प्रशांत किशोर यांचा आता बिहार विधानसभेत प्रवेश झाला आहे. तिथल्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची संख्या 201 आहे. त्या तुलनेत प्रशांत किशोर यांच्या पक्षाचे संख्याबळ मर्यादित आहे, पण त्यांचा प्रभाव मोठा असेल. सभागृहातील चर्चांमध्ये त्यांची भूमिका निश्चितच प्रभावी ठरू शकेल, आणि त्यांना संसदीय आयुधांचा वापर करण्याची संधी मिळेल. विविध सरकारे आणि मुख्यमंत्री यांच्यासाठी अनेक वर्षे निवडणूक नियोजन करणाऱ्या व्यक्तीकडून संसदीय चर्चेतही तितक्याच अभ्यासपूर्ण आणि प्रभावी मांडणीची अपेक्षा असेल.
बिहारमधील बांकिपुर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी मिळवलेला विजय हा केवळ एका विधानसभा मतदारसंघाचा निकाल म्हणून पाहता येणार नाही. हा विजय त्यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असून, त्यांनी आपल्या सक्रिय संसदीय राजकारणाची सुरुवात पोटनिवडणुकीपासून करण्याचा घेतलेला निर्णय हाच मुळात एक राजकीय रणनीती म्हणून पहावे लागेल. या निर्णयामुळे त्यांना केवळ आमदारकी मिळाली नाही, तर राष्ट्रीय पातळीवर मोठी प्रसिद्धीही मिळाली. अनेक वर्षे निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांची आता लोकप्रतिनिधी अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. हिंदी आणि उत्तर भारतीय माध्यमांनी या विजयाला दिलेले व्यापक कव्हरेज त्यांच्या राजकीय प्रतिमेला अधिक बळ देणारे ठरले आहे.
या विजयाचे दुसरे महत्त्व असे की, हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जात होता. 1995 पासून भाजपच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व यापूर्वी नितीन नवीन आणि त्याआधी त्यांच्या वडिलांनी केले होते. नितीन नवीन यांची निवड भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली आणि पोटनिवडणूक झाली. त्यामुळे हा केवळ भाजपच्या एका उमेदवाराचा पराभव असे म्हणणे पुरेसे नाही. या निमित्ताने तर भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन क्षमतेवरही चर्चा घडू शकते. विशेषतः जो मतदारसंघात भाजपची संघटनात्मक ताकद आणि सूक्ष्म नियोजन यासाठी प्रसिद्ध होता, तिथे लागलेला हा निकाल म्हणजे राजकीय विश्लेषकांसाठी विशेष अभ्यासाचा विषय ठरेल.
जातीपातीच्या ठरवीक गणिताच्या पलीकडे पाहायला भाग पाडणारा निकाल म्हणूनदेखील याच्याकडे पहिले पाहिजे. सामाजिक प्रश्नासाठी भांडणारा विद्यार्थी कार्यकर्ता भारत भूषण तिवारी पोलीस कारवाईमध्ये मारला गेला. त्यामुळे तरुणाई चवताळलेली होती. त्याचाही प्रभाव निवडणुकीत काही प्रमाणात पडला असणारच.
प्रशांत किशोर यांच्या प्रचाराची शैली हे या विजयामागचं महत्त्वाचं कारण आहे. त्यांनी प्रचारात छोट्या सभा, लोकांशी थेट संवाद, स्थानिक प्रश्न सोडवण्यात नागरिकांचा थेट सहभाग यावर भर दिला. ते सतत लोकांमध्ये राहिले, संवाद साधत राहिले आणि निवडणुकीत केवळ पक्षीय स्पर्धा न करता स्थानिक लोकांच्या अस्मिता आणि अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न केला.
भाजपच्या रवीशंकर प्रसाद ह्या वरिष्ठ नेत्याने भाजपच्या तिकिटावर कुत्रा-मांजर जरी उभे केले तरी ते निवडून येईल अशा आशयाचे केलेले विधान विरोधकांसाठी प्रचाराचे प्रभावी अस्त्र ठरले. प्रशांत किशोर यांनी या विधानाचा अत्यंत प्रभावी राजकीय वापर करून निवडणुकीत जनमत आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणामही दिसून आला.
या विजयामुळे प्रशांत किशोर यांचा आता बिहार विधानसभेत प्रवेश झाला आहे. तिथल्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची संख्या 201 आहे. त्या तुलनेत प्रशांत किशोर यांच्या पक्षाचे संख्याबळ मर्यादित आहे, पण त्यांचा प्रभाव मोठा असेल. सभागृहातील चर्चांमध्ये त्यांची भूमिका निश्चितच प्रभावी ठरू शकेल, आणि त्यांना संसदीय आयुधांचा वापर करण्याची संधी मिळेल. विविध सरकारे आणि मुख्यमंत्री यांच्यासाठी अनेक वर्षे निवडणूक नियोजन करणाऱ्या व्यक्तीकडून संसदीय चर्चेतही तितक्याच अभ्यासपूर्ण आणि प्रभावी मांडणीची अपेक्षा असेल.
बिहारच्या विरोधी पक्षांच्या राजकारणातही या विजयाचे परिणाम दिसू शकतात. आतापर्यंत राज्यातील विरोधी पक्षांच्या राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून तेजस्वी यादव यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र प्रशांत किशोर यांच्या विधानसभेतील उपस्थितीमुळे आणि माध्यमांमध्ये त्यांना मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे हा केंद्रबिंदू त्यांच्याकडे सरकतो का, हे पाहणे लक्षणीय ठरेल. अर्थात, केवळ एका पोटनिवडणुकीच्या निकालावरून असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरू शकते, पण या विजयामुळे प्रशांत किशोर यांना बिहारच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे, हे मात्र नक्की.
आणीबाणीतील जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनानंतर शिक्षित, अभ्यासू आणि धोरणात्मक विचार करणाऱ्या लोकप्रतिनिधींची अपेक्षा समाजात व्यक्त होत आली आहे, त्या अपेक्षेला प्रशांत किशोर कितपत न्याय देतात, हे पाहिले पाहिजे. निवडणुकीतील भाषणे आणि प्रचार मोहिमा वेगळ्या असतात; मात्र विधानसभेत अभ्यासपूर्ण मांडणी, प्रश्न उपस्थित करणे, सरकारला उत्तरदायी धरणे आणि जनतेच्या प्रश्नांना संविधानात्मक मार्गाने पुढे नेणे, ही लोकप्रतिनिधीची खरी कसोटी असते. अनेकवेळा लोकानुनयी भूमिका देखील घ्याव्या लागतात आणि मग पुढे त्यावर प्रश्न उभे देखील राहतात.
या निवडणुकीचा आणखी एक राजकीय संदर्भ म्हणजे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार राज्यातील सत्तेत आणि राजकारणात अनुपस्थित असताना ही महत्त्वाची पोटनिवडणूक झाली आहे. गेल्या दोन दशकांत बिहारच्या राजकारणात नितीश कुमार हे केंद्रस्थानी राहिले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली जनता दल (युनायटेड)ने अनेक निवडणुका जिंकल्या आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाशिवाय झालेल्या या निवडणुकीने भविष्यासाठी काही नवे राजकीय संकेत दिले का, याचाही विचार केला पाहिजे.
बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्पष्ट बहुमतासह स्थिर आहे. या निकालामुळे त्याला आत्ता लगेच कोणताही धोका नाही. त्यामुळे एका जागेचा पराभव हा सत्तांतराचा संकेत नक्कीच नाही. मात्र संघटनात्मक पातळीवर आणि नेतृत्वाच्या दृष्टीने या निकालाचे विश्लेषण भाजपला करावे लागेल. विशेषतः मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाचीही या निमित्ताने चर्चा होईल. भविष्यात पक्षाच्या संघटनात्मक रचनेत किंवा नेतृत्वात काही बदल होऊ शकतील.
प्रशांत किशोर यांच्या विजयातील आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांचे सूक्ष्म नियोजन आणि नवीन लोकांचा पक्षात समावेश. निवडणुकीतील मायक्रो मॅनेजमेंट, बूथस्तरीय संपर्क आणि मतदारांशी सातत्यपूर्ण संवाद यामुळे त्यांनी भाजपच्या मजबूत संघटनात्मक यंत्रणेलाही शह दिला. काही मतदान केंद्रांवर, अगदी प्रतिस्पर्धी नेतृत्वाच्या प्रभावक्षेत्रातही त्यांनी आघाडी मिळवल्याची चर्चा होत आहे. यामुळे त्यांची निवडणूक रणनीती प्रत्यक्ष राजकीय स्पर्धेतही प्रभावी ठरू शकते, हे सिद्ध झालेलं आहे.
आता प्रशांत किशोर ह्यांनी प्रचारात दिलेली आश्वासने, विधानसभेत मांडलेले प्रश्न, मतदारसंघातील विकासकामे आणि जनतेशी सातत्याने असलेला संपर्क यावरच त्यांच्या नेतृत्वाचे मूल्यांकन होईल. आता त्यांच्या प्रत्येक कृतीकडे एक आमदार म्हणून त्यांनी काय केले? या निकषावरून पाहिले जाईल.
हेही वाचा : करिश्म्यापेक्षा वाढले 'मॅनेजमेंट'चे महत्त्व (सुरेश इंगळे)
एकूणच, या विजयाकडे समाजवादाची पिछेहाट किंवा एखाद्या विचारप्रवाहाचा विजय म्हणून पाहण्यापेक्षा, नियोजन, संवादकौशल्य, संघटन, प्रभावी राजकीय रणनीती, तसेच साधलेले टायमिंग यांचा विजय म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल.
बिहारच्या राजकारणात प्रशांत किशोर यांनी स्वतःसाठी एक स्वतंत्र राजकीय अवकाश निर्माण केला आहे. हा अवकाश पुढे किती मोठा होतो, विरोधी पक्षांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू त्यांच्याकडे सरकतो का, आणि राष्ट्रीय राजकारणात त्यांचे स्थान किती मजबूत होते, याची उत्तरे येणाऱ्या काळात मिळतीलच. पण या एका पोटनिवडणुकीने प्रशांत किशोर यांना केवळ बिहारच्या आमदारकीची नव्हे, तर देशाच्या राजकारणाची दारेदेखील खुली करून दिली आहेत, एवढे मात्र नक्की!
Tags: bihar bihar assembly elections बिहार विधानसभा पोटनिवडणूक बिहार बिहार विधानसभा प्रशांत किशोर जन सुराज निवडणूक विजय निवडणूक रणनीती लोकांशी संवाद साधनाडिजिटल Load More Tags
Add Comment