वस्तादों का वस्ताद : गुरू हनुमान पहिलवान

'माणूस'मधील 50 वर्षांपूर्वीच्या सदराची पुनर्भेट (16/22)

लहानपणापासून मुलाला पहिलवानकी शिकवण्याची कल्पना रम्य आणि फलदायी असली तरी चांगलीच कष्टाची आहे. स्वतःचे खासगी आयुष्य मग राहतेच कुठे? कुस्तीच्या आणि चेल्यांच्या उत्कर्षासाठी सारे जीवन अर्पण करणाऱ्या गुरू हनुमानसिंग यांसारख्या एखाद्या वस्तादालाच हे शक्य आहे. त्यांच्या बिर्ला व्यायामशाळेत आज 40 छोट्यामोठ्यांच्या पालनपोषणासह सर्व जबाबदारी घेऊन आखाड्याची आराधना चालू आहे. आजच नव्हे गेली सुमारे 40 वर्षांची ही परंपरा आहे. तांबडी माती हाच त्यांचा निवारा आणि शिष्यांचे फोटो आणि बक्षिसे हाच संसाराचा पसारा.

नागपूरच्या मैदानावर माझा दुहेरी लाभ झाला होता. चांगले सामने खेळण्यासाठी मिळालेच आणि वंडरबॉय वेदप्रकाशची त्याचे वस्ताद गुरू हनुमान पहिलवानांच्या समवेत गाठ पडली.

सत्तरीच्या घरात पोहोचलेले शरीर, पण पांढरे केस सोडले तर त्याची इतर कोणतीच निशाणी शरीरावर दिसत नव्हती. कणा ताठ होता, दृष्टी अभेद होती. वाणीत आत्मविश्वास होता. स्वतःच्या मताबद्दल ठामपणा होता.

त्यांच्या मते कुस्ती हा भरपूर श्रमाचा आणि आपल्या वस्तादावरील अभंग निष्ठेचा पेशा आहे. पहिलवानाचा गुरू हाच त्याचा पालक. त्याच्या पद्धतीप्रमाणेच पहिलवानाने राहिले पाहिजे, वागले पाहिजे. आणि तरच तो वाढेल. कोणाशी कुस्ती लढवायची हे वस्तादच ठरवू शकेल, ते त्याने मानले पाहिजे. एका महिन्यात चारपेक्षा अधिक कुस्त्या खेळू नयेत, ह्या गावाहून त्या गावी छोट्या-मोठ्या जत्रेत अशा कुस्त्या करत लढणारा पहिलवान कदाचित नाव कमावीलही पण कसा कमावील? भारतकेसरी चंदगीरामसारख्या नामवंत पहिलवानाला ‘वीर घटोत्कच’सारख्या व इतर कुठल्याही सिनेमात काम करण्याची दुर्बुद्धी सुचावी याबाबत ते अतिशय नाराज आहेत. पहिलवान हा स्वभावाने नम्र असलाच पाहिजे यावरही त्यांचा कटाक्ष आहे.

त्यांचा जन्म संपन्न घराण्यात झाला आणि दहाव्या वर्षापासून त्यांना लाल मातीची ओढ लागली. कुस्तीगीर म्हणून नावलौकिकाला येण्यासाठी मात्र त्यांना पुढे वयाच्या 20 वर्षांपर्यंत थांबावे लागले. नामवंत पहिलवान रिसाउसिंह हे त्यांचे गुरू. स्वतःला कुस्तीची साधना सुरू करण्यात उशीरच झाला असे मात्र त्यांना वाटते. तीन-चार वर्षांपासूनच जर हे शिक्षण मिळाले तर तो पुढे अधिक चांगला पहिलवान होतो असा त्यांचा अनुभव आहे. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या गोगाने एकाच आठवड्यात हिंदकेसरी गणपत आंदळकर आणि सादिक पंजाबीला कोल्हापूर मुक्कामी अस्मान दाखविले होते. त्याच्या यशाचे रहस्य सांगताना कोल्हापूरचे एक प्रसिद्ध वस्ताद मला म्हणाले होते, ‘‘अहो, गामा-गुंगाच्या घराण्याचे हे वंशज. पोर आईच्या उदरात असल्यापासून पोरावर कुस्तीचे संस्कार चालू होतात. आईच्या खुराकापासून पोराची पहिलवानकी चालू होते. जन्माच्या पहिल्या दिवसापासून त्याला नामवंत कुस्तीगीर करण्याचे ठरवून सारी देखभाल केली जाते. नाहीतर आपल्याकडे महमद हनीफसारख्या पहिलवानाला वयाच्या 10-12 वर्षांपर्यंत हॉटेलात कपबशा विसळाव्या लागतात आणि मग लोकांच्या आश्रयावर त्यांची वाढ चालू होते. यांची बरोबरी होणार कशी?"

लहानपणापासून मुलाला पहिलवानकी शिकवण्याची कल्पना रम्य आणि फलदायी असली तरी चांगलीच कष्टाची आहे. स्वतःचे खासगी आयुष्य मग राहतेच कुठे? कुस्तीच्या आणि चेल्यांच्या उत्कर्षासाठी सारे जीवन अर्पण करणाऱ्या गुरू हनुमानसिंग यांसारख्या एखाद्या वस्तादालाच हे शक्य आहे. त्यांच्या बिर्ला व्यायामशाळेत आज 40 छोट्यामोठ्यांच्या पालनपोषणासह सर्व जबाबदारी घेऊन आखाड्याची आराधना चालू आहे. आजच नव्हे गेली सुमारे 40 वर्षांची ही परंपरा आहे. तांबडी माती हाच त्यांचा निवारा आणि शिष्यांचे फोटो आणि बक्षिसे हाच संसाराचा पसारा.

या बिर्ला व्यायामशाळेच्या उभारणीचा इतिहास स्फूर्तिदायी आहे. 1924 सालात दोन टांगेवाल्या गुंडांच्या तावडीतून हनुमानसिंगांनी एका महिलेला सोडवले. त्याच्याच टांग्याच्या चाबकाचा त्यांनी चांगला उपयोग केला. या धैर्याची जुगलकिशोरी बिर्लाशेटनी कदर केली आणि त्यांना ही व्यायामशाळा बांधून दिली आणि त्यांचा इतर सर्व खर्चही उचलला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारे अनेक कुस्तीगीर या व्यायामशाळेने सतत तयार केले. सज्जनसिंह, रामधन, सुरजभान हरपाल सिंह, रंधवासिंह, अमृत, रूपचंद, वेदप्रकाश, सुरेश कुमार ही काही नावे. दिल्लीतला सर्वात जुना आणि सर्वात नावाजलेला असा हा आखाडा. ‘लवकर निजे लवकर उठे’ हे कुस्तीच्या पेशात फार उपयोगी ठरते असे त्यांचे मत. पहाटे चार वाजता मेहनत चालू व्हावयास हवी. उन्हाळयाच्या दिवसांत थंडाई अगर सरबत पिऊन मग व्यायामाला सुरुवात केली तर ते अधिक फलदायी. भारी वजनाची डंबेल्स किंवा जड फावड्याने आखाडा उकरणे असले व्यायाम सुरुवातीला नव्या पहिलवानाने टाळावेत.

मेहनतीपेक्षा लढतीवर त्यांचा अधिक भर आहे. प्रत्यक्ष कुस्ती हीच अधिक फलदायी असे त्यांना वाटते. पहिलवानाने नेहमीच आपल्यापेक्षा भारी वजनाच्या पहिलवानाशी लढत द्यावी हेही त्यांना तितकेसे पटत नाही. बरोबरीच्या पहिलवानाबरोबर होणारी लढत ही अधिक कसाची होते असे त्यांचे मत आहे.

ते शाकाहाराचे पूर्ण समर्थक आहेत. त्यांच्या हाताखालचे बहुतेक सर्व पहिलवान त्यामुळे शाकाहारच घेतात. बदामाची लस्सी ही पहिलवानाला बाराही महिने अत्यंत फायदेशीर, तुपापेक्षा लोणी अधिक उपयुक्त. दुधात तूप मिसळून पिणे अगदी खवा खाणे हे मात्र आहार म्हणून अहितकारक अशी त्यांची मते. रात्रीची आवश्यक तेवढी झोप नियमितपणे घेतली नाही तर साऱ्या परिश्रमावर पाणी फिरते असे त्यांना वाटते.

मातीवरच्या कुस्तीबरोबरच गादीवरची कुस्तीही त्यांना अवगत आहे. ती कुस्ती त्यांना अधिक कसाची वाटते. दोन्ही प्रकारच्या क्षेत्रांत आपल्या शिष्यांचे आाणि व्यायामशाळेचे नाव सतत उज्ज्वल राहावे म्हणून ते अखंड धडपडत असतात.

याही वयात ते अजून सकाळी हजार जोर-बैठका मारतात. आखाड्यात उतरून डावपेच शिकवतात. चार शेर दूध, दीड पावशेर तूप, अर्धा शेर बदाम आणि फळे व भाज्या हा त्यांचा आजचा आहार आहे.

आर्य समाज आणि त्याचे प्रवर्तक दयानंद यांच्या विचारांचा त्यांच्यावर जबरदस्त पगडा आहे. सर्व जातिधर्मांचे शिष्य एका घराप्रमाणे त्यांच्या व्यायामशाळेत वाढतात. वेदप्रकाश हा असाच अगदी बालपणापासून त्यांच्या देखरेखीखाली वाढलेला पहिवान आहे.

वेदकाळातील तपश्चर्येशी नाते सांगणाऱ्या या वस्तादाच्या 40 वर्षांच्या साधनेचा प्रकाश आता वेदप्रकाशच्या रूपाने साऱ्या जगभर पसरला आहे.

(पूर्वप्रसिद्धी : माणूस, 24 मार्च 1971)

- डॉ. नरेंद्र दाभोलकर


क्रीडांगण सदरातील या आधी प्रसिद्ध झालेले सर्व लेख वाचा या लिंकवर

Tags: नरेंद्र दाभोलकर अंनिस सामाजिक कार्यकर्ता माणूस साप्ताहिक श्री. ग. माजगावकर क्रिडा नरेंद्र दाभोळकर खेळ क्रिकेट सामना Load More Tags

Add Comment