'चीन भेटीतील भाषणे' या पुस्तकाचा प्रकाशनसोहळा

रवींद्रनाथ टागोरांनी 101 वर्षांपूर्वी चीनमध्ये केलेल्या भाषणांचा सानिया कर्णिक कृत अनुवाद

साधना ट्रस्टच्या ग. प्र. प्रधान संशोधन व प्रशिक्षण केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या अभ्यासवृत्तीतून साकारलेले पहिले पुस्तक 'चीन भेटीतील भाषणे' या नावाने वाचकांसमोर आले आहे.

रवींद्रनाथ टागोर यांनी 1924 मध्ये चीनला भेट दिली. त्या 50 दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी विविध ठिकाणी भाषणे दिली. त्यातील सात भाषणांचे पुस्तक Talks in China या नावाने 1925 मध्ये आले. त्यापैकी पहिले भाषण आत्मकथनात्मक आहे, दुसरे आयोजकांना उद्देशून, तिसरे विद्यार्थीमित्रांना उद्देशून तर चौथे शिक्षकांना उद्देशून आहे. पाचवे भाषण संस्कृती व प्रगती यांचा परामर्श घेणारे आहे, तर सहावे भाषण सत्य या संकल्पनेवर आधारित आहे. सातवे भाषण चीनचा निरोप घेताना दौऱ्याचा मागोवा घेणारे आहे.

त्या सर्व भाषणांचा अनुवाद, तसेच तो दौरा आयोजित करणारे लियांग छिछाव यांनी लिहिलेला लेख, दौऱ्याची एकूण आखणी आणि रूपरेषा, या भेटीला चीनमध्ये झालेला विरोध आणि मिळालेला पाठिंबा, चीनमधल्या वृत्तपत्रांतली आणि बुद्धिजीवी वर्तुळातली चर्चा, दौऱ्याच्या वेळी झालेले वादसंवाद आणि त्या दौऱ्याचे इतर तपशील आणि आशयाला पूरक अशी छायाचित्रे यांचा समावेश या संदर्भसमृद्ध पुस्तकात आहे.

मूळची पुण्याची असलेली आणि सध्या चीनमध्ये अनुवादशास्त्राचा अभ्यास करत असलेली युवती सानिया कर्णिक हिने हे सर्व अनुवाद इंग्रजी आणि चीनी भाषेतून केलेले आहेत.

साधना प्रकाशनातर्फे या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला. पुस्तकाचे प्रकाशन 'चिनी महासत्तेचा उदय' या पुस्तकाचे लेखक सतीश बागल यांच्या हस्ते झाले. जर्मन भाषेच्या अभ्यासक नीती बडवे या प्रमुख अतिथी होत्या, तर 'अंतर्नाद'चे माजी संपादक भानू काळे अध्यक्षस्थानी होते. या तिघांप्रमाणेच प्रकाशक आणि साधनाचे संपादक विनोद शिरसाठ , तसेच अनुवादक-संपादक सानिया कर्णिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रविवार, 19 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन हॉल, नवी पेठ, पुणे येथे हा सोहळा संपन्न झाला. त्या सोहळ्याचा हा 2 तासांचा व्हिडिओ आहे.

Tags: रबीन्द्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर सानिया कर्णिक भाषण भाषांतर अनुवाद अनुवादित पुस्तक साधना प्रकाशन साधना प्रकाशनचे नवे पुस्तक चीन चीन राजकारण चीन इतिहास टागोर भाषा नीती बडवे भानू काळे सतीश बागल Load More Tags

Add Comment

संबंधित लेख