गोपाळ गणेश आगरकर यांच्या निधनाला 17 जून 2020 रोजी सव्वाशे वर्षे होत आहेत. ते फक्त 39 वर्षे जगले. परंतु या अल्पकाळात सामाजिक सुधारणेचा त्यांनी केलेला सर्वंकष विचार पुढे अनेक पिढ्यांसाठी विचारप्रवर्तक ठरला आहे. वरपांगी सामाजिक विचार मांडणारे विचारवंत आपल्याकडे खूप आहेत. समाजजीवनाचा अभ्यास व निरीक्षण करून सामाजिक दोषांची मूलगामी मीमांसा करणारे आणि समाजाच्या अभ्युदयासाठी आपल्या विचारांची कठोरपणे मांडणी करणारे त्यांच्यासारखे प्रज्ञावंत दुर्मिळच म्हणायला पाहिजेत.
आगरकर नुसता विचार प्रतिपादन करून थांबले नाहीत. तर त्यांनी आपल्या विचारांना कृतीचीही जोड दिली. त्यांनी आपली तेजस्वी लेखणी बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्तिवाद, समता आणि मानवतावाद यांच्यासाठी झिजवली. त्यासाठी त्यांना फार मोठा संघर्ष करावा लागला. पूर्वापार चालत आलेल्या आपल्या समाजातील पूर्वजन्म आणि पुनर्जन्म या खुळचट कल्पनांवर त्यांचा विश्वास नव्हता. चातुर्वर्ण्य, जातिव्यवस्था, अस्पृश्यता आणि बालविवाह इत्यादी बाबींचे शतकानुशतके पालन भारतीय समाजात होत आले. आपल्या देशासारख्या संस्कृतिसमृद्ध भूमीत या गोष्टी होणे म्हणजे वदतोव्याघात होता. ही कृती सर्वथैव अशास्त्रीय स्वरूपाचीच होती.
महाविद्यालयीन जीवनात आगरकरांचा मनावर जॉन स्टुअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारसरणीचा प्रभाव पडला. त्यांचा मन:पिंड बुद्धिवादी बनला. द्रष्टेपणाने समाजधारणेची नवी स्वप्ने ते पाहू लागले. त्यांच्याकडे विवेकबुद्धी होती. मनस्वी वृत्ती होती. समाजनिष्ठा हा त्यांचा स्थायी भाव होता. म्हणूनच गरिबीत शिक्षण घेतलेल्या या उच्चविद्याविभूषित तरुणाने लोकमान्य टिळकांबरोबर देशकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले.
आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारात आणि कार्यपद्धतीत तीव्र मतभेद होते खरे; पण आज शे-सव्वाशे वर्षांनंतरच्या पुनरावलोकनानंतर आपल्या समाजात काही विदारक सत्ये जाणवतात. या दोघांचे कार्य परस्परविरोधी वाटत असले तरी भारतीय जीवनसरणीच्या संदर्भात ते पूरकच होते. एकाएकी बाहेरून येऊन भारतासारख्या देशात ब्रिटिशांनी सत्ता प्रस्थापित करणे ही अनाकलनीय गोष्ट होती. म्हणून त्यांना अविलंबे या देशातून घालवणे ही काळाची गरज होती.
टिळकांच्या जहाल विचारसरणीशी आगरकर बव्हंशी सहमत होते. पण सामाजिक स्थितीचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. ज्या प्रकारच्या दुर्दैवी घटना या देशात घडत गेल्या त्या पाहून त्यांचा कल सामाजिक सुधारणावादाकडे वळला. त्यांची लेखणी युयुत्सू बनली. आपल्या स्वतंत्र विचारसरणीच्या प्रतिपादनासाठी त्यांनी 'सुधारक' हे वृत्तपत्र सुरु केले. देशाला स्वातंत्र्य मिळून आता 73 वर्षे झाली, पण समाजात आजही घडणाऱ्या घटना पाहिल्या आणि अनिष्ट रुढींनी ग्रस्त झालेला समाज पाहिला की आगरकर किती बरोबर होते आणि ते काळाच्या किती पुढे होते हे उमजून येते.
डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांनी 'केसरीची त्रिमूर्ती' मध्ये तसेच 'माझे चिंतन' मधील 'विश्वाविरुद्ध' या निबंधात आगरकरांच्या संघर्षशील जीवनावर आपल्या प्रज्ञेचा टाकलेला प्रकाश आजही मननीय आणि अंतर्मुख करणारा आहे. टिळक-आगरकरांच्या विचारमंथनाविषयीचे मंथनही गेल्या शतकापासून भरपूर प्रमाणात होत आलेले आहे. मला वाटते ही प्रक्रियादेखील 'विचारकलहाला का भिता', 'आमचे अजून ग्रहण सुटले नाही', 'आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील?', 'हा कलंक कसा जाणार?', 'समजत नाही ते हे', 'मूळ पाया चांगला पाहिजे', 'शहाण्यांचा मूर्खपणा अथवा आमचे प्रेतसंस्कार' आणि 'इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल तें करणार' इत्यादी जाज्वल्य मनोवृत्तीतून आलेल्या आगरकरांच्या अग्रलेखांच्या प्रभावामुळे निर्माण झाली आहे.
समकालीन समाजजीवनातील अनिष्ट बाबींमुळे आपण विषण्ण होतो, तेव्हा पुन: पुन्हा गोपाळ गणेश आगरकर आठवतात. त्यांच्या विचारांचे दोहन अधिकाधिक व्हायला हवे. "आगरकर हे कर्ते सुधारक नव्हे, केवळ बोलके सुधारक होते." असे म्हणून त्यांना हिणवणाऱ्यांचा एक वर्ग आमच्या समाजात आहे. पण त्यांचे हे विधान बरोबर नाही. ज्या विचारसरणीच्या प्रतिपादनार्थ- प्रसारार्थ ते झटले, त्या दिशेने त्यांनी पावले टाकली होती हे त्यांच्या जीवनचरित्राचा मागोवा घेतल्यानंतर समजते. पण हे सारे तपशील न सांगता सामाजिक सुधारणांसंबंधीच्या त्यांच्या विचारांकडे लक्ष केंद्रित करणे अधिक श्रेयस्कर.
आगरकरांच्या जीवनदृष्टीचे स्वच्छ प्रतिबिंब त्यांच्या विचारांत पडलेले आहे. लोकांच्या अंधश्रद्धाळूपणामुळे त्यांचे मन व्यथित झालेले होते. म्हणून समाजाच्या विवेकबुद्धीला ते सतत आवाहन करत राहिले. विचार आणि आचार यांची इष्टानिष्टता ठरवताना ते बुद्धीला प्रमाण मानत. 'सत्याच्या शोधार्थ निरंतर धडपड करणे' हेच जीवनाचे श्रेयस आहे हे त्यांना पुरेपूर कळलेले होते. सत्य स्पष्टपणे सांगायला आणि आपले दोष आम्हाला दाखवायला ते धजत होते, हे त्यांच्या पुढील उद्गारांवरून दिसून येते:
"सुधारणा ही स्थिर वस्तू नाही; ती पुढे चालेल किंवा मागे सरेल! आमची सुधारणा क्षणैक निश्चल होऊन मग तिची पीछेहाट होऊ लागली असावी, असें मानिल्याखेरीज ज्यांस आम्ही रानटी म्हणत होतो ती राष्ट्रे, दोन हजार वर्षांच्या अवकाशात आम्हांपुढे इतकी कशी गेली याचा उलगडा होत नाही.सुधारणेच्या शर्यतीचे जे एकदा आमच्या फार पाठीमागे होते, त्यांनी आम्हास गाठले. इतकेच नाही तर पाठीमागे टाकले ,असे आपल्या स्थितीवरून कबूल करावे लागेल. यात आमच्यामते प्रतिष्ठा मारण्यासारखे काहीच नाही. "दुसरे लोक रानटी होते तेव्हा मी फार सुधारलेले होतो!" असा आव कदाचित पुन: पुन्हा गत गोष्टींबद्दल मिटक्या मारीत बसण्यात काय अर्थ आहे? आम्हांस तर असल्या निरुपयोगी प्रतिष्ठेचा मनापासून कंटाळा येतो. असल्या प्रतिष्ठेमुळे स्वदोष दिसेनासे होतात." (आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील?)
हा आणि यापुढील आशय अंतर्मुख व्हायला लावणारा आहे. "ज्यांना मनुष्याच्या पूर्णावस्थेचे रूप बिलकूल समजलेले नाही किंवा ती घडून येण्यास काय केले पाहिजे हे ठाऊक नाही, अशांच्या पर्वतप्राय झुंडीच्या झुंडी तुटून पडल्या तरी, जो खरा विचारी आहे, ज्याला लोककल्याणाची खरी कळकळ आहे, सत्य बोलणे व सत्यास धरून चालणे यातच ज्याचे समाधान आहे, अशाने वरच्यासारख्या क्षुद्र लोकांच्या अवकृपेला, रागाला किंवा उपहास्यतेला यत्किंचित् न भिता आपल्या मनास योग्य वाटेल ते लिहावे, बोलावे व सांगावे हेच त्यास उचित होय. त्याच्या अशा वर्तनातच जगाचे हित आणि त्याच्या जन्माची सार्थकता आहे." (सुधारक काढण्याचा हेतू)
या उद्गारांतून त्यांची अविचल ध्येयनिष्ठाच अधोरेखित झालेली आहे.
संमती वयाच्या बिलासंबंधीची आपली ठाम भूमिका मांडताना आगरकर म्हणतात, "पृथ्वीवरील इतर देशांत अशा प्रकारचे स्थित्यंतर एकसारखे होत आहे; ज्यांनी अपरिहार्य व अनिवार्य सृष्टिनियमाच्या उलट जाण्याचा प्रयत्न केला आहे ते नष्ट झाले आहेत; व जर हिंदू लोक अविचारी, मूर्ख, निर्दय, दुराग्रही व दुरभिमानी पुढाऱ्यांचे अंध गुलाम होऊन तसे करतील, तर यांचीही तीच दशा होईल हे त्यांनी पक्के ध्यानात ठेवावे."
जे जनतेच्या अंतिम हिताचे आहे ते कटू सत्य सांगण्याचा स्पष्टवक्तेपणा आगरकरांनी अंगी बाणवला होता, याचा प्रत्यय येथे येतो. आपल्या समाजात काय व्हायला हवे आणि काय नको यासंबंधीची भूमिका मांडताना ते म्हणतात, "नीतिप्रसार, संपत्युत्पादन, आरोग्यरक्षण वगैरे अनेक महत्त्वाच्या गोष्टी ज्ञानाधीन असल्यामुळे लोकशिक्षणाचे काम जितक्या झपाट्याने चालवेल तितक्या झपाट्याने चालविले पाहिजे; जातिभेद नाहीसा झाला पाहिजे, स्त्री-पुरुषांच्या ज्ञानात व स्वातंत्र्यात जेवढे अंतर राहू देणे अपरिहार्य असेल तेवढ्याहून अधिक राहिल्यास पूर्ण संसारसुख प्राप्त होण्याचा संभव नाही, म्हणून स्त्रियांची उन्नती करण्याबद्दल रात्रंदिवस झटले पाहिजे वगैरे. धार्मिक, राजकीय व सामाजिक विषयासंबंधीचे स्थूल औपपत्तिक सिद्धांत जसे एकाला तसे दुसऱ्यालाही संमत आहेत. दोघांत जो मतभेद पडतो तो आज तारखेस ते सिद्धांत अमलात आणण्यासाठी काय करता येईल व ते कोणत्या साधनाने करता येईल यासंबंधी पडतो."
हे सारे करत असताना विचारकलह हा अटळ आहे. विचारकलहामुळे समाजात घुसळण होते आणि सत्यान्वेषी विवेकशक्तीचा उगम होतो असे आगरकरांना वाटते. या संदर्भात ते उत्कटतेने आवाहन करतात, "बांधवहो, विचारकलहाला तुम्ही इतके कशासाठी भिता? दुष्ट आचारांचे निर्मूलन, सदाचाराचा प्रसार, ज्ञानवृद्धी, सत्यसंशोधन व भूतदयेचा विचार इत्यादी मनुष्याच्या सुखाची वृद्धी करणाऱ्या गोष्टी विचारकलहाखेरीज होत नाहीत. आजपर्यंत या देशात हा माजावा तितका कधीच न माजल्यामुळे बहुधा आमचे लोक 'गतानुगतिक'च असल्यामुळे, हे भरतखंड इतकी शतके अनेक प्रकारच्या विपत्तींत खितपत पडले आहे! हा विचारकलह दुष्ट विकोपास जाऊ न देण्याविषयी खबरदारी ठेविली पाहिजे. नाहीतर पुढे खऱ्या लढाया आणि रक्तस्राव होण्याचा संभव असतो."
वैचारिक संघर्ष करत असताना अभिनिवेश टाळण्याचे हे त्यांचे आत्मभान अत्यंत महत्त्वाचे वाटते. अशाने माणसे प्रणालिपीडित होतात हे त्यांना ठाऊक होते. हा विवेक किती लक्षणीय स्वरूपाचा.
आगरकरांच्या सामाजिक सुधारणावादी विचारसरणीचे पुनर्मूल्यांकन आजच्या काळाच्या संदर्भात अनेक अंगांनी करता येण्यासारखे आहे.
आगरकर म्हटल्याबरोबर त्यांच्या सामाजिक सुधारणावादच डोळ्यांसमोर उभा राहतो. तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा पैलू आहे हे खरे; पण त्यांचे कार्य तेवढ्यापुरते सीमित नव्हते. लोकमान्य टिळकांबरोबर 'न्यू इंग्लिश स्कूल' आणि 'फर्ग्युसन कॉलेज' या शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी त्यांचा लागलेला महत्त्वाचा हातभार सर्वज्ञात आहे. तरुण वयात फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्यपद त्यांनी भूषवले. अनारोग्यामुळे त्यांना अकाली मृत्यू आला नसता तर त्यांच्या जीवनचरित्राला वेगळी दिशा मिळाली असती, झळाळी लाभली असती.
आगरकरांचा अर्थशास्त्राचा अभ्यास किती दांडगा होता हे त्यांच्या 'सुधारक' मधील अग्रलेखांतून दिसून येते. 'तीन अर्थशास्त्रे', 'इंग्रजी राज्याची उलट बाजू अथवा आमचे घोर दारिद्रय', 'हिंदुस्थानास क्षय लागला', 'वाचाल तर चकित व्हाल', 'घ्या पण त्याला काही धरबंध असू द्या', 'हिंदुस्थानातील अन्नान्नददशेचे दुष्परिणाम', 'हिंदुस्थानची तिजोरी आणि घाटत असलेला अन्याय', 'समाजोत्कर्षाचा एक मुख्य घटक- व्यापारवृद्धी' आणि 'भांडवल गेले; व्यापार गेला!' या अग्रलेखांतून याविषयीचाही त्यांनी सांगोपांग विचार केला होता हे जाणवते. याविषयी विस्ताराने विवेचन करता येईल.
आगरकरांचे व्यक्तिमत्त्व एकारलेले नव्हते. सदभिरुचिसंपन्नता त्याला लाभलेली होती. त्यांच्या विविधांगी लेखांतून ते दिसून येते. स्त्री-पुरुषांच्या पोशाखाच्या बदलत्या पद्धतींविषयीदेखील त्यांनी लेखन केले आहे. माणसांच्या ठिकाणी दागदागिन्यांचा जो सोस असतो; त्यामागच्या मानसिकतेची त्यांनी मीमांसा केली आहे. त्यांच्या या लेखनाला रसिकतेचे रंग आहेत.
समाज सुसंस्कृत होण्यासाठी वाचनाभिरुची जपली पाहिजे असे त्यांना वाटत होते. शतकापूर्वी ग्रंथसंस्कृतीचा संस्कार दृढमूल करण्याचा त्यांचा हा प्रयत्न प्रशंसनीय वाटतो. या संदर्भात त्यांनी लिहिलेले 'वाचन' आणि 'ज्ञान' हे दीर्घ निबंध वाचनीय आणि मननीय वाटतात. त्यातील विचारांचा ताजेपणा आणि अद्ययावतपणा प्रभावित करणारा. वाचनापासून होणारे अनेक लाभ त्यांनी प्रतिपादिले आहेत. त्यापासून ज्ञानवृद्धी होते. दुःखाचे विरेचन होते. "वाचन मनुष्याचे वर्तन सुधारते व त्याला रानटीपणात राहू देत नाही." हा त्यांनी अधोरेखित केलेला विचार किती मोलाचा आहे!
'ज्ञान' हा निबंध पुन: पुन्हा वाचावासा वाटतो तो केवळ त्यात प्रेरकता आहे म्हणून नव्हे. मनाला उभारी देण्याबरोबरच अनिर्वचनीय आनंदाची अनुभूती या निबंधाच्या वाचनामुळे लाभते. भाषेवरील प्रभुत्व आणि भाषाविलास, व्युत्पन्नतेबरोबर रसिकता व चिरप्रसन्नता ही गुणवैशिष्ट्ये या निबंधात प्रकट झालेली आहेत. 'वाचन' या निबंधाबद्दलही हेच विधान करावे लागेल.
'कवी, काव्य, काव्यरति' या निबंधातून काव्यमीमांसेबरोबर आस्वादकाची भूमिका कोणती असावी याविषयी आगरकरांनी मूलगामी चिंतन प्रकट केले आहे. आधुनिक वाङ्मयात समीक्षेची बैठक कशी असावी याचा निकष निश्चित करणारे आगरकर हे पहिले समीक्षक असावेत, असे वाटते. संवेदनानिष्ठ मनोव्यापार हा सृजनशील साहित्याचा प्रमुख गुण. सह्र्दयता हा रसिकाचा महत्त्वाचा गुण. या दोन्ही गुणांचा उच्चार या लेखात त्यांनी केला आहे.
"एक कल्पनाशक्ती प्रज्वलित होऊन ती मनाचे काव्यवस्तूंशी तादात्म्य करण्यासाठी झटत असते; दुसरा, इंद्रियापुढे प्रत्यक्ष असणार्या किंवा कल्पनेने निर्माण केलेल्या काव्यवस्तू आपापल्या स्वभावाप्रमाणे वाचकांच्या व प्रेक्षकांच्या अनुकूल व प्रतिकूल संवेदनांस अंशतः कारण होत असतात." असा मौलिक विचार देणारे मीमांसक म्हणूनही अभ्यासकांना आगरकर आज पुन्हा आठवावेसे वाटतात.
आगरकरांचे 'विकारविलसित' हे 'हॅम्लेट'चे केलेले भाषांतर मराठी रंगभूमीवर गाजलेले आहे. 'वाक्यमीमांसा' हे त्यांचे मराठी व्याकरणावरील पुस्तक आहे.
आगरकरांसारख्या जीवनाच्या विविध पैलूंना स्पर्श करणाऱ्याला समानधर्मा लाभला नाही. द्रष्टेपणाने सामाजिक सुधारणावादी विचारधारेला वाहून घेणाऱ्या या प्रज्ञावंताला आणि प्रतिभावंताला अनुयायी लाभला नाही याचे वैषम्य वाटते. पण म्हणून काही आगरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे मोल कमी होणार नाही.
उंचच उंच गेलेल्या शिखरासारखे ते शोभून दिसतात!
- डॉ. सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा.
somnathpant@gmail.com
Tags: व्यक्तिवेध गोपाळ गणेश आगरकर आगरकर सोमनाथ कोमरपंत सामाजिक सुधारणा लोकमान्य टिळक Gopal Ganesh Agarkar Agarkar Somnath Komarpant Social Reforms Lokmanya Tilak Load More Tags
Add Comment