धुळे येथील कबड्डीच्या महाराष्ट्र राज्य चाचणी स्पर्धा

'माणूस'मधील 50 वर्षांपूर्वीच्या सदराची पुनर्भेट (3/22)

प्रातिनिधिक चित्र | sportzcraazy.com

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मुख्य ओळख अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते अशी आहे. त्यानंतर साधना साप्ताहिकाचे दीड दशक संपादक अशीही त्यांची एक महत्त्वाची ओळख आहे. मात्र आयुष्याच्या पंचविशीपर्यंत त्यांची मुख्य ओळख राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू अशी होती. त्यांना राज्य सरकारचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार दोन वेळा मिळाला होता. एकदा कबड्डीचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून, आणि दुसऱ्यांदा कबड्डी खेळातील अन्य योगदानासाठी (संघटक, पंच, कॉमेंटेटर, स्तंभलेखक, क्रीडाप्रसारक, इत्यादी प्रकारच्या).

अशा डॉ. दाभोलकरांनी माणूस साप्ताहिकात 1970 - 1971 मध्ये क्रीडांगण हे पाक्षिक सदर लिहिले. त्यात कब्बडी, कुस्ती, अन्य देशी खेळ यांच्यासोबत क्रिकेटवरही त्यांनी लिहिले आहे. या सदरातील एकूण 22 लेखांतून क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी आसुसलेले मन आणि एकूणच खेळांच्या विषयी असलेले त्यांचे प्रगल्भ विचार यांचे दर्शन घडते.  

तब्बल 50 वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले आणि त्यानंतर आजतागायत कुठेही  उपलब्ध नसलेले हे लेख, साधनेतील आमचा तरुण सहकारी समीर शेख याने 'माणूस'च्या अर्काइव्हमधून संकलित केले आहेत. डॉ. दाभोलकर यांच्या आयुष्यातील सुरुवातीचे हे पर्व किती रोमांचक असेल याची कल्पना तर या लेखमालेतून येईलच, पण 50 वर्षांपूर्वीच्या क्रीडा जगताची एक झलकही पाहायला मिळेल. डॉक्टरांच्या व्यक्तिमत्वातला फारसा समोर न आलेला पैलू दाखवणारे हे लेख आजही वाचनीय आहेत, यात शंकाच नाही. 31 जुलैपासून सलग 22 दिवस म्हणजे 20 ऑगस्ट या डॉक्टरांच्या स्मृतिदिनापर्यंत ही लेखमाला 'कर्तव्य'वरून पुनर्भेट म्हणून सादर करीत आहोत.

कबड्डीचा महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यासाठी धुळे येथे जे आंतरजिल्हा चाचणी सामने या महिन्याच्या सुरवातीला पार पडले ते अनेकार्थाने गाजले. प्रथम श्रेणीची कबड्डी स्पर्धा प्रथमच पाहणाऱ्या धुळ्याच्या क्रीडाशौकीनांनी मनमोकळेपणे दिलेली दाद, खेळाडूंचे ठेवलेले चोख आदरातिथ्य, बलाढ्य संघाचे अनपेक्षितपणे झालेले पराभव आणि निवडसमितीने सर्वांना दिलेले धक्के या सर्व घटनांनी स्पर्धा गाजविण्यात आपापला वाटा उचलला.

स्पर्धेच्या उद्घाटनाचे संचलन शानदार झाले. गणवेषाअभावी अथवा संघ वेळेवर न आल्याने मागील वर्षी काही संघांनी संचलनात भागच घेतला नव्हता, तर साधना मंडळासारख्या पुण्याच्या मान्यवर संघाने सूचना देऊनही स्वतःचा ध्वज न आणता पुठ्याच्या छोट्या तुकड्यावरच संघाचे नाव लिहून वेळ मारून नेली होती. या साऱ्या गोष्टी यावर्षी कटाक्षाने टाळण्यात आल्या. स्पर्धा वेळेवर सुरू करण्याचा संयोजकांचा मानस मात्र उद्घाटन करावयाला मान्यवर मंत्रीमहाशयच दीड तास उशीरा आल्याने फसला.

अखिल भारतीय कबड्डी संघटनांत महाराष्ट्र राज्याची कबड्डी संघटनाच सर्वात अधिक प्रभावी आणि कार्यक्षम समजण्यात येते आणि ते खरे आहे. असे असूनही महाराष्ट्रातल्या फक्त 13 जिल्ह्यांनीच स्पर्धेत भाग घ्यावा हे तितकेसे भूषणावह नाही. महिला कबड्डीचा प्रचार तर पुण्या-मुंबईबाहेर गेलेलाच नाही. त्यामुळे त्यांच्या निवड सामन्यात तर वैयक्तिक संघच भाग घेतात. पुरुषांच्या संघांची विभागणी तीन विभागांत आणि स्त्रियांच्या संघांची दोन विभागात केली होती.

‘अ’ गटात मुंबई, सातारा, उस्मानाबाद आणि नाशिक या चार संघांचा समावेश होता. योगायोगाची गोष्ट म्हणजे गेल्यावर्षीच्या सांगलीच्या चाचणी स्पर्धेतही पहिले तीन जिल्हे एकाच गटात होते. मात्र मागील वर्षी मुंबईच्या संघावर मात करून सातारकरांनी पहिल्यांदाच विभागाचे अजिंक्यपद मिळविले होते. मुंबईकरांनी यावर्षी त्याची सव्याज परतफेड केली. अर्थात सातारा जिल्ह्याचा संघही यावर्षी मागच्या तुलनेने बराच कमकुवत होता. उस्मानाबादकरांनी दोन वर्षांपूर्वीच्या चाचणी स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती, पण मागच्या वर्षी मात्र विभागातील साऱ्याच संघांकडून त्यांना नामोहरम व्हावे लागले होते. यंदा त्यांनी आपला फॉर्म पुन्हा मिळवला. सातारा संघावर त्यांनी सहजपणे मात केलीच पण अजिंक्यपद मिळवणाऱ्या मुंबई संघालाही त्यांनी चांगलेच झुंजविले. वसंत सूद अथवा विजू पेणकर यांना निदान रेषेवर यशस्वीपणे पकडणे सोपे खासच नव्हे पण आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने त्यांनी ते साध्य करून दाखविले. जाल कारभारीचा मध्य रक्षकाने काढलेला एकेरी पट खेळाडूचे मर्मस्थान अचूक ओळखण्याची झलक दाखवून गेला. थोडी घाई नडली म्हणून नाहीतर मुंबईकरांवर बाका प्रसंग ओढवला असता. नाशिकच्या नवशिक्या संघाचा पराभव करताना सातारच्या किसन काळेचा खेळ चांगला झाला.


हेही वाचा : सिद्दींचे खेळातील महत्त्व - ज्योती भालेराव-बनकर


‘ब’ गटात सोलापूर, सांगली, धुळे आणि औरंगाबाद या चार संघांचा समावेश होता. सोलापूर जिल्ह्याचा संघ नेहमीच बलवान असतो त्याप्रमाणे तो यंदाही होता. बच्चू हलवाई, घोडगे, पापा शिंदे यांच्या पुनरागमनामुळे सांगलीचा संघही मजबूत झाला होता. (मागल्या वर्षी काही अंतर्गत वादामुळे हे खेळाडू खेळलेले नव्हते.) धुळयाचा संघ अगदीच मामुली तर औरंगाबादचा साधारण होता. अर्थातच या दोन्ही संघांचा फारसा टिकाव सांगली, सोलापूरपुढे लागला नाही. यंदापासून केलेल्या नवीन नियमाप्रमाणे विभागातून फक्त एकच संघ वर घ्यावयाचा असल्यामुळे सांगली-सोलापूर या तुल्यबल संघांतला सामना अटीतटीचा ठरणार ही अटकळ होती. दोन बलाढ्य संघातला सामना ‘रड्या’ होतो हा अनुभव पहिल्या 40 मिनिटांच्या डावात आला. मग पुन्हा दुसरा 40 मिनिटांचा डाव खेळवण्यात आला. नाणेफेकीचा बोनस गुण सांगलीला मिळूनही सामना सोलापूरकरांनी जिंकला. दामोदर सहस्रबुद्धेसारखा सुज्ञ खेळाडू दोनदा फायर लाईनला स्पर्श होऊन बाद व्हावा हे त्या संघाचे दुर्दैव. आपला संघ वाचविण्यासाठी पापा शिंदेने केलेला प्रयत्न कौतुकास्पद होता. आपल्या चढायाच्या कौशल्याने एकेक गडी बाद करत एकूण चार गुण त्याने मिळविले. पण त्याची ही एकाकी लढत पराभवाचे विजयात रूपांतर मात्र करू शकली नाही.

पुणे, ठाणे, कुलाबा, जळगाव या जिल्ह्याच्या गटात पहिले दोनच संघ खरे. सोलापूरच्या संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा मान ठाण्याने मागच्या वर्षी पहिल्यांदा मिळविला आणि पुण्याच्या मातबर संघाचा पराभव करून यंदा तो कायम राखला. 20 फुटांवर जाऊन गडी बाद केल्यावर स्वतःचाच पाय पायात अडकून बाळ कोंडाळकर पडला आणि पहिल्या गुणाच्या बाबतीत ठाणेकर नशिबवान ठरले. पुणे संघात भरवशाचे आणखी चढाईबहाद्दर नव्हते (आणि नसतातच हे कटु पण सत्य) त्यामुळे त्यांनी निदान रेषा बंद करण्याचा हुकमी डाव टाकला. ज्योतिबा पाटीलने शिवाजी जगतापच्या अंगावरून सफाईदार उडी घेतली आणि तो डाव पुणेकरांच्यावरच उलटला. पहिल्या गुणावर मिळालेली आघाडी ठाणेकरांनी कायम राखली खरी पण पुण्याच्या पंढरीनाथ जाधवच्या त्यांनी केलेल्या पकडीत त्यांना पुन्हा एकदा नशिबाने हात दिला हे मान्य करावयास हवे.

बाद पद्धतीच्या स्पर्धेत मागील वर्षीची मुंबई-ठाणे ही जोडी पुन्हा उपांत्य फेरीत भेटली आणि मागील वर्षीप्रमाणेच मुंबईने ठाण्यावर एकतर्फी मात केली. अंतिम सामना झाला मुंबई आणि सोलापूरमध्ये. मुंबईकरांनी पहिला गुण पकडीवर मिळवला आणि त्यानंतर दोन्ही आघाड्यांवर बराच वेळ सामसूम होती. मुंबईच्या कोपरारक्षकाने गुराप्पा पारशेट्टीला पायात सूर मारून पकडण्याचा प्रयत्न अगदीच अकारण केला आणि स्वतःबरोबर सूदचा मोलाचा गुणही तो गमावून बसला. शेखर शेट्टीने पुढच्याच चढाईत लाथेने बाद करून मिळवलेला गडी हा केवळ जोरदार अपिलाचा (आणि गड्याला स्पर्श न झालेला चपळ हालचालीचा) बळी होता. वसंत सूदने त्यानंतर कोपऱ्यावरून पळत जाऊन मौला इनामदाराची केलेली पकड ही मात्र अगदी खासच प्रेक्षणीय होती.

मुंबईकडून या सर्वच सामन्यांत वसंत सूद चढाई आणि क्षेत्ररक्षण या दोन्ही आघाड्यांवर मिळून सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. शेखर शेट्टी काणि विजू पेणकर यांनी त्याला उत्कृष्ट साथ दिली.

महिला सामन्यांत बरेच सामने झाले. एकतर्फी, एखादा अगदी बचावात्मक आणि थोडे रंगतदार. धुळे अथवा उस्मानाबादचे महिला संघ हे अगदीच नवशिके तर राणाप्रताप आणि जॉफे मॅनर्स या संघांनी 40 मिनिटांच्या सामन्यानंतरही गुणफलक कोरा ठेवून आम्ही पुरुषांच्या मागे नाही हे सिद्ध केले. नवयुग क्रीडा मंडळ आणि राणाप्रताप, पुणे, अथवा विश्वशांती मुंबई हे काही गाजलेले सामने. पहिल्या सामन्यात चित्रा नाबरच्या चढायांना मध्यंतरानंतर नीलिमा पुसाळकर आणि हेमा गोडसेने चोख उत्तर दिले आणि सामना 12-12 असा समान गुणांवर आणला. विश्वशांती आणि साधना मंडळ, पुणे हा उपांत्य आणि नंतर नवयुग क्रीडा मंडळाशी अंतिम सामना गाजवला विश्वशांतीच्या छाया बांदोडकरने. तिच्या चढाईच्या खेळाचा खास उल्लेख करावा लागेल. अर्थात नवयुग क्रीडाच्या मृदुला मडईकरे आणि क्रांती व चित्रा नाबर या भगिनींनी सामना 14-3 असा जिंकून मुंबईच्या दादोबा गावडे ढाल स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढला हे मात्र खरे.

पुरुषांच्या महाराष्ट्राच्या संघाची निवड याबाबत भरपूर वावड्या उठत होत्या. कर्णधार म्हणून मुंबईचा वसत ढवण, वसंत सूर आणि शेवटी शेवटी जाल कारभारी. त्याबरोबरच सोलापूरच्या गुराप्पा पारशेट्टीचे नाव घेतले जात होते. चढाई आणि क्षेत्ररक्षण या दोन्हीमधील खेळाडूंची चाचणी स्पर्धेतील कामगिरी, त्यांचा या सिझनमधील फॉर्म, नेतृत्वाची कुवत या गोष्टींचाच प्रामुख्याने विचार करावा असे मला वाटते. या सर्व कसोट्यांवर वसंत सूद हा वसंत ढवणला उजवा असल्याने त्याला हा मान का दिला नाही हे माझ्याप्रमाणेच अनेक जणांचे प्रश्नचिन्ह आहे. इंदूर, नागपूर, मुंबई या गेल्या तीन वर्षांतील अखिल भारतीय स्पर्धेत महाराष्ट्र संघातही ज्याचा समावेश घेऊ शकला नाही त्या वसंत ढवणचा फॉर्म यंदा एकदम सुधारला काय? आणि तसे असेल तर चाचणी स्पर्धेत त्याचे प्रत्यंतर यावयास नको काय! का तरुण रक्ताला वाव देण्याची घोषणाबाजी सर्व क्षेत्राप्रमाणे याही क्षेत्रात चालू आहे? गुराप्पा पारशेट्टीची उपकर्णधार म्हणून झालेली निवड हो या स्पर्धेतील त्याचा खेळ पाहता योग्यच म्हणावी लागेल (अर्थात उपसंघनायक हाही काही सामन्यांच्या वेळेस पद्धतशीरपणे बाहेर ठेवण्यात येतो हा यापूर्वी आलेला कटु अनुभव त्याला येणार नाही ही आशा.)

महिला संघाची कर्णधार म्हणून चित्रा नाबरच्या झालेल्या निवडीबद्दलही विस्मय वाटतो. तिच्या आक्रमक चढाईबद्दल दुमत नाही पण परिस्थितीप्रमाणे संघाचे धोरण आखणे आणि सर्व खेळाडूंना बरोबर घेऊन ते संयमितपणे आणि नेमकेपणाने कार्यान्वित करणे यामध्ये ती या स्पर्धेतील सर्वोकृष्ट खेळाडू होती असे मला वाटत नाही. नीलिमा पुसाळकरकडे नेतृत्व येणार ही शेवटी हूल ठरली. का मागच्या वर्षी पुण्याची वासंती सातव झाल्यावर यंदा मुंबईकडेच मानाचे पान जावयास हवे असे आहे?

महाराष्ट्र संघाचे दार अनेक वर्षे ठोठावणाऱ्या सांगलीच्या पापा शिंदेने चढाई आणि पकडीचा चतुरस्त्र खेळ करूनही त्याची निवड न करण्यात मला त्याच्यावर अन्याय झाला असे वाटते. विजू पेणकरला पण डावलावयास नको होते.

सांगली, सातारा आणि पुणे जिल्हे एकूण बरेच नाराज दिसले. या नाराजीची कारणे कबड्डी संघटक प्रामाणिकपणे शोधतील आणि खेळाडूही कटुता विसरून महाराष्ट्रात आणि भारतात कबड्डीची शान वाढविण्यास धडपडतील ही अपेक्षा!

कटुता टाळणे शक्य आहे

मागील वर्षी महाराष्ट्र राज्याला आपल्या संघनायकत्वाखाली अखिल भारतीय अजिंक्यपद मिळवून देणारा मधू पाटील यंदा मुंबई जिल्ह्याचाही संघनायक होऊ शकला नाही, तर मागील वर्षी मुंबई जिल्ह्याच्या 12 खेळाडूंमध्येही न बसल्याने चाचणी स्पर्धेतही न उतरलेला वसंत ढवण यंदा प्रथम मुंबई जिल्ह्याचा आणि मग महाराष्ट्राचा संघनायक म्हणून निवडला गेला. खेळामध्ये मधू सरस आहेच पण विशेषतः कप्तान म्हणून त्याची बरोबरी करणारा एकही खेळाडू आज महाराष्ट्रात नाही हे सारे खेळाडू आणि तज्ज्ञ मनमोकळेपणे मान्य करतात. या मानहानीमुळे मधू रागावला असेल तर मी ते योग्य म्हणेन. खांदेपालट पाहिजे होता तर ताज्या दमाचा वसंत सूदसारखा सर्वोत्कृष्ट खेळाडू का नको! नेतृत्वात तो तुलनेने मधूला कमी असेल पण तरीही मुंबईच्या या हंगामातील आतापर्यंतच तीन अजिंक्य-पदे स्वकर्तृत्वावर संपादून आपला विशिष्ट दर्जा त्याने निश्चितच सिद्ध केला आहे. निवड करताना खेळाशी संबंधित बाबींचाच विचार केला जावा ही रास्त अपेक्षा. मुंबईमध्ये खूप गुणवान खेळाडू आहेत हे मान्य करूनही आणि त्यामुळे काहींची नाराजी स्वाभाविक समजूनही निवड निःपक्षपाती होतेच असा विश्वास आज सर्वसामान्य खेळाडू व्यक्त करत नाही. लक्ष्मण पिरवडकरला या आधीच्या दोन वर्षांत ज्या पद्धतीने आणि ज्या कारणाने डावलले जाते ते याला पुरावाच देतात. निवड समितीला संपूर्ण स्वातंत्र्य असले तरी ज्या निकषाच्या साहाय्याने निवड होते त्यांची सर्वमान्य रूपरेखा झाल्यास विनाकारण वाढणारी कटुता टाळण्यास निश्चितच मदत होईल.

(पूर्वप्रसिद्धी : माणूस, 19 डिसेंबर 1970)

- डॉ. नरेंद्र दाभोलकर

Tags: नरेंद्र दाभोलकर अंनिस सामाजिक कार्यकर्ता माणूस साप्ताहिक श्री. ग. माजगावकर क्रिडा नरेंद्र दाभोळकर खेळ क्रिकेट सामना Load More Tags

Add Comment