बहिणाबाईंचे काव्यशिल्प

बहिणाबाई चौधरी यांच्या 69व्या पुण्यतिथीनिमित्त... 

बहिणाबाई अशिक्षित होत्या असे म्हणायला जीभ धजत नाही. लेखणी अडते. स्त्रीमनाची शहाणीव घेऊन आलेली समर्थ अभिव्यक्ती त्यांच्या शब्दाशब्दांतून जाणवत राहते. ही कवितेची अंतःप्रेरणा त्यांना एकाएकी कशी झाली असेल हा कुतूहलापोटी पडणारा प्रश्न आहे. त्याच्या उत्तरादाखल त्यांचा जीवनप्रवास समग्रतेने नाही तरी थोडक्यात समजून घेऊ या.

मराठीच्या आदिकालापासून आजमितीची कविता न्याहाळताना तिच्यात अनेकविध धारा आढळतात. नदीचा शक्तिस्रोत जसा अनेक निर्झरांचा तसाच अनेक वळणावाकणांनी निरंतर वाहणाऱ्या काव्यतटिनीचा प्रवाह संस्कृतिसंचिताचे सत्त्व आत्मसात करून काठांवरील रसिकांच्या जीवनाचे पोषण करणारा. 

त्यांची संवेदनशीलता ताजीतवानी ठेवून, जीवनोत्सुकतेचा ओलावा टिकवून सर्जनात्मकतेचे नवांकुर फुलवत राहणे यात तिने आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता मानली. तिची ही अथक, अथांग आणि विस्तीर्ण यात्रा संक्षेपाने कशी वर्णावी? या यात्रेतील मोजकीच रसतीर्थे कशी वर्णावीत? उगमापासून संगमापर्यंत ती तर अगणित आहेत.
 
कविता हा वाङ्मयातील संश्लिष्ट प्रकार. संस्कृतीचा समवाय बालमनाने टिपणे हा कविवृत्तीचा विशेष. केशवसुतांनी ‘प्रौढत्वी निजशैशवास जपणे बाणा कवीचा असे’ असे त्या वृत्तीचे वर्णन केले आहे.

जीवन कितीही दुःसह असू द्या... त्याला धीराने तोंड देत, त्याच्याशी शब्दक्रीडा करत त्यात रमून जाणे हा कवींचा धर्म. या प्रक्रियेत त्यांना जीवननिष्ठा आकळते. जीवनाचे तत्त्वज्ञान गवसते. ते नवनीत सर्वांच्या आनंदासाठी, अंतर्मुखतेसाठी उपयुक्त ठरते.

अशाच एक समर्थ कवयित्री आधुनिक काळात होऊन गेल्या. त्यांचे नाव बहिणाबाई चौधरी. मौखिक परंपरेचा सशक्त वारसा सांगणाऱ्या. कृषिसंस्कृतीतील दैन्यदारिद्य्र घेऊन आलेल्या. अकाली वैधव्याचा आघात झालेल्या... पण दुर्दैवाच्या टकमक टोकावर न डगमगता आयुष्याशी आत्मनिर्भर वृत्तीने सामना करणाऱ्या धीरोदात्त भारतीय स्त्री. 

त्या अशिक्षित होत्या असे म्हणायला जीभ धजत नाही. लेखणी अडते. स्त्रीमनाची शहाणीव घेऊन आलेली समर्थ अभिव्यक्ती त्यांच्या शब्दाशब्दांतून जाणवत राहते. ही कवितेची अंतःप्रेरणा त्यांना एकाएकी कशी झाली असेल हा कुतूहलापोटी पडणारा प्रश्न आहे. त्याच्या उत्तरादाखल त्यांचा जीवनप्रवास समग्रतेने नाही तरी थोडक्यात समजून घेऊ या.

बहिणाबाईंच्या कवितेमागे त्यांच्या जीवनाची करुण कहाणी दडलेली आहे. जळगाव जिल्ह्यात 1880मध्ये नागपंचमीला जन्मलेल्या बहिणाबाई. त्यांच्या वडिलांचे नाव उखाजी महाजन आणि आईचे नाव भीमाई. बालपणी कृषिसंस्कृतीत वाढलेल्या बहिणाबाईंवर मौखिक परंपरेचे प्रगाढ संस्कार आपसूक झाले. त्यांतून त्यांचे मन समृद्ध झाले. तेराव्या वर्षी खंडेराव चौधरी यांच्या घरात त्या सूनबाई म्हणून आल्या. त्यांचे पती नथूजी चौधरी यांचे अकाली निधन झाले. फार मोठा आघात होता तो! 

बहिणाबाईंचे भावजीवन उद्ध्वस्त झाले. दुर्दैवांची मालिका संपली नाही. दुष्काळाचे संकट कोसळले. या सर्व आपत्तींना तोंड देता देता आणखी एक कौटुंबिक आघात झाला. थोरला मुलगा ॐकार याला प्लेग झाला. तो थोडक्यात बचावला... पण त्याला पंगुत्व आले. मधला सोपानदेव आणि धाकटी काशी. त्या काळातील रितीरिवाजानुसार बालवयात काशीचे लग्न झाले. सोपानदेव कवी म्हणून मराठीच्या काव्यक्षेत्रात नावाजले गेले. आईने केलेले संस्कार वाया गेले नाहीत.

मातीचा ओलावा आणि आभाळाची माया घेऊन बहिणाबाईंची कविता त्यांच्या संवेदनशील मनाच्या सांदीकोपऱ्यांतून प्रकट झाली.
         
         लडू नोको माझ्या जीवा ।
         तुला लड्याची रे सव ।
         लडू हासव रे जरा ।
         त्यात संसाराची चव ।
         नका नका आयाबाया ।


         नका करू माझी कीव ।
         झालं माझं समाधान ।
         आता माझे मले जीव ।

अशा आत्मसंवादाच्या लयीत बहिणाबाई चौधरींनी आपल्या दुःखाचा निचरा केला. त्यांतून त्यांना आत्मसुखाची पाऊलवाट गवसली. ती यापूर्वी संतकवी-कवयित्रींनी चोखाळलेली होती. अहिराणीचा हा नवा अलंकार. मराठी काव्यसृष्टी स्तिमित झाली.

संकोचशील स्वभावाच्या सोपानदेव चौधरींना आपल्या आईची कविता आचार्य अत्रे यांच्यासारख्या रसज्ञ आणि दिग्गज कवीला दाखवावीशी वाटली. तो सुवर्णक्षण ठरला. बहिणाबाईंची कविता वाचून अत्रेंनी उत्स्फूर्तपणे उद्गार काढले, ‘अहोऽ हे बावनकशी सोनं आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे.’
 
परिमळ या अत्रेंच्या रसग्राही प्रस्तावनेसह ‘बहिणाईंची गाणी’ हा कवितासंग्रह 1952मध्ये प्रसिद्ध झाला. बहिणाईंची कविता सर्वतोमुखी झाली. तिच्यातील आंतरिक गोडवा रसिकांना भावला.

सर्वांचं पोषण करणाऱ्या धरित्रीची माया बहिणाबाईंनीच आपल्या ओथंबलेल्या शब्दांत करावी...

         अशी धरित्रीची माया
         अरे तिला नाहीं सीमा
         दुनियेचें सर्व पोट    
         तिच्यामध्ये झाले जमा.

प्रपंचविज्ञानाची सखोल समज बहिणाबाईंच्या कवितेतून व्यक्त होते. ती भल्याभल्यांना उमजणार नाही. पूर्वसूरींच्या संस्कारांहून भिन्न आणि समकालीनांच्या प्रभावापासून अलिप्त अशी ही अभिव्यक्ती आहे. उदाहरणार्थ...

         अरे संसार संसार
         जसा तवा चुल्ह्यावर
         आधी हाताले चटके
         तव्हा मियते भाकर!
 
         अरे संसार संसार
         दोन जिवांचा इचार
         देतो सुखाले नकार 
         अन् दुःखाले होकार

जीवनजाणिवेचे बहिणाबाईंचे प्रगल्भ आकलन न्याहाळण्यासारखे आहे. मिताक्षरांत व्यापक जीवनाशय त्या सहजपणे मांडतात...

         आला सास, गेला सास
         जीवा तुझं रे तंतर
         अरे जगनं-मरनं
         एका सासाचं अंतर

‘माझी माय सरसोती’, ‘कशाला काय म्हनू नही’, ‘मन’, ‘हिरीताचं देनं घेनं’, ‘देव अजब गारोडी’, ‘खोप्यामधीं खोपा’, ‘खोकली माय’, ‘देव दिसला, देव कुठें?’, ‘मानूस’ आणि ‘धरत्रीले दंडवत’ या मोजक्याच कवितांमधील आशयसूत्रांचा धांडोळा घेताना मानवी मनाचे अंतरंगदर्शन बहिणाबाई किती चिंतनगर्भ शैलीत घेतात हे उमगते.

परमेश्वराचा शोध बहिणाबाईंना मंदिरात वा राऊळात घ्यावा लागत नाही. राबताना शेतात आणि निसर्गाच्या सहवासात त्यांना देव भेटतो. त्या उद्गारतात...

         माझ्यासाठी पांडुरंगा
         तुझं गीता-भागवत
         पावसात समावतं
         माटीमधीं उगवतं
         तुझ्या पायाची चाहूल
         लागे पानापानामधीं
         देवा तुझं येनं जानं
         वारा सांगे कानामधीं

कृषिसंस्कृतीविषयीचा अपार जिव्हाळा हा बहिणाबाईंच्या भावजीवनाचा अविभाज्य घटक आहे. तो ‘देव अजब गारोडी’ या कवितेत दृक् संवेदनांद्वारे व्यक्त झाला आहे...

         बीय टरारे भुईत
         सर्वे कोंब आले वऱ्हे
         गह्यरलं शेत जसं
         आंगावरती शहारे
         ऊन वाऱ्याशी खेयता
         एका एका कोंबातून
         पर्गटले दोन पानं
         जसे हात जोडोसन

ही धरित्री त्यांच्या जीवनाला आस पुरवते. ध्यास निर्माण करते. सर्जनशीलतेसाठी श्वास पुरवते. जीवन कशासाठी जगायचे याची संथा देते. ही मूलद्रव्ये पुरवणार्‍या काळ्या आईच्या कृतज्ञतेपोटी बहिणाबाईंच्या ओठांवर गीत येते, ते कुण्या घरचे अपार्थिवाचे लेणे? त्या उद्गारतात...

         धर्तीमधल्या रसाने । जीभ माझी सवादते
         तेव्हा तोंडातली चव । पिंडामधी ठाव घेते.

निसर्गरूपांविषयी, त्याच्या कुशीत वास करून राहिलेल्या पक्ष्यांविषयी बहिणाबाईंना अपूर्वाई वाटते. त्यांना सुगरणीचा खोपा दिसतो. तो पाहून त्याविषयी माणसाला त्या संदर्भात काहीतरी सांगावेसे वाटते...

         खोपा इवला इवला
         जसा गिलक्याचा कोसा
         पाखराची कारागिरी
         जरा देख रे मानसा
         तिची उलूशीच चोच
         तेच दात तेच ओठ
         तुला दिले रे देवानं
         दोन हात दहा बोटं
सुगरणीसारख्या लहानशा पाखरामध्ये ही अमर्याद शुभंकर शक्ती परमेश्वराने पेरलेली आहे. मिताक्षरांतून कवयित्रीने येथे खूप काही सुचवले आहे.

बहिणाबाईंनी पावसाची चित्रेदेखील तन्मयतेने रेखाटली आहेत. पहिला पाऊस आलेला आहे... सारी भुई चिंब भिजलेली आहे... धरित्रीच्या परिमलाने कवयित्रीचे मन भरून गेलेले आहे... पावसाच्या सरींवर सरी कोसळताहेत... शेत शिवार भिजलेले आहे... नदीनाले भरून गेले आहेत... पाऊस धूमधडाक्यात कोसळत आहे... घर गळायला लागले आहे... पिवळी चिक्कणमाती वाहू लागली आहे... पाऊस ललकारी देत आलेला आहे... पोरे आरोळ्या ठोकत पावसात भिजत आहेत... पाऊस गडगडाट करत आलेला आहे... छातीत धडधडून पोरे घरात दडलेली आहेत.

पाऊस आलेला आहे... आता शेते उगवू देत... आता रोपे वर येऊ देत... आता हौस फिटू दे... पावसाची झड लागलेली आहे... आता घरामध्ये दडून बसा आणि वडे, भजी यांचा मनसोक्त आस्वाद घ्या असे कवयित्री नर्मविनोदी शैलीत सांगते.

पावसाचा अनुभव कवयित्री प्रत्ययकारी शब्दांत टिपते. सौंदर्याचा सहजसुलभ आविष्कार येथे दिसून येतो. शेवटच्या कडव्यामध्ये कवयित्रीच्या प्रतिभेला वेगळीच कलाटणी मिळालेली आहे.

         देवा, पाऊस पाऊस
         तुझ्या डोयातले आंस
         दैवा, तुझा रे हारास
         जीवा, तुझी रे मिरास
येथे तिने कवितेला विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलेले आहे.

शेतीविषयक जीवन हा बहिणाबाईंच्या भावजीवनाचा मर्मबंध असल्यामुळे अधिकांश कविता त्या विषयावरच्या आहेत. ‘मोट हाकलतो एक’, ‘पेरनी’, ‘उपननी’, ‘कापनी’ (कापणी), ‘रगडनी’ (मळणी) आणि ‘शेतीची साधने’ या कवितांतील तपशील न्याहाळावेत. कवयित्रीच्या कर्मयोगातील तन्मयता त्यांत दिसेल. ‘मोघम मोघडा / पेरनीचा चवघडा’, ‘पांभर पांभर / मांघे धारये झांबर’, ‘आऊत आऊत / आला कमाईले ऊत’, ‘तीफन तीफन / व्हये शेताचं मापन’, ‘वखर वखर / घाले मायेची पाखर’ आणि ‘नागर नागर / सर्व्या सुखाचं आगर’ या मंत्राक्षरांतून आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता सामावलेली आहे असे बहिणाबाईंनी सांगितले आहे. 

कृषिजीवनाला कष्टाचे जीवन न मानता त्यात साफल्य शोधणारी ही कवयित्री खऱ्या अर्थाने भूमिकन्या आहे. समांतरप्रक्रियेने त्या भूप्रदेशातील शेतीवर अवलंबून असणाऱ्या असंख्य जिवांच्या प्रातिनिधिक भावभावनांचे शब्दांकन ही कविता करते. कवयित्रीचे श्वास-नि:श्वास हे भूमीच्या श्वासनि:श्वासाशी निगडित आहेत.

या कृषिसंस्कृतीचा एक अतूट धागा पिढ्यान्‌पिढ्यांपासून पंढरपूरच्या विठोबाशी आणि आणि संतांच्या मांदियाळीशी जोडला गेलेला आहे. ते जग काही कवितांतून सजग झालेले आहे. या दृष्टीने ‘आली पंढरीची दिंडी’, ‘विठ्ठल मंदिर’, ‘खरा देवामधी देव’ आणि ‘माझी मुक्ताई’ या कविता उल्लेखनीय वाटतात. बहिणाबाईंची आस्तिक्य बुद्धी येथे प्रकट झाली आहे... पण त्यांनी आपले मन एवढ्यापुरते बंदिस्त करून ठेवले होते का? नाही वाटत! 

बहिणाबाईंच्या मुक्त मनाचा प्रवास ‘देव दिसला, देव कुठे?’ या कवितेत दिसतो. या कवितेचा आशय समग्रतेने मनात साठवावा. पुनःपुन्हा आठवावा. अंतर्मुख वृत्तीने विचार करावा. माणसाला देव्हारे माजवण्याची मग जरुरी भासणार नाही. एवढ्या स्वच्छ, प्रांजळ आणि पारदर्शी शब्दांत देवाविषयीचा विचार बहिणाबाईंनी या कवितेत मांडलेला आहे.

         सदा जगाच्या कारनी
         चंदनापरी घसला
         अरे सोतामधी त्याले
         देव दिसला दिसला

...आणि देवविषयक चिंतन करताकरता बहिणाबाई लिहून जातात...

         देव कुठे देव कुठे?
         तुझ्या बबुयामझार
         देव कुठे देव कुठे?
         आभायाच्या आरपार
अशी अंतर्दृष्टी असलेला विचार बहिणाबाईच करू जाणे.

बहिणाबाईंनी देवाप्रमाणेच मानवी मनाचाही घेतलेला शोध ‘मानूस’, ‘मन’, ‘माझ्या जीवा’ व ‘मी कोन?’ (अहंकार) या कवितांत दिसून येतो. या कवितांची खूप प्रमाणात चर्चा आजवर झालेली आहे. बहिणाबाईंना बोलताबोलता प्रसंगानुरूप ज्या उत्स्फूर्त म्हणी सुचल्या त्या विचारस्फुलिंगांतून त्यांच्या बुद्धिमत्तेची चमकही दिसून येते आणि क्षितिजविस्तार दिसून येतो. यावरून ‘बहिणाईची गाणी’ ही मराठी काव्यसृष्टीची अनुपमेय लेणी आहेत याचा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही.

- डॉ. सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा.
somnathpant@gmail.com

Tags: लेख साहित्य कविता कवियत्री बहिणाबाई चौधरी सोमनाथ कोमरपंत Marathi Literature Poem Bahinabai Chaudhari Somanath Komarpant Load More Tags

Comments: Show All Comments

लतिका

सहजसुंदर लेख.

ओंकार कुंभार

छान सारभूत लेखन. बहिणाबाई मुळातून वाचण्यासाठी प्रवृत्त करणारे लेखन. धन्यवाद

दीपक पाटील

किती गोड शब्द...प्रासादिक वचन कवेत घेतले...सारे ऐहिक जीवन समजुनि समजावते...अशी बहिणाई माझ्या अहिराणी अंगास...लाभे नवलाई

नरेंद्र महादेव आपटे 

आचार्य अत्रे यांच्या कायम ऋणात राहावे असे सर्वात महत्वाचे त्यांचे योगदान म्हणजे त्यांनी बहिणाबाईंची महाराष्ट्राला ओळख करून दिली हे आहे. . प्रा सोमनाथ कोमरपंत यांनी ओघवत्या भाषेत बहिणाबाईंची महती सुरेखपणे सांगितली आहे. 

अप्रतीम

sanjayfiat55@gmai.com

Anup Priolkar

Nice introduction of Bahinbai poems.

Add Comment