एक आशादायक संध्याकाळ

'माणूस'मधील 50 वर्षांपूर्वीच्या सदराची पुनर्भेट (5/22)

प्रातिनिधिक चित्र | traveldine.com

मला कौतुक वाटले ते संयोजकाच्या समर्थपणाचे. सुमारे हजार खेळाडू क्रीडांगणावर वावरत असूनही गडबड-गोंधळ जवळजवळ दिसलाच नाही. उत्साह भरपूर होता पण बेजबाबदारपणा वा बेशिस्त आढळली नाही. कारण सरळ आहे. ते सर्व खेळाडू दररोज क्रीडांगण आणि शिस्तीला सरावलेले होते. यापेक्षाही मोठे क्रीडा महोत्सव मी बघितले आहेत - सरकारने वा संस्थेने आयोजित केलेले, पण इतरांच्यासाठी! खेळाचा दर्जा सुधारण्यास त्यामुळे मदत निःसंशयपणे होते. पण तरुण मनाच्या स्वतः खेळण्याच्या हौसेला वाव देण्यासाठी निवडक संघांच्या भरवलेल्या या सामन्यांचा उपयोग कितीसा होणार! 

गेल्या काही वर्षांत खेळाच्या स्पर्धांसाठी मी महाराष्ट्राचे बहुतेक सारे जिल्हे भटकलो. देशी खेळांतील बहुतेक सारे नामवंत संघ, संस्था, व्यायामशाळा बघण्याची संधी मला मिळाली. संघाच्या दर्जाचे कौतुक करत असताना क्रीडांगणावरच्या खेळाडूंच्या संख्येबद्दल मी नेहमीच नाराजी आणि खेद व्यक्त केला. शतक अथवा अर्धशतकांची परंपरा सांगणाऱ्या संघाच्या मैदानावर पुरे 50-100 खेळाडू दृष्टीस पडू नये, याचे कारण कार्यकर्त्यांची उदासीनता असेच करता येईल. चार चांगल्या खेळाडूंच्या जिवावर जोपर्यंत संघ सामने जिंकतो आणि त्यांचा फॉर्म संपण्यापूर्वी आणखी चार खेळाडू या ना त्या प्रकारे मिळवता येतात तोपर्यंत ‘देशी खेळांचा प्रसार’ या महत्त्वाच्या गोष्टीकडे सारेच संघ दुर्लक्ष करतात.

शरीराला आणि मनाला ताजेपणा आणण्यासाठी स्वतःचा अभ्यास व व्यवसाय सांभाळून हे बिनखर्चाचे खेळ संध्याकाळी तासभर खेळण्यास आज अनेक तरुण मने उत्सुक असतात. याशिवाय या खेळांना आज लोकमान्यता, राजमान्यता, प्रसिद्धी प्राप्त झाल्यामुळे त्यांचे आकर्षण आणखी वाढले आहे. दुर्दैवाने ‘योजकस्तत्र दुर्लभः’ अशी आज याबाबत स्थिती आहे.

देशी खेळांच्या वाढीसाठी अत्यंत सातत्याने आणि शिस्तबद्धपणे केलेल्या प्रयत्नांचे एक दुर्लभ दर्शन मला मागील आठवड्यात सातारला आढळले. श्री शिवाजी उदय मंडळ ही संस्था सातारा जिल्ह्यातील मान्यवर क्रीडासंस्था आहे. अखिल भारतीय पातळीवर कबड्डी, खोखो, मल्लखांब, कुस्तीत चमकणारे अनेक संघ व खेळाडू या मंडळाने तयार केले आहेत. पण हे तर महाराष्ट्रातले अनेक संघ आज करतात. या मंडळाचे कौतुक यासाठी की, सर्व प्रकारच्या देशी खेळांचे शिक्षण देण्यासाठी आठ शाखा सातारा शहरात यांनी चालविल्या आहेत आणि सुमारे हजार स्त्री-पुरुष नियमितपणे तेथे सराव करतात. 80 हजार वस्तीच्या सातारा शहरात ही संख्या निश्चितच कौतुकास्पद आहे. अशा अनेक शाखा चालविणारी एकही क्रीडासंस्था महाराष्ट्रातील मोठ्या शहरांतून मला आढळली नाही. त्यामुळे या कामाची गरज व यश अधिक जाणवते. दर तीन महिन्यांनी हे सारे खेळाडू संस्थेच्या मुख्य क्रीडांगणावर एकत्रित करून देशी खेळांच्या प्रसाराचे एक विलोभनीय दर्शन संस्था घडविते. मागील आठवड्यातच हा कार्यक्रम झाला.

सारे वातावरण कसे चैतन्याने भारले होते. ओळीने आखलेल्या कबड्डीच्या रेखीव मैदानावर दहा वर्षांपासून ते 30 वर्षांपर्यंतचे खेळाडू आपापल्या गटातील विरुद्ध शाखेच्या संघाशी सामने रंगवत होते. खोखोच्या मैदानावरही मुला-मुलींच्या खेळाची धावपळ चालली होती. सारे नियोजन क्रीडा महोत्सवाएवढेच शिस्तबद्ध होते. सर्व सामने एकाच शिट्टीच्या इशाऱ्यावर चालू होत आणि संपत. धावणे, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक, थाळी आणि भालाफेक यांच्या स्पर्धा त्याच मैदानावर दुसऱ्या बाजूस चालू होत्या. कोणत्या खेळाडूने किती नियमबद्धपणे उडी मारली वा गोळा फेकला आणि कोणता उच्चांक केला याची फारशी फिकीर नव्हतीच. मोकळ्या वातावरणातला निकोप स्पर्धेचा आणि खेळाचा आनंद मनमुराद मिळविण्यासाठी सारी धडपड चालली होती. यानंतर झाली मल्लखांब आणि लेझमीची प्रात्यक्षिके. पाच वर्षांच्या मुलापासून ते 25 वर्षे वयाच्या मुलांपर्यंत साऱ्यांनी आपले कौशल्य सादर केले. योजनाबद्ध प्रयत्नाने क्रमाक्रमाने विकसित होत जाणाऱ्या क्रीडाकौशल्याचा तो एक सुंदर आलेख होता. जळते पलिते बांधून केलेली लेझीम हा तर अस्सल सातारी प्रकार होता, मराठमोळा आणि रांगडा. यानंतर झाली प्रात्यक्षिके. साऱ्या खेळाडूंना मार्गदर्शनासाठी उत्कृष्ट अशा निवडक खेळाडूंचा कबड्डी व खोखोचा एकेक सामना झाला आणि त्यानंतर पळणे, उडी मारणे आणि इतर वैयक्तिक खेळांतील तज्ज्ञ खेळाडूंनी प्रात्यक्षिकासह त्यातील रहस्ये उकलून दाखविली. स्टार्ट कसा घ्यावा, स्टेपिंग कसे टाकावे, कोणत्या गोष्टी पाळाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात याबद्दलचे त्यांचे स्वानुभव, शिक्षणातून मिळविलेले ज्ञान आणि होतकरू खेळाडूंना घडविलेले त्याचे दर्शन हे सारे खूपच उपयुक्त वाटले. त्यानंतर कलेक्टरांचे भाषण वगैरे औपचारिक भाग पार पडला.

मला कौतुक वाटले ते संयोजकाच्या समर्थपणाचे. सुमारे हजार खेळाडू क्रीडांगणावर वावरत असूनही गडबड-गोंधळ जवळजवळ दिसलाच नाही. उत्साह भरपूर होता, पण बेजबाबदारपणा वा बेशिस्त आढळली नाही. कारण सरळ आहे. ते सर्व खेळाडू दररोज क्रीडांगण आणि शिस्तीला सरावलेले होते. यापेक्षाही मोठे क्रीडा महोत्सव मी बघितले आहेत - सरकारने वा संस्थेने आयोजित केलेले, पण इतरांच्यासाठी! खेळाचा दर्जा सुधारण्यास त्यामुळे मदत निःसंशयपणे होते. पण तरुण मनाच्या स्वतः खेळण्याच्या हौसेला वाव देण्यासाठी निवडक संघांच्या भरवलेल्या या सामन्यांचा उपयोग कितीसा होणार! 

म्हणूनच एका वैयक्तिक संस्थेने स्वतःच्याच खेळाडूंचा भरविलेला हा महोत्सव मी दुहेरी अर्थाने महत्त्वाचा मानतो. चांगले खेळाडू मिळविण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी तर त्याचा उपयोग होईलच; पण ‘आजच्या बिघडलेल्या पिढीला संध्याकाळी नुसते इकडे तिकडे बघत रस्त्यावरून फिरायला पाहिजे असते’- या आरोपात काय तथ्य आहे? योग्य प्रयत्न केले तर अल्पमोली बहुगुणी खेळात खूप मोठ्या संख्येने आजचे तरुण मन नियमितपणे गुंतवता येते हेच या महोत्सवाने सिद्ध केले नाही का?

महाराष्ट्र खोखो संघाचा कर्णधार

‘‘बी. ए. ला मी अर्थशास्त्र विषयात पहिल्या वर्गात पहिला आलो. त्याचे सुवर्णपदक आणि गोपाळ कृष्ण गोखले पारितोषिक मला मिळाले.’’ 

दोस्तांनो- क्रीडांगण सदरासाठी स्कॉलरची मुलाखत घेण्याची ही गफलत नव्हे. अभ्यासात सतत पहिला राहणाऱ्या 25 वर्षांच्या सुनिल तांबेने खोखोच्या खेळातही आपला प्रथम दर्जा सतत टिकवला आहे.

सुमारे दहा वर्षां‍पूर्वी नू. म. वि. शाळेत त्याने आपल्या खेळाचा श्रीगणेशा शंकरराव पाटणकरांच्या हाताखाली गिरवला. लंगडी आणि आट्यापाट्या या खेळांतील कौशल्याचा खोखोमध्ये खूपच फायदा त्याला झाला. किंबहुना, त्याच्या मते हे खेळ पूर्वतयारी म्हणून आवश्यकच आहेत. सशाच्या पाठीमागे लागलेल्या चित्त्याच्या प्रमाणे तडाखेबंद पद्धतीने खेळाडूचा वेगवान पाठलाग करून त्याला टिपणे आणि चौकाच्यामधील खेळ करून समोरच्या संघाला दमविणे आणि नाउमेद करणे ही त्याच्या खेळाची खास वैशिष्ट्ये. मात्र पायात सूर मारून गडी मारण्याचे कौशल्य शिकण्याचे राहून गेले, हे मनमोकळेपणे मान्य करून त्या बाबतची रुखरुखही तो व्यक्त करतो.

हेवा वाटावा अशी त्याची क्रीडाक्षेत्रील कामगिरी आहे. स. प. कॉलेज, पुणे जिल्हा, पुणे विद्यापीठ, नवमहाराष्ट्र संघ आणि आता महाराष्ट्र राज्य या सर्व संघांचे कप्तानपद त्याने भूषविले आहे. आणि त्या त्या वेळी तो संघ अजिंक्य ठरला आहे. आतापर्यंतच्या अनेक स्पर्धांतील विजयात त्याचा सिंहाचा वाटा आहे. बडोद्याला झालेल्या पुणे आणि बडोदा विद्यापीठांतील अकरा डावांच्या न भूतो न भविष्यति सामन्यात पुणे विद्यापीठाचा झालेला विजय आणि इतर असे अनेक सामने त्याच्या कर्तृत्वाची साक्ष पटवतील.

वर्षभर नियमितपणे सराव तो आवश्यकच मानतो. गेल्या दहा वर्षांतील क्रीडा कारकिर्दीत परीक्षेच्या दिवशीही त्याने कधी संध्याकाळचे मैदानाचे दर्शन चुकविलेले नाही.

यंदाचा महाराष्ट्र राज्यसंघ हरियाणामध्ये होणाऱ्या (25 डिसेंबर ते 2 जाने.) अ. भा. खोखो स्पर्धेत निश्चित विजयी होईल असा त्याला विश्वास वाटतो. खेळाडूंना झालेल्या दुखापती आणि कमी पडलेली पळती ही मागच्या वर्षीच्या अपयशाची कारणे यंदा निश्चितच टाळण्यात येतील.

या चतुरस्र सुविद्य आणि सुज्ञ खेळाडूच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची मान उंच व्हावी हीच इच्छा!

(पूर्वप्रसिद्धी : माणूस, 2 जानेवारी 1971)

- डॉ. नरेंद्र दाभोलकर

Tags: नरेंद्र दाभोलकर अंनिस सामाजिक कार्यकर्ता माणूस साप्ताहिक श्री. ग. माजगावकर क्रिडा नरेंद्र दाभोळकर खेळ क्रिकेट सामना Load More Tags

Add Comment