संस्थानिकाने पदरी मल्ल बाळगावेत तसे मोठ्या कंपन्या हल्ली नावाजलेले कबड्डीचे खेळाडू नोकरीला ठेवतात. तीन-चार खासगी संघांतले खेळाडू एका संघात. तुलनेने कमकुवत असलेले खासगी संघ त्यामुळे व्यावसायिक संघापुढे क्वचितच टिकाव धरतात. स्वतःच्या संघातून खेळात मोठे व्हायचे, नावाला यायचे आणि कंपनीत नोकरी मिळाली की पुन्हा आपले त्या संस्थेने नवीन खेळाडू तयार करावयाला सुरुवात करायची. शिवाय तो खेळाडू जरी संघातून खेळला तरी तो एकटा संघ झुंजवायला कितपत टिकाव धरणार? खासगी संघाच्या वाढीवर हे मोठेच आक्रमण अप्रत्यक्षपणे होऊन बसले.
उन्हाळी मोसमातील कबड्डी हंगामाचा नारळ सोलापुरात जय भवानीच्या मैदानावर फुटला. दहा हजार प्रेक्षकांनी मोठ्या हौसेने त्याला साथ दिली.
मध्यंतरी चार वर्षे बंद पडलेला क्रीडा महोत्सव जय भवानी मंडळाने चालू केला याबद्दल त्यांचे अभिनंदन. कबड्डी क्षेत्रातील ही एक चांगली परंपरा आहे. जे संघ महाराष्ट्रातली अनेक मैदानं स्वतः गाजवितात ते आपल्या सामन्याचे मैदान गाजविण्यासाठी दुसऱ्या संघांना आमंत्रित करतात. मुंबईचा विजयबजरंग, सांगलीचा तरुणभारत, पुण्याचा राणाप्रताप ही याची उदाहरणे. विजयबजरंगची चांगली परंपरा गेले दोन वर्षे खंडित झाली आहे. याउलट तरुणभारतनं मध्यंतरी बंद पडलेली परंपरा पुन्हा मोठ्या मानाने चालू केली आणि यंदा रौप्य महोत्सवी सामने ते भरवीत आहेत. जयभवानी संघाचे हे सामने भरविण्याचे सोळावे वर्ष.
सोळावं वरीस काही सामने भरण्याच्या संघाला धोक्याचे नसते. पण यंदा मधल्या काही वर्षांच्या पोकळीपुढे सोलापूरकरांना थोडा त्रास झाला खरा. महाराष्ट्रातील बरेचसे नामवंत संघ या सामन्यात उतरू शकले नाहीत. सर्व खर्चाची व्यवस्था सोलापुरकरांनी स्वीकारल्यावर यापेक्षा अधिक भरघोस प्रतिसाद त्यांना मिळायला हवा होता.
‘ब’ गटात मुंबईच्या ओम बजरंगला बडगी (हुबळी) श्रीकृष्ण मंडळ सोलापूर याचा पराभव करण्यास फारसा त्रास पडला नाही. मात्र श्रीकृष्णच्या राम गायकवाडने यांना चांगले झुंजविले. ब गटात होते अवघे दोन संघ. शिवशक्ती आणि बाळीवेस मंडळ, सोलापूर यांच्यातला हा सामना अगदी एकतर्फी झाला. ‘बाळीवेस’च्या नावाजलेल्या संघाचा गेले काही वर्षे दर्जा घसरत चालला आहे. ‘क’ गटात मुंबईचा विश्वशांती संघ होता. अंजुमन आणि सिद्धेश्वर हे दोन्ही या गटांतले अगदीच नवखे संघ. त्यांच्याबद्दल न लिहिणे बरे. स्थानिक संघांनी आपल्या गावात अ. भा. पातळीवरील स्पर्धा भरत असताना भाग घावा, हे एक सर्वमान्य धोरण आहे. पण तरीही संघाच्या दर्जाबाबत काही किमान पातळी नको का? सामन्यांचा दर्जा कमी होतो की नाही, याचा विचार नक्कीच व्हावयास हवा. मुंबईमध्ये कबड्डीचे सुमारे 600 संघ आहेत. त्यांपैकी काही थोडे संघ ‘अ’ दर्जाचे मानले जातात. काही निवडक स्पर्धांतच हे संघ भाग घेतात. आणि इतर अनेक स्पर्धा ह्या ‘ब’ दर्जाच्या संघासाठीच फक्त खेळवल्या जातात. मुंबईबाहेर अशी विभागणी थोडी अवघड असली, तरी ती झाली तर स्वतःचा दर्जा टिकवण्यासाठी आणि नसलेला दर्जा मिळवण्यासाठी. त्यामुळे निकोप स्पर्धा चालू होऊन कबड्डीचे काही भले होईल अशी शक्यता निश्चितच आहे.
‘ड’ गटातला तरुणभारत व्यायाम मंडळ सांगली आणि बालवीर भैय्या हा सामना रंगला. खरे म्हटले तर सर्व गटांतल्या साखळी पद्धतीच्या सामन्यांत एवढ्याच सामन्याने काय ते नेत्रसुख दिले. मागील वर्षी बाळीवेसच्या सामन्यात स्टेट बँकेच्या बलाढ्य संघाला अंपत्य फेरीत नामोहरम करणारा हा संघ भारतीय रेल्वेच्या संघातला खंदा खेळाडू अंबादास यामधून खेळतो आहे. तरुणभारतचा संघ महाराष्ट्रातला जुना आणि नामवंत. या सामन्यामध्ये सुरुवातीच्या वर्षात लागोपाठ दोनदा अजिंक्यपद मिळवलेला. तरुणभारतला पहिल्यापासूनच पिछाडी तोडण्याचा प्रयत्न करावा लागला. त्यांच्या कोपरारक्षक मोरेने अंबादासला अवघ्या तीन खेळाडूंत पायात सूर मारून अप्रतिम पकडले. तेही दोनदा. त्यामुळे संघ सावरला आणि अनिल दलवाईला चढाईत एकदम मिळालेल्या गुणाने हा हातातून निसटणारा विजय तरुणभारतला मिळवता आला. यातून छ. शिवाजी व्यायामशाळा आणि तरुणभारत हे दोन संघ बाद पद्धतीच्या सामन्यात गेले.
बाद पद्धतीच्या उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत आमच्या लाडक्या कबड्डीचे सारे दोष आणि मर्यादा उघड्या झाल्या. छत्रपती व्यायामशाळा विरुद्ध ओम बजरंग, बाळीवेस सोलापूर विरुद्ध विश्वशांती मुंबई, श्रीराम संघ सोलापूर आणि तरुणभारत सांगली आणि शिवशक्ती मुंबई व श्रीकृष्ण सोलापूर- असे उपांत्यपूर्व फेरीचे चार सामने. हे सर्व सामने कमालीचे एकतर्फी झाले. पहिला गुण एकदा हातात आल्यानंतर पोलादी क्षेत्ररक्षणाच्या जिवावर तो टिकवून सामना सहजगणे एकतर्फी जिंकणे हे तंत्र आता महाराष्ट्रातल्या अनेक संघांना सहज साध्य झाले आहे. नाव घेण्यासारखे चढाईबहाद्दर नवीन 20-22 च्या पिढीत क्वचितच तयार होताना दिसतो. त्यामुळे मग हे तंत्र अधिकच सोपे झाले आहे. याचा नेमका उलटा परिणाम खेळाच्या रंगतदारपणावर होतो. पहिला गुण हा निर्णायक ठरत असल्याने, तो न गमावण्यासाठी संथ व बचावात्मक खेळाचा पवित्रा दोन्ही संघाकडून घेतला जातो. त्यातही कोंडी फोडण्यासाठी एखाद्या खेळाडूने असा उत्साह कोणी दाखवला आणि तो अपयशी झाला तर त्याचा संघ बहुधा हमखास हार खातो आणि मग तो फुकटच्या दोषाचा धनी ठरतो.
उपांत्य सामन्यात असे झाले. तरुणभारत व्यायाम मंडळाच्या बच्चू हवाईने पहिल्या काही मिनिटांतच शिवशक्ती संघाच्या परशुराम कांबळीच्या पायात सूर मारला. आणि दुर्दैवाने त्यांच्या संघाला दोन गुण गमवावे लागले. आणि त्यानंतर पुढची 30 मिनिटे याच गुणसंख्येवर रटाळ, रडी कबड्डी खेळली गेली. सामन्यात रंगत यावी म्हणून बच्चूने केलेल्या प्रयत्नांचे हेच यश काय? पहिला गुण जाऊ नये म्हणून आधी नामर्दपणे खळणारे संघ बघायचे आणि पहिला गुण केल्यावर एकतर्फी चुरसहीन सामने बहुतेक वेळा बघायचे, अशी मोठी विचित्र कोंडी सध्या कबड्डीची होऊन बसली आहे. वेळाच्या विकासावर अनेक उपक्रम करणारी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन या प्रश्नावर क्रीडारसिकांनी संतापावे इतकी उदासीन आणि निष्क्रिय आहे. सध्यातरी चमकदार कबड्डी बघण्यासाठी क्रीडारसिकांना नशिबावरच हवाला ठेवायला लागतो.
सोलापूरकर हे मनापासूनचे कबड्डी शौकीन आहेत. बहुधा त्या इच्छाशक्तीनेच नशीब त्यांना अनुकूल झाले असावे. कारण पुरुष, महिला व वजनी गटातील तिन्हीही अंतिम सामने अत्यंत प्रेक्षणीय झाले.
शिवशक्ती आणि ओम बजरंग हा मुंबईच्याच दोन संघांतील सामना अपेक्षेपलीकडे रंगला. पांडुरंग साळुंखेला ओम बजरंगच्या मध्यरक्षकाने काढलेला एकेरी पट फसला आणि हातात आलेल्या गुणाच्या साह्याने शिवशक्तीने ओम बजरंगवर पुरे लोण लावले. हा लोण फिरवताना निदानरेषेवर आणि चढाईचा जो खेळ विरोधी संघाने केला तो पैसे वसूल करणारा होता. वेगवान, हलत्या ताकदीचा योग्य उपयोग करणारी आनंद गंभीरेची जी चढाई त्यालाच सर्वोकृष्ट चढाईच्या खेळाडूचे सुवर्णपदक मिळाले ते योग्यच असे सिद्ध करणारी होती. ओम बजरंगने हा सामना जिंकला. प्रेक्षकांना काही दर्जेदार पाहावयास मिळाल्याचे समाधान लाभले.
विभागातले महिलांचे सामने असेच अगदी एकतर्फी झाले. सन्मित्र संघ मुंबई, वाल्मिकी संघ मुंबई या दोन संघांत काहीच राम नव्हता. महिलांचे संघ कमी पडत असल्याने त्यांना धरून आणले असावे. ‘साधना केंद्र पुणे’ने त्यांना सरळसरळ हरविले. ‘ब’ विभागात नवयुग संघ मुंबई आणि चेतना क्रीडा मंडळ सोलापूर हे दोनच संघ. सुरुवातीच्या काही मिनिटांत चेतनाच्या हेमलता पाटीलने केलेल्या दोन पवडी आणि तिनेच बाद केलेले तीन गडी यांमुळे सामना रंगला; पण ही आघाडी चेतना टिकवू शकली नाही.
साधना केंद्र आणि नवयुगचा अंतिम सामना मात्र चांगलाच रंगला. साधनाचा संघ ताकदीने आणि खेळानेही सरस होता. संघनायक जोशी पहिल्यापासूनच चोख चढाया करत होती. साधना धारियाचीही तिला चांगली साथ होती. मुंबईचा संघ चढाई कमी असली तरी क्षेत्ररक्षण भक्कम होते. जयश्री कदमची पकडीची पद्धत प्रेक्षणीय होती. सामना चांगला रंगला पण अपेक्षेप्रमाणे साधनाची क्रीडासाधना फळाला आली.
115 पौंडाखालीलच्या वजनी गटात मागच्या वर्षाच्या स्टँडर्ड मिल या मुंबईच्या विजयी संघाला विकास मंडळ येळगी संघाकडून हार खावी लागली. गंगाराम घाणेकर आणि गजानन लाड या त्यांच्या दोन्ही खेळाडूंची चढाई उत्कृष्ट असूनही विकास मंडळाची प्रगती रोखू शकली नाही. त्यातच मध्येच घाणेकरच्या पायाला दुखापत झाल्याने मागील वर्षीच्या विजेत्याला उपांत्य फेरीतच गारद व्हावे लागले.
जय महांतवीर सोलापूर संघाला अंतिम सामन्यात भीमराव कोशीकरच्या चढाईने चांगली एका गुणाची आघाडी मिळाली होती. पण हे सारे पारडे येळगीकरांनी फिरवले. सौदागरच्या चढाईचा त्यांना खूप उपयोग झाला. तुकाराम सुर्यवंशींची पाठीमागून पळत जाऊन पाठ पकडण्याची पद्धत एवढी अप्रतिम होती की, शिवा पवारची आठवण व्हावी.
जेवणाची व्यवस्था आणि तीही उत्कृष्ट करून सोलापूरकरांनी खेळाडूंना खूश करून टाकले. गंमत म्हणून त्यांनी भोजन मंडपाबाहेर वही ठेवली होती, मते नोंदविण्यासाठी. सर्वच शेरे चांगले लिहिण्याचे एक आश्चर्य त्या वहीत नोंदवले गेले. पण भोजनव्यवस्था त्या प्रशंसेला पात्र होती खरी.
बक्षीस समारंभातल्या दोन गोष्टी मला खटकल्या. महिलांचे सामने संपल्यावर त्यांचा बक्षीस समारंभ घाईने उरकून टाकण्याची काय गरज? लगेच होणारा पुरुषांचा सामना झाल्यावर दोन्ही सामन्यांचा बक्षीस समारंभ एकत्र करणे उचित नाही का? तसेच पुरुषांच्या अंतिम सामन्याच्या मध्यंतराच्या वेळी सुमारे 20-25 मिनिटे दारूकाम आणि लेझीम यासाठी देण्याची काहीच गरज नव्हती. सामन्यानंतर हा कार्यक्रम सहज घेता आला असता. दोन डावांतला नियमाप्रमाणे असलेला पाच मिनिटांचा वेळ वाढविणे हे खेळाडूंना आणि प्रेक्षकांना कोणालाच आवडण्यासारखे नाही.
असो. कबड्डी मोसमाची ‘पहिली भवानी’ जय भवानीच्या सामन्याने सोलापुरात झाली. आता त्यातून निर्माण झालेले वातावरण सातारा, मुंबई, सांगली, औरंगाबाद, बंगलोर येथील मैदानावर कसेकसे आकारत गेले ते दिसेलच.
----
काहीतरी कारण काढून होणाऱ्या गोंधळाने ना खेळाडूचे भले होणार ना खेळाचे!
संस्थानिकाने पदरी मल्ल बाळगावेत तसे मोठ्या कंपन्या हल्ली नावाजलेले कबड्डीचे खेळाडू नोकरीला ठेवतात. तीन-चार खासगी संघांतले खेळाडू एका संघात. तुलनेने कमकुवत असलेले खासगी संघ त्यामुळे व्यावसायिक संघापुढे क्वचितच टिकाव धरतात. स्वतःच्या संघातून खेळात मोठे व्हायचे, नावाला यायचे आणि कंपनीत नोकरी मिळाली की पुन्हा आपले त्या संस्थेने नवीन खेळाडू तयार करावयाला सुरुवात करायची. शिवाय तो खेळाडू जरी संघातून खेळला तरी तो एकटा संघ झुंजवायला कितपत टिकाव धरणार? खासगी संघाच्या वाढीवर हे मोठेच आक्रमण अप्रत्यक्षपणे होऊन बसले.
महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनने मग नियम केला की, सामने भरविणाऱ्या संघांनी फक्त खासगी संघांचे वा फक्त व्यावसायिक संघांचेच सामने भरवावेत. सरमिसळ करू नये. यामुळे बेजोड लढत टळेल आणि खासगी संघ वाढतील ही अपेक्षा. त्याचप्रमाणे एका वर्षी व्यावसायिक सामने भरविले तर दुसऱ्या वर्षी खासगी संघाचे सामने भरवावेत असाही नियम केला. ऑगस्टमध्ये हे नियम करताना वा त्यानंतर आतापर्यंतही याबाबत कोणी शब्द काढला नाही. पण संघांना आमंत्रण देणे चालू झाले आणि एकदम गोंधळ उडाला. मागच्या वर्षी मिरजेच्या सामन्यात अजिंक्य असलेला ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ यंदा तेथे खासगी संघांचे सामने असल्याने जाऊ शकेना. तर सांगलीला यंदा रौप्य महोत्सवी सामनेपण व्यावसायिक. त्यामुळे मागच्या वर्षीच्या लक्ष्मीमाता संघाला तेथे कसे जाता येणार? सांगलीकरांना तर मधू पाटीलचा खेळ बघायची इच्छा. तीही त्यांच्या संघातून.
या सामन्यातून वादाला सुरुवात झाली. थोडी कटुता आली. आव्हान प्रतिआव्हानाची भाषा वापरली गेली. याचा फेरविचार व्हावा असा आग्रह पुढे आला. ऑगस्टमध्ये ठरावाला पाठिंबा देणारेच आता त्याच्यामागे ठरावावर टीका करू लागले.
ऑगस्टनंतर आताच ही जाग कोठून आली? योग्य दिशेने होणाऱ्या प्रयोगक्षमतेला विरोध का? या वेळच्या सामन्याचे निष्कर्ष बघून पुन्हा पुढच्या वर्षी बदल करण्याची मुभा आहेच ना? मग बंडाची भाषा कशाला?
प्रश्न आहे कबड्डी खेळ आणि त्याबरोबर खेळाडू आणि संघ वाढण्याचा. इतर भलत्याच गोष्टींना महत्त्व देऊन आणि त्यासाठी काहीतरी कारण काढून होणाऱ्या गोंधळाने ना खेळाडूंचे भले होणार ना खेळाचे.
(पूर्वप्रसिद्धी : माणूस, 8 मे 1971)
- डॉ. नरेंद्र दाभोलकर
क्रीडांगण सदरातील या आधी प्रसिद्ध झालेले सर्व लेख वाचा या लिंकवर
Tags: नरेंद्र दाभोलकर अंनिस सामाजिक कार्यकर्ता माणूस साप्ताहिक श्री. ग. माजगावकर क्रिडा नरेंद्र दाभोळकर खेळ क्रिकेट सामना Load More Tags
Add Comment