डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मुख्य ओळख अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते अशी आहे. त्यानंतर साधना साप्ताहिकाचे दीड दशक संपादक अशीही त्यांची एक महत्त्वाची ओळख आहे. मात्र आयुष्याच्या पंचविशीपर्यंत त्यांची मुख्य ओळख राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू अशी होती. त्यांना राज्य सरकारचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार दोन वेळा मिळाला होता. एकदा कबड्डीचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून, आणि दुसऱ्यांदा कबड्डी खेळातील अन्य योगदानासाठी (संघटक, पंच, कॉमेंटेटर, स्तंभलेखक, क्रीडाप्रसारक, इत्यादी प्रकारच्या).
अशा डॉ. दाभोलकरांनी माणूस साप्ताहिकात 1970 - 1971 मध्ये क्रीडांगण हे पाक्षिक सदर लिहिले. त्यात कब्बडी, कुस्ती, अन्य देशी खेळ यांच्यासोबत क्रिकेटवरही त्यांनी लिहिले आहे. या सदरातील एकूण 22 लेखांतून क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी आसुसलेले मन आणि एकूणच खेळांच्या विषयी असलेले त्यांचे प्रगल्भ विचार यांचे दर्शन घडते.
तब्बल 50 वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले आणि त्यानंतर आजतागायत कुठेही उपलब्ध नसलेले हे लेख, साधनेतील आमचा तरुण सहकारी समीर शेख याने 'माणूस'च्या अर्काइव्हमधून संकलित केले आहेत. डॉ. दाभोलकर यांच्या आयुष्यातील सुरुवातीचे हे पर्व किती रोमांचक असेल याची कल्पना तर या लेखमालेतून येईलच, पण 50 वर्षांपूर्वीच्या क्रीडा जगताची एक झलकही पाहायला मिळेल. डॉक्टरांच्या व्यक्तिमत्वातला फारसा समोर न आलेला पैलू दाखवणारे हे लेख आजही वाचनीय आहेत, यात शंकाच नाही. कालपासून (31जुलै) सलग 22 दिवस म्हणजे 20 ऑगस्ट या डॉक्टरांच्या स्मृतिदिनापर्यंत ही लेखमाला 'कर्तव्य'वरून पुनर्भेट म्हणून सादर करीत आहोत.
क्रीडाक्षेत्रात ज्या परंपरा महाराष्ट्र शासनाने रुजविल्या, त्यामध्ये महाराष्ट्र राज्य क्रीडामहोत्सवाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मुंबई प्रांत असतानाच हा क्रीडामहोत्सव चालू झाला. पुढे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर मूळ चौकटीत बदल न करता पण अधिक सुव्यस्थितपणे त्याला स्वरूप देण्याचे प्रयत्न झाले. परंतु निर्माण केलेल्या चौकटीमुळेच ज्या उद्देशाने क्रीडामहोत्सव चालू केला तो साध्य होण्यात अनेक अडचणी येतात हे लक्षात आल्यावर त्याची संपूर्ण पुनर्रचना यावर्षीपासून करण्यात आली.
गामीण भागातील जनतेत खेळाची आवड निर्माण व्हावी, त्यांना स्वतःचे कौशल्य दाखविण्यास संधी मिळावी, होतकरू तरुण खेळाडूंना योग्य ते मार्गदर्शन व उत्तेजन मिळावे ही या क्रीडामहोत्सवामागची कल्पना होती. शहरातील खेळाडूंना अनेक प्रकारे सहकार्य व संधी मिळते. बहुसंख्य लोक खेडेगावात राहणारे असून आणि त्यामध्ये खरोखरच कौशल्य अंगी असलेले तरुण असून केवळ वाव नाही म्हणून त्यांची कुचंबणा होऊ नये ही खरी भूमिका.
यासाठी गट, तालुका जिल्हा व राज्य या चार पातळ्यांवर 17 वर्षे वयाखाली व 21 वर्षे वयाखाली या गटात सामने होत. प्रत्येक पातळीवर चमकणारे खेळाडू निवडून त्यांचा संघ बनविण्यात येई.
या पद्धतीत काही दोष ठळकपणे होते. वयाचा दाखला हा गावच्या तलाठ्यापासून ते प्राथमिक शाळेच्या हेडमास्तरापर्यंत कोणाचाही चाले. यामुळे वयाच्या अटीला काही अर्थच उरला नव्हता. फक्त खोटेपणाला प्रोत्साहन मिळत होते. आजकाल बहुतेक तालुक्यांतून कॉलेजे निघाली आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना क्रीडाक्षेत्रात आज खूपच संधी उपलब्ध आहे. त्यामुळे या संघाचा, खेळाडूंचा दर्जाही बरा असे. त्यामुळे पुन्हा हेच विद्यार्थी तालुक्याचे नेतृत्व करत; आणि अविद्यार्थी असा बहुसंख्य तरुण गट शेवटी डावललाच जाई. त्यामुळे ग्रामीण विभागाला प्रोत्साहन देण्यासाठी चालू केलेल्या या सामन्यात शहरी संघाचेच प्राबल्य उघड उघड दिसून येई. गेल्या दहा वर्षांत अजिंक्यपद मिळवलेल्या संघाचा वा वैयक्तिक स्पर्धेतील खेळाडूंचा आढावा घेतल्यास हे शंभर टक्के सिद्ध होईल.
यावर्षीपासून वरील पद्धतीत दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले. शालेय स्पर्धाचा एक विभाग पाडण्यात आला आणि 16 वर्षांवरील पण अविद्यार्थी असा सर्वांसाठी खुला हा दुसरा गट करण्यात आला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे यामुळे या सामन्यावर होणारे आक्रमण थांबेल ही कल्पना. तसेच वयाची अटच काढून टाकल्याने सर्वांना मार्ग खुला झाला. याशिवाय खेडेगावात सर्वात अधिक लोकप्रिय असणाऱ्या लेझीम या व्यायामप्रकाराचा समावेश केल्याने ते लोक या सामन्याच्या खरेखुरे अधिक जवळ आले. याबरोबरच महिलांची कबड्डीही चालू झाली.
जिल्हा पातळीवर होणारे हे महोत्सव नोव्हेंबर महिन्याअखेरीस संपावेत अशी सूचना होती. त्याप्रमाणे बहुतेक जिल्ह्यातले क्रीडामहोत्सव संपले. यापैकी अनेक क्रीडामहोत्सव मी जवळून पाहिले. एक खेळाडू म्हणून आणि निरीक्षक म्हणूनही.
सामन्याचे उद्घाटन बहुतेक ठिकाणी ठरलेल्या वेळेप्रमाणे होई. अध्यक्षमहाराज येऊन दाखल झाल्यावर निरुपायाने ते होत असावे. खेळाडूंचे होणारे संचलन हा अक्षरशः एक फार्स असे. जिल्ह्यातले निम्म्याशिम्या तालुक्यांचेच संघ मुळात स्पर्धेसाठी संघ पाठवीत. त्यापैकी तीन-चार संघ संचलन हा स्पर्धेचाच आवश्यक भाग मानून या कार्यक्रमाला उपस्थित राहत. बाकीचे संघ आपल्या सामन्यापुरतेच क्रीडांगणावर उगवत. संचलनाची रंगीत तालीम ही नुसतीच कागदोपत्री राही आणि मग अध्यक्ष आणि पाहुण्यांच्या पुढे सादर केली जाई ती रंगीबेरंगी पोषाखातील विदुषकी फॅन्सी परेड. प्रत्येक खेळाडूने आपापल्या सोयीप्रमाणे लेंगा शर्ट, पँट, पटका, स्वेटर आणि इतर काहीही घातलेले असे आणि रस्त्यातून चालताना चालावे इतक्याच निष्काळजीपणे तो संचलनातही चालत असे.
खरे म्हटले तर थोडे कडक धोरण आणि थोडे परिश्रम घेतले तर संचलन यशस्वी करणे आणि सामन्यांची शानदार सुरवात करणे सहज शक्य आहे. पण तसा उत्साह कोणत्याच ठिकाणी संयोजकांच्यात दिसून आला नाही. सरकारी कार्यक्रमात चैतन्य अभावानेच आढळते हा कटु पण सत्य अनुभव क्रीडास्पर्धेच्या उत्साही मैदानावरही यावा हे दुर्दैव. जबाबदारी अंगावर टाकलेले जिल्हापरिषदेचे पदाधिकारी आणि त्यांना मदत करण्यासाठी सरकारी हुकमाने बोलविलेले शाळेतील N.F.C.चे शिक्षक हे स्पर्धेचे संयोजक. पाटी टाकण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे कार्यक्रमात अनेक ठिकाणी वैगुण्ये येतात. यापेक्षा त्या त्या जिल्ह्यातील एखाद्या उत्साही क्रीडासंस्थेवर ही जबाबदारी टाकल्यास ते ही जबाबदारी कितीतरी अधिक समर्थपणे पार पाडतील. आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अशा क्रीडासंस्था अस्तित्वात आहेत.
खेळाचे मैदान तयार करणे, क्रीडांगणावर प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था करणे, निष्णात पंच, खेळाडूंना कपडे बदलण्यासाठी तंबू यापैकी कशाचाच पत्ता बहुतेक ठिकाणी नव्हता. कुठल्याही साधारण सपाट जागेवर जर चार रेघा ओढल्या तर कबड्डी, खोखोची मैदाने आणि पळण्याचे मार्ग तयार होतात ही कल्पना. ती जागा कितपत खडकाळ आहे, गवताळ आहे, त्यावर काचा वगैरे पडलेल्या आहेत का याची चौकशी करतो कोण? जिल्हा सामन्याला बावीसशे रुपये खर्च सरकारकडून मंजूर असतो. यापैकी खेळाडूंचा येण्याजाण्याचा खर्च वगळता (ज्यासाठी भाड्यातील सवलत मिळते) खेळाच्या मैदानाची उत्तम तयारी हे पहिले लक्ष्य हवे. पण ते अभावानेच आढळते. प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था म्हणजे खेळाच्या मैदानाभोवतीचे गर्दी करून केलेले कोंडाळे. उत्साही प्रेक्षक काही वेळा क्रीडांगणाच्या राखीव क्षेत्रावरही आक्रमण करतात. कळत नकळत. या गोष्टी वारंवार निदर्शनाला आणूनही हे असे होणारच अशी संयोजकांची भूमिका दिसते. निष्णात पंच ही खेळाच्या यशस्वीतेसाठी आणखी एक आवश्यक बाब. कबड्डी, खोखो, व्हॉलीबॉल यांच्या असोसिएशन महाराष्ट्रात जोरात असून त्यांच्या पंचपरीक्षा पास झालेले काही खेळाडू आज प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध आहेत. काही जुने तज्ज्ञ अनुभवी क्रीडाशिक्षकही प्रत्येक ठिकाणी असतातच. त्यांना मानधन द्या वा देऊ नका (माझ्या मते द्यावयास हवे. पण तो मुद्दा सोडून देऊ) पण निदान आग्रहाने विनंती करून बोलवा तरी. नाहीतर संघ उतरल्यावर पंच शोधण्याची धावपळ, मग कुणा सोम्या गोम्याला वेठीला धरून उभे कर. आणि मग त्याच्या अर्ध्या-कच्च्या ज्ञानातून निर्माण होणारे वाद आणि भांडणे. याशिवाय कुस्ती एके ठिकाणी, वैयक्तिक स्पर्धा दुसऱ्या मैदानावर तर सांघिक सामन्याचे मैदान निराळेच असाही कारभार काही जिल्ह्यांत दिसून आला.
उणिवा दाखविणे सोपे असते याची जाणीव मलाही आहे. हा पहिलाच क्रीडा महोत्सव असल्याने काही अधिक अडचणी असणार हेही खरे आहे. यातील एक अडचण खरोखरच महत्त्वाची आहे. पूर्वी तालुक्यातले संघ हे खऱ्या अर्थाने तालुक्याचे निवडलेले संघ असत आणि त्यामुळे त्या 50 जणांवर देखरेख ठेवणारा व्यवस्थापक सामन्याच्या दिवसांत आपले सहकार्य देऊ शकत असे. यावर्षीच्या नवीन पद्धतीप्रमाणे कबड्डी, खोखो, व्हॉलीबॉल, लेझीम हे चारी संघ चार निरनिराळ्या खेड्यातले. कारण निवड होत नाही, अजिंक्य संघच पुढे जातो. तर वैयक्तिक स्पर्धांतले स्पर्धक हे असेच स्वतंत्रपणे आलेले. स्वाभाविकपणेच विकेंद्रीकरणातून देखील सामन्याचे सुसूत्र संचलन करण्यासाठी काही अधिक सुधारणा कराव्या लागतील.
स्पर्धेत जमेच्या बाजूही आहेत. त्यापैकी महत्त्वाची म्हणजे लेझीमचा समावेश. 16 जणाच्या संघात सगळीकडेच 16 वर्षांपासून शब्दश: 60 वर्षांपर्यंतचे खेळाडू दृष्टीला आले. ऐटदार पोषाखात वाद्यांच्या साथीवर लयबद्धपणे त्यांनी केलेले डाव बघितले की त्यांनी घेतलेल्या परिश्रमाची कल्पना येई. बहुतेक जिल्हा सामन्यांत हे एकच सांघिक बक्षिस खेड्यातल्याच संघांना हमखासपणाने मिळाले. पण त्यामुळे ते लोक खूष झाले. त्यांना श्रमाचे चीज वाटले. विजयी आणि पराभूत दोन्ही संघांनी पुढच्या तयारीने कमरा कसल्या. तो जिवंत रांगडा उत्साह खराखुरा ग्रामीण वाटला. लेझीमने चालू केलेला हा खेळातील विजयाचा सूर एकदा खेडेगावातल्या लोकांच्या डोक्यात भिनला की मग कबड्डी, व्हॉलीबॉल, वैयक्तिक स्पर्धा या साऱ्यांमधली आव्हाने स्वीकारण्यासाठी त्यांचे मन आणि बाहु स्फुरू लागतील. प्रयत्नाने हे घडू शकते याचा प्रत्यय सांगली जिल्ह्यातील वाळवे गावाने आपल्या खोखो कौशल्याने या पूर्वीच्या काही क्रीडामहोत्सवांत दिलाच आहे. गरज आहे ती मोठ्या प्रमाणावर त्याचे अनुकरण होण्याची. महाराष्ट्र राज्य क्रीडामहोत्सव ग्रामीण भागातील ही सुप्त क्रीडाशक्ती किती जागृत करू शकतो यावरच या नवीन बदलाचे मूल्यमापन होणार आहे.
आंतरविद्यापीठ सामन्यात नेमबाजीचा समावेश शिवाजी विद्यापीठामुळे झाला. खेळाच्या विकासासाठी आपले सारे आयुष्य वेचलेल्या मेघनाथ नागेशकरांच्या प्रयत्नामुळे हे घडू शकले. या स्पर्धेत पहिल्या वर्षी तर अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या चमूने पहिला नंबर पटकावला.
या पार्श्वभूमीवर सातारा येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविभागीय नेमबाजी स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद फारसा उत्साहवर्धक नव्हता. सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी व सांगली या पाच विभागांपैकी फक्त पहिल्या दोनच विभागांचे संघ आले होते, खरे म्हटले तर सर्वच कॉलेजातून N.C.C. चालू असताना संघ येण्यास अडचण पडणे हे कॉलेज वा खेळाडूंच्या उदासीनतेचेच लक्षण नव्हे काय?
संघ एकूण चार खेळाडूंचा असतो- पाचवा गडी राखीव - नेमबाजी दोनशे यार्डावरून करावयाची. त्याचे पाच प्रकार, (1) आडवे पडून, (2) गुडघे टेकून, (3) उभे राहून, (4) पंधरा सेकंदांत चार गोळ्या चालविणे, (5) या प्रकारात चार सेकंदाचे लक्ष्य डोळ्यांसमोर धरले जाते तेवढ्यात अचूक वेध घ्यायचा. या पाची प्रकारांना मिळून एकूण 100 गुण. चार खेळाडूंच्या 400 गुणांपैकी सातारा संघाला 262 गुण मिळाले. कोल्हापूरला त्यापेक्षा पाचच कमी म्हणजे 257 गुण मिळाले.
छत्रपती शिवाजी कॉलेजचे वैशिष्ट्य म्हणजे गेले सतत चार वर्षे हा संघ विद्यापीठात अजिंक्यपद मिळवत आहे. यंदाचे मानकरी आहेत, (1) भीमराव मांडके, (2) शंकर चव्हाण, (3) सूर्यकांत शिंदे, (4) शशिकांत शिंदे, (5) संभाजी कदम. यापैकी मांडके तर 84 गुण मिळवून विद्यापीठातले पहिल्या नंबरचे नेमबाज ठरले.
सामन्याचा सराव तसा या मंडळींनी थोडेच दिवस केला. सामन्याच्या आधी फक्त चार दिवस दररोज सुमारे दीडशे काडतुसे उडविण्यासाठी या संघाला मिळाली. सुभेदार मुकुटराव निकम यांचे गुरु. N.C.C. मधील विभागाचे जे सामने नागपूरला झाले त्यासाठी केलेला सरावही या संघाला उपयोगी पडले.
शिवाजी विद्यापीठाचा संघ आता 19 डिसेंबरला अलाहाबादला खेळेल. कुस्ती, कबड्डी, नेमबाजी या खेळात आंतरविद्यापीठीय सामन्यात आतापर्यंत शिवाजी विद्यापीठाचे संघ चमकले आहेत. (अनेक वेळा अंतिम फेरी गाठणारा कबड्डीचा दर्जा मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत पार घसरला. यंदा तर पहिल्याच सामन्यात प्रचंड गुणसंख्येने पराभव त्यांच्या पदरी आला.) यश मिळवणे सोपे असते पण ती परंपरा जोपासणे फार कठीण. नेमबाजीच्या संघाला ही कठीण जबाबदारी पार पाडायची आहे. शिवाजीचे मावळे हे आव्हान यशस्वीपणे स्वीकारतील का हे समजेलच.
(पूर्वप्रसिद्धी - माणूस, 12 डिसेंबर 1970)
- डॉ. नरेंद्र दाभोलकर
Tags: नरेंद्र दाभोलकर अंनिस सामाजिक कार्यकर्ता माणूस साप्ताहिक श्री. ग. माजगावकर क्रिडा नरेंद्र दाभोळकर खेळ क्रिकेट सामना Load More Tags
Add Comment