रणजी ट्रॉफी : एक बचावाची लढत

'माणूस'मधील 50 वर्षांपूर्वीच्या सदराची पुनर्भेट (1/22)

सुनील गावस्कर | Getty Images

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मुख्य ओळख अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते अशी आहे. त्यानंतर साधना साप्ताहिकाचे दीड दशक संपादक अशीही त्यांची एक महत्त्वाची ओळख आहे. मात्र आयुष्याच्या पंचविशीपर्यंत त्यांची मुख्य ओळख राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू अशी होती. त्यांना राज्य सरकारचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार दोन वेळा मिळाला होता. एकदा कबड्डीचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून, आणि दुसऱ्यांदा कबड्डी खेळातील अन्य योगदानासाठी (संघटक, पंच, कॉमेंटेटर, स्तंभलेखक, क्रीडाप्रसारक, इत्यादी प्रकारच्या).

अशा डॉ. दाभोलकरांनी माणूस साप्ताहिकात 1970 - 1971 मध्ये क्रीडांगण हे पाक्षिक सदर लिहिले. त्यात कब्बडी, कुस्ती, अन्य देशी खेळ यांच्यासोबत क्रिकेटवरही त्यांनी लिहिले आहे. या सदरातील एकूण 22 लेखांतून क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी आसुसलेले मन आणि एकूणच खेळांच्या विषयी असलेले त्यांचे प्रगल्भ विचार यांचे दर्शन घडते.  

तब्बल 50 वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले आणि त्यानंतर आजतागायत कुठेही  उपलब्ध नसलेले हे लेख, साधनेतील आमचा तरुण सहकारी समीर शेख याने 'माणूस'च्या अर्काइव्हमधून संकलित केले आहेत. डॉ. दाभोलकर यांच्या आयुष्यातील सुरुवातीचे हे पर्व किती रोमांचक असेल याची कल्पना तर या लेखमालेतून येईलच, पण 50 वर्षांपूर्वीच्या क्रीडा जगताची एक झलकही पाहायला मिळेल. डॉक्टरांच्या व्यक्तिमत्वातला फारसा समोर न आलेला पैलू दाखवणारे हे लेख आजही वाचनीय आहेत, यात शंकाच नाही. आजपासून सलग 22 दिवस म्हणजे 20 ऑगस्ट या डॉक्टरांच्या स्मृतिदिनापर्यंत ही लेखमाला 'कर्तव्य'वरून पुनर्भेट म्हणून सादर करीत आहोत.

महाराष्ट्र आणि मुंबईतील रणजी ट्रॉफीचा सामना ही क्रिकेट शौकिनांची पर्वणीच मानली जाते. भारतीय संघातून चमकणारे आणि चमकू इच्छिणारे अशा अनेक क्रिकेटपटूंचा या संघात समावेश असतो. 21 नोव्हेंबरपासून ते 23 नोव्हेंबरपर्यंत पुण्याच्या नेहरू स्टेडिअमवरील लढत पाहण्यासाठी म्हणूनच सुमारे 20 हजार प्रेक्षकांनी गर्दी केली होती.

रणजी करंडकाच्या बादस्पर्धेत प्रवेश मिळविण्याचे स्वप्न महाराष्ट्र संघ गेली कित्येक वर्षे उराशी बाळगून आहे. गेल्या सहा वर्षांत कऱ्हाड, मुंबई व औरंगाबाद येथे मुंबईला पहिल्या डावात मागे टाकल्यानंतरही महाराष्ट्राला पश्चिम विभागात मानाचे पहिले पान मिळालेले नाही. गुणसंख्येच्या जोरावर दरवर्षी मुंबई संघाने आपले घोडे पुढे काढले आहे.

यंदाची परिस्थिती थोडी वेगळी होती. या सामन्याच्या आधीच दोन आठवडे गुजरातला निर्णायक हरविण्यात महाराष्ट्र यशस्वी झाला होता, तर दुसऱ्या डावातील गुजरातच्या खंबीर फलंदाजीने निर्णायक विजय मिळवण्याचे मुंबईचे स्वप्न भंगले होते. त्यामुळे सामना सुरू होण्यापूर्वी उभय संघांना समसमान गुण मिळाले, तरी काही बिघडणार नाही, अशी थोडी नकारात्मक भूमिका महाराष्ट्राने घेतली होती.

यासाठी दोन्ही आघाड्यांवर महाराष्ट्राने प्रयत्न केले. पहिला मार्ग म्हणजे स्पर्धेची नियमावली बदलून एकाऐवजी दोन संघांना बादपद्धतीत पाठविणे. अर्थात, याचा निर्णय लागण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सहा तारखेच्या बैठकीपर्यंत थांबावे लागेल. दुसरा मार्ग म्हणजे सामन्यासाठी निर्जीव खेळपट्टी तयार करणे.

गुजरातला हरविणाऱ्या आपल्या संघात महाराष्ट्राने बदल केला नाही. मुंबई संघ मात्र थोडा अडचणीत होता. दिलीप सरदेसाईची तब्येत पुरेशी सुधारली नव्हती; तर अजित पैचा दुखावलेला पायही त्याला त्रासाचा ठरणार होता. अर्थातच हे दोन्ही खेळाडू मुंबईला गाळावे लागले. वेगवान गोलंदाजांना उत्तेजन देण्याच्या धोरणाचा पुन्हा पुन्हा उच्चार होत असता इस्माईलच्या जोडीला नाईक अथवा उमेश कुलकर्णी यांपैकी कोणाचाच समावेश का होऊ शकला नाही, हे अध्यक्ष विजय मर्चंटच जाणोत.

टॉस जिंकून मुंबई संघाला पहिली फलंदाजी देण्यामध्ये महाराष्ट्र संघाच्या मनात बोनस गुण मिळविण्याची सुप्त आकांक्षा होतीच. पहिल्याच दिवशी दोन बाद 306 ह्या धावसंख्येने भक्कम पाया रचून मुंबईने महाराष्ट्राचा आशाभंग केला.

अकलखान यांना गोलंदाजी मिळाल्यावर पहिल्या दोन्ही षटकांमध्ये त्यांनी फार मोठे इनस्विंग वळवले, आणि त्यांच्या चौथ्याच षटकामध्ये आउटस्विंगवर मनकडच्या बॅटीच्या कडेला चाटून त्यांचा झेल स्लिपमध्ये उडाला, आणि तासाभराच्या अवधीत अवघ्या 26 धावांत मनकडना तंबूत परतावे लागले. परंतु निर्जीव खेळपट्टीमुळे हैराण झालेल्या गोलंदाजांना त्यापासून काही फारसे प्रोत्साहन मिळू शकले नाही. बोर्डे यांनी गोलंदाजीत योग्य प्रकारे बदल करून आणि उपहारानंतर अकलखान व विठ्ठल जोशी यांच्या गोलंदाजीवर योग्य क्षेत्ररक्षण ठेवूनही मुंबईचा बोनस गुण मिळवण्याची आशा त्यांनी दुरावली एवढेच. महाराष्ट्र सबंध दिवसात गडी बाद करू शकला फक्त दोनच!

सुनील गावसकरचा खेळ आणि त्याच्या 176 धावा हा या स्पर्धेतला सुखकारक अनुभव होता. पहिल्या दिवशीच्या त्याच्या नाबाद 144 धावांत सलढाणाच्या गोलंदाजीवर मारलेला एक सुरेख षटकार आणि 19 चौकार होते. रांजणेच्या गोलंदाजीवर मिडविकेटला त्यांनी मारलेले जोरदार फटके आणि विठ्ठल जोशीच्या फिरक्या गोलंदाजीवर केलेला कौशल्यपूर्ण खेळ हा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. शतक काढले आणि षटकार ठोकला तरीही त्याच्या खेळात टिकून राहिलेली एकाग्रता आणि धिमेपणा स्पृहणीय होता. पॉपिंग क्रीझच्या मागची जागा त्याने क्वचितच वापरली. सातत्याने काढलेले हे त्याचे तिसरे शतक! उत्कृष्ट फलंदाजाची अनेक वैशिष्ट्ये त्याच्या खेळात चमकून गेली.

3 बाद 380 वरून सर्व बाद 425 असा मुंबईचा डाव संपुष्टात आला. सामना अनिर्णित राहील म्हणून आणि धावांचा वेग वाढवावा म्हणून मुंबईने केलेल्या घाईने हे घडले.

महाराष्ट्राची सुरुवात केली चौहान आणि गुप्ते यांनी. चौहान निवड समिती सदस्यांच्या नजरेने दबून गेल्यासारखा खेळला. शिवालकरची गोलंदाजी खेळण्यास त्याला बरेच अवघड गेले. याउलट रेगेच्या गोलंदाजीवर मिड विकेटकडे गुप्तेने मारलेला चौकार त्याच्या कसदार खेळाचा दर्जा सहजच सिद्ध करून गेला.

बोर्डे आणि कानिटकर यांच्या मंद गती खेळाने महाराष्ट्रास सामना अनिर्णित ठेवायचा आहे हे स्पष्ट झाले. त्या दृष्टीने हेमंत कानिटकर आणि विठ्ठल जोशी यांनी नाबाद 75 व 43 धावा काढून चांगलीच कामगिरी बजावली. बोर्डेनी 69 धावा काढताना दाखवलेला खेळ हे शास्त्रशुद्ध आणि खंद्या क्रिकेट फलंदाजाचे मूर्तिमंत रूप होते. स्क्वेअर कटला मेहताच्या गोलंदाजीवर त्याने मारलेला चौकार आणि सोलकरच्या गोलंदाजीवर मारलेले फटके याची साक्ष पटवतील. भारतामधल्या आघाडीच्या फलंदाजांत अजूनही त्याचे नाव आवर्जून घ्यावे लागेल असा त्याचा खेळ होता.

अनिर्णित सामन्याने मुंबई व महाराष्ट्र या दोघांनाही तीन गुण मिळाले. मुंबईचे आता तीन सामन्यांपासून 18 गुण व महाराष्ट्राचे दोन सामन्यांपासून बारा गुण झाले आहेत. मुंबईस उरलेल्या एका सामन्यापासून अधिकाधिक गुण मिळवता येतील. याचा अर्थ पश्चिम विभागाच्या विजयाचा तुरा मस्तकावर चढविण्यासाठी उरलेले दोन्ही सामने दोन्ही डावावर महाराष्ट्राने जिंकले पाहिजेत. हे शक्य न होऊन जर गुणांची बरोबरी झाली तर मग धावांची सरासरी काढून अजिंक्यपद ठरविले जाईल.

झनानी कबड्डीचा लपंडाव

सुमारे महिन्यापूर्वी पार पडलेल्या भोईर सुवर्ण चषकाचे सामने म्हणजे कबड्डी खेळाचे विंबल्डन! दृष्ट लागण्यासारखी स्पर्धेची तयारी, भारतातील निवडक नामवंत संघांची उपस्थिती आणि डोळे सुखावणारी दर्जेदार कबड्डी ही या स्पर्धेची आकर्षणे. पण अंतिम फेरीतील वेस्ट आणि स्टेट बँक या दोन तुल्यबळ नावाजलेल्या संघांच्या लढतीला जाताना मी ज्या वेळी माझ्या जुन्या कबड्डीशौकीन मित्राला विचारले, त्या वेळी त्याच्या उद्गाराने माझे कबड्डी-अभिमानी मन निश्चितच दुखावले. तो म्हणाला, ‘‘येणार कोण वेळ आणि पैसा खर्चून तुमचा झनानी कबड्डी बघायला ?’’

दुर्दैव असे की 40 मिनिटांच्या सामन्यात गुणशून्य बरोबरी (0 - 0) करून दोन्ही संघांनी माझ्या मित्राची बत्तिशी शब्दशः खरी केली. आणि त्याच वेळी पलीकडच्या मैदानावर चाललेल्या नवयुग क्रीडा मंडळ आणि विश्वशांती या दोन महिला संघांनी अंतिम सामन्यात नेत्रदीपक पकडी व चौफेर चढाया यांची बरसात करून हे केविलवाणे दृश्य आणखी उघडे पाडले.

पोलादी क्षेत्ररक्षणाच्या जोरावर केवळ एका गुणाची मिळालेली आघाडी निर्णायक विजय मिळवून देण्यास आज बऱ्याच संघांना उपयोगी पडते. हे तंत्र पहिल्यांदा मुंबईकरांनी तयार केले, आणि आता साऱ्या महाराष्ट्रात ते झपाट्‌याने पसरत आहे. पहिला गुण दुसऱ्या संघाला न देण्याच्या धडपडीत स्वतःला तो नाही मिळाला तरी चालेल अशी नकारात्मक भूमिका घेतली जाते. याच्यामुळे प्रेक्षकांच्या वाट्याला येतो तो नीरस कंटाळवाणा कमालीचा संघखेळ.

याचे पहिले दर्शन प्रकर्षाने झाले ते दोन वर्षांपूर्वी नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत. भारतातील अतिरथी-महारथी ज्या संघातून खेळतात त्या भारतीय रेल्वे व महाराष्ट्र राज्य यांच्या अंतिम लढतीत गुणफलक कोराच राहिला. दहा मिनिटांचा जादा वेळ ठेवूनदेखील. कोल्हापूरच्या अ. भा. स्पर्धेत 1964 साली ‘भूतो न भविष्यति’ असा सामना रंगविणारे हेच का ते संघ व खेळाडू? असा प्रेक्षकांना संभ्रम पडला. आणि वैतागलेल्या प्रेक्षकांनी ‘दोन्ही संघ मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या.

योगायोग असा की, त्या वर्षी नागपुरात या कबड्डी सामन्यानंतर काही दिवसांनीच अखिल भारतीय खोखोच्या स्पर्धा पार पडल्या, आणि त्यातील क्रीडाकौशल्यावर देशी खेळांचा रसिक प्रेक्षकवर्ग बेहद्द खूश झाला. नेमके तसेच यंदा मुंबईतही घडले. नेरुरकर चषकाच्या खोखोचे मान्यवर सामने सुमारे आठवड्यानंतर त्याच मैदानावर पार पडले. आणि त्या वेगवान झंझावाती खेळाने प्रेक्षकांच्या डोळयांचे पारणे फेडले. खोखोच्या खेळाचा हा अंगभूत गुण आहे. खेळाला स्वतःची गती असते आणि त्यामुळे दोन बलाढ्य संघांतला सामना हमखास रंगेलच हे सांगता येते. खोखोपेक्षा कितीतरी अधिक संघर्षमय असलेल्या कबड्डीला मात्र ही स्वतःची गती नाही. आणि आता तर विजयाच्या आशेने अतिरेकी तंत्राच्या आहारी जाऊन ‘संघर्षमय खेळ’ हा आपला आत्माच कबड्डी हरवू लागला आहे.

तसे बघितले तर विजयासाठी खेळणे यात गैर काही नाही, पण म्हणून चमकदार खेळ धाडस दाखवून करू नये असे थोडेच आहे? त्याचा आनंद खेळाडू आणि क्रीडारसिक या दोघांनाही लुटता येतो आणि बऱ्याच वेळा विजयश्री ही या वीरांना माळ घालते. “खेळाडूंनो, खेळ दाखविण्यासाठी खेळा” असा उपदेश सारेच दुसऱ्याला करतात, पण धडाडीने असा खेळ दाखविणारा एखादाच पुण्याचा बाळ कोंढाळकर अथवा रेल्वेचा सदा दोहे निघतो. मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्याला मिळालेल्या अखिल भारतीय अजिंक्यपदातील सिंहाचा वाटा पहिल्याच चढाईपासून आक्रमक बेडर खेळ करणाऱ्या बाळ कोंढाळकरचाच होता हे कोण नाकारेल?

पण असे खेळाडू असतात हाताच्या बोटावर मोजण्याइतके. तेव्हा कबड्डी आक्रमक आणि आकर्षक करण्यासाठी कबड्डीच्या खेळातच काही बदल करून बघावेत हा दुसरा मतप्रवाह. पुण्याच्या सन्मित्र संघाने मागील वर्षी अशा स्वरूपाचे सामने आयोजित केले होते. कबड्डीला आलेला साचेबंदपणा नाहीसा होण्यासाठी अशा स्वरूपाच्या प्रयोगाची आज खूपच गरज आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेखाली दरवर्षी महाराष्ट्रात अनेक कबड्डी स्पर्धा पार पडतात. त्यांपैकी सुमारे दहा टक्के सध्यातरी प्रायोगिक असाव्यात याचा आग्रह असोसिएशन का धरत नाही? का प्रेक्षकांची सध्याच्या कबड्डीबद्दलची नाराजी त्यांना समजतच नाही? सातारा, पाचगणी, कराड येथील काही उत्साही कार्यकर्त्यांनी आपल्या मंडळाच्या वतीने अशा प्रायोगिक स्पर्धा या तिन्ही गावी आखण्याचे योजिले आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत संघांनाही पाचारण करण्यात येणार आहे. सध्याची कोंडी फोडण्यास या स्पर्धांतले कबड्डीचे बदलते स्वरूप किती मदत करते हे वाचकांच्या पुढे येईलच!

(पूर्वप्रसिद्धी : माणूस, 5 डिसेंबर 1970)

- डॉ. नरेंद्र दाभोलकर

Tags: क्रीडा नरेंद्र दाभोलकर अंनिस सामाजिक कार्यकर्ता माणूस साप्ताहिक श्री. ग. माजगावकर क्रिडा नरेंद्र दाभोळकर खेळ क्रिकेट सामना Load More Tags

Comments:

विष्णू दाते

छान लेख! डाॅ.दाभोळकरांचा हा पैलु प्रथमच समोर आणल्याबद्दल कर्तव्य साधनाचे आभार! पुढील २२ दिवस हे वाचायला उत्सुक आहोत!

Sarita Awad

Krida naipuny aani tatsth smeeksha samajli. Dr. Dabholkaranchya swabhaawaachaa ha unknown Pailoo aahe.

Add Comment