मराठी कविता लोकाभिमुख करणारा प्रयोगशील कवी

माधव जूलियन यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त...

आधुनिक मराठी काव्यक्षेत्रातील महत्त्वाचे कवी म्हणून माधव जूलियन उर्फ डॉ.माधवराव पटवर्धन यांचे नाव घेतले जाते. वाङ्‌मयाच्या विविध क्षेत्रांत त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची स्वतंत्र मुद्रा उमटवली तरी कवित्वशक्ती हा त्यांच्या प्रतिभाधर्माचा केंद्रबिंदू होता. त्यांना शेहेचाळीस वर्षांचे आयुष्य लाभले... पण अल्पावधीतही त्यांनी आपले वाङ्‌मयीन कर्तृत्व दाखवून दिले. स्फूट कविता, खंडकाव्य, काव्यानुवाद या रूपकळांमधून कविता लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. काव्यक्षेत्रात त्यांनी आपल्या परीने काही प्रमाणात प्रयोगशीलता दाखवली. ‘रविकिरण मंडळा’चे ते ज्येष्ठ सदस्य होते. काव्यनिर्मिती हाच त्यांचा ध्यास होता. अशा या व्युत्पन्न आणि रसज्ञ कवीच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि वाङ्‌मयीन कर्तृत्वाचा संक्षेपाने घेतलेला हा मागोवा.

माधव जूलियन यांचा जन्म बडोद्याला त्यांचे थोरले मामा महादेव विश्वनाथ सहस्रबुद्धे यांच्या घरी 21 जानेवारी 1894 रोजी झाली. बालपणीचे त्यांचे जीवन तसे खडतर स्वरूपाचे ठरले. सुरुवातीची त्यांची आठदहा वर्षे भ्रमंतीतच गेली. त्यांचे प्राथमिक शिक्षण आवळस इथे चुलत आजोबांकडे झाले. 

त्यांच्या वडिलांची शिस्त फार कडक होती. 1904मध्ये ते पुन्हा मामांकडे बडोद्याला गेले. अडचणी अनंत होत्या तरीदेखील मामांच्या सक्रिय सहानुभूतीमुळे आणि नातेवाइकांच्या ऊबदार प्रेमामुळे त्यांचे तेथील वास्तव्य संस्मरणीय झाले. समानधर्मी मित्र त्यांना लाभले. मनाचा विकास करायला संधी मिळाली. 

पुढे त्यांच्या मनात कवितेची आवड निर्माण झाली. चंद्रशेखरांसारख्या प्रथितयश कवीचा सहवास त्यांना लाभला. कटू-गोड अनुभव घेत-घेत फारसी विषय घेऊन ते बीएची परीक्षा उत्तीर्ण झाले. 1918 मध्ये ते मुंबईला आले. एप्रिलमध्ये फारसी आणि इंग्रजी घेऊन एम.ए. झाले. अनेक कारणांनी 1911 ते 1916 हा कालावधी त्यांच्या जीवनातील अस्थिरतेचा आणि अस्वस्थतेचा गेला. 

ते अत्यंत मनस्वी वृत्तीचे होते. ‘पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ या फर्ग्युसन महाविद्यालयात फारसी व इंग्रजी या विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांनी नावलौकिक प्रस्थापित केला. प्रागतिक विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या प्रा.श्री.बा. रानडे यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. प्रा.श्री.बा. रानडे आणि सौ.मनोरमा रानडे या दाम्पत्याचे घर त्यांना आधारवडासारखे वाटायचे. 

1923 मध्ये समानधर्मी मित्रांच्या समवेत ‘रविकिरण मंडळा’ची स्थापना झाली. वि.द. घाटे, यशवंत, गिरीश, ग.त्र्यं. माडखोलकर, नाट्यछटाकार दिवाकर आणि प्रा.द.ल. गोखले त्यात होते. 

या मंडळाच्या काव्यक्षेत्रातील यशापयशाबद्दल अनेक मतमतांतरे समीक्षकांमध्ये आढळतात... पण एक गोष्ट निर्विवाद आहे. ती ही की, ‘रविकिरण मंडळा’च्या बहराच्या काळात नवे काव्यप्रकार उदयास आले. काव्यगायनाची प्रथा सुरू झाली. काव्यचर्चा होऊ लागली. नव्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाची ती पहाट होती. या मंतरलेल्या दिवसांत मराठी कविता लोकाभिमुख करण्याचे प्रयत्न झाले.

माधव जूलियन हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य होते. या काळात निर्माण झालेल्या गैरसमजाच्या धुक्यामुळे त्यांना अनेक संकटमालिकांना तोंड द्यावे लागले. त्यांना डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राजीनामा द्यावा लागला. 

1924 ते 1926 या दोन वर्षांत अंमळनेरच्या प्रताप हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षकाचे काम पाहिले. 1926 ते 1938 या काळात पुण्याच्या भावे हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. 

1928 पासून 1939 पर्यंत कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये फारसी व इंग्लीश या विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची मुद्रा उमटवली. या साऱ्या भ्रमंतीत आणि मानसिक संघर्षातून जात असताना, मनाने मोडून न जाता त्यांनी आपली जीवननिष्ठा अभंग ठेवली. त्यांच्या विविधरूपिणी कवितेतील आशयसूत्रांचा विस्तार पार मोठा आहे. त्यातील मोजक्याच पैलूंकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न इथे केला आहे.

माधव जूलियन यांच्या प्रतिभाधर्मात उत्कट ध्येयवाद, सूक्ष्मतरल भावना यांबरोबरच कल्पनाविलासही आढळतो. व्यासंगाची जोड त्यांनी आपल्या कवित्वशक्तीला दिली. प्रेमभावनेची अभिव्यक्ती माधव जूलियन कशी करतात ते इथे पाहण्यासारखे आहे.

      किती शांतता तुझिया मुखीं, मधु  मुग्ध भाव सदासुखी
      किती जीवनक्रम चार की स्मृति धीर दे भवसंगरी!
      नजरेत जादुगिरी पुरी, अनुरागवर्धक माधुरी,
      नच मत्त मादक आसुरी, नच तीक्ष्ण भेदक सग्जरी
      तुझिया हृदीं परि प्रेम तें जणू हेम शम्भर नम्बरी  
     (मानससुंदरी/ गज्जलाञ्जली)

‘सङ्‌गमोत्सुक डोह’ मध्ये प्रियकर प्रेयसीला उद्देशून म्हणतो...

        एकत्र गुम्फून जीवित-धागे
        प्रीतीचें नर्तन नाचलों मागे
        एकटा उभा मी तेथे
        भोंवती शोधी प्रियेतें;
        न दिसे कोठे; का सोडून गेली?
        लोपते का कधी प्रीति उदेली!

‘विरहतरंग’ या खंडकाव्यात प्रियकराच्या मनातील भावना पुढील शब्दांत व्यक्त होते...

        पूर्वीच्या स्वरसंगमी मधुरता सुस्निग्ध सामावली
        आता त्या ध्वनिविण नीरस ती तीच गीतावली,
        नादब्रह्मच तेधवा बहरलें संगे तुझ्या मंजुळे
        माझें उत्तर भावकम्पित तुझ्या शब्दानुरोधें झुले

‘गज्जलाञ्जली’ मधील ‘तू आणि मी’ या कवितेतील प्रियकर म्हणतो...

        निस्सङ्‌ग नील नभीं परी गाम्भीर्य निश्चल भासते
        उत्तुङ्‌ग नील गिरीवरी गांभीर्य निर्मल हासते
        खालीं दरींतील काननीं गांभीर्य भीषण सांचतें
        माझ्या मनीच्या प्राङ्‌गणी हुरहूर सुंदर नाचते

माधव जूलियन प्रीतिभावना रेखाटताना शारीर-मानस भाव तितक्याच समरसतेने रेखाटतात. माधव जूलियन यांना ‘प्रणय पंढरीचे वारकरी’ असे संबोधले गेले... पण ते तेवढे खरे नाही. जीवनातील अन्य पैलूंचे चित्रण त्यांनी तेवढ्याच तन्मयतेने केलेले आहे.

राष्ट्रीय पुरुषार्थासाठी जनमानसाला आवाहन करणारी त्यांची ‘भ्रांत तुम्हा कां पडे?’ ही कविता तर सर्वश्रुतच आहे. ‘गज्जलाञ्जली’ या संग्रहातील ‘क्षात्रधर्म’ या कवितेत कवी उद्‌गारतो...

        बोलता, आम्ही सुपर्ण व्योमसाञ्चारी,परी
        जुम्पिल घाण्यास जातां आणि नेत्रीं झांपडें!
        जन्मला शार्दूलवंव्शी, स्वत्व जाणा आचरा;
        धूर्तता ये घेऊनी का जम्बुकाचें कातडें

‘स्वप्नरंजन’मधील ‘महाराष्ट्र-गीत’ या कवितेत कवी मराठी मनाला आवाहन करतो...

        म्लेच्छांपुढे मराठ्यांनो, कां व्हा दीन, कां वाका?
        फडफडे भोसल्यांच्या प्रतापाची पताका!
        अल्पसन्तुष्टता का रे? ठेवा थोर आवाका!
        पसरू द्या हिंदुस्थानभर नवा आवेश!

‘मराठबाणा’ या कवितेत महाराष्ट्राच्या भूप्रदेशाविषयीचा, शिवाजीमहाराजांविषयीचा, संतपुरुषांविषयीचा आणि ज्या भाषेत ‘ज्ञानदेवी’ प्रकटली त्या मराठी भाषेविषयीचा सार्थ अभिमान व्यक्त झाला आहे.

        मराठीस अन्याय कोठेहि झाला, स्वदेशीं विदेशीं कुणी गाञ्जिलें
        मराठी कसा मी न सन्ताप माझा धडाडे जरी तीव्र दुक्खानिलें?
        मराठी जनांचेच वर्चस्व राहो स्वतःच्या महाराष्ट्र देशीं तरी-
        प्रसादें तुझ्या कोणती व्यक्त आशा करू अन्य हे वन्द्य वागीश्वरी?

‘शिव-प्रताप’ या कवितेत शिवाजीमहाराजांच्या अलौकिक कर्तृत्वाचा गौरव कवीने केलेला आहे. ‘फटकळ अभंगां’मधून कविमनाचा आगळावेगळा आविष्कार दिसून येतो.

माधव जूलियन यांनी ‘सुधारक’ या खंडकाव्यात समाजमानसातील विसंगतीवर प्रकाश टाकलेला आहे. पुढील आशयातून कवीचीच मनोधारणा व्यक्त झाली आहे...

        कां काळाची महती गाता?
        काळास पुढे लोटी व्यक्ती
        अनिवार जिची ध्येयासक्ती;
        अवतार गणी मग तिज भक्ती
        परिस्थितीच्या खाऊन लाथा
        जाल पुढे घालित लोटाङ्‌गण
        त्यात तुमची काय शहामत?

‘सुधारक’ या खंडकाव्यातील व्यक्तिचित्रे माधव जूलियन यांनी अतिशय कौशल्याने रेखाटली आहेत. एका परीने समाजचित्रांची मालिकाच इथे दिसून येते. या दृष्टीने रावबहादूर ठोसर, वासूराजे, सरला, मेजर गोखले आणि डॉ. ॐकार ही पात्रे अभ्यसनीय वाटतात. सामाजिक सुधारणेचे कार्य समाजातील मान्यवर व्यक्तींनी आपल्या अंगावर घेतले तर प्रगती झपाट्याने झाली असती असे मत कवीने व्यक्त केले आहे.

माधव जूलियन यांनी ‘सुधारक’प्रमाणे ‘नकुलालंकार’ हे बहिर्मुख वृत्तीने लिहिलेले सामाजिक आशयाचे खंडकाव्य आहे. त्याचे स्वरूप उपहात्मक आहे. साहित्यक्षेत्रातील अपप्रवृत्तींकडे कवीने लक्ष वेधले आहे. लटपट्या स्वभावाची आणि संधिसाधू माणसे या क्षेत्रात कशी वावरतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. 

ही पात्रे काल्पनिक वाटत असली तरी वास्तवाधिष्ठित आहेत. लब्धप्रतिष्ठितांवर वक्रोक्तिपूर्ण खंडकाव्य रचून मराठीतील उपहासपर काव्यात माधव जूलियनांनी महत्त्वपूर्ण भर घातली आहे.

माधव जूलियनांच्या कर्तृत्वाचा आवाका फार मोठा आहे. थोडक्यात त्याचा परामर्श घेणे ही कठीण बाब आहे. मराठीच्या अभ्यासक्षेत्रात त्यांनी केलेल्या अन्य कार्याचा उल्लेख इथे करणे आवश्यक आहे. 

त्यांनी ‘फारसी-मराठी कोश’ तयार केला. मराठीच्या काव्यधारेतील विविध वृत्तिप्रवृत्तींच्या रचनेत आलेल्या छंदांचा आणि वृत्तांचा अभ्यास करून त्यांनी ‘छंदोरचना’ हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. त्याबद्दल मुंबई विद्यापीठाकडून डी.लिट्‌.ची पदवी त्यांना प्राप्त झाली. 1936मध्ये जळगाव इथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. मराठीतील भाषाशुद्धीविषयीचा विचार त्यांनी हिरिरीने मांडला.

माधव जूलियनांचा गौरव करताना सुप्रसिद्ध कवी आणि साक्षेपी समीक्षक प्रा.गो.वि. करंदीकर (विंदा करंदीकर) यांनी काढलेले उद्गार विचार करायला लावणारे आहेत... ‘‘केशवसुत आणि मर्ढेकर यांच्यामधील कालखंडात फक्त माधव जूलियनांच्या कवितेतच या प्रकारची सजीव व साक्षेपी प्रयोगशीलता दिसून येते.’’

- डॉ. सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा.
somnathpant@gmail.com


सोमनाथ कोमरपंत यांचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा 

Tags: व्यक्तिवेध साहित्य कवी सोमनाथ कोमरपंत माधव जूलियन Marathi Literature Poet Poem Somnath Komerpant Madhav Julian Load More Tags

Comments:

नंदकिशोर लेले

नमस्कार ."मराठी कविता लोकाभिमुख करणारा प्रयोगशील कवी" रविकिरण मंडळाचे भूषण कवी श्रीयुत माधव ज्युलियन यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा लेख खूप आवडला.

Anup Priolkar

In short but informative Article on Madhav Julian by Dr. Komarpant Sir.

नरेंद्र महादेव आपटे

प्रा कोमरपंतांनी आत्मीयतेने लिहिले आहे. हा लेख वाचल्यावर वि द घाटे यांनी माधव जूलियन   यांच्याबद्दल त्यांच्या 'दिवस असे होते' या आत्मचरित्रात माधवरावाबद्दल खूप प्रेमाने लिहिले आहे त्याची आठवण होते.  माधव जूलियन यांचे मराठी भाषा प्रेम आपण विसरलो आहोत का? महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला साठ वर्षे  झाली तेव्हा माधवराव पटवर्धनांची आठवण किती जणांनी जागवली?   

Add Comment