भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे अध्वर्यू, झुंजार वृत्तीचे संपादक, गणितज्ज्ञ, प्राच्यविद्यापंडित आणि भगवद्गीतेचे आधुनिक काळातील भाष्यकार म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची ख्याती सर्वदूर पसरली आहे. 1 ऑगस्ट 2020 रोजी त्यांच्या स्मृतिशताब्दीची पूर्ती होत आहे. लोकमान्य आपल्यामधून जाऊन शतक ओलांडले; पण त्यांचा कीर्तिसुगंध अजूनही सर्वत्र दरवळत आहे. त्यांचे उज्ज्वल चरित्र आणि निष्कलंक चारित्र्य हेच त्यांच्या महत्तेस कारणीभूत ठरलेले आहे. विविध पैलू असलेले त्यांचे देदीप्यमान व्यक्तिमत्त्व ‘लोकमान्य’ या संज्ञेत सामावलेले आहे. राष्ट्रकारणासाठी त्यांनी देह झिजवला. अन्यायाविरुद्ध ते खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या धीरोदात्त व्यक्तिमत्त्वासमोर सतत नतमस्तक व्हावेसे वाटते. सहजतेने कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या ‘लावण्यरेखा’ या कवितेतील :
देखणीं ती जीवनें जीं तृप्तिची तीर्थोदकें
चांदणें ज्यांतून फांके शुभ्र पाऱ्यासारखें ।।
देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा
अग्निचा पेरून जातो राजगर्भीं वारसा ।।
या ओळी मनात तरळून जातात. लोकमान्य टिळकांची मानसमूर्ती सदैव आपल्या अंतरंगातील चिंतनात असते. कारण गतशतकात राष्ट्रमानस घडविण्यासाठी त्यांनी सिंहाचा वाटा उचलला होता. त्यांच्या या ऋणातून उतराई होणे कठीण आहे.
टिळकयुग हा भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील ऊर्जस्वल कालखंड होय. लोकमान्यांसारखा धुरंधर राजनीतिज्ञ, कृतिशील प्रज्ञावंत आणि प्रकांड पंडित जवळजवळ पंचेचाळीस वर्षे या देशाचे नेतृत्व करीत होता. महाराष्ट्रात त्यांचे स्थान अढळ होतेच. शिवाय देशातील अन्य भागांतही त्यांना फार मोठा मान होता. ‘टिळकमहाराज’ असे त्यांना संबोधले जात असे. त्यांच्यासारखा द्रष्ट्या महापुरुषाच्या मार्गदर्शनामुळे, पायाभूत कार्यामुळे राष्ट्रीय चळवळीला योग्य दिशा प्राप्त झाली. स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चतु:सूत्रीचा लोकमान्यांनी हिरिरीने पुरस्कार केला. आपल्या राष्ट्राची उन्नती व्हायची असेल तर ती स्वदेशी आणि बहिष्कार याच मार्गांनी होईल, सर्वस्वी हतभागी झालेल्या आपल्या लोकांना वर येण्याचा जो काही मार्ग असेल तर तो स्वावलंबन व स्वार्थत्याग हाच होय, असा मूलमंत्र त्यांनी भारतीय जनतेस दिला.
आपल्या राष्ट्राच्या सर्वंकष उन्नतीचा त्यांनी अहर्निश ध्यास बाळगला होता. संघर्ष हे त्यांच्या जीवनाचे प्राणतत्त्व होते. चिरोलने उपहासव्यंजक शैलीत त्यांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ असे म्हटले. पण त्यांनी ते बिरुद म्हणून स्वीकारले. चौसष्ट वर्षांचे आयुष्य टिळकांना लाभले. आपल्या समर्पणशील वृत्तीमुळे त्यांनी या कालावधीत एवढी महत्त्वाची कार्ये करून ठेवली आहेत की, त्यांची संक्षेपाने नोंद घेणे ही कठीण बाब आहे. साधेपणा, अलौकिक बुद्धिमत्ता ज्ञाननिष्ठा, व्यासंग आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जनहितासाठी कार्य करीत असताना देहदंड सोसण्याची, कारावास भोगण्याची तयारी त्यांनी सदैव ठेवली.
लोकमान्यांच्या सम्यक जीवनाचा येथे मागोवा न घेता ज्या वृत्तपत्रमाध्यमाचा त्यांनी राष्ट्रजागृतीसाठी उपयोग करून घेतला, त्यातून त्यांची वृत्तपत्रशैली निर्माण झाली. तिचा त्यांच्या जीवनशैलीशी संबंध होता. त्या दोहोंकडे लक्ष केंद्रित करणे एवढेच उद्दिष्ट येथे बाळगले आहे.
लोकमान्य टिळकांनी शिक्षणकार्याने आपल्या सार्वजनिक कार्यास प्रारंभ केला. विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर आणि त्यांनी मिळून ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. अध्यापनव्यवसाय स्वीकारल्यावरदेखील टिळकांनी विनावेतन काम केले. 1881 मध्ये त्यांनी ‘आर्यभूषण छापखाना’ सुरू केला. ‘केसरी’(मराठी) आणि ‘मराठा’ (इंग्रजी) ही वृत्तपत्रे सुरू केली. सुरुवातीला आगरकर ‘केसरी’चे संपादक होते आणि लोकमान्य ‘मराठा’चे संपादक होते. इ.स.1884 मध्ये शिक्षणप्रेमी मंडळींच्या सहाय्याने टिळक-आगरकरांनी ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ स्थापन केली. या संस्थेतर्फे 1885 मध्ये ‘फर्ग्युसन कॉलेज’ची स्थापना करण्यात आली. टिळक येथे गणित आणि संस्कृत शिकवीत. दोन्हीही विषयांवर त्यांचे असामान्य प्रभुत्व होते.
‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे लोकमान्यांनी जनसामान्यांमध्ये जागृती व्हावी म्हणून सुरू केली. त्यांची ‘केसरी’मधील अग्रलेखांची शैली ही त्यांच्या प्रखर राष्ट्रनिष्ठेचे आणि जाज्वल्य मनोवृत्तीचे दर्शन घडविणारी होती. लोकमान्य दिवंगत होऊन शतक लोटले. मराठी वृत्तपत्रसृष्टीत अनेक स्थित्यंतरे झाली. मराठी भाषेच्या वळणा-वाकणांमध्ये अनेक बदल झाले, तरीही त्यांची शैली आजही प्रभावी वाटते. तिच्यातील कणखरपणा जाणवतो. त्यांच्या अग्रलेखांची आशयसूत्रे तत्कालीन राजकीय परिस्थितीच्या आणि सामाजिक ताण-तणावांच्या संदर्भात होती खरी; पण त्यांच्या भाषाशैलीतील सुलभता, मराठमोळेपण, म्हणी-वाक्प्रचारांचा मुक्त वापर आणि प्रसंगविशेषी संस्कृत सुभाषितांची त्यांनी केलेली पखरण यांमधून त्यांच्या व्युत्पन्न व्यक्तिमत्त्वाचे विलोभनीय दर्शन घडते.
विषय कालान्तराने जुने होतात; पण विचार कालातीत असतात. लोकमान्यांच्या शैलीच्या बाबतीत हेच म्हणता येईल. त्यांनी आपल्याला अभिप्रेत असलेल्या चतु:सूत्रीची वेळोवेळी मांडणी केली. शिक्षणाविषयीचे आपले मूलभूत चिंतन व्यक्त केले. धर्मचिंतन हा तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायी भाव होता. सामाजिक सुधारणांच्या संदर्भात ते मुळीच उदासीन नव्हते. सामाजिक विचारांची मीमांसा त्यांनी आपल्या अग्रलेखांतून केलेली आहे. रामायण, महाभारत इत्यादी आर्ष महाकाव्ये, बाणभट्ट व श्रीहर्ष यांसारखे अभिजात संस्कृत वाङ्मयातील मानदंड, शिवाजी महाराज, रामदास हे तर त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते.
‘कै. गोपाळराव गोखले’, ‘प्रिन्सिपॉल आगरकर’, ‘प्रो. मॅक्समुल्लर’, ‘हर्बर्ट स्पेन्सर’ आणि ‘गांधीजींच्या चारित्र्याचे मर्म’ हे लोकमान्यांचे ‘केसरी’मधील अग्रलेख मर्मग्राही स्वरूपाचे आहेत. त्या प्रज्ञावंतांचा शोध त्यांनी सहृदयतेने घेतलेला आहे. मराठीतील वैचारिक निबंधाची शैली घडविण्याचे श्रेय बव्हंशी लोकमान्यांकडे जाते.
राजकीय आणि सामाजिक वादांविषयी लिहिताना लोकमान्यांची भाषाशैली युयुत्सू वृत्ती धारण करते; तर तत्त्वज्ञान, इतिहास, भाषा आणि वाङ्मय इत्यादीसंबंधी विवेचन करताना हीच शैली विषय समजावून देणाऱ्या शिक्षकासारखी असते. त्यांची भूमिका कणखर असायची. मोघमपणाचा लवलेश तिच्यात नव्हता. एखाद्या विषयावर लिहिताना पूर्ण अभ्यास करून ते बैठक मारीत असत. प्राच्यविद्या, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि धर्मशास्त्र इत्यादी विषयाचा त्यांचा गाढा व्यासंग होता. त्यांचे असामान्य भाषाप्रभुत्व त्यांच्या या यशाला कारणीभूत ठरले. त्यांच्या असामान्य कर्तृत्वशक्तीची आणि जीवनशैलीची जोड त्याला मिळाली होती. हाती घेतलेल्या विषयाच्या मुळाकडे जाण्याची बुद्धी, तीव्र स्मरणशक्ती, शुद्ध ज्ञानाविषयीचे ममत्व आणि श्रुतयोजनकौशल्य हे गुण त्यांच्या भाषाशैलीत होते.
देश, काल आणि परिस्थिती यांच्या प्रगल्भ आकलनामुळे लोकमान्यांनी राष्ट्रकारण करताना जहाल भूमिका स्वीकारली. त्यासंबंधी ते म्हणतात: ‘‘जहाल झाले काय किंवा मवाळ झाले काय, त्यांच्या हेतूत मुळीच विभिन्नता नाही. भेद आहे तो केवळ कार्यपद्धतीचा आहे; आणि या विभेदामुळे आमच्या पदरी ‘जहाल’ हे नाव आलं. आमच्यामुळे नेटिव्हांना स्वातंत्र्याचे धडे मिळतील, अशी भीती त्यांना वाटते. यासाठी निराश होऊन आम्ही जहालांनी वेगळा मार्ग पत्करण्याचं ठरवलं. हा केवळ स्वभावाचा भेद आहे. तरुण मंडळी आमच्या बाजूची आहेत. स्वावलंबन-भिक्षांदेही नव्हे, हे आमचं ब्रीदवाक्य आहे.’’
राष्ट्रीय जागृतिकार्यात त्यांनी ज्या चतु:सूत्रीचा अवलंब केला त्यासंबंधी निवेदन केले आहे, ‘‘स्वराज्य आमचं साध्य आहे. स्वदेशी चळवळ, बहिष्कार, योग आणि राष्ट्रीय शिक्षण ही सदर हेतू सिद्धीस नेण्यास स्वावलंबनाची मोठी साधनं आहेत. असा कायमचा सिद्धान्त सभेच्या 21 व्या बैठकीत झालेला आहे.’’
हिंदू-मुसलमान भेदाविषयी लोकमान्यांची भूमिका स्वच्छ आहे. ते म्हणतात, ‘‘राज्यकर्ते व प्रजा हा मुख्य भेद आहे व त्याच्यापुढे हिंदू-मुसलमानादी सर्व भेद रद्द होत.’’
ताईमहाराज दत्तक प्रकरणात टिळकांच्या कर्तव्यभावनेची कसोटी लागली आणि सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तीने आपले चारित्र्य कसे ठेवले पाहिजे, याचा आदर्श त्यांनी घालून दिला. या प्रकरणाच्या अधिक तपशिलात शिरल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आपल्याला दिसून येतील.
राजद्रोहाच्या तीन खटल्यांना लोकमान्यांना सामोरे जावे लागले. पहिल्या दोन खटल्यांत त्यांना शिक्षा झाली. पहिला खटला 1897 मध्ये भरला गेला. आपले लेख अत्याचाराला प्रोत्साहन देणारे नव्हते, हा मुद्दा लोकमान्यांनी ठामपणे मांडला. तो मांडताना सरकारी भाषांतऱ्याने मराठीचे इंग्रजी भाषान्तर चुकीच्या पद्धतीने कसे केले होते, यावर त्यांनी प्रकाश टाकला. त्या वेळी त्यांचे व्याकरणविषयक ज्ञान कसाला लागले.
त्यांच्यावर दुसरा राजद्रोहाचा खटला 1908 मध्ये भरला होता. तो बंगालमधील वंगभंगविरोधी चळवळीचे त्यांनी समर्थन केले, या संदर्भात होता. 'बंगालमध्ये बॉम्ब का उडतात' हे समजून घेण्याचा उपदेश त्यांनी सरकारला केला. ‘‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’’ आणि ‘‘राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे.’’ या त्यांच्या अग्रलेखांमुळे ब्रिटिश सरकार प्रक्षुब्ध झाले. त्या वेळी अस्खलित वाणीत त्यांनी जे भाषण केले, ते चिरस्मरणीय आहे. ‘‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’’ हा त्यांचा निर्धार होता. ‘‘मला सांगावयाचे आहे, असे फारच थोडे आहे. ज्यूरीने मला दोषी ठरवले तर खुशाल ठरवो. पण मी गुन्हेगार नाही. लौकिक गोष्टींचे नियंत्रण करणारी अशीही एक शक्ती न्यायपीठाहूनही वरिष्ठ आहे. कदाचित ईश्वराची इच्छाच अशी असेल की, मला शिक्षा व्हावी आणि मी शिक्षा भोगल्याच्या कारणानेच मी अंगीकारलेल्या कार्याला ऊर्जित दशा यावी.’’
ही वाक्ये असलेला फलक मुंबई हायकोर्टात लावण्यात आला आहे. लोकमान्यांना या खटल्यात सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यांची मंडालेच्या तुरुंगात रवानगी झाली. या विजनवासात त्यांचे वाचन, चिंतन, मनन सातत्याने चालले होते. त्या तपश्चर्येचे फलित म्हणजे त्यांनी सिद्ध केलेल्या भारतीयांना कर्मयोगाचा संदेश देणारा ‘गीतारहस्य’ हा विद्वत्ताप्रचुर ग्रंथ. हादेखील विसाव्या शतकाच्या आणि पुढील शतकांसाठी लाभलेला दीपस्तंभ आहे. ‘ओरायन’ (1890) आणि ‘आर्क्टिक होम इन द वेदाज्’ (1903) हे विद्वत्तापूर्ण ग्रंथही त्यांनी लिहिले.
या साऱ्या दिव्यांतून टिळकांचे व्यक्तिमत्त्व झळाळून निघाले हा त्याचा इत्यर्थ. त्यांची धीरोदात्त वृत्ती साऱ्या जगाच्या प्रत्ययास आली. लखनौ काँग्रेसच्या अधिवेशनप्रसंगी मुसलमानाशी करार करण्यातही त्यांनी राजकीय धैर्य प्रकट केले.
लोकमान्यांच्या जीवनचरित्रातील ही अवघीच अधोरेखिते. या व्यक्तिमत्त्वाचे असीम क्षितिज आपल्या कवेत येणे कठीण. टिळकांच्या या महत्तेचा प्रत्यय अनेक प्रज्ञावंतांना आलेला आहे. फेरोजशहा मेहता त्यांचा गौरव करताना म्हणाले होते, ‘पाहा, हे महाराष्ट्राचे रक्त... शिवाजी व टिळक जोपर्यंत महाराष्ट्राच्या तरुणात जागृत आहेत, तोपर्यंत महाराष्ट्रात हिंदी स्वराज्याचा प्रश्न सोडवील.’तर डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर म्हणाले, ‘टिळकांचे व माझे ध्येय आणि मार्ग भिन्न असले, तरी बावनकशी सोन्याप्रमाणे तो देशभक्त परमशुद्ध असल्यामुळे आम्हांस तो हवा आहे.’
शिवजयंतीसारखा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यामागची लोकमान्यांची भूमिका समजून घेण्यासारखी आहे. ते या संदर्भात म्हणतात, ‘‘आपल्या थोर पूर्वजांस विसरून जाऊन कोणतेही राष्ट्र उदयास आले नाही व येणेही शक्य नाही... स्वभाषेची अभिवृद्धी स्वराष्ट्राच्या इतिहासाचा स्वकीय दृष्टीने अभ्यास, मनन व स्वधर्मश्रद्धा इत्यादी गोष्टी राष्ट्राच्या उत्कर्षाला कारणीभूत होतात.’’ गणेशोत्सवाला त्यांनी सार्वजनिक स्वरूप दिले, त्याला विशेष अर्थ होता.
जीवनाच्या उत्तरायणात म्हणजे 1919 मध्ये राजकीय निष्ठा आणि सामाजिक निष्ठा यांच्या संदर्भात विचार प्रकटन करताना, त्यांनी आपला प्रांजळ भाव आणि पारदर्शित्व दाखवून दिले आहे :
‘‘स्वाभिमान, हुरूप, स्वराज्यनिष्ठा हाच खरा राष्ट्राचा जीव होय आणि ही जिवंतपणा जिथे वसत आहे, त्या ठिकाणी सुईच्या मागे दोरा तद्वत सामाजिक सुधारणाही मागोमाग येत असतात, अशी इतिहास साक्ष देत आहे. म्हणून राष्ट्रीय पक्ष राजकीय चळवळीस जितके महत्त्व देतो, तितके सामजिक चळवळीस देत नाही. राष्ट्राची सामाजिक प्रगती होऊ नये, असं त्याचं म्हणणं नाही; पण ती राजकीय प्रगतीच्या व स्वाभिमानाच्या अनुषंगानेच झाली पाहिजे. राजकीय परवशता फार तर मुळमुळीत विरोधाने स्वीकारून जिवंत सुधारणा होणे शक्य नाही, असे राष्ट्रीय पक्षाचे तत्त्व आहे.’’
लोकमान्यांचा हा दृष्टिकोन आपण तत्कालीन राजकीय परिस्थितीच्या आणि ब्रिटिश सत्तेने निर्माण केलेल्या दमनप्रक्रियेच्या संदर्भात समजून घेतला पाहिजे. टिळक-आगरकर यांच्यामध्ये ‘आधी राजकीय की आधी सामाजिक’ या विचारसरणीच्या संदर्भात वैचारिक आणि भावनात्मक अंतर पडले, तरी दोघांचे प्रयत्न राष्ट्रनिर्मितिप्रक्रियेसाठी पूरकच ठरले, असे आजच्या घडीला म्हणावेसे वाटते. त्यामुळे विचारांची घुसळणही झाली.
राष्ट्राचा अभ्युदय ही लोकमान्यांची जीवननिष्ठा होती. त्यासाठी भिन्न मतप्रणाली सोडून सर्वांनी एकात्म व्हायला पाहिजे, ही त्यांची जीवनधारणा होती. ‘‘व्यक्ती निघून जातील; पण राष्ट्र चिरंतन राहील.’’ हे लोकमान्यांच्या जीवनातील अंत:सूत्र समजून घेतले, तर त्यांच्या द्रष्टेपणाची आणि समर्पणशीलतेची खऱ्या अर्थाने ओळख पटेल.
लोकमान्यांच्या मृत्यूनंतर महात्मा गांधींनी उद्गार काढले होते, ‘‘त्यांचे जीवन हे उघडे पुस्तक होते. त्यांच्या आवडी फार साध्या होत्या. त्यांचे खासगी जीवन निष्कलंक होते. त्यांनी आपली अचाट बुद्धिमत्ता आपल्या देशाला वाहिली होती. लोकमान्यांनी ज्या सातत्याने आणि ठामपणाने स्वराज्याची शिकवण दिली, तशी कुणीही दिली नाही.’’ (यंग इंडिया/ 4 ऑगस्ट 1920)
त्यांच्या समर्पित राष्ट्रसेवेचा यथार्थ गौरव गांधीजींनी केलेला आहे. ते म्हणतात, “ज्याने आपल्या मनाशी एक योजना तयार केली आणि पंचेचाळीस वर्षे त्याचा पाठपुरावा केला, ज्याने राष्ट्राच्या सेवेसाठी आपले शरीर झिजवले, त्याला मरणानंतरही कोणी विसरत नाही. तो कधीही खऱ्या अर्थाने मरत नाही. म्हणून आपल्या मरणातही लोकमान्यांनी जगण्याचे रहस्य आपल्याला शिकवले आहे, असेच आपण स्वत:ला सांगितले पाहिजे.” (नवजीवन/ ऑगस्ट 1920)
एका महात्म्याने दुसऱ्या महात्म्याला येथे किती समरसतेने समजून घेतले आहे!
- डॉ. सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा.
somnathpant@gmail.com
Tags: सोमनाथ कोमरपंत व्यक्तिवेध बाळ गंगाधर टिळक Somnath Komarpant Lokmanya Tilak Bal Gangadhar Tilak Load More Tags
Add Comment