कुस्ती बेमुदत निकाली होईल हे पाहावयास हवे तसेच ती काटाजोडच असेल ही दक्षताही घ्यावयास नको का? नाहीतर मग एका चांगल्या पहिलवानाच्या नावावर शौकिनांना उकळण्याचा तो धंदाच होऊन बसतो. हजारो रुपये मिळत असल्याने पहिलवानही ह्या बनावात खुशीने सामील होतात.
आवडत्या नटाच्या सिनेमाचा पहिला खेळ न चुकता बघणाऱ्या प्रेक्षकाप्रमाणे मारुती मानेची कुठलीही कुस्ती न चुकता पहिल्या रांगेत बसून मी बघत आलो आहे.
याची सुरुवात झाली नऊ वर्षांपूर्वी. बसलिंग करजगी आणि मारुती मानेच्या कुस्तीची हवा त्या वेळी सांगलीत चांगलीच तापली होती. ऐन सार्वत्रिक निवडणुकीच्या धामधुमीचा तो काळ. पण उमेदवार आणि राजकारण यापेक्षा पहिलवानांची तयारी आणि कुस्तीचा निकाल याचीच चर्चा अधिक व्हायची. बसलिंग सांगलीचा. आदल्याच वर्षी त्याने मारुतीला अस्मान दाखविले होते आणि आव्हानाची म्हणून कुस्ती परत ठरली होती.
परीक्षा तोंडावर असूनही मोठ्या कुतूहलाने मी त्या कुस्तीला गेलो. सांगली भाग हा कोल्हापूरसारखाच कुस्तीवेडा. टांगेवाल्यापासून मोटारमालकापर्यंत आणि शिपायापासून साहेबापर्यंत साऱ्याच्या तोंडून जुन्या मैदानांचे किस्से, या लढतीचे भविष्य, मेहनतीची आणि खुराकाची रंगतदार वर्णने ऐकून ‘ना मिळे अशी मौज पुन्हा पहाया नरा’ अशी माझी कल्पना झाली होती. पाण्याची मोट दोन बैलांना बाजूला सारून स्वत: ओढणाऱ्या मारुती मानेची आडमाप ताकद आणि डावाला हुशार असलेल्या बसलिंगचे कौशल्य यात कोण वरचढ ठरणार याच्या असंख्य पैजा लागल्या होत्या.
मारुतीचे नाव त्या वेळी अर्थातच आजच्या एवढे झालेले नव्हते. पण पैलवान स्थानिक भागातले असले, लढत अटीतटीची, आव्हानाची आणि खरोखरच निकाली असली; जोड काटा-जोड असला की मैदानाला कशी गर्दी उसळते हे मी त्या वेळी अनुभवले. पंच कोण होते ते आठवत नाही पण सरपंच होते सांगली जिल्ह्याचे लाडके नेते आणि त्या वेळचे विधानसभेचे उमेदवार वसंतरावदादा पाटील. त्या प्रचंड गर्दी आणि गोंधळात मागच्या लोकांना काही नीट दिसेना. मग त्यांनी चालू केले छोटे छोटे दगड मारून फेकण्याचे उद्योग. त्यात वसंतरावदादाच नेमके किरकोळ जखमी झाले. दगड डोळ्याच्या जरा खाली बसला म्हणून नशीब!
शेवटी मारुती माने आणि बसलिंगची जोडी मैदानात उतरली. एकमेकांना खाली घेण्याचे प्रयत्न, थोडी खडाखडी, थोडी चिडाचिडी हे सारे पहिल्या वीस-पंचवीस मिनिटांत झाले. मग मारुतीने धिस्सा मारला. डाव पूर्णपणे लागला नाही. लढत कोपऱ्यात गेली होती. पंचांनी ती सोडविली आणि पैलवानांना मध्ये आणीत असतानाच मारुतीने हिसका मारून हात सोडवून घेतला आणि दक्षिणेच्या बाजूला बसलेल्या ‘आपल्या’ प्रेक्षकांत उडी घेतली. कुस्ती निकाली झाली नव्हतीच. पुनःपुन्हा माइकवरून मारुतीला बोलावण्यात आले पण तो मैदानात असेल तर ना! मैदान मारल्याच्या आविर्भावात तो आपल्या चाहत्यांच्या खांद्यावरून मैदान सोडून केव्हाच गावातल्या मिरवणुकीत सामील झाला होता. बसलिंग खुद्द सांगलीचा! अधिक प्रेक्षक त्याच्या बाजूचे. बसलिंग मैदान सोडेना. त्याला विजयी जाहीर करा म्हणून त्याच्या पाठीराख्यांनी पंचांच्याकडे तगादा लावला. पंच गोंधळले. त्यांनी सरपंचाकडे बोट दाखविले. वसंतरावदादांच्यावर ही नसती आपत्ती आली. त्यांना वाटले होते मामला साधा-सरळ असेल पण ही नसतीच पंचाईत. मिरवत चाललेल्या मारुती मानेला पराभूत ठरवायचे तर कवठेपिरान गावची मते मिळणार कशी? तो त्या गावचा राजाच. आणि सांगलीकर मंडळींना तरी दुखवून कसे चालेल? ‘धरले तर चावते सोडले तर पळते’ असा वैताग. फुकटचा जनतासंपर्क पुढे ज्यांना कधीकधी नडतो तो हा असा.
मोठा गाजावाजा केलेली आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या उपस्थितीत सार्वत्रिक निवडणुकीच्याच सावळ्या गोंधळात जाहीर झालेली मारुती मानेची जी कुस्ती विश्वनाथबरोबर ज्या पद्धतीने पार पडली त्या वेळी सांगलीच्या लढतीची आठवण न झाल्यास नवल. अर्थात एक महत्त्वाचा फरक होताच. वर्तमानपत्रे आणि जाहिराती यांतून कितीही तुल्यबळ लढतीचा आभास निर्माण केला तरी ही लढत मारुतीच जिंकणार याबद्दल कोणत्याही जाणकारात दुमत नव्हते. खऱ्या अर्थाने मारुतीला जोड होऊ शकेल असा एकच मल्ल सध्या भारतात आहे हे कुस्तीतज्ज्ञ जाणतात. सामान्य प्रेक्षकाला काही वेळा हे समजत नाही आणि समजले तरी ‘आदतसे मजबूर’ असलेला शौकीन भरमसाठ दर्जाची तिकिटे काढूनही कुस्तीला गर्दी करतोच. (त्याचा हा विक पॉइंट ठेकेदारांनी चांगला ओळखला आहे.)
ठीक साडेसहाला दोन्ही मल्ल आखाड्यात उतरले. मारुतीचे पोट आता बरेच सुटले आहे तरीही त्याचे बाकीचे शरीर व्यायामाचे आणि कसाचे वाटते. सर्वसाधारणपणे भारतीय मल्ल जो पळण्याचा व्यायाम घेतच नाहीत तो नियमितपणे घेत असल्याचा फायदा मारुतीला निश्चितच झाला आहे. पहिली 20 मिनिटे झाली फक्त खडाखडी. याच खडाखडीनंतर थपडाथपडी होऊन पद्धतशीरपणे कुस्ती अर्धवट टाकूनच मैदानातून पाय काढलेल्या सादिक पंजाबी आणि श्रीरंग जाधवाच्या मुंबईच्याच कुस्तीची मला आठवण झाली. पण एकविसाव्या मिनिटाला मारुतीने पट काढून विश्वनाथला खाली घेतले. कुस्ती मैदानाच्या बाजूला बांधलेल्या रस्सीजवळ गेली. पंचांनी पुन्हा दोघांना सोडवून आत आणले. यानंतर पुन्हा नऊ मिनिटांनी आणि नंतर बत्तिसाव्या मिनिटाला मारुतीने विश्वनाथला पट काढून खाली घेतले. तिसऱ्यांदा पट काढून खाली घेतल्यानंतर पुन्हा पंचांनी दोघांना सोडवून मध्ये आणले. ते पुन्हा लढत चालू करून देणार त्या वेळीच बेसावध असलेल्या मारुतीला खाली घेऊन एका बगलेवर दाबण्याचा विश्वनाथने प्रयत्न केला आणि तो थोडा यशस्वी होताच कुस्ती जिंकल्याच्या आविर्भावात आखाड्यातून उडी मारून तो बाहेर पडला. गंमत म्हणजे पंच रामचंद्र चव्हाणही त्याच्यापाठोपाठ बाहेर पडले. निकाल न देताच जणू काही कुस्ती संपली.
मारुती माने अजून आखाड्यात उभा होता. थोडा चिडलेला. विश्वनाथला आत यावयास सांगा, चितपट मारतो असे सांगत होता. प्रेक्षकांचा गोंधळ वाढला त्या वेळी विश्वनाथला माइकवरून पुकारण्यात आले. अपेक्षेप्रमाणे तो आला नाहीच आणि मग मारुतीचा विजय घोषित झाला. ऑलिंपिकला चौथा नंबर मिळवलेल्या विश्वंभरसिंगची मागच्या वर्षी संभाजी पारगावकरशी मुंबईलाच कुस्ती झाली होती. आणि पहिल्या दीड मिनिटातच कुस्ती मारल्याच्या थाटात संभाजी बाहेर आला होता. त्याला सक्तीने पुन्हा आत नेऊन कुस्ती खेळावयास लावली होती. पण असे काही करायचे तर कुस्ती जाहिरातीत लिहिल्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत खरोखरीच बेमुदत निकाली करावयाची ठेकेदारांची तयारी हवी ना? नाहीतर सारा दिवस आणि बरेचसे पैसे घालवून प्रेक्षकांच्या पदरात येते बेचव लढत आणि अपेक्षाभंग.
कुस्ती बेमुदत निकाली होईल हे पाहावयास हवे तसेच ती काटाजोडच असेल ही दक्षताही घ्यावयास नको का? नाहीतर मग एका चांगल्या पहिलवानाच्या नावावर शौकिनांना उकळण्याचा तो धंदाच होऊन बसतो. हजारो रुपये मिळत असल्याने पहिलवानही ह्या बनावात खुशीने सामील होतात.
मारुती माने गेल्या काही वर्षांत विलक्षण गाजला आहे. वाढला आहे. बसलिंग करजगीच्या कुस्तीनंतर त्याने महमद हनीफला हरवले. अवघ्या 35 मिनिटांत दमामध्ये साफ उखडून हनीफ बेजोड ठरून चित झाला. त्यानंतर कुठे विष्णु सावर्डे मारुतीबरोबर कुस्ती खेळावयास तयार झाला. आत 60-70 हजार प्रेक्षकांची गर्दी आणि बाहेर तेवढाच तिकीट न मिळालेला जनसमुदाय. ही कुस्ती मात्र खरोखरच बेमुदत लढविली गेली. तब्बल तीन तासांच्या लढतीनंतर मारुतीने सावर्डेला अस्मान दाखविले. प्रेक्षकांच्यात बसलेल्या मंत्र्यांचे निरोप येऊनही ही कुस्ती सोडविली गेली नाही हे विशेष. त्यानंतर मारुती हिंदकेसरी झाला. मागच्या वर्षी त्याने हिंदकेसरी हजरत पटेल आणि मग सादिक पंजाबी या दोघांच्यावरही एकाच वर्षात मात केली आणि आपले श्रेष्ठत्व निर्विवाद राखले. एवढ्या मोठ्या पहिलवानाने कुठे कोणी पंजाबवाला अथवा कोणी लष्करातला सिंग अशा कुस्त्या करण्यात आणि त्या जिंकण्यात विशेष ते काय? त्याला लढतीला आता दोनच मल्ल खरे राहिले आहेत. एक सादिक पंजाबी आणि आंदळकरला सहजपणे अस्मान दाखविणारा पाकिस्तानचा गोगा अथवा भारत केसरी चंदगीराम.
वसंतदादा पाटील व मारुती माने
चंदगीरामबरोबर मारुतीची बेळगावला काही वर्षांपूर्वी झालेली लढत बरोबरीत सुटली होती - तीन तासांनंतर चंदगीरामने ‘भारत केसरी’ हा बहुमान दोनदा मिळवला आहे. या मानाच्या फडातही मारुतीने कधीच का उतरू नये? सादिक पंजाबीबरोबर मागील वर्षी दुर्दैवाने चंदगीराम हरला असला तरी 20 मिनिटांच्या लढतीतही चंदगीरामने सादिकची दमछाक करून स्वतःचे प्रभुत्व साऱ्यांना पटविले होते. हिंदकेसरी आणि भारतकेसरी यांची ही लढत हेच खरे मारुतीला आज आव्हान आहे. निदान भारतापुरते तरी!
मुंबई शहर तालीम संघाच्या मान्यतेने काही ठेकेदारांनी हे मैदान भरविले होते. या साऱ्या प्रकारातील ‘अंदर की बात’ आणि स्वार्थी राजकारणी गोंधळ लवकरच या सदरातून वाचकांच्या पुढे येईलच.
(पूर्वप्रसिद्धी : माणूस, 24 फेब्रुवारी 1971)
- डॉ. नरेंद्र दाभोलकर
Tags: नरेंद्र दाभोलकर अंनिस सामाजिक कार्यकर्ता माणूस साप्ताहिक श्री. ग. माजगावकर क्रिडा नरेंद्र दाभोळकर खेळ क्रिकेट सामना Maruti Mane kusti sports Load More Tags
Add Comment