना आणि त्यांनी साकार केलेली निसर्गचित्रे या दोघोंमध्ये अभिन्नता आहे, एवढेच येथे नमूद करावेसे वाटते.
- सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा.
somnathpant@gmail.com
(लेखक, मराठी साहित्य समीक्षक असून त्यांनी गोवा विद्यापीठात मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले आहे.)
Tags: चित्र कलानगर जे जे स्कूल भारतीय चित्रकार निसर्गचित्र स्मृतिग्रंथ ग्रंथपरिचय मराठी पुस्तके रापण मौज प्रकाशन Load More Tags
Add Comment