वनस्पतिकुळातील माणूस

मारुती चितमपल्ली यांच्या 88व्या वाढदिवसानिमित्त 

मारुती चितमपल्ली यांचे प्रसन्न आणि संपन्न लेखन एकीकडे वाङ्‌मयरसिकाला आनंदानुभव प्राप्त करून देते... तर दुसरीकडे पर्यावरण सम्यक रीतीने जाणून घेणाऱ्या वाचकांचे क्षितिज ते विस्तीर्ण करते. त्यांचे शैलीसंपन्न लेखन किती आनंददायी स्वरूपाचे आहे हे वेगळे सांगायला नको. 

12 नोव्हेंबर 2020 रोजी निसर्गानुभवाला शब्दशिल्पाची रूपकळा प्राप्त करून देणारे श्रेष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांचा 88 वा वाढदिवस. या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाने गेल्या चार दशकांहून अधिक काळ मराठी साहित्यविश्वाला समृद्ध केलेले आहे. वाचन-चिंतन-मनन आणि निरंतर लेखन ही त्यांच्या जीवनप्रवासाची चतुःसूत्री. 

महाराष्ट्र राज्याच्या वनविभागात महत्त्वाच्या पदांवर ते कार्यरत होते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधून 1990मध्ये उपसंचालक म्हणून ते निवृत्त झाले... पण ही झाली त्यांची उपजीविका. माणूस आणि निसर्ग यांचे आदिम कालापासूनचे नाते अधोरेखित करण्याचा निदिध्यास ही त्यांची जीविका... म्हणूनच हा माणूस जनांपेक्षा विजनात अधिक रमला. त्याने ग्रंथवेड जोपासले. वने धुंडाळली. पशुजगत आणि पक्षिजगत डोळसपणे आणि संवेदनशीलतेने न्याहाळले. निर्मितिशील नेत्रांनी ही सारी क्षणचित्रे टिपली. ती मराठी साहित्यसृष्टीतील लेणी ठरली.  

मारुती चितमपल्ली यांनी आत्तापर्यंतच्या साहित्यसाधनेने मराठी साहित्यसृष्टीला काय दिले? थोडक्यात सांगणे कठीण आहे... पण एक सांगता येईल, त्यांनी अखंडितपणे ज्ञानसाधना केली. ती टिकवण्याची त्यांची जिद्द आज एकाकी अवस्थेतही कायम आहे. त्यांनी भारतीय ज्ञानपरंपरेचे परिशीलन केले. त्यासाठी संस्कृत वाङ्‌मयाचे अध्ययन निष्ठापूर्वक केले. आपण घेतलेल्या वनविद्येपुरते ज्ञान मर्यादित न ठेवता आंतरविद्याशाखीय दृष्टीकोन सतत डोळ्यांसमोर ठेवला. बहुभाषा-कोविद झाले. विश्वसाहित्याचा धांडोळा घेतला. आयुष्यात प्रचंड आघात होऊनही ज्ञाननिष्ठा ढळू दिली नाही. गतिमान काळात पर्यावरणाचे भान ठेवले. ही त्यांची सजगता मौलिक स्वरूपाची. आज पर्यावरणशास्त्र ही स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून परिणत झालेली आहे. 

मारुती चितमपल्ली यांचे प्रसन्न आणि संपन्न लेखन एकीकडे वाङ्‌मयरसिकाला आनंदानुभव प्राप्त करून देते... तर दुसरीकडे पर्यावरण सम्यक रीतीने जाणून घेणाऱ्या वाचकांचे क्षितिज ते विस्तीर्ण करते. त्यांचे शैलीसंपन्न लेखन किती आनंददायी स्वरूपाचे आहे हे वेगळे सांगायला नको. 

चितमपल्ली मूळचे तेलुगु भाषक. महाराष्ट्रात राहिले... महाराष्ट्राचे झाले. त्यांच्या शैलीसंपन्न भाषेतील नितळ आशय आणि लीळाचरित्राच्या अभिव्यक्तीशी नाते सांगणारी शब्दकळा यांमुळे आपली चित्तवृत्ती पुलकित होते. जी जी अनुभूती त्यांना आकळली तिचे त्यांनी सुवर्ण करून टाकले. वाचनसंस्कृतीपासून दूर गेलेल्या समाजातही मारुती चितमपल्लींनी विशिष्ट अभिरुची बाळगणारा वाचकवर्ग निर्माण केला, घडवला. ही त्यांच्या लेखनाची जमेची बाजू. त्यांच्या लेखनामुळे मराठीतील ललित गद्य हे शैलीच्या आणि अनुभवविश्वाच्या दृष्टीने समृद्ध झालेले आहे.

त्यांचा जीवनप्रवास आता सर्वज्ञात आहे. तरीही त्यांच्या ललित निबंधशैलीचा विचार करताना त्यांच्या जीवनप्रवासातील ठळक टप्पे, त्यांची जडणघडण, त्यांना लेखन करण्याची झालेली अंतःप्रेरणा, आपल्या लेखनप्रकाराचा त्यांना लागलेला आत्मशोध, त्यांच्या लिहित्या हाताला आधार देणारे साहित्यक्षेत्रातील दिग्गज, लेखनयश प्राप्त झाल्यावर जीवनात आलेले आनंददायी प्रसंग हे सारे समजून घ्यावे लागेल. त्यांचे जीवन आणि त्यांची अनुभवसृष्टी यांचा अन्योन्यसंबंध आहे.

‘मौज प्रकाशन गृहा’ने प्रकाशित केलेले ‘चकवाचांदण - एक वनोपनिषद’ हे  त्यांचे 687 पृष्ठांचे बृहद्‌स्वरूपाचे आत्मचरित्र आपल्या सुदैवाने उपलब्ध आहे. एका कर्मयोगी आणि निर्मितिशील साहित्यिकाच्या प्रयत्नवादी जीवनाचा तो आरसा आहे... एवढे सांगितले तरी पुरे. 

निर्मम, निरहंकारी आणि प्रांजळ वृत्तीने लिहिल्या गेलेल्या आदर्श आत्मचरित्रांमध्ये या आत्मचरित्राचा गुणानुक्रम मराठीत फार वरचा लागेल. त्यांच्या लेखनयशाची चढती श्रेणी लक्षात घेता त्यांनी किती समतोल वृत्तीने हे ‘आत्म’दर्शन घडवले आहे याचा प्रत्यय आल्यावाचून राहणार नाही.

या संदर्भात प्रथमतः आठवण होते ती चितमपल्लींच्या  आत्मचरित्राच्या प्रास्ताविकातील एका महत्त्वाच्या आणि संस्मरणीय संदर्भाची. व्यंकटेश माडगूळकर त्यांना त्यांच्या लेखनासंदर्भात म्हणाले होते, ‘तुम्ही म्हणजे चालताबोलता ज्ञानकोश आहात... परंतु माहिती म्हणजे ललित साहित्य नव्हे. तुमच्या साऱ्या शास्त्रीय ज्ञानाला माणसांचा संदर्भ देऊन लिहा... म्हणजे ते निर्मितीच्या पातळीवर जाईल. तुमच्या शास्त्रीय लेखनापेक्षा वाचकांना हे नवे लेखन निश्चितच आवडेल. भाषा मात्र सोपी करा.’ 

व्यंकटेश माडगूळकरांनी पुढील काळात चितमपल्लींच्या अनुभवविश्वाचा धांडोळा घेताना ‘वनस्पतिकुळातील माणूस’ म्हणून गौरवले. प्रसन्न ललितलेखनाची आणि समग्रतेने जीवनाचा मागोवा घेण्याची समलय जुळलेली आहे हे चितमपल्लींच्या आत्मचरित्राचे वाचन करताना सतत जाणवते.

मारुती चितमपल्ली यांचा जन्म सोलापूर येथे 12 नोव्हेंबर 1932 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भुजंगराव आणि आईचे नाव सौ. सुगंधाबाई. वयाच्या नवव्या वर्षापासून टी.एम. पोरे स्कूलमध्ये त्यांना दाखल करून घेण्यात आले. चौथ्या इयत्तेपर्यंत त्यांना मराठी भाषा, गणित, परवचा, भूगोल व मोडी लिपी आदी विषय शिकवले जात असत. 

शेवाळकर, देशपांडे आदी शिक्षकांनी त्यांच्यावर कायम स्वरूपाचा प्रभाव पाडला. हा पाया जर कच्चा असता तर पुढील शिक्षणाची वाटचाल करणे अवघड झाले असते असे चितमपल्लींनी आत्मचरित्रात नमूद केले आहे. त्यांचे हेडमास्तर तिपण्णा यांच्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांच्या मनात भीतियुक्त आदर होता. ते कडक शिस्तीचे गृहस्थ होते.

त्यांचे हायस्कूलचे शिक्षण नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूलमध्ये झाले. त्यांचे वर्गशिक्षक गुरव सर इंग्लीश शिकवायचे. त्यांनी चितमपल्लींच्या इंग्लीश भाषेचा पाया पक्का करून घेतला. त्याचा त्यांना भविष्यकाळात खूपच उपयोग झाला. अरगडे सरांच्या मराठीच्या अध्यापनशैलीचा प्रभाव दीर्घकाळपर्यंत त्यांच्या मनावर पडला. शास्त्र शिकवायला गायकवाड सर होते. 

चितमपल्ली वर्गातले हुशार विद्यार्थी होते. अकरावीपर्यंत त्यांना दरमहा दहा रुपये शिष्यवृत्ती मिळत असे... त्यामुळे त्यांना फीदेखील माफ होती. ऐन परीक्षेच्या वेळी चितमपल्ली आजारी पडले. गायकवाड सरांचे त्यांच्याकडे लक्ष होते. ‘तू परीक्षा बुडवू नकोस. वर्षभरात तू जो अभ्यास केलास त्या आधारे सहज पास होशील.’ या परीक्षेत ते पहिल्या क्रमांकाने पास झाले होते. 

अकरावीत त्यांना पंडित सर मराठी शिकवायचे. सहामाही परीक्षेत त्यांना मराठीत वर्गात सर्वाधिक गुण मिळाले. पंडित सरांनी त्यांची उत्तरपत्रिका वर्गात वाचून दाखवली. विशेषतः त्यांनी लिहिलेला निबंध पंडित सरांना फार आवडला होता. 

त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण दयानंद कॉलेजमध्ये झाले. त्यांनी एफ.वाय. सायन्सला प्रवेश घेतला. अकरावीपर्यंतचे शिक्षण मराठीत झालेले होते... पण कॉलेजमध्ये गणित आणि अन्य विज्ञानविषय इंग्लीशमधून शिकवले जात असल्यामुळे  त्यांचे आकलन व्हायला त्यांना अवघड जाऊ लागले.

शिवाय आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना कॉलेजची फी आणि पुस्तकांचा खर्च भागवणे जड जात असे... पण या प्रतिकूल परिस्थितीवरदेखील त्यांनी मात केली. बीएस्‌सीच्या पहिल्या वर्षाकरता पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय त्यांनी निवडले होते.

महाविद्यालयीन जीवनात त्यांना साहित्याची गोडी लागली होती. खलिल जिब्रान यांच्या कथांचे अनुकरण करून कथालेखन करण्याचा छंद त्यांना जडला होता. प्रख्यात कवी वि.म. कुलकर्णी त्या कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक होते. चितमपल्लींनी आपल्या कथा कुलकर्णी सरांना दाखवल्या. त्यांपैकी ‘यात्रिक’ या कथेची निवड त्यांनी कॉलेज नियतकालिकात केली होती. ‘या कथा बेंद्रे सरांना दाखवल्या पाहिजेत. ते याविषयी अधिक सांगू शकतील.’ असे उद्‌गार त्यांनी काढले. प्रख्यात कवी द.रा. बेंद्रे कॉलेजमध्ये कन्नड भाषा शिकवत होते. 

दयानंद कॉलेजचे प्राचार्य श्रीराम शर्माजी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता. पुण्यातील वास्तव्यात चितमपल्लींनी वाचनाचा छंद वाढवला. आत्मचरित्रात ‘पहिला पुणे मुक्काम - फर्ग्युसन कॉलेज’ या प्रकरणात त्यांनी आपले अनुभव मांडले आहेत. येथील मुक्कामात गो.नी. दांडेकर आणि नानासाहेब गोरे या थोर साहित्यिकांशी त्यांच्या गाठीभेटी झाल्या.

फर्ग्युसन महाविद्यालयात 1958मध्ये बीएस्‌सीच्या शेवटच्या वर्षात शिकत असताना एके दिवशी महाविद्यालयाच्या सूचनाफलकावर वनाधिकाऱ्यांच्या भरतीविषयीची जाहिरात चितमपल्लींनी पाहिली. त्या जाहिरातीत लिहिले होते त्याप्रमाणे... कोईमतूर वानिकी महाविद्यालयात दोन वर्षांचे वनशास्त्राचे शिक्षण, अभ्यासदौऱ्याकरता भारतभर प्रवास, प्रवेश मिळताच नोकरीची हमी शासनाकडून शिक्षणाचा खर्च अशी योजना होती.

वानिकी महाविद्यालयामध्ये आपली निवड झाली तर रानावनांतील एक वेगळे आयुष्य जगता येईल असे चितमपल्लींना वाटले. त्याची आवड त्यांना लहानपणापासून होती. त्यांनी घेतलेला हा निर्णय किती अचूक होता आणि त्यांच्या आयुष्यक्रमाला वेगळी कलाटणी कशी मिळाली हे यावरून दिसून येते.

कोईमतूर वानिकी महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. गोविंद मेनन, व्यंकटरमण आणि प्राचार्य शेट्टी हे ज्येष्ठ वनाधिकारी त्यांना शिक्षक म्हणून लाभले. त्यांनी आपली वर्तणूक, शिस्त आणि शिकवण यांमुळे चितमपल्ली यांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला. चितमपल्लींच्या जीवनातील पुढच्या वाटचालीत प्राचार्य शेट्टी दीपस्तंभासारखे पथदर्शक म्हणून सदैव उभे राहिले. ‘वनविद्येतील गुरुजन’ हे त्यांच्या आत्मचरित्रातील प्रकरण या दृष्टीने वाचनीय आहे. 

तामीळनाडू - उटकमंड, कोडाई, कर्नाटक - माकुथ (कुर्ग), बंगलोर... कारवार... दांडेली, म्हैसूर, मलबार, पाँडिचेरी या स्थळांना चितमपल्लींनी दिलेल्या भेटी त्यांचे अनुभवविश्व समृद्ध करणाऱ्या कशा होत्या याचे दर्शन इथे घडते... शिवाय अल्पाक्षरांमध्ये अनुभवदर्शन किती काव्यात्म शैलीत आणि उत्कटतेने करता येते याचा प्रत्यय येतो. ‘उत्तरायण’ हे प्रकरण तर वर्णनशैलीचा परमोच्च बिंदू आहे.

हे सारे अनुभवधन मोठ्या निष्ठेने, परिश्रमपूर्वक गोळा करून मारुती चितमपल्ली यांनी कर्नाळा पक्षिअभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासात भरीव योगदान दिले. उत्तम वनाधिकारी म्हणून त्यांची कारकिर्द यशस्वी झाली... पण त्यांनी आपले कार्यक्षेत्र तेवढ्यापुरते मर्यादित ठेवले असते तर त्यापलीकडे त्यांचे नाव कुणाला ज्ञात झाले नसते.

चितमपल्ली यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा विकास केला. ज्ञानाचे क्षितिज वाढवले. अभिरुची संपन्न केली. तिचा लाभ मराठी साहित्यरसिकांना झाला. वनविद्येच्या उपासनेमुळे त्यांनी हिरव्या वाटा खुल्या केल्या. अज्ञात क्षितिज रसिकांच्या दृष्टीने पल्ल्यात आले. किती नवे शब्द त्यांनी मराठीच्या साहित्यविश्वात आणले...! 

स्तिमित होऊन पंचसंवेदनांना आल्हाद देणाऱ्या शब्दसंपत्तीकडे आणि तिच्यातून समूर्त केलेल्या विलोभनीय विश्वाकडे पाहत राहावे, मनःपूत आस्वाद घ्यावा आणि मनाच्या कक्षा विस्ताराव्यात!

या दृष्टीने आजमितीस चितमपल्ली यांनी साकार कलेल्या सकस साहित्यनिर्मितीकडे पाहता येईल. हे संपन्न क्षितिज किती अमर्याद आहे... किती अभिनव आहे... किती चित्रमय आहे...! या वाटांकडे सहसा कुणी वळणार नाही. छांदिष्ट आणि अवलिया माणसेच हा खडतर आणि तरीही आनंददायी मार्ग अंगीकारू शकतात.

‘पक्षी जाय दिगंतरा’ (1983), ‘जंगलाचं देणं’ (1985), ‘रानवाटा’ (1991), ‘शब्दांचं धन’ (1993), ‘रातवा’ (1993), ‘मृगपक्षिशास्त्र’ (संस्कृत-मराठी अनुवाद) (1993), ‘घरट्यापलीकडे’ (1995), ‘पाखरमाया’ (2000), ‘निसर्गवाचन’ (2000), ‘सुवर्णगरुड’ (2000), ‘आपल्या भारतातील साप’ (इंग्रजी-मराठी अनुवाद) (2000), ‘आनंददायी बगळे’ (संस्कृत साहित्यातील काही पक्षी) (2002) आणि ‘निळावंती’ (2003) ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत... शिवाय त्यांनी बृहद्‌स्वरूपाचा ‘पक्षिकोश’ (2002) निर्माण केला आहे.

हे सगळे लेखन एका ठशाचे नाही. त्याची आविष्कारपद्धती भिन्न-भिन्न स्वरूपाची आहे. ‘पक्षी जाय दिगंतरा’ आणि ‘निळावंती’ यांमधील लेखन कथास्वरूपाचे आहे. ‘आपल्या भारतातील साप’आणि ‘आनंददायी बगळे’ यांमधील लेखन वर्णनात्मक स्वरूपाचे आहे. ‘मृगपक्षिशास्त्र’मधील लेखन शास्त्रीय स्वरूपाचे आहे. भारतीय परंपरेतील अज्ञात पैलूंचा शोध त्यात आहे. अन्य लेखन निबंधाच्या प्रकारात मोडणारे आहे. ‘अरण्यवाचन’ हे त्यातील अंतःसूत्र आहे. 

‘अरण्यवाचन’ ही संज्ञा चितमपल्लींनी मराठी साहित्यविश्वाला दिली आहे. या संज्ञेचे अक्षांश-रेखांश जाणून घेण्यासाठी ‘रानवाटा’मधील ‘अरण्यवाटा’ हा चितमपल्ली यांनी तन्मयतेने लिहिलेला माहितीपूर्ण लेख वाचावा. यात शास्त्रीय दृष्टीकोन आहे. त्याचप्रमाणे पशुसृष्टी, पक्षिसृष्टी आणि वनस्पती यांकडे पाहणारी चोखंदळ वृत्ती तसेच जीवनाविषयीची सौंदर्यदृष्टी दिसून येते. जीवन जगण्याची संथादेखील त्यांनी अरण्यवाचनातून मिळते. 

चितमपल्ली म्हणतात, ‘अनोळखी गूढ जंगलात एकट्यानंच भटकण्यात एक अननुभूत आनंद असतो. अरण्यवाचनाची विद्या असली तर अभ्यासात रस निर्माण होतो आणि एकट्यानंही धैर्यानं आणि आत्मविश्वासानं अरण्यात सर्वत्र सहज फिरता येतं.’ ‘वन्यजीव निरीक्षणाची किमया’ या ललित निबंधातील आशय याला पुष्टी देणारा आहे.

‘वन्यजीवननिरीक्षण ही एक साधना आहे. एक तप आहे. या साधनेमुळंच जंगली हत्तींचा अभ्यास करणारा पालकाय, रघुवंशातल्या कांचनमृगाबरोबर दूर्वांकूर खाऊन राहणारा शातकर्णी, रानबकऱ्यांचा अभ्यास करणारा अज, रानमेंढ्यांविषयी अध्ययन करणारा जाबाली ही सारी थोर माणसं त्यांनी आयुष्यभर केलेल्या साधनेमुळंच ऋषिमुनींच्या पदाला पोहोचली.’ ही सारी निरीक्षणे त्यांच्या संस्कृत वाङ्‌मयाच्या व्यासंगामुळे त्यांना नोंदवता आली.

मारुती चितमपल्लींच्या शैलीरूपांचा अभ्यास करणे हा स्वतंत्र विवेचनाचा विषय आहे... पण या विषयाच्या अनुषंगाने ‘जंगलाचं देणं’मधील ‘पैल तो गे काऊ’, ‘रोजनिशीतील पाने’, ‘घर माझे बांधावर’ आणि ‘अशी पाखरे येती’ हे ललित निबंध पाहावेत. ‘रानवाटा’मधील ‘रानातली घरं’, ‘वेणू वाजताहे’, ‘गुलाबी पिसं’, ‘धनचिडी’, ‘इटिया डोहातील हुदाळे’, ‘पाडस’, ‘शाल्मली’ आणि ‘पांगारा’ या लेखांतील स्थलविशेषांचे, पक्षिविशेषांचे आणि वृक्षविशेषांचे वर्णन वाचावे. 

‘पाखरमाया’मध्ये गोरख चिंच, महारूख, बाभूळ, राय मुनिया आणि शेवगा या वृक्षपंचकाचे वर्णन आप्तस्वकीयांचे कौतुक करावे तितक्या ममत्वाने केले आहे. ‘रातवा’ या ललित निबंधसंग्रहातील सौंदर्यविलासामुळे रसिक मन हरखून जाते. रातकिड्यांच्या संगीताकडे चितमपल्लींचे लक्ष जाते. वाघूळाविषयी त्यांना आकर्षण वाटते. ‘पाखरमायेच्या वटवृक्षानं आणि बांबूनं माझं भावविश्व व्यापलं आहे. या सर्व माझ्या हिरव्या सोबत्यांनी एखाद्या आशीर्वादासारखं आपलं छत्र माझ्यावर धरलं आहे.’ असे ते सहजपणे लिहून जातात. हरोळी, रातवा आणि घुबड या पक्ष्यांचे वर्णन त्यांनी समरसतेने केले आहे. रानबदके आणि पंकोळी या पक्ष्यांच्या दिनक्रमाचेही त्यांनी वर्णन केले आहे.

संक्षेपाने सांगायचे झाल्यास चितमपल्ली यांची ही वनयात्रा वाचकांच्या दृष्टीने आनंदयात्रा आहे. अनोख्या दुनियेत परिक्रमा केल्याचा अपरिमित आनंद तिच्यामुळे वाचकांना मिळतो. अभिजात शैलीतील चिररुचिर स्वरूपाचे हे ललित लेखन आहे.

पशुसृष्टीविषयीचे आणि पक्षिसृष्टीविषयीचे अपार कुतूहल हा जसा मारुती चितमपल्लींच्या आवडीचा आणि अभ्यासाचा विषय तशीच निसर्गाविषयीची त्यांना अनावर ओढ. त्यांच्या आत्मचरित्रातील ‘पाढे - पनवेलचे’ या प्रकरणातील चित्रमय निसर्गवर्णन चिरस्मरणीय वाटते...

‘हळूहळू तांबडं फुटू लागलं. किती सुंदर सकाळ होती. अनेक रंगांच्या काचेच्या कंगोऱ्यांप्रमाणे खाडीचा पृष्ठभाग दिसत होता. किनाऱ्याकिनाऱ्यानं आमची होडी झरझर जात होती. जंगलं नेहमीच सुंदर दिसतात. खाडीकाठच्या खाजणीला- मॅनग्रुव्ह फॉरेस्टला- एक आगळंवेगळं गूढ सौंदर्य प्राप्त झालेलं होतं. आजूबाजूला हिरव्या डोंगरांच्या रांगा. दोन डोंगरांमधून वाहत समुद्राला मिळालेली हरिवत नदी. समुद्राच्या पोटात शिरलेले दांडे... त्यामुळे निर्माण झालेली मुखं अन्‌ मुखाकाठच्या घनदाट खाजणी, त्यापलीकडे अफाट समुद्र. त्यावर निळं आभाळ. खाजणीत कांदल, तिवर आणि वांजळ यांची झाडं होती. भरती-ओहोटीचं पाणी त्या जंगलात येत-जात असल्यानं त्यांना ‘टायडल फॉरेस्ट’ असंही म्हणतात. पाणी आणि जंगल यांचं इतकं सुंदर साहचर्य क्वचितच कुठं पाहायला मिळतं.’

त्यांच्या आत्मचरित्रात ‘साहित्यिकांच्या सहवासात’ या शीर्षकाखाली रेखाटलेली बाबा आमटे, गो.नी. दांडेकर, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, प्रा. राम शेवाळकर, जी.ए. कुलकर्णी यांची व्यक्तिचित्रे अविस्मरणीय स्वरूपाची झाली आहेत. त्यांच्या चित्रमय शैलीला अनुरूप चित्रांची साथसंगत देणाऱ्या अ.अ. आलमेलकर या चित्रकाराचे त्यांनी रेखाटलेले ते शब्दचित्र अप्रतिम स्वरूपाचे. मारुती चितमपल्लींना वनविद्येच्या साधनेमुळे आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनामुळे या सर्वांचा सहवास लाभला. 

मारुती चितमपल्ली अलीकडेच नागपूर सोडून सोलापूरला कायम वास्तव्यासाठी आलेले आहेत. त्यांचा पुढील काळ निरामयतेचा आणि लेखनदृष्ट्या स्वास्थ्याचा जावो. त्यांच्या 88 व्या वाढदिनी त्यांचे अभीष्टचिंतन...!

- डॉ. सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा.
somnathpant@gmail.com

Tags: लेख व्यक्तिवेध सोमनाथ कोमरपंत मारुती चितमपल्ली निसर्ग जंगल पर्यावरण साहित्य अरण्यवाचन Somnath Komarpant Maruti Chitampalli Nature Environment Literature Marathi Aranyavachan Load More Tags

Comments:

माधवी सोनावणे

खूपच अप्रतिम लेख आहे . मराठी साहित्य घेऊन पदवीचा अभ्यास करताना मला आदरणीय श्री मारुती चितमपल्ली सरांच्या साहित्याची माहिती झाली. त्यांचा एक ललित लेख होता अभ्यासक्रमात, खेद आहे की आता मला नाव आठवत नाही पण तो लेख वाचताना ते पक्षी, जंगल, पाण्याचे ओहोळ इत्यादी अगदी डोळ्यासमोर उभे राहिले होते हे अद्याप लक्षात आहे. सरांचा एक ललित लेख होता ज्या वेळी मी मराठी साहित्यातुन पदवीचा

नंदकिशोर लेले

सर,अतिशय हृद्य लेख,लेखकाच्या लेखन लेखनशैलीची वैशिष्ट्ये उलगडून दाखवताना लेखकाच्या व्यक्तिमत्वातून ते कसं लपेटून आल आहे हे आपल्या लेखातून नेहमीच दिसून येते.त्यांच्या पुस्तकांविषयी खूप माहिती मिळाली. आपल्या लेखात सांगितलेलं आत्मचरित्र जरूर वाचेन. .'पक्षी जाय दिगंतरा ' यांमधील हिरवे रान हा लेख मला फार आवडला. मी सोलापूरचा असल्याने आपण केलेल्या साहित्यिकांचा उल्लेखही मनाला खूप आनंद देऊन गेला. शतशः धन्यवाद ! आपल्यासारखे साहित्य उपासक आणि साक्षेपी समीक्षक हे अलक्षित तसेच दुर्लक्षीत पुस्तकांना आणि त्यांच्या लेखकांना उजेडात आणतात हे एक महान कार्य आहे.

योगेश रावते

समग्र चितमपल्ली अशा स्वरूपाचा सुरेख असा हा लेख... डॉ. सोमनाथ कोमरपंत यांच्या या लेखामुळे वाचक निश्चितच श्री. मारुती चितमपल्ली यांच्या साहित्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही...

नरेंद्र महादेव आपटे

श्री मारुती चितमपल्ली यांच्या व्यक्तिमत्वाची आणि साहित्याची सुरेख ओळख करून देणारा हा लेख आहे.  प्रा सोमनाथ कोमरपंत यांच्या या लेखा मुळे माझ्यासारख्या अनेकाना  श्री मारुती चितमपल्ली यांचे  आत्मचरित्र वाचावेसे वाटेल. 

Mangesh Berad

अतिशय सुंदर लेख.

Add Comment