नुकतेच महाराष्ट्र शासनाने दोन महत्त्वाचे साहित्य पुरस्कार जाहीर केले. त्यातला पहिला व्रतस्थ वृत्तीने अनवट वाटा चोखाळत मराठीतील ललित निबंध समृद्ध करणारे साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार’ आणि दुसरा 1960 नंतरच्या काळात मराठी कादंबरीला नवीन वळण देणारे समर्थ कादंबरीकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांना. या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या दोघा श्रेष्ठ साहित्यिकांचे हार्दिक अभिनंदन !
मराठी साहित्यविश्वाला अत्यंत आनंद देणारी ही घटना. एक योगायोगाची गोष्ट येथे आवर्जून नमूद करावीशी वाटते. 1960-61 च्या दरम्यान श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी ‘रूप’ हे लघु अनियतकालिक सुरू केले होते. त्यात भालचंद्र नेमाडे, द. भि. कुलकर्णी, शांताराम रामचंद्र शिंदे, इंदिरा संत, प्रल्हाद वडेर, व. ह. पिटके, वासंती मुझुमदार आणि सिंधू अराणके इत्यादींनी लेखन केले होते.
प्रस्तुत लेखात श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा थोडक्यात परामर्श घ्यायचा आहे. 20 नोव्हेंबर 1936 ला जन्मलेल्या श्रीनिवासांनी नव्वदाव्या वर्षात पदार्पण केले आहे. कराडच्या कोयना वसाहतीत कित्येक वर्षे राहून त्यांनी मोजकीच परंतु दर्जेदार साहित्यनिर्मिती केलेली आहे. त्यांच्या ललित निबंधाची शैली अनन्यसाधारण आहे. मिताक्षरांतून अर्थघन आशय अभिव्यक्त करण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे. साध्या-सुध्या, अलंकारविरहित, छोट्या-छोट्या वाक्यांतून तलम पोत असलेले अक्षरविश्व त्यांनी निर्माण केले आहे. त्यातील निरागसता रसिकमनाला भावते; आणि त्यातील काव्यात्म अनुभूती आल्हाद देते. लेखक ‘डोह’ सारख्या पुस्तकातून आपले बोट धरून प्रत्येकाला आपल्या बालपणान नेतो. पण हे अनुभूतिविश्व केवळ श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचेच असू शकते. अन्य कुणाचे नव्हे.
रूप-रंग-गंध-नाद-स्पर्श या पंचसंवेदनांची जाणीव निर्माण करणारी अप्रतिम शब्दकळा त्यांना लाभलेली आहे. कवितेत न मावणारा आशय ते काव्यात्म अनुभूतीने टिपतात. वास्तव भूमीवर कल्पनाविश्वात न रमता घट्टपणे उभे राहून ते भवतालाचे सूक्ष्म निरीक्षण करतात. सृष्टीतील अणुरेणू त्यांच्या नजरेतून सुटत नाही.
त्यांची संवेदनशीलता इतकी तीव्र आणि उत्कट आहे की, जणू काही बालकवींच्या काव्यविश्वात आपण वावरत असतो. आजोबांपासून चालत असलेल्या चित्रकलेचे त्यांनी जाणीवपूर्वकतेने जतन केले आहे. त्यामुळे ते चित्रमय सृष्टी निर्माण करतात. सृष्टीचे प्रतिरूप आपल्यासमोर ठेवतात. त्या सुकुमार शैलीशी आपण एकरूप होऊन जातो. विस्मयाने भारले जातो.
ही सारी किमया कशामुळे घडत असेल? वडिलांचा चित्रकलेचा वारसा त्यांनी लेखनप्रक्रियेत आणि सुंदर हस्ताक्षरात सामावून घेतला आहे. आईकडून वाचनाचे संस्कार घेतले आहेत. औदुंबरचा परिसर त्यांना अंतःचक्षूंनी न्याहाळता आला, कारण त्यांचे कुमारवयीन आयुष्य या परिसरात गेले. त्या समृद्धीचा गर्भश्रीमंतीचा प्रत्यय त्यांच्या आशयामधून येतो. ते आपल्या व्यक्तिमत्त्वातील हळुवारपणा कळत-नकळत अभिव्यक्तीत मिसळून टाकतात. त्यामुळे त्यांचा ललितबंध लालित्याने ओथंबून येतो. शब्दसमाधीच लाभलेली असते त्यांना!
श्रीनिवासांनी मराठीतील जुन्या काव्याचे वाचन केले. आधुनिक कविता डोळसपणे वाचली. संस्कृत साहित्याचे चोखंदळपणे वाचन केले. या त्यांच्या सदभिरुचिसंपन्न व्यक्तिमत्त्वातील प्रसन्न वृत्तीचे प्रतिबिंब त्यांच्या ललितनिबंधांत पडले आहे.
श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे ‘डोह’ (1965), ‘सोन्याचा पिंपळ’ (1975), ‘पाण्याचे पंख’ (1987) आणि ‘कोरडी भिक्षा’ (2000) हे ललितनिबंधसंग्रह प्रसिद्ध झाले. ही सगळीच पुस्तके साहित्यरसिकांनी उचलून धरली. ‘डोह’ला आतापर्यंत मिळालेला प्रतिसाद लोकविलक्षण आहे. सामान्य वाचकांपासून ते समीक्षक, सर्जनशील कवी-लेखकांपर्यंत सर्वांच्या मनावर ‘डोह’ ने मोहिनी घातली. प्रा. वा. ल. कुलकर्णी, पु. ल. देशपांडे, डॉ. सरोजिनी वैद्य, प्राचार्य म. द. हातकणंगलेकर, दुर्गाबाई भागवत, डॉ. सुधा जोशी, डॉ. द. भि. कुलकर्णी, प्रा. ल. ग. जोग, डॉ. प्रल्हाद वडेर, आनंद यादव, डॉ. प्रभा गणोरकर, राम पटवर्धन, डॉ.गं. ना. जोगळेकर, डॉ. सुहास भालचंद्र बापट आणि अन्य नामवंतांनी ‘डोह’ची आणि त्यांच्या अन्य ललितनिबंधसंग्रहांची मुक्त मनाने प्रशंसा केलेली आहे.
श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी साहित्यप्रेमामुळे आणि सकस साहित्यनिर्मितीमुळे अनेक मित्र जोडले. प्रेमळ, आणि स्वागतशील वृत्तीमुळे ही मांदियाळी त्यांनी जोडली. अगत्यशील काव्यात्म अनुभूतीने विनटलेल्या त्यांच्या ललितनिबंधांच्या अंतरंगाकडे येथे लक्ष वेधावेसे वाटते.
आम्ही वानरांच्या फौजा, मृगजळातील यक्षघराला, जुन्या जन्मींची माणसे, रात दिवाभीताची, मनातल्या उन्हात, डोहापलीकडे, वारा वाहे रुणझुणा, शब्दांच्या संध्याकाळी, पाणी, सुसरीचे दिवस आणि हा चौघडा झणाणे या डोहमधील साऱ्याच ललितनिबंधांचे वाचन करताना अपरिमित आनंद होतो. श्रीनिवासांच्या या भावविश्वात वनस्पती, वड, पिंपळ इत्यादी वृक्षविशेष, पशुपक्षी, नदीप्रवाह, डोह, त्याच्या साहचर्याने येणाऱ्या सुसरी, वानरे, यांची चित्र आहेत. ही सारी दृश्ये सजीव होऊन आलेली आहेत असे वाटते. घरातील आप्त आणि परिसरा तीन माणसे त्यांच्या वृत्तिप्रवृत्तीसह येथे दृग्गोचर होतात. वातावरणाला जिवंतपणा आणतात. ‘डोह’ला प्राप्त झालेली आत्मानुभूतीची मिती-अभिनव स्वरूपाची आहे.
हेही वाचा - सृष्टीचे रंगविभ्रम तन्मयतेने रेखाटणारा कवी (बालकवींच्या 130 व्या जयंतीनिमित्त) - सोमनाथ कोमरपंत
‘सोन्याचा पिंपळ’ (1975) हा ललितनिबंधसंग्रह अनुभूतिदर्शनाच्या बाबतीत आगळा-वेगळा ठरलेला आहे. अतींद्रिय अनुभवांचे विश्व येथे लेखकाने उभे केलेले आहे. ‘सोन्याचा पिंपळ’ मध्य प्रौढ मन प्रकट झाले आहे. ‘घंटीवाला’ या पहिल्याच लेखात आपल्या छोट्या भावाच्या मृत्यू पर्यंतचा प्रवास लेखकाने चित्रित केला आहे. ‘तळ्याकाठी संध्याकाळी’ या ललित निबंधातील निसर्गवर्णन चित्रमय वाटतेः पाण्यावरचा काळिमा गडद झाला होता. झाडेही गडद होऊन दिसेनाशी. विवेकला म्हटले, “झोप आली काय?”, “हट्! मी इथं बसून पाणी बघणार आहे.” तो तन्मय झाला होता. आम्ही उठलो. तळ्याच्या पायऱ्यांना लगटून मंदिर होते. शंकराचे. घंटा वाजत होत्या. मंदिराच्या तळाकडल्या भिंतीच्या जाळीतून, चांदीच्या मोठ्या निरांजनातल्या हलत्या ज्योतींचा प्रकाश तळ्यावर हेलकावत होता.
दृक्-नाद-संवेदनायुक्त चित्र साकार झाल्याची ही अनुभूती आहे. उदासीनदास, धनानि भूमौ आणि काळोख चोहूंकडे है या संग्रहातील वाचनीय लेख आहेत. ‘देव’ या ललितनिबंधात काळोखाचे गूढरम्य चित्र रेखाटले आहे: “रंगीत फिल्म सरकावी तशी डोळे मिटल्यावर ही दृश्यं सरकत असतात आणि दृश्यं नसतात तेव्हा नुसता काळाभोर काळोख कधीच डोळ्यांपुढं दिसत नाही. मी केवळ काळोख कधी बघितलाच नाही. काळ्याभोर काळोखातही, समुद्रात आतून असावेत तसे प्रवाह चाललेत असं दिसतं... आणि काहीतरी ऐकू आल्यासारखं वाटतं. ते प्रवाह कुठंतरी पलीकडे पोचताहेत, असे भासतं.” दादा म्हणाले, “खरं आहे. अंधार हा अंतःस्थाचाच भाग आहे आणि अंतःशक्तीचे प्रवाह सर्वव्यापी असतातच.”
‘पाण्याचे पंख’ या ललितनिबंधसंग्रहात आपले घर, घराभोवतालचा परिसर आणि त्यात वावरणाऱ्या लहान मुलांचे भावविश्व त्यांनी तन्मयतेन रंगविले आहे. आलोक, पदम, मनू आणि मिकी इत्यादी ललितनिबंधांत लेखकाची बालविश्वाशी झालेली समरसता अनुभवावी.
‘कोरडी भिक्षा’ हा लेखकाच्या परिणतावस्थेतील ललितनिबंधसंग्रह. यात 1972 ते 1997 या काळात लिहिलेले सोळा ललित-निबंध आहेत. कावळ्याची गोष्ट, बुवाची आई, लेखकाची सखी आणि आत्मध्यान हे ललित निबंध अंतर्मुख करणारे आहेत. मानवी वृत्तिप्रवृत्तोंचे सूक्ष्म चित्रण लेखकाने यांत केलेले आहे.
या साऱ्या लेखनसंपदेबरोबरच त्यांनी 1987 पासून त्यांनी ‘मौज’ वार्षिकाचे निगुतीने संपादन केले आहे. आणि वाङ्मयीन जगतात ‘मौज’ वार्षिकाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. कुशल संपादन, वाङ्मयीन निष्ठा, ग्रंथसहवास हेच आपले श्रेयस मानण्याची वृत्ती, अखंडित परिश्रम करण्याची तयारी आणि समकालीन लेखक-कवी यांची उत्तम पारख, हे त्यांचे गुण मौज आणि सत्यकथा या वाङ्मयीन नियतकालिकाचे संवर्धन करण्यासाठी पोषक ठरले. या कामात प्रा. श्री. पु. भागवतांसारखी वडिलधारे मार्गदर्शक आणि राम पटवर्धनांसारखे निष्ठावंत सहकारी त्यांना लाभले. ही नियतकालिके वर्धिष्णु होत गेली. मराठी वाङ्मयीन नियतकालिकांचा इतिहास लिहिताना या बाबीचा निर्देश करावा लागेल. मौज प्रकाशनाची वाढ झाली ती या साऱ्यांच्या सहकार्यामुळे. या गुणी जनांचे एकत्र येणे हा एक शुभयोग होय!
- डॉ. सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा
somnathpant@gmail.com
(लेखक गोवा विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख, ज्येष्ठ समीक्षक आणि मराठी साहित्याचे प्राध्यापक आहेत.)
Tags: साधना डिजिटल श्रीनिवास विनायक कुलकर्णी महाराष्ट्र राज्य शासन विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ललित लेखन डोह सोन्याचा पिंपळ कोरडी भिक्षा पाण्याचे पंख ललित निबंध मौज सत्यकथा Load More Tags
Add Comment