त्रिवार अभिनंदन - दोन आदर्श उपक्रम : बाबा शिर्के साहाय्यक निधी

'माणूस'मधील 50 वर्षांपूर्वीच्या सदराची पुनर्भेट (17/22)

बबनराव उथळे आणि मेघनाथ नागेशकर

काही लोक वेडे असतात. वेड सुंदर असते. भव्य असते. दिव्य असते. त्या वेडासाठी मग ते रक्ताचे पाणी करतात. कोल्हापूरचे मेघनाथ नागेशकर आणि सातारचे बबनराव उथळे ह्या अशा दोन व्यक्ती. 25 वर्षांपूर्वी दलदल आणि डबकी असलेल्या ठिकाणी नागेशकरांनी शाहू स्टेडियमची प्रचंड वास्तू उभी केली आणि कोल्हापूरच्या सबंध क्रीडाजीवनाला योग्य आणि निकोप वळण लावले. सातारला बबनरावांनी देशी खेळांचा प्रचंड पसारा उभा केला. सडकेचे सख्याहरी म्हणून ज्या तरुण पिढीची अवहेलना होते, ती संध्याकाळी खेळाच्या मैदानावर यशस्वीपणे गुंतवता येते आणि अव्वल दर्जाचे खेळाडू त्यातून निर्माण करता येतात हे त्यांनी यशस्वीपणे सिद्ध केले.

कृतज्ञता आणि कर्तव्य, जिव्हाळा आणि आपुलकी ह्या शब्दांचे अर्थ शब्दकोशात धुंडाळावयास लागावेत असा हा जमाना! 'काय संबंध?' अशा त्रयस्थ दृष्टिकोनातून आजकाल कुठल्याही घटनेकडे बघायला लोक सरावले आहेत. पदराला खार लावून कोणी काही चांगले करत असेल तर ‘पुढे पुढे करायची सवय लागलीय म्हणून हा नाचरेपणा' अशा प्रकारे त्याची संभावना होते आणि कामाला नावे ठेवणे अगदीच शक्य नसेल तर 'बघू या, आम्ही तरी कुठे कुठे पुरे पडणार?' असा साळसूदपणा वर दाखवत पाठ वळल्यावर ‘काय नसती पीडा’ अशी आठी कपाळावर उमटते.

कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला येणारे हे अनुभव फारसे उत्साहवर्धक नाहीत. देशी खेळांसारख्या तुलनेने मागासलेल्या ठिकाणी काम करताना तर असे अनुभव येण्याची शक्यता खूपच अधिक. सगळीकडे कोरडी सहानभूती आणि खोटा जिव्हाळा! पण संस्था ज्यांना उभ्या करावयाच्या असतात त्यांना या साऱ्या वातावरणाशी टक्कर देत ज्योत जागवावीच लागते. सतत पेटतीही ठेवावी लागते. जिद्दीने धडपणारी एखादी संस्था म्हणजे तिच्या असंख्य कार्यकर्त्यांचे खरे घर. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनला ही उपमा शोभून दिसावी. घरामध्ये सारे शिस्तीत घडावे म्हणून वडीलधाऱ्यांचा धाक लागतो. काही चांगले केले तर त्याचे कौतुक व्हावे लागते. काही अडले-नडले तर डोळ्यांतले अश्रू जवळिकीने पुसणारी आणि आधार देणारी व्यक्ती लागते. एखादी संस्था घरासारखी वाढवावयाची म्हणजे ह्या साऱ्या गोष्टी बघाव्याच लागतात.

बाबा शिर्के गेला त्या वेळी सगळ्यांचीच मने सुन्न झाली. स्वभावाने झुंजार आणि वृत्तीने निगर्वी असा हा कबड्डी शौकिनांचा लाडका खेळाडू! कुठल्याही आणीबाणीच्या वेळी बाबाने आपला खेळातला संयम आणि बेडरपणा सोडला नाही. खरेपणापासून ढळला नाही. बाबाशी दोन हात करण्याचा प्रसंग मला दोनदाच आला. पण बाबाच्या खेळाचा आनंद मी अनेक वेळा मनमुराद लुटला आहे. स्वतःच्या ‘खास’ तंत्राने लोकप्रिय झालेले जे थोडे खेळाडू महाराष्ट्रात होते, त्यामध्ये बाबाचा उल्लेख अवश्य करायला हवा. ब्लॉक पद्धतीने गडी रोखणे हे कबड्डीतले एक वैशिष्ट्यपूर्ण तंत्र आहे, दत्ता मालप आणि सदा शेटेनंतरच्या पिढीत हे तंत्र मला बाबा शिर्के आणि लक्ष्मण बिरवडकर या दोनच खेळाडूंत परिपूर्ण आढळले.

बाबाचे वजन 110 पौंड खाली बसत नाही म्हणून केवळ त्याच्यासाठी लक्ष्मीमाता संघाने खुल्या गटात आपला संघ नोंदवायला सुरुवात केली आणि बाबाच्यासाठी चालू केलेला हा आरंभ त्याच्या संघाला एकदम मोठे नाव मिळवून देण्यास कारणीभूत ठरला. लक्ष्मीमाता संघाच्या इतिहासात मधू पाटीलइतक्याच मोलाचे बाबा शिर्केचे नाव आहे. भोईर सुवर्ण चषकाचा सर्वोच्च मान लक्ष्मीरतनला दुसऱ्यांदा मिळवून देताना उपांत्य फेरीत बाबाने आपल्या पकडीच्या जोरावर रेल्वेच्या अथीरथींची चाल ज्या शर्थीने रोखली होती, ती झुंज ज्यांनी बघितली ते भाग्यवान! आधीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण असलेल्या स्टेट बँकेच्या संघात बाबा ज्या वेळी दाखल झाला त्या वेळी स्टेट बँकेचे कव्हर एखाद्या अभेद्य किल्ल्यासारखे बळकट झाले.

लक्ष्मीरतनने भोईर चषक पहिल्यांदा मिळवला त्या वेळी त्या यशाला कारणीभूत झालेल्या मधू बोभाटेवर कॅन्सरचा घाला पडावा आणि त्या संघाला दुसऱ्यांदा हा मान मिळवून देणारा बाबा शिर्के कॅन्सरचेच भक्ष्य ठरावा हा नियतीचा विचित्र योगायोग नव्हे काय?

हळहळ वाटावी हे स्वाभाविक होते. पण या नुसत्या हळवेपणाचा काय उपयोग होता? कुटुंबातल्या एका भावाच्या संसाराची घडी विस्कटली होती. मुले पोरकी झाली होती, वहिनी निराधार झाल्या होत्या. कबड्डी असोशिएशनने कंबर कसली. बाबा परत येणे शक्य नव्हते पण आर्थिक मदतीने त्याचा संसार सावरणे जमले असते. चार मुलांच्या शिक्षणाची तरतूद झाली असती. लक्ष्मीमाता आणि स्टेट बँक या त्याच्या संघांनी पुढाकार घेतला. निधी जमविण्याचे काम चालू झाले. बाबाची लोकप्रियताही तशीच होती. बघता बघता पाचसहा हजार रुपये गोळा झाले. मग बाबा शिर्के निधी साहाय्यक स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. मुंबईतले नामवंत संघ स्वखर्चाने त्यात उतरले. सामने रंगले. निधी वाढला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी निधीची रक्कम 11 हजारांचा आकडा ओलांडून पुढे गेली होती.

प्रत्यक्ष आकड्यांचे महत्त्व यापेक्षा निधी जमविण्याच्या मागची आपुलकीची भावना आणि कळकळ याचे मोल अधिक असते. पण या वेळी जमा झालेली रक्कमही कमी मुळीच नाही. सुशिक्षितांत आणि श्रीमंतांच्यात कबड्डी अजूनही फारसा परिचित नाही. लोकप्रिय तर नाहीच. या पार्श्वभूमीवर तर ही रक्कम अधिकच उठून दिसते. सर्व थरांतून आणि सर्व भारतभर हा खेळ न्यावयाचा म्हणजे अनेक अंगांनी संघटना बांधावी लागते. संघटनेमधले कार्यकर्ते ज्या जवळिकीने आणि जिद्दीने एकमेकांशी बांधले जातात त्यांच्यावरच अशा संस्थांचे भवितव्य अवलंबून असते. खेळाला आणि खेळाडूंना काही वेळा त्यांचा वाईटपणा पत्करूनही खेळाच्या वाढीसाठी शिस्त लावणारी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन खेळाडूच्या संकटकाळीही मदतीला सरसावून उभी राहते हे चित्र अभिनंदनीय आहे. लक्ष्मीमाता आणि स्टेट बँक संघांचाही उल्लेख जरूर करायला हवा.

एक कल्पना या उपक्रमातून सुचू शकते. काही ना काही प्रमाणात अशा आपत्ती नेहमीच येत असतात. यासाठी कायम स्वरूपाचा निधी उभा करण्याची नितांत आवश्यकता आहे. केवळ या निधीसाठीच म्हणून मुंबई, पुणे, सोलापूर, सांगली या ठिकाणी दरवर्षी एक याप्रमाणे सामने आयोजित व्हावेत. परगावचे संघ बोलवून खर्च वाढविण्याची गरज नाही. वरील चारही गावांत कबड्डीचे भरपूर संघ आहेत आणि त्यांच्यातील चुरशीचे सामने निश्चितपणे गर्दी खेचू शकतील. आपल्या कबड्डीचे यात भले आहे या भावनेने सर्व संघांनी मदत केली तर सामन्यांचे संयोजन त्रासदायक आणि खर्चीक ठरू नये. सतत तीन वर्षे अशा स्पर्धा आयोजित झाल्या तर 25 ते 50 हजारांपर्यंतचा कायमचा निधी कबड्डीपटू सहज उभा करतील, त्यांच्या खेळाच्या आणि खेळाडूंच्या भवितव्याच्या सुरक्षिततेसाठी. 

बाबा शिर्के निधी स्पर्धा ही याची सुरुवात ठरेल काय?

गुरुदक्षिणा ट्रॉफी

काही लोक वेडे असतात. वेड सुंदर असते. भव्य असते. दिव्य असते. त्या वेडासाठी मग ते रक्ताचे पाणी करतात. अपार श्रम घेतात. प्रयत्न असतो अक्षरश: शून्यातून विश्व निर्माण करण्याचा. पण हे महाभाग जिद्दीचे असतात. अनेक घाव झेलूनही हटत नाहीत. मंझिलचा रस्ता सोडत नाहीत.

कोल्हापूरचे मेघनाथ नागेशकर आणि सातारचे बबनराव उथळे ह्या अशा दोन व्यक्ती. 25 वर्षांपूर्वी दलदल आणि डबकी असलेल्या ठिकाणी नागेशकरांनी शाहू स्टेडियमची प्रचंड वास्तू उभी केली आणि कोल्हापूरच्या सबंध क्रीडाजीवनाला योग्य आणि निकोप वळण लावले. सातारला बबनरावांनी देशी खेळांचा प्रचंड पसारा उभा केला. सडकेचे सख्याहरी म्हणून ज्या तरुण पिढीची अवहेलना होते, ती संध्याकाळी खेळाच्या मैदानावर यशस्वीपणे गुंतवता येते आणि अव्वल दर्जाचे खेळाडू त्यातून निर्माण करता येतात हे त्यांनी यशस्वीपणे सिद्ध केले.

 डावीकडे बबनराव उथळे श्री. शिवाजी उदय तरुण मंडळाच्या खेळाडूंसह

केवळ सातारा शहरात संस्थेच्या पुरुषांच्या सात महिलांची एक- अशा आठ शाखा आहेत. इतर गावांतला पसारा वेगळाच. स्वतःची व्यायामशाळा आहे. या साऱ्या शाखांवर मिळून बाराही महिने देशी खेळांची अखंड उपासना चालू असते. कबड्डी, खोखो, आट्यापाट्या, लंगडी, मल्लखांब, कुस्ती, लेझीम, फरिदगा, आसने या विविध प्रकारांचे शास्त्रीय शिक्षण जवळजवळ हजार स्त्री-पुरुष नियमितपणे घेत असतात. बबनरावांच्या प्रेरणेने आणि त्यांच्यावर निष्ठा ठेवून कार्यकर्ते हे सारे उपक्रम विनामूल्य चालवितात. पुणे, शिवाजी विद्यापीठांच्या अनेक कबड्डी संघांचे संघनायक या संस्थेचे होते. भारतीय पातळीवर या स्पर्धेचा खेळाडू मल्लखांबात अजिंक्य ठरला आहे. संस्थेच्या प्रभाकर पवारने एका दमात मारलेल्या 6161 बैठकींचा उच्चांक अजूनही कोणी मोडला नाही. महाराष्ट्राच्या शालेय खोखो संघाचे नेतृत्व अ. भा. शालेय स्पर्धांत या संस्थेच्या खेळाडूंना मिळाले आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव तीनदा जिंकणारा हा महाराष्ट्रातला एकमेव संघ हे यश कार्यकर्त्यांचे आहे, संघाचे आहे, खेळाडूंचे आहे तेवढेच ते बबनराव या एका व्यक्तीचेही आहे. प्रत्येक खेळाडूवर त्यांच्या तंत्रामंत्राची, वागण्याबोलण्याची पडलेली छाप आणि त्याबद्दलचा आदर न सांगताही जाणवावा एवढा स्पष्ट आहे.

या श्री. शिवाजी उदय मंडळाचा यंदा आहे रौप्य महोत्सव. त्या निमित्ताने सातारा शहरात हे लोक अ. भा. कबड्डी स्पर्धा आयोजित करत आहेत. उपक्रम मोठा आहे. सातारा जिल्ह्यात प्रथमच होणारा. सामन्यातील विजयी संघाला चांदीचा एक भव्य चषक मिळेल. त्याचे नाव आहे. ‘गुरुदक्षिणा ट्रॉफी’. ज्या बबनरावांच्या पुण्याईने संस्थेचा संसार गेल्या पंचवीस वर्षांत समर्थपणे उभा राहिला त्यांच्याबद्दल कृतज्ञतेची खूण म्हणून या कामात बबनरावांच्या हाताखालून गेलेल्या आजी-माजी खेळाडूंनी ह्या ट्रॉफीची रक्कम जमा केली. सुमारे पाच हजार रुपये किंमतीची ही ट्रॉफी त्याच्या या पार्श्वभूमीमुळे महाराष्ट्रातील एकमेव अद्वितीय ठरेल. पण एवढ्यावरच गुरुदक्षिणा समितीचे अध्यक्ष डॉ. लवंगारे खूष नाहीत. ट्रॉफीचे डिझाइन आणि त्यावरील नक्षीकाम हे अतिशय देखणे ठरावे यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले आहेत. सातारला चषकाचे चित्र आणि कोल्हापूरला प्रत्यक्ष चाललेले काम हे दोन्ही पाहण्याचा मला योग आला. जवळजवळ निम्मा भारत मी कबड्डी सामन्यासाठी पायाखाली घातला आहे. परंतु सर्व ठिकाणी बघितलेल्या पारितोषिकांपेक्षा ही ट्रॉफी आकर्षक ठरेल असा माझा अंदाज आहे. सामन्याला साऱ्या भारतातून गोळा होणारे संघ आपले मत देतीलच. त्यांचाही होकार माझ्या मनाला मिळाला तर बबनरावांच्या आजपर्यंतच्या कामाचा योग्य तो गौरव केल्याचे समाधान या कामासाठी आपुलकीने निधी गोळा केलेल्या संस्थेतल्या असंख्य कार्यकर्त्यांना निश्चितच लाभेल.

(पूर्वप्रसिद्धी : माणूस, 17 एप्रिल 1971)

- डॉ. नरेंद्र दाभोलकर


क्रीडांगण सदरातील या आधी प्रसिद्ध झालेले सर्व लेख वाचा या लिंकवर

Tags: नरेंद्र दाभोलकर अंनिस सामाजिक कार्यकर्ता माणूस साप्ताहिक श्री. ग. माजगावकर क्रिडा नरेंद्र दाभोळकर खेळ क्रिकेट सामना Load More Tags

Add Comment