अनुवादकाचे वाचन....

'जागतिक पुस्तक दिवस' निमित्ताने...

फोटो: कर्तव्य साधना

जगभर 23 एप्रिल हा दिवस 'जागतिक पुस्तक दिवस' म्हणून साजरा केला जातो. जगभरातील उत्तमोत्तम साहित्यकृतींना स्वभाषेत अनुवादित करून अनुवादक भाषा, समाज आणि संस्कृती यांच्या उन्नतीसाठी महत्त्वाचे योगदान देत असतात. तर जागतिक पुस्तक दिवसाच्या निमित्ताने 'अनुवादक आणि पुस्तके' या विषयावरील चार लेख व एक मुलाखत आज, उद्या आणि परवा प्रसिद्ध करत आहोत. त्यापैकी हा एक लेख ...

मी आत्तापर्यंत पन्नासहून अधिक पुस्तके अनुवादित केलेली आहेत. त्यात कथा ,कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, आठवणी, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखकांची भाषणे, इत्यादी अनेक साहित्य प्रकारांचा समावेश आहे. यामध्ये, सहसा चांगल्या वाचकांच्याही हाताला लागणार नाहीत अशी काही पुस्तके आहेत. ती प्रकाशित झाल्यावर ‘ही पुस्तके तुम्हाला कुठून मिळतात? ती आमच्या हाताला कशी लागत नाहीत?’ असे विचारणारे माझे काही वाचक मित्र आहेत. त्यांच्याही मनात ‘ मी काय वाचतो?’ हा प्रश्न येत असणारच. त्या प्रश्नाचे समाधान करण्याचा हा छोटासा प्रयत्न. 

प्रथम मी अशा वेगळ्या पुस्तकांपर्यंत कसा पोहोचतो हे सांगतो. माझा हिंदीतील अनेक लेखकांशी चांगला परिचय आहे. त्यांच्याशी बोलताना अनेकवेळा त्यांच्या वाचनात आलेल्या वेगळ्या पुस्तकांची माहिती मला मिळते. तसेच मी हिंदीतील काही नियतकालिकांचा नियमित वाचक आहे. त्यामध्ये ‘ हंस’, ‘पहल’, ‘अकार’, ‘ज्ञानोदय’ ‘समकालीन साहित्य’ इत्यादी निवडक नियतकालिकांचा समावेश आहे. या नियतकालिकांच्या माध्यमातून मला हिंदी साहित्य विश्वात नवीन काय चालले आहे, याची माहिती मिळत असते. त्या माहितीच्या आधारे मी मला वेगळे वाटलेल्या पुस्तकाची मागणी नोंदवतो. आणि ती माझ्यापर्यंत पोहोचतात. 

अर्थात सगळी पुस्तके मी अनुवादित करण्याच्या दृष्टीनेच वाचतो असे मात्र नाही. ती पुस्तके मला वाचावीशी वाटलेली असतात. कधी-कधी मी त्यातील एखाद्या पुस्तकावर लेखदेखील लिहितो. पण नेहमीच असे होईल असे नसते. अशाच काही पुस्तकांवर मी येथे लिहिणार आहे. 

एखादे पुस्तक अनुवादित करण्यापूर्वी मी त्या लेखकाची इतर अनेक पुस्तके मिळवून वाचतो. त्याच्या मुलाखतीची पुस्तके असतील तर तीही मागवून घेतो. त्यातून तो लेखक समजायला मला मदत होते. उदाहरणच द्यायचे झाले तर ‘मंटो’चे देता येईल. मी कॉलेजमध्ये असल्यापासून ‘मंटो’च्या कथा वाचतो आहे. पण त्यानंतर जवळजवळ वीस वर्षांनी मी त्याच्या कथा अनुवादित केल्या. तो पर्यंत ‘मंटो’चे किंवा त्याच्या साहित्याविषयीची जी पुस्तके मला मिळाली ती मी घेतलेली आहेत. त्याच्या विषयीची वेळोवेळी जी नियतकालिके प्रकाशित झाली ती सुद्धा मी वाचली आहेत. अजूनही मी ‘मंटो’ची पुस्तके विकत घेत असतो. 

दुसरे उदाहरण म्हणजे भीष्म साहनी. त्यांचे आत्मचरित्र मी अलीकडेच अनुवादित केले आहे. पण ते करण्यापूर्वी मी भीष्म साहनी यांची अनेक पुस्तके, त्यांच्यावरील लेख असणारी नियतकालिके विकत घेतली आहेत. त्यातून भीष्म साहनी समजून घ्यायला मला मदत झाली.

अर्थात या लेखकांचे इतर सर्व साहित्य मी पूर्णपणे वाचलेलेच असते असाही माझा दावा नाही. पण मी अनुवाद करण्यापूर्वी त्यातला आवश्यक तो भाग नक्कीच वाचलेला असतो. तर काही भाग नुसताच चाळलेला असतो. मी अनुवाद न केलेल्या काही पुस्तकांची ओळख आता मी जरा सविस्तरपणे करून देणार आहे. 

‘पाश’चे ‘संपूर्ण कविताएं’ हे माझे आवडते पुस्तक आहे. देशात आज असलेल्या वातावरणात ‘पाश’ची आठवण येणे स्वाभाविक आहे. त्याचे नाव अवतारसिंग संधू ‘पाश’ असे होते. काव्यलेखनासाठी स्वीकारलेल्या ‘पाश’ या नावानेच जग त्याला ओळखते. 23 मार्च 1988 रोजी खलिस्तानी आतंकवाद्यांनी या युवा क्रांतिकारी कवीला गोळ्या घालून ठार मारले होते.

'पाश'ला ठार करून आपल्या विरूद्ध उठणारा एक आवाज कायमचा बंद केला आहे, असे आतंकवाद्यांना वाटले होते. पण तसे घडले नाही. हत्येपूर्वी ‘पाश’चा आवाज  त्याच्या कवितेच्या आणि अन्य लेखनाच्या माध्यमातून फक्त पंजाब आणि पंजाबी भाषा या पुरताच मर्यादित होता. पण त्याच्या हत्येनंतर तो आवाज संपूर्ण देशभर पोहोचला तो त्याच्या कवितेच्या माध्यमातून. 

हा आवाज इतका सशक्त होता की, 1989 मध्ये पाशच्या कवितांचा हिंदी अनुवाद प्रकाशित झाला. त्या कवितासंग्रहाचे नाव होते ‘बीच का रास्ता नाही होता’. हा कवितासंग्रह हिंदी भाषिकांना इतका आवडला की, त्यांनी तो उचलून धरला. (हे पुस्तक मराठीतही अनुवादित झाले आहे.) आजही ‘पाश’ हा कवी पंजाबी पेक्षा हिंदीतच जास्त प्रसिद्ध आहे. 

जेव्हा आपल्या देशात लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न केला जातो, एखाद्या व्यक्तीचा किंवा व्यक्ती समूहाचा आवाज दाबण्यात येतो, तेव्हा ‘पाश’ यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांचे ‘संपूर्ण कविता’ (आधार प्रकाशन, पंचकुला, हरियाणा) हे कायम माझ्या वाचनात असते. 

माझ्या वाचनात असलेले दुसरे कवी आहेत केदारनाथ सिंह. त्यांना 2013 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. तोवर मी त्यांच्या कविता, मुलाखती नियतकालिकांतून वाचल्या होत्या. पण त्यानंतर मी त्यांचे एक दोन कवितासंग्रह मिळवले. त्यांचे साहित्यविषयक विचार समजून घेण्यासाठी मेरे साक्षात्कार’ हे त्यांच्या मुलाखतीचे पुस्तकही मागवले. आता ते माझ्या संग्रही आहे. त्यांच्या मुलाखतीतून मला त्यांची कविता समजून घ्यायला मदतच झालेली आहे. येथे त्यांच्या एका कवितेच्या काही ओळी उद्धृत  करण्याचा मोह होतो आहे. 

‘कठीण दिवस’ या त्यांच्या कवितेते त्यांनी भविष्यातला धोका कसा ओळखला होता हे आपल्याला समजते. या कवितेत केदारनाथ सिंह म्हणतात...

            दिवस कठीण येणार आहेत.
            खूप दीर्घ आणि निसत्व...

आजची आपली अवस्था पहिली तर त्या भविष्यदर्शी कवीने ‘कठीण दिवस येणार आहेत’ असा इशाराच जणू या ओळीतून देवून ठेवला होता असे मला वाटते. या कवितेत ते पुढे लिहितात...

           प्रथम धान्य कमी होईल 
           कदाचित चिमण्यांना याची जाणीव आधी होईल
           नंतर माणसांना
           मग कमी होऊ लागेल पाणी
           मग कमी होऊ लागेल हवा... 
सगळीच कविता येथे देत नाही. पण आज आपण हे प्रत्यक्ष घडताना अनुभवतो आहोत. 

एका मुलाखतीत केदारनाथ सिंह यांना रचना प्रक्रियेबद्दल विचारले असता ते म्हणतात, “मला वाटतं की, रचना प्रक्रियेबद्दल बोलणं ही आधुनिक समीक्षेतील फॅशन झाली आहे. रचना प्रक्रियेबद्दल बोलणं म्हणजे अंधा-या विहिरीत डोकावून बघण्यासारखे आहे. पण तरीही सांगायचं झालंच तर मी इतकंच म्हणेन की, एका रचनेकडून दुसऱ्या रचनेकडे जाताना आणि कित्येक वेळा एका शब्दातून दुसऱ्या शब्दाकडे जाताना प्रतीक्षा करावी लागते. खूप धीर धरावा लागतो. मी घाईने काहीही करीत नाही. कित्येक वेळा एखादा अनुभव किंवा विचार मी मनाच्या तळाशी सोडून देतो. तिथे तो अपोआप एक आकार धारण करतो. ही पद्धत खूप दीर्घ आणि यातनामयी आहे. पण त्याशिवाय रचनेच्या अंधाऱ्या मुळापर्यंत पोहोचण्याचा दुसरा रस्ता मी शोधू शकलेलो नाही... पण मी कवितेच्या किंवा साहित्याच्या बाबतीत अजिबात निराश नाही. अभिव्यक्तीची सगळी मध्यमं जिथे संपतात तिथे शब्द जिवंतच राहतो. माझा शब्दांवर विश्वास आहे. आज भारतीय लेखकांपुढे सगळ्यात मोठं आव्हान हेच आहे की, शब्दांच्या या दुनियेत थेट भारतीय शब्दांची ओळख कशी टिकवून ठेवायची? मी माझ्या विनम्र रचनात्मक प्रयासांद्वारे त्या दिशेने निरंतर सक्रीय राहत आलेलो आहे”. या कवीच्या कविता नाही समजल्या तरी ‘दिवस कठीण येणार आहेत’ हा इशारा समजला तरी पुरे, असे मला वाटते.

अलीकडेच माझ्या वाचनात आलेला कवितासंग्रह आहे ‘अंधेरे की पाजेब’. यामध्ये काश्मिरी लोकांच्या दु:खाच्या आणि विस्थापनाच्या कविता आहेत. त्याचे कवी आहेत... निदा नवाज. या कवीच्या कविता आणि डायरीतील पाने मी प्रथम ‘पहल’ मधून वाचली होती. पण त्यांचा कवितासंग्रह मागवायचे राहून गेले होते. लॉकडाऊनपूर्वीच मी त्यांचा हा कवितासंग्रह मागवून घेतला आहे आणि सध्या तोच वाचतो आहे. या पुस्तकातील प्रत्येक कविता ही अनुभवातून उतरलेली आहे. यातील कविता वाचताना काश्मीरवरील डॉक्युमेंटरीच बघतो आहोत असा भास होतो.

निदा नवाज हे पुलवामा इथे राहतात. तेथील लोकांचा आवाज बनून ते लिहित आहेत. काश्मीरमधील परिस्थितीसाठी ते सैन्याला आणि अतिरेक्यांना जबाबदार धरतात. कित्येक वेळा ते तेथे घडलेल्या घटनांवर, तेथील लोकांवर कविता लिहितात असे दिसते. त्यांच्या बहुतेक कवितांमध्ये कथ्य इतके ठोस आणि मार्मिक असते की, कवितेतील त्रुटींकडे वाचकांचे लक्ष जात नाही. मी तुम्हाला त्या कवितासंग्रहातील काही कवितांची शीर्षके सांगतो, त्यावरून तुम्हाला त्यांच्या कवितांची कल्पना येईल. ‘आदमखोर कानून की आड मे’, ‘देशद्रोही’, ‘लाशे, ईद और रथयात्रा’, ‘इतिहास का जख्म’, ‘बिघर हुए परिंदों का काफिला’... 

या पूर्वी निदा नवाज यांची काश्मिरी डायरी ‘सिसकियाँ लेता स्वर्ग’ प्रकाशित झाली आहे. त्यातील काही भाग मी ‘पहल’ या नियतकालिकातून वाचला आहे. हिंदीत पहिल्यांदाच इतक्या संवेदनशील पणे सैन्य आणि अतिरेकी यांच्यातील ‘क्रॉसफायरिंग’मध्ये अडकलेल्या गरीब आणि निर्दोष काश्मिरी जनतेचे चित्रण करण्यात आलेले आहे. हे चित्रण तुम्हाला अस्वस्थ करते. ‘अंधेरे की पाजेब’ (अंधाराची पैंजणे) मध्ये असेच काही अनुभव काव्यरूप घेवून अवतरले आहेत. अर्थात ते डायरीतील समाजशास्त्रीय अनुभवांपेक्षा वेगळे आहेत. सध्या लॉकडाऊनच्या काळात मी हा काव्यसंग्रह हळूहळू वाचतो आहे. 

बादल सरकार हे नाव आपल्याला प्रायोगिक नाटकांच्या संदर्भात माहिती असते. त्यांची काही नाटके अमोल पालेकरांनी केलेली आहेत. पण या व्यतिरिक्त त्यांच्याविषयी आपल्याला काहीच माहिती नसते. त्यांच्या विषयीच्या एका पुस्तकाचा-‘बादल सरकार: व्यक्ती आणि रंगमंच’चा- मी अनुवाद करणार आहे. बादल सरकार यांच्यासोबत काम केलेले जागतिक कीर्तीचे चित्रकार अशोक भौमिक यांनी हे पुस्तक लिहिले आहे. बादल सरकार यांच्या कार्याविषयी माहिती देणारे कोणतेही पुस्तक मराठीत नसल्याने मी या पुस्तकाचा अनुवाद करायचे ठरवले आहे. पण त्यापूर्वी ‘प्रवासी की कलमसे’ हे बादल सरकार यांचे पुस्तक मी वाचले आहे. त्यात बादल सरकार यांची पत्रं, डायरी इत्यादींचा समावेश आहे. 

अशोक भौमिक यांची ‘मोनालिसा हँस रही थी’ ही कादंबरी मी अनुवादित केली आहे. ती या वर्षी प्रकाशित होईल. या कादंबरीच्या माध्यमातून भौमिक यांनी चित्रकलेच्या जगातील भांडवलदार विरुद्ध कलेचे स्वातंत्र्य असा लढा चित्रित केला आहे. यात नायक, खलनायक अशी पात्रे नाहीत. तर संपूर्ण समाजाला त्यांनी गुन्हेगाराच्या पिंज-यात उभे केले आहे.  

आता माझ्या टेबलवरील वाचनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुस्तकाचा उल्लेख करतो. अब्दुल बिस्मिल्लाह यांची ‘कुठाँव’ ही कादंबरी मुस्लीम समाजातील जातीयतेचे चित्रण करते. मुस्लीम समाजात उच्चनीचता नसते अशी आपली समजूत करून देण्यात आली आहे. पण ती कशी खोटी आहे, हेच त्यांनी या कादंबरीत दाखवून दिले आहे. अब्दुल बिस्मिलाह हे मुसलमानांतील बंडखोर लेखक समजले जातात. 

असे अनेक पुस्तकांबद्दल लिहिता येईल. मी दर महिन्याला काही पुस्तके विकत घेतो. त्यातील सगळीच वाचली जातात असे नाही. पण ती पुस्तके आपल्या जवळ आहेत याचे एक समाधान मात्र असते. पुस्तकाबाबत प्रत्येकाची आवड, त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन, उद्देश वेगवेगळा असतो. त्यामुळे वाचनामध्ये फरक पडतो. मात्र वरील विवेचनावरून माझी आवड तुमच्या लक्षात आली असेलच...

- चंद्रकांत भोंजाळ
bhonjalck@gmail.com

वाचा 'जागतिक पुस्तक दिवस' निमित्त विशेष लेख:

अनुवाद आणि उत्तम अनुवाद - संजय भास्कर जोशी
केल्याने भाषांतर... - डॉ. शंतनू अभ्यंकर
मुक्त संवाद: अभिरुचिसंपन्न प्रकाशकाशी - सोमनाथ कोमरपंत

Tags:Load More Tags

Comments: Show All Comments

Mr RAVINDRA TORNE

लेख खूप आवडला. धन्यवाद

वासुदेव पाटील

मंटो च्या कथेचे खूपच छान,अचूक अनुवाद आपण केले आहेत .साधना साप्ताहिक मध्ये वाचले आहेत .या कथेचे पुस्तक प्रकाशित झाले आहे काय ?

महेश प्रकाश कुलकर्णी

उत्तम माहिती. योग्य वेळ मी स्वतः आपल्या कथा, कादंबर्‍याचा वाचक आहे... 'लोकशाही ची ऐशी तेशी' नुकतेच वाचनात आले होते. अनुवादाचा आवाका किती मोठा असतो याचा अंदाज आला. आपली लेखणी आणि वाचन असेच गुलमोहर सारखे बहरु दे. या शुभेच्छा सह पुढील वाटचालीस अनेक उत्तम शुभेच्छा....!!!

Dr Sudhir R. Deore

खूप आवडला लेख

Dr. Vaidya

खूप छान

Tanaji Shrirang Bhosale

चंद्रकांत भोंजाळ यांच्यामुळे हिंदीतील चांगल्या आणि वाचनीय पुस्तकांचा परिचय होत असतो. अलीकडेच त्यांच ' भय इथले संपत नाही ' हे फाळणीवरच्या कथांच अनुवादित पुस्तक वाचले आहे.

Prof.. Dada Shinde

Very Good.. &.. informative.. Self.. Expression... Congratulations.

Sudam Gopal Sutar

Nice sir

Add Comment

संबंधित लेख