एक गलथान संयोजन : अखिल भारतीय कबड्डी सामने - भिलाई (मध्यप्रदेश)

'माणूस'मधील 50 वर्षांपूर्वीच्या सदराची पुनर्भेट (14/22)

प्रातिनिधिक चित्र | hmoob.in

चार राज्यांचे खेळाडू जमले की गप्पा हमखास रंगतात. सामन्यांच्या आणि खेळाच्या. या वेळी मात्र निवडणुकीचा विषय सर्वांच्या डोक्यात पहिल्यांदा घोळत होता. दिल्लीतील सामान्य आणि गरीब जनतेचा पाठिंबा इंदिराजींना असल्याचे दिल्लीकर सांगत. उत्कल काँग्रेस विधानसभेच्या निवडणुकीत प्रभाव पाडू शकेल पण लोकसभेत इंडिकेटच येणार असे ओरिसावाले म्हणत. मध्यप्रदेशात लढत चुरशीची पण तरीही अधिक जागा सत्तारूढ काँग्रेसलाच मिळतील हा त्या भागातील खेळाडूंचा अंदाज. प्रत्यक्ष भिलाईत संघटना आणि सत्तारूढ काँग्रेसमध्ये सरळ सामना होता आणि तो चुरशीचा आहे असे सांगण्यात आले तरी प्रचाराच्या बाबतीत मात्र सारे कसे शांत शांत होते.

साहेब या देशात दीडशे वर्षे राहिला, त्याचे गुणदोष, आवडीनिवडीही काही प्रमाणात येथे रुजल्या. येथील वातावरणाशी विसंगत आणि या देशाला न परवडणारा क्रिकेट स्वतःचाच खेळ वाटावा इतक्या प्रेमाने येथे जोपासला गेला. 

महाराष्ट्राबाहेरही कबड्डीचे थोड्‌या प्रमाणात असेच झाले. ऐतिहासिक दाखले देता येतील इतका हा खेळ येथे जुना, धसमुसळा, रंगीला, शक्ती आणि युक्तीचा मिलाप साधणारा- ही येथली स्वभाववैशिष्ट्ये या खेळातही आलेली. ज्या ज्या प्रांतांत महाराष्ट्रीय मोठ्या प्रमाणावर गेले तेवढ्याच प्रांतांत कबड्डीचा खेळ खऱ्या अर्थाने वाढला. बंगलोर, बडोदा, इंदूर येथील अनेक संघांतले बहुतेक खेळाडू महाराष्ट्रीय असतात. एवढेच काय पण अखिल भारतीय सामन्यात येणाऱ्या म्हैसूर, गुजरात, मध्यप्रदेश राज्यांच्या संघांतही निम्म्याहून अधिक महाराष्ट्रीय नावेच आढळतात. अखिल भारतीय कबड्डीचे सामने मध्यप्रदेशात तीन ठिकाणी होतात. इंदूरला महानगरपालिकेतर्फे, उज्जैनला खाजगी क्रीडामंडळाकडून आणि भिलाई येथे पोलाद कारखान्याच्या क्रीडा विभागाकडून, नागपूर-विदर्भाहून भिलाईला आलेले महाराष्ट्रीय या कामात सर्वस्वी पुढाकार घेतात. भिलाईच्या सामन्यात यंदा भाग घेण्याचे आकर्षण दोन प्रकारचे होते. एक पोलाद कारखाना बघण्याचे आणि दुसरे अर्थातच सामन्याचे.

कोठेही उशीर न होता दोन दिवसांचा प्रवास संपवून आम्ही दुर्ग स्टेशनवर नेमके रात्री साडेनऊ वाजता पोहोचलो. सबंध सामन्यात नेमकेपणे ज्या थोड्या गोष्टी घडल्या त्यातही एक गोष्ट. बाकीच्या अनेक महत्त्वाच्या बाबतीत सगळा 'आनंदच' होता.

सामना समितीची कसूर नाही पण कमनशीब मात्र खरे. नुकताच दिल्लीचा अखिल भारतीय आंतरराज्यीय कबड्डी क्रीडा महोत्सव संपला होता. फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाची घरघर लागली होती. पण सगळ्या अडचणीमुळे निमंत्रित सोळांपैकी पुरुषांचे अवघे सहा संघ उपस्थित राहिले आणि महिलांनी तर त्याच्यावर ताण केली. आठपैकी अवघा एक संघ आलेला!

निवडणुकीत असो वा सामन्यात असो, अनपेक्षित अडचणी उभ्या राहिल्या की माणूस बहुधा गोंधळून जातो. पहिलाच अंदाज साफ चुकल्याने सामन्याचे संयोजक जे गोंधळले त्यातून स्वतःच निर्माण केलेल्या चुका त्यांना शेवटपर्यंत निस्तरता आल्या नाहीत.

सर्व ठिकाणाप्रमाणेच संघाची विभागणी चार गटांत केली होती. सामने होने अवघे तीन दिवस. त्यापैकीही पहिल्या दिवसाच्या संध्याकाळी सामन्याला सुरुवात झाली आणि सुरुवातीला संघ हजर होते अवघे सात. अगदीच तीन गटांत अवघा एक सामना घेऊन त्याच दिवशी गटविजेते पदांचे निकाल लागले. चौथ्या गटात तर काय नुसते शड्डू ठोकूनच अजिंक्यपद! कारण अवघा एकच संघ ना.

दुसऱ्या दिवशी सकाळी सुभाष मंडळाचा संच दाखल झाला. स्वतः सामने भरवत असूनही आचारसंहिता गुंडाळून भिलाई पोलाद कारखान्याने स्वतःचा संघच सामन्यात दाखल केला. शिवाय भिलाईने आणखी दोन फालतू संघांना संधी दिली आणि मग संघाने यांच्या वरताण ‘अक्कल’ लढवून चार विभागांचे दोन विभाग केले. आता सामन्याचा मामला कसा घसघशीत झाला. खेळाडूंना एका दिवशी चार अथवा पाच सामने खेळावयास लागतात याची फारशी फिकीर त्यांनी बाळगली नाही.

पहिल्या विभागात होते वंदेमातरम पुणे, सुभाष मंडळ नागपूर, वीर मंडळ रायपूर, भिलाई पोलाद कारखाना आणि भिलाईचे शिवाजी मंडळ. या विभागातले दोनच सामने गाजले. नागपूरकरांनी पुण्याबरोबर खेळताना प्रथम तीन गुणांची आघाडी मिळवली. निदानरेषा बंद करून पुण्याने ही पिछाडी तोडली आणि आणखी दोन गुण मिळवले. अगदी शेवटच्या चढाईत सुरेश कोंढाळकरने रीठेला विनाकारण धरण्याची घाई केली आणि सामना समान गुणावर आला. भिलाईच्या पोलाद कारखाना संघाने पुण्याचा सरळ सरळ पराभव केला. तर नागपूर आणि भिलाई सामना ठरवून खेळण्यात आला आणि गुणशून्य बरोबरी करण्यात आली. (मुंबईकरांच्या इतर अनुकरणाबरोबर हे ‘नसते गुण’ही लांबवर पसरू लागले हे काही चांगले लक्षण नव्हे.) ह्या बनावाने भिलाई आणि नागपूर संघ विभागात विजयी ठरले आणि पुणेकर विभागातच गळले. सर्व संघांच्या मर्यादा या सामन्यात उघड्या झाल्या. सुभाष मंडळाची मदार यंदा दिल्लीचे सामने गाजविणाऱ्या रीठे या खेळाडूवर सर्वस्वी होती. गुणही त्यानेच मिळवून द्यावयाचे आणि चौफेर क्षेत्ररक्षण करून ते सांभाळावयाचेही त्यानेच. बाकी एका खेळाडूला धड निदानरेषा ओलांडता आली तर नशीब. एकटा बाप कमवणारा आणि सारे चिरंजीव उधळणारे निघाले की जसा संसार व्हावा अगदी तसे या संघाचे सामने व्हायचे.

वंदेमातरम संघ हा बाळ कोंढाळकरशिवाय आलेला. आत्म्यावाचून कुडी तसा हा प्रकार. सामने जिंकण्याचे अमोघ अस्त्र बाळासाहेब. त्यांच्या अनुपस्थितीत केवळ बचाव करणे आणि गरज पडल्यास काही गुणांनीच रेषा बंद करून मिळवणे या पलीकडे ते काय करणार? त्यातही रडण्यासाठी विनाकारण केलेली घाई या संघाला नेहमीच नडली. भिलाईचा संघ तसा ठाकठीक. पण वेगवान हलत्या चढाईमुळे त्यांचे क्षेत्ररक्षण गोंधळे.

दुसऱ्या विभागात रुरकेला, दिल्ली, भोपाळ, सातारा, छत्तीसगड आणि भिलाई या संघांचा समावेश होता. महिन्यापूर्वी मराठा लान्सरच्या सामन्यात उप-अजिंक्यपद मिळवणाऱ्या भोपाळला विभागात सातारा आणि रूरकेला संघाकडून पराभव पत्करावे लागले. विनाकारण गरम घेऊन खेळण्याची सवय त्यांना नडली. खेळण्याचे तंत्र हा प्रकार दिल्लीच्या उंच्यापुऱ्या खेळाडूंच्या गावी नव्हताच. त्यामुळे यांच्या खेळाने प्रेक्षक खूश झाले तरी समोरच्या संघाला मात्र दुखापतीच्या भीतीने जपूनच खेळावे लागे. याउलट रूरकेला संघाने अल्पावधीतच चांगली प्रगती दाखविली. या विभागाचे अजिंक्यपद मिळवलेला सातारच्या श्री शिवाजी उदय मंडळाचा संघ सर्वच दृष्टीने श्रेष्ठ होता. चौफेर चढाया करणारे पाच चढाईबहाद्दर केवळ या एकाच संघात होते. सर्वांत तरुण खेळाडूंचा संघही हाच. या विभागातले उपविजेतेपद मिळाले रूरकेला स्टील प्लेटच्या संघाला.

विभागाची मोडतोड करून केलेल्या नवीन विभागाचे सामने संपल्यावर आणखी दोन गमती घडल्या. सर्व विभागीय सामने संपल्यावर उज्जैन आणि वेऱ्याचे संघ डेरेदाखल झाले. गोंधळलेल्या सामना समितीने त्यांना एक सामना खेळावयास दिला. सामन्याचा तो शेवटचा दिवस. विभागीय आणि बाद पद्धतीचे मिळून नऊ सामने त्या संघाला (जर जिंकत गेले नसते तर) खेळावयास लागले असते. हा मूर्खपणा सुदैवाने संयोजकांच्या लगेच लक्षात आला आणि त्यांनी चूक सुधारली. एका विभागातून दोन संघ वर घेण्याची प्रथा मोडून चार संघ वर घेण्याची एक नवीन प्रथा सामना समितीने नियमाच्या विरुद्ध आहे हे माहीत असतानाही ऐन वेळी जाहीर केली. बाद पद्धतीच्या सामन्याच्या जोड्या लावताना चिठ्ठ्या उचलण्याचा नियम मोडून इच्छेप्रमाणे जोड्या लावल्या गेल्या. बिचाऱ्या असहाय खेळाडूंनी या साऱ्यापुढे निमूटपणे मान तुकविली. मध्यप्रदेशाच्या कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष आणि अ. भा. कबड्डी संघटनेचे मान्यवर सदस्य आणि या सामन्याचे निरीक्षक यांच्या उपस्थितीत हा गोंधळ व्हावा यापेक्षा दुर्दैव ते काय?

बाद पद्धतीचे जवळजवळ सर्वच सामने गाजले. वंदेमातरम संघाबरोबर खेळताना हातातून गेलेले चार गुण पुन्हा जिंकून सातारच्या शिवाजी उदय मंडळाने सामना समान गुणांवर आणला आणि जादा वेळेत सामना जिंकलादेखील. अजून मिसरूड न फुटलेल्या सातारच्या विजय जाधवने ज्या बेदरकारपणे चढाया करून गडी बाद केले आणि ज्या धाडसाने गडी धरले तो खेळ डोळ्याचे पारणे फेडणारा होता. सांगलीच्या राज्य क्रीडा महोत्सवापासून गेल्या दोन महिन्यांत चार मोठया सामन्यांत मी या खेळाडूंचा खेळ बघत आहे. आणखी वर्षा-दोन वर्षांत ‘मधू पाटील’ची कीर्ती त्याला मिळाली नाही तरच मला आश्चर्य वाटेल. नागपूर आणि भोपाळचा सामना असाच अटीतटीचा झाला आणि जादा 5-5 मिनिटांच्या डावात सामन्याचे पारडे फिरले आणि भोपाळकर नशीबवान ठरले. विभागातच बाद झालेला भोपाळचा संघ चार संघ वर घेण्याच्या निर्णयाने भाग्यवान ठरला. उपांत्य फेरीत रूरकेला संघाचा त्याने पराभव केला. विभागीय सामन्यात चार गुणांनी रूरकेला संघाकडून मार खाणारा हा संघ त्या अनुभवाने अक्कलहुशारी शिकला आणि मोठ्या मानाने अंतिम फेरीत दाखल झाला. भिलाई पोलाद संघ आणि सातारकरांचा उपांत्य सामना चांगलाच गाजला. कोपरारक्षक वसंत पावसकरने विनाकारण पकड घेण्याची केलेली घोडचूक सातारकरांना भोवली. पण त्यामुळेच विजय जाधव आणि भाग्यवंत अहिरे यांच्या चढाईच्या खेळाचा मनमुराद आनंद प्रेक्षकांना लुटता आला. सातारकर कमनशीबवान हेच खरे. कारण सामना हातात येता येता दोनदा त्यांच्या हातातून निसटला. मुख्य अडथळा उपांत्य फेरीतच दूर झाल्यावर भिलाईकरांनी अंतिम फेरीत भोपाळच्या संघावर जवळजवळ एकतर्फी मात केली. वर्मा आणि दादाराव हे त्यांचे विजयाचे शिल्पकार. भोपाळच्या संघाने डाव सावरण्याचा केलेला प्रयत्न शेवटी निष्फळ ठरला.

महिला सामन्यांच्याबद्दल काय लिहावे? एक तरी सामना खेळला जावा म्हणून मोठ्या मिनतवारीने नागपूरपर्यंत धावपळ करून नागपूरचा सुभाष मंडळाचा संघ शेवटच्या दिवशी शेवटच्या घटकेला आणविला गेला. तीन दिवस नुसताच मुक्काम करून कंटाळलेल्या नगर नागसेन नागपूर या संघाशी त्यांची लढत झाली. सुभाष मंडळाचा संघ बलाढ्य असूनही झुंज चांगली रंगली. पण खेळाबरोबरच योग्य वेळी लढावयाच्या डावपेचात नागपूर नागसेनची सेना अपुरी पडली. राज्य क्रीडा महोत्सव गाजविणाऱ्या शोभा कलांडे, जयश्री खापर्डे येथेही चमकून गेल्या. अवघा एक सामना खेळवून अखिल भारतीय अजिंक्यपदाची बिरुदावली मिळवण्याचे हे भाग्य विरळे.

संयोजक तळमळीचे होते, कष्टही घेत होते, पण तरीही कार्यक्षमतेचा आणि शिस्तबद्धतेचा अभाव लक्षात राहण्याएवढा जाणवला. अंतिम सामन्याचा अपवाद वगळता प्रेक्षकांचा प्रतिसादही निरुत्साही करणाराच होता. विजयी संघाना दिलेल्या ढाली आणि बक्षिसे तर आपल्याकडे खेडेगावच्या सामन्यात देतात त्यापेक्षाही मामुली होती. वैयक्तिक पारितोषिकांचा जाहीर करूनही पत्ता नव्हता. भिलाईचा कारखाना दाखविण्याची व्यवस्था करण्याचे राहूनच गेले. एक गोष्ट मात्र मला आवडली. उद्घाटन आणि बक्षीस समारंभाचे कार्यक्रम कसे 15 मिनिटांत आटोपले गेले आणि दोन्ही वेळेस दोन्ही अध्यक्षांनी अध्यक्षीय भाषणाला पूर्ण फाटा दिला.

एवढी अनुकरणीय प्रथा सोडली तर सामने कसे भरवू नयेत याबद्दल बरेच काही इतर ठिकाणी सामने आयोजित करणाऱ्या उत्साही मंडळींना या सामन्यापासून शिकता येईल.

…..

चार राज्यांचे खेळाडू जमले की गप्पा हमखास रंगतात. सामन्यांच्या आणि खेळाच्या. या वेळी मात्र निवडणुकीचा विषय सर्वांच्या डोक्यात पहिल्यांदा घोळत होता. दिल्लीतील सामान्य आणि गरीब जनतेचा पाठिंबा इंदिराजींना असल्याचे दिल्लीकर सांगत. उत्कल काँग्रेस विधानसभेच्या निवडणुकीत प्रभाव पाडू शकेल पण लोकसभेत इंडिकेटच येणार असे ओरिसावाले म्हणत. मध्यप्रदेशात लढत चुरशीची पण तरीही अधिक जागा सत्तारूढ काँग्रेसलाच मिळतील हा त्या भागातील खेळाडूंचा अंदाज. प्रत्यक्ष भिलाईत संघटना आणि सत्तारूढ काँग्रेसमध्ये सरळ सामना होता आणि तो चुरशीचा आहे असे सांगण्यात आले तरी प्रचाराच्या बाबतीत मात्र सारे कसे शांत शांत होते.

रूरकेला आणि भिलाई या दोन्ही संघांनी जे जे चांगले खेळाडू दिसले - उदा. सुभाष मंडळाचा रीठे, सातारचा विजय जाधव - त्यांना भरपूर पगारावर नोकरीला येण्यासाठी मागणी घातली. रीठेने ती कबूलही केली. (म्हणजे सुभाष मंळाची चांगलीच पंचाईत. कारण सामन्याच्या आधी चारच दिवस त्यांनी आपल्या संघात त्याला रजिस्टर करून घेतला होता.)

भिलाईला जाऊन पोलाद कारखाना न बघणे म्हणजे काशीला जाऊन विश्वेश्वराचे दर्शन चुकविणे. सामना संपल्यानंतर दुसरे दिवशी कारखाना दाखविण्याचा प्रयत्न (आश्वासन नव्हे) करतो, असे संयोजकांनी सांगितले. अर्थात अवघे दोन संघ दिल्ली आणि सातारकर थांबू शकले. तीन तास भारताचे हे नवीन तीर्थक्षेत्र डोळे भरून पाहिल्यावर या केलेल्या सोईबद्दल आम्ही वरील सामना समितीला त्यांचे बाकीचे सगळे गुन्हे माफ केले.

(पूर्वप्रसिद्धी : माणूस, 17 मार्च 1971)

- डॉ. नरेंद्र दाभोलकर


क्रीडांगण सदरातील या आधी प्रसिद्ध झालेले सर्व लेख वाचा या लिंकवर

Tags: नरेंद्र दाभोलकर क्रीडा नरेंद्र दाभोलकर अंनिस सामाजिक कार्यकर्ता माणूस साप्ताहिक श्री. ग. माजगावकर क्रिडा नरेंद्र दाभोळकर खेळ क्रिकेट सामना भिलाई Load More Tags

Add Comment