स्त्रियांच्या राष्ट्रीय खेळांचे सामने

'माणूस'मधील 50 वर्षांपूर्वीच्या सदराची पुनर्भेट (6/22)

प्रातिनिधिक चित्र | thebridge.in

या साऱ्या स्पर्धांची फलश्रुती काय? क्रीडांगणावरचे उत्साहाने उचंबळणारे वातावरण ज्यांनी बघितले असेल ते हा प्रश्न विचारणारच नाहीत. मिरजेसारख्या छोटया गावात दीड-दोनशे खेळाडू आणि त्यांचा खेळ बघण्यासाठी कौतुकाने रात्रीपर्यंत बसून राहणाऱ्या सातपासून ते 70 पर्यंतच्या 700-800 महिला, ही कमाई निश्चितच थोडी नव्हे. थोडे खेळाडू या स्पर्धेमधून स्फूर्ती घेऊन खेळाचा सराव सतत ठेवतील आणि प्रेक्षकांमधल्या काही कार्यकर्त्या महिला तरी या निकोप प्रकृतीची जोपासना जाणीवपूर्वक घेण्यासाठी कार्याला लागतील. हे एवढे जरी झाले तरी भारतीय खेळ आणि खेळाडू यांना खूप काही मिळेल. हे होऊ शकेल हा दिलासा या स्पर्धांनी दिला खरा.

‘चूल आणि मूल’ या बंधनातून स्त्री कधीच बाहेर पडली. आज अनेक क्षेत्रांत ती स्वकर्तृत्वाने संचार करते आहे. क्रीडाक्षेत्रही याला अपवाद नाही. कटक येथे पंधरवड्यापूर्वीच झालेल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत पुण्याच्या अलका दिघेने 100 मीटर पळण्याच्या शर्यतीत जुना उच्चांक मोडून नवीन स्थापन केला.

पण तरीही महिला अथवा तरुण स्त्री आणि खेळ यांचा मेळ आपल्याकडे मुळीच समाधानकारकपणे बसलेला नाही. पुण्या-मुंबईसारख्या सर्वार्थाने पुढारलेल्या शहरांतही ही गोष्ट जाणवते आणि महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्ह्यांत तर शून्यापासूनच सुरुवात करावी लागेल. टेबल टेनिस, बॅडमिंटन यांसारखे खेळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या महिला खेळतात. आवश्यक साधनसामग्री आणि खर्च यांमुळे बहुसंख्यांना ते कधीच लाभणार नाहीत. तर अनेक प्रकारचे देशी खेळ थोड्या जागेत, अत्यल्प खर्चात खेळता येण्यासारखे असून आणि भरपूर व्यायाम व इतर अनेक फायदे त्यापासून मिळण्यासारखे असूनही एक प्रकारची तुच्छता, उपेक्षित वृत्ती आणि ‘हे खेळच धसमुसळे’ असा न खेळताच करून घेतलेला सोईस्कर गैरसमज, यामागे महिलांच्यामध्ये असल्याचा दिसून येतो. हुतुतू, खोखो आणि इतर वैयक्तिक स्पर्धांसाठीही खेळाडू मिळवताना आणि तयार करताना दरवर्षी कशी मिनतवारी आणि पहिल्यापासून श्रीगणेशा करावा लागतो हे कोणताही कॉलेजचा क्रीडाशिक्षक सांगू शकेल.

स्त्रियांच्या राष्ट्रीय खेळांचे सामने सातत्याने 23 वर्षे भरविण्याचा उपक्रम करणारी अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाची मिरज ही एकमेव शाखा आहे. सामने भरविणे आणि सुव्यवस्थितपणे पार पाडणे हे बाळंतपण किती अवघड आहे हे कुठल्याही प्रकारचे सामने भरविणाऱ्यांनाच समजू जाणे. तेव्हा एवढ्या अखंडपणे आणि तेही स्त्रियांचे सामने भरविण्याबद्दल मिरज शाखेचे निश्चितच कौतुक करावयास हवे.

हे सामने या वर्षी 22 ते 24 डिसेंबरला मिरजेला पार पडले. कबड्डी, फुगडी, पिंगा, शरीरसौष्ठव या चारी प्रकारांचे सामने तरुण खेळाडू आणि 40 वर्षांवरच्या प्रौढ महिलांच्यासाठी स्वतंत्र असे होते. तर लांब उडी, उंच उडी, नमस्कार, दोरीच्या उड्या, निसर फुगडी, कोंबडा आणि ब्रिज सर्वांसाठी होते.

हे सामने भरविले जातात, अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाच्या मान्यतेने. अर्थातच सामन्यात दरवर्षी हुतुतूचा समावेश असे. यंदा मात्र एक योग्य पाऊल टाकण्यात आले. फक्त कबड्डी सामने हे तेवढे ‘कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया’च्या मान्यतेने भरविले गेले. हुतुतू हा खेळ महाराष्ट्रात आता नामशेषच झाला आहे. आणि त्याचीच सुधारलेली आवृत्ती कबड्डी ही जोमदारपणे वाढली आहेच; त्याचबरोबर अखिल भारतीय पातळीवर मान्यताही पावली आहे. त्याचा समावेश करणे आवश्यकच होते. 

या सामन्यांत आठ संघांनी भाग घेतला होता. मुंबईचा (न आलेला) नवयुग मंडळाचा संघ सोडता मावळी संघ ठाणे, सेवासदन सोलापूर आणि कोल्हापूर हे तीन परगावचे संघ होते. आलेल्या संघांना भरपूर खेळण्यास मिळावे आणि प्रेक्षकांना महिला कबड्डीचे दर्शन घडावे यासाठी सर्व सामने साखळी पद्धतीने झाले. अंबाबाई तालीम संघाने सर्वांच्यावर मात केली. अगदी सहजपणे. त्या संघाला हे कौतुकास्पद असले तरी असे एकतर्फी सामने हे खेळाचा दर्जा आणि संघाचा कस वाढण्याच्या दृष्टीने फारसे उपयोगी ठरत नाहीत. मुंबईकर स्पर्धेत उतरले असते तर मात्र त्यांना चांगला प्रतिस्पर्धी भेटला असता. लेले भगिनी या विद्यापीठ संघातील खेळाडू आणि चिवटे, गाडगीळ या राष्ट्रीय सामन्यातील महिला अंबाबाई तालमीकडून चढाई आणि पकडीमध्ये विशेषत्वाने चमकल्या. सेवासदन आणि ठाणेकर यांचे कोल्हापूरबरोबर झालेले सामने रंगले. कोल्हापूरच्या साधना जोशीचा खेळ नजरेत भरण्यासारखा होता.

खोखो, लंगडी, थ्रोबॉल टप्प्याची शर्यत अशा अनेक क्रीडा प्रकारांना या वर्षी एकदम गाळण्यात आले. कबड्डीचे अखिल भारतीय पातळीवरील सामने भरविताना खेळाडूंना येण्याजाण्याचा आणि जेवणाचा द्यावा लागणारा खर्च यांमुळे हा निर्णय नाइलाजाने घ्यावा लागला असे सामना समितीचे म्हणणे. त्यांची अडचण समजूनही ही फार जबरदस्त किंमत त्यांनी दिली असे मी मानतो.

या स्वरूपाच्या सामन्यांचा उद्देश हा प्रथमतः महिलांच्या उत्साहाला वाव देणे आणि देशी खेळांबद्दलचे त्यांचे आकर्षण वाढविणे हा आहे. कबड्डीच्या काही संघांसाठी वरील चार आणि इतरही काही वैयक्तिक क्रीडाप्रकार एकदम वगळणे हे अनेक खेळाडूंची निराशा करण्यासारखे नाही का? खेळाचा कस हा मुद्दा प्रमुख मानला तरीही मग खोखोच्या खेळास अग्रक्रम द्यावयास हवा. कारण अ. भा. पातळीवर कबड्डीमध्ये गेली सतत 14 वर्षे महाराष्ट्र महिला सतत विजयी होत आहेत. (आणि आणखी काही वर्षे तरी त्याला आव्हान मिळणार नाही हे निश्चित) याउलट महिला खोखोमध्ये मात्र मध्यप्रदेशाच्या मक्तेदारीला यशस्वी आव्हान अजून कोणी दिलेले नाही. त्यासाठी तयारीचा प्राथमिक पाया अशा सामन्यांतूनच घातला जात नाही का?

उंच उडी आणि लांब उडी या दोन्ही प्रकारांत कोल्हापूरची साधना जोशी पहिली आली. तिचे उच्चांक आहेत 5' 2 आणि 12.11. पहिल्या नंबरच्या बाबतीत काही किमान गुणवत्तेचा आग्रह वरच्या पातळीवर नेहमीच धरला जातो. तो इष्टही आहे. मात्र अशा स्वरूपाच्या सामन्यांत तो धरला तर भलतीच पंचाईत होऊन बसेल.

नमस्काराच्या स्पर्धा आज महाराष्ट्रात फारच थोड्या ठिकाणी होतात. स्त्रियांच्यासाठी या स्पर्धा घेण्यात येतात आणि महिलांचा प्रतिसादही चांगला असतो हा अनुभव उत्सावर्धक आहे. शास्त्रशुद्धपणे सर्वांगाला व्यायाम घडविणारा हा व्यायामप्रकार. औंधकर पद्धतीने ह्या स्पर्धा घेण्यात आल्या आणि तीन मिनिटांत 21 नमस्कार काढून सफाई व संख्या या दोन्ही गुणवत्तेवर रेखा करमरकर पहिल्या आल्या.

इतर स्पर्धाप्रकार खास बायकी होते, (खरे म्हटले तर हा शिक्का मारणे फारसे योग्य नाही. कारण या प्रकारातून पुरुषांनाही खूप व्यायाम होऊ शकेल, पण लक्षात कोण घेतो?) 350 दोरीच्या उड्या तीन मिनिटांत मारून कोल्हापूरची हेमलता कुलकर्णी पहिली आली.

फुगडीमध्ये सातपासून 25 वर्षांपर्यंतच्या मुलींनी भाग घेतला होता. जोडीतील संघनायक एक चक्र फिरून आपल्या जागेवर आला की एक याप्रमाणे तीन मिनिटांची संख्या मोजण्यात येई. मध्ये थांबण्यास परवानगी असे. रजनी देशपांडे आणि वर्षा करमकर या मैत्रिणींनी 107 फेरे पूर्ण करून पहिला नंबर पटकावला.


हेही वाचा : यश मिळवण्याचे हे चार मंत्र - दत्तप्रसाद दाभोलकर


बैठक घेऊन कमरेतून एक पाय संपूर्ण घसरून ताठ करावा व नंतर तो जवळ आणून दुसरा ताठ करावा याचे नाव निसर फुगडी. जागा सोडू शकता. हाताची हालचाल कशीही चालू शकते. शास्त्रीय भाषेत मांड्यांच्या स्नायूंना हा अगदी अस्सल व्यायाम आहे. वर्षा करमकरने तीन मिनिटांत 194ची संख्या गाठली. मध्ये एक सेंकदही न थांबता (खाली पायाची सालडी सोलली गेली पण बक्षीस मिळाले ना.)

कोठे ना कोठे पिंगा घालण्याची सवय आजच्या तरुणांत (आणि तरुणींतही) काही नवीन नाही. पण पायाची हालचाल न करता कमरेत वाकून गोलाकारपणे शरीर वेगाने फिरवणे हा पिंगा तेवढा सोपा नाही. आणि तीन मिनिटांत सुमन सावंतने मारल्या तशा 191 फेऱ्या मारणे तर चांगलेच अवघड आहे.

कोंबडा म्हणजे गुडघ्यावर गुडघा ठेवून आणि त्यावर हात ठेवून ते न सोडता आणि न पडता 75 मीटरची दौड मारणे. कोल्हापूरच्या सुमन जगदाळेनी ह्यात पहिला क्रमांक मिळवला.

स्त्रियांचे उत्तम शरीरसौष्ठव आणि सुदृढ बालक या दोन्ही गोष्टींबाबत अनेक बाजूंनी महिला मंडळांना खूप काही करता येण्यासारखे आहे. पण आपल्या अतिविशाल कार्यक्रमात बहुतेक मंडळांना यासाठी फार थोडा वेळ मिळतो. याची जाणीव ठेवून दरवर्षी आपल्या कार्यक्रमात संस्था या दोन गोष्टींचा समावेश करते. एका वर्षाच्या आतील बालस्पर्धेत अतुल पाटकरने तर एका वर्षावरील स्पर्धेत मनीष देशपांडेने नंबर मिळवला. शरीरसौष्ठव स्पर्धेत पुण्याच्या सौ. गायत्री भिडे पहिल्या आल्या.

सर्व स्पर्धा संपल्यावर बक्षीस समारंभापूर्वी झालेल्या लोकनृत्यांनी कार्यक्रमावर कळस चढवला हे मान्य करावयास हवे. मिरजेच्या शारीरिक शिक्षणमंडळाने सादर केलेल्या ‘केवढा मोठा फटाका’ या गंमतशीर गीतनृत्याने खूपच रंगत आणली. न्यू इंग्लिश स्कूल कन्याशाळेच्या मुलींनी ‘डोलकर दरियाचा राजा’ हे नृत्य स्वतःच दर्याचे राजे असल्याच्या थाटात सादर केले. कल्पना खरात या छोट्या मुलीचा खास उल्लेख करावयास हवा. शास्त्रशुद्ध शिक्षण मिळाले तर ही मुलगी या क्षेत्रात नाव चांगलेच वर काढेल. महिला विकास कन्याशाळेचे ‘पाटलाचे लग्न’ हे नृत्यही छान झाले.

सुमारे पाच हजार रुपये खर्चून पार पाडलेल्या या क्रीडा महोत्सवात पैशाची अडचण असतेच. पण वैद्य करमकरांच्यासारखे जिद्दीचे अध्यक्ष दरवर्षी असंख्य अडचणीतून ही रक्कम जमवितात. पण त्यांचे खरे दुःख हे नाही. जे दुःख आहे ते आहे सच्चा क्रीडाप्रेमी कार्यकर्त्यांचे मनोगत. त्यांना वाटते एवढा सारा खटाटोप करूनही शाळांचा मिळणारा प्रतिसाद नेहमीच खेदजनक असतो. शाळेच्या शारीरिक शिक्षणाच्या चाकोरीबाहेरचे पण आवश्यक असे हे कार्य शाळा आपले मानतच नाहीत. बऱ्याच शाळा दखल घेत नाहीत. ज्या थोड्या घेतात त्या अत्यंत अपुऱ्या तयारीने. खेळाचा दर्जा मग सुधारणार कसा? आमच्या या कार्याशी क्रीडा संख्या, शाळा आणि महिला मंडळे यांनी आपुलकीचे नाते जोडले तर खूपच प्रगती करता येईल. तयारीसाठी मिळालेला अपुरा वेळ आणि कबड्डी सामन्यांच्या खर्चामुळे गाळावे लागलेले इतर अनेक क्रीडाप्रकार यांची खंत त्यांनाही आहे. पुढच्या वर्षी शानदार कबड्डी सामन्यांबरोबरच पूर्वीचे सर्व खेळ परत घेण्याची त्यांची जिद्द आहे.

या साऱ्या स्पर्धांची फलश्रुती काय? क्रीडांगणावरचे उत्साहाने उचंबळणारे वातावरण ज्यांनी बघितले असेल ते हा प्रश्न विचारणारच नाहीत. मिरजेसारख्या छोटया गावात दीड-दोनशे खेळाडू आणि त्यांचा खेळ बघण्यासाठी कौतुकाने रात्रीपर्यंत बसून राहणाऱ्या सातपासून ते 70 पर्यंतच्या 700-800 महिला, ही कमाई निश्चितच थोडी नव्हे. थोडे खेळाडू या स्पर्धेमधून स्फूर्ती घेऊन खेळाचा सराव सतत ठेवतील आणि प्रेक्षकांमधल्या काही कार्यकर्त्या महिला तरी या निकोप प्रकृतीची जोपासना जाणीवपूर्वक घेण्यासाठी कार्याला लागतील. हे एवढे जरी झाले तरी भारतीय खेळ आणि खेळाडू यांना खूप काही मिळेल. हे होऊ शकेल हा दिलासा या स्पर्धांनी दिला खरा.

सोईचे अखिल भारतीयत्व

महाराष्ट्राच्या चार जिल्ह्यांबाहेरचा एकही संघ नसलेला, हे सामने अखिल भारतीय पातळीवरचे होते. अलीकडे अनेक सामने हे याच पद्धतीने अ. भा. पातळीवरचे म्हणून भरविले जातात. अखिल भारतीय या विशेषणाची ही थट्टा नव्हे का?

संयोजकांना हे समजत नसते असे नव्हे. पण त्यांचा नाईलाज असतो. कारण खेळाडूंना येण्यासाठी आवश्यक असलेले रेल्वे कन्सेशन फक्त अखिल भारतीय पातळीच्या सामन्यांनाच मिळू शकते. ही रेल्वे सवलतीमुळे वाचणारी रक्कम बरीच असते. अखिल भारतीयत्वाची बिरुदावली लावून इतर कोणताच तोटा होत नाही (झाला तर फायदाच, खेळाडूंना अखिल भारतीय अजिंक्यपद मिळवल्याच्या कल्पनेने होणारा.)

माझ्या मते मात्र हा प्रकार ताबडतोब बंद व्हावयास हवा. अखिल भारतीय विशेषण लावावयाचे तर भारतातल्या किमान चार राज्यातले संघ तरी यावयास हवेत, जसे भोईर सुवर्णचषकाच्या कबड्डी स्पर्धेत येतात. महाराष्ट्रात आता खेळाचा स्वतंत्र विभाग झाला आहे. रेल्वे सवलतीची अडचण महाराष्ट्र पातळीवर सोडविण्यास त्यामुळे काही अडचण येऊ नये ही अपेक्षा रास्त नाही काय!

क्रीडा विभागाची पुनर्रचना झाल्यावर होणारा पहिला महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव सांगली येथे सात ते दहा जानेवारीला मोठ्या थाटामाटाने पार पडेल. एक खेळाडू म्हणून आणि समीक्षक म्हणूनही त्याचे खरेखुरे रुपरंग पुढील दोन क्रीडांगणात वाचकांना सादर केले जाईल.

(पूर्वप्रसिद्धी : माणूस, 9 जानेवारी 1971)

- डॉ. नरेंद्र दाभोलकर

Tags: नरेंद्र दाभोलकर अंनिस सामाजिक कार्यकर्ता माणूस साप्ताहिक श्री. ग. माजगावकर क्रिडा नरेंद्र दाभोळकर खेळ क्रिकेट सामना Load More Tags

Add Comment