आधुनिक मराठी वाङ्मयपरंपरेमध्ये निरलसपणे संशोधन-प्रक्रियेत स्वत:ला झोकून देणार्या संशोधकांमध्ये डॉ. रा. चिं. ढेरे यांचे नाव अग्रगण्य स्वरूपाचे आहे. आज (21 जुलै) त्यांची 90वी जयंती. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, ‘महाराष्ट्र सारस्वत’कार वि. ल. भावे, इतिहाससंशोधक आणि मर्मज्ञ समीक्षक त्र्यं. शं. शेजवलकर, दुर्गाबाई भागवत, डॉ. इरावती कर्वे आणि डॉ. सरोजिनी बाबर यांनी संशोधनाच्या विविध वाटा चोखाळत ज्ञानमार्ग समृद्ध केला. याच मार्गावरून वाटचाल करीत डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे या निस्सीम ज्ञानोपासकाने स्वयंभू वृत्तीने आपले मौलिक योगदान मराठीच्या अभ्यासक्षेत्राला दिले.
डॉ. ढेरे यांचे संशोधनकार्य एकतर्फी किंवा एकाच कालखंडापुरते मर्यादित नव्हते. मराठी वाङ्मयातील प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड, संतवाङ्मय, विविध धर्मसंप्रदाय, लोकसाहित्य आणि लोकपरंपरा इत्यादी क्षेत्रांविषयी त्यांनी इतकी मौलिक आणि विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली आहे की त्यांच्या ज्ञानक्षेत्राचा हा पैस पाहून आपण थक्क होतो.
साधारणत: संशोधक हा रुक्ष वृत्तीचा असतो. त्याच्या व्यक्तिमत्त्वात एकारलेपणा असतो. पण डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या व्यक्तिमत्त्वात व्युत्पन्नतेबरोबर रसज्ञता होती. त्यांच्या प्रज्ञा-प्रतिभेमध्ये विदग्धतेचे रंगविभ्रम मिसळलेले होते. त्यांच्या प्रतिपादनशैलीला विवेकाची जोड होती. संवेदनशीलतेचा ओलावा होता. मात्र प्रत्यक्ष पुराव्याशिवाय बोलायचे नाही, लिहायचे नाही ही त्यांची धारणा होती.
आपल्या शोधज्योतीच्या प्रस्फुरणामुळे ज्ञानक्षेत्रातील अलक्षित कोपरे उजळून जावेत, अशी आकांक्षा त्यांनी निरंतर बाळगली. संशोधनाअंती गवसलेले वस्तुनिष्ठ सत्य जनमानसासमोर मांडताना त्यांनी कोणतीही तमा बाळगली नाही. या सच्च्या ज्ञानव्रतीसमोर सतत नतमस्तक व्हावे.
ज्या अभावग्रस्त परिस्थितीत डॉ. रा. चिं. ढेरे यांनी आपल्या जीवनाची जडणघडण केली आणि ज्ञानक्षेत्रासाठी वाहून घेतले, ते समजून घेणे बोधप्रद ठरेल. ध्येयवादी वृत्ती, प्रयत्नवाद आणि आपल्या कर्तव्याविषयी योग्य वेळी झालेले आकलन, ही त्यांच्या जीवनप्रवासाची मूलप्रेरणा मानावी लागेल. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास हा संघर्षमय होता, पण त्यांनी हार पत्करली नाही. एकलव्यनिष्ठेने त्यांनी ज्ञानसाधना केली. आपल्या व्यासंगाच्या बळावर आणि लेखनसामर्थ्यामुळे या क्षेत्रातील अत्युच्च शिखरे त्यांनी गाठली. पण अखेरपर्यंत ते निर्मोही, निरहंकारी आणि निर्मत्सरी राहिले. ‘अण्णासाहेब ढेरे म्हणजे चालता-बोलता ज्ञानकोश’ असे मानणारे महाराष्ट्रात आणि देशभरात अनेकजण आढळतात. खंडोबावर संशोधन करणारे सोन्थायमॉरसारखे जर्मन विद्वान त्यांना किती आदराने वागवीत, हे तर सर्वश्रुत आहे.
विद्वानांच्या मांदियाळीत ते जसे रमत असत; तितकाच जनसामान्यांशी हृदयसंवाद करणे त्यांना आवडत असे. पण आपल्या इच्छित ज्ञानमार्गासाठी त्यांनी लोकान्तामधील एकान्त स्वीकारला होता. ‘अभिराम अपार्टमेंट्स’मधील ‘विदिशा’ या भव्य वास्तूतील भव्य ग्रंथालयातील विविध ज्ञानशाखांच्या ग्रंथांच्या सहवासात डॉ. ढेरे यांचा ज्ञानयज्ञ निरंतर चालत असे. या ज्ञानयज्ञामुळे समाज, साहित्य आणि संस्कृती यांचे परस्परसंबंध दृढ होत गेले. उलगडले गेले.
लोकसंस्कृतीच्या क्षितिजाचा शोध भविष्यकालीन वाटचालीसाठी दिवा ठरू शकतो. ही वाटचाल कृतिशील पावलांना आपल्या सामाजिक अनुबंधाची जाणीव करून देते. ऊर्जा पुरवते. डॉ. ढेरे यांचे आजवरचे कार्य हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण.
ज्ञानमार्गाने वाटचाल केल्याने जीवनाचे श्रेयस कसे गवसते, याचा आदर्श वस्तुपाठ डॉ. ढेरे यांच्या जीवनचरित्रात अनुभवता येतो. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील निगडे या गावी झाला. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले. पोरकेपण त्यांच्या वाट्याला आले. आजोळी त्यांच्या वयोवृद्ध आजी भागिरथी काशिनाथ मुंडले यांनी त्यांचे पालनपोषण केले. त्यांची आबाळ होऊ दिली नाही.
गावातील खासगी शाळेत त्यांचे मराठी चौथीपर्यंतचे शिक्षण झाले. पुढे त्यात खंड पडला. त्यांचे चुलत आजोबा कृष्णाजीपंत मुंडले यांच्या आग्रहामुळे 1944 मध्ये ते पुण्याला आले. 1944 ते 1950 पर्यंत प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देत रात्रशाळेत प्रवेश मिळवून त्यांनी आपले शिक्षण सुरु ठेवले. व्हर्नाक्युलर परीक्षेत ते पहिले आहे. 1950 मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. याच काळात त्यांनी हिंदीच्या आणि मराठीच्या परीक्षा दिल्या. त्यानंतर ग्रंथालयशास्त्राची आणि एसटीसी या पदविका प्राप्त केल्या. कोवळ्या तरुण वयात त्यांनी संशोधनवृत्तीचा निदिध्यास बाळगला.
कधी टी डेपोत, तर कधी पुठ्ठ्यांची खोकी बनवण्याच्या कारखान्यात, कधी मुद्रितशोधक म्हणून आणि कधी विद्यालयात ग्रंथपाल म्हणून काम करीत त्यांना पुढचे शिक्षण घ्यावे लागले. या काळात त्यांनी ‘साधना’ साप्ताहिकातही काम केले आहे. दिनदर्शिकेच्या कोर्या पानांवर त्यांना अभ्यासाची टिपणे काढावी लागलेली आहेत. या परिस्थितीवर मात करून बहि:स्थ विद्यार्थी म्हणून सगळे पेपर्स एकाच वेळी देऊन ते बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. तांत्रिक कारणांमुळे त्यांच्या एम. ए.च्या टर्म्स नामंजूर करण्यात आल्या. 1975 मध्ये एम. ए. पदवीशिवाय संशोधन करून त्यांनी पीएच. डी. पदवी प्राप्त केली. ‘षट्स्थल: एक अध्ययन’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. ‘लज्जागौरी’, ‘चक्रपाणि’, ‘महाराष्ट्राचा देव्हारा’ आणि ‘संतसाहित्य आणि लोकसाहित्य: काही अनुबंध’ या ग्रंथातील मौलिक संशोधन लक्षात घेऊन 1980 मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना डी. लिट. ही पदवी सन्मानाने दिली.
साठीचे आणि अमृतमहोत्सवाचे सोहळे अनेकांचे होतात. पण डॉ. ढेरे यांच्या गौरवार्थ त्यांच्या पन्नासाव्या वर्षी ‘महाराष्ट्राची सत्त्वधारा’ हा ग्रंथ निघाला. या ग्रंथात विविध ज्ञानशाखांचा नामवंत विद्वानांनी परामर्श घेतला आहे. शिवाय या ग्रंथात महाराष्ट्रातील एक व्यासंगी प्राध्यापक आणि समीक्षक डॉ. र. बा. मंचरकर यांनी डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या खडतर जीवनसाधनेचा आणि वाङ्मयीन क्षेत्रातील कर्तृत्वाचा तन्मयतेने आणि ममत्वाने वेध घेतलेला आहे.
याशिवाय, त्यांच्या कन्या नामवंत साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे आणि वर्षा गजेंद्रगडकर यांनी संपादित केलेला ‘लोकसंस्कृतीचे प्रातिभदर्शन’ व लोकसाहित्याच्या नामवंत संशोधक डॉ. तारा भवाळकर यांनी संपादित केलेला ‘संस्कृतीची शोधयात्रा’, असे दोन गौरवग्रंथ प्रकाशित झाले आहेत.
2017 मध्ये संतवाङ्मयाचे गाढे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांनी ‘जीवनाची स्मरणयात्रा’ हे आत्मचरित्र लिहिले आहे. त्यात त्यांनी त्यांच्याविषयीचे ‘डॉ. रा. चिं. ढेरे यांचे ऋणानुबंध’ असे स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे. त्यात डॉ. ढेरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे किती तरी पैलू उलगडून दाखवले आहेत. त्यांचे मुलखावेगळे ग्रंथप्रेम, त्यांचा विद्याव्यासंग, विद्वान व्यक्तींशी त्यांचे जुळलेले अनुबंध, त्यांची ग्रंथसंपदा यांवर त्यांनी प्रकाश टाकलेलाच आहे; शिवाय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श आपल्याला प्रेरक कसा ठरला, हे प्रांजळपणे सांगितले आहे.
शंभराहून अधिक लहान-मोठे ग्रंथ डॉ. रा. चिं. ढेरे यांनी लिहिले. त्यांचा संक्षेपाने परामर्श घेणे, ही कठीण बाब आहे. पण या ग्रंथसंपदेचे स्थूल स्वरूप सांगणे सहज शक्य आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासापासून लोकसाहित्यापर्यंत सर्व क्षेत्रांत त्यांची शोधप्रतिभा सहजतेने विहार करते. त्यांच्या विचारमंथनामुळे नवे नवे पैलू प्रकाशात येतात. त्यांना कोणताही विषय हा अविषय वाटत नाही. वेगवेगळ्या पातळ्यांवरून त्यांनी केलेले संशोधन त्यांच्या बहुश्रुततेची, अखंडित व्यासंगाची आणि चिकित्सक दृष्टीची साक्ष पटवून देणारे आहे. सर्जनशीलतेची मितीही तिला लाभलेली आहे.
उत्कृष्ट संपादनकार्य हेदेखील त्यांच्यामधील संशोधनपद्धतीच्या कौशल्याचे अधोरेखन करणारे आहे. ‘श्रीकृष्णचरित्र’, ‘महिकावतीची बखर’, ‘नरेंद्राचे रुक्मिणी स्वयंवर’, ‘सुभद्रा स्वयंवर’, ‘शिवदिग्विजय’, ‘मुरारीमल्लाची बालक्रीडा’ ही त्यातील महत्त्वाची संपादने आहेत. वि. ल. भावे यांच्या लेखांचे संपादनही त्यांनी केले आहे. जुने-नवे असा भेदभाव त्यात नाही. ‘विविधा’, ‘गंगाजळी’, ‘शोधशिल्प’, ‘लौकिक आणि अलौकिक’, ‘मुसलमान संतकवी’, ‘मराठी लोकसंस्कृतीचे उपासक’, ‘कल्पवेल’, ‘एकात्मतेचा शिल्पकार’, ‘ईश्वरनिष्ठांची मांदियाळी’, ‘चरित्रप्रभा’, ‘ही चिरंतनाची वाट’ आणि ‘लोकसंस्कृतीची क्षितिजे’ या पुस्तकांतून स्फुट शोधनिबंध आलेले आहेत. यांतील प्रत्येक शोधनिबंध नवी दृष्टी देणारा आहे.
‘संतांच्या चरित्रकथा’ आणि ‘संतांच्या आत्मकथा’मधून त्यांनी संतांच्या चरित्र-आत्मचरित्रांचा संक्षेपाने परामर्श घेतला आहे. मराठी वाङ्मयाच्या अभिवृद्धीस कारणीभूत ठरलेल्या आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक जडणघडण करणार्या दत्त संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, नवनाथ संप्रदाय, वीरशैव संप्रदाय, वारकरी संप्रदाय इत्यादी संप्रदायांविषयीचा त्यांनी समग्रतेने धांडोळा घेतला आहे. या संदर्भात त्यांचे ‘नाथ संप्रदायाचा इतिहास’, ‘दत्त संप्रदायाचा इतिहास’, ‘चक्रपाणि’, ‘श्रीविठ्ठल : एक महासमन्वय’, ‘श्री नामदेव: एक विजययात्रा’, ‘संतसाहित्य आणि लोकसाहित्य’ आणि ‘खंडोबा’ हे त्यांचे उल्लेखनीय ग्रंथ. ‘षट्स्थळ’ या ग्रंथातून त्यांनी चक्रधरांच्या जीवनावर नवा प्रकाशझोत टाकलेला आहे.
त्यांचा ‘शिखर शिंगणापूरचा श्री शंभूमहाराज’ हा बृहद्ग्रंथ म्हणजे त्यांच्या दीर्घकालीन तपश्चर्येचे फलित होय. श्री शिवाजीमहाराजांच्या चरित्रावर आणि त्यांच्या सिसोदिया कुळाच्या अज्ञात पार्श्वभूमीवर आंतरज्ञानशाखीय दृष्टीने अभ्यास करून ज्ञात इतिहासाची पुनर्मांडणी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
डॉ. ढेरे यांचे ‘प्राचीन मराठी वाङ्मय: मुकुंदराज ते मुक्तेश्वर’, ‘प्राचीन मराठी गद्याचा इतिहास (अपूर्ण)’, ‘ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा आणि सोळावा’ हे महत्त्वपूर्ण हस्तलिखित ग्रंथ अन्य साधनसामग्रीबरोबर पानशेतच्या पुरात वाहून गेले. आपले परिश्रम मातीमोल होताना त्यांनी डोळ्यांनी पाहिले, पण ते निराश झाले नाहीत. राखेतून फिनिक्स पक्ष्याने नवजीवन उभे करावे, अशा अभंग जिद्दीने त्यांनी आपले संशोधन कार्य निरलसपणे चालू ठेवले. डॉ. ढेरे यांना प्रकृतीने साथ दिली नाही. पण त्याविषयी त्यांनी कधीही कुरकूर केली नाही. सर्व अडचणींवर मात करून त्यांनी निरंतर आपली ज्ञानसाधना चालू ठेवली.
आयुष्याच्या उत्तरायणात त्यांनी श्रीव्यंकटेश या दैवताचा सांगोपांग धांडोळा घेतला. त्यासाठी अनेक व्यंकटेशस्थानांची भ्रमंती केली. त्याचे फलित म्हणजे त्यांचा ‘श्री वेंकटेश्वर आणि श्रीकालहस्तीश्वर’ हा ग्रंथ. ‘श्री नृसिंहोपासना’ हा त्यांचा शेवटचा ग्रंथ.
डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक गुणविशेष म्हणजे त्यांच्या लेखनात लालित्याचे रंग आहेत. ‘विराग आणि अनुराग’ हे त्यांच्या ललित निबंधाचे पुस्तक वाचताना याचा पदोपदी प्रत्यय येतो. या पुस्तकात त्यांनी कालिदास, खलिल जिब्रान या प्रतिभावंतांचे प्रतिभादर्शन तन्मयतेने घडवले आहे. कविवर्य बा. भ. बोरकर हे त्यांचे आवडते कवी. त्यांच्या ‘यौवनाचे झाड’ या कवितेचे अप्रतिम रसग्रहण या पुस्तकात समाविष्ट केले आहे.
डॉ. ढेरे कोवळ्या तरुण वयात कविता करायचे. ती काव्यात्म वृत्ती त्यांनी कायम ठेवली. तिचाच प्रत्यय त्यांच्या कालिदासावरील ‘जीवनयोगी महाकवी’ आणि खलिल जिब्रानविषयीच्या ‘चिरंतनाचा ध्यास’ या ललित निबंधांतून येतो. कालिदासाविषयी लिहिताना डॉ. ढेरे उद्गारतात:
‘‘...आजही आपल्याला त्याचा प्रत्यय येतो की, त्याच्या शब्दांना रूप आहे, रस आहे, गंध आहे आणि नादही आहे. स्पर्श-संवेदनांचा प्रत्यय तर तो जागोजागी आणून देतो. उज्जयिनीच्या एखाद्या भूमिगत प्रासादात त्याचे रंगविश्व आजही प्रकाशाची वाट पाहात असेल काय? क्षिप्रेच्या तरंगांवर त्याचे कंठमाधुर्य आजही प्रतिध्वनित होत असेल काय? नूपुरांच्या रुणझुणीला साथ देणारा त्याचा मृदंगध्वनी अजूनही कुठे घुमत असेल काय? एकांतात बसून त्याने छेडलेल्या वीणेच्या तारांचा झंकार महाकालाच्या गाभार्यात अजूनही ऐकू येत असेल काय?’’
कविमानसातील कल्पनाविलासाचे नितांत मनोहर रूप येत ‘बिंब-प्रतिबिंब’ न्यायाने येथे प्रकट झालेले आहे. तेच परमन-प्रवेश करण्याचे सामर्थ्य डॉ. ढेरे यांच्या खलिल जिब्रानविषयक पुढील उद्गारांतून दिसून येते:
‘‘...जिब्रानची निर्माणशक्ती उर्वशीप्रमाणे चिरयौवन होती. वयाच्या चौथ्या वर्षापासून जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सौंदर्याचे आणि सत्तत्त्वाचे नवनवीन उन्मेष त्याच्या प्रतिभेतून फुटले आहेत. त्याची संपूर्ण जीवनयात्रा ही सौंदर्यसाक्षात्काराची अखंड प्रक्रिया होती. जीवनाच्या अंतिम सत्याचा वेध घेणारी सर्वस्पर्शी प्रज्ञा आणि अनुभूतीच्या भुजांनी चिदाकाशाला मिठी मारणारी प्रमत्त प्रतिभा यांमुळे त्याचे साहित्य अमर झाले. जिब्रान आनंदयात्री आहे. प्रेमाचे पाथेय बरोबर घेऊन आणि सौंदर्य दृष्टी जागी ठेवून तो चिरंतनाची अखंड वाटचाल करीत आहे.’’
डॉ. ढेरे यांनी ‘बोरकरांची प्रेमकविता’ संपादित केली आहे. या पुस्तकाला त्यांनी ‘माती आणि ज्योती’ ही प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन्ही रूपकळा येथे समर्थपणे व्यक्त झाल्या आहेत. त्यामुळे बोरकरांची प्रेमकविता चांगल्याप्रकारे आकळते. उलगडते.
चिकित्सक संशोधक आणि सौंदर्यदृष्टी असलेला रसज्ञ समीक्षक यांच्यात द्वैत असण्याचे कारण नाही, हे डॉ. रा. चिं. ढेरे यांनी दाखवून दिलेले आहे.
1 जुलै 2016 रोजी वयाच्या 86व्या वर्षी त्यांचे दु:खद निधन झाले. अनेक प्रकारच्या आधिव्याधींवर मात करून आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत लेखन, वाचन, मनन आणि चिंतन यांमध्ये ते निमग्न राहिले. अभ्यासक्षेत्रातील ही त्यांची निष्ठा दुर्मीळ स्वरूपाची.
डॉ. रा. चिं. ढेरे यांचा लाभलेला सहवास हा माझ्या आयुष्यातील भाग्ययोग होता. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!
- डॉ. सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा.
somnathpant@gmail.com
Tags: व्यक्तिवेध सोमनाथ कोमरपंत रा चिं ढेरे लोकपरंपरा लोकसाहित्य Somnath Komerpant R C Dhere Load More Tags
Add Comment