आदिवासी कलांच्या मूळ प्रेरणेचा शोध

द. ग. गोडसे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या 'लोकधाटी' या पुस्तकाचा परिचय

दत्तात्रय गणेश गोडसे हे मराठी साहित्य आणि कला विश्वातले चतुरस्त्र प्रतिभावंत होते. ते इतिहासकार, नाटककार, चित्रकार, नेपथ्यकार, लेखक, कला समीक्षक म्हणून नावाजलेले होते. १९८८ चा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळालेला होता. त्यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील वाघोडे गावचा आणि त्यांचे शालेय शिक्षण सावनेरमध्ये झाले. नागपूरचे मॉरिस कॉलेज आणि मुंबईचे विल्सन कॉलेज येथून त्यांनी उच्चशिक्षण पूर्ण केले. पुढे लंडन विद्यापीठाच्या 'स्लेड स्कूल ऑफ फाइन आर्ट' मधून ललितकलेचे प्रशिक्षणही त्यांनी घेतले. महत्त्वाची ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे, मराठी वाङ्‌मय, नाटके, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला, स्थापत्यकला अशा अनेक विषयांवर गोडसे आवर्जून फक्त मराठीत लिहीत असत.

गोडश्यांनी पुस्तकांची मुखपृष्ठं केली, त्यांसाठी रेखाचित्रं काढली आणि आतली सजावटही केली. यातली ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘एक झाड दोन पक्षी’ किंवा ‘रणांगण’ सारखी पुस्तकं आज वाचकांच्या काही पिढ्यांना सुपरिचित आहेत. 'नांगी असलेले फुलपाखरू' या त्यांच्या स्वतःच्या पुस्तकाचे मुखपृष्ठही खूप गाजले, १०७हून अधिक नाटकांचे ते नेपथ्यकार होते. तीन मराठी आणि दोन हिंदी चित्रपटांचे ते कलादिग्दर्शकही होते.

द. ग. गोडसे यांचा मृत्यू ५ जानेवारी १९९२ला झाला. आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या लोकधाटी या आदिवासी कलांचे मूळ शोधणाऱ्या पुस्तकाविषयी सोमनाथ कोमरपंत यांनी लिहिलेला हा लेख प्रसिद्ध करत आहोत.


जुन्या पिढीतील नामवंत चित्रकार द.ग.गोडसे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अन्य काही पैलू होते. ते इतिहासाचे जाणकार अभ्यासक होते. लोकसाहित्य आणि लोकपरंपरा यांच्या मूलप्रेरणांचा शोध घेण्याची संशोधक वृत्ती त्यांच्यामध्ये होती. एकूणच मौखिक परंपरांमध्ये कलासौष्ठव, सामाजिक-सांस्कृतिक अनुबंध आणि मानववंशशास्त्रीय अभ्यासाला पोषक ठरणारे घटक यांचा शोध घेण्याची मर्मदृष्टी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सामावलेली होती. लोकसंस्कृतीचे भाष्यकार या नात्याने आणि इतिहासाचा मागोवा घेत त्यांनी केलेली मांडणी आजमितीला रसिकमान्य झालेली आहे. ‘पोत’, ‘‘शक्तिसौष्ठव’, ‘गतिमानी’, ‘लोकधाटी’, ‘मातावळ’, ‘ऊर्जायन’ आणि ‘समदे तलाश’ यांसारखी सौंदर्यमीमांसा करणारी त्यांची पुस्तके याची साक्ष देतात. वाचकाला नव्याने विचार करायला प्रवृत्त करतात.  द.ग.गोडसे यांच्यामधील विचारवंत सतत जागृत असतो.

द.ग.गोडसे यांचा ‘लोकधाटी’ हा ग्रंथ लोकपरंपरांच्या मूलस्रोतांकडे वाचकांना घेऊन जाणारा आहे. आदिवासींच्या श्रद्धाविश्वातील अनियमित आकाराच्या शिल्पांची त्यांनी जी संगती लावलेली आहे, ती आपल्याला स्तिमित करणारी आहे. उदाहरणार्थ, आदिवासींना श्रद्धेय वाटणारी वाघाची एक आकृतीही अशीच दणकट आणि ओबडधोबड, तोंड शरीराच्या मानाने थोडे मोठे, जबडा उघडलेला, करवती सारखे दात दाखवणारा पाय मजबूत, पंजे मोठे, पंज्याची नखे बाहेर आलेली, मूर्तीच्या उजव्या खांद्यावर एक मोठा फणा उभारलेला नाग, नागाची शेपटी खांद्यावरून सरळ कमरेपर्यंत आलेली, मूर्ती वाघाच्या पाठीवर एका बाजूने बसलेली - स्वार झालेली नव्हे.

ही मूर्ती कोणा आदिवासी शक्तिदेवतेची असावी, असे लेखकाला वाटते. मूर्तीप्रमाणेच वाघ, खड्ग, कुंभ, दागिने, साप या साऱ्यांच्या आकृती शक्तीने भरल्या-भारलेल्या. आकृतिसौष्ठवाचे, आकारसौष्ठवाचे, अंगसौष्ठवाचे, रचनेचे - इत्यादींपैकी कोणतेही सूत्र या शिल्पात आढळत नव्हते. पण वेगळ्या वळणाचे असले तरी ते शिल्प आहे, हे नाकारता येत नव्हते.

“आदिवासी कलाकाराचे मनोगत आणि साधन ही दोन्हीही स्वभावातःच मुक्त, स्वतंत्र आणि समर्थ असल्यामुळे मनोगत आणि साधन या दोघांनाही परंपरांच्या सामर्थ्याची, वैशिष्ट्याची नुसती जाणच नसते; तर परस्परांच्या कर्तृत्वाबद्दल आदरही असतो, म्हणूनच लोक-आविष्कारांच्या प्रक्रियेत मनोगत आणि साधन यांचे हे आदरयुक्त सहकार्य फार महत्त्वाचे आणि जिव्हाळ्याचे ठरते”, असे लेखकाने म्हटले आहे. म्हणजेच कोणतातरी आदिम विचार मुक्तपणे कलेच्या शास्त्रीय चौकटीत न बसणाऱ्या पद्धतीने त्यांच्या चित्र-शिल्पनतून दिसतो, असे लेखकला म्हणायचे आहे.

आदिवासी कलावंताच्या मनोगताला ‘आशय’ म्हणण्यापेक्षा ‘भावन’ म्हणणे अधिक समर्पक ठरेल असे त्याला वाटते. आदिमानवाच्या 'भावनांचा' शोध म्हणजे मानवाच्या आदिम मनाचा शोध. मानवी संस्कृतीच्या आरंभापासून तो लिपीचा शोध लागेपर्यंतचा काळ म्हणजे प्रागैतिहासिक काळ. त्याचे ‘अश्मयुग’ आणि ‘नवाश्मयुग’ असे स्थूल उपविभाग. आदिमानवाला शिकारीच्या निमित्ताने, शिकारीपूर्वी आणि त्यानंतरही काही यातुविधी करावे लागत होते. शिकारी मानवाने गुहांतून केलेल्या चित्रणात अनेक प्राण्यांचे आलेखन आढळते. उदाहरणार्थ, तीक्ष्ण शिंगे रोखून बेगुमान धावणारा अक्राळ वृषभ, वक्र विशाल सुळ्यांचा मत्त केसाळ मॅमथ किंवा बेढब आकार-अंगाचा पुष्ट दांडगा वराह. शिकारीपूर्वी करायच्या यातुविधीतील एक आवश्यक आह्निक म्हणून आदिमानवाने कलेचा आधार घेतला होता. निसर्गाच्या शक्तींच्या अनुग्रहाबरोबरच स्वकौशल्याविषयी आदिमानवाला आत्मविश्वास वाटत होता. स्वतःच्या हत्यारावरही तेवढीच निष्ठा आणि प्रेम होते. तो त्याचा एक अवयवच. सर्वस्वी तो शिकारीवर अवलंबून राहिल्यामुळे त्याच्या भावविश्वाला एक वेगळेच वळण लागून त्याच्या मनाची घडण विशिष्ट घाटाची होते. नागरी संस्कृतीच्या प्रदूषणांपासून ते अलिप्त राहू शकले. शिकारी व शेतकरी यांच्या जीवनशैलीत काहीसे साधर्म्य असल्यामुळे दोघांच्याही आविष्कारांचे थाट-घाट तत्वतः एकाच वळणाचे ठरतात असे लेखकाचे मत आहे.

लोकदैवतांचं आणि लोककलाविष्कारांचं सौष्ठव आणि गतिमानता यांचीही चर्चा गोडश्यांनी केलेली दिसते. मातीचं मडकं, जात्यावरच्या ओव्या, आदिवासी शिल्पं, अशा आविष्कारांमागचं माणसाचं नागरी संस्कृतीचा स्पर्श न झालेलं जीवन कसं होतं? त्यांची जीवनदृष्टी, श्रद्धा, समूहभावना या कलेतून कशी दिसते? अशा प्रश्नांची उकल करण्याचा गोडसे प्रयत्न करतात. लोकाविष्कारांची शास्त्राशी बांधीलकी नसल्यामुळे त्यांतली लयतत्त्वं, वाक्-वळणं आणि उर्जा या गोष्टी नागर आविष्कारांपेक्षा कशी वेगळ्या असतात हे ते उलगडून दाखवतात. त्यातून आदिम लोकधाटीतला भावनानिष्ठ, ‘गतिमानी’ आविष्कार आणि औद्योगिक, नागर संस्कृतीतला काटेकोर ‘गणितमानी’ आविष्कार असं द्वैत ते उभं करतात. 

लोक-चित्रकलेतील रेषा ही गतिमानी असते. ती अनेक वाक-वळणांची असते अनियमित लवचिक लय ही वाक वळणांच्या गतिमानी रेषेचे आणखी एक महत्त्वाचे परिमाण असते. गतिमानी रेषेचे प्रववहन म्हणजे अनेक अनियमित, असमतोल गतिमानांची एक मालिका बनते. स्वयंप्रवाही रेषेतील अंगभूत असे हे वाक-तत्त्व महत्त्वाचे, इत्यादी निरीक्षणे द.ग.गोडसे यांनी नोंदवली आहेत. एका परीने हा त्यांचा संशोध होय. गतिमानी रेषेतील वाकाची घडण आणि कार्य यांचे स्थूल मानाने स्वरूप अशा प्रकारचे. त्यात पूर्वनियोजित सूत्रबद्ध असे काही नसतेच. सारे काही उत्स्फूर्त, स्वयंप्रेरित, स्वयंगतिशील, स्वयंप्रवाहित आणि स्वलयवर्तित असे अनिर्बंध, मुक्त आणि ताल-कालातीत असते. आदिमानवाच्या मनात हजारो वर्षांपासून हत्तीविषयीची भीती आणि आदराची भावना असते. सामूहिक संज्ञा आणि सामूहिक संवेदना यांच्या स्पष्ट-सूक्ष्म संवाद-संघर्षातून हत्तीविषयक विशिष्ट ‘भाव-मात्र’ प्रतिमा आदिवासी कलावंताच्या भावविश्वात स्थिर होते. कोणत्याही अनुभवाची केवळ ‘भावमात्र प्रतिमा’ टिपणे हे कलावंताच्या आविष्कार-प्रक्रियेचे धोरण व वळण ठरते.

लेखकाने त्यानंतर जात्यावर गायलेल्या ग्रामीण ओवीचे स्वरसौंदर्य, अर्थसौंदर्य आणि भावसौंदर्य उलगडून दाखवले आहे. कुंभाराच्या फिरत्या चाकावर घडणारे ग्रामीण मडके आणि फिरत्या जात्याच्या भ्रमणात आकारास येणारी ‘ओवी’ या दोहोंत लेखकाला साम्यस्थळ आढळून येते. दोहोंची निर्मिती म्हणजे गतिमान आवर्तनांच्या लयीतून आकारास येणारे एक घडित असते. ग्रामीण आविष्कारांची सारी सूक्ष्म-स्पष्ट वळणे त्यात आढळतात. ग्रामीण ओवीचे अक्षररूप हे खरे पूर्ण रूप नव्हे. तिचे खरे रूप गेय असते. म्हणून ते स्वरस्वरूप असते. पूर्ण आणि विभाग यांच्या परस्परसंबंधाची एक विशिष्ट जाण हे ग्रामीण व्यवहाराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. लोकघडितातील कोणत्याही आविष्काराची ‘आवृत्ती’ अथवा ‘प्रत’ निघू शकत नाही ती पूर्णरूप, एकसंध असते. तशीच ती एकमेवाद्वितीयच असते.

लेखक केवळ सैद्धांतिक विवेचन करून थांबत नाही. लोकतत्त्व विशद करताना त्याच्या उगम स्थानाचा तो उबदार मनाने शोध घेतो. त्याच्या भावभावनांचे ओथंबलेपण तो समरस होऊन समजावून घेतो. उदाहरणार्थ – “सर्वसाधारणपणे हे दळण पहाटे करण्यात येते. शुक्राचा तारा वर आलेला, पहाटेची नीरव शांतता, पहाटवाऱ्याच्या शीतमंद झुळूकांनी वातावरण प्रसन्नलेले, घराच्या ओसरीवर गृहिणीची वृद्ध सासू आणि मुले पहाटेच्या साखरझोपेत मश्गूल झोपलेली... पती शेतावर करावयाच्या कामाची तयारी करण्यात गुंतलेला. अशा वेळी जात्यावर दळायला बसल्यावर ग्रामीण रुहिणीला गाण्याची ऊर्मी येऊन सुचणारे अथवा आठवणारे ओवीचे स्वरूप ती गाऊ लागणे सहज स्वाभाविक. दळणाचे कष्ट लक्षात घेतल्यास ते हलके करणारे गायन त्यावेळी आवश्यकही.

दळणाऱ्या बाईने जात्यावर नेहमी प्रसन्न, आनंददायक गाणीच म्हणावी. करुण, दुःखी कवने म्हणू नये. कारण या गाण्यांचा दळलेल्या पिठावर परिणाम होत असतो अशी त्यांची श्रद्धा. अशी त्यांची धारणा. गृहिणींना जात्यावर बसल्यावर माहेराचे कौतुक गायला विशेष हुरूप येतो. ते संपन्न, समृद्ध आहे हे साऱ्याच गृहिणी सांगतात. खानदेशातील ग्रामीण श्रद्धाविश्वावर रामायण-महाभारताचा आणि पुराणांचा प्रभाव मोठा. अनेक व्यक्तिरेखांचे उल्लेख तेथील कवनांतून आढळतात. 

अखंड प्रवाहित्व आणि एकसंध घडण ही ग्रामीण घडणीची वैशिष्ट्ये. तीच तिची बलस्थाने. तीच ग्रामीणांच्या आविष्काराचीही बलस्थाने. ग्रामीण चित्र-शिल्पांतून मानवाकृतीचे चित्रण अथवा शिल्प असते. या आकृतीचे हात आणि पाय यात प्रमाणबद्धता व सारखेपणा आढळत नाही. लोक-कलावंताच्या दृष्टिकोनातून प्रत्येक कलावंताची निर्मिती ही स्वायत्त व स्वतंत्र असते. या घडणीत कला की कारागिरी हा प्रश्नच त्याच्या दृष्टीने संभवत नाही. 
अवकाशविषयक व अंतर विषयक ग्रामीण विधाने अलग असतात. ‘कासराभर दिवस वर आला’ अथवा ‘कासराभर दिवस राहिला’, ‘दोन हाकांच्या अंतरावर गाव आहे’ व ‘तीन पुरुष पाणी आहे’ या स्वरूपाची विधाने असतात. या परिमाणात गणिती नेमकेपणा नसतो.  लवचिकता असते. कोणत्याही शास्त्रोक्त परंपरेचा अभाव हे सुद्धा लोक-आविष्कारांचे एक वैशिष्ट्य असते. शास्त्रोक्त नागरी परंपरांतून आढळणारीवेगवेगळी घराणी, त्यांतील तात्विक वाद व भांडणे इत्यादी उपाधी यांना ग्रामीण कलाजगतात स्थान नसते.

स्थळीय देवतांच्या आकृती नागरी उपासनेतील देवतांच्या मूर्तींहूनभिन्न प्रकारच्या असतात. ग्रामीणांची देवतांकडे पाहण्याची दृष्टी सर्वस्वी भावप्रत्ययकारी असते. समर्थांनी अनेक दगडांच्या गर्दीतून म्हसोबा कसा ओळखला हा प्रश्न आजच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. ग्रामीण श्रद्धाविश्वात साकल्याने भावणारे एका अनामिक शक्तीचे ‘भावमात्र रूप’ समर्थांना शिलाखंडाच्या आकार-अवकाशात आकळले.

कुंभाराचे ग्रामीण मडके, जात्यावरची ग्रामीण गेय ओवी, तमाशाचा ग्रामीण प्रयोग, निखळ आदिवासी चित्रधाटणी आणि लोकनाट्यपरंपरा इत्यादींच्या आविष्कारपद्धतींच्या निरीक्षणातून द.ग.गोडसे यांनी ‘लोकधाटी’चे अंतसूत्र शोधले आहे. ते अभ्यासनीय आहे. मननीय आहे.

- डॉ. सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा
somnathpant@gmail.com 
(लेखक गोवा विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख, ज्येष्ठ समीक्षक आणि मराठी साहित्याचे प्राध्यापक आहेत.)

Tags: आदिवासी कला लोकधाटी अनागर संस्कृति आदिवासी द. ग. गोडसे Load More Tags

Comments:

Anup Priolkar

Informative Article

Add Comment