खांडेकरांच्या 1942 साली प्रसिद्ध झालेल्या ‘क्रौंचवध’ या कादंबरीत आपल्या राष्ट्रीय जीवनात निर्माण झालेल्या आणि नव्याने जागृत झालेल्या जनमानसाच्या प्रभावी विचारसरणीचे प्रतिबिंब आढळते. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या ऊर्जस्वल पर्वातील रोमहर्षक वातावरणाचे तरंग या कादंबरीत उमटले आहेत. खांडेकरांना मार्क्सवादाविषयी आकर्षण वाटत होते. गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाविषयी आणि त्यांनी राष्ट्रासाठी केलेल्या समर्पित कार्याविषयी खांडेकरांच्या अंत:करणात नितांत आदराची भावना होती. ‘क्रौंचवध’मधील आशय व व्यक्तिरेखा यांद्वारे गांधीजींच्या विचारसरणीविषयी उलटसुलट प्रतिक्रिया नोंदवीत गांधीवादाच्या पर्यायाने त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या श्रेष्ठत्वाकडे खांडेकर वाचकांचे लक्ष केंद्रीत करतात.
यंदा आपण नुकताच भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. महामारीच्या संकटातून आपण अजूनही पूर्णपणे बाहेर पडू शकलेलो नाही. असुरक्षिततेची भीती आमच्या मनात अजूनही कायम आहे. गेल्या दोन वर्षांत आपण काय काय गमावले, याचा ताळेबंद अजूनही आपण मांडू शकलेलो नाही. उद्योगधंदे ठप्प झाले, कारखाने खंडित झाले. त्यामुळे अर्थकारणाचा समतोल ढासळला. नव्या पिढीतील शिक्षणप्रक्रिया खंडित झाली. त्यांचे भवितव्य अंधारात राहिले. त्यांच्या मानसिकतेवर आघात झाला. माणसा-माणसांमधील चलनवलन आणि सुसंवाद थांबल्यामुळे सामाजिकीकरणाच्या गतीला खीळ पडली. सांस्कृतिक अराजक निर्माण झाले. हा सारा राष्ट्रीयदृष्ट्या सिंहावलोकनाचा कालखंड असल्यामुळे जवळच्या संकटमालिकांचा उच्चार करावासा वाटला.
स्वातंत्र्यपूर्व काळातील राजकीय नेत्यांनी, कृतिशील प्रज्ञावंतांनी आणि प्रतिभावंतांनी आपले उत्तरदायित्व योग्य रीतीने पार पाडले. साहित्यिक तर राष्ट्रीय स्पंदनांना आणि सर्वसामान्यांच्या मनोभावनांना उद्गार देत असतात. रोमा रोलॉं या श्रेष्ठ विचारवंतांचे सुवचन या संदर्भात स्मरते : ‘साहित्यिक हे जीवनाच्या अखंड युद्धातील सर्वश्रेष्ठ सैनिक आहेत.’ गतकाळ हा आदर्शवादाचा होता. आजचा काळ कठोर वास्तव स्वीकारण्याचा आणि जीवनातील जटीलता सहन करण्याचा आहे.
स्वातंत्र्य हे जगातील सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. ते केवळ भौगोलिक भूमी मुक्त करत नाही; ते सृजनशील आत्म्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रेरणास्थान असते. ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या जोखडातून भारतवर्ष मुक्त व्हावा म्हणून अनेकांनी अनेकप्रकारे त्याग केला. काहींनी बलिदान केले. कवींनी स्फूर्तीदायक काव्यनिर्मिती केली. कादंबरीकारांनी तत्कालीन स्वातंत्र्यसंग्रामपर्वाची चित्रे रेखाटली.
या संदर्भात वि. स. खांडेकर यांच्या ‘अश्रू’ आणि ‘क्रौंचवध’ या कादंबर्या आठवतात. वि. वा. शिरवाडकर यांची ‘वैष्णव’, अनंत गोपाळ शेवडे यांची ‘ज्वालामुखी’, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांची ‘आनंदमठ’ आणि रवींद्रनाथ टागोर यांची ‘गोरा’ या कादंबर्या आठवतात. ‘गोरा’ या कादंबरीविषयी डॉ. सुकुमार सेन म्हणतात, ‘‘...‘गोरा’ या कादंबरीला आधुनिक भारताचे ‘महाभारत’ म्हटले जाते हे योग्यच आहे.’’ स्वातंत्र्योत्तर कालखंडातील प्रा. ग. प्र. प्रधान यांची ‘साता उत्तराची कहाणी’ ही कादंबरी आठवते.
या पार्श्वभूमीवर खांडेकरांच्या ‘क्रौंचवध’ या कादंबरीचा इथे थोडक्यात परामर्श घ्यायचा आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींनी ज्या आस्थेने शक्तीहीन भारतीय समाजात कमालीचा आत्मविश्वास निर्माण केला. तशाच प्रकारची आस्था आणि आत्मियता वि. स. खांडेकरांकडे होती. त्यांना आपल्या समाजातील दौर्बल्य जाणवले, तरी येथील माणसांमधील अंत:स्थ सामर्थ्यावर त्यांना जबरदस्त विश्वास होता. त्यांची ‘घरिं एकच पणती मिणमिणती...’ ही कविता म्हणजे विसाव्या शतकातील माणसाचे प्रतीकच म्हणावे लागेल. ध्येयवादी शिक्षक, सृजनशील साहित्यिक आणि भारतीय साहित्याला विधायक वळण लावणारे प्रतिभावंत अशी त्यांची ख्याती होती. आजही आहे. तत्कालीन राजकीय परिस्थिती, सामाजिक स्पंदने, अर्थकारण, सांस्कृतिक वातावरण आणि येऊ घातलेले विचारप्रवाह व अंत:प्रवाह इत्यादी धारा त्यांनी आत्मसात केल्या. सात्विकता टिकवून ठेवली. कुठल्याही रूढ विचारप्रणालींमागे आंधळेपणाने न धावता त्यातील नवनीत त्यांनी स्वीकारले. त्या वेळच्या तरुण मनाची संवेदनशीलता आणि धारणाशक्ती यांचा धागा त्यांच्या मनाशी जुळलेला होता. कालपुरुषांची संवेदनशीलता जाणवल्यामुळे त्यांचे मन सद्भिरुचिसंपन्न बनले.
वि. स. खांडेकरांनी मराठी मनाला स्वप्नांचे पंख दिले आणि समकालीन वास्तवाचे भान दिले. समाजविन्मुख राहून हस्तिदंती मनोर्यात बसून लेखन करणे हे त्यांना मान्य नव्हते. त्यांना दरिद्रीनारायणाचे दर्शन घडले. माणसांचे चेहरे त्यांनी वाचले. खांडेकरांना खर्या अर्थाने ‘माणूस’ कळला नाही असे म्हणणारे काही टीकाकार आहेत. त्यांना खांडेकरांमधील ‘माणूस’ कळला नाही असेच म्हणावे लागेल. वाचन-मनन-चिंतन या गुणत्रयीचा निदिध्यास खांडेकरांनी बाळगला. मराठी साहित्याचे अक्षांश-रेखांश त्यांनी अभ्यासले होते; शिवाय विश्वसाहित्यातील आल्बर्ट कामू, ज्यॉं पॉल सार्त्र, अनेस्ट हॅमिंग्वे इत्यादिकांच्या साहित्यकृती त्यांनी मन लावून अभ्यासल्या होत्या. 1972 पणजीला झालेल्या जाहीर व्याख्यानात हेमिंग्वे यांच्या ‘ऑल्ड मॅन अँड दि सी’ या अक्षय साहित्यकृतीचे अंतरंग त्यांनी उलगडून दाखवले होते... माणसाची प्रबळ जीवनेच्छा आणि अखंड आशावाद या कादंबरीत अभिव्यक्त झालेला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले होते.
‘हृदयाची हाक’ (1930) पासून ‘सोनेरी स्वप्ने भंगलेली’ (1977) या 47 वर्षांतील खांडेकरांचा कादंबरीप्रवास हा त्यांच्या जीवनचिंतनाचा परिपाक आहे. व्यष्टीपासून समष्टीपर्यंत घडलेला हा प्रवास आहे. त्यांचे जीवनभाष्य म्हणजे वाट चुकलेल्या गलबतांना दिशा दाखवणारा दीपस्तंभ आहे.
हेही वाचा : वाङ्मयीन संस्कृतीचे निस्सीम उपासक - सोमनाथ कोमरपंत
‘क्रौंचवध’ ही खांडेकरांची कादंबरी 1942 मध्ये प्रकाशित झाली. या संवत्सराला आपल्या राष्ट्रजीवनाच्या संदर्भात अतिशय महत्त्व आहे... भारतीयांची युयुत्सु वृत्ती महात्मा गांधींच्या मुखातून मुखर झाली होती... ‘ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य कधी मावळत नाही.’ अशी वल्गना करणार्या राजसत्तेची पाचावर धारण बसली होती.
खांडेकरांच्या 1942 साली प्रसिद्ध झालेल्या ‘क्रौंचवध’ या कादंबरीत आपल्या राष्ट्रीय जीवनात निर्माण झालेल्या आणि नव्याने जागृत झालेल्या जनमानसाच्या प्रभावी विचारसरणीचे प्रतिबिंब आढळते. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या ऊर्जस्वल पर्वातील रोमहर्षक वातावरणाचे तरंग या कादंबरीत उमटले आहेत. खांडेकरांना मार्क्सवादाविषयी आकर्षण वाटत होते. गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाविषयी आणि त्यांनी राष्ट्रासाठी केलेल्या समर्पित कार्याविषयी खांडेकरांच्या अंत:करणात नितांत आदराची भावना होती. ‘क्रौंचवध’मधील आशय व व्यक्तिरेखा यांद्वारे गांधीजींच्या विचारसरणीविषयी उलटसुलट प्रतिक्रिया नोंदवीत गांधीवादाच्या पर्यायाने त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या श्रेष्ठत्वाकडे खांडेकर वाचकांचे लक्ष केंद्रीत करतात. आपल्या प्रस्तावनेत ते म्हणतात, ‘रानटी काळापासून थोडेफार सुसंस्कृत झालेले मानवी मन अधिक सुधारून हा पालट घडून येईल अशी गांधीवाद अपेक्षा करतो. समाजवादाचा मार्ग जवळचा आहे. तो पूर्णपणे टिकाऊ आहे की नाही हे काळच ठरवील. गांधीवादाचा मार्ग लांबचा आहे. त्याचे इच्छित साध्य झाले नाही तरी ते समाजवादाच्या कार्याला अंती पूर्णपणे पोषकच होईल.’ खांडेकरांची जीवनश्रद्धा या उद्गारांतून प्रकट होते.
खांडेकरांनी बुद्धिवाद, समाजवाद आणि त्यातून परिणत झालेला मानवतावाद यांचे पुनरावलोकन केले. गांधीवादाचा पुरस्कार व उपभोगवादाचा अस्वीकार, ध्येयवाद ही जीवनमूल्ये ‘क्रौंचवध’मधून दृग्गोचर होतात. ‘क्रौंचवध’ या प्रतीकातून त्यांनी आपल्याला अभिप्रेत असलेला आशय प्रकट केलेला आहे.
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम: शाश्वती: समा: ।
यत्क्रौंचमिथुनादेवमवधी काममोहितम् ॥
या आदिकवी वाल्मिकींच्या श्लोकातून आधुनिक जीवनसरणीच्या अनेक अंगोपांगांना लेखकाने स्पर्श केलेला आहे. प्रेयस आणि श्रेयस यांच्या संघर्षात प्रेयसामधील संस्कृतचे कुशल आणि कर्तव्यनिष्ठ प्राध्यापक दादासाहेब दातार, त्यांची मुलगी सुलोचना उर्फ सुलू, दादासाहेब दातारांच्या आश्रयाखाली वाढलेला ध्येयवादी वृत्तीचा, राष्ट्राविषयी असीम निष्ठा बाळगणारा दिनकर उर्फ दिलीप या प्रमुख व्यक्तिरेखा. या परस्परांमधील भावबंध खांडेकरांनी समरसतेने रेखाटले आहेत. सुलूच्या भावजीवनात असलेले दिलीपचे स्थान, दिलीपचा स्वातंत्र्यसंग्रामातील सहभाग, रामगड संस्थानातील राजेसाहेबांशी त्याने केलेली बंडखोरी, दिलीप व सुलू यांची परस्परांमधील प्रेमभावना लक्षात न घेता दादासाहेब दातारांनी सुखवस्तू डॉ. भगवंतराव शहाणे यांच्याशी केलेला सुलूचा विवाह, विवाहानंतरही शहाणे यांच्याशी मनाने एकरूप न होता ध्येयनिष्ठ दिलीपविषयीचे हृदयबंध जपणारी सुलू, तिच्या मनात सतत चालणारे द्वंद, दिलीपच्या कर्तृत्वामुळे सुलूचे मानसिकदृष्ट्या त्याच्याजवळ जाणे, केवळ वैभवप्राप्तीसाठी अनाचार करायला प्रवृत्त झालेल्या आपल्या पतीविषयी सुलूच्या मनात निर्माण झालेला अंतराय, प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनांपायी आक्कासाहेबांच्या गर्भात वाढणार्या मुलाची डॉ. शहाणे यांनी केलेली हत्या, दिलीपला स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झाल्याबद्दल झालेली फाशीची शिक्षा, दिलीपने प्रा. दादासाहेब दातार यांना निर्वाणीच्या क्षणी लिहिलेले प्रदीर्घ पत्र आणि दिलीप फाशीची शिक्षा रद्द होऊन कादंबरीचा झालेला सुखान्त शेवट. अशा विविध टप्प्यांनी कथानकाचा परिपोष खांडेकरांनी केलेला आहे. त्याद्वारे खांडेकरांच्या प्रखर जीवननिष्ठेचे विलोभनीय दर्शन घडते.
‘क्रौंचवध कादंबरीतील सुखान्त शेवट न पटणारा आहे.’ असे मत प्रथितयश समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.
(क्रौंचवध व ययाती यांचे सुखान्त, ललित, मे 1979, पृ. 11-13)
‘क्रौंचवध’मध्ये दिलीप आणि सुलू या प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. कथानक-परिपोष करताना अन्य व्यक्तिरेखांना उठाव मिळालेला आहे. सुलू या व्यक्तिरेखेला केंद्रवर्ती स्थान मिळालेले आहे. खांडेकरांच्या अन्य कादंबर्यांमध्ये जसे स्त्रीपात्रांना प्राधान्य मिळालेले आहे, तसेच ‘क्रौंचवध’मध्ये सुलू या व्यक्तिरेखेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
वि. स. खांडेकर यांचे स्त्रीजीवन विषयक चिंतन आणि आदर्शवादी विचासरणीविषयी वाटणारे ममत्व ‘क्रौंचवध’मध्ये प्रकट झालेले आहे. सुलू सुशिक्षित आहे. नव्या विचारप्रवाहांचे दर्शन घडलेली ती बुद्धिवादी आणि मनस्वी नायिका आहे. विवाह झाल्यानंतरदेखील तिच्या मनात दिलीपविषयीची ओढ कायम असते, तिच्यामुळे फार मोठ्या मन:संघर्षाला ती तोंड देते. तिच्या मनोगतातून, पत्रांमधून तिच्या भावनात्मकतेचे दर्शन घडते. आपल्या भावनांचे प्रकटीकरण ती आपल्या वडिलांशी करू शकत नाही. तिच्या मनातील संघर्ष हा बुद्धी आणि भावना यांमधील आहे. आपल्या वडिलांचे मन कोणत्याही कारणाने दुखावले जाऊ नये म्हणून ती जीवनात अनेक तडजोडी स्वीकारते. डॉ. भगवंतराव शहाणे यांच्या सुखवस्तू वास्तूत रमण्याचा प्रयत्न करते. पण या सुखाभासाची जाणीव तिच्या अंतर्मनाला क्लेश देत राहते. हे अंतर्द्वंद्व अनेक प्रसंगमालिकांतून प्रकट करण्यात खांडेकरांना यश प्राप्त झालेले आहे.
स्त्रीच्या वाट्याला निसर्गत: आलेली मातृत्वाची भूमिका तिला आयुष्यात सारी दु:खे विसरायला लावते. पण नियतीच्या क्रूर लीलेमुळे सारा खेळ खलास होतो. मातृत्वाचा आनंदानुभव तिला घेता येत नाही. मूल दगावल्यामुळे मातृत्व हे तिच्या दृष्टीने मृगजळच ठरते. तिचे भावजीवन उद्ध्वस्त होते.
सुलू ही निष्णात डॉक्टरची पत्नी. अर्थात राजघराण्याशी तिचा निकटचा संबंध येणे हे अत्यंत स्वाभाविक. त्यामुळे क्लबमध्ये जाणे, फॅशन्सच्या अनेक प्रकारांचे वर्णन करणे तिला क्रमप्राप्त असले तरी या लब्धप्रतिष्ठित व आत्मकेंद्रीत जगात ती मुळीच न रमणारी क्लबमधील दृश्ये पाहून तिच्या मनात विचार येतात.
‘आम्ही सुखवस्तू बायका म्हणजे शृंगारलेल्या बाहुल्याच आहोत. नवर्याचे आवडते खेळणे म्हणून आम्ही जगायचे. स्वत:चे असे ध्येयच नाही आम्हाला. आमच्या चळवळी म्हणजे नुसती शोभेची फुलं आहेत.’
सुलूने तत्कालीन समाजातील स्त्री जीवनाविषयी केलेल्या कठोर आत्मविश्लेषणाद्वारे खांडेकरांच्या जीवनविषयक प्रणालीचे आणि उदारमतवादी दृष्टीकोनाचे दर्शन घडते. सुशिक्षित स्त्रीच्या मनात अशा प्रकारचे विचारमंथन व्हावे, असे त्यांना वाटते.
सुलू प्रचलित समाजसंकेतांचे दडपण झुगारू शकत नाही. ‘जगाच्या दृष्टीने मी भगवंतरावांची आहे. मनाने मी दिलीपची आहे.’ अशा स्वप्नाळू विश्वात ती वावरताना दिसते. सुखाच्या ऐन बहरात ती पूर्वाश्रमीच्या प्रियकराची आठवण म्हणून शिरोड्याच्या सत्याग्रहातील मिठाची पुडी ट्रंकेच्या तळाशी जपत असते. ती मनस्विनी आहे. सुलू या व्यक्तिरेखेच्या द्वारे खांडेकरांनी आधुनिक युगातील स्त्रीच्या मनातील संघर्ष चित्रित केला आहे.
राजेसाहेबांच्या षष्ठ्यद्बिपूर्तीच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमप्रसंगी दिलीपने केलेल्या भाषणामुळे सुलू प्रभावित होते. सुखावते. पण त्याच्या जीवनातील आगामी संकटाच्या कल्पनेने तिला काळजी वाटते. तथाकथित प्रतिष्ठितांच्या समुदायात दिलीपच्या झालेल्या अवहेलनेमुळे सुलू दुखावली जाते. ती उद्गारते, “रामगडात मोठी मानली जाणारी ही सारी माणसे ढोंगी आहेत. ते खर्या देवाचे भक्त नाहीत. नैवेद्याकरिता दगडापुढे हात जोडणारे पुजारी आहेत. हे पैशाची पूजा करतील. प्रतिष्ठेला फुलं वाहतील, सतीभोवती दिवे ओवाळतील, सिंहासनावर बसलेल्या सशाची सिंह म्हणून स्तुतिस्तोत्रे गातील आणि पिंजर्यात सापडलेल्या खर्याखुर्या सिंहाला खडे मारतील.”
सुलू आणि भगवंतराव यांच्या वृत्ती-प्रवृत्तीतील अंतर्विरोधी आणखी एका प्रसंगाद्वारे लेखकाने अधोरेखित केला आहे.
वि. स. खांडेकरांचे खुद्द लेखकाने केलेले रेखाटन
सुलू आणि भगवंतराव राजेसाहेबांना साठीच्या निमित्ताने एक चित्र भेट म्हणून द्यायचे ठरवितात. भगवंतरावांनी निवडलेले चित्र उमरखय्यामचे होते. सुलूला आवडलेले चित्र क्रौंचपक्ष्याचे होते. सुलूने त्या प्रसंगी व्यक्त केलेल्या मनोगतातून लेखकाची जीवनमूल्यांविषयीची धारणा प्रकट होते.
‘पहिल्या चित्रात जगाची आठवण विसरून मद्याची सुरई आणि रसाळ कविता यांच्यात मग्न होऊन गेलेला उमरखय्याम झाडाखाली बसलेला दाखविलेला होता. दुसर्यात झाडावरल्या क्रौंच पक्ष्यांच्या जोडप्यातील नराला मारणार्या पारध्याला क्रोधाने शाप देणारा ऋषी दाखविला होता. जवळच एक तरुणी त्या मृत पक्ष्याला पोटाशी धरून अश्रू ढाळीत बसली होती. कला या दृष्टीने दोन्ही चित्रे चांगली होती. पण...’
‘त्या उमरखय्यामच्या चित्रात काही तरी कमी आहे, असे मला वाटत होते. ते वैगुण्य काही केल्या नेमके मला सांगता येईना.’
अशाप्रकारे वि. स. खांडेकर यांच्या ‘क्रौंचवध’ या कादंबरीतून सूचित झालेल्या जीवनाशयाला आदर्शपूजनाचा ध्यास आणि हव्यास आहे. तिला अनेक परिणामे नाहीत.
‘क्रौंचवध’ प्रसिद्ध होऊन 80 वर्षे उलटली. आदर्शवादाचा मानदंड ठरावा अशी ही साहित्यकृती आहे. कुसुमाग्रजांच्या ‘क्रांतीचा जयजयकार’ या कवितेने कृतिशील आणि शुभंकर हातांना बळ दिले... कर्त्या हातांसाठी तो प्रेरणास्रोत ठरला. तद्वत खांडेकरांनी ‘मिथक’पासून स्फूर्ती घेऊन ‘क्रौंचवध’ ही कादंबरी लिहिली.
आजचे युगमानस बदललेले आहे... अभिरुचीचा मन:पालट झालेला आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील भ्रमनिरासामुळे आणि वास्तवानुभूतीमुळे सर्जनशील लेखकांची संवेदनशीलता बदललेली आहे. माणसामाणसांच्या जीवनशैलीत बदल होत चाललेला आहे. तीनुसार युगशैली बदलणे अपरिहार्य आहे. कोणतीही साहित्यकृती कालजयी ठरली आहे की नाही, याविषयीचे आजचे निकष लावून भागणार नाही. तत्कालीन जीवनासंदर्भात खांडेकरांसारख्या मोठ्या कादंबरीकाराचे मूल्यमापन करण्यात तारतम्य बाळगायला हवे. जीवनाचा संदर्भ लक्षात घेता समग्रतेचे भान लेखकाने ठेवले आहे की नाही याचा शोध घेतला तर पुष्कळ गोष्टी सुलभतेने उलगडून दाखवता येतील. लेखकाचे जीवनजाणिवेचे आकलन आणि साहित्यकृतीत त्याने केलेली प्रमेयात्मक मांडणी यांचा साक्षेपाने विचार करायला हवा असे वाटते. हे करत असताना ‘क्रौंचवध’ नंतरचा ‘ययाती’पर्यंतचा खांडेकरांचा प्रवास सहृदयतेने समजून घ्यायला हवा.
सुरुवातीपासून ‘ययाती’पर्यंतचे खांडेकरांचे वाङ्मयीन कर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ दिला गेला. करवीर नगरीत त्यांचा भव्य गौरव समारंभ झाला. महाराष्ट्रातील आणि भारतातील थोर नेते यशवंतराव चव्हाण यांनी ‘अश्रू’ आणि ‘क्रौंचवध’ यांसारख्या कादंबर्यांनी आमच्या पिढीतील माणसांची जडणघडण केली होती असे कृतज्ञतेचे उद्गार काढले होते. त्यांनी असेही नमूद केले होते की, ‘खांडेकरांसारखा समीक्षक मला त्या वेळी लाभला असता, तर माझे सृजनशील लेखन वेगळ्या अंगाने विकसित झाले असते.’
1997 मध्ये शिवाजी विद्यापपीठ आणि साहित्य अकादमी, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात भव्य चर्चासत्र आयोजित केले गेले. माननीय कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे यांनी त्या चर्चासत्राचे उद्घाटन केले होते. समारोपप्रसंगी प्रथितयश साहित्यिक आणि समाजमनस्क प्रज्ञावंत प्रा. ग. प्र. प्रधान यांनी खांडेकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि वाङ्मयीन कर्तृत्वाचा यथोचित गौरव केला होता. ‘अश्रू’ आणि ‘क्रौंचवध’ने आपल्या पिढीला कसे घडविले हेही त्यांनी विशद केले होते. एवढेच नव्हे तर जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्याला आणि विचारवंतांच्या मनात खांडेकरांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाबद्दल आत्मीयता आणि आदराची भावना कशी वसत होती, हे आवर्जून सांगितले होते.
संक्षेपाने सांगायचे झाल्यास खांडेकरांच्या ‘क्रौंचवध’ कादंबरीतील आशयातून तत्कालीन राजकीय परिस्थिती, समाजकारण यांतील अंत:प्रवाहांचे आकलन होते. गांधीवाद, मार्क्सवाद इत्यादी प्रभावी विचारप्रणालींविषयीचे मंथन आढळते. आपल्या अवतीभोवतीच्या सांस्कृतिक पर्यावरणाच्या तपमानाचा वेध घेणे हे खांडेकरांच्या प्रातिभधर्माचे व्यवच्छेदक लक्षण. ‘क्रौंचवध’मधून पदोपदी त्याचा प्रत्यय येतो. ‘क्रौंचवध’मधील प्रतीकात्मकता कथानकपरिपोष करताना सतत खेळती कशी राहील याचे भान खांडेकरांनी ठेवलेले आहे. या संदर्भात त्यांनी भारतीय अभिजात साहित्यातील आणि मराठी साहित्यातील उद्धृत केलेली अवतरणे रसिक वाचकांच्या मनात प्रसन्नता निर्माण करतात. उदाहरणार्थ, त्यांनी कुसुमाग्रजांच्या ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ आणि ‘क्रांतीचा जयजयकार’ या कवितांमधील काही ओळी उद्धृत केल्या आहेत. ‘क्रौंचवध’ या कादंबरीला काही मर्यादा पडलेल्या असल्या तरी, भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या उज्ज्वल कालखंडातील जीवनप्रेरणांचे, तत्कालीन मध्यमवर्गीय तरुण-तरुणींच्या हृदयतरंगांचे काही प्रमाणात येथे दर्शन घडते. मराठी कादंबरी विश्वातील ‘क्रौंचवध’ या कादंबरीचे स्थान महत्त्वाचे मानावे लागेल.
खांडेकरांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना राज्य शासन, साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ असे चढत्या श्रेणीने पुरस्कार लाभले. लौकिकदृष्ट्या हे सन्मान गौरवास्पद आहेतच. पण अलौकिक क्षण कोणता असेल बरं? यमूच्या रूपाने स्त्रीदु:खाला वाचा फोडणारे समाजमनस्क कादंबरीकार हरी नारायण आपटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या पत्नी रमाबाई आपटे यांनी ठेवलेले ‘कै. ह. ना. आपटे पारितोषिक 1942’ खांडेकरांना त्यांच्या ‘क्रौंचवध’ या कादंबरीस मिळाले. याहून समुचित बाब अन्य काय असू शकेल? त्यांच्या आनंदाश्रमातून रमाबाईंनी हे पारितोषिक स्वीकारावे म्हणून 26 मे 1943 रोजी पत्र लिहिले. ते पत्र अत्यंत हृदयस्पर्शी होते.
वि. स. खांडेकरांच्या कादंबरीविश्वाचा धांडोळा घेतला असताना ‘मानवतेचा नंदादीप विझू देऊ नका.’ हे अंत:सूत्र आढळते. माणसाने कसे आणि कुणासाठी जगावे याचा मूलमंत्रच येथे अधोरेखित झाला आहे. ‘जगा आणि अर्थपूर्ण जगा’ अशी आशावादाची धून या उद्गारांमधून ध्वनित झालेली आहे.
- डॉ. सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा.
somnathpant@gmail.com
(लेखक मराठी साहित्य समीक्षक असून त्यांनी गोवा विद्यापीठात मराठी विभागप्रमुख पदावरून काम पाहिले आहे.)
Tags: सोमनाथ कोमरपंत वि. स. खांडेकर Literature Marathi Somnath Komarpant Vi Sa Khandekar V. S. Khandekar Load More Tags
Add Comment