एक नामवंत क्रीडातज्ञ श्री. हरिभाऊ साने

'माणूस'मधील 50 वर्षांपूर्वीच्या सदराची पुनर्भेट (10/22)

सन्मित्र संघ हरिभाऊंनी 1923 मध्ये स्वतः शाळेत असताना स्थापन केला. प्रजा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष नानासाहेब गोरे हे खोखोचे उत्कृष्ट खेळाडू होते आणि त्यांच्या बरोबर सामने खेळल्याची आठवण ते सांगतात. या सुमारे 50 वर्षांत कबड्डी, खोखो आणि इतर खेळांनी अनेक स्थित्यंतरे बघितली. आट्यापाट्या नामशेष झाला, लंगडी नाममात्र राहिली. हुतूतूचे कबड्डीमध्ये रूपांतरित झालेल्या खेळाचा चेहरामोहरा पार पालटला. या साऱ्या कायापालटामध्ये चांगले जुने टिकवित, नवे शास्त्र आत्मसात करत आणि अधिक सुधारण्यासाठी धडपडत हरिभाऊंनी आपले ज्ञान नेहमी ताजे ठेवले आणि त्याच्या जोडीला क्रीडांगणावरची संध्याकाळची फेरी कधीही न चुकविता ते आचरणात आणले. आणवून घेतले.'

कबड्डी हा मातीशी मस्ती करणारा खेळ असेल जरूर; पण त्यालाही काही शास्त्र आहे, तंत्र आहे, मंत्र आहे. खेळाडूला कबड्डी-खोखोमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यातील कौशल्यस्थाने नेमकी हेरावी लागतात. पहिलवानी धसमुसळेपणा अथवा अंगदांडगाई आणि पाठशिवणीच्या खेळाची जरा सुधारलेली आवृत्ती ही कबड्डी-खोखोबद्दलची कल्पना आता मागे पडत आहे.

देशी खेळांचा विकास आज अनेक अंगांनी होत आहे. वाढ परिपूर्ण होण्यासाठी ते आवश्यकच आहे. कबड्डी- खोखोच्या खेळाची शास्त्रीय बैठक शरीरशास्त्रीय आणि मानसशास्त्रीयही. त्याचा अभ्यास, कौशल्याचा विकास करण्यासाठी वापरावयाच्या निरनिराळ्या पद्धती, खेळाडूंना द्यावयाच्या प्रात्यक्षिकांच्या अभिनव योजना, कबड्डीचा खेळ अधिक आक्रमक आणि आकर्षक होण्यासाठी अभ्यासपूर्णतेने आखलेल्या आणि प्रत्यक्षात आणलेल्या योजना या साऱ्यांमध्ये पुण्याचा सन्मित्र संघ आणि त्याचे चालक हरिभाऊ साने हे आघाडीवर आहेत. किंबहुना अशा स्वरूपाचे प्रयत्न जाणीवपूर्वक सातत्याने करणारे ते महाराष्ट्रात एकटेच आहेत.

तसे म्हटले तर सन्मित्र संघ हरिभाऊंनी 1923 मध्ये स्वतः शाळेत असताना स्थापन केला. प्रजा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष नानासाहेब गोरे हे खोखोचे उत्कृष्ट खेळाडू होते आणि त्यांच्या बरोबर सामने खेळल्याची आठवण ते सांगतात. या सुमारे 50 वर्षांत कबड्डी, खोखो आणि इतर खेळांनी अनेक स्थित्यंतरे बघितली. आट्यापाट्या नामशेष झाला, लंगडी नाममात्र राहिली. हुतूतूचे कबड्डीमध्ये रूपांतरित झालेल्या खेळाचा चेहरामोहरा पार पालटला. या साऱ्या कायापालटामध्ये चांगले जुने टिकवित, नवे शास्त्र आत्मसात करत आणि अधिक सुधारण्यासाठी धडपडत हरिभाऊंनी आपले ज्ञान नेहमी ताजे ठेवले आणि त्याच्या जोडीला क्रीडांगणावरची संध्याकाळची फेरी कधीही न चुकविता ते आचरणात आणले. आणवून घेतले.'

‘‘आट्यापाट्या आणि लंगडी याचे शिक्षण मी कबड्डी-खोखोच्या खेळासाठी अत्यावश्यक मानतो. आट्यापाट्यामध्ये तयार होणारे फूटवर्क आणि लंगडीमध्ये द्यावयास लागणाऱ्या झुकांड्या व हुली यांचा कबड्डी-खोखोत खूपच फायदा होतो. आट्यापाट्याचे सामने सध्या कोठे भरतच नाहीत. पण तरीही चांगला खेळाडू बनायचे असेल तर आट्यापाट्याचे शिक्षण हवेच. लंगडीचे सामनेही मिरजेसारख्या एखाद्याच ठिकाणी भरतात. अशा ठिकाणी मी आवर्जून माझे खेळाडू पाठवितो. कारण या खेळातून तयार होण्याच्या पायावरच पुढच्या कबड्डी-खोखोच्या यशाची कमान उभी राहणार असते. ’’

‘‘याशिवाय त्या त्या खेळाचे शिकवण्याचे असे कोणते आडाखे तुम्ही बांधले आहेत?”

‘‘महिनोन्‌महिने मैदानावर मुले सराव करत आहेत आणि न चुकता तेथे उभा राहून ‘कोच’ - पंचाचे काम करतो आहे, याचा माझ्या मते काहीच उपयोग नाही. त्या सातत्याचे आणि नियमितपणाचे कौतुक जरूर करेन. पण ते खेळाडू तेवढ्‌या महिन्यात शिकले किती? त्या कोचने त्यांच्या किती चुका हेरल्या आणि त्यांना किती नवे ज्ञान दिले असा विचार केला तर निराशाच पदरी येते. दुर्दैवाने बहुसंख्य क्रीडासंस्थांत आणि शाळा-कॉलेजच्या मैदानावर खेळाचा सराव म्हणजेच उत्कृष्ट मार्गदर्शन असे समजून आंधळे कोचिंग चाललेले असते.’’

‘‘तुमचे मार्ग कोणते?’’

‘‘खेळाचे स्वरूप, त्यातील बारकावे, कौशल्याचे प्रकार हे खेळाडूला नीट समजावून द्यावयास हवेत आणि स्वतंत्र बुद्धीने त्याला त्याचा वापर करता यावयास हवा. वेगवान संघर्षमय, जिद्दीची गरज असलेला आणि शक्तीपेक्षाही युक्ती आणि सफाई यांची आवश्यकता असलेला हा खेळ. ताकद असेल तर दुधात साखर. पण ताकदीशिवायही चांगला खेळाडू बनता येते. मात्र तंत्र पक्के हवे. चढाई करताना सुरुवात गडबडीने न करता संथ करावी, वाकून खेळावे, साती खेळाडू नजरेच्या टप्प्यात खेळते ठेवावेत. चढाई मध्यरेषेला काटकोनात असावी. दोन्ही पाय एकाच जमिनीला टेकून शक्यतो उभे राहू नये, फूटवर्क नेमके असावे या साऱ्या गोष्टी खेळाडूला हाताला धरून शिकवाव्या लागतात. नाही तर पायाच कच्चा राहतो. कधीकधी नावाजलेले खेळाडूही या चुका करतात आणि सामना हरतात तेव्हा याची गरज अधिकच जाणवते.’’

कबड्डीमध्ये मैदानावरचे क्षेत्ररक्षण नेहमी बदलते असते. एकापासून ते सातापर्यंत कितीही खेळाडू एका वेळी त्या परिस्थितीप्रमाणे आत असतात. खेळाडूंची आत असलेली संख्या, त्यांचे क्षेत्ररक्षण याप्रमाणे चढाई करणाऱ्याला त्यांना बाद करण्यासाठी पवित्रे घ्यावे लागतात. तासभर खेळाडूंनी दमदारपणे कबड्डीचा सराव केला म्हणजे काही ‘कोच’चे काम झाले नाही. वरील प्रत्येक परिस्थितीत त्या चढाईपटूने कसे खेळावे हे तसे खेळाडू मैदानात नेमके ठेवून मार्गदर्शकाने दाखविले पाहिजे. असा अर्ध्या तासाचा सरावदेखील मग नुसत्या तासभर खेळापेक्षा खूप मोलाचा ठरतो.

‘‘बचाव करणाऱ्या खेळीचे असे तुम्ही कोणते खास तंत्र शिकवता का ?’’ 

‘‘राखीव क्षेत्राचा (लांबी) चटकन आणि कौशल्यपूर्ण उपयोग याचा वापर योग्य त्या पद्धतीने करता आल्यास संघाला त्याचा हमखास फायदा मिळतो, झटापट चालू झाली की राखीव क्षेत्रामधून निसटण्याची धडपड बहुतेक सर्व चढाईबहाद्दर करतात. लांबीच्या तीन फुटी जागेत एक खेळाडू जर नेमके आणि पक्के पाय रोवून ती जागा अडवून उभा राहिला तर भल्याभल्या खेळाडूंना तो सहज रोखू शकतो. कारण अलीकडच्या बाजूस क्षेत्ररक्षण तयार असते. पलीकडच्या बाजूस मैदानाची हद्दच संपलेली असते. माझ्या संघाने हे तंत्र आत्मसात करावे म्हणून मी नेहमीच भर दिला आहे. हाताला हात धरून साखळी पद्धतीने व्यूह रचण्याचा प्रकारही मला नामंजूर आहे. यात मला अनेक तोटे वाटतात. मधल्या खेळाडूचे हात दोन्ही बाजूंनी पकडलेले, म्हणजे त्याचा उपयोग संघाला शून्य. कोपऱ्याने जवळच्याचा हात धरला तर तो हात सोडून मग पकड घेणे आणि दोन्ही हात सुटे असताना पकड घेणे यात अधिक वेळ कशाला लागेल तुम्हीच सांगा? दोघांनी मिळून साखळीत केलेली पकड ही बऱ्याच वेळा कच्ची असते. माझ्या मते याचे मूळ कारण मानसशास्त्रीय आहे. कारण चढाई करणाऱ्या गड्याचा पवित्रा हेरून तो पकडण्याच्या तंत्रात एका विविक्षित गाफील क्षणी आला, की पकडणारा त्याला पकड घेतो. नेमकी त्यांनी हेरलेली ही वेळ शेजारच्या हाताच्या गड्याला समजेलच असे नाही, आणि मग निर्माण झालेल्या गोंधळात बहुधा दोघेही बाद होतात. त्यापेक्षा माझ्या संघात मी कोपरे सुटे ठेवतो आणि गेल्या मोसमात तीन ठिकाणी अजिंक्यपद आणि दोन उपविजेतेपद मिळवणाऱ्या माझ्या संघाला त्याचा नेहमीच फायदा झाला आहे. वैद्य या आमच्या कोपरारक्षकाला तर अनेक ठिकाणी उत्कृष्ट कामगिरीची पारितोषिके मिळाली आहेत.’’


हेही वाचा : असहिष्णू शासन = राष्ट्राचे पतन : इतिहासातील सात धडे - आनंद करंदीकर


‘‘खोखोच्या खेळातली कोणती कौशल्ये तुम्ही खेळाडूंना अधिक आग्रहाने शिकवता? ’’

‘‘खोखोच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, खोखो आहे दमाचा खेळ! तरुण रक्तालाच तो झेपू शकतो आणि वेळीच निवृत्त झाले नाही तर अनुभवी, जागत्या खेळाडूंचा तिथे फज्जा उडतो. संघात सातत्याने तरुण रक्त राहील याची मी नेहमी काळजी घेतो. कुणाच्या रागालोभाची पर्वा न करता 73 साली राष्ट्रीय स्पर्धेत खेळणारा संघ मी आताच जाहीर केला आहे. एखादा अपवाद वगळता जुन्यांनी वेळेवर खेळातून निवृत्त व्हावे हे संघाला नेहमीच फायद्याचे ठरते.’’

‘‘वस्तादाशी लढल्यावरच चेला सुधारतो हे मला दोन्ही खेळांबाबत मान्य आहे. म्हणून मी छोट्या आणि नवोदित खेळाडूंना नेहमीच भारी संघाशी खेळवितो. हेमंत जोगदेव हा उत्कृष्ट खोखोपटू आहे हे सर्वांना पटले, पण तरीही इतक्या कोवळ्या कुमाराला पहिल्याच तिघांच्या तुकडीत पाठवावे हे मुंबईकरांना पटत नाही. त्यांना ती ‘जादा’ जबाबदारी वाटते. मी मात्र बेडरपणे त्याला ही संधी देतो. यंदा कुमाराचे राष्ट्रीय खोखो स्पर्धेत एकलव्य पारितोषिक त्याला मिळाल्याने माझाच हट्ट उपयोगी ठरला असे मला वाटते.’’

‘‘प्रत्यक्ष खेळाच्या बाबत म्हणाल तर बाहेर खेळणे, चौकात खेळणे, हुलकावण्या देणे, चांगल्या खेळाडूला आले पाहिजे हा माझा आग्रह असतो. नुसता पळत राहिला तर पाठलागाचा वेग वाढतो आणि खेळाडू फुकट लवकर मरतो. याउलट बाहेरून झुकांड्‌या देत खेळले तर वेगाला खंड पडतो. खुंटावर जाऊन खेळणे याला चांगले खेळाडूही बिचकतात. खुंटावरच्या जागेला खेळाडूचे Death bed समजण्यात येते. माझ्या खेळाडूंच्या मनातून ही भीती काढून टाकण्यासाठी मी त्यांना मुद्दामहून खुंटावर खेळण्याचा सराव देतो. वाकून गडी मारणे, वेग एकदम वाढवणे आणि कमी करणे या गोष्टींसाठी काही खास प्रकारे मी शिक्षण देतो. मला वाटते, अवघ्या दोन वर्षांत सन्मित्रच्या खोखो संघाचा दबदबा जो एकदम वाढला आणि यंदाच्या महाराष्ट्र राज्याच्या खोखो संघात एका मंडळाचे नऊ खेळाडू असण्याचा जो विक्रम मंडळ करू शकले त्याचा धागा या शास्त्रशुद्ध विचाराच्याकडे आणि त्याप्रमाणे केलेल्या प्रयत्नाकडे जातो.’’

‘‘खेळाडूंच्या दृष्टीने आणखी कोणत्या गोष्टी तुम्ही आवश्यक मानता?’’ 

‘‘सामन्याच्या वेळी खेळाडूंना चांगला योग्य सकस आहार मिळावा यावर माझा कटाक्ष असतो. मी खेळाडूंना मसाज शिकवले आहे. अंग ताजेतवाने होण्यास त्याचा खूपच फायदा होतो. याबरोबरच खेळाडूने संघभावनेने खेळावे आणि संपूर्णपणे शिस्तीनेच खेळावे याबद्दलचा माझा आग्रह कडक असतो. मात्र गुणानुक्रमाने म्हणाल तर उत्कृष्ट अभ्यास, चांगली वागणूक आणि मग कौशल्य अशी मांडणी मी करेन.’’

‘‘नेतृत्वाच्याबद्दल तुमच्या काही विशेष अपेक्षा?’’

‘‘संघनायक खेळाच्या तंत्रात तज्ज्ञ असावाच पण कोणत्या वेळी काय करावे याची अचूक जाणीवही त्याला हवी. याबरोबरच खेळाडूच्या चुका त्याला नाराज न करता समजावून सांगून त्याला प्रोत्साहनही कर्णधाराला देता आले पाहिजे. हा समजूतदारपणा फारच थोडे संघनायक दाखवितात.’’

‘‘कबड्डीच्या शास्त्रशुद्ध वाढीकडे आणि त्याचबरोबर प्रसारामध्ये तुमची भूमिका काय?’’

‘‘शास्त्रशुद्ध वाढीमध्ये अनेक उपक्रम तर आमच्या मंडळानेच चालू केले. खेळाचे नियम आणि वेगवेगळ्या परिस्थितीची कल्पना देणारे नकाशे आम्ही तयार केले. चर्चेत त्याचा खूप उपयोग होतो. कबड्डी आणि खोखोचा खेळ कसा शिकवावा याचा - आसनांचा असतो तसा - नकाशाही आम्ही करत आहोत. प्रत्येक शाळा-कॉलेजला ते आवर्जून घ्यावे लागतील इतके ते उपयुक्त ठरतील. खेळाडूंना आणि ‘कोच’ना सर्वांगीण शिक्षण देण्याचे शिबिरही आम्ही आयोजित केले होते आणि ते खूपच फलदायी ठरले. बचावात्मक कबड्डीमुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी आयोजित केलेले सामने, अथवा सर्व नवोदितांना संधी मिळावी म्हणून महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डाचा संघ करून मेमध्ये घेण्यात येणारे सामने, किंवा कबड्डीचे कोठेही हलवता येणारे मैदान हे आमचे आणखी काही उपक्रम. कबड्डीच्या प्रसाराबद्दल म्हणाल तर संघावर, जिल्ह्यावर, कोरड्या नियमावर प्रेम करणारे लोक मूळ कबड्डीच्याबद्दलचीच माया कमी करत असतात, असा कडू अनुभव काही वेळा येतो खरा. ’’

‘‘मग तुमचे जास्त प्रेम कशावर?’’ मी उठताना हसत हसत प्रश्न विचारला. मात्र तोच माझ्या विचाराला चालना देणारा ठरला.

‘‘तसा प्रेमाचा प्रश्न नाही पण खोखो हा निश्चितच अधिक अवघड खेळ आहे. कबड्डी त्या मानाने सोपा खेळ. खोखोमध्ये अधिक अवधाने अधिक कौशल्याने सांभाळावी लागतात. खोखो खेळणारा खेळाडू कबड्डी खेळू शकेल; पण उलटे मात्र शक्य होईलच असे नाही. तुम्हांला काय वाटते ?’’

तुम्हांला काय वाटते ?

खोखो हा मुळातच वेगवान खेळ आहे. दोन बलाढ्य संघांतला सामना येथे हमखास रंगतोच. सरावासाठी अधिक सातत्य त्याला आवश्यक असते. वेगाने पळताना सूर घेऊन गडी बाद करण्यातले कौशल्य नजर खिळवणारे असते. आणि नागमोडी अथवा अंगकृती पळताना सफाईदारपणे दिलेल्या हुलकावण्या नजर सुखावणाऱ्या ठरतात.

पण तरीही मला कबड्डी हा अधिक अवघड, अधिक कौशल्यपूर्ण आणि अधिक आकर्षक खेळ वाटतो. एका गड्याने वा संघाने दुसऱ्या गड्याचा केलेला पाठलाग हे खोखोचे ढोबळ स्वरूप. त्यामध्ये येऊन येऊन किती कौशल्य येणार? याउलट कबड्डीमध्ये बचाव करणारे आणि चढाई करणारे यांची संख्या सारखी बदलत असते. दरवेळा नवीन धडपड, नवीन युक्ती शोधावी लागते. समोरच्या खेळाडूच्या मानसशास्त्राचा अभ्यास अधिक अचूकपणे असावा लागतो. कौशल्याचे प्रकारही किती विविध. एक कोपरारक्षक घेतला तर त्याला चवडा धरणे, लवण पकडणे, एकेरी, दुहेरी, पट काढणे, साखळी फिरवणे, ब्लॉक करणे, पाठलाग करणे, पाठ पकडणे, अशी अनेक कौशल्ये आत्मसात करावी लागतात. आणि समोरच्या खेळाडूचे कच्चे दुवे व प्रत्यक्ष परिस्थिती याची सांगड घालून त्या कौशल्यांचा वापर करावा लागतो. याशिवाय इतरांच्या मिळणाऱ्या मदतीवर त्याचे यश अवलंबून असल्याने खेळाची अनिश्चितता आणि पकडणाऱ्याची जबाबदारी अधिक वाढते.

एखाद्या भक्कम संघाविरुद्ध खोखोत दोन मिनिटे पळणे आणि कबड्डीमध्ये दोन गुण मिळविणे यांमध्ये दुसरे निश्चितच अधिक अवघड आहे. तुम्हाला काय वाटते ?

हलवता येणारे मैदान

सन्मित्र मंडळ सध्या तयार करत असलेले कबड्डीचे Portable क्रीडांगण हा सध्या कबड्डीशौकिनांत एक खास चर्चेचा विषय आहे. खेळताना खेळाडूला होणाऱ्या दुखापती या बऱ्याच वेळा मैदान चांगले नसल्याने होतात. मैदानाची बरी-वाईट स्थिती अनेक सामन्यांत निर्णायक ठरते. पावसाळ्याचे चार महिने अतिशय छोट्या जागेत खेळता येणारा हा खेळ मोठे हॉल असूनही बंदच ठेवावा लागतो. या साऱ्यावर एका जागेहून दुसऱ्या जागेवर हलवता येणारे हे मैदान तोडगा ठरू शकेल. वर्ष-दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतर सुमारे अडीच हजार रुपये खर्च करून हे मैदान आता पूर्णावस्थेला पोहोचत आहे. पॅकिंगचे रबर आणि इतर काही गोष्टी यापासून हे तयार केले जाईल. अर्थातच प्रत्यक्ष सामने खेळल्यावर त्याचा टिकाऊपणा आणि उपयुक्तता यांबद्दल अधिक नेमके बोलता येईल. अशा प्रयत्नांची गरज लक्षात घेऊन त्यासाठी जाणीवपूर्वक धडपड करणारे हरिभाऊ आणि त्यांची संस्था व ही गरज मान्य करून त्यांना योग्य ती आर्थिक मदत लगेच देणारे महाराष्ट्र खात्याचे क्रीडासंचालक श्री. वाखारकर हे निश्चितच प्रशंसेस पात्र आहेत.

(पूर्वप्रसिद्धी : माणूस, 10 फेब्रुवारी 1971)

- डॉ. नरेंद्र दाभोलकर

Tags: नरेंद्र दाभोलकर अंनिस सामाजिक कार्यकर्ता माणूस साप्ताहिक श्री. ग. माजगावकर क्रिडा नरेंद्र दाभोळकर खेळ क्रिकेट सामना Load More Tags

Add Comment