वज्रनिर्धाराची भूमिका घेणारा मातृहृदयी...

साने गुरुजींच्या 121व्या जयंती निमित्त...

साने गुरुजींनी खडतर जीवनसाधना करत असताना ज्ञानसाधना केली... पण ही ज्ञानसाधना हस्तिदंती मनोऱ्यात बसून केलेली नव्हती. जनसामान्यांची सेवा करत असतानाच त्यांनी ज्ञानकण वेचले. लेखणीच्या लालित्यापेक्षा झाडूचे लालित्य श्रेष्ठतम असल्याचे मानत त्यांनी जीवनातील अमांगल्याविरुद्ध, विरुपतेविरुद्ध लेखणी परजली. परिपूर्णतेचा ध्यास बाळगणारा हा अस्वस्थ आत्मा होता. या अस्वस्थतेची, अशांततेची निःश्वसिते त्यांच्या लेखनातून दृग्गोचर होतात.

साने गुरुजींची करुणामय मूर्ती डोळ्यांसमोर येताच त्यांचे समाजमनस्क आणि समर्पणशील व्यक्तिमत्त्व आठवायला लागते. आईची ममता असलेला त्यांच्यासारखा ऋजू अंतःकरणाचा लेखक त्यांच्यानंतर शतकभरात झाला नाही असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. मराठीत लिहिणारे लक्षावधी सर्जनशील साहित्यिक आहेत... पण साने गुरुजींच्या लेखणीचे आणि तिच्यातून उतरलेल्या शैलीचे अनन्यसाधारणत्व हृदयाला भिडणारे आहे. प्रखर बुद्धिमत्ता, भावनोत्कटता आणि राष्ट्रभक्ती ही त्यांच्या मनःसृष्टीची विलोभनीय रूपे.

आपल्या ध्येयवादी वृत्तीने त्यांनी ‘धडपडणारी मुले’ घडवली. या धडपडणाऱ्या मुलांनी फक्त महाराष्ट्राचाच राजकीय, सामाजिक, वाङ्‌मयीन आणि सांस्कृतिक इतिहास केवळ निर्माण केला नाही... तर राष्ट्रपातळीवर आघाडीवर राहून सर्वच क्षेत्रांत नेतृत्व केले. त्यांपैकी थोड्यांचाच उल्लेख करणे प्रशस्त ठरणार नाही. साधनशुचितेचा मार्ग स्वीकारून जीवनसाधना करणे यात साने गुरुजींनी इतिकर्तव्यता मानली. यशःसिद्धीची वाट पाहिली नाही. गीतेतील कर्मयोग खऱ्या अर्थाने ते जगले. ‘गीताहृदय’ त्यांनी जाणले... म्हणूनच ‘भारतीय संस्कृती’चा आधुनिक भाष्यकार अशी तेजस्वी प्रतिमा त्यांनी त्यांच्या कृतिशीलतेतून आणि सर्जनशीलतेतून जनमानसात निर्माण केली.

साने गुरुजींच्या करुणामय डोळ्यांतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होई. ते आपल्यामधून निघून गेले या घटनेला सत्तर वर्षे लोटली... पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू सर्वांना आठवतात. निष्ठावंत शिक्षक, त्याहून अधिक असलेले समाजशिक्षक, सर्जनशील साहित्यिक, कवी, लोकसाहित्याचे अभ्यासक, देशभक्त, समाजपुरुषाची समर्पणशील वृत्तीने सेवा करणारे कृतिशील विचारवंत, उत्तम अनुवादक, संपादक आणि निष्कलंक चारित्र्य असलेले महामानव म्हणून ते सर्वज्ञात झाले.

मराठी साहित्यक्षेत्रात विशुद्ध सात्त्विकतेचा आणि ऋजुतेचा नंदादीप गुरुजींनी निरंतर तेवत ठेवला. आपल्या विचारदर्शनाने तत्कालीन पिढीला त्यांनी मंत्रमुग्ध केले. ज्योतीने ज्योत प्रज्वलित करावी त्याप्रमाणे या ध्येयमूर्तीच्या प्रेरणेने अनेक ध्येयमूर्ती निर्माण झाल्या. या ज्ञानयोगी आणि कर्मयोगी पुरुषाच्या परीसस्पर्शाने अनेकांच्या जीवनात आदर्श निर्माण झाला. जीवनाची वाटचाल योग्य दिशेने करण्याचा मंत्र जनसामान्यांना मिळाला.

दापोली तालुक्यातील पालगड गावी 24 डिसेंबर 1899 रोजी साने गुरुजींचा जन्म झाला आणि 11 जून 1950 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण भारतीय संस्कृतीतील जीवनमूल्यांच्या संस्कारांमधून झालेली होती. त्यांचे बाळकडू त्यांना त्यांच्या मातेच्या प्रत्यक्ष आचरणातून लाभलेले होते. पुढे तर तो त्यांच्या अनन्यसाधारण निष्ठेचा आणि निदिध्यासाचा विषय झाला. आचार्य अत्रे यांच्यासारख्या सिद्धहस्त, सव्यसाची साहित्यिकाला आणि शब्दप्रभूला ‘श्यामची आई’ हे ‘मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र’ वाटले. साने गुरुजींच्या प्रतिमेसमोर आणि प्रतिभेसमोर ते नम्र झाले. विनोबाजींसारख्या श्रेष्ठ प्रज्ञावंताने गुरुजींना ‘अमृताचा पुत्र’ असे संबोधले. नानासाहेब गोरे यांनी लिहिलेले ‘स्वप्न-भाषण’ आणि प्रा. वसंत बापट यांचे ‘सायीचे हात’ आणि ‘गायीचे डोळे’ हे लेख चिररुचिर स्वरूपाचे. साने गुरुजींविषयी बोलताना पु.ल. देशपांडे आणि प्राचार्य राम शेवाळकर यांची रसवंती फुलून आलेली अनुभवली. डॉ.विद्याधर पुंडलिकांनी ‘आवडलेल्या माणसां’मध्ये साने गुरुजींची गणना केली. साने गुरुजींच्या वाणीतून आणि लेखणीतून मराठी मन बोलत होते. भारतीय आत्मा व्यक्त होत होता.

साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वात जशी भावकोमलता होती... तशीच वज्रकठोरताही होती. ‘मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदू ऐसे।’ ही तुकारामांची उक्ती त्यांच्या बाबतीत अर्थपूर्ण ठरावी. या त्यांच्या गुणविशेषाचे दर्शन वेळोवेळी घडत राहिले. साने गुरुजींचे व्यक्तिमत्त्व संघर्षाच्या मुशीतून घडलेले होते. खडतर परिस्थितीवर मात करून त्यांना विद्यार्जन करावे लागले. एम.ए.ची पदवी त्यांनी प्राप्त केली. पैशाचे प्रलोभन न बाळगता शिक्षकी पेशा पत्करला... पण तो व्यवसाय न मानता जीवनाचा वसा मानला. आजन्म बालब्रह्माची उपासना केली. तन्मयता हा त्यांचा मनोधर्म होता. मुलांमध्ये मूल होऊन त्यांच्या भावभावनांशी ते एकरूप होत. त्यांना गोष्टी सांगत. गोष्टीतून देशभक्तीचे, सेवाभावी वृत्तीचे संस्कार करत.

‘करी मनोरंजन जो मुलांचे ।
जडेल नाते प्रभूशी तयाचे ।’

हे त्यांच्या जीवनाचे सूत्र होते. त्या सूत्राविषयी संपूर्ण आयुष्यात त्यांनी अविचल निष्ठा बाळगली. त्यांचे हात सदैव शुभंकर आणि सर्जनशील राहिले. एक पाय तुरुंगात आणि दुसरा पाय बाहेर असताना निर्मितिशीलता भंगू दिली नाही. बालपण संघर्षात आणि तारुण्यही संघर्षात... पण कोणत्याही प्रकारचा कडवटपणा त्यांच्या अंतरंगाला स्पर्श करू शकला नाही. ‘पद्मपत्रमिव अम्भसा’ असाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करावा लागेल. या कमळाची प्रत्येक पाकळी टवटवीत आणि मृदू स्पर्शाची होती.

साने गुरुजींनी कर्मठपणाविरुद्ध, चातुर्वर्ण्याविरुद्ध, जातीयतेविरुद्ध आणि विषमतेविरुद्ध लढा दिला. कृतिशीलतेने, वाणीमधून आणि लेखनातून धार्मिक नि सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी स्वधर्मीयांविरुद्ध लढणे अथवा परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी लढणे हा साने गुरुजींच्या दृष्टीने मानवमुक्तीचा मार्ग होता. तो निष्कंटक करण्यासाठी वज्रनिर्धाराची भूमिका अनेकदा त्यांना स्वीकारावी लागली. पंढपूरच्या विठोबाच्या मंदिरात दलित बांधवांना प्रवेश दिला जात नव्हता म्हणून साने गुरुजींनी उपोषण सुरू केले. वंदनीय असलेल्या महात्मा गांधींचा आमरण उपोषण सोडण्याचा सल्ला त्यांनी मानला नाही. तत्त्वाशी तडजोड करायची नाही असा त्यांचा बाणा होता. या ‘पांडुरंगा’ला साथ देण्यासाठी दुसरे ‘पांडुरंग’ (सेनापती बापट) येऊन उपोषणाला बसले. त्यांच्या या अविचल निष्ठेत ‘अद्वैत’ होते. शेवटी मंदिरातील पांडुरंगाला जनता जनार्दनासाठी आपले द्वार खुले करावे लागले. हा शेवटी ध्येयनिष्ठेचा विजय होता.

साने गुरुजींनी खडतर जीवनसाधना करत असताना ज्ञानसाधना केली... पण ही ज्ञानसाधना हस्तिदंती मनोऱ्यात बसून केलेली नव्हती. जनसामान्यांची सेवा करत असतानाच त्यांनी ज्ञानकण वेचले. लेखणीच्या लालित्यापेक्षा झाडूचे लालित्य श्रेष्ठतम असल्याचे मानत त्यांनी जीवनातील अमांगल्याविरुद्ध, विरुपतेविरुद्ध लेखणी परजली. परिपूर्णतेचा ध्यास बाळगणारा हा अस्वस्थ आत्मा होता. या अस्वस्थतेची, अशांततेची निःश्वसिते त्यांच्या लेखनातून दृग्गोचर होतात. मिळवलेले ज्ञान कडीकुलपात ठेवायचे नाही, ते अहंकारासाठी नाही. ती समाजसेवेची दीक्षा आहे याचे आत्मभान साने गुरुजींना होते. भारतीय संस्कृतीचे ते निस्सीम उपासक होते. त्यांच्या जीवनधारणेला तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाची बैठक होती. अंमळनेरच्या तत्त्वज्ञान मंदिरात तत्त्वज्ञान हा विषय घेऊन अभ्यास करत असताना ‘छात्रालय दैनिक’ हे हस्तलिखित त्यांनी सुरू केले. संवेदनक्षम वयात स्वदेशीचे महत्त्व त्यांना पटले. त्यांनी खादी परिधान केली. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे आपले ब्रीद सर्वांच्या प्रत्ययास आणून दिले. या संस्मरणीय क्षणांचे रेखांकन ‘मृगाजिन’ या त्यांच्या पुस्तकात त्यांच्या जीवनपटातील आहे. 

आचार्य स.ज. भागवत यांच्याशी गाठभेट झाल्यानंतर साने गुरुजींनी प्रार्थनागीत लिहिले. मराठी, इंग्लीश, हिंदी, संस्कृत आणि बंगाली या भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळवले. अंमळनेरला त्यांनी अध्यापनक्षेत्रात सहा वर्षे घालवली. ‘खरा धर्म’ ही कविता त्यांना तुरुंगवासात स्फुरली. मानवताधर्माचा प्रसार करणारा हा ज्ञानयोगी आपल्या राष्ट्राचे पारतंत्र्य बघून तळमळत होता. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या सत्याग्रहाच्या चळवळीत साने गुरुजींनी निष्ठेने आणि सातत्याने भाग घेतला. ‘देशभक्ता प्रासाद बंदिशाला’ हे कवितेतील अवतरण साने गुरुजींच्या जीवनयात्रेला शब्दशः लागू पडणारे आहे. साने गुरुजींना ऐन तारुण्यात तुरुंगवासात राहावे लागले. धुळ्याला, धुळ्याच्या तुरुंगातून नाशीकच्या तुरुंगात, नाशीकच्या तुरुंगातून पुन्हा धुळ्याला, एरंडवण्याला आणि त्रिचनापल्लीला अशी भ्रमंती या निष्ठावंत देशभक्ताला करावी लागली. कष्टप्रद दिवसांत गांधीजी आणि विनोबाजी ही उपास्य दैवते मानून साने गुरुजींनी तुरुंगाचे मंदिर केले. ज्ञानसाधनेचे केंद्र केले. निसर्गाशी नित्य संवाद साधला. लेखनाद्वारे जनमानसाशी संवाद साधला.

तुरुंगवासात साने गुरुजींनी शुद्ध, सात्त्विक आणि लखलखीत स्वरूपाची साहित्यनिर्मिती केली. मराठी साहित्यसंपदेत साने गुरुजींच्या साहित्याचे शाश्वत मूल्य काय असा प्रश्न पढीक विद्वान समीक्षक विचारतात... पण साने गुरुजींनी देशप्रेमाने रसरसलेली सकस माणसे त्यामधून निर्माण केली. हे मूल्य नगण्य नव्हे. समकालीन साहित्यधारेत साने गुरुजींची काहीशी उपेक्षा झाली हे खरे आहे... पण गुणग्राहक समाजमानसाने हे साहित्य आपले मानले. साने गुरुजींच्या जीवनातील सुवर्ण त्यांच्या जिवंतपणीच ओळखले हेही तेवढेच खरे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात अल्पावधीनंतर भ्रमनिरासाचे, वैफल्याचे आणि वैतागाचे पर्व सुरू झाले. सर्व ज्योती विझू विझू झाल्या... त्यामुळे तर स्वयंतेजाने तेवणाऱ्या साने गुरुजींसारख्या पणतीचे तेज समाजमानसाला अधिकच देदीप्यमान वाटायला लागले.

साने गुरुजींच्या या वाङ्‌मयाचे नेमके बलस्थान कोणते होते? केवळ भाषासिद्धी होती का? केवळ प्रतिभाविलास होता का? कल्पनेची कारंजी होती का? भाषिक अलंकारांनी ते नटलेले होते का? विचारांचे सामर्थ्य आणि आशयसंपन्नता हेच त्यांच्या श्रेष्ठत्वाचे गमक होते का? उत्कृष्ट साहित्याला आवश्यक अशी सर्व अंगोपांगे त्यात होतीच... शिवाय त्यांनी तन्मयतेने प्रकट केलेली त्यांच्या आत्म्याची स्पंदने हा तत्कालीन तरुणाईचा आत्मस्वर झाला. नंतरच्या पिढ्यांसाठी तो दीपस्तंभ ठरला.

धुळ्याच्या तुरुंगात त्यांनी ‘स्वातंत्र्याचे शिपाई’ ही कविता लिहिली. नाशीकच्या तुरुंगात ‘माझे ध्येय’ ही कविता लिहिली. त्यांच्या निरागस मनाचे प्रतिबिंबस्वरूप असलेल्या कवितांचा संग्रह ‘पत्री’ या नावाने मराठी शारदेच्या सेवेसाठी रुजू झाला. आईच्या ओठांवरील ओव्या त्यांनी लिहून काढल्या. ‘स्त्रीहृदय’च्या रूपाने त्या काळात लोकगीतांचा हा नवा प्रवाह त्यांची लोकमानसासमोर आणला. त्यांची जन्मदात्री जेव्हा गेली तेव्हा त्यांनी तिची महती वर्णन केली...
        आई माझा गुरू, आई कल्पतरू
        सुखाचा सागरू, आई माझी,
        प्रीतीचे माहेर, मांगल्याचे सार,
        अमृताची धार आई माझी

प्रवाही शैलीत हा गंगौघ सुरू झाला. ‘अंतरींचे धांवे स्वभावें बाहेरी’ असा तो मनमुक्त आविष्कार होता. शास्त्रकाट्याची कसोटी तिथे नव्हती. तुरुंगवासातच ‘श्यामची आई’ त्यांच्या लेखणीतून प्रकटली. ‘श्यामची आई’ ही मायाममतेने पाठीवरून हात फिरवणारी सर्वांची आई झाली. आजही अनेकांच्या मनावर तिची मोहिनी  आहे. कुमारवयात मनःसंस्कारांमुळे मंत्रभारलेपणा कसा अनुभवला जातो हे ज्याने-त्याने आपल्या मनाला विचारावे, ‘श्यामची आई’मध्ये केवळ प्रादेशिकता नाही. तिच्यात वैश्विक आवाहन आहे. हे कोवळे चंद्रकिरण चकोर होऊन सेवन करावेत... त्यामुळे स्वच्छ नसलेला मनाचा आरसा नितळ होऊन जाईल.

त्यांची ‘क्रांती’ ही कादंबरी क्रांतिकारकांना प्रेरणादायी वाटली. ‘आस्तिक’ कादंबरीने भारतीय जीवनाचा नवा अन्वयार्थ लावायला प्रेरित केले. खानदेशात अतिवृष्टीमुळे जनजीवन उद्‌ध्वस्त झाले... तेव्हा साने गुरुजींनी ‘आतां उठवूं सारें रान’ ही कविता लिहून जागृती केली. नाशीकच्या तुरुंगात ‘श्यामची पत्रे’ हे पुस्तक लिहिले. एरंडवण्याच्या तुरुंगात ‘कला म्हणजे काय’ हे टॉलस्टॉयच्या पुस्तकाचे भाषांतर केले. हरी नारायण आपटे यांच्या कादंबऱ्या; स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ, योगी श्री अरविंद यांचे तत्त्वज्ञान; रवींद्रनाथ टागोर यांची कविता; टॉलस्टॉय, रस्किन यांची विचारसंपदा आदींचा परिचय आपल्या लेखनातून करून दिला. वॉल्ट व्हिटमनच्या ‘Leaves of Grass’ या कवितासंग्रहाचा ‘तृणपर्णे’ या नावाने सरस अनुवाद केला. व्हिक्टर ह्यूगोच्या ‘Les Miserables’ चे ‘दुर्दैवी’ हे रूपांतर केले. त्यांची पुतणी सुधा हीस ‘सुंदर पत्रे’ लिहिली... पण प्रत्यक्षात ती कुमारवयीन वाचकांसाठी ती पत्रे होती. त्यांनी ‘गोड गोष्टी’ अनेक भागांत लिहिल्या. त्यांनी अल्पकाळात लिहिलेला ‘भारतीय संस्कृती’ हा ग्रंथ त्यांच्या प्रज्ञेचा आणि प्रतिभेचा मानबिंदू ठरला.

या ग्रंथात अंतरीच्या उमाळ्याने साने गुरुजींनी आपल्या देशबांधवांशी हितगूज केले आहे. त्यांची भावनाशील वृत्ती इथे ओथंबून आली आहे. प्रमेय रूचीस आले आहे. रसवंती बहरून आली आहे. विचारांच्या इंद्रधनूचे विभ्रम प्रकट झाले आहेत. साने गुरुजींच्या समग्र व्यक्तिमत्त्वातील ऋजुता, भावकोमलता आणि रसवत्ता यांचा त्रिवेणी संगम ‘भारतीय संस्कृती’मध्ये झालेला आहे. त्यांच्या तन्मयतेचे आणि अंतःप्रेरणेचे आल्हाददायी चांदणे या ग्रंथात दिसते. जितके गाभाऱ्यात शिरावे तितके पावित्र्ययुक्त आसमंतात परिक्रमा घडल्याचे सात्त्विक समाधान लाभते. साने गुरुजी हे भारतीय संस्कृतीतील मूल्यविवेक मनात मुरवलेले आणि अधिकारवाणीने तिच्यावर भाष्य करणारे प्रज्ञावंत आहेत याचा प्रत्यय या ग्रंथातून पदोपदी येतो. त्यांच्या प्रतिपादनशैलीत निःसंदिग्धता आहे. गतिमान काळात पाश्चात्त्य जीवनपद्धतीतील ऐहिक सुखवर्धनाची संकल्पना आमच्या समाजात रुजली पाहिजे आणि विज्ञाननिष्ठ समाजाची निर्मिती झाली पाहिजे असे आवाहन त्यांनी आवर्जून केले आहे. संस्कृतीच्या नावाखाली धार्मिक आचारविचारांचे आणि कर्मकांडांचे आंधळेपणाने पालन करणाऱ्यांच्या मनोवृत्तीकडे त्यांचा रोख आहे. एरवी सौम्य वाटणारे साने गुरुजी सामाजिक दोषांची मीमांसा करताना सडेतोड भूमिका स्वीकारतात. त्यांच्या या सतेज वृत्तीचे स्पष्ट प्रतिबिंब ‘भारतीय संस्कृती’ या ग्रंथात आढळते.

साने गुरुजींनी ‘गीताहृदय’ या पुस्तकामध्ये आपल्या भावकोमल शब्दांत गीतेचा गाभारा सामान्य जनांसाठी उलगडून दाखवला आहे. एवढी लेखनसिद्धी प्राप्त झालेल्या या प्रथितयश साहित्यिकाने तुरुंगवासात असताना विनोबाजींची ‘गीताप्रवचने’ लिहून काढली. भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी 15 ऑगस्ट 1948 रोजी साने गुरुजींनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. नवनिर्माणपर्वात त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्याचा तो प्रारंभबिंदू होता. या साप्ताहिकाच्या माध्यमातून साने गुरुजींनी आणि त्यांच्या जीवनस्वप्नांशी समरस झालेल्या त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी समाजप्रबोधनाचे आणि निर्मितिशील साहित्याचे ऊर्जस्वल पर्व महाराष्ट्रात गेली बहात्तर वर्षे कसे निर्माण केले हा इतिहास सर्वांसमोर आहे.

विविध गुणवैशिष्ट्यांनी नटलेल्या भाषाभगिनींचा समन्वय भारतीय भूमीत व्हावा हे रमणीय स्वप्न साने गुरुजींनी बाळगले. ‘आंतरभारती’च्या संकल्पनेचे आदिबीज या भूमीत रुजवण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. राष्ट्रीय एकात्मतेचे अंतःसूत्र त्यांना अभिप्रेत होते... शिवाय भाषाभगिनींच्या या अभिव्यक्तीतून विविधांगी भाषाप्रवाहांचे अभिसरण व्हावे असे त्यांना वाटत होते. हा महान प्रयोग ‘साधना’ साप्ताहिकाच्या माध्यमातून सातत्याने चालू राहिला.

साने गुरुजींच्या 121व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!

- डॉ. सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा.
somnathpant@gmail.com

Tags: मराठी सोमनाथ कोमरपंत व्यक्तिवेध साने गुरुजी साधना Somnath Komarpant Sane Guruji Sadhana Load More Tags

Comments: Show All Comments

डॉ.यशवंत पाटणे,सातारा

आदरणीय गुरुवर्य डॉ.कोमरपंत सर, शतशः प्रणाम साने गुरुजी हे भारतीय संस्कृतीचे, वात्सल्याचे आणि मांगल्याचे मूर्तिमंत प्रतीक .. माझ्या पिढीचे सांस्कृतिक जीवन संपन्न करण्याचे अक्षरकार्य साने गुरुजींच्या साहित्याने आहे.लेखणीला संस्काराचे सामर्थ्य आणि वाणीला मंत्राचे मांगल्य लाभले होते.. गुरुवर्य, आपण गुरुजींनी जगलेल्या प्रत्येक अंगाचा अत्यंत आत्मीयतेने आणि अभ्यासूवृत्तीने मागोवा घेतला आहे. आपला लेख गुरुजींच्या जीवन तपश्चर्येचा मंगल कलश आहे..

Rekha Hosalkar

खूपच सुंदर लेख! ओघवती शब्दशैली.लेख वाचल्यावर पूज्य साने गुरुजींचा जीवनपटच समोर उभा राहतो.त्या महात्म्यास शतशः प्रणाम.

रेखा होसाळकर

मामा खूपच सुंदर लेख.तुझ्या ओघवत्या शब्द शैलीतून त्यांचा जीवन वृतांत छानचं!शब्दांची जडण-घडण इतकी उच्च आहे की, आम्हा सारख्या साहित्य पामराःना आवघड होऊन जाते.असो, पण भावना अंतरी पोहचतात. असाच लिहित रहा की, त्या योगे आम्हा सारख्याना साहित्यातील ज्ञानार्जनाचे दालन खुले होईल.

नंदकिशोर लेले ,पुणे

सर नमस्कार, आदरणीय साने गुरूजी यांचे स्फुर्ती दायी स्मरण करणारा आपला लेख खूपच भावला।आपण अतिशय आत्मीयतेने लिखाण करता त्यातून खूपच प्रेरणा मिळते. माझी पहिली शाळा आंतरभारती कुर्डुवाडी याची आठवण झाली.

अरुण कोळेकर ,सासवड

वाचनीय आणि मर्मग्राही आस्वादक असा लेख. आवडला. भावला.

विष्णू दाते

पूज्य सानेगुरुजींचे भावविश्व उलगडून दाखविणारा अभ्यासपूर्ण आणि सुंदर लेख!

दीपक पाटील

द.भारतातील तुरुंगात असताना साने गुरुजींना कुरल या प्रसिद्ध तमिळ काव्याची माहिती मिळाली. तुरुंगातच त्यांनी कुरल च्या इंग्रजी आवृत्त्तीचे मराठीमध्ये भाषांतर केले. तुरुंगातील वेळ सार्थकी लावला. वंदन ! वरील लेख अतिशय सुंदर झाला आहे.

नरेंद्र महादेव आपटे

जेमतेम एक्कावन्न वर्षे एव्हढे  कमी आयुष्य लाभलेल्या साने गुरुजींची महती आमच्या पिढीतील कित्येकांना पुन्हा पुन्हा जाणवते,  याचे कारण काय? असे का बरे होत असावे? प्रा कोमरपंत यांचा लेख वाचला या प्रश्नाचे उत्तर मिळते. सध्या आपल्या देशाला साने गुरुजींना अभिप्रेत असलेल्या असंख्य धडपडणाऱ्या मुलांची गरज आहे. तसे तरुण पुढे येतील असा आशावाद बाळगावा का? 

रमाकांत कराड नाशिक

गुरुजींच्या साहित्य ,जीवन व व्यक्तीमत्त्व यांचे हृदयंगम दर्शन घडविणारा लेख ! आजच्या पिढीला हे समजण्याची नितांत आवश्यकता आहे. कोमरपंतसर मनःपूर्वक धन्यवाद !

डॉ.सीमा नाईक गोसावी

अतिशय आस्वाद्य समीक्षा दृष्टी ! नेमकेपणाने पूज्य साने गुरुजींच्या साहित्यातील भावानुभवांचे कारुण्य टिपणारा लेख! वात्सल्याची व समतारुपी ममत्वाची रसवत्ता सामाजिक,सांस्कृतिक उंची गाठणार्या लेखन शैलीचा वेध मार्मिकपणे सदर लेखात घेतला आहे! खूप छान ,लेख आवडला.

Anup Priolkar

Wonderful article on Sane Guruji. Some of the words are rightly choose, added glory to the article.

Add Comment