हे फार अपुरे आहे : दिल्लीच्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा

'माणूस'मधील 50 वर्षांपूर्वीच्या सदराची पुनर्भेट (13/22)

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मुख्य ओळख अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते अशी आहे. त्यानंतर साधना साप्ताहिकाचे दीड दशक संपादक अशीही त्यांची एक महत्त्वाची ओळख आहे. मात्र आयुष्याच्या पंचविशीपर्यंत त्यांची मुख्य ओळख राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू अशी होती. त्यांना राज्य सरकारचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार दोन वेळा मिळाला होता. एकदा कबड्डीचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून, आणि दुसऱ्यांदा कबड्डी खेळातील अन्य योगदानासाठी (संघटक, पंच, कॉमेंटेटर, स्तंभलेखक, क्रीडाप्रसारक, इत्यादी प्रकारच्या).

अशा डॉ. दाभोलकरांनी माणूस साप्ताहिकात 1970 - 1971 मध्ये क्रीडांगण हे पाक्षिक सदर लिहिले. त्यात कब्बडी, कुस्ती, अन्य देशी खेळ यांच्यासोबत क्रिकेटवरही त्यांनी लिहिले आहे. या सदरातील एकूण 22 लेखांतून क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी आसुसलेले मन आणि एकूणच खेळांच्या विषयी असलेले त्यांचे प्रगल्भ विचार यांचे दर्शन घडते.  

तब्बल 50 वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले आणि त्यानंतर आजतागायत कुठेही  उपलब्ध नसलेले हे लेख, साधनेतील आमचा तरुण सहकारी समीर शेख याने 'माणूस'च्या अर्काइव्हमधून संकलित केले आहेत. डॉ. दाभोलकर यांच्या आयुष्यातील सुरुवातीचे हे पर्व किती रोमांचक असेल याची कल्पना तर या लेखमालेतून येईलच, पण 50 वर्षांपूर्वीच्या क्रीडा जगताची एक झलकही पाहायला मिळेल. डॉक्टरांच्या व्यक्तिमत्वातला फारसा समोर न आलेला पैलू दाखवणारे हे लेख आजही वाचनीय आहेत, यात शंकाच नाही. 20 ऑगस्ट या डॉक्टरांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ही लेखमाला 'कर्तव्य'वरून पुनर्भेट म्हणून सादर करीत आहोत.

कबड्डीचा खेळ हाच खरा राष्ट्रीय खेळ, असा एक गोड (गैर) समज सध्या आढळून येतो. अखिल भारतीय कबड्डी स्पर्धांत निदान पुरुष विभागात तरी साऱ्या राज्यांचे संघ भाग घेतात असा दावा या समजाच्या पुष्टीसाठी जोडला जातो. (खोखोमध्ये भारतातल्या निम्म्या राज्यांचे संघ येताना मारामार हेही सांगण्यात येतेच) थाटामाटाने भरविलेल्या सामन्यांची वर्णने पंतप्रधान अथवा राष्ट्रपतींनी झाडलेली पायधूळ वगैरेची वर्णने मग आलीच.

फाजील आत्मगौरवाची भावना विकासाला नेहमीच मारक ठरते. सत्य कटू असते म्हणून सोईस्करपणे त्याला बगल देण्यात येऊ नये. महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांत कबड्डीची अवस्था दयनीय आहे किंवा कोणती अवस्थाच अस्तित्वात नाही. महाराष्ट्राला लागून असलेली गुजरात, मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्ये काही प्रमाणात अपवाद म्हणून सोडता येतील. बाकीच्या कोणत्याही राज्यात राष्ट्रीय सामन्यात प्रांताचा संघ पाठविणे यापलीकडे कोणत्याच प्रकारे कबड्डीच्या वाढीचे सोयरसुतक जोडलेले नसते. दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि उत्तरप्रदेशातील सर्वच राज्यात कबड्डीच्या नावाखाली खेळला जाणारा खेळ हा रूढ महाराष्ट्रीय कबड्डीपेक्षा सर्वस्वी वेगळा असतो. त्यामध्ये एकच गडी एका गड्याला घेरतो. क्रीडांगणाची लांबी 150 फूट असते.

सुसंघटितपणे, कार्यक्रम ठरवून कबड्डीच्या विकासासाठी काही किमान गोष्टी दरवर्षी केल्या जाव्यात आणि हळूहळू पण निश्चितपणे कबड्डी रुजत आहे आणि वाढत आहे याचा दिलासा देशातील हजारो-लाखो क्रीडाशौकिनांना मिळावा अशी कोणतीही भरीव कामगिरी अखिल भारतीय कबड्डी असोसिएशनने गेल्या आठ-दहा वर्षांत केली नाही. गेल्या आठ वर्षांत अलाहाबाद, बडोदे, हैदराबाद, कोल्हापूर आणि मुंबई या पाच राष्ट्रीय सामन्यांत स्वतः खेळाडू म्हणून भाग घेतलेल्या मला वाटणारी ही खंत दिल्लीच्या या वर्षी झालेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेनंतरही कायम आहे. आणि कबड्डी संघटनेच्या अंतर्गत लाथाळीमुळे त्यामध्ये सध्यातरी फरक पडण्याचे भाग्य दिसत नाही.

तेव्हा खऱ्याखुऱ्या अशा या एकमेव अखिल भारतीय सामन्यांचे वर्णन हे फक्त सामन्यांचेच ठरते. ज्या व्यापक पार्श्वभूमीवर याचा विचार करावा ती पार्श्वभूमी चितारावयाचा कॅनव्हास अजून बहुतेक ठिकाणी कोराच आहे.

जागेचा आणि वेळचा मुहूर्त यंदा लवकर सापडला नाही. गेली सहा वर्षे मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात यामध्येच घुटमळणारे हे सामने (त्यापैकी महाराष्ट्रात तीन वेळा) कोण्या दूरच्या प्रांतात जावेत असा प्रयत्न. प्रथम मद्रास मग जयपूर आणि मग दिल्ली अशा जागा बदलत गेल्या. या साऱ्या गोंधळात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणारे हे सामने फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत लांबले.

महाराष्ट्र राज्याच्या पुरुष संघावर यंदा विशेष जबाबदारी होती. गेल्या 18 वर्षांत हॅटट्रिक मिळवण्याची संधी फक्त यंदाच त्यांना उपलब्ध झाली होती. तर महिला संघांना नेहमीप्रमाणेच 15 वर्षांच्या अखंड विजयाची परंपरा सांभाळावयाची होती. अलिबागचे चार दिवसांचे सराव शिबिर आणि मुंबईचा शानदार निरोप समारंभ घेऊन हा संघ दिल्लीला पोहोचला. (विदर्भ आणि कोल्हापूर कबड्डी असोसिएशन या दोन प्रादेशिक संघटनांचे संघही महाराष्ट्रातून आले होते.)

महाराष्ट्राच्या विभागात होते - हरियाणा, हैदराबाद, ओरिसा आणि तामिळनाडू हे संघ. अनपेक्षितपणे महाराष्ट्राला आपल्या विभागातूनच वर येण्यासाठी निकराने झुंज द्यावी लागली. रेल्वे आणि महाराष्ट्र हे हमखासपणे अंतिम फेरीत भेटणारे दोन बलाढ्य संघ. मागच्या वर्षी विभागीय सामन्यात राजस्थानने आणि पोस्ट व तार खात्याने रेल्वेला अक्षरशः नाकात दम आणला, तर यंदा हरियाणा आणि हैदराबादने महाराष्ट्राचे हाल केले. हैदराबादच्या वासुदेवने घेतलेल्या बेदरकार पकडीने महाराष्ट्र संघाच्या तोंडचे पाणी पळाले होते. शेवटी बाळ कोंडाळकर पावला आणि सामना समान गुणांवर 6-6 ठेवण्यात महाराष्ट्राला यश मिळाले. हरियाणाच्या हरबनसिंगने तर एकट्याच्याच चतुरस्र खेळाने सामना फिरवण्यात जवळजवळ यश मिळवले होते. धसमुसळी चढाई करून कसेही धरले तरी पार्टीवर येण्याची त्याची धमक रंग भरणारी ठरली. अवघ्या दोन गुणांनी महाराष्ट्राने हा सामना जिंकला.

विदर्भ, उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आणि दिल्ली हा दुसरा गट महाराष्ट्राच्या मातीच्या कबड्डीचा कस हा सकसच असतो हे या गटात विजयी ठरून विदर्भाने सिद्ध केले. त्यांना थोडी झुंज द्यावी लागली ती मध्यप्रदेशाबरोबरच. पहिला गुण हातातून निसटला होता पण मध्यप्रदेश संघाचा कणा सदा केकरेला राउतने पकड घेतली आणि सामना हातात घेतला. पण फक्त पाच गुणांनीच विजयी होण्यावर त्यांना समाधान मानावे लागले. 


Read Also : Good Show by India! - A. S. Ketkar


कोल्हापूर अथवा केरळसारख्या संघाचा पराभव करून विभागीय विजेतेपद मिळवताना रेल्वेच्या बलाढ्य संघाला फारसा त्रास झाला नाही. 

पोस्ट आणि तार खाते, बंगाल, म्हैसूर, पंजाब हा विभाग तसा तुल्यबळ संघाचा मागील वर्षीचा उपविजेता म्हैसूर संघ मात्र यंदा विभागीय अजिंक्यपदही मिळवू शकला नाही. बंगालने आपले निर्विवाद वर्चस्व या विभागावर प्रस्थापित केले.

बाद पद्धतीच्या उपांत्य सामन्यात विदर्भ, महाराष्ट्र, बंगाल आणि रेल्वे यांची गाठ पडली. मागील वर्षी महाराष्ट्राला उपांत्य फेरीत याच संघाशी खेळावे लागले होते आणि बाळ कोंडाळकरच्या व वसंत सूदच्या प्रभावी चढायांनी विदर्भ हतप्रभ झाला होता. यंदा मात्र सामना कमालीचा थंड झाला. मध्यंतरापर्यंत सामना शून्य गुणांवर. मग बाळासाहेबांना उतरविले. पण मागच्या वर्षीची चूक सुधारून जनार्दन देशमुखने कोंडाळकरला अचूक पकडले. प्रत्येक सामन्यात महाराष्ट्राचा आधार ठरलेल्या शेखर शेट्टीने याही वेळेस सफाईने एक गडी टिपला. पण तरीही पहिला गुण मिळवल्याने बोनस गुणाचा फायदा विदर्भाकडे होता. रीठे या हुशार आणि चपळ खेळाडूची त्यापेक्षाही अधिक चपळतेने पाठीवरून फिरून शिवाजी जगतापने पकड घेतली आणि महाराष्ट्राने अटीतटीच्या उपांत्य फेरीतून रेल्वेबरोबरच्या सामन्यासाठी अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत रेल्वेने मात्र बंगालला एकतर्फी हरविले.

रेल्वे आणि महाराष्ट्र या संघांच्या अंतिम सामन्याचा एक गमतीदार इतिहास आहे. पहिला गुण रेल्वेच्या संघाने मिळवला तर रेल्वेचा संघ एकतर्फी सामना जिंकतो (अलाहाबाद, बडोदा, हैदराबाद) पण पहिला गुण महाराष्ट्राला मिळाला तर मात्र सामना चांगलाच रंगतो (कोल्हापूर, इंदूर आणि आता दिल्ली). या वेळी पहिला गुण शेखर शेट्टीने नोंदवला. खरे तर खेळत असताना उंचीचा फायदा घेऊन वेगवान लाथेने गडी बाद करण्याचे या खेळाडूचे कौशल्य अप्रतिम आहे. अशा सामन्यात पहिला गुण मिळवणे म्हणजे निम्म्याहून अधिक विजय खिशात घालण्यासारखे. पण रेल्वेच्या भोला गुरगने महाराष्ट्राला हे समाधान लाभू दिले नाही. उंच्यापुऱ्या आणि आंतरराष्ट्रीय वजन उचलण्याच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या या खेळाडूला पुढे डाईव्ह मारण्याची घाई शिवाजी जगतापसारख्या अनुभवी कोपऱ्याने केली आणि तीन खेळाडू एकाच चढाईत लोळवून भोलाने त्याचा अचूक फायदा उठविला व (इंदूरला पहिला गुण वसंत सूदनने मिळवला होता आणि मदन पुजारीने दोघांना एकदम बाद केले होते- खेळाडू वेगळे पण इतिहास अगदी तसाच) पुरे लोण लावून रेल्वेने आपले वर्चस्व (18-9) सामन्यांवर प्रस्थापित केले. पुन्हा एकदा बाळ कोंडाळकरने खळबळ माजवली. त्याने सामना संपण्याला थोडाच अवधी असताना तीन गडी बाद केले. भोलाने त्याला धरण्याच्या केलेल्या घाईचा त्याने फायदा उठविला. शेवटच्या चार मिनिटांत सामन्यांचा ताण गोंधळ आणि अनिश्चितता कमालीची वाढली होती, पण या साऱ्यातून यंदाच संघनायक झालेल्या सदानंद शेटेने शांतपणे मार्ग काढला आणि एक गुणाने का होईना पण संघाचा विजय नोंदविला. महाराष्ट्राच्या संघात वसंत सूद आणि मधू पाटील या दोन्ही खेळाडूंची अनुपस्थिती जाणवली. वसंत सूद जायबंदी झाल्यामुळे खेळू शकला नाही. मधूची तर निवडच झाली नव्हती. या दोन्ही खेळाडूंनी इतिहास निराळा घडविला असता असे मानण्यास भरपूर जागा आहे. 

महिला विभागातील या गटात हैदराबाद आणि कोल्हापूरला विदर्भाने सहज हरवले. निलीमा चटर्जी, जयश्री खापर्डे, शोमा कलांडे या यंदा महाराष्ट्र राज्य महोत्सव गाजविणाऱ्या महिला येथेही चमकल्या. महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान या विभागांत प्रश्नच नव्हता. मध्यप्रदेश, केरळ, पंजाब या विभागात मध्यप्रदेश अजिंक्य ठरले. ज्योती गाडे चढाई आणि क्षेत्ररक्षण दोन्हीमध्ये चमकली. नेहमी भरभक्कम शरीरयष्टीच्या असणाऱ्या पंजाब-हरियाणाच्या महिला खेळाडू यंदा दहा-अकरा वर्षांच्या छोट्या शाळकरी मुली होत्या. नेहमीच्याप्रमाणे त्या बट घालूनच खेळल्या. दिल्ली, तामिळनाडू आणि उत्तरप्रदेश गटात तामिळनाडू अजिंक्य ठरले. उपांत्य सामना रंगला मध्यप्रदेश आणि विदर्भाचा. मध्यंतरापर्यंत विदर्भ चांगला 12 गुणांनी आघाडीवर होता. मध्यंतराला त्यांनी सुषमा अवधिनकर या राखीव खेळाडूला संधी देण्यास उतरवले आणि तिच्या चुकीच्या पकडीने एकाच चढाईत ज्योती गाडे पाच गडी घेऊन गेली. मग विदर्भाच्या हातात फक्त पराभव आणि पश्चात्तापच राहिला. विभागीय सामने तामिळनाडू आणि मध्यप्रदेशबरोबरचे उपांत्य व अंत्य सामने हे सर्व सामने महाराष्ट्राने एकतर्फी जिंकले. नाबर भगिनी, जया बांदोडकर, निलीमा पुसाळकर यांचे विशेष कौतुक करावयास हवे. महाराष्ट्रीय महिला संघ सतत 16 वर्षे राष्ट्रीय अजिंक्यपद मिळवतो याचा आनंद मानायचा की 16 वर्षांत एकाही प्रांताने एकदाही महाराष्ट्र संघाच्या जवळपास फिरकू नये याची खंत मानायची?

सामन्याला गर्दी यथातथाच होती. (तिकीट लावले असते तर कोणीच फिरकले नसते हे कार्यकर्त्यांचे मत) जेवणाची व्यवस्था चांगली पण अंघोळीसाठी सर्व पुरुष संघाला एक आणि महिला संघाला एक नळ. दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीने साहजिकच बहुतेकानी अंघोळीची गोळी घेतली. राष्ट्रपती भवनात 15 मिनिटे चहापान झाले. पण महानगरपालिकेला मात्र विस्मरण व्हावे याचे अनेकांना आश्चर्य वाटले.

भारतीय कबड्डी असोसिएशनच्या नेतृत्वाचा खांदेपालट वगैरे प्रश्न निकालात निघाले. अलाहाबादचे अध्यक्ष त्रिपाठी हे उस्तादोंके उस्ताद या पद्धतीने सध्यातरी वागत आहेत. (अर्थात सर्वच राजकारणात अलाहाबादचीही परंपराच आहे.)

चार चांगले, चार फालतू सामने, बरी गर्दी, थोडी करमणूक हेच या सामन्यांचे फलित काय? भारतभर जिल्हावार संघटना तरी प्रत्येक राज्यात अस्तित्वात याव्यात, अविकसित भागात दौरे आखावेत. कबड्डीचे स्वरूप आकर्षक करण्यासाठी त्यात बदल घडवावेत हे आणि असे अनेक उपक्रम आहेत. वर्षातून केवळ एकदाच ज्या ठिकाणी सर्व राज्यांचे प्रतिनिधी भेटतात त्या ठिकाणी या बाबतीत सामसूम दिसावी आणि सामने यशस्वी झाल्याचा डांगोरा पिटण्यात यावा यात काय अर्थ?

(पूर्वप्रसिद्धी : माणूस, 13 मार्च 1971)

- डॉ. नरेंद्र दाभोलकर


क्रीडांगण सदरातील या आधी प्रसिद्ध झालेले सर्व लेख वाचा या लिंकवर

Tags: नरेंद्र दाभोलकर अंनिस सामाजिक कार्यकर्ता माणूस साप्ताहिक श्री. ग. माजगावकर क्रिडा नरेंद्र दाभोळकर खेळ क्रिकेट सामना Load More Tags

Add Comment