सृष्टीचे रंगविभ्रम तन्मयतेने रेखाटणारा कवी

बालकवी यांच्या 130व्या जयंतीनिमित्त...

बालकवी हे उत्कट संवेदनशीलता लाभलेले मराठीतले श्रेष्ठ कवी. त्यांच्या उन्मेषशालिनी प्रतिभेचे दिव्य स्फुरण त्यांच्या निसर्गकवितेत आढळते. त्यांच्या कवितेत निरागसता, सौंदर्यशाली मन आणि शब्दकळेतली भावकोमलता यांचा स्वरसंगम आढळतो. शिवाय सत्‌, चित्‌ आणि आनंद या त्रिपुटीची एकात्मता त्यांच्या कवितेत आहे. 

बालकवींचा जन्म 13 ऑगस्ट 1890 रोजी झाला आणि 5 मे 1918 रोजी वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी त्यांनी अकाली या जगाचा निरोप घेतला. ते आपल्यातून जाऊनही एका शतकाहून अधिक काळ लोटला आहे. या शतकभराच्या कालावधीत मराठी कविता अनेक अंगांनी बदलत गेली. नवनव्या विचारप्रवाहांनुसार तिने कितीतरी वळणे घेतली. काव्यभाषा बदलली तरीही बालकवींची लावण्यमय कविता ताजी टवटवीत राहिली. हे लावण्य त्यांच्या कवितेतल्या केवळ बाह्यांगाचे नाही... ते अंतरंगाचेही होते. मराठी कवितेतील कवितेतली सौंदर्यवादी धारा सशक्त करण्याचे फार मोठे श्रेय बालकवींना जाते.

बालकवी हे मराठी कवितेला पडलेले एक स्वप्न होते असे म्हणण्याचा मोह होतो. अर्थात हा विचारही बालकवींच्या आशय-अभिव्यक्तीच्या अभिन्नत्वातून मनात निर्माण होतो. कवी हा जन्मावा लागतो असे म्हणतात. अशी उपजत कवित्वशक्ती घेऊनच बालकवी आले होते. आपल्या आयुष्यात भव्य-दिव्य मंगलाचे जे नक्षत्रांचे देणे होते ते अंतःप्रेरणेने देऊन ते आपल्यातून निघून गेले. 

175 कवितांची ओंजळ त्यांनी मराठी काव्यरसिकांसमोर रिती केली आहे. ही अम्लान कविता म्हणजे मराठी काव्यशारदेचे वैभवलेणे आहे. आपल्या भावभावनांचे संक्रमण सहजतेने रसिकांच्या मनात करण्याची किमया बालकवींना साधलेली आहे... म्हणूनच रसिकहृदयात त्यांच्या कवितेला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. साऱ्या विश्वात सौंदर्य भरलेले आहे. स्वार्थाच्या बाजारात किती तरी पामर रडतात. रडोत बिचारे! त्यांना आनंद कोठून मिळणार? शेवटी आनंद वाटणाऱ्याला आनंद मिळणार. ही साक्षात्कारानुभूती त्यांना वयाच्या विसाव्या वर्षी झाली होती हे विशेष.

बालकवींची समग्र कविता हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. बालकवींचा अंतरंगशोध आजवर अनेक अभ्यासकांनी त्यांच्या कवितांच्या आधारे साकल्याने केलेला आहे. प्रा. एस. एस. नाडकर्णी यांनी 1918 ते 1990 या काळातल्या बालकवी समीक्षेचा मागोवा घेणारा ‘बालकवी-समीक्षा’ हा ग्रंथ संपादित केला.

बालकवींच्या एकूण कवितांपैकी बहुतांश कविता निसर्गविषयक आहेत. निसर्ग जसा दिसतो तसा रेखाटणे हे कवीचे काम नव्हे. तो द्रष्टा आणि स्रष्टा असावा लागतो. कवित्वशक्तीबरोबरच त्याला चित्रकाराची दृष्टी लागते. रंग, रेषा आणि बिंदू यांचे महत्त्व चित्रकलेत असतेच. शिवाय रंगानुभूतीमध्ये दृश्य स्वरूपाच्या रंगांबरोबर अमूर्त रंगांचे रसायन साधण्याची किमया असावी लागते. बालकवींच्या नवनिर्माणक प्रतिभेत कवित्वशक्तीबरोबर चित्रकाराची कुशलता मिसळलेली आहे असे जाणवते. बालकवींची कविता शब्दशक्तीमध्ये रमणाऱ्या रसिकाला आवडते तशीच ती जी. ए. कुलकर्णी यांच्यासारख्या प्रतिभावंतालाही भावते ती यामुळेच. अंतर्दृष्टीने निर्मिलेली बालकवींची सृष्टिचित्रे चित्ताला प्रसन्नता प्राप्त करून देतात, चैतन्य निर्माण करतात.

प्रत्येक वस्तुजातामध्ये सौंदर्यविलास कसा प्रकट होतो हे बालकवींनी मर्मदृष्टीने सांगितले आहे... 

    वस्तुवस्तुमधिं काव्य विलसतें;
    श्रवणीं नयनीं हृदयीं उतरुनि
    पूर्ण करी जें जड जीवातें
    बाह्य वेष जरि सुंदर धरितें;
    मंजुगीत त्यामधुनी स्फुरतें;
    दिव्य अहा मग ते अवतरतें

बालकवींच्या निसर्गकवितेत दिव्यत्वाचा जसा स्पर्श आहे... तसाच आनंदाचा अंतर्नाद ऐकू येतो. पार्थिव-अपार्थिवाच्या संगमक्षणी मानवी वृत्तिप्रवृत्तींचे संमोहन त्याला जाणवते. ‘अरुण’ या कवितेत ते म्हणतात...

    पूर्व दिशा मधु मृदुल हांसते गालींच्या गालीं
    हर्षनिर्भरा दिशा डोलती या मंगल कालीं

बालकवींचा निर्झर बालरूपातच प्रकट होतो... कारण कविप्रवृत्तीचे ते दुसरे रूप असते. पुन्हा या दोहोंमध्ये एकात्मता आढळते.

    हांस लाडक्या नाच करी
    बालझरा तूं बाळगुणी,
    बाल्यचि रे भरिसी भुवनीं

बाल्य म्हणजे आनंद असे बालकवींना मनोमन वाटते. निर्झर हा काव्यदेवीचा प्राण आहे असे त्यांना वाटते. ‘तृणपुष्प’ या कवितेत तृणपुष्पास उद्देशून ते म्हणतात...

    सदैव सस्मित, सदैव अपुला डोलत तूं असतोस,
    दुःखसृष्टी कधी स्पर्शिली नाहीं तव चित्तास

पुढे ते त्याला विनवतात...

    तृणपुष्पा चल, तुज कवितेच्या ठेवीन उद्यानांत
    सख्या रहा तूं तिथे निरंतर, रंजव माझे चित्त

मनाच्या बाल्यवृत्तीबरोबरच आनंद, सौंदर्य आणि परिपूर्णता यांच्या गुणसंगमाला बालकवी प्राधान्य देतात...

    प्रतिभेच्या सौधावरुनी । मरुद्‌गणांवरती चढुनी;
    अनंतात गगनीं उडुनी । लीन बनुनि वातावरणीं;
    होउनियां सौंदर्यधनी । गुंजारव मंजुळ गाणी;
    ब्रह्मांडाची सदाफुली । अक्षयतेमध्ये फुलली 
                                        (कवीची इच्छा)

निसर्गाच्या सान्निध्यात परिपूर्ण जीवन जगण्याचा ध्यास बाळगणाऱ्या या कवीच्या ‘शारदेस’ या कवितेत त्याच्या जीवनधारणेचे प्रतिबिंब आढळते...

    निर्झरमय, काननमय, गायनमय दिव्य जाहला देह,
    सृष्टीचेही पुरेना विचराया स्वैर त्याजला गेह,
    मग गूढ अमूर्ताची मधुगीते गोड गावया लागे
    आनंदरूप झाली मानवता, मृत्यू राहिला मागे

निसर्गाचे वास्तववादी चित्र रेखाटणाऱ्या आठ ओळींच्या ‘औदुंबर’ या कवितेत चित्रकाराची सौंदर्यदृष्टी आणि कवीची शब्दशक्ती यांचा गुणसंगम झालेला आहे. साध्यासुध्या शब्दांतून केवढा मोठा अवकाश कवीने व्यापलेला आहे! नितांतरमणीय परिसराचे चित्रमय वर्णन इथे कवीने केले आहे. दोन्ही तटांना पसरलेला हिरवाईचा प्रदेश... बेटाबेटांतून वाहणारा निळसर काळा झरा... पलीकडे दिसणारे दूरवरची घरे... हिरव्या शेतमळ्यातली दाटीवाटी... शेतमळ्याच्या हिरव्या कुरणातून आडवीतिडवी पडलेली, काळ्या डोहाकडे चाललेली पांढरी पाऊलवाट... काळा डोह... आणि डोहाच्या काठावर औंदुबर वृक्षाच्या सावलीमुळे डोहाच्या पाण्याच्या पृष्ठभागावर पसरलेली काळसर छटा... हे सृष्टिचित्र दृग्गोचर होते.

अनेक समीक्षकांनी ‘पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर’ या शेवटच्या ओळीमुळे अनेक अन्वयार्थ लावले आहेत... पण एखाद्या कुशल चित्रकाराने काढावे तसे हे विशुद्ध निसर्गचित्र आहे... असे मानले तर?

निसर्गाची वास्तव चित्रे रेखाटण्यात बालकवी कुशल आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या उत्तुंग कल्पनाविलासाची अगणित उदाहरणे त्यांच्या कवितांत शोधता येतील. या दृष्टीने ‘फुलराणी’ या कवितेचा उल्लेख पहिल्यांदा करावा लागेल. बालकवींच्या प्रतिभाशक्तीचे आणि भावकोमल शब्दकळेचे ते नितांत रमणीय रूप आहे. बालकवींच्या सौंदर्यदृष्टीचे, जीवनदृष्टीचे आणि उत्कट ध्यासाचे चित्र ‘बाल-विहग’ (अष्टदिशांचा गोफ) या कवितेत उमटलेले आहे...

    सुंदरतेच्या सुमनांवरचें दंव चुंबुनि घ्यावें,
    चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हांत हिंडावें
    प्रीतिसारिका गीत तियेचें ऐकावें कानीं
    बनवावें मन धुंद रंगुनी काव्यसुधापानीं

‘अरुण’, ‘मधुयामिनी’, ‘संध्या-रजनी’, ‘तारकांचे गाणे’, ‘संध्यातारक-1’, ‘संध्यातारक-2’, ‘श्रावणमास’, ‘फूलपांखरूं फुलवेली’, ‘शारदीय सौंदर्यदेवता’, ‘सृष्टी’, ‘गवताचे गाणें’, ‘डोंगर सुंदर दूरदूरचे बाई’, ‘हिरवळ गडे ही हिरवी’, ‘आनंदी प्रवासी’, ‘अप्सरांचे गाणें’, ‘माझा लहानसा बाग’, ‘बाळें ती खेळत होती’, ‘कविबाळें’ आणि ‘वनमाला’ या कविता या दृष्टीने उल्लेखनीय आहेत.

‘अरुण’ ही बालकवींची बहुचर्चित कविता. उदयाचलावरील सूर्याचे आणि त्या वेळी आभाळात पसरलेल्या रंगविभ्रमांचे त्यांनी समरसतेने वर्णन केले आहे:...

    अरुण चितारी, नभःपटाला रंगवितो काय?
    प्रतिभापूरित करी जगाला कीं हा कविराय?
    कीं, नव युवती उषासुंदरी दारीं येवोनी
    रंगवल्लिका रम्य रेखिते राजस हस्तांनी?
    दिवसयामिनी परस्परांचे चुंबन घेतात-

अनेक काव्यगुणांनी हे कल्पनाचित्र मंडित झालेले आहे. यात उपमा-उत्प्रेक्षा आलेल्या आहेत. चेतनागुणोक्तीचे उत्तम उदाहरण म्हणून या कवितेचा निर्देश करता येईल. ‘रंगवल्लिका रम्य रेखिते राजस हस्तांनी?’ या ओळीत आलेला अनुप्रास चित्तवेधक वाटतो. निसर्गरूपाशी कवी किती तादात्म्य पावतो,हे इथे अनुभवण्यासारखे आहे. निसर्गाच्या अपार्थिव सौंदर्याशी बालकवींनी साधलेली समरसता ही मराठी काव्यविश्वातली अपूर्व चीज आहे.

सूर्यास्तकालीन संध्याराग न्याहाळत असताना कवीच्या मनात कल्पनेचे तरंग उमलतात. त्या घटिकेचे वर्णन कवी संवादात्मक शैलीत करतो. या संवादातला लडिवाळपणा बघण्यासारखा आहे. 

    गेला, झाला दृष्टिआडही सूर्य, तरी अजुनी
    पहा चमकते प्रेमपताका पश्चिम दिग्वदनीं
    थक्क होउनी दिशा म्हणाल्या, ‘‘काय मोहिनी ही!
    प्रेम-समाधी अजुनि खुळीची या उतरत नाही!
    किती पश्चिमे! आता त्याचे चिंतन करिशील?
    दृष्टी लावुनि अशीच बसशिल सांग किती वेळ?
    खिन्नपणा हा पुरे! पुरे ग अश्रूंची माळ!
    उद्यां बरं का तो राणीला आपुल्या भेटेल!’’  
                                     (संध्या-रजनी)

बालकवींच्या निसर्गकवितेत शब्दांच्या कोमलतेबरोबरच भावभावनांची सुकुमारता आढळते. या दोन्ही बाबी एकाच वेळी हातात हात घालून वावरत असतात. या शब्दांच्या पदन्यासामुळे निर्माण होणारी लय मनाला प्रसन्न करणारी आहे...

    मधुयामिनी नील-लता
    हो गगनीं कुसुमयुता
    धवलित करि पवनपथा
    कौमुदि मधुमंगला
    दिव्य शांति चंद्रकरीं
    आंदोलित नील सरी
    गिरिगिरिवरी, तरुतरुवरि
    पसरी नव भूतिला    
                    (मधुयामिनि)

कविता ही विश्लेषण करण्याची, पाकळीन्‌पाकळी उलगडून पाहण्याची चीज नसून गुणसमुच्चयाने तिचा सुगंध घेण्याची चीज आहे हे इथे उमगते. बालकवींच्या निसर्गकवितेत पंचसंवेदनांना नवे नेत्र फुटतात. विस्मयभारित होऊन आपण या नव्या सृष्टीकडे बघतच राहतो. इथे कवितेने काही शिकवायचे नसते, रिझवायचे नसते. तिच्या आकंठ सेवनाने जाणिवा आपोआप प्रगल्भ होतात. संवेदनाप्रवाह खळाळत जातो. बालकवींच्या निसर्गकवितांमध्ये अशी किती अधोरेखने करावीत?

    फिकट निळीने रंगविलेला कापुस मेघांचा
    वरुनि कुणी गुलजार फिरविला हात कुसुंब्याचा
    त्यांतहि हंसली मंदपणे ती चंद्रकला राणी
    कडेकडेच्या मेघांवर ये मोत्यांचे पाणी
    इंद्र निळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला
    मधुन जलाची शुभ्र शोभते ती मोहनमाला
    चौबाजूला थाट दाटला हा हिरवळीचा  
                                   (मेघांचा कापूस)

हे अलवार क्षणचित्र थबकून पाहावे. इतक्यात शुभ्र फुलांची मूस दिसावी असे दुसरे क्षणचित्र समोर येते...

    थबथबली, ओथंबुनि खालीं आली
    जलदाली मज दिसली सायंकाळीं
    रंगहि ते नच येती वर्णायातें!
    सुंदरता मम त्यांची भुलवी चित्ता
    व्योमपटीं जलदांची झाली दाटी;  
                                 (पाऊस)

बालकवींनी ‘श्रावणमास’ ही कविता लिहून एक शतक लोटले. त्यानंतर कितीतरी श्रावणमास आले-गेले. श्रावणावरच्या अगणित कविता मराठीत झाल्या... परंतु... बालकवींच्या ‘श्रावणमास’ या कवितेतल्या क्षणचित्रांचा विसर मराठी मनाला आजही पडलेला नाही. बालकवींच्या शोधक नेत्रांनी श्रावणातल्या सौंदर्याच्या उन्मेषांचे चित्र टिपलेले आहे... त्याला तोड नाही. तरल मनोवृत्तीने आणि शब्दांची समाधी लावून सृष्टीच्या प्रत्येक घटकाचा सौंदर्यपूर्ण आविष्कार बालकवींनी इथे केला आहे. सर्वांगपरिपूर्ण असे हे निसर्गचित्र आहे.

श्रावण महिन्यातला लोकमानसातला हर्ष आणि चोहीकडे पसरलेली हिरवळ यांच्यातली समतानता बालकवींनी टिपली आहे. क्षणात येणारे सरसर शिरवे... क्षणात फिरून पडणारे ऊन... आभाळातल्या इंद्रधनूचा दुहेरी गोफ... जणू नभोमंडपातले मंगल तोरणच! सूर्यास्त झाला आहे असे वाटत असतानाच उघडलेली सांज... तरुशिखरांवर, उंच घरांवर पडलेले पिवळे-पिवळे ऊन... मेघांवर उठलेले अनंत संध्याराग... सर्व नभावर रेखिलेले सुंदरतेचे महान रूप....

या सौंदर्यपूर्ण महिरपीवर बालकवींनी अप्रतिम चित्रमालिका निर्माण केली आहे.

    बलाकमाला उडतां भासे कल्पसुमांची माळचि ते
    उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलांची की एकमतें!
    फडफड करुनि भिजले अपुले पंख पांखरें सांवरितीं
    सुंदर हरिणी हिरव्या कुरणीं निजबाळांसह बागडती

सृष्टीचे हे रंगविभ्रम तन्मयतेने रेखाटत असताना नागरी जीवनाला आणि परिसराला बालकवी विसरलेले नाहीत हे आणखीन एक वैशिष्ट्य.

कल्पनाविलासाच्या सामर्थ्याने अभिनव सृष्टी निर्माण करणे हा बालकवींचा प्रतिभाधर्म होता; पण तो केवळ कल्पनाविलास नव्हता. स्वप्न-वास्तवाची नाजूक वीण त्यांच्या आशयात होती. बालकवींचे व्यक्तिमत्त्वच मुळी स्वप्न-वास्तवाच्या हिंदोळ्यावर झोके घेणारे होते... त्यामुळे त्यांचे हृदयतरंग कवितेत जसेच्या तसे उमटले. अभिव्यक्तीच्या वाटांची प्रतीक्षा त्यांना कधी करावी लागली नाही. अनुभवांच्या प्रक्षेपणाचा वेग-आवेग, उतटता-उत्कटता सारे काही त्यांच्या शब्दसृष्टीत सहजतेने अवतरले. त्यांना कुठेही आटापिटा करावा लागला नाही. ‘झरा हा मूळचाच खरा’ याची प्रचिती बालकवींच्या शब्दाशब्दांतून येत राहते. कविता हा अंतःकरणातला उद्‌गार मानला जातो. बालकवींचा श्वास आणि निःश्वास कवितेसाठी होती. बालकवींना अभिप्रेत असलेले प्रेयस कदाचित मिळाले नसेल. ते ओरखडेही त्यांच्या कवितेत उमटले आहेत... पण...

    सत्याची स्वप्नें व्हावीं । सत्याला स्वप्ने यावीं
    स्वप्नींहीं स्वप्नें बघत । स्वप्नांतच व्हावा अंत

असे म्हणणारे बालकवी निरंतर श्रेयसाच्या शोधात होते. ते श्रेयस त्यांना निसर्गात गवसले याचा प्रत्यय त्यांच्या कवितेतून येतो.

- डॉ. सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा.
somnathpant@gmail.com

Tags: साहित्य मराठी कविता बालकवी सोमनाथ कोमरपंत व्यक्तिवेध Somnath komarpant Balkavi Poems Marathi Load More Tags

Comments: Show All Comments

नंदकिशोर लेले

बालकवींच्या कवितेतील विविध सौन्दर्य छटा, मन थक्क करुन टाकणारे आविष्कार लेखातून अगदी अलगद आणि हळूवार पणे उलगडून दाखविले आहेत. लेख संपूच नये असंच वाटतं राहत. कवी आणि चित्रकार अशी दोन्ही रूपे उत्तम रित्या समजावून सांगितल्याने बालकवी याचे पूर्ण काव्य कधी वाचेन अशी ओढ निर्माण झाली. .अतिशय कमी आयुर्मान लाभलेला हा कवी काव्यविश्व किती समृद्ध करून गेला हेच या लेखातून कळते। सर ,कवी समजावून घ्यायला आपल्या लेखाचं खूपच उपयोग होतो ।शतशः धन्यवाद!

Nitin Palkar

बालकवींंच्या कवितेचे अतिशय सुंदर रसग्रहण

शमीम पटेल

बालकवींचा संपूर्ण प्रतिभाशाली जीवनपट आपण काव्याच्या पंचअंगांना स्पर्श करुन अलगत उलघडला. अवघ्या 28 वर्षाचे आयुष्य लाभले बालकवींना ...पण या अल्प कालावधीत बालकवींनी काव्यलतिकेची वेल आकाशावर पोहोचवली......

भाऊसाहेब गोरे

बालकविंच्या कविता वाचून मनाला आनंद वाटला. बालकवी यांना भावपूर्ण आदरांजली

रामचंद्र आंगणे

अप्रतिम आदरांजली

SHIVAJI PITALEWAD

अप्रतिम. आदरांजली!!

Umesh Madhukar Kunde

खुप छान शब्दांकन

नरेंद्र महादेव आपटे

बालकवि, रा ग गडकरी, माधव ज्युलिअन ही तीन वेगवेगळ्या प्रवृृतीचे प्रतिभावंत पण त्यांच्यातील एक विलक्षण समानधागा तो अति अल्प वा अल्प आयुष्याचा. हे असे का होत असावे बरे?

Anup Priolkar

Nice article on poems of Balance. Sir has given justice to his poems even after his birth of 130 years.

Add Comment