अॅथलेटिक्स ही खालच्या पातळीवर तशी दुर्लक्षित शाखा आहे. इतर अनेक खेळांचे ज्याप्रमाणे सामने भरविण्यात येतात त्याप्रमाणे कुठलेच कॉलेज, क्रीडा संस्था अॅथलेटिक्सचे सामने भरवीत नाही. तसे झाले तर खेळाडूला नेहमी एक आव्हान राहील. नाहीतर संध्याकाळी मैदानावर एकट्यानेच जाऊन सराव करत बसणे हे बऱ्याच वेळा कंटाळवाणे वाटते. यंदापासून राज्य क्रीडा महोत्सव हा अ-विद्यार्थी खेळाडूंच्यासाठीच केला आहे. त्यामुळे तीही संधी मिळत नाही. खेळांसाठी असलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्त्यांचे तीन गट. त्यामध्ये कॉलेजच्या शेवटच्या दोन वर्षांचा समावेश नाही. खरे तर या वर्षांतच शिष्यवृत्तीची गरज अधिक, कारण पहिल्या दोन वर्षांमध्ये केलेल्या परिश्रमांचे त्यामुळे खेळाडूंना चीज झाल्यासारखे वाटेल.
चंद्रकुमार ताशिलदारची निवड शिवाजी विद्यापीठाच्या अॅथलेटिक संघाचा संघनायक म्हणून झाल्याचे ज्या वेळी समजले त्या वेळी मनापासून आनंद वाटला. मित्राचा गौरव झाल्याचे समाधान होतेच, पण त्याच्या कर्तृत्वाला योग्य संधी मिळणार आहे ह्या जाणिवेने अधिक बरे वाटले.
सांगली-मिरज भागामध्ये राष्ट्रीय पातळीवर चमकू शकेल असे विविध खेळांतील खेळाडू आज आहेत. पण प्रश्न आहे त्या प्रमाणात मार्गदर्शन आणि वाव मिळण्याचा. रणजी करंडक सामने सध्या गाजवीत असलेला विठ्ठल जोशी मिरजेचा तर सतत तीन वर्षे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्तीचे अजिंक्यपद मिळवून विश्वंभरसिंगसारख्या जागतिक पातळीवर चालणाऱ्या कुस्तीगिराशी यशस्वी लढत देणारा संभाजी पवार (पारगावकर) सांगलीचा. अशी काही आणखीही उदाहरणे सहज देता येईल. ताशिलदार हा त्यांपैकीच एक.
मिरज हायस्कूलला शिकत असताना खोखो, कबड्डी एवढ्यापुरतेच त्याच्या खेळाचे क्षेत्र मर्यादित होते. 1966 मध्ये तो कॉलेजात दाखल झाला. त्याच वर्षी पुणे येथील राज्य क्रीडा महोत्सवात तो दुसरा आला. 100 मीटर पळण्याच्या शर्यतीत त्याला 11.2 सेकंद वेळ लागला आणि तो रौप्य पदाचा मानकरी ठरला. त्याच वर्षी सोलापूर येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठाच्या सामन्यात पहिला येऊनही आणि 100 मीटर व 200 मीटर या दोन्हीमध्ये टाईमिंग चांगले असूनही दुर्दैवाने त्याला आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी पाठविण्यात आले नाही. योग्य वेळी प्रोत्साहन न मिळाल्याने होणारी नाउमेदी त्याच्याही वाट्याला आली. त्या वर्षी आंतरविद्यापीठाचा 100 मीटर पळण्याचा उच्चांक होता 10.09 सेकंद, त्याच्या बऱ्याच जवळ असूनही आपली निवड का झाली नाही हे कोडे त्याला व कॉलेजच्या पदाधिकाऱ्यांनाही कधी सुटले नाही.
यानंतर पतियाळा आणि जबलपूर या दोन ठिकाणी आंतरविद्यापीठ सामन्यांसाठी त्याची निवड झाली. खेळाडूंच्या ठरावीक संख्येत बऱ्याच विभागांत भाग घ्यावयाच्या विद्यापीठाच्या हट्टाने अथवा अडाणीपणे खेळाडूंच्यावर अकारण ताण पडतो. खेळाडू गेलेला असतो 100 आणि 200 मीटरसाठी आणि त्याबरोबरच त्याला 400 मीटरच्या रीलेमध्येही भाग घ्यावा लागतो. 100 मीटरसाठी गेलेला खेळाडू ज्या वेळी 400 मीटरच्या रीले स्पर्धेत भाग घेतो त्या वेळेला दुसरे बक्षीस तर जातेच, पण 100 मीटरसारख्या त्याच्या खास विभागातही संपूर्ण केंद्रीकरण न करता आल्याने आणि 400 मीटरच्या स्पर्धेतून दमल्या-भागल्यानंतर 100 मीटरला पुरेशी ताकद न राहिल्याने त्या स्पर्धेवरही परिणाम होतो. विद्यापीठाचे यंदाचे कोच म्हसकर हे स्वतः चांगले खेळाडू असल्याने त्यांनी यंदा ही गोष्ट न करण्याबद्दल आग्रह धरला. संघाची संख्या त्यामुळे दुप्पट झाली हे खरे; पण प्रत्येक खेळाडूला त्यामुळे आता संपूर्ण वाव मिळेल.
हेही वाचा : चेस ऑलिंपियाडच्या निमित्ताने... - आ. श्री. केतकर
पुण्या-मुंबईबाहेरच्या खेळाडूंना योग्य मार्गदर्शनाअभावी नेहमीच त्रास होतो. ताशिलदारच्या शब्दांत- ‘‘आयुष्यात प्रथमच अत्यंत शास्त्रशुद्धपणे शिकवणारे देसाई सर आम्हांला यंदा भेटले. सुरुवातीपासून असे भाग्य लाभले असते तर किती श्रम वाचले असते वा सार्थकी लागले असते,’’ असे त्याला वाटते. सुरुवात (Start) अचूकपणे कशी करावी, बूट किती नंबरचे वापरावेत, लेस कशी बांधावी या साऱ्या गोष्टी त्याला त्यांच्या कारणांसहित प्रथमच कळल्या. प्रोत्साहनही खूप मिळाले आणि त्यामुळे यंदा आंतरविद्यापीठ स्पर्धेत चमकण्याची उमेद तो बाळगून आहे.
खेळाडू ज्या गोष्टींमुळे अडचणीत येतो अशाही काही गोष्टींकडे त्याने माझे लक्ष वेधले. त्याच्या मते प्रत्येक मार्गदर्शकाचे स्वतःचे असे खास तंत्र असते आणि त्याबाबत तो आग्रही असतो. विद्यापीठ 15 दिवसांचे जे सराव शिबिर भरवते त्यामध्ये असणारा कोच हा त्याच्या पद्धतीनेच आम्ही आमचे तंत्र बदलावे असा आग्रह धरतो आणि त्यामुळे खेळाडूस गोंधळण्यापलीकडे काही फायदा मिळत नाही. तेव्हा आम्हांला आपापल्या जागीच ठेवून त्याच शिक्षकांच्याकडून मार्गदर्शन मिळाल्यास उपयुक्त ठरेल किंवा सराव शिबिराला तरी खेळाडूबरोबर कोचही बोलवावेत.
खेळाचे क्रीडांगण हादेखील बऱ्याच वेळा महत्त्वाचा घटक ठरतो. या वेळी विद्यापीठ-स्पर्धेत सर्वच खेळाडूंचे टाईमिंग तितकेसे चांगले आले नाही, याचे कारण म्हणजे मैदान सॉफ्ट होते आणि पुन्हा समान पातळीतही नव्हते. याउलट आंतरविद्यापीठ स्पर्धेत क्रीडांगण तयार करण्यासाठी खास परिश्रम घेतले जातात. कोळशाच्या भुकटीचा वापर करून तयार केलेल्या ह्या मैदानाला सुमारे 40 हजार रुपये खर्च येतो. दुर्दैवाने शिवाजी विद्यापीठाकडे असे मैदान नाही. आणि त्याचा सराव खेळाडूंना नसल्यामुळे त्यांचा तोटा होतोच.
सध्या सकाळी सुमारे पाऊण ते एक तास तयारीचा व्यायाम (Conditioning) आणि संध्याकाळी साडेचार ते साडेसहा प्रत्यक्ष सराव असा त्यांचा कार्यक्रम असतो. या वेळात सुमारे चार ते पाच वेळा तो 100-200 आणि 400 मीटरचे अंतर पळतो. आठवड्यातून एकदा वा दोनदा वेळ लावून पळणे घेतले जाते. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. स्वतःला नेमकी कल्पना येते.
अॅथलेटिक्स ही खालच्या पातळीवर तशी दुर्लक्षित शाखा आहे. इतर अनेक खेळांचे ज्याप्रमाणे सामने भरविण्यात येतात त्याप्रमाणे कुठलेच कॉलेज, क्रीडा संस्था अॅथलेटिक्सचे सामने भरवीत नाही. तसे झाले तर खेळाडूला नेहमी एक आव्हान राहील. नाहीतर संध्याकाळी मैदानावर एकट्यानेच जाऊन सराव करत बसणे हे बऱ्याच वेळा कंटाळवाणे वाटते. यंदापासून राज्य क्रीडा महोत्सव हा अ-विद्यार्थी खेळाडूंच्यासाठीच केला आहे. त्यामुळे तीही संधी मिळत नाही. खेळांसाठी असलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्त्यांचे तीन गट. त्यामध्ये कॉलेजच्या शेवटच्या दोन वर्षांचा समावेश नाही. खरे तर या वर्षांतच शिष्यवृत्तीची गरज अधिक, कारण पहिल्या दोन वर्षांमध्ये केलेल्या परिश्रमांचे त्यामुळे खेळाडूंना चीज झाल्यासारखे वाटेल.
ताशिलदारची आतापर्यंतची वाटचाल तशी प्रतिकूल परिस्थितीत झाली. घरातून फारसा पाठिंबा मिळाला नाही आणि योग्य शिक्षकही लाभले नाहीत. डिसेंबरमध्ये सामने संपल्यावर पुन्हा जुलैमध्ये नव्याने सुरुवात. यंदापासून मात्र सामने संपले तरीही देसाई सरांच्या मार्गदर्शनाखाली तो या ना त्या स्वरूपात सराव चालूच ठेवणार आहे. यंदा आंतरविद्यापीठ सामन्यात तो निश्चितपणे चमकेल आणि पुढील वर्षी महाराष्ट्र राज्य पातळीवरही गाजू शकेल अशी त्याच्या मार्गदर्शकांची खात्री आहे.
…..
मिरजेचा मानकरी
विठ्ठल जोशी हा मिरजेचा. सौराष्ट्राविरुद्ध झंझावाती शतक मारून आणि गोलंदाजीमध्येही आपली करामत दाखवून बारा वर्षांनंतर महाराष्ट्राला पश्चिम विभागाचे अजिंक्यपद मिळविण्यात त्याचा वाटा निश्चितच मोठा आहे. यंदाच्या सर्वच रणजी ट्रॉफींत त्याचा फॉर्म निर्विवादपणे प्रशंसनीय आहे. सांगली, कोल्हापूर भागात अनेक गुणी क्रिकेट खेळाडू आहेत. पण त्यांना योग्य संधी मिळविण्यासाठी पुण्या-मुंबईलाच जावे लागते ही या भागातील लोकांची भावना निश्चितच काही प्रमाणात खरी आहे उदा., सांगलीचा विजय भोसले. पुण्या-मुंबईला जाण्याचा सल्ला नाकारून विठ्ठल जोशी मात्र मिरजेलाच राहिला. आज शेष भारत संघात तो मानाने दाखल झाला आहे. आणि त्याच्या पुढील कर्तृत्वाकडे आज या भागातील लोक घरगुती जिव्हाळ्याने डोळे लावून आहेत.
(पूर्वप्रसिद्धी : माणूस, 26 डिसेंबर 1970)
- डॉ. नरेंद्र दाभोलकर
Tags: नरेंद्र दाभोलकर अंनिस सामाजिक कार्यकर्ता माणूस साप्ताहिक श्री. ग. माजगावकर क्रिडा नरेंद्र दाभोळकर खेळ क्रिकेट सामना Load More Tags
Add Comment