रंगलेल्या तिरोडकर स्पर्धा

'माणूस'मधील 50 वर्षांपूर्वीच्या सदराची पुनर्भेट (20/22)

प्रातिनिधिक चित्र | newsclick.in

महिला कबड्डी खेळतात याचेच कौतुक आपण किती दिवस करणार याचा विचार आता एकदा केला पाहिजे. मुंबईमधल्या नवयुग क्रीडा, नवयुग मंडळ एकाच मंडळाच्या वादातून निर्माण झालेले दोन संघ आणि विश्वशांती आणि साधना व राणाप्रताप एवढे संघ सोडले की अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत सतत 15 वर्षे अजिंक्यपद मिळवणाऱ्या महाराष्ट्र राज्याचा महिलांचा कबड्डी विभाग संपुष्टात येतो. बाकीचे संघ सामन्यात भाग घेतात पण त्यांचे अस्तित्व हे पावसाळी छत्रीप्रमाणे असते. 15 दिवस सराव करून आणि इकडच्या-तिकडच्या चार मुली जमा करून कबड्डी खेळाडू संघ आणि खेळ यापैकी कशाचेच भले होत नाही.

मुंबईचे नामवंत कबड्डी संघ ज्या वेळी एकमेकांसमोर उभे ठाकतात त्या वेळी कोण कुणाचा पराभव करेल याचा अंदाज करताना आता भल्याभल्यांची मती गुंग होते. काही वेळा परगावचे संघही या चमत्कारात भाग घेतात. यंदा भुईर सुवर्ण चषक स्पर्धा जिंकणारा ‘स्टेट बँक’. त्यानंतर कोणत्याही स्पर्धेत पुन्हा अजिंक्यपद पटकवू शकला नाही. कोणाच्याही ध्यानीमनी नसलेल्या बॉम्बे पोर्ट्स असोसिएशनच्या संघात शिर्के संघाने कबड्डी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. तिरोडकर चषकाच्या स्पर्धेने या वर्षी सगळ्यात विस्मयजनक निकाल दिले. मी मी म्हणणाऱ्या संघांना आपल्या गटविभागातच नामुष्कीने आपला गाशा गुंडाळावा लागला.

एका गटातून अवघा एकच संघ वर घ्यावयाचा या तंत्राने सध्या साखळी सामन्यात भलत्याच दडपणाखाली खेळावे लागते. तसा खेळ करूनही पुन्हा काही चांगले सामने विभागातच हकनाक बाद होतात. गेली तीन वर्षे राज्य चाचणी स्पर्धेत अंतिम फेरी गाजविणारा पुणे जिल्ह्याचा संघ ठाण्याकडून पराभूत होताच यंदा धुळ्याच्या निवड स्पर्धेत गटातच गारद झाला. खेळाडूंना अधिकाधिक संधी देण्यासाठी ज्या चाचणी स्पर्धा घ्यायच्या त्यामध्ये एका गटातून अवघा एकच संघ वर घेण्यात काय साधले जाते कुणास ठाऊक? इतरही ठिकाणी हा नियम अन्यायकारकच वाटतो. बरे, महाराष्ट्रात तो सगळीकडे सारखाच लागू होत नाही. पुण्याला निराळी पद्धत. तेथे विभागातून दोन संघ वर घेतात. तर मुंबईकरांची निराळीच तऱ्हा.

ही गटातली काटछाट यंदाच्या तिरोडकर स्पर्धेत भलतीच रंगली. भल्या भल्या संघांच्या तोंडचे पार पाणी पळाले. बेस्टचा संघ हा सतत तीन वर्षे भुईर ट्रॉफीची अंतिम फेरी गाठणारा आणि त्यापैकी दोनदा ती जिंकणारा बलाढ्य संघ. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर तो मात करेलच ही खात्री. सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली. श्रीपाद शिरोडकरची पकड करून बँकेने मिळवलेली आघाडी मधू पाटीलने एकाच चढाईत चार गडी बाद करून संपुष्टात आणली. पण बँकेच्या मारुती लोखंडेने भलताच दमदार खेळ केला. त्याने मध्यंतरापूर्वी परशुराम आणि मधू या पाटीलद्वयाला टिपले आणि मध्यंतरानंतर एकाच चढाईत तीन गडी बाद करून बँकेच्या 7-17 या घवघवीत विजयाचा मार्ग मोकळा केला. या स्पर्धेत प्रथम पदार्पण करणाऱ्या कल्याणच्या ‘विम्को’ने ‘रेल्वे’च्या नाकात दम आणला. सामना अगदी संपायला येईपर्यंत पठ्ठ्‌यांनी पाच-पाच अशी बरोबरी राखली. याच मैदानावर मागील वर्षी रेल्वेच्या संघाबरोबर राजस्थानच्या संघाने राष्ट्रीय सामन्यात रेल्वेला असेच झुंजविलेले मला आठवले. त्या वेळी शेवटच्या दोन मिनिटांत सदा शेटे आपल्या संघाच्या मदतीला धावला होता. या वेळी मात्र विम्कोच्या दुर्दैवानेच रेल्वेला हात दिला. पंचांनी नाईकला दमबाद केले आणि रेल्वेला एका गुणाने हा सामना जिंकणे शक्य झाले.

‘महाराष्ट्र राज्य सहकारी बँक’ या वेळी भलतीच फॉर्मात होती. आपल्या विभागात ‘मध्य रेल्वे’चीही त्यांनी धूळदाण उडवली. 28-7 अशा गुणांची नोंद फरकावर करून जगन्नाथ बलवाडेने पकडीचा डोळे सुखविणारा खेळ केला. वर्षाच्या विश्रांतीनंतर मध्यरक्षक म्हणून उतरलेल्या चंद्रकांत मांडरेनी त्याला चांगली साथ दिली - महिन्यापूर्वीच बाबा शिर्के निधी स्पर्धेत अजिंक्यपदाची माळ पटकवणाऱ्या मध्य रेल्वेला विभागातच संपुष्टात यावे लागले.

‘ब’ गटात ‘महिंद्र आणि महिंद्र’ व ‘महाराष्ट्र बँक’ या दोन संघांचा समावेश होता. गेल्या दोन वर्षांत जे संघ महाराष्ट्रात एकदम चमकू लागले, त्यापैकी हे दोन संघ. वसंत ढवण आणि जयवंत परब यांसारख्या नामांकित खेळाडूंचा संघाला आधार मिळाला. महाराष्ट्र बँकेने अभेद क्षेत्ररक्षण आणि पहिला गुण निदानरेषेवर हमखास मिळवण्याचे कसब यांच्या साह्याने आपला जम बसविला, लक्ष्मण तिरवडकर हा त्याचा मध्यरक्षक आज महाराष्ट्रात कौतुकाचा विषय आहे. या दोन्ही संघांना कळव्याच्या ‘नॅशनल मशिनर’ने अक्षरश: पाणी पाजले. 28-3 असा अपमानास्पद पराभव महिंद्रला पत्करावा लागला तर निदानरेषेवर पहिला गुण मिळवायचे तंत्र फसल्यावर महाराष्ट्र बँकेला संघावर पकड घेणे अवघड जाते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

‘ड’ गटात ‘नेव्हल डॉकयार्ड’ने बंगलोरच्या ‘हिंदुस्थान ट्रान्समिशन प्रॉडक्ट्‌स’चा 54 - 11 असा दणदणीत पराभव केला आणि स्टेट बँकेलाही असेच सरळसरळ नामोहरम केले. वसंत सूदसारख्या चतुरस्र आणि बलदंड खेळाडूची अनुपस्थिती स्टेट बँकेच्या नावाजलेल्या संघाला चांगलीच जाणवली. यंदाची भुईर ट्रॉफी जिंकणारा हा संघ विभागातच दोनदा पराभूत झाला. बंगलोरकरांनी ‘स्टेट बँक’ आघाडीवर असतानाही त्याचा पराभव करून क्रीडाशौकिनांना चांगलाच धक्का दिला. ‘बंगलोर’चा कर्णधार मारुती कुसपे याचा मात्र सिंहाचा वाटा होता. ‘इ’ गटात महाराष्ट्र बँक आणि केमिकल्स अंबरनाथ या दोन प्रमुख संघांचा समावेश होता. या दोन्ही संघांनी ‘भिलाई पोलाद कारखान्या’वर सहजपणे मात केली. मुंबईबाहेरच्या प्रथम दर्जाच्या संघांत आज या दोन्ही संघांचा समावेश होतो. हा सामना बचावात्मक होईल ही अटकळ सुदैवाने खोटी ठरली. ‘अंबरनाथ’च्या अरुण नाईकने पहिल्याच चढाईत तीन गडी बाद करून सामना आपल्याकडे खेचून आणला आणि तो 11-6 अशा गुणांनी जिंकला. मग त्यांना सोपे गेले. या सामन्याबरोबर विभागीय विजेतेपदही त्यांनी खिशात घातले.

स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी ‘फ’ गटातील संघाची कमतरता भरून काढण्याला ‘एअर इंडिया’ला स्थान द्यावे लागले. हा प्रकार बऱ्याच जणांना खटकला. समजा एखाद्या विभागात दोनच संघ असले म्हणून असे काय फार मोठे बिघडले असते? एअर इंडिया आणि यशवंत सोलापूर या दोन्ही संघांचा भारत इलेक्ट्रॉनिक्स बंगलोर या संघाने पराभव केला. यशवंत कारखाना ही सोलापूरकरांची खास फाईण्ड आहे. पूर्वी खेळाडूंच्या रजिस्ट्रेशनची पद्धत अस्तित्वात येईपर्यंत सोलापूरचा निवडक खेळाडूंचा संयुक्त संघ सर्वांना पाणी पाजे. पुढे रजिस्ट्रेशनच्या नियमामुळे हे जमेना. पराभवाची मानहानी सोलापूरकरांना सतावू लागली. मग त्यांनी एक कंपनी काढली. ती कसले उत्पादन करते कोणास ठाऊक. पण त्यात सगळे चांगले खेळाडू नोकरीला ठेवले. सोलापूरच्या खासगी संघातील सर्व चांगले खेळाडू आता सोलापूर महानगरपालिका आणि यशवंत कंपनीत सामावलेले आहेत. दुर्दैवाने हा संघ या सामन्यात यशवंत ठरू शकला नाही.

या सर्व गटांच्या पार्श्वभूमीवर आपल्या गटात अजिंक्यपद मिळवताना हिंद सायकल संघाने केलेला संयमित आणि आत्मविश्वासाचा खेळ साऱ्यांच्याच मनात भरला. त्यांनी सहजपणे आपल्या विभागाचे विजेतेपद मिळवले.

उपांत्यपूर्व फेरीतले दोन्हीही सामने तसे एकतर्फी झाले. ‘नेव्हल डॉकयार्ड’ला ‘को-ऑपरेटिव्ह बँके’पुढे पाय रोवताच आले नाहीत. जाल कारभारी आणि विनायक यांनी अष्टपैलू खेळ करून 98-8 असा सामना आपल्या संघाला जिंकून दिला. बंगलोरकरांनी आपल्या चौफेर चढाईने कळव्याचा पराभव केला.

या स्पर्धेत अपेक्षा उंचावणाऱ्या सहकारी बँकेच्या संघाला हिंद सायकलने उपांत्य फेरीत गोता दिला आणि अंतिम फेरी गाठली. तर केमिकल्सने बंगलोरचा पराभव करून अंतिम फेरीत पदार्पण केले.

मागील वर्षीचे अजिंक्यपद राखायचे या जाणिवेने हिंदू सायकलचा संघ अत्यंत सावधपणे खेळला. कसलीही घाई वा आक्रमकता त्यांनी दाखविली नाही. टॉस हरल्यामुळे पहिला गुण मिळवणे केमिकल्सला क्रमप्राप्तच होते. त्यांनी निदानरेषा बंद हे आपल खास ठेवणीतले हत्यार काढले. पण बूमरँगप्रमाणे ते त्यांच्यावरच उलटले. धीर न खचू देता गेलेले गुण मिळवण्यासाठी केमिकल्सच्या रामचंद्र बागवेनी तुफानी चढायांना सुरुवात केली. 20 फुटांवर जाऊन त्यांनी रत्नाकर शेट्टीला ज्या बेडरपणे बाद केले ते धाडस डोळे आणि मन सुखावणारे होते. दुर्दैवाने सामन्याचे पारडे फिरवण्याइतके यश त्याच्या चढाईला लाभू शकले नाही. प्रथमपासूनच सुव्यवस्थितपणे केलेल्या खेळामुळे अजिंक्यपद आपल्याकडे राखणे ‘हिंद सायकल’ला शक्य झाले.

महिला कबड्डी खेळतात याचेच कौतुक आपण किती दिवस करणार याचा विचार आता एकदा केला पाहिजे. मुंबईमधल्या नवयुग क्रीडा, नवयुग मंडळ एकाच मंडळाच्या वादातून निर्माण झालेले दोन संघ आणि विश्वशांती आणि साधना व राणाप्रताप एवढे संघ सोडले की अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत सतत 15 वर्षे अजिंक्यपद मिळवणाऱ्या महाराष्ट्र राज्याचा महिलांचा कबड्डी विभाग संपुष्टात येतो. बाकीचे संघ सामन्यात भाग घेतात पण त्यांचे अस्तित्व हे पावसाळी छत्रीप्रमाणे असते. 15 दिवस सराव करून आणि इकडच्या-तिकडच्या चार मुली जमा करून कबड्डी खेळाडू संघ आणि खेळ यापैकी कशाचेच भले होत नाही. एखाद्या चांगल्या संघाशी या संघाची गाठ पडल्यावर होणारा खेळ अत्यंत एकतर्फी आणि बेचव असतो. साधना मंडळाने ठाण्याच्या मावळी मंडळाचा गुणांचे शतक नोंदवून धुव्वा उडविला हे महिलांच्या कबड्डीच्या वाढीच्या दृष्टीने मला काही फारसे आनंदाचे वाटत नाही.

‘क’ गटात गतवर्षी या ‘राणाप्रताप’च्या विजेत्या संघाचा नवयुग मंडळाने जो पराभव केला त्यामध्ये मात्र अनपेक्षित चमकदार कबड्डी बघावयास मिळाली. सरोजनी पाटकर व लीला पाटील या वेळी उत्कृष्ट खेळल्या.

अंतिम सामना जिंकण्याचे नवयुग क्रीडा मंडळाचे काम यामुळे सोपे झाले. खरे म्हटले तर नवयुग क्रीडा मंडळाशी बरोबरी करू शकणारा एकही महिला संघ सध्या मला महाराष्ट्रात आढळत नाही. अत्यंत चुरशीचा सामना होऊन एखाद्या वेळेस संघ पराभूत होतही असेल. जसे यंदाच्या भुईर सुवर्णचषकाच्या सामन्यात विश्वशांतीकडून त्यांना हार खावी लागली. पण संघाचा सर्व बाजूने विचार केला तर हा संघ आजतरी महाराष्ट्रात सर्वश्रेष्ठ वाटतो. चित्रा आणि क्रांती या नाबर भगिनी आकर्षक आणि तडफदार चढाईबहाद्दर असल्यामुळे या संघाचे काम नेहमीच सोपे होते. याही सामन्यात त्यांनी आपल्या संघाला सहजपणे आघाडी मिळवून दिली. त्यानंतर वत्सला दुमणेने एकाच चढाईत चार गडी बाद केल्याने थोडी रंगत येईल असे वाटले होते, पण शेवटी ही लढत एकतर्फीच ठरली.

मुंबईतले आणि महाराष्ट्रातले सर्व नामवंत संघ भुईर सुवर्णचषक आणि तिरोडकर चषक या दोन्ही सामन्यांतच एकत्रित दिसतात. यंदा पुण्याची पी. एम. टी., सोलापूरची महानगरपालिका, सांगली पोलीस अशा काही संघांची अनुपस्थिती या सामन्यात जाणवली. नऊ तारखेपासून सातारला चालू झालेल्या श्री शिवाजी उदय मंडळाच्या रौप्य महोत्सवी सामन्यात हे सर्व संघ पुन्हा एकदा आमने-सामने येण्याचा अनोखा योग घडला आहे. मुंबईबाहेर महाराष्ट्रातले सर्व नामवंत संघ एके ठिकाणी येण्याचे हे पहिलेच उदाहरण! पाहू या कबड्डीमधली अनिश्चितता तेथे काय चमत्कार दाखवते ते.

(पूर्वप्रसिद्धी : माणूस, 22 मे 1971)

- डॉ. नरेंद्र दाभोलकर


क्रीडांगण सदरातील या आधी प्रसिद्ध झालेले सर्व लेख वाचा या लिंकवर

Tags: नरेंद्र दाभोलकर अंनिस सामाजिक कार्यकर्ता माणूस साप्ताहिक श्री. ग. माजगावकर क्रिडा नरेंद्र दाभोळकर खेळ क्रिकेट सामना Load More Tags

Add Comment