खेळाडू, मंडळे आणि राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संबंधामधील दरी झपाट्याने वाढत चालली आहे. एकमेकांना पूरक आणि एकमेकांच्या हितासाठी आणि कबड्डीच्या भल्यासाठी हे सारे चालले आहे. याचा विसर दोघांनाही पडला आहे काय अशी सार्थ शंका वाटते. आमच्या खेळावर व जिवावर मिरवणाऱ्या राज्य संघटनाच आम्हांला क:पदार्थ ठरवून स्वतःच्याच मिजाशीत आम्हांला कशीही वागवते, ही खेळाडूंची भावना. तर कबड्डी वाढली, हे खेळाडू प्रतिष्ठित झाले आणि आता मस्तवालपणा करतात तो आम्ही मोडून काढू, ही संघटकांची उमेद.
यशवंतरावजी मनमोकळेपणे हसले. राजकारणी माणसे अशी दिलखुलास क्वचितच हसतात. मखमलीच्या पेटीमधून त्यांनी शिटी काढली आणि वाजविली. महाराष्ट्राचे राजकारण ज्यांच्या इशाऱ्यावर चालते. त्यांच्या इशाऱ्यावर सामने चालू झाले. त्यांच्यासकट सर्वांना ही कल्पना मोठी गमतीदार आणि नवीन वाटली.
श्री शिवाजी उदय मंडळाच्या सातारच्या सामन्यात असे काही खूपसे नवीन आणि चांगले आढळले. दोन भव्य सुंदर चषक, अमाप गर्दी, विशेषतः महिला वर्गाची प्रचंड उपस्थिती. महाराष्ट्रातल्या सर्व नामवंत संघांच्या उपस्थितीने रंगलेले सामने. दोन अर्थमंत्र्यांचे लाभलेले अर्थपूर्ण आशीर्वाद.
मुंबईबाहेरच्या कुठल्याही स्पर्धेत मुंबईच्या सर्व नामवंत संघांनी एकवटून भाग घेण्याची ही पहिली वेळ असावी. सोलापूरचा अपवाद वगळता महाराष्ट्रातम्या इतर सर्व संघांनीही सातारकरांच्या हाकेला प्रतिसाद दिला. सातारला पहिल्यादाच भरणाऱ्या अखिल भारतीय स्पर्धेत त्यामुळे सध्या फॉर्मात असलेल्या जवळजवळ सर्व खेळाडूंचा खेळ क्रीडाशौकिनांना बघायला मिळाला.
‘अ’ गटात रेल्वेने सहजपणे अजिंक्यपद खिशात टाकले. सर्वांत जुने खेळाडू घेऊन सर्वांत अधिक दमदारपणे खेळणारा हा संघ. संघात दोन चढाईबहाद्दर असतानाही ज्ञानेश्वर पुजारीला निदानरेषेवर अडविण्याचा ‘महिंद्र अॅण्ड महिंद्र’चा प्रयत्न फसला आणि गटामध्ये दोन संघांकडून पराभूत होण्याची नामुष्की या बलाढ्य संघावर आली. खरे म्हटले तर मुंबई महानगरपालिकेला महिंद्र सहज हरवू शकला असता. पण मनमोकळेपणे खेळ करण्याऐवजी विजयाकडे लक्ष ठेवूत तोलूनमापून केलेला खेळ त्यांना नडला. सामना पुन्हा ओढून काढण्यासाठी पकडी आणि चढाईचा खेळ मात्र वसंत ढवण आणि त्याच्या साथीदारांनी जोरदार केला पण पश्चातबुद्धी क्वचितच मदत करते.
सातारा नगरपालिका या संघाने वरील सर्व संघांशी खेळताना खेळाचा भरपूर अनुभव घेतला. प्रेक्षकांना गंमत वाटली. खेळाडूंची हौस भागली. मात्र काही खऱ्या क्रीडारसिकांना चीड आली असेल. ह्या स्वरूपाच्या सामन्यात उतरण्यासाठी लागणारी सामान्य तयारी आणि तंत्र नगरपालिकेच्या संघात अभावानेच आढळले.
हिंद सायकल - अनपेक्षित कलाटणी
याच पार्श्वभूमीवर सातारच्या पोलीस संघाची कामगिरी उठून दिसली. हिंद सायकल संघाला पराभूत करून मागील वर्षीच्या सांगली येथील इतिहासाची त्यांनी पुनरावृत्ती केली. शेवटच्या काही मिनिटांतल्या ढमालेच्या लाभदायक चढाईचा त्यांनी अचूक फायदा उठवला. स्टेट बँकेच्या संघाचा पराभव करून तर आपल्या गावकरी मंडळीकडून पोलिसांनी प्रशंसेची पावती मिळवली. महाराष्ट्र बँकेच्या पोलादी क्षेत्ररक्षणाच्या लढ्यात आणि निदानरेषेवरच्या व्यूहात ही पोलीसमंडळी फसली नसती तर त्यांनी इतिहास घडविला असता. हे होऊही शकेल पण किसन काळेला त्यासाठी कोणाचीतरी तशीच जबर साथ लाभायला हवी. हिंद सायकल आणि महाराष्ट्र बँकेला सरळसरळ पराभूत करणारा स्टेट बँक, पोलीस आणि स्टील प्लांट भिलाई (मध्य प्रदेश) यांच्या संघासमोर मात्र कमकुमत ठरला. वसंत सूदची अनुपस्थिती हेच त्याचं खरे कारण. आठवड्यापूर्वीच तिरोडकर स्पर्धा जिंकणारा हिंद सायकलचा संघ अगच कमनशिबी ठरला. भिलाई स्टील प्लांटबरोबर तो कसाबसा वाचला. बाकी तीनही संघांकडून त्याला पराभूत व्हावे लागले. बेभरवशाच्या कबड्डीचे हे एक उदाहरण. या साऱ्या परस्परांच्या काटछाटीतून महाराष्ट्र बँक स्टेट बँकेकडून पराभूत झाली तरीही विभागीय अजिंक्यपद मिळवून वर सरकली.
‘क’ गटात चारही संघ कसलेले होते. दुर्दैवाने ‘सांगली पोलीस’ प्रत्यक्ष मैदानावर तुलनेने खूपच अपुरा पडला. पुण्याचा ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ हा पुण्यातला एक सर्वोत्कृष्ट संघ. पुण्यातल्या सर्व चांगल्या संघांचे खेळाडू त्यात एकवटलेले आहेत. मुंबईच्या ‘सहकारी बँके’बरोबर म्हणूनच त्यांचा सामना अवघा एक एक गुण नोंदवून समान गुणावर झाला. कमी गुणसंख्येचा रटाळ संथ खेळ हे मोठेपणाचे लक्षण (!) आजकाल होऊन बसले आहे. ‘नेव्हल डॉक यार्ड’च्या खेळावर म्हणूनच सातारकर खूश झाले. कारण मोठेपणाच्या या खोट्या जाळयात ते अडकले नाहीत. पुण्याच्या महाराष्ट्र बँकेने त्यांच्यावर आघाडी मिळवली होती. पण बलदंड शरीरयष्टीच्या विजू पेणकरने फीदा कुरेशीचा त्याला ब्लॉक करण्याचा प्रयत्न सहज मोडून काढला आणि संघ आघाडीवर नेला. सूर मारून मध्यरेषेवर पोहोचण्याची त्याची पद्धत मोठी आकर्षक वाटली. मुंबईच्या सहकारी बँकेचा पराभव करून आठवड्यापूर्वीच याकडून झालेल्या पराभवाचे उट्टे नेव्हल डॉकने फेडले. दुसरे लोण सहकारी बँकेवर लागत असताना अचानक डाव फिरला आणि एका लोणाची परतफेड बँकेने केली. त्यानंतरही तीच धडाडी बँकेच्या चढाईबहाद्दरांनी दाखविली असती तर कदाचित इतिहास वेगळा घडला असता पण निदानरेषेवरचा जुगार महाराष्ट्र बँक खेळली आणि स्वतःच्या हाताने तिने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला.
मुंबईची महाराष्ट्र बँक आणि नेव्हल डॉक यार्ड यांच्यातील उपांत्य फेरीत मध्यंतरापर्यंत 1-3 अशा गुणसंख्येने चुरस कायम होती, पण मध्यंतरानंतर मात्र एकतर्फी खेळ झाला. विदर्भातून नुकताच मुंबईच्या बँकेत आलेला काशिनाथ रीठे कोणत्याच सामन्यात प्रभाव पाडू शकला नाही.
सातारा शहरातल्या कोणत्याही ज्योतिषाने त्या दिवशी गुरुदक्षिणा चषकमध्ये रेल्वे जिंकणार असे छातीठोकपणे सांगितले असते. नाणेफेकीचा पहिला गुण मिळाल्यावर तर ही शक्यता अधिकच वाढली. नेव्हलच्या राजू शेट्टीने केवळ आपल्या एकाच चढाईत या साऱ्यावर पाणी सांडले. सदा शेटेला तेवढ्याच जोरदारपणे टक्कर देऊन त्याने मध्यरेषा गाठली ती पाच गडी लोळवूनच. रेल्वे संघावर दोनच चढाईत लोण लागला. सदा शेटे, शिवा पवार, ज्ञानेश्वर पुजारी, प्रभाकर तुळसकर आणि मधू लाड हे अ. भा. स्पर्धा अनेक वर्षे गाजवणारे पाच पराक्रमी वीर रेल्वेच्या संघात होते. अपेक्षा होती रेल्वे लोणाची परतफेड करील. पण या पंचकडीचे अक्षरशः पानिपत झाले. शिवा पवार कसेबसे दोन गुण मिळवू शकला. ती मध्य रेल्वेची संपूर्ण चाळीस मिनिटांची कमाई. नेव्हल डॉक यार्डने आपला अप्रतिम सांघिक खेळ या वेळी दाखवला. परशराम कांबळीने वेळेप्रमाणे दोन्ही बाजूंचा कोपरारक्षक म्हणून खास कामगिरी बजावली. आपल्या ताकदीच्या जोरावर गड्याला पकडण्याची विजू पेगकरची पद्धत आगळी वाटली. आपल्या क्रीडा आयुष्यात रेल्वे संघाला एवढा प्रचंड पराभव प्रथमच पत्करावा लागला असेल. नेव्हल यार्डचाही हा एवढा मोठा पहिलाच विजय.
महिलांच्या ‘अ’ गटातील झुंजी चांगल्याच रंगतील असे वाटले होते. पण कमकुवत संघाबरोबर एकतर्फी आणि कसदार संघाबरोबर कुचका, ही पुरुषी खेळाची लक्षणे आता थोड्या प्रमाणात महिला संघातही शिरू लागली आहेत. अ गटातल्या ‘सन्मित्र’ आणि ‘अंबाबाई’ या दोन्ही संघांचा इतर संघांकडून एकतर्फी पराभव झाला. सन्मित्रचा संघ अगदीच नवोदित आहे. पण दोन वर्षांत तो चांगलाच नावारूपाला येईल अशा आशेला नक्कीच जागा आहे. खरोखरच बऱ्यापैकी खेळणाऱ्या अंबाबाई तालीम संस्थेच्या कन्यका काही सामन्यात अशा एकदम नामोहरम का व कशा होतात हे एक न समजणारे कोडे आहे. ‘राणाप्रताप’ आणि ‘नवयुग क्रीडा’ हा या गटातला सर्वांत चुरशीचा सामना. सामन्याच्या उत्तरार्धात राणाप्रताप संघाने दोन गुणांची आघाडी मिळवून सारे वातावरण बदलले होते. पण त्यांनी कमवलेले त्यांना राखता आले नाही! आणि नाबर भगिनींच्या पल्लेदार चढायांपुढे त्यांना पराभूत व्हावे लागले. याच सामन्यात प्रथम उतरलेल्या चित्रा नाबरचा नवयुग क्रीडाला चांगलाच उपयोग झाला. ‘विश्वशांती’ आणि नवयुग क्रीडाचा विभागीय अंतिम सामना कंटाळवाणा झाला. (1-6) शैला रायकरने शेवटच्या चढाईत सामन्याला कलाटणी देण्याचा धाडसी प्रयत्न केला. पण संघाच्या दुर्दैवाने मध्यरेषेवरची तिची धाव पाव इंचाने कमी पडली.
‘ब’ विभागात ‘मॅनर्स स्पोर्ट्स क्लब मुंबई’ने साऱ्या संघांवर सहजपणे मात केली. ‘जयभवानी’चे अजिंक्यपद मिळवणारा पुण्याच्या साधना मंडळाचा संघ या संघाबरोबर चांगली लढत देऊ शकला नाही. ‘मॅनर्स’च्या वत्सला हुमणेची पकडण्याची पद्धत व धाडस नवोदित खेळाडूंनी कित्ता गिरवावे असे होते. यंदाचे राज्यक्रीडा महोत्सवाचे अजिंक्यपद मिळवणारा नागपूरच्या सुभाष मंडळाचा संघ या सामन्यात अजिबातच प्रभाव पाडू शकला नाही. सुटलेला सराव हे बहुधा त्याचे कारण असावे. प्रथमच मैदानावर पाऊल ठेवून श्री शिवाजी उदय मंडळाच्या मुली अपेक्षेपेक्षा भलत्याच बहारदार खेळल्या. सर्व संघातल्या नामवंत खेळाडूंच्या त्यांनी कसदार पकडी घेतल्या. खेळाचे तंत्र, मंत्र आणि सांघिक शास्त्र या मुलींना लाभले तर पुण्या-मुंबईच्या तोडीला हा संघ सहजपणे जाऊन बसेल.
अंतिम सामन्यावर सुमारे 20 मिनिटांपर्यंत मॅनर्स स्पोर्ट्स क्लबने आपली पकड ठेवली होती. नाबर भगितींच्या वेगवान चढाया आपल्या क्षेत्रव्यूहाच्या अभेद्यपणाने त्याने थोपवून धरल्या. शेवटी ‘क्रांती’ने यशस्वीपणे दोन बुरुज ढासळविले आणि आपल्या संघाकडे सामना खेचून नेला. मृदुला मडईकर आणि वत्सला हुमणेनी त्यानंतर फिरवण्यासाठी केलेला प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. आणि श्रद्धा चषक नवयुग क्रीडामंडळाने जिंकला. उत्कृष्ट चढाईचे सुवर्णपदक क्रांती नाबरला मिळाले.
अंतिम सामने सुरू होण्यापूर्वी प्रमुख पाहुण्यांच्या भाषणासह सर्व कार्यक्रम उरकून घेण्यात आले. पहिल्या दिवशी छत्रपती पारितोषिक विजेत्यांचा सत्कार झाला होता. शेवटच्या दिवशी संस्थेच्या सर्व माजी अध्यक्षांचा सत्कार झाला. मा. वानखेडेंचे भाषण मोठे समर्पक होते. त्यांच्या आधी झालेल्या दोनतीन भाषणांना उद्देशून ते म्हणाले, “त्या भाषणांच्या वेळी मला स्वतःलाच शिट्ट्या वाजवून टाळ्या पिटाव्या असे वाटत होते. तेव्हा मीही लोकांची हीच भावना माझ्या भाषणाच्या वेळी आहे हे ओळखून लवकर आवरते घेतो.”
सामने संपले. लक्षात राहिली रंगलेली कबड्डी, सुंदर युवक गुरुदक्षिणा चषक आणि विजेत्यांचे मोहरलेले चेहरे आणि उत्साहाने साद देणारे असंख्य क्रीडाशौकीन. पहिल्याच प्रयत्नाला ही कमाई भरभक्कम आहे.
एका अनिष्ट वादळाचा आरंभ
प्रथमपासूनच बाद पद्धतीने सामने खेळण्याची पूर्वीची पद्धत आता बाद झाली आहे. आलेल्या संघाचे आता विभाग (Zone) पाडतात. विभागीय सामन्यात विजेते-उपविजेते ठरलेले संघ मग बाद पद्धतीच्या सामन्यात प्रवेश करतात. यामुळे दूरवरून आलेल्या खेळाडूंना भरपूर सामने खेळावयास मिळतात. एखादा सामना कमनशिबाने हरूनही बाद पद्धतीच्या सामन्यात त्याला प्रवेश मिळवता येतो. शिवाय प्रेक्षकांना खेळाचा मनमुराद आनंद लुटता येतो.
या पद्धतीत काही दोष शिरले. चार वा पाच संघांच्या विभागातले दोन बलाढ्य संघ इतर संघांना झोडपून काढत आणि स्वतः गुणशून्य बरोबर करून एक-एक गुण घेत. सामने रंगण्याऐवजी रटाळ होऊ लागले. मग महाराष्ट्र असोशिएशनने हा नियम बदलला. विभागातून अवघा एकच संघ वर घेण्याचा प्रयोग करण्याचे त्यांनी ठरविले.
या पद्धतीतही काही तोटे होते. विभागातून वर जाणे हा सर्वच संघांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. ते नाराज झाले. शिवाय विभागातला एखादा सामना हरताच आता सारे संपले या भावनेने पुढचे सामने खेळण्यातला खेळाडूंचा रस एकदम कमी होऊ लागला.
कबड्डीमध्ये प्रयोगक्षमता कमी, अशी ओरड नेहमी होते. त्यामुळे हा नवीन प्रयोग एक वर्षभर राबविण्याचा प्रयत्न करण्यास काही हरकत नव्हती. पण खेळाडूंची इच्छा, प्रेक्षकांची मर्जी आणि संयोजकांचा पाठिंबा, याच्या जोरावर सोलापूरच्या या वर्षी ह्या तीनही स्पर्धांत जाणूनबुजून हा नियम धुडकावून लावला गेला. सातारकरांची मनापासूनची इच्छा दोन संघ विभागातून वर घेण्याची! पण ते पडले शिस्तबद्ध. त्यामुळे त्यांनी असोशिएशनच्या म्हणण्यापुढे मान तुकविली. सांगलीकरांनी पुन्हा आपलेच घोडे पुढे दामटले. सातारला राणा भीमदेवी पवित्रा घेतलेल्या असोसिएशनच्या कार्यकर्त्यांना सांगलीला माघार घ्यावी लागली.
यातून उमजली जाणारी सत्ये भयंकर आहेत. एक म्हणजे कबड्डीच्या भल्यासाठी आपणच घेतलेले काही निर्णय सर्व संघांपर्यंत पोहोचविण्याची आणि ते राबवून घेण्याची जिल्हा संघटनांची जबाबदारी आहे हे मुळी सर्व संघटना नाकारतातच. नियम बदलावयाचाच होता ना, मग असोशिएशनची खास सभा बोलावून बदलायचा. पुढील वर्षी प्रयोग फसला म्हणून बदलला. पण या मन चाहेल त्या वर्तनाला काही अर्थ नाही. दुसरे म्हणजे ही नियमांची पायमल्ली होत आहे हे माहीत असूनही महाराष्ट्र राज्याची समर्थ कबड्डी असोसिएशन तातडीने काहीही करू शकली नाही. यानंतर शिस्तभंगाच्या कारवाया होतील पण त्यात दम नाही. त्या ठिकाणीच हे जाब विचारले जावयास हवेत. असोसिएशनचा खास निरीक्षक पहिल्या वर्गाचा भत्ता घेऊन सामन्याला जातो त्याचे मग काम काय? काही कारवाई मनात आणले असते तर तातडीने करता आली असती अशी ताकद आज महाराष्ट्राच्या राज्य असोसिएशननजवळ निश्चितच आहे. मग हे का घडले नाही? तिसरी गोष्ट ही ह्या सर्वांच्या मुळाशी असलेली महत्त्वाची गोष्ट - खेळाडू, मंडळे आणि राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संबंधामधील दरी झपाट्याने वाढत चालली आहे. एकमेकांना पूरक आणि एकमेकांच्या हितासाठी आणि कबड्डीच्या भल्यासाठी हे सारे चालले आहे. याचा विसर दोघांनाही पडला आहे काय अशी सार्थ शंका वाटते. आमच्या खेळावर व जिवावर मिरवणाऱ्या राज्य संघटनाच आम्हांला क:पदार्थ ठरवून स्वतःच्याच मिजाशीत आम्हांला कशीही वागवते, ही खेळाडूंची भावना. तर कबड्डी वाढली, हे खेळाडू प्रतिष्ठित झाले आणि आता मस्तवालपणा करतात तो आम्ही मोडून काढू, ही संघटकांची उमेद.
एका विभागातून दोन संघ वर घेण्यावरून उठलेले वादळ हे सध्या सर्व महाराष्ट्रभर खेळाडूंच्यात एक प्रमुख चर्चेचा विषय आहे. कबड्डी स्पर्धांचा मौसम आता संपत आला. पुन्हा सारी शांतता होईल. ही दुसऱ्या मोठ्या वादळापूर्वीची शांतता ठरू नये हीच इच्छा. नाहीतर आता कुठे आकार घेणारे कबड्डीचे घरटे त्यात पार उस्कटून जाईल.
(पूर्वप्रसिद्धी : माणूस, 29 मे 1971)
- डॉ. नरेंद्र दाभोलकर
क्रीडांगण सदरातील या आधी प्रसिद्ध झालेले सर्व लेख वाचा या लिंकवर
Tags: नरेंद्र दाभोलकर अंनिस सामाजिक कार्यकर्ता माणूस साप्ताहिक श्री. ग. माजगावकर क्रिडा नरेंद्र दाभोळकर खेळ क्रिकेट सामना Load More Tags
Add Comment