महाराष्ट्र संघाची कर्णधार : चित्रा नाबर

'माणूस'मधील 50 वर्षांपूर्वीच्या सदराची पुनर्भेट (8/22)

वसंत ढवण

श्रीराम संघ हा मुंबईतील सर्वांत अधिक बक्षिसे मिळविलेला संघ आहे आणि त्या यशात वसंत ढवणचा वाटा नेहमीच महत्त्वाचा राहत आहे. मुंबईतील तीन स्पर्धांत एकाच दिवशी अजिंक्यपद मिळविणे, सोलापूरच्या जय भवानीच्या सामन्यात सतत तीन वर्षे सुवर्णढाल जिंकून हॅट्ट्रिक करणे अथवा एका वर्षात 14 ठिकाणांची अजिंक्यपदे मिळविणे हे सर्व पराक्रम श्रीराम संघाला वसंत ढवणच्या दमदार खेळामुळेच शक्य झाले.

पूर्वीच्या काळी अश्वमेध यज्ञ होत. कोठेही पराभव न घेता साऱ्या प्रदेशावर विजयी वर्चस्व स्थापन केल्यावर या विजयाची सांगता होई. नवयुग क्रीडा मंडळाच्या कर्णधार कु. चित्रा नाबर यांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या व संघाच्या पराक्रमाला वरील उपमाच साजेशी दिसेल. मागील वर्षी नवयुग क्रीडा मंडळाने भारतातील नऊ नामवंत क्रीडास्पर्धांत भाग घेतला आणि त्या सर्व सामन्यांत हा संघ अजिंक्य ठरला. या विजयातील सिंहाचा वाटा संघनायिका आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून चित्रा नाबर यांच्याकडे जातो. मागील वर्षी भारतीय स्पर्धेत अजिंक्य ठरलेल्या महाराष्ट्र राज्यसंघाच्या त्या उपकर्णधार होत्या आणि यंदा दिल्ली येथे 3 ते 7 फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय स्पर्धेत त्या महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करतील.

1965 मध्ये किंग जॉर्ज हायस्कूलमधून खेळाचा प्रारंभ केल्यावर अवघ्या पाच वर्षांत त्यांनी बजावलेली कामगिरी हेवा वाटण्यासारखी आहे. रुईया कॉलेजचा संघ त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई विद्यापीठात सतत तीन वर्षे अजिंक्य ठरला आहे. 1969 मध्ये त्यांनी नेतृत्व केलेल्या मुंबई विद्यापीठाच्या संघाने अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत मानाचे पान मिळविले होते. तिरोडकर ट्रॉफी अथवा ‘दादोबा गावंड शील्ड’चे सामने अशा स्वरूपाच्या पहिल्या दर्जाच्या स्पर्धेत आपला संघ सतत पहिला ठेवण्याचा विक्रम त्यांनी सतत चार वर्षे केला आहे. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपदाच्या आणि संघ निवडण्याच्या चाचणी-सामन्यांत 1967 पासून अजिंक्य ठरलेल्या मुंबई जिल्ह्याच्या थरात त्यांचा वाटा किती महत्त्वाचा आहे हे ते सामने जवळून पाहणारा कोणताही क्रीडारसिक चटकन सांगू शकेल. महाराष्ट्र राज्याच्या प्रातिनिधिक संघातून बडोदा, इंदूर, नागपूर आणि मुंबई येथील अ. भा. स्पर्धा त्यांनी गाजविल्या आहेत.

त्यांचे सफाईदार क्रीडाकौशल्य, स्वतःच्या उंचीचा सुयोग्यपणे करून घेतलेला उपयोग, हूल देऊन, झाप घेऊन आणि इतर विविध प्रकारे गडी बाद करण्याचे कसब हे सारे पहिल्या वर्गाचे आहे. पण या साऱ्यापेक्षा त्यांच्या बेडर आक्रमक वृत्तीला मी सर्वांत अधिक गुण देतो. भलेभले पुरुष खेळाडू सध्या कातडीबचावू खेळ खेळत असताना एका स्त्री खेळाडूने केवढ्‌याही जबरदस्त प्रतिस्पर्ध्याशी नेहमीच प्रबलपणे आणि खऱ्याखुऱ्या खिलाडूवृत्तीने झुंज देऊन खेळाचा आणि संघाचा गौरव वाढवावा ही खरोखरच पुरुष खेळाडूंना आदर्शवत गोष्ट ठरावी. अनेक सामन्यांतून मध्यरक्षकाची आणि कोपरारक्षकाची कामगिरीही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.

अ.भा.वि.प. तर्फे आयोजित करण्यात आलेल्या गॅलपपोलमध्ये 1968-1969 मध्ये सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून त्यांची निवड झाली होती. आकाशवाणीवरून कबड्डी खेळाविषयी माहिती सांगण्याची व मुलाखत देण्याची संधीही त्यांना दोनदा प्राप्त झाली आहे. महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व मैदाने गाजविणाऱ्या या विक्रमी महिलेची स्वतःच्या नेतृत्वाखालील दिल्लीवरची स्वारी यशस्वी होईल यात मला तरी शंका नाही.

महाराष्ट्र राज्याचा कर्णधार - वसंत ढवण

कसोटी सामन्यांचे नेतृत्व चंदू बोर्डेकडे आले असते तर तो जसा अनपेक्षित धक्का बसला असता तसा धक्का वसंत ढवणच्या खांद्यावर महाराष्ट्र राज्याच्या नेतृत्वाची धुरा दिली गेल्यावर अनेकांना बसला. गेली तीन वर्षे महाराष्ट्र राज्याच्या संघातही ज्याची निवड होऊ शकली नाही तो यंदा एकदम संघनायक कसा, असा प्रश्न अनेक मुखांनी विचारला गेला.

हे विचारले जात असताना वसंत ढवणच्या कबड्डीतील कर्तृत्वाची योग्य नोंद घेणे आवश्यक आहे. कारण अ.भा. स्पर्धांच्या अठरा वर्षांच्या इतिहासात अजिंक्यपदाची हॅट्‌ट्रिक करण्याची संधी प्रथमच महाराष्ट्राला लाभत आहे आणि संघनायक म्हणून या विजयाचा शिल्पकार त्याला व्हावयाचे आहे.

1950 मध्ये मुंबईच्या श्रीराम संघात दाखल झालेला वसंत ढवण गेली 20 वर्षे सतत कबड्डीचे मैदान आपल्या कर्तृत्वाने गाजवीत आहे. श्रीराम संघ हा मुंबईतील सर्वांत अधिक बक्षिसे मिळविलेला संघ आहे आणि त्या यशात ढवणचा वाटा नेहमीच महत्त्वाचा राहत आहे. मुंबईतील तीन स्पर्धांत एकाच दिवशी अजिंक्यपद मिळविणे, सोलापूरच्या जय भवानीच्या सामन्यात सतत तीन वर्षे सुवर्णढाल जिंकून हॅट्ट्रिक करणे अथवा एका वर्षात 14 ठिकाणांची अजिंक्यपदे मिळविणे हे सर्व पराक्रम श्रीराम संघाला वसंत ढवणच्या दमदार खेळामुळेच शक्य झाले.

‘फिनिक्स मिल्स’मध्ये कामाला असताना ‘मिल नोकर संघा’ला महाराष्ट्रातून अनेक अनेक ठिकाणी जी अजिंक्यपदे मिळाली ती वसंतमुळेच. पुढे लक्ष्मीरतन या कारखान्यात नोकरीला लागल्यावर भारतीय कबड्डीचे विंबल्डन असलेल्या ‘भुईर सुवर्ण चषका’च्या स्पर्धा जिंकून तो चषक आपल्या संघाला मिळवून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. गेली दोन वर्षे तो ‘महिंद्र आणि महिंद्र’मध्ये नोकरी करत आहे. गेल्या वर्षी टुर (आंध्र) या ठिकाणी अ.भा. स्पर्धेत अथवा यंदा पुणे येथील ‘राणाप्रताप संघा’च्या दर्जेदार सामन्यात ‘महिंद्र संघा’ने जी अजिंक्यपदे मिळविली त्याला वसंतचे प्रभावी नेतृत्व आणि चतुरस्र खेळच कारणीभूत होता.

डावा कोपरा तो अत्यंत कौशल्याने सांभाळतो. उत्कृष्ट कोपरारक्षकाला लागणारे सर्व गुण - चवडा आणि लावणी पक्कड, सूर मारणे, पाठ पकडणे, पाठलाग करणे, ब्लॉक करणे - त्याच्या मध्ये आहेत. त्याची चढाई वेगवान असते. खालचा पाय मारणे वा लाथ मारणे आणि कच्चे दुवे अचूक हेरून झापेने गडी मारणे ही त्याची खास कौशल्ये. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील फक्त आठ निवडक संघांचे जे सामने मिरजेला झाले, त्यांमध्ये ‘विजय बजरंग’च्या बलाढ्य संघाशी खेळताना त्याने ज्या तडफदारपणे झापेनं खेळाडू टिपून आपल्या संघाकडे विजयश्री खेचून आणली तो खेळ कधीच विसरणे शक्य नाही.

1960 पासून 1966 पर्यंत अमृतसर, जबलपूर, अलाहाबाद, कोल्हापूर, हैदराबाद, बडोदा या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय सामन्यांत तो महाराष्ट्र राज्य संघातून सतत खेळला आहे. त्याचे अनुभवी आणि सयंमित नेतृत्व हॅट्‌ट्रिक पुरी करण्याचे महाराष्ट्राचे फार वर्षांचे स्वप्न साकार करील अशी आशा करू या.

(पूर्वप्रसिद्धी : माणूस, 30 जानेवारी 1971)

- डॉ. नरेंद्र दाभोलकर

Tags: नरेंद्र दाभोलकर अंनिस सामाजिक कार्यकर्ता माणूस साप्ताहिक श्री. ग. माजगावकर क्रिडा नरेंद्र दाभोळकर खेळ क्रिकेट सामना Load More Tags

Add Comment