जगभर 23 एप्रिल हा दिवस 'जागतिक पुस्तक दिवस' म्हणून साजरा केला जातो. जगभरातील उत्तमोत्तम साहित्यकृतींना स्वभाषेत अनुवादित करून अनुवादक भाषा, समाज आणि संस्कृती यांच्या उन्नतीसाठी महत्त्वाचे योगदान देत असतात. तर जागतिक पुस्तक दिवसाच्या निमित्ताने 'अनुवादक आणि पुस्तके' या विषयावरील चार लेख व एक मुलाखत आज, उद्या आणि परवा प्रसिद्ध करत आहोत. त्यापैकी हा एक लेख ...
भाषांतर, अनुवाद, रूपांतर, स्वैर भावानुवाद अशा अनेक संज्ञा या संदर्भात कधी एकाच अर्थाने तर कधी वेगवेगळ्या अर्थाने वापरल्या जातात. त्यांचे काटेकोर पारिभाषिक अर्थ आणि व्याख्या बऱ्याच गुंतागुंतीच्या आहेत. उदाहरणार्थ ‘अनुवाद’ या संकल्पनेत वेगळ्या शब्दात स्पष्टिकरण करणे, मागून पुन्हा बोलणे, टीका करणे, अर्थ सांगणे वगैरे बरेच काही समाविष्ट असते. पण सामान्यत: अनुवादित पुस्तक म्हटले की आपल्या मनात ‘आपली मराठी भाषा सोडून दुसऱ्या एखाद्या भाषेतल्या पुस्तकाचं मराठीत भाषांतर केलेलं पुस्तक’ असं येतं, तर तीच सोपी सुटसुटीत व्याख्या या निबंधात गृहीत धरली आहे.
आता काही वेळा हा अनुवाद अगदी जसाच्या तसा असतो तर काही वेळा अनुवाद करणारा लेखक मूळ पुस्तकातला काही भाग गाळतो किंवा काही वेळा मूळ पुस्तकातील काही भाग स्पष्ट करण्यासाठी आपला स्वत:चा काही मजकूर देखील घालतो. पण मूळ पुस्तकातील आशय, पात्रांची नावे आणि पर्यावरण तेच ठेवून शक्य तितकं मूळ पुस्तकाबरहुकुम भाषांतर केलं म्हणजे तो अनुवाद आणि मूळ पुस्तकातील आशय तोच ठेवून पात्रांची नावे, पर्यावरण, स्थळे वगैरे बदलले की ते रूपांतर असे सोप्या शब्दात म्हणता येईल.
या संदर्भात साहित्याच्या गंभीर अभ्यासकांनी डॉ. कल्याण काळे आणि डॉ. अंजली सोमण यांनी संपादित केलेल्या ‘भाषांतरमीमांसा’ या ग्रंथातील डॉ. कल्याण काळे आणि डॉ. अंजली सोमण यांची सुरवातीची प्रकरणे जरूर वाचावीत. विशेषत: डॉ. अंजली सोमण यांनी भाषांतर संकल्पनेचा विकास रोमन कालखंडापासून विसाव्या शतकापर्यंत कसा होत गेला ते उत्तम सांगितले आहे.
इथे एक गोष्ट स्पष्ट करतो. ‘भाषांतरमीमांसा’ हे डॉ. काळे आणि डॉ. सोमण यांनी संपादित केलेले उत्तम पुस्तक काय किंवा डॉ. वीणा मुळे यांनी अतिशय कष्टपूर्वक केलेली सूची काय, या ग्रंथात जे आहे ते पुन्हा सारांशरूपाने सांगण्याचा प्रयत्न शक्यतो प्रस्तुत निबंधात केलेला नाही. या प्रकारच्या उत्तम पुस्तकांकडे निर्देश करून आणि त्यातल्या वेचक आणि गाभ्याच्या प्रतिपादनाचा उल्लेख करून आणि आधार घेऊन (आणि अभ्यासकांना ते ग्रंथ मुळात वाचण्याची विनंती करून) या निबंधात मात्र नव्याने आणि स्वतंत्रपणे जे सुचेल तेच मांडायचा प्रयास आहे.
एकूणातच अनुवाद करताना अनुवादकापुढे ‘शब्दश: अनुवाद’ आणि ‘आशयानुवर्ती अनुवाद’ हे दोन पर्याय असून बहुतेक जाणकार आणि मीमांसक शब्दश: अनुवादापेक्षा ‘आशयानुवर्ती’ अनुवादाचे महत्व सांगतात असे दिसते. याबाबत श्री. म. माटे यांचे उद्गार मननीय आहेत. माटे म्हणतात, ‘एका कुपीतील अत्तर दुसऱ्या कुपीत आले आहे की नाही एवढेच भाषांतराच्या कामी पाहावे. दोन्ही बाटल्यांची काच सारख्याच वाणाची आणि आकाराची असली पहिजे, असा आग्रह धरण्यात काही मतलब नाही.’ हे रूपकात्मक विधान असल्याने समजायला सोपे असले तरी प्रत्यक्षात तरतम भाव तपासणे तितकेसे सोपे नाही.
पु.ल.देशपांडे यांनी ‘खुर्च्या’ या गमतीदार लेखात केलेले शब्दश: भाषांतराचे विडंबन त्यातल्या ‘चिरा बाजारात बर्फ पडत होता’... ‘डुकराच्या मासाची तळलेली भजी’... वगैरे वाक्यांमुळे या संदर्भात सहज आठवते. (पण आशयानुवर्ती भाषांतरात शैलीबाबत अनुवादकाने घेतलेले स्वातंत्र्य काही वेळा मूळ आशयाला धक्का कसे लावते याचे उदाहरण म्हणून त्यांनीच केलेल्या ‘एका कोळियाने’ या हेमिंग्वेच्या ‘ओल्ड मॅन अँड द सी’ या कादंबरीच्या अनुवादाकडे बोट दाखवता येते, हा एक गमतीदार विरोधाभास होय.)
बऱ्याच वेळा उत्तम अनुवादासाठी दोन उपमा दिल्या जातात. एक आहे स्वच्छ काचेची आणि दुसरी रंगभूमीवरील अभिनेत्याची. काचेचे अस्तित्व काचेवर काही धूळ, घाण वगैरे असेल तरच दिसते तसेच अनुवादकाचे अस्तित्व त्यातल्या उणीवांमुळेच दिसावे, अन्यथा अनुवादक अदृश्य असावा असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे अनुवादक हा रंगभूमीवरील अभिनेत्यासारखा असतो असेही म्हटले जाते. तो जे सांगतो ते दुसऱ्या कुणी लिहिलेले असते, पण ते त्याचेच आहे, मूळचेच आहे असे त्याला भासवायचे असते.
म्हणजे अनुवादामध्ये अदृष्यत्वाचे मोल दुहेरी असते. एकीकडे अनुवादक स्वत: त्याच्या आशय आणि शैलीबाबत अदृष्य असायला हवा, म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाची, विचारांची आणि शैलीची सावली अनुवादावर मुळीच पडता कामा नये, त्याचबरोबर अनुवाद इतका अस्सल हवा, की मूळ लेखक कुणी वेगळा आहे हे समजूच नये. तोच अदृष्य व्हावा. माझ्या मते उत्तम अनुवादासाठी खालील निकष मोलाचे आहेत.
गाभ्याचा आशय पोचवणे
मूळ साहित्यकृतीचा आशय अचुकपणे पोचवणे हे अर्थातच कोणत्याही अनुवादात सर्वप्रथम आणि सर्वाधिक महत्वाचे असते. त्यासाठी अर्थातच अनुवादकाचे दोन्ही भाषांवर प्रभुत्व तर हवेच, पण त्याचे वाड्मयीन आकलन उत्तम हवे. मूळ पुस्तकाला अभिप्रेत असलेली आशयसूत्रे आणि मूळ पुस्तकाचे गाभ्याचे प्रतिपादन अनुवादकाला अचुकपणे समजायला हवे. अन्यथा मूळ पुस्तकातील शब्दाशब्दाचे अचुक भाषांतर करूनही आशय मात्र हरवून जाऊ शकतो.
साहित्यकृतीचे प्रयोजनच मूलत: वाचकाला एखाद्या अनुभवाची प्रतीती देऊन लेखकाला अभिप्रेत असे जीवनदर्शन घडवणे हे असते. अनुवादात हे अभिप्रेत जीवनदर्शन मूळ लेखकाला झालेले जीवनदर्शन असायला हवे. त्यासाठी अनुवादकाने सर्वप्रथम एक उत्तम वाचक असणे आवश्यक आहे. त्याला मूळ साहित्यकृतीत लेखकाला नेमके काय म्हणायचे आहे ते उमजायला हवे. (काही वेळा मूळ साहित्यकृतीतील जीवनदर्शन अनुवादकाला मान्य नसेलही. अनुवादकाचे आकलन वेगळे असू शकेल. पण अनुवादकाच्या भूमिकेत शिरल्यावर आपले आकलन बाजूला ठेवून मूळ लेखकाला अभिप्रेत तेच मांडणे आवश्यक असते. प्रा. म. सू. पाटील यांनी गणेश देवी यांचे ‘after amnesia’ हे पुस्तक अनुवादित केले तेव्हा त्यातील काही भागाशी तर प्रा. पाटील यांचे मतभेद होते. त्यांचा उल्लेख प्रास्ताविकात करून त्यांनी अनुवाद मात्र मूळ आशयाला अनुसरूनच केला, हे उदाहरण या बाबतीत बोलके आहे.)
संस्कृती आणि पर्यावरणाचे भान
मूळ आशयानंतर किंवा गाभ्याच्या प्रतिपादनानंतर अनुवादकाने मूळ साहित्यकृतीतील पर्यावरणाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ एकोणीसाव्या शतकातल्या फ्रान्सची पार्श्वभूमी असलेल्या कादंबरीचे भाषांतर करताना त्या काळातले फ्रान्समधले लोकजीवन, चालीरीती, मानसिकता यांची जाण अनुवादकाला असायला हवी. उत्तम अनुवाद ही अतिशय अवघड आणि दुर्मिळ गोष्ट आहे ती याचकरता.
एकदा रूपांतराचा मार्ग न स्वीकारता अनुवादाचा मार्ग स्वीकारल्यावर मूळ साहित्यकृतीतील आशय, पर्यावरण आणि शैली यांचे प्रामाणिक भाषांतर व्हायला हवे. त्यामुळे एखाद्या इंग्रजी, फ्रेंच किंवा रशियन कादंबरीचा अनुवाद करताना मराठी संस्कृतीत प्रचलित असणारे आणि बहुसंख्यांकांच्या मुखी असणारे अस्सल मराठी वाक्प्रचार किंवा म्हणी वापरणे गैर ठरेल. बऱ्याच वेळा मूळ भाषेतले वाक्प्रचार तिथल्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात. अशा वाक्प्रचारात केवळ शब्दार्थ महत्वाचे नसतात तर त्यामागची परंपरा आणि मानसिकता, सामाजिक जाणीवा, मानवी संबंध हे सारे मोलाचे असते.
उदाहरणार्थ एखाद्या फ्रेंच स्त्रीचे आत्मचरित्र अनुवादित करताना त्यात ‘म्हटलंच आहे ना, अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, तसे झाले माझ्या जीवनाचे’ यासारखे वाक्य प्रभावी वाटले तरी ते मूळ पुस्तकावर अन्याय करणारे ठरेल. किंवा एखाद्या अमेरिकन कादंबरीतल्या ‘Day and night at war’ अशा नावाच्या प्रकरणाला मराठी अनुवादात ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ असे काव्यात्मक नाव दिले तर ते देखील अनावश्यक संदर्भ देऊन हानीकारक ठरेल.
अनेकदा आपला आशय वाचकाला परिचित अशा भाषा/ उदाहरणे/ वाक्प्रचार/ म्हणी याद्वारे अधिक प्रभावीपणे पोचेल असे अनुवादकाला वाटण्याची शक्यता असते. म्हणजे एका बाजूला शब्दश: भाषांतराचा अतिरेक अनुवादाला मारक ठरतो तर दुसऱ्या बाजूला आशय अधिकाधिक प्रभावीपणे पोचवण्याच्या नादात अतिरेकी मराठीकरण देखील अनुवादाच्या गुणवत्तेला मारक ठरू शकते.
मूळ भाषेचे ज्ञान आणि अनुवादाचा अनुवाद
मूळ साहित्यकृतीचे (म्हणजे ती मुळात ज्या भाषेत लिहिली गेली त्याच भाषेत) वाचन करून अनुवाद करणे हा अर्थातच सर्वोत्तम मार्ग. कारण मूळ साहित्यकृतीचा दुसऱ्या एखाद्या भाषेत केलेला अनुवाद वाचून त्याचा अनुवाद केला असता त्या पहिल्या अनुवादकाच्या चुका किंवा त्याची छाप अशा अनुवादात येणे शक्य असते.
अनुवादावरून केलेल्या अनुवादाच्या चिकित्सेचे एक उत्तम उदाहरण म्हणजे विलास सारंग यांनी केलेले विंदा करंदीकर यांच्या ‘फाउस्ट’ च्या अनुवादाचे परीक्षण. गटेच्या ‘फाउस्ट’ या मूळ जर्मन नाटकाच्या फिलिप वेन या लेखकाने केलेल्या इंग्रजी अनुवादावरून करंदीकरांनी हा अनुवाद केला आहे. सत्यकथेत (मे, 1967) लिहिलेल्या लेखात विलास सारंग यांनी अनेक उदाहरणे देऊन करंदीकरांचा अनुवाद आत्मीयतेने आणि उत्कटतेने केला असला तरी मूळ नाटकापेक्षा इंग्रजी अनुवादावर विसंबून राहिल्याने मूळ आशय कसा हरपला हे अनेक उदाहरणे देऊन दाखवले आहे. (अभ्यासकांसाठी: हा लेख विलास सारंग यांच्या ‘अक्षरांचा श्रम केला’ या पुस्तकात समाविष्ट केला आहे.)
अतिरेकी मराठीकरण
अनुवाद करताना काही परभाषिक शब्द जर मराठीत रोजच्या वापरात प्रचलित आणि मराठी साहित्यात रूढ असतील तर ते तसेच राहू देणे आवश्यक असते. म्हणजे काही शब्दांचे ओढाताण करून शोधलेले/ वापरलेले मराठी प्रतिशब्द अनुवादाचा ओघ बिघडवतात. यासाठी मुळातूनच मराठीत लिहिलेल्या पुस्तकात जर हे परभाषीय शब्द सर्रास वापरले जात असतील तर मराठी अनुवादात ते आल्यास हरकत नसावी. टेबल, हॉटेल, सिनेमा, शर्ट, पेन, फोन यासारखे शब्द मूळ मराठी लिहिताना देखील परके वाटत नाहीत. विशेषत: संवादांचा अनुवाद करताना मराठीत बोलताना आपण ‘मी तुला भ्रमणदूरध्वनी करेन’ किंवा ‘तुझी लेखणी मला देतोस का?’ असे बोलत नाही. अशा वेळी अनुवादात मराठीचा अट्टाहास वाचकाला त्रासदायक ठरू शकतो. विशेषत: जे लेखक स्वतंत्र सर्जनशील मराठी लेखन करतात त्यांनी केलेल्या अनुवादाचा असा अभ्यास करणे गरजेचे आहे.
याउलट काही वेळा मराठी भाषेत उपलब्ध असलेले शब्द देखील संकोचामुळे नीट न लिहिल्यामुळे रसभंग होतो. उदाहरणार्थ ‘लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र’ या सईद मिर्झा यांच्या कादंबरीचा अनुवाद उत्तम केला असला तरी अधुन मधुन मूळ पुस्तकात असलेल्या अपशब्दांचा/शिव्यांचा उल्लेख अनुवादकाने ‘भो*डीके’, ‘झ*ताहेत’ असे मध्येच फुल्या घालून केल्याने रसभंग होतोच. वाचक परिपक्व आहे असे गृहीत धरूनच मूळ लेखकाने असे शब्द वापरले असताना असे संकोच आणि संक्षेप गरजेचे नसतात.
अनुवादित पुस्तकाचे शीर्षक
पुस्तकाचे नाव हा पुस्तकाचा एक महत्वाचा भाग असतो. शक्यतो मूळ नावच शीर्षकस्थानी कायम ठेवणे श्रेयस्कर, कारण शीर्षकामध्ये अनेक अर्थव्यूह आणि अर्थवलये गर्भित असतात. मूळ लेखकाने आपल्या साहित्यकृतीचा सर्वांगीण विचार करून ज्या पद्धतीने वाचकाने पुस्तकाला सामोरे जावे असे वाटते त्यानुसार शीर्षक योजले असते. त्या सगळ्याचे यथार्थ भाषांतर होणे कठिण असते. हेमिंग्वेच्या ‘ओल्ड मॅन अँड द सी’ चा अनुवाद पु.ल.देशपांडे यांनी ‘एका कोळियाने’ या नावाने केला, त्या शीर्षकात भिंतीवरच्या कोळ्याची अर्थच्छटा मिसळली गेल्याने नको ते संदर्भ चिकटले तसेच पर्ल बकच्या ‘गुड अर्थ’ चा सगळा आणि नेमका अर्थ वेगवेगळ्या मराठी अनुवादाच्या ‘काळी’, ‘माती’, ‘मातीचे घर’ या शीर्षकात येत नाही.
याउलट आर.के.नारायण यांच्या ‘मॅन इटर ऑफ मालगुडी’ या पुस्तकाचा अनुवाद ‘मालगुडीचा नरभक्षक’ या नावाने केला तेव्हा काही नुकसान झाले नाही. तो थेट आणि सरळ सोपा अर्थ सहज अनुवादित झाला. रॉबर्ट स्टीव्हन्सन च्या ‘ट्रेझर आयलंड’ चे भाषांतर ‘खजिन्याचे बेट’ देखील यथार्थ आणि योग्यच म्हणावे लागेल. पण शशी देशपांडे यांच्या ‘ए मॅटर ऑफ टाइम’ चा सगळा आशय सरोज देशपांडे यांनी केलेल्या ‘अशी काळवेळ’ या शीर्षकात येत नाही, किंबहूना ‘अशी काळवेळ’ मध्ये नवेच संदर्भ लागू होतात. याचे अगदी मूळ नाव आणि अनुवादित शीर्षकात सूक्ष्म फरक असणारे महत्वाचे उदाहरण आर्थर कोस्लरच्या कादंबरीबाबत आहे. मूळ पुस्तकाचे नाव आहे - Darkness at noon त्याचे दोन अनुवाद झाले आहेत. नारगोलकरांनी केलेल्या अनुवादाला नाव दिले आहे ‘भरदुपारच्या अंधारात’ तर नवसाहित्य प्रकाशनाने केलेल्या अनुवादाला नाव दिले आहे ‘सूर्यातळी अंधार’.
काही वेळा मूळ लेखकाला अभिप्रेत असणारा प्रकाशझोतच अशी अनुवादित शीर्षके बदलून टाकतात. उदाहरणार्थ ॲगाथा ख्रिस्तीच्या ‘A body in the library’ च्या कुमुदिनी रांगणेकर अनुवादित पुस्तकाचे नाव ठेवले आहे ‘पिंगट केसांची तरुणी’ या उलट दग्रेट गॅट्सबी (चंद्रशेखर चिंगरे), कॅचर इन द राय (संजय भास्कर जोशी), ब्लाइंडनेस (भा.ल.भोळे) यासारख्या अतिशय गाजलेल्या कादंबऱ्यांच्या अनुवादाला मूळ नावच ठेवले आहे ते योग्य वाटते.
भाषेवरचे प्रभुत्व
मूळ साहित्यकृतीचा आशय पोचवणे हे जरी अनुवादाचे मुख्य काम असले तरी अनुवादात मराठीचा डौल आणि सौंदर्य याचा बळी देऊन ते साधणे उत्तम अनुवादाला मारक ठरते. मराठी भाषेला मोठी परंपरा असून काही शब्द, वाक्प्रचार, वाक्यरचना भाषेचे सौंदर्य वाढवतात तर काही शब्दरचना साधेपणाने आशय पोचवतात. पण काही वेळा अनुवादक मराठीच चुकीची वापरतात.
उदाहरणार्थ महाश्वेतादेवींच्या ‘द्रौपदी’ कथेच्या मराठी अनुवादात एके ठिकाणी वाक्य आहे,‘अशा घटनांमुळे कॅप्टन अर्जन सिंग यांचा मधुमेह याच कारणामुळे वाढतोय यात काही संशयच उरला नाही.’ (इंग्रजी मध्ये असे आहे – ‘This proves conclusively that they are the cause of Captain Arjan Singh's diabetes.’) इथे मराठीमध्ये ‘अशा घटनांमुळे’ आणि ‘याच कारणामुळे’ असे दोन शब्द एकाच प्रयोजनाला वापरल्याने मराठीची लय बिघडली जाते. किंवा एके ठिकाणी इंग्रजीमध्ये वाक्य आहे -‘ In the draught human patience catches easily'’ तर मराठीत वाक्य आहे, ‘कोरड्या दुष्काळात माणसांची सहनशक्तीही आगीसारखी भडकून उठते.’ वास्तवात मराठी भाषेत ‘सहनशक्ती आगीसारखी भडकून उठते’ हे अर्थपूर्ण तर नाहीच पण चुकीचे मराठी वाटते. इंग्रजीवरून तरी इथे मुळात सहनशक्ती संपते असा अर्थ असावा असे वाटते.
अनुवाद हे एक महत्त्वाचे सांस्कृतिक कार्य आहे. अधिकाधिक अनुवाद होणे हे त्या भाषेची, समाजाची आणि संस्कृतीची उन्नती होण्यासाठी महत्वाची घटना आहे. जी.ए.कुलकर्णी, पु.ल.देशपांडे, विजय तेंडुलकर यांच्यासारख्या अनेक अव्वल दर्जाच्या सर्जनशील लेखकांनी आवर्जून अनेक पुस्तकांचे अनुवाद केले ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे.
अनुवादकार्याचे महत्व अधोरेखित करताना ‘फाउस्ट’च्या अनुवादाच्या प्रस्तावनेत विंदा करंदीकर म्हणतात, ‘हा बिकट ग्रंथ मराठीत आणण्याचे साहस मी ज्या श्रद्धेच्या जोरावर केले, त्या श्रद्धेचा उच्चार या ठिकाणी केला तर ते अप्रस्तुत ठरणार नाही : मराठीतील प्रत्येक सुशिक्षित लेखकाने जागतिक वाड्मयातील निदान दोन ग्रंथ तरी आपल्या भाषेत आणणे हे त्याचे कर्तव्य आहे असे मी मानीत आलो आहे. या पूर्वतयारीशिवाय मराठीला शैक्षणिक व सांस्कृतिक जीवनातील तिचे नवे कार्य करता येणार नाही. या श्रद्धेनुसार माझ्या हातून एका वैचारिक आणि एका सृजनशील अशा दोन ग्रंथांचे मराठीत भाषांतर व्हावे अशी माझी मनीषा होती. ॲरिस्टॉटलच्या काव्यशास्त्राचे मराठी भाषांतर मी ज्या श्रद्धेतून केले, त्याच श्रद्धेतून मी गटेच्या फाउस्टचे हे भाषांतर मी केलेले आहे.’ विंदांनी व्यक्त केलेले हे विचार महत्वाचे आहेत.
- संजय भास्कर जोशी
sanjaybhaskarj@gmail.com
वाचा 'जागतिक पुस्तक दिवस' निमित्त विशेष लेख:
अनुवादकाचे वाचन... - चंद्रकांत भोंजाळ
केल्याने भाषांतर... - डॉ. शंतनू अभ्यंकर
मुक्त संवाद: अभिरुचिसंपन्न प्रकाशकाशी - सोमनाथ कोमरपंत
Tags:Load More Tags
Add Comment