या ठेकेदारांना जाब कोण विचारणार? : चंदगीराम विरुद्ध चंबा

'माणूस'मधील 50 वर्षांपूर्वीच्या सदराची पुनर्भेट (15/22)

मास्टर चंदगीराम

आंतरराष्ट्रीय कुस्तीत अवघा नऊ मिनिटांचा वेळ असतो. चंदगीराम कुस्ती निकाली लढत नाही. तासन्तास कुस्ती लढवतो हे अमानुषपणाचे आहे. यापैकी कोणत्याच खुलाशाला फारसा अर्थ नाही. गादीवरच्या आणि मातीच्या कुस्तीत कसाच्या दृष्टीने जमीन-अस्मानाचा फरक असतो. ऑलिंपिकला चौथा नंबर मिळवणाऱ्या विश्वंभर सिंगशी यशस्वी लढणाऱ्या सांगलीच्या संभाजी पारगावकरच्या मते मातीवरच्या कुस्तीत तासभर खेळून होत नाही एवढी दमछाक गादीवर दोन मिनिटांत होते. इतरांचे अनुभवही काही यापेक्षा वेगळे नाहीत. चंदगीराम निकाली लढत नाही हा आरोप तर या कुस्ती या संदर्भात हास्यास्पद आहे. तासन्तास लढणे तुम्हाला मान्य नसेल तर मग बेमुदत हा शब्द वापरता कशाला?

कुस्तीची हवा तापत चालली आहे. हिंदकेसरी मारुती मानेनंतर हिंदकेसरी, भारतकेसरी आणि भारतभीम असा तिहेरी मुकुट धारण करणारा मास्टर चंदगीराम परवा मुंबईच्या आखाड्यात प्रथमच उतरला. चंदगीरामचे वैशिष्ट्य म्हणजे यापैकी प्रत्येक किताब त्याने दोनदा मिळवला आहे. याशिवाय अर्जुनवीर पदकाचा तो मानकरी आहे ते वेगळेच.

पहिलवानाशी गप्पा मारणे हा माझा आवडता छंद आहे. मास्टर चंदगीरामाची प्रथम ओळख चार वर्षांपूर्वी इंदूरला अ. भा. कबड्डी स्पर्धा बघावयास तो आला होता, त्या वेळी झाली. त्यानंतर शामराव मोरेबरोबरच्या कुस्तीसाठी तो दोन वर्षांपूर्वी सांगलीला आला होता, त्या वेळी भेटला आणि या वेळी छत्रपती शहाजी महाराजांच्या नवीन राजवाड्यातील लाल आखाड्यातील मेहनत संपल्यावर त्याची भेट घेतली.

पहिलवान म्हटला की मराठी मनापुढे एक चित्र चटकन उभे राहते. चंदगीरामचा याला अपवाद आहे. चार वर्षांपूर्वीपेक्षा आज तो खूपच पुढे आला आहे पण अजूनही त्याची आर्जवी बोलण्याची पद्धत आणि विनयशील वृत्ती तशीच आहे.

चित्रकला शिक्षकाचा पेशा सोडून कुस्तीला वाव मिळावा म्हणून तो लष्करात गेला आणि शौक खूपच वाढल्याने तीही नोकरी त्याने सोडली. पण लष्करातील नोकरीचा त्याला खूपच फायदा झाला. भारतीय पद्धतीपेक्षा पाश्चिमात्य व्यायाम पद्धतीची मेहनत तो जास्त करतो याचे कारण हे लष्करातील संस्कार! पाचशेवर जोर-बैठका तो कधीच मारत नाही; तर आखाडा उकरणे आणि लढत हे भारतीय प्रकार सोडले तर डंबेल्स, पळणे, दोर चढणे, वेटलिफ्टिंग या सर्व प्रकारांवरच तो अधिक भर देतो. त्याच्या पंजातील ताकद हा कुस्ती शौकिनांत एक आश्चर्याचा विषय आहे.

सांगली भागातला शामराव मोरे हा काही साधा पहिलवान नव्हे. पोलादाची कांब असल्याचा लौकिक आणि डावाला अतिशय हुशार. पण सांगलीला त्याच्याबरोबर लढताना चंदगीरामने त्याचे मनगट जेव्हा धरले तेव्हा हातामधली ताकदच संपल्याचा त्याला भास झाला आणि अवघ्या पाच मिनिटांत त्याला अस्मान बघावे लागले. यापेक्षाही मागच्या वर्षी सादिक पंजाबीबरोबर लढताना त्या रुस्तमेहिंदची दयनीय अवस्था चंदगीरामने केली होती. पंजात पकडलेले मनगट सोडवून घेण्यासाठी तब्बल पाच-सात मिनिटे दोन्ही हातांनी सादिकला खटपट करावी लागली. दोर चढण्याचा चंदगीरामला झालेला हा फायदा आहे. कुस्ती निकाली करणार आणि आपणच ती जिंकणार याचा चंदगीरामला पूर्ण भरवसा होता.

चंबा हा हिंदकेसरी आंदळकरचा चेला! उंची अवघी साडेपाच फूट आणि वजन 185 पौंड. पटाची तयारी दृष्ट लागण्यासारखी! त्याला भेटायला गेलो त्याच्या आधी दोनच दिवस म्हैसूर टायगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुंडगिरी पहिलवानाला त्याने चितपट मारले होते. पै. गणपत आंदळकर, महाराष्ट्र केसरी दादू चौगुले आणि वस्ताद बाबूराव यांच्या बरोबर बसलेला चंबा खूपच आत्मविश्वासाने बोलत होता. लखनौला भारतभीम स्पर्धेत झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्याचे त्याच्या डोक्याने पक्के घेतले होते. शिवाय कुस्ती निकालीच करावयाची अशी त्याचा गुरू हिंदकेसरी आंदळकरची प्रथाच आहे.

हे सारे असूनही काही चमकदार क्षण सोडले तर प्रत्यक्ष लढतीत सारा मामला थंड होता. प्रेक्षकांना याचा वास आधीच कसा लागतो कोण जाणे! चंदगीराम पहिल्यांदाच मुंबईत उतरत असूनही अवघ्या दहा हजार प्रेक्षकांनीच कुस्तीला गर्दी केली. चंबाची तयारी नजरेत भरत होती. त्याचा पवित्राही आक्रमक होता. याउलट चंदगीरामची उंची 6 फूट 3 इंच आणि वजन 190 पौंड. नावाभोवती असलेले वलय सोडले तर हा कोणी मोठा पहिलवान आहे हे सांगावेच लागले असते. खेळावयाची पद्धतही संथ बचावात्मक.

आपल्या नेहमीच्या पद्धतीने सतत वाकून आणि हाताचे पंजे पसरत चंदगीराम अंदाज घेत होता. प्रथम त्याने चंबा मुतनाळेचे मनगट रगडले. सुमारे 12 मिनिटांनंतर त्याने मानेला हात घातला आणि तो मानेला रगडू लागला. यातून काही निष्पन्न होत नाही असे दिसताच पंधराव्या मिनिटाला चंदगीरामने पटाला हात घातला. सावध असलेल्या चंबाने उलटे फिरून पट सोडवून घेतला आणि. चंदगीरामच्याच पाठीला मिठी मारली, त्यांची कंबर उचलली आणि त्याला खाली आदळले. दोन्ही मल्लांची झटापट आता आखाड्याच्या कडेला गेली होती. पडता पडता चंदगीरामचा पाय स्टेजच्या बाजूच्या दोरीत आणि फळीत अडकून राहिला. पण पायाला दुखापत झाल्याचा कसलाही नखरा त्याने केला नाही. बेमुदत निकाली ठरलेली लढत निकालीच करावयाची या इर्षेने तो पुन्हा मध्यावर आला. श्रीपती खंचनाळेबरोबर झालेली बेमुदत लढत पायाला दुखापत झाल्याचे निमित्त करून गणपत आंदळकर मध्येच सोडून गेला होता, त्याची मला आठवण झाली.

आखाड्यात जाता जाता चंबाने चंदगीरामच्या डोळयांत माती फेकली. चिडलेला चंदगीराम अर्धा मिनिट थबकला आणि त्याने पुन्हा कुस्ती चालू केली. तेविसाव्या मिनिटाला पुन्हा चंदगीरामने चंबाचा एकेरी पट खेचला पण चंबाने त्याला हाताने फिरवले. कुस्ती पुन्हा कडेला गेली. पंचाने ताकीद देऊनही मल्ल एकमेकांना सोडेनात. तुकाराम भोसलेना त्यांना दूर करण्यासाठी दुसऱ्या पंचाची मदत घ्यावी लागली.


हेही वाचा : सामाजिक जीवनातील माझा सुरुवातीचा काळ - समाजवादी युवक दल - डॉ. नरेंद्र दाभोलकर


कुस्ती आणखी 15 मिनिटे अशीच चालली तर सोडविली जाईल हा निर्णय या वेळी ठेकेदारांनी जाहीर केला. सगळेच वातावरण बदलले. बेमुदत निकाली कुस्तीच्या आश्वासनावर आलेले प्रेक्षक खवळले. त्यांचा आरडाओरडा चालू झाला. आता अवघे 10-15 मिनिटेच खेळावयाचे हे ध्यानात येताच आधीच दमलेल्या चंबाने आक्रमकता सोडून बचावाचे धोरण अवलंविले. 45 मिनिटे संपली आणि पंचांनी कुस्ती बरोबरीने सोडविल्याचे जाहीर केले.

चंबा लगेच आखाडा सोडून बाहेर पडला. चंदगीराम मात्र या निर्णयाने प्रेक्षकांच्या इतकाच नाराज झाला. दोन्ही हात उंच करत आणि अजून लढण्याची भाषा करून तो आखाड्यातून फिरत होता. 45 मिनिटे त्याच्याबरोबर दमात न उखडता, डावाला न फसता चंबाने लढत दिली याचे कौतुक जरूर करावयास हवे. चंबाने चढाईचा पवित्रा ठेवला होता हेही मान्य. पण तरीही कुस्ती सोडविण्यासाठी यापैकी कोणतेही समर्थन लटके पडते. एक क्षणाचीही उसंत चंबाला न देता अगदी पंच दोघांच्या अंगावर माती टाकतात तेव्हादेखील त्याच्यापासून दूर न होता चंदगीराम चंबाला दमछाक करून मारण्याच्या बहुधा विचारात होता. कुस्ती मध्येच सोडवणे हे त्याच्यावर अन्यायाचे नाही का?

चंदगीराम आखाड्यात आव्हानाची भाषा बोलत असताना त्याच्या कुणीतरी चाहत्याने त्याला हार घातला. झाले. चंबा पुन्हा आपल्या वस्तादाबरोबर आखाड्यात आला पण तो विजयी वीरासारखा गळ्यात हार घालूनच. या साऱ्याबरोबर प्रेक्षकांची खुर्च्यांची मोडतोड चालूच होती. त्यांचा आरडाओरडा, रेटारेटी, आखाड्यातील गोंधळ, पोलिसांचा लाठीमार अशी या नावाजलेल्या कुस्तीची सांगता झाली.

पंच तुकाराम शेठ भोसलेनी कुस्ती बरोबरीत सोडविण्याचा निर्णय आपला नाही असे सांगत आणि कोणाचा हे गुलदस्त्यात ठेवत कानावर हात ठेवले. चंदगीराम नाहीतरी निकाली लढत नाहीच. उदाहरणार्थ, हजरत पटेलबरोबर सव्वा तास आणि मारुती मानेबरोबर बेळगावला तीन तास झालेली लढत. या वेळी त्यापेक्षा काय वेगळे घडले असते अशी मल्लीनाथीही त्यांनी केली.

आंतरराष्ट्रीय कुस्तीत अवघा नऊ मिनिटांचा वेळ असतो. चंदगीराम कुस्ती निकाली लढत नाही. तासन्तास कुस्ती लढवतो हे अमानुषपणाचे आहे. यापैकी कोणत्याच खुलाशाला फारसा अर्थ नाही. गादीवरच्या आणि मातीच्या कुस्तीत कसाच्या दृष्टीने जमीन-अस्मानाचा फरक असतो. ऑलिंपिकला चौथा नंबर मिळवणाऱ्या विश्वंभर सिंगशी यशस्वी लढणाऱ्या सांगलीच्या संभाजी पारगावकरच्या मते मातीवरच्या कुस्तीत तासभर खेळून होत नाही एवढी दमछाक गादीवर दोन मिनिटांत होते. इतरांचे अनुभवही काही यापेक्षा वेगळे नाहीत. चंदगीराम निकाली लढत नाही हा आरोप तर या कुस्ती या संदर्भात हास्यास्पद आहे. तासन्तास लढणे तुम्हाला मान्य नसेल तर मग बेमुदत हा शब्द वापरता कशाला? विष्णु सावर्डे आणि मारुती मानेची कुस्ती अत्यंत प्रेक्षणीय होऊन पावणेतीन तास चालली होती आणि बेमुदत निकाली हा शब्द पाळण्यासाठी गॅसबत्त्यांच्या प्रकाशातपण कुस्ती चितपट झाली हा इतिहास विसरता कसा येईल!

हे सारे लिहिणे म्हणजे जागे असलेल्याला पण झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करण्यासारखे आहे याची मला जाणीव आहे. ते कसे जमणार? ठेकेदारांना ज्यांची इज्जत वाढवावयाची असेल त्यांच्या कुस्त्या ते मध्येच बरोबरीने सोडवितात. दुसऱ्या पहिलवानाला त्यामुळे पक्षपाती वागणूक मिळते. चंबाच्या नावामागे आता हिंदकेसरी मास्टर चंदगीरामबरोबर बरोबरीने झुंजलेला, अशी पदवी लागेल. चंदगीरामचा भाव वाढलाच आहे त्याबरोबर चंबाचा आपोआपच वाढेल. प्रेक्षकांना निकाली कुस्ती आव्हानाप्रमाणे बघावयास मिळणे आणि चंदगीरामला संपूर्ण संधी मिळणे या गोष्टी त्या मानाने किरकोळ आहेत. नाही का?

माझ्या या मताला महंमद हनिफसारख्या नावाजलेल्या पहिलवानाची पुष्टी मला कुस्त्यानंतर तो भेटला त्या वेळी मिळाली. त्याच्याही मते निकाली कुस्त्यांची दंगल हे आजकाल ठरवून रंगवलेले नाटक झाले आहे.

आंतरराष्ट्रीय कुस्तीत महाराष्ट्राची शान वाढवण्याचे तूर्त राहू द्या. निदान महाराष्ट्रातील कुस्त्यांना तरी योग्य ते वळण लावून दाखविण्याचे धाडस महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद दाखविल काय?

----

पैलवान चंबा मुतनाळे

खुराक आणि तयारी

चंबाचा रोजचा आहार- दररोज एक कोंबडी. सकाळ संध्याकाळ 100 बदामाची थंडाई. 15 भारलोणी. तीन शेर दूध. पावशेर तूप व फ्ले. शरीरयष्टीची मापे - वजन 185 पौंड, छाती 42 इंच, गळा 17 इंच, मांड्या 27 इंच, घोटा 9 इंच, उंची 5 फूट 6 इंच, दंड 15 इंच, मनगट 9 इंच, पिंडरी 14 इंच.

चंदगीराम संपूर्ण शाकाहारी. सुमारे चार शेर दूध पावशेर. तूप. 100-150 बदाम. फळे, पालेभाज्या, नळी, चपाती भरपूर.

वजन 150 पौंड, उंची 6 फूट, 3 इंच, छाती 41 इंच, दंड 14 इंच, गळा 15.5 इंच, मनगट 9 इंच, मांड्या 25 इंच, पिंडरी 13 इंच, घोटा 8 इंच.

(पूर्वप्रसिद्धी : माणूस, 10 एप्रिल 1971)

- डॉ. नरेंद्र दाभोलकर


क्रीडांगण सदरातील या आधी प्रसिद्ध झालेले सर्व लेख वाचा या लिंकवर

Tags: नरेंद्र दाभोलकर अंनिस सामाजिक कार्यकर्ता माणूस साप्ताहिक श्री. ग. माजगावकर क्रिडा नरेंद्र दाभोळकर खेळ क्रिकेट सामना Load More Tags

Add Comment