कुठल्याही बलदंड प्रतिस्पर्ध्याबरोबर सामना रंगविण्याच्या इर्षेने झुंजारपणे सामना खेळणाऱ्या संघात सर्व भारतात ‘मध्य रेल्वे संघा’ला मी पहिला क्रमांक देईन आणि याची सुरुवात करतो बहुसंख्य वेळा सदानंद. पकडीमधील एकेरी पट काढणे, दुहेरी पट ओढणे, ब्लॉक करणे, धडक मारणे, डाइव्ह मारणे, लवण पकड या सर्व कौशल्यांत तो निर्विवादपणे पारंगत आहे. पण या साऱ्याचा उपयोग तो ज्या बेडरपणे करतो ते धाडस अक्षरशः चकित करणारे आहे.
रसिकांचे मत आणि परीक्षकांचे मनोमन यांचा सांधा क्वचित जुळतो. असे झाले नाही तर मग चांगल्या चांगल्या कल्पनेतील हवाच निघून जाते. मग राहतो तो नुसता कोरडा उपचार.
असा प्रकार शिवछत्रपती पारितोषिकाबद्दल यंदा झाला नाही म्हणून परीक्षकांचे अभिनंदन!
महाराष्ट्र राज्याचे सरकार हे तसं थोडं शहाणे सरकार आहे. कलावंत म्हटला मग साहित्यातला असो वा संगीतातला असो किंवा सामन्याच्या मैदानावर चमकणारा. त्याची बूज राखण्याचा ते शक्यतो प्रयत्न करते. (कोणी म्हणतात ‘यशवंत नीती’ ती हीच) पोटातला हेतू भले काहीही असो पण त्याच्या क्षेत्रात त्यामुळे उत्साह वाढतो. चैतन्य जागते. निकोप स्पर्धाही लागते.
मागच्या वर्षी खेळाचे वेगळे खाते महाराष्ट्रात उघडले गेले आणि काही नवीन उपक्रम चालू झाले. श्री शिवछत्रपती पारितोषिक हा त्यामधील एक. त्या त्या देशी-विदेशी खेळांत महाराष्ट्र पातळीवर सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करायचा, त्याला मानाने राजभवनात बोलवावयाचे, चांदीच्या तबकातून जिरेटोपाची प्रतिकृती, समशेर व जरीपटका द्यावयाचा अशी यामागची कल्पना. राष्ट्रीय पातळीवर दिल्या जाणाऱ्या अर्जुन पारितोषिकाची छोटी आवृत्तीच म्हणा ना!
दुर्दैवाने महाराष्ट्रात या पारितोषिकाची किंमत अजूनही क्रीडा संघटनांना कळलेली नाही. मागील वर्षी या पारितोषिकासाठी निवडलेल्या 19 पैकी अवघ्या सहा प्रादेशिक संघटनांनी आपल्या खेळाडूंच्या नावाची शिफारस केली आणि निवड समितीकडे नावे पाठविली. काम करण्याचे बाजूला राहिले पण निदान जीव तोडून खेळणाऱ्या खेळाडूला मानाचा जिरेटोप मिळवून द्यायला यांचे काय जात होते कुणाला माहीत? बरे पहिले वर्ष म्हणावे तर यंदादेखील तसा प्रकार आहेच. सुधारणा एवढीच की यंदा एकूण 11 संघटनांनी आपली नावे पाठविली.
बक्षीस देताना महत्त्व दिलेला एक मुद्दा पक्का राजकारणी होता. भलत्या ठिकाणी प्रादेशिक भावनात्मक ऐक्य वगैरे म्हणजे थोतांडच नाही का? साऱ्या भिंती ओलांडून एकमेकांजवळ जायचे म्हणून क्रीडास्पर्धा. त्याच्या वाढीसाठी पारितोषिके आणि त्यात पुन्हा या ऐक्याच्या नावाने सवतासुभा. म्हणजे असे की, कबड्डीचे पारितोषिक महाराष्ट्राला मिळाले ना, मग खोखोचे विदर्भात पाठवा! मागील वर्षी नागपूरला उषा लोहारकरची खोखोला झालेली निवड प्रामुख्याने या निकषावर झाली... हे एवढ्यावर कुठले थांबायला? आता पुढील वर्षी कबड्डीचे पारितोषिक विदर्भात आणि खोखोचे महाराष्ट्रात असेही ठरले होते. पारितोषिक म्हणजे काय नुरा कुस्ती वाटली काय? पाच मिनिटे तुम्ही वर पाच मिनिटे आमची सरशी. दोघंही खुश! खेळाचा सन्मान करणार ना! मग क्रीडा-कौशल्याच्या कसोट्यावर नीट पारखून करा. दोन्ही खेळांतील सर्वोकृष्ट खेळाडू मुंबईच्या एकाच चाळीत, एकाच मजल्यावर जवळच्या खोलीत राहत असले तरी त्यांना बक्षीस द्यायला नको का? असले शहाणे सल्ले बहुधा शासनाला पटत नाहीत. पण भारतीय क्रीडा संघटक शंकरराव साळवींनी हे मुद्दे त्यांच्या गळी उतरविले. या माणसाची एक गोष्ट मला आवडते, पटेल ते बोलायला आणि योग्य ते वागायला ते कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाही. तोंडाला फटकळ असला तरी मनातल्या तळमळीने काम होते. जे खेळ महिला व पुरुष दोघेही खेळतात त्यामध्ये बक्षीसपात्र खेळाडू असतील तर दोन पारितोषिके द्यावीत, हाही मुद्दा त्यांनीच मान्य करून घेतला. नाहीतर क्रिकेट आणि कुस्ती या दोन्ही कार्तिकस्वामीच्या खेळाचे आदर्श पुढे ठेवून बाकी साऱ्याचे संयोजन व्हायचे आणि मग पुरुषांना लाजवणारा खेळ करणाऱ्या आमच्या महिलांना हा मान मिळणार कधी?
सदानंद शेटे यांची 'हनुमंतउडी'
देशी खेळांच्या शिवछत्रपती पुरस्काराबद्दल म्हणाल तर परीक्षकांच्या मताशी महाराष्ट्रातले बहुतेक क्रीडारसिक सहभागी आहेत. कबड्डीमध्ये मागील वर्षी मधू पाटीलला हा मान मिळाल्यावर यंदा सदा शेटेशिवाय दुसऱ्या कोणाचेच नाव पुढे येऊ शकत नव्हते. मागील वर्षी मुलींच्या वाट्याला हा मान येण्याची शक्यता असती तर वासंती सातवचे नाव 100 टक्के नक्की होते. पण अ. भा. स्पर्धेत अजिंक्यपद मिळविल्यावर तिने आपली निवृत्ती जाहीर केली आणि सप्तपदी चालल्यामुळे ती खेळापासून सात पावले दूर सरकली. यंदा जी दोन-तीन नावांमधून निवड अपेक्षित होती, त्यामध्ये चित्रा नाबर हे नाव होते. यंदा तिने महाराष्ट्र राज्याला अ. भा. आंतरराज्य कबड्डी स्पर्धेत अजिंक्यपद मिळवून दिल्याने हा सन्मान तिच्या बाबतीत अपेक्षितही होता. (एक भविष्य आताच वर्तवून ठेवतो. महाराष्ट्र राज्याचा महिला कबड्डी संघ गेले 15 वर्षे अ. भा. स्पर्धेत सतत अजिंक्य आहे. येत्या दहा वर्षांत तरी ती पराभूत होण्याची शक्यता दिसत नाही. एकदाच संघनायक व्हावे. संघ हमखास जिंकतोच आणि मग अ. भा. स्पर्धेतून निवृत्त व्हावे अशी एक परंपरा कबड्डीमध्ये चालू आहे. त्यालाच आता निवृत्त होताना शिवछत्रपती पुरस्काराचा मानही खेळाडूला मिळावा असा एक अलिखित संकेत जोडला जाण्याची शक्यता आहे. पाहू काय होते ते?)
सदानंद शेटे
सदानंदचे संपूर्ण नाव काय? त्याचे शिक्षण कुठे झाले? ‘विजय बजरंग संघा’तून तो कधीपासून खेळू लागला? रेल्वेच्या संघात तो कधी दाखल झाला. या साऱ्या गोष्टींचा परिचयात उल्लेख करावा अशी एक रूढ परंपरा आहे. सदाचे कुठले सामने अधिक गाजले? त्याला किती बक्षिसे मिळाली? सुवर्णपदकांची संख्या किती? स्वकर्तृत्वाने मिळवलेल्या त्याच्या विजयातून त्याच्या संघाची कीर्ती आणि त्याची खेळाडू म्हणून मूर्ती कशी साकार झाली या साऱ्याचा उल्लेख करावयास हवा हेही मला माहीत आहे.
पण या साऱ्या गोष्टींना माझ्या मते गौण स्थान आहे. सर्व खेळाडूंच्या बाबतीत नव्हे. पण सदाच्या बाबतीत हा सन्माननीय अपवाद करायला हरकत नाही. वैयक्तिक बक्षिसे, संघाची हारजीत, इतर मानसन्मान यापलीकडे जे गेले आहेत असे काही अत्यंत मोजके खेळाडू असतात. त्यांचे क्रीडानैपुण्य म्हणजे एक आविष्कार असतो. मैदानावरील उपस्थिती म्हणजे चैतन्य असते. खेळाच्या इतिहासात त्यांनी म्हणून निर्माण केलेला एक टप्पा असतो. त्या खेळाने खेळाडू मोठा होण्याबरोबरच खेळाडूमुळे खेळही मोठा होत असतो. हॉकीमधली ध्यानचंदची अथवा क्रिकेटमधली डॉन ब्रॅडमनची उदाहरणे घेतली तर मला काय म्हणावयाचे आहे हे लक्षात येईल.
कबड्डीची तुलना मी फार मोठ्या खेळाशी केली याची मला पूर्ण जाणीव आहे. पण महाराष्ट्रात आणि राष्ट्रातही देशी खेळ म्हणून कबड्डीला काही मानाचे स्थान आहे. प्रेम करणारे हजारो क्रीडाशौकीन आहेत. 40-50 वर्षांचा छोटा इतिहास आहे. या ऐतिहासिक परंपरेतील मधू पाटील आणि सदा शेटे हे दोन महत्त्वाचे दुवे आहेत. किंबहुना इतके तोलाचे तिसरे नाव आज तरी मला कबड्डीपटूंत आढळत नाही. भारतातल्या बहुतेक नामवंत स्पर्धा मी खेळलो आहे. सर्व चांगल्या खेळाडूंशी दोन हात करण्याची संधी मला कधी ना कधी मिळाली आहे. निरनिराळ्या वेळच्या परिस्थितीमधील त्यांचे पवित्रे मी पाहिले आहेत आणि जबाबदारीने हे विधान मी करत आहे.
कुठल्याही बलदंड प्रतिस्पर्ध्याबरोबर सामना रंगविण्याच्या इर्षेने झुंजारपणे सामना खेळणाऱ्या संघात सर्व भारतात ‘मध्य रेल्वे संघा’ला मी पहिला क्रमांक देईन आणि याची सुरुवात करतो बहुसंख्य वेळा सदानंद. पकडीमधील एकेरी पट काढणे, दुहेरी पट ओढणे, ब्लॉक करणे, धडक मारणे, डाइव्ह मारणे, लवण पकड या सर्व कौशल्यांत तो निर्विवादपणे पारंगत आहे. पण या साऱ्याचा उपयोग तो ज्या बेडरपणे करतो ते धाडस अक्षरशः चकित करणारे आहे. हैदराबादच्या अ. भा. स्पर्धेचा अंतिम सामना, रेल्वे विरुद्ध महाराष्ट्र राज्य सामना नुकताच चालू झालेला. अतिशय चलाख व तल्लख नजरेचा मधू पाटील सावधगिरीने चढाई करत होता. आणि सदाने त्याच्या पायावर सूर टाकून त्याला अचूक अडवला. इतक्या महत्त्वाच्या सामन्यात मधूसारख्या खेळाडूला सूर टाकण्याचे धाडस दाखवणे हे कर्तृत्व फक्त सदाच दाखवू शकेल. त्यानंतर दोन वर्षांनी इंदूरच्या अखिल भारतीय स्पर्धेत पहिल्याच चढाईला पुढे येऊन वसंत सूदचा एकेरी पट ओढण्याचा अयशस्वी प्रयत्न सदाने केला. सूदसारखा खेळाडू पटात सापडणे महामुश्किल आहे आणि अशा सामन्यात पहिला गुण देणे हे फार महागात पडते हे काय सदाला माहित नसेल? पण जे अवघड असते तेच करून दाखवायची अनोखी जिद्द या माणसात आहे.
या धाडसापायी संघावर मोठा बाका प्रसंग अनेक वेळा ओढवतो. मग प्रतिस्पर्ध्याच्या हातात गेलेली विजयश्री धारदार चढाया करून खेचून आणावी लागते. यामध्येही सदाचा नंबर पहिला असतो. आपला सुमारे 170 पौंड वजनाचा बोजा सांभाळत हा खेळाडू अत्यंत सफाईने हनुमान उडी घेतो. पण यापेक्षा उजव्या कोपऱ्यात खोल आत शिरताना पुढच्या क्षेत्ररक्षकांनाही त्याने मारलेली हूल ही किती जबरदस्त असते हे समजायला सदाशी एकदा खेळायलाच हवे. गेली 20 वर्षे सदा सतत खेळत आहे. तो नुसती हूल पुढच्या क्षेत्ररक्षकांना देतो आणि कोपऱ्यात घुसून गडी मारतो हे त्याचे तंत्रही सगळ्यांना माहीत आहे. पण अजूनही त्याने हूल दाखविली की भले भले मध्यरक्षक मागे कोलमडतात.
1972 मध्ये सदानंद शेटे अर्जुन पारितोषिक मिळवणारे पहिलेच कबड्डीपटू ठरले.
प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंच्या सदाबद्दलचा आत्मविश्वासाचे एक मोठे बाके उदाहरण आहे. मागील वर्षी भानू तालीमच्या शतसांवत्सरिक उत्सवासाठी महाराष्ट्रातले अवघे आठ निवडक संघ बोलवून सामने झाले. अंतिम सामना झाला महेंद्र आणि महेंद्र आणि सदाच्या विजय बजरंग संघात. सदाला काय झाले होते कोणास ठाऊक! वेगाने अंगावर आलेल्या गड्याचे ना त्याने पट ओढले, ना पाट दाखवून पुढे पळत जाणाऱ्या वसंत ढवणला पाठीवर पकडले. हातात असलेला सामना जिंकायला अवघा एक गुण हवा असताना आणि दोन चढाया बाकी असताना तो बादही झाला नाही वा त्याने गडी मारलेही नाहीत. सामना इतर दृष्टीने अत्यंत चुरशीचा झाला. पारडे इकडे तिकडे झुकत झुकत शेवटी ‘महेंद्र आणि महेंद्र कंपनी’ने उत्कृष्ट खेळ करून सामना जिंकला. प्रेक्षकांची गोष्ट सोडा पण महाराष्ट्रातले बडेबडे खेळाडू मात्र याचे श्रेय विजयी संघाला द्यावयास तयार होईनात. त्यांच्या मते हा सगळा ठरवून घडवलेला बनाव होता. नाहीतरी सदासारखा खेळाडू एका सामन्यात इतका निगेटिव्ह खेळेल हे सर्वस्वी अशक्य आहे. केवळ दुसऱ्या संघाला विजय द्यायचा म्हणूनच तो असा खेळला. दोन्ही संघांतल्या अनेक खेळाडूंशी निरनिराळ्या वेळी बोलून हा रचलेला बनाव नव्हता याची माझी खात्री पटली. विजय बजरंग संघ असली बनवाबनवी कधीच करत नाही हेही खरे. एखाद्या सामन्यात सदाकडून चूक होणे शक्य नाही का? डॉन ब्रॅडमनही शून्यावर क्वचित बाद झालाच ना. पण त्याने गोलंदाजाशी काही गुप्त कारवाई - संगनमत केले अशी शंका प्रेक्षकांना यावी, यातच त्याचा मोठेपणा दडलेला आहे. सदाच्या बाबतीतही अशीच गोष्ट झाली. अजूनही शिवाजी जगताप अथवा पापा शिंदेसारखे मोठे खेळाडूदेखील सदाचा खेळ झाला नाही असे न मानता सदाने मुद्दामहून काही कारणासाठी खेळ केला नाही असे मानतात. सर्वांच्या या प्रगाढ विश्वासापुढे सामन्याचे यशापयश आणि इतर मानसन्मान दुय्यम नाहीत का?
(पूर्वप्रसिद्धी : माणूस, 24 एप्रिल 1971)
- डॉ. नरेंद्र दाभोलकर
क्रीडांगण सदरातील या आधी प्रसिद्ध झालेले सर्व लेख वाचा या लिंकवर
Tags: नरेंद्र दाभोलकर अंनिस सामाजिक कार्यकर्ता माणूस साप्ताहिक श्री. ग. माजगावकर क्रिडा नरेंद्र दाभोळकर खेळ क्रिकेट सामना Load More Tags
Add Comment