कथा, समीक्षा या वाङ्मयप्रकारांबरोबरच गाडगीळ यांनी कादंबरीलेखनही केले. ‘लिलीचे फूल’ ही त्यांची प्रयोगशील कादंबरी आहे. ‘दुर्दम्य’ ही त्यांची लोकमान्य टिळकांवरची चरित्रात्मक कादंबरी. या कादंबरीतून त्यांनी लोकमान्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडून दाखवले आहेत. तत्कालीन राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रेरणांचे अवधान ठेवून ही साहित्यकृती लिहिलेली आहे.
प्रा. गंगाधर गाडगीळ यांचे वाङ्मयीन कर्तृत्व चतुरस्त्र स्वरूपाचे आहे. मराठी नवकथेचे ते शिल्पकार मानले जातात. मराठी वाङ्मयात त्यांनी मोलाची भर घातली आहे. संवेदनक्षम वयात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला. 85 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी 130 पुस्तके लिहिली. कथालेखन हे त्यांचे आवडते क्षेत्र होते. त्यात त्यांनी अनेक प्रयोग केले. आपल्या कथेतून व्यक्तिमनाचे अनेक पापुद्रे त्यांनी उलगडून दाखवले. त्याचप्रमाणे समाजमानसाचाही वेध घेतला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवी जीवनमूल्यांत आमुलाग्र बदल झाला. या काळातील साहित्यावर व्यक्तिवादाचा आणि वास्तववादाचा प्रभाव होता. या काळात अनेक कथाकारांनी पारंपरिक कथालेखनात परिवर्तन घडवले. गाडगीळ ज्या काळात लिहीत होते, त्याच काळात अरविंद गोखले, व्यंकटेश माडगूळकर, पु. भा. भावे, शांताराम आणि सदानंद रेगे हेदेखील कथालेखन करत होते. या काळात ‘सत्यकथा’ आणि ‘अभिरुची’ या वाङ्मयीन नियतकालिकांनी नवसाहित्याचा कैवार घेतला. केवळ कथाच नव्हे तर अन्य साहित्यप्रकारांतही नवे प्रवाह आले. गाडगीळ व अन्य समकालीन साहित्यिकांनी ते आत्मसात केले. वास्तविक, गाडगीळ हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक. त्यांनी सुरत येथे अर्थशास्त्राचे अध्यापन केले होते. त्यानंतर, मुंबईतील पोतदार कॉलेज, सिडनहॅम कॉलेज आणि रूपारेल कॉलेज येथे त्यांनी अर्थशास्त्राचे अध्यापन केले. नरसी मोनजी कॉलेजचे प्राचार्यपद त्यांनी भूषवले. आपटे उद्योग समूह आणि वालचंद उद्योग समूह यांचे ते सल्लागार होते.
मुंबई हे आपल्या देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक केंद्र राहिलेले आहे. या महानगरात अंतःस्तरावर आणि बाह्यस्तरावर जाणवणारे संवेदनाविश्व गाडगीळांनी रंगवले. मुंबई ही त्यांच्या दृष्टीने प्रयोगभूमी होती. 1940 मध्ये ‘प्रिया आणि मांजर’ ही कथा त्यांनी लिहिली. तिच्यात नवतेच्या पाऊलखुणा दिसत होत्या. त्यानंतर गाडगीळ सातत्याने आणि निष्ठेने लिहीत राहिले. बा.सी. मर्ढेकर यांनी गुणग्राहकतेने आणि दृष्टेपणाने गाडगीळ यांच्या कथालेखनातली बलस्थाने अधोरेखित केली आहेत. ‘उद्ध्वस्त विश्व’मधील कथांमधून त्यांनी वास्तवानुभूतीचे विदारक चित्रण केलेले आहे आणि तेवढ्याच सामर्थ्यानिशी तरल मनोविश्वाचे काव्यात्म दर्शन घडविले आहे. ‘किडलेली माणसे’मधून समूहमानसाची चित्रे त्यांनी रेखाटली. आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही घटकांमध्ये त्यांचे प्रतिभासंपन्न मन नवे नवे प्रयोग करू लागले. मानवी स्वभावाच्या मुळाशी असणाऱ्या आदिम प्रेरणांचा त्यांनी शोध घेतला. मानवी जीवनातील घटनांच्या चित्रणापेक्षा पात्रांच्या मनोविश्लेषणाला त्यांनी प्राधान्य दिले. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीमनाची होणारी कुचंबणा त्यांनी ‘भागलेला चांदोबा’ या कथेतून दाखवून दिली. या कथेमध्ये त्यांनी ‘फॅन्टसी’चा आधार घेतला आहे, स्वप्नांचा आणि प्रतीकांचा उपयोग कथेच्या आशयातून कलात्मक रीतीने केला आहे. मानवी मनाच्या अतर्क्य गुढतेची संगती लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. मानवी अंतरंग दर्शनाची नवी मळवाट त्यांनी निर्माण केली. उत्तरकालीन कथाकारांनी तिच्यावरून वाटचाल केली.
कथाकार गाडगीळांइतकेच समीक्षक गाडगीळ महत्त्वाचे आहेत. सर्जनात्मकता त्यांनी अंगात मुरवून घेतली आहे याचा प्रत्यय येतो. सैद्धांतिक समीक्षेपेक्षा आस्वादात्मकता हा त्यांच्या समीक्षालेखनाचा गुणविशेष आहे. ‘साहित्याचे मानदंड’, ‘खडक आणि पाणी’, ‘आजकालचे साहित्यिक’, ‘खाडिलकर यांची तीन नाटके’, ‘पाण्यावरची अक्षरे’ आणि ‘प्रतिभेच्या सहवासात’ ही त्यांची महत्त्वाची समीक्षेची पुस्तके आहेत. त्यांच्यामधील वाङ्मयीन टीकाकार किती सक्षम, सूक्ष्म आणि तीक्ष्ण बुद्धीचा आहे याचे दर्शन त्यात घडते.
‘संवाद’ या ग्रंथात डॉ. विजयाबाई राजाध्यक्ष यांनी घेतलेल्या प्रदीर्घ मुलाखतीमधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेता येतो. ‘जिव्हाळा’ या ग्रंथात डॉ. रामदास भटकळ यांनी गाडगीळ यांचा चरित्रात्मक धांडोळा घेतला आहे. तो हृद्य आणि निकट सहवासाच्या अनुभूतीतून आलेला आहे. या पार्श्वभूमीवर गाडगीळांची मराठी साहित्यातील महत्ता प्रत्ययास येते.
‘खडक आणि पाणी’ या समीक्षा ग्रंथात गाडगीळ यांची समीक्षादृष्टी प्रकट झाली आहे. या ग्रंथात अल्प प्रमाणात सैद्धांतिक समीक्षा आढळते, पण ती रुक्ष स्वरूपाची नाही. अनुभवसंपन्न, निर्मितिशील साहित्यिकाचे ते प्रचितीचे बोल आहेत. ‘साहित्यातील सत्य’, ‘वास्तवता : एक वाङ्मयीन मूल्य’ आणि ‘साहित्याचे मूल्यमापन’ हे लक्षणीय लेख या ग्रंथात आहेत.
लघुकथा, ललित निबंध, कादंबरी, विनोदी साहित्य आणि कविता या वाङ्मयप्रकारांविषयीचे विवेचन त्यांनी या ग्रंथात केलेले आहे. वाङ्मयाविषयीची प्रचंड आस्था आणि वाङ्मयीन संस्कृतीवरील निष्ठा त्यात दिसून येते, पण त्यात कुठेही भाबडेपणा नाही. आपली विचारदृष्टी प्रकट करताना ते परखडपणाही दाखवतात. या दृष्टीने ‘रसचर्चेची अडगळ’ हा काव्यमीमांसा करणारा लेख वाचावा. ‘मर्ढेकर : दुसरे केशवसुत’ या लेखामध्येही त्यांच्या चिकित्सक वृत्तीचा प्रत्यय येतो.
‘काव्याचा अर्थ : एक उलटतपासणी’, ‘नवकथेचे स्वरूप’, ‘काही अनुभव आणि विचार’ या लेखांमधून नवसाहित्याविषयीची आपली भूमिका त्यांनी अभ्यासपूर्वक आणि हिरिरीने मांडली आहे. व्यंकटेश माडगूळकर यांची कथा व कादंबरी, श्री. ना. पेंडसे यांची कादंबरी आणि इंदिरा संत व पु. शि. रेगे यांची कविता यांचा परामर्श गाडगीळ यांनी तन्मयतेने घेतला आहे. वाङ्मयीन टीका म्हणजे चिरफाड नव्हे, तर तो स्नेहसौहार्दाने केलेला संवाद असतो असा आपुलकीचा भाव गाडगीळ यांच्या या लिखाणात आहे.
‘आठवणीच्या गंधरेखा’मध्येही असा जिव्हाळा व्यक्त झाला आहे. या संस्मरणात्मक पुस्तकात विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि बा. सी. मर्ढेकर इत्यादी कवींच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे. गाडगीळ यांच्या लालित्यपूर्ण शैलीमुळे ही विश्रब्ध सृष्टी उभी राहिलेली आहे.
आस्वादक समीक्षेविषयीची आपली भूमिका त्यांनी निखळ आणि पारदर्शी शब्दांत मांडली आहे. ती रसिकांच्या जाणिवा आणि संवेदनशीलता प्रगल्भ करणारी आहे.
‘आस्वादक समीक्षा हा सर्व समीक्षेचा पाया आहे असे मी मानतो आणि ही समीक्षा एका साहित्यकृतीची स्वतंत्रपणे केलेली असावी असं मला वाटतं. प्रत्येक साहित्यकृतीला स्वतःचं असं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं. कुठल्याही वर्गीकरणात, साहित्यविषयक संकल्पनाव्यवहारात ती चपखल बसत नाही. अशा एकेका साहित्यकृतीचा आस्वाद घेऊनच रसिक साहित्याशी आपलं नातं जोडत असतो. रसिकांच्या मनावर होणारे अनेकविध संस्कार आणि त्यापासून होणारा आनंद येथूनच सगळ्या साहित्यविषयक विचाराला सुरुवात होते. हा संस्कार आणि हा आनंद ही एक गोष्ट प्रत्यक्षात घडणारी असते बाकी सर्व अनुमाने असतात.
‘काही अनुभव आणि विचार’ या लेखात गाडगीळ यांनी स्वतःच्या लेखनाच्या निर्मितिप्रक्रियेविषयीचे मनोगत प्रकट केले आहे. ते म्हणतात,
‘मनात गोळा झालेल्या अनेक अनुभवांतील एखादा एकदम सजीव होतो. प्रकाशकिरण बाहेर टाकू पाहतो. पाहता पाहता त्याच्याभोवती इतर अनुभव सजीव होऊन घिरट्या घालू लागतात आणि थोड्याच वेळात अनुभूतीची एक आकृती तयार होते. कधी कधी एखाद्या तात्कालिक कारणामुळे ती क्रिया घडते, पण ही एक आपोआप घडणारी क्रिया आहे.’
कथा, समीक्षा या वाङ्मयप्रकारांबरोबरच गाडगीळ यांनी कादंबरीलेखनही केले. ‘लिलीचे फूल’ ही त्यांची प्रयोगशील कादंबरी आहे. ‘दुर्दम्य’ ही त्यांची लोकमान्य टिळकांवरची चरित्रात्मक कादंबरी. या कादंबरीतून त्यांनी लोकमान्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडून दाखवले आहेत. तत्कालीन राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रेरणांचे अवधान ठेवून ही साहित्यकृती लिहिलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील एका तेजस्वी पर्वाचा धांडोळा घेत, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी लोकमान्य टिळकांची प्रभावी व्यक्तिरेखा उभी केलेली आहे. परिणतप्रज्ञ वयात त्यांनी मुंबईच्या जडणघडणीसंबंधीची ‘प्रारंभ’ ही कादंबरी लिहिली. नाना शंकरशेठ हे मुंबईच्या रचनेचे शिल्पकार. अर्थातच त्यांच्या व्यक्तिरेखेला प्राधान्य मिळणं स्वाभाविक आहे. या कादंबरीत गाडगीळ यांनी चित्रांचाही उपयोग करून घेतला आहे. मुंबई शहराच्या विकासक्रमाचे आकलन होण्यासाठी ते पूरक ठरले आहे. ज्या प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत यांनी मिळून महाराष्ट्राची सत्वधारा सशक्त बनवली, अशा व्यक्तिमत्त्वांमध्ये ‘बालगंधर्व’ हे अग्रगण्य व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या जीवनचरित्रावर आधारलेली कादंबरी गाडगीळ यांनी लिहिलेली आहे. ‘गंधर्व युग’ हे त्या कादंबरीला दिलेले नाव अर्थपूर्ण आहे.
हेही वाचा : मधु मंगेश कर्णिक: चतुरस्र प्रतिभेचे साहित्यिक - सोमनाथ कोमरपंत
सुरुवातीच्या काळात प्राध्यापक गाडगीळ यांनी ‘गोपूरांच्या प्रदेशात’ हे प्रवासवर्णनही लिहिले. या पुस्तकात त्यांनी दक्षिण भारतातील भव्य मंदिरांची वास्तुशिल्पाची आणि भवतालच्या प्रदेशाची चित्रे प्रसन्न शैलीत रेखाटली आहेत. मराठीतील अग्रगण्य प्रवासवर्णनकारांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. ‘साता समुद्रापलीकडे’ या पुस्तकातील ‘काप्री’, ‘व्हेनिस’, ‘रोमांचकारी रोम’ आणि ‘जपान’ हे लेख आनंदानुभूती देणारे आहेत. तन्मयतेने केले गेलेले हे लेखन आहे. याशिवाय ‘चीन : एक अपूर्व अनुभव’, ‘नायगाराचं नादब्रह्म’ आणि हिममय अलास्का’ ही प्रवासवर्णने त्यांनी उत्तरायुष्यात लिहिली. ‘एका मुंगीचे महाभारत’ हे त्यांचे गाजलेले आत्मचरित्र. त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. समकालीन समाज आणि सामाजिक, वाङ्मयीन, सांस्कृतिक घटना यांचे प्रत्ययकारी चित्रण लेखकाने केलेले आहे.
अर्थशास्त्रावरची काही गंभीर आणि नर्मविनोदी शैलीतील पुस्तकेही त्यांनी लिहिलेली आहेत. ‘आर्थिक नवलकथा’ हे त्यांचे लक्षणीय स्वरूपाचे पुस्तक. ‘फिरक्या’, ‘मुंबई आणि मुंबईकर’, ‘मुंबईच्या नवलकथा’ ही त्यांची विनोदी शैलीतील पुस्तके. मुंबईच्या मध्यमवर्गीय समाजाचा लघुत्तम साधारण विभाजक साधणारा बंडू याचे आणि स्नेहलता हिचे स्वभावचित्र गाडगीळ यांनी समरसतेने रेखाटले आहे.
प्रा. गंगाधर गाडगीळ यांच्या साहित्याचे क्षितिज विस्तीर्ण आहे. त्याला गवसणी घालणे अवघड आहे. प्रस्तुत लेखात सूत्ररूपाने त्याला स्पर्श केलेला आहे. जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
- सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा.
somnathpant@gmail.com
(लेखक, मराठी साहित्य समीक्षक असून त्यांनी गोवा विद्यापीठात मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले आहे.)
आकाशवाणी पुणे केंद्राच्या संग्रहातील गंगाधर गाडगीळ यांची विद्याधर पुंडलिक यांनी घेतलेली मुलाखत
Tags: मराठी साहित्य व्यक्तीविशेष समीक्षा सोमनाथ कोमरपंत साधना डिजिटल Load More Tags
Add Comment