1922 ते 2010 अशी तब्बल 88 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या तत्त्वनिष्ठ आणि जीवनोपासक श्रेष्ठ व्यक्तीचा जीवनप्रवास न्याहाळताना त्यांच्या अनेकविध पैलूंचे दर्शन घडते. संक्षेपानेच ते सांगायला हवे. प्रधानसर कृतिशील विचारवंत होते. 'आधी केले; मग सांगितले' हा त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता.
प्रा. ग. प्र. प्रधान यांचे नाव घेताच त्यांची सात्त्विक भावमुद्रा डोळ्यांसमोर तरळते. त्यांचे निर्व्याज हास्य आठवते. निर्मोही, निरहंकारी आणि निर्मत्सरी वागणे आठवते. जीवनात अनेक संकटांची मालिका येऊन ठेपली, तरी त्यांनी आपला चेहरा कोमेजू दिला नाही. याचे एकमेव कारण म्हणजे त्यांची अंतर्यामीची आत्मनिर्भर वृत्ती. आपला जीवनप्रवास केवळ स्वत:पुरता सीमित नाही; तर तो समष्टीसाठी आहे ही त्यांची दृढ धारणा होती. तिच्या अभ्युदयाची तळमळ त्यांच्या चिंतन-मननातून, लेखनातून आणि त्यांच्या प्रत्यक्ष कृतींतून सतत जाणवायची. ध्यासपंथी माणसांच्या मांदियाळीत त्यांचे मार्दव उठून दिसले. प्रसंगविशेषी वज्रनिर्धाराची भूमिका त्यांची स्वीकारली, पण तीही निर्मम वृत्तीने. आपले जीवन म्हणजे अखंड अग्निहोत्र आहे, तो समाजपुरुषाने मांडलेला यज्ञ आहे. आपण केवळ समिधा आहोत, ही त्यांची प्रांजळ जीवननिष्ठा. वंदनीय साने गुरुजींच्या 'बलसागर भारत होवो। विश्वात शोभूनी राहो।' या मंत्रोच्चाराबरोबर 'धडपडणार्या मुलां'ची जी पिढी होती, त्यातील बिनीचे शिलेदार म्हणून प्रा. ग. प्र. प्रधान केवळ महाराष्ट्रात नव्हे; तर संपूर्ण भारतात ओळखले जातात.
विशिष्ट काळाची एक हाक असते. तीनुसार माणसे जन्मास येतात. समान गुणसूत्रांची नक्षत्रे आकाशात एकत्र येतात. त्यांचा पुंज निर्माण होतो. त्याची आकाशगंगा होते. पृथ्वीतलावरही हीच प्रक्रिया घडत असते. समानधर्मी माणसे एकत्र येतात आणि राष्ट्रकार्यास प्रवृत्त होतात. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या 'महाभारता'त नेमके हेच घडले. साने गुरुजींचा वसा आणि वारसा जपणाऱ्या 'साधना' या सत्त्वशील साप्ताहिकाचे संपादकपद भूषविणार्या प्रा. वसंत बापट, प्रा. ग. प्र. प्रधान आणि यदुनाथ थत्ते यांची जन्मशताब्दी एकाच वर्षात आली आहे. एस. एम. जोशी आणि नानासाहेब गोरे यांच्या वैचारिकतेच्या मुशीत घडलेल्या या तिन्ही संपादकांनी 'साधना'चे ऊर्जस्वल पर्व निर्माण केले. लोकशाही समाजवादाकडे वाटचाल करणार्या भारतीय समाजातील पुरोगामी विचारांचे व्यासपीठ म्हणून 'साधना'ची प्रतिमा निर्माण झाली, ती या संपादकांच्या कौशल्यामुळे आणि सर्वसमावेशक वृत्तीमुळे. याविषयी वस्तुनिष्ठपणे विचार केल्यास कुणाचेही दुमत होण्याचे कारण नाही.
प्रधानसरांना सगळे जण 'प्रधान मास्तर' म्हणायचे. राष्ट्र सेवादलात तन्मयतेने काम करीत असताना याच नावाने त्यांना समाजमान्यता मिळाली. पुण्याच्या प्रख्यात फर्गसन महाविद्यालयातील इंग्रजीचे नामवंत प्राध्यापक अशी प्रा. प्रधानसरांची ओळख शैक्षणिक जगताला झाली. पण त्यांनी विशाल क्षितिजाकडे झेप घेण्याची आकांक्षा बाळगली. 20 वर्षे या महाविद्यालयात अध्यापनकार्यात मग्न असताना समांतर प्रक्रियेने वाचन-मनन-चिंतन आणि लेखन करून आदर्श प्राध्यापक कसा असावा याचा त्यांनी मानदंड निर्माण केला. विद्यापीठीय शिक्षणदान करताना हस्तिदंती मनोर्यात राहून भागत नाही. शिक्षण आणि समाज यांमध्ये सेतू निर्माण करण्याचे दायित्व प्राध्यापकाने स्वीकारले पाहिजे. यातूनच समाजधारणा आणि राष्ट्रनिर्माणाची कोनशिला बसवली जाते, हे आत्मभान आणि समाजभान प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या व्यक्तिमत्त्वात शिगोशिग भरलेले होते. ज्ञानसागरात अवगाहन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती आणि मुक्तमनाने मिळवलेले ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याचे ममत्वही त्यांच्याकडे होते. सतत भ्रमंती करण्याची आवड त्यांना होती. त्यामुळे होतं काय? जनमानसाचा कानोसा घेता येतो, तेज:कण वेचता येतात आणि मिळवलेल्या ज्ञानाचे पाथेय पुढील पिढ्यांना देता येते. खर्या अर्थाने ज्ञानात्मक अनुभूतीचे संक्रमण त्यांनी राष्ट्रनिर्मितीत केले. चतुरस्र प्रतिभेचे साहित्यिक, प्रभावी वक्ते आणि मनमिळावू मित्र या त्रयीच्या संगमातून विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून ते ओळखले जाऊ लागले.
प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या पत्नी सौ. मालविकाबाई सासरी गेल्यावर पतीच्या आणि घरातील मंडळींच्या प्रोत्साहनाने डॉक्टर झाल्या. व्यवसायात बस्तान बसल्यानंतर त्यांनी प्रधानसरांना पूर्णवेळ राजकारणात भाग घेण्याची मुभा दिली. पण प्रधानसर आजच्या संदर्भातील राजकारणी होते का? पूर्वसूरींच्या प्रभावामुळे आणि संस्कारांमुळे त्यांनी केले ते राष्ट्रकारण! राजकारण नव्हे. ते विधान परिषदेत आमदार झाले. विरोधी पक्षनेते झाले. साधनशुचितेच्या संदर्भात त्यांची या क्षेत्रातील कारकीर्द बारकाईने अभ्यास करण्यासारखी आहे.
प्रधानसरांची जडणघडण आणि पुढील जीवनाची वाटचाल समजून घेण्यासाठी त्यांचे 'माझी वाटचाल' हे संस्मरणात्मक अंगाने लिहिलेले पुस्तक वाचायला हवे.
1922 ते 2010 अशी तब्बल 88 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या तत्त्वनिष्ठ आणि जीवनोपासक श्रेष्ठ व्यक्तीचा जीवनप्रवास न्याहाळताना त्यांच्या अनेकविध पैलूंचे दर्शन घडते. संक्षेपानेच ते सांगायला हवे. प्रधानसर कृतिशील विचारवंत होते. 'आधी केले; मग सांगितले' हा त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता.
महाविद्यालयीन जीवनात बुद्धिमान, विद्याव्यासंगी आणि विनयशील विद्यार्थी म्हणून ते ओळखले जात होते. त्यांच्या आईच्या शुद्ध आचरणाचा त्यांच्या जडणघडणीवर झाला. त्यांच्या घरातील वातावरण संस्कारशील आणि सदभिरूचिसंपन्न होते. फर्गसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांनी 9 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झालेल्या 'चले जाव'च्या चळवळीत हिरिरीने भाग घेतला, तेव्हा त्यांना कारावासाची शिक्षा झाली. स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांच्या सहभागामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला. नंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आचार्य शं. द. जावडेकर आणि साने गुरुजी यांच्या निकट सहवासामुळे त्यांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली.
महाविद्यालयीन अभ्यास चालू असतानाही त्यांचे देशातील राजकीय घटनांकडे लक्ष होते. त्या वेळच्या 'सोशॅलिस्ट स्टडी सर्कल'मध्ये एस. एम. जोशी आणि नानासाहेब गोरे यांची भाषणे त्यांनी ऐकली. शिरुभाऊ लिमये यांची भेट येथेच झाली. समाजवादी विचारसरणीचा प्रभाव त्यांच्यावर पडला. शिरुभाऊंच्या सहवासात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे 'माझी जन्मठेप' हे पुस्तक त्यांनी वाचले. सशस्त्र क्रांतीविषयीही त्यांना आकर्षण वाटू लागले.
भारतातील राजकीय संघर्षाचे अनेक टप्पे प्रधानसरांनी जवळून पाहिले. चळवळीत व्यग्र राहूनही त्यांनी आपला वैचारिक पिंड सातत्याने जोपासला. आचार्य जावडेकरांनी विविध राजकीय विचारप्रणालींचा परिचय करून देणारी माला लिहिली. प्रधानसरांनी ती अभ्यासली. आगरकरांच्या सामाजिक सुधारणेसंबंधीच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. तत्कालिन सामाजिक परिस्थितीत हाही मार्ग बिकट आहे, याची जाणीव त्यांना झाली. मात्र तूर्तास स्वातंत्र्यलढ्याला अग्रक्रम द्यायला हवा असे त्यांच्या मनाने घेतले. त्यासाठी त्यांनी समर्पित वृत्तीने कार्य केले. काकासाहेब गाडगीळ यांनी दिलेल्या 'ग्यानबाचे अर्थशास्त्र' या व्याख्यानमालेतून त्यांनी अर्थकारणाची मीमांसा समजून घेतली.
खूप मोठी माणसे त्यांना जवळून पाहता आली. त्यांच्या गाठी-भेटींमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध झाले. साने गुरुजी, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, मा. ग. बुद्धिसागर, प्रा. अ. के. भागवत, प्रा. वसंत बापट, प्रा. नरहर कुरुंदकर, प्रा. सदानंद वर्दे, बंडू वझे, अशोक मेहता, डॉ. राममनोहर लोहिया, मधू लिमये, कोल्हटकरमास्तर आणि बॅ. नाथ पै यांचा सहवास त्यांना लाभला.
हेही वाचा : समाजशिक्षक - विनोद शिरसाठ
राष्ट्र सेवादल ही समर्पणशील वृत्तीने राष्ट्रकार्य कसे करावे, याचा वस्तुपाठ देणारी प्रयोगशाळाच. याच मुशीतून आपले व्यक्तिमत्त्व कसे घडत गेले, याचा आलेख प्रा. प्रधानसरांनी तन्मयतेने आणि प्रसन्न शैलीत रेखाटला आहे.
प्रधानसरांच्या समग्र कार्यकर्तृत्वावर दृष्टीक्षेप टाकणे आवश्यक आहे. 1954 ते 1966 या कालावधीत ते पुणे विद्यापीठ सिनेट आणि कार्यकारिणीचे सदस्य होते. 1966 पासून 1984 पर्यंत ते विधान परिषदेचे सदस्य म्हणून ते कार्यरत होते. 1966, 1972 आणि 1978 अशा तीन वेळा पदवीधर मतदारसंघातून त्यांची निवड झाली. 1980-82 या काळात ते विधानपरिषदेत विरोधी पक्षाचे नेते होत. सांसदीय कार्यपद्धतीचा त्यांचा व्यासंग दांडगा होता. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी सदैव मूल्यविवेक बाळगला. आपल्या पदाला त्यामुळे त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली.
'नेता' म्हणवून न घेता 'कार्यकर्ता' म्हणवून घेणे हे त्यांनी अधिक पसंत केले. 1984 ते 1998 मध्ये 'साधना' साप्ताहिकाचे सहसंपादक म्हणून वसंत बापटांबरोबर ते कार्यरत होते. दोघांनी या काळात विधायक वृत्तीने काम करून 'साधना'चा कायापालट केला. प्रसंगोपात प्रधानसरांनी अनेक घटनांवर केलेले भाष्य, रेखाटलेली व्यक्तिचित्रे आणि अनेकविध विषयांवर केलेली टीका-टिप्पणी मौलिक स्वरूपाची होती. त्यांच्या प्रसन्न शैलीचा आणि अमोघ शब्दकळेचा त्यातून प्रत्यय यायचा. व्यासंगप्रियतेची भक्कम बैठक असल्याशिवाय हे सारे सिद्ध होते का?
प्रा. ग. प्र. प्रधान यांचे जीवन अनेक रोमहर्षक घटनांनी भरलेले आहे. 1942ची 'चले जाव'ची चळवळ, गोवा मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, 1975ची आणीबाणी आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा इत्यादी महत्त्वाच्या घटनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. या कठीण प्रसंगी ते मुळीच डगमगले नाहीत. समाज प्रबोधन हाच त्यांच्या जीवितहेतू होता.
कोणत्याही विषयाचा सम्यक अभ्यास केल्याशिवाय आणि भाषणांची टिपणे काढल्याशिवाय प्रधानसर कधीच भाषण करीत नसत. महाराष्ट्रातील ग्रामीण परिसरातील प्रश्नांवर त्यांनी अभ्यासपूर्ण भाषणे विधानपरिषदेत केली आहेत. अधिवेशन संपले, की लगोलग ते दौर्यावर निघत. अधिवेशनात काय काय घडले, त्याचा वृत्तान्त ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवीत. 18 वर्षांच्या कालावधीत पायांना भिंगरी लावून उभा-आडवा महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला. विधानपरिषदेत विरोधी पक्षाचे नेते या नात्याने त्यांना सर्व प्रकारच्या सरकारी सवलती होत्या. त्यांचे निवासस्थान म्हणजे कार्यकर्त्यांसाठी आणि सामान्य जनतेसाठी मुक्तद्वार होते. 'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी' हाच त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता.
प्रधानसरांच्या राजकीय वाटचालीत आणि एकूणच जीवनप्रवासात त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. मालविका यांचा सिंहाचा वाटा आहे. त्या व्यवसायाने डॉक्टर, पण प्रधानसरांचा संसार आणि त्यांनी बुद्ध्याच मांडलेला समाजाचा व्यापक संसार सांभाळण्यात त्यांनी उभी हयात घालवली. सुगृहिणीची भूमिका त्यांनी चोख बजावली. लोकोत्तर सहजीवनाचा आदर्श प्रधान दाम्पत्याच्या रूपाने अवघ्या महाराष्ट्राने अनुभवला.
प्रा. ग. प्र. प्रधान यांची वाङ्मय संपदा
प्रधानसरांनी जटिल जीवनाच्या धबडग्यात आपले वाङ्मयाविषयीचे प्रेम अबाधित ठेवले. इंग्रजी वाङ्मयाच्या परिशीलनाबरोबर मराठीचा व्यासंगही त्यांनी वाढवला. त्यांनी आपले वाचन अद्ययावत ठेवले. त्यांनी मराठी वाङ्मयातील महत्त्वाच्या ग्रंथांना प्रस्तावना लिहिल्या. 'साहित्य अकादमी'ने प्रकाशित केलेला आणि प्रा. ग. प्र. प्रधान यांनी संपादित केलेला 'आगरकर - लेखसंग्रह' या दृष्टीने आदर्श ग्रंथ आहे. त्यांनी सहा विभागांत केलेली आगरकरांच्या विचारांची मांडणी, त्यांच्या वैचारिक वैभवाला न्याय देणारी आहे. प्रा. प्रधानसरांची या ग्रंथाला लाभलेली 20 पृष्ठांची दीर्घ प्रस्तावना अभ्यासपूर्ण आहेच. शिवाय तो काळ आणि आगरकरांची क्रान्तदर्शी जीवनसरणी यांचे आकलन करून देण्यास ती सहाय्यभूत ठरलेली आहे. यातून प्रधानसरांची बुद्धिप्रामाण्यवादी, व्यासंगी आणि प्रज्ञावंत म्हणून ओळख पटते.
'मला उमजलेले...' या ग्रंथात प्रधानसरांच्या निवडक प्रस्तावना आहेत. 'जी. एं.ची निवडक पत्रे खंड 1 आणि खंड 2', 'शोकात्म विश्वरूपदर्शन', 'आगरकर लेखसंग्रह', 'भारतीय प्रबोधन आणि नव-आंबेडकरवाद', 'विचारांतून व्यक्त झालेले एस. एम. जोशी', 'नानासाहेब गोरे : व्यक्ती, विचार आणि वाङ्मय' आणि 'एका स्वातंत्र्य सैनिकाचे प्रांजल आत्मकथन' या प्रस्तावनांचा समावेश आहे. त्यातून त्यांच्या प्रज्ञेचा पैस आकळतो. त्यांची श्रद्धास्थाने उमजतात. मर्मदृष्टीचा प्रत्यय येतो. डॉ. श्रीपाल सबनीस यांचे ग्रंथाच्या शेवटी लिहिलेले 'अभिवादन' हे प्रकरण आहे. ते खूपच मर्मग्राही आहे. 'नारायणीय' या ग्रंथात शैलीसंपन्न नानासाहेब गोरे यांच्या निवडक साहित्याचे आणि विचारसंपदेचे संकलन प्रा. ग. प्र. प्रधान आणि प्रा. वसंत बापट यांनी चोखंदळपणे केले आहे. या ग्रंथाच्या शेवटी प्रधानसरांनी 'नानासाहेब गोरे : व्यक्ती, विचार आणि वाङ्मय' हा प्रदीर्घ लेख लिहिला आहे. तो अभ्यासपूर्ण आहेच; शिवाय नानासाहेब गोरे यांच्याविषयीच्या जिव्हाळ्याने ओथंबलेला आहे. आपल्या श्रद्धास्थानाविषयी तन्मयतेने कसे लिहावे याचा तो आदर्श वस्तुपाठ आहे.
ग. प्र. प्रधान यांच्या स्वतंत्र ग्रंथाचा थोडक्यात परिचय करून देणे अगत्याचे आहे. इतिहास, चरित्रवाङ्मय आणि समकालीन घटना हे प्रधानसरांचे आस्थेचे आणि अभ्यासाचे विषय आहेत. तरुणावस्थेत असल्यापासून ते लेखनमग्न राहिले. आयुष्याच्या संध्याकाळी अन् परिणतप्रज्ञ अवस्थेत तरुणाच्या उत्साहाने त्यांनी लिहिले. हा सारा खटाटोप कशासाठी होता? तरुण पिढीचा स्वाभिमान जगविण्यासाठी. राष्ट्रनिर्मितीची नवी स्वप्ने पाहण्यासाठी. हेच त्यांच्या विविधांगी वाङ्मयनिर्मितीचे अंत:सूत्र होय.
भारत-पाक युद्धावर 1966 मध्ये त्यांनी 'हाजीपीर' हे पुस्तक लिहिले. 'कांजरकोट' हे पुस्तक 1968 मध्ये लिहिले. त्यांनी आणि प्रा. अ. के भागवत यांनी मिळून 1956 मध्ये इंग्रजीत टिळकचरित्र लिहिले. त्यांनी स्वत: मुलांसाठी महात्मा गांधींचे चरित्र इंग्रजीत लिहिले. 'लोकमान्य टिळक' (1989), 'साने गुरुजी' (1990) आणि 'राम गणेश गडकरी' ही चरित्रे साक्षेपी वृत्तीने लिहिली.
'स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत' या इतिहासग्रंथाच्या शेवटी गोवा मुक्तिसंग्रामाचा इतिहास त्यांनी साक्षेपाने लिहून समाविष्ट केला. भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्तीचा तो क्षण होता (1987). बांगला देशाला भेट देऊन त्यांनी 'सोनार बांगला' हे पुस्तक लिहिले (1972). 'साता उत्तराची कहाणी' आणि 'आठा उत्तराची कहाणी' या ललित-ललितेतर सीमारेषेवरील कादंबर्या लिहिल्या. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीने मंतरलेले क्षण पुनरुज्जीवित करण्याचे प्रयोजन बाळगून हे लेखन त्यांनी केले. हा ऐतिहासिक तसाच सामाजिक - सांस्कृतिक दस्तऐवज आहे.
परिणतावस्थेत त्यांनी लिहिलेल्या 'टॉलस्टॉय यांच्याशी पत्रसंवाद' या पुस्तकाकडे आवर्जून लक्ष वेधावेसे वाटते. हे पुस्तक म्हणजे प्रधानसरांनी आयुष्यभर जपलेल्या मूल्यविवेकाचे आणि जीवनचिंतनाचे सुमधुर नवनीत म्हणता येईल. अमेरिकन विचारवंत थोरो आणि रशियन प्रज्ञावंत व प्रतिभावंत लिओ टॉलस्टॉय ही त्यांची प्रेरणास्थाने. टॉलस्टॉयच्या विचारांचा प्रभाव गांधींवर पडला होता आणि गांधीजींचा प्रधानसरांवर! हे अनुबंध अधोरेखित व्हावेत म्हणून प्रा. प्रधान यांनी टॉलस्टॉयला उद्देशून लिहिलेली पत्रे म्हणजे त्यांच्या चिंतनशील प्रतिभेचा कलात्म आविष्कार... ही सारीच पत्रे म्हणजे त्यांच्या अंतर्मुखतेचा प्रवास... त्यातील शेवटचे पत्र हे गांधीजींना उद्देशून लिहिलेले आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर वाचक एका आगळ्या वेगळ्या अनुभूतीविश्वात प्रवेश करतो, ही या पुस्तकाच्या निर्मितीची फलश्रुती!
साने गुरुजी हे प्रधानसरांचे दुसरे श्रद्धास्थान. 24 डिसेंबर 2008 ला साने गुरुजींच्या जयंतिदिनी प्रसिद्ध झालेले ‘Letters to Shivani’ हे पुस्तकही असेच वैशिष्ट्यपूर्ण. पुस्तक लहान पण आशय महान... साने गुरुजींनी आपली पुतणी सुधा हिला 'सुंदर पत्रे' लिहिली. ती अख्ख्या महाराष्ट्राची झाली. हे अंत:सूत्र ध्यानात घेऊन इंग्लंडमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या आणि 'फिजिओथेरपी'चा अभ्यास करणार्या शिवानीस - सुधाच्या नातीला उद्देशून प्रधानसरांनी लिहिलेले हे पत्रात्मक पुस्तक. तेही 'भारतीय संस्कृती'च्या संदर्भात... ‘योजकस्तत्र दुर्लभः’ हे सुवचन या संदर्भात सार्थ ठरावे. या लेखनामागची कल्पकता आणि सृजनशीलता लक्षणीय स्वरूपाची... 18 पत्रांत या विषयाची मांडणी केलेली आहे. या पुस्तकातील निवेदनशैली आकलनसुलभ अन् प्रभावी आहे. भारतीय जीवनप्रणालीतील आणि परंपरेतील सैद्धांतिक संकल्पना सहजतेने कळाव्यात अशा स्वरूपाच्या... परिभाषेच्या जंजाळात पाडणारी शब्दयोजना इथे नाही. आशय सहजसुलभ आणि हृदयाला भिडणारा!
प्रधानसरांची गाठभेट गोव्यात एक-दोन वेळा आणि कोल्हापुरात एकदा झाली. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या वेळी 1997 मध्ये गोवा विद्यापीठात ते महनीय प्रवक्ते म्हणून आले होते. त्या वेळी विद्यापीठाच्या अतिथिगृहात त्यांची गाठभेट झाली... मनसोक्त गप्पा झाल्या. दुसरी भेट शिवाजी विद्यापीठात... साहित्य अकादमी आणि शिवाजी विद्यापीठ यांनी मिळून वि. स. खांडेकर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने चर्चासत्र आयोजित केले होते. समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रधानसर आले होते. त्यांचे श्रोतृवृंदाला मंत्रमुग्ध करणारे त्या वेळचे खांडेकरांविषयीचे अंतरीच्या जिव्हाळ्याने उच्चारलेले शब्द आठवतात... कानामनांत रुंजी घालतात. त्यांनी त्यांचा जीवनपटच उलगडून दाखवला होता... अधूनमधून मी त्यांना पत्रे लिहायचो... त्यांचे वात्सल्य लाभले हा माझ्या आयुष्यातील धन्यतेचा क्षण! 'आनंदाचे बेट निर्माण करू या' हा त्यांचा परवलीचा उद्गार!
प्रा. प्रधानसरांच्या स्मृतीला विनम्र वंदन!
- डॉ. सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा.
somnathpant@gmail.com
(लेखक मराठी साहित्य समीक्षक असून त्यांनी गोवा विद्यापीठात मराठी विभागप्रमुख पदावरून काम पाहिले आहे.)
Tags: प्रधान मास्तर जन्मशताब्दी मराठी साहित्यिक साधना संपादक आणीबाणी इंग्रजी साहित्य टिळकचरित्र Load More Tags
Add Comment