मनोज्ञ प्रवासचित्रे रेखाटणारा सदभिरुचिसंपन्न लेखक

प्रा. रा. भि. जोशी यांच्या प्रवासवर्णनांचा आढावा

‘मजल दरमजल’ या पुस्तकात प्रा. रा. भि. जोशी यांनी संवेदनशील वृत्तीने, डोळसपणे केलेला प्रवास दिसतो. दिल्ली, मथुरा, अयोध्या, धनुष्कोडी, पैठण, देवगिरी, ऋद्धिपुर, तुळजापूर, पुसद, वाशिम, अकोट, गाणगापूर, माणिकपूर, पंढरपूर, वाई, औंध, कऱ्हाड, मुंबई आणि पुणे या स्थळांसंबंधीचे आहेत. कालप्रवाहाशी टक्कर देत देशातली सत्त्वधारा चिरंतन ठेवणाऱ्या सांस्कृतिक स्थळांची ही परिक्रमा. दिल्ली, मुंबई आणि पुणे हे भारताच्या आधुनिक जीवनातले मानबिंदू आहेत. त्याचबरोबर त्यांना सांस्कृतिक वारसादेखील आहे. हे सारे जोशी यांच्या डोळ्यांनी पाहणे हा सुखद अनुभव आहे.


प्रा. रा. भि. जोशी हे मराठी साहित्यसृष्टीतील चतुरस्र साहित्यिक. त्यांचे वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्व सदभिरुचिसंपन्न होते. सर्जनशीलता आणि चिकित्सक वृत्ती यांचा स्वरमिलाफ त्यात झालेला होता. त्यांनी तत्त्वज्ञान, इतिहास कलास्वरूपशास्त्र आणि समाजशास्त्र इत्यादी ज्ञानक्षेत्रांविषयी सतत कुतुहल बाळगले. समाजभानाबरोबर त्यांना आत्मभानही होते त्यांचा मनःपिंड सौंदर्योपासक आणि उदारमनस्क. चिंतनशीलता आणि रसिकता या दोहोंचा प्रत्यय त्यांच्या प्रसन्न वृत्तीने केलेल्या लेखनातून येतो. मनुष्यनिर्मित कलाकृतीकडे आणि साहित्यकृतीकडे खुल्या दिलाने पाहणारे ते रासिकाग्रणी होते. निसर्गाविषयी त्यांना अत्यंत ममत्व वाटत असे. वाङ्‌मयातील विविध प्रकार त्यांनी हाताळले असले तरी प्रवासवर्णन हा त्यांचा मर्मबंध होता. मराठीतील प्रवासवर्णनपर लेखनाला नवी मिती देण्यात त्यांचे श्रेय फार मोठे आहे. ते स्वतः आपल्या या प्रकारच्या लेखनाला ‘प्रवासलेख’ असे संबोधतात. संकलित परिणामाच्या दृष्टीने त्यांना ‘प्रवासचित्रे’ म्हणणे अधिक योग्य वाटते. त्यांच्या या लेखनात त्यांच्या सद‌भिरुचिसंपन्न मनाचा प्रवास आपल्याला घडतो. तो आपले मन उन्नत करणारा असतो. आपल्या राष्ट्राच्या खऱ्याखुऱ्या वैभवाचे दर्शनही त्यातून घडते. ही पुस्तके वाचण्यापूर्वीचे आपण आणि वाचल्यानंतरचे आपण यात फरक पडतो. आपले बोट धरून प्रा. रा. भि. जोशी ही परिक्रमा घडवून आणतात. प्रगल्भ नजरेने पाहिलेल्या विश्वाचा परिचय आपल्याला करून देतात. पण नकळत. खऱ्या मार्गदर्शकाचे हे द्रष्टेपण किती मौलिक, किती आल्हाददायी! या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिरूप त्यांच्या प्रवासवर्णनपर लेखनातून ठायी गयी दिसते. 

प्रा. रा. भि. जोशी यांचा जन्म हैदराबाद येथे 10 जुलै 1903 रोजी झाला. त्यांचे बालपण हैदराबादमध्येच गेले. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण हैदराबादच्या वैदिक धर्म प्रकाशिकेत झाले - मराठी व संस्कृतबरोबर ते उर्दूही शिकाले. संस्कृत भाषेतील संपन्नता व कर्णमाधुर्य यांबरोबर उर्दूचा गोडवा या दोहोंच्या स्वरमिलाफातून त्यांच्या भाषाशैलीची जडणघडण निराळ्या प्रकारची झाली. बालपणीचे हे भाषासंस्कार, त्यांच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे ठरले. 1911 मध्ये जमरावतीच्या सरकारी हायस्कूलमधून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. विविध विषयांवरचे भरपूर वाचन त्यांनी या काळात केले. त्यांची वाचनाची आवड उत्तरोत्तर वाढतच गेली. या शाळेला उज्ज्वल परंपरा लाभलेली होती. उत्तम शिक्षक त्यांना लाभले होते. लेखनाची आवड त्यांना लहानपणापासूनच होती. ते चिये काढत असत. नित्यनेमाने डायरी लिहीत असत.

मॅट्रिक झाल्यानंतर उमरावतीच्या डेप्युट कमिशनरच्या कचेरीत त्यांनी नोकरी केली, त्यानंतर तेथील डीसीच्या ऑफिसमध्ये ते कॉपीइस्ट म्हणजे नकलनवीस होते. दोन वर्षे नोकरी केल्यावर इंदूरच्या होळकर कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. बी. ए. साठी त्यांनी इंग्रजी, संस्कृत व तत्त्वज्ञान हे विषय घेतले होते. त्यांचा हा अध्ययनकाळ अत्यंत आनंदाचा गेला. ललित आणि वैचारिक वाङ्‌मयाचे मनसोक्त वाचन त्यांनी या काळात केले. ‘कलकत्ता संस्कृत असोशिएशन’ ची ‘काव्यतीर्थ’ ही संस्कृतची परीक्षा ते 1926 मध्ये उत्तीर्ण झाले. केशवसुत, बालकवी आणि गोविंदाग्रज यांच्या कवितेचा प्रभाव या काळात त्यांच्या संवेदनशील मनावर पडला होता. विठ्ठलराव घाटे यांच्या परिचयामुळे माधव जूलियन आणि गं. दे. खानोलकर यांच्याशी त्यांचे सौहार्द जुळले. या तिघांच्या सहवासामु‌ळे त्यांच्या साहित्यप्रवासाची वाट सुकर झाली. एम. ए. होण्यासाठी ते मुंबईला गेले. पण प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला. पुढे इंग्रजी व मराठी घेऊन ते एम. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.

सुरुवातीच्या काळात (1935 ते 1947) त्यांनी पार्ले टिळक विद्यालयात व बालकमंदिर हायस्कूल, माटुंगा येथे अध्यापनाचे कार्य केले. नंतर दिल्लीला आकाशवाणीत वृत्तविभागात त्यांनी नोकरी केली. ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस, मुंबई येथे प्रसिद्धी विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. 1947 ते 1953 या काळात सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनोमिक्समध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले. 1955 ते 1961 मध्ये त्या महाविद्यालयात ते विभागप्रमुख होते. 1961 ते 1964 च्या दरम्यान महाडच्या आंबेडकर कॉलेजच्या प्राचार्यपदाची धुरा त्यांनी सांभाळली. 20 जून 1964 पासून पुन्हा सिद्धार्थ कॉलेजमध्ये त्यांनी अध्यापन सुरु केले. इंग्रजीचे नामवंत प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकिक पसरला.

‘वाटचाल’ (1953), ‘मजल दरमजल’ (1961), ‘उथव’ (1974) आणि ‘घाटशिळेवरी उभी’ (1984) ही त्यांची चार प्रवासवर्णनात्मक पुस्तके. या सर्व पुस्तकांत एकूण 74 लेख आहेत - ही संख्या तशी फार मोठी नव्हे; पण गुणात्मक दृष्ट्या हे लेखन मौलिक स्वरूपाचे आहे. या वर्णनशैलीत स्थळाचा इतिहास, परंपरा आणि तेथील कलाविशेष साऱ्या रंगरेषांसह साकार होतात. त्या त्या परिसराच्या संचिताचा तो आलेख असतो आणि सौंदर्यपूर्ण आलोक असतो. सर्व संवेदना जागृत ठेवून रा. भि. जोशी यांनी तन्मयतेने घेतलेला तो सौंदर्यशोध असतो. प्रसन्न शैली आणि अभिजातता है गुणविशेष त्यांच्या प्रवासवर्णनात्मक लेखनात असतात; पण तिथेच ते लेखन थांबत नाही. भूमी आणि तेथील माणसे यांमधील आंतरिक नात्याचा शोध त्यात असतो. काळप्रवाहाच्या गतीनुसार दृष्टीआड झालेल्या वैभवचिन्हांची चित्रे लेखकाने या पुस्तकांतून रेखाटलेली आहेत.

या लेखकाचे आपला इतिहास आणि आपली परंपरा यांविषयीचे आकलन प्रगल्भ आहे. साहित्य, चित्रकला, मूर्तिकला आणि स्थापत्यशास्त्र यांविषयी त्याला आस्था आहे. लेखक तपशिलाने जे पाहतो, त्यावर भाष्य करीत जातो. त्यामुळे त्याच्या आत्माविष्काराला वाव मिळतो. निसर्गसौंदर्याची विलोभनीय वर्णने या प्रवासचित्रांत आढळतात. सौंदर्यनिष्ठ मनाने हो चित्रे टिपलेली आहेत. मंदिरांच्या आकृतिबंधांविषयी, शिल्पाविषयी, चित्रांविषयी लेखक समरसतेने लिहितो. अनेक वाङ्‌मयीन संदर्भ त्यांच्या वर्णनशैलीत येतात. लेखकाच्या व्युत्पन्नतेचे, श्रुतयोजनकौशल्याचे तसेच रसज्ञतेचे दर्शन येथे घडते. प्रा. रा. भि. जोशी यांच्या आत्मनिष्ठ अभिव्यक्तीचे विलोभनीय इंद्रधनुष्य त्यांच्या प्रवासवर्णनांतून अनुभवायला मिळते.

करताना ते ‘वाटचाल’ या पुस्तकात 17 लेख आहेत. स्थूलमानाने तीर्थक्षेत्रे, शहरे, खेडी, माणसे, पशुपक्षी, नद्या, पाने-फुले, समुद्र आणि समृध्द्ध सृष्टिवर्णन यांमध्ये रा. भि. जोशी रमून जातात. आंबेजोगाई, ‌गोकर्ण, नरसोबाची वाडी, हरिद्वार यासारख्या स्थळांविषयी लिहिताना ते त्या स्थळांचा इतिहास, त्याच्याशी निगडित असलेल्या कथा, आख्यायिका समरसून सांगतात. ते वाचत असताना वाचक नकळत भूतकाळात शिरतो. दिल्ली, लाहौर, इंदूर व उज्जैन या स्थळांची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली जाते. येथे त्यांची बहुश्रुतता प्रत्ययास येते. त्यांच्या लेखांची शीर्षकेही त्यांच्या अनुभूतीतील लय समर्पकपणे अधोरेखित करणारी आहेत.

‘मजल दरमजल’ या पुस्तकात प्रा. रा. भि. जोशी यांनी संवेदनशील वृत्तीने, डोळसपणे केलेला प्रवास दिसतो. दिल्ली, मथुरा, अयोध्या, धनुष्कोडी, पैठण, देवगिरी, ऋद्धिपुर, तुळजापूर, पुसद, वाशिम, अकोट, गाणगापूर, माणिकपूर, पंढरपूर, वाई, औंध, कऱ्हाड, मुंबई आणि पुणे या स्थळांसंबंधीचे आहेत. कालप्रवाहाशी टक्कर देत देशातली सत्त्वधारा चिरंतन ठेवणाऱ्या सांस्कृतिक स्थळांची ही परिक्रमा. दिल्ली, मुंबई आणि पुणे हे भारताच्या आधुनिक जीवनातले मानबिंदू आहेत. त्याचबरोबर त्यांना सांस्कृतिक वारसादेखील आहे. हे सारे जोशी यांच्या डोळ्यांनी पाहणे हा सुखद अनुभव आहे.


हेही वाचा - वनस्पतिकुळातील माणूस (पक्षीतज्ञ मारुती चितमपल्ली यांचा व्यक्तिवेध) - सोमनाथ कोमरपंत


‘उथव’ या पुस्तकात 19 लेख आहेत. कोकणातील हिरवागार प्रदेश प्रा. रा. भि. जोशी यांना अतिशय प्रिय आहे. ‘जिथे उथव येतो’, ‘महाबळेश्वर : भिजरे आणि हसरे’, ‘त्रिपुट आणि तत् चित्तपावनं क्षेत्रम्’ या लेखांतून त्यांनी त्या त्या प्रदेशाचे अंतरंगदर्शन रूप, रस, गंध, स्पर्श, नाद आदी संवेदनांच्या साहाय्याने घडविले आहे. त्यांच्या निसर्गसौंदर्याच्या वर्णनात ताजेपणा व टवट‌वीतपणा आहे. केळशी, आंजर्ले, मुरुड आणि गुहागर येथील निसर्गाचे गुणवैभव अधोरेखित करीन असताना त्या परिसराने दिलेल्या कर्तृत्ववान माणसांकडे अंगुलीनिर्देश करायला प्रा. रा .भि. जोशी विसरत नाहीत. निसर्गसौंदर्य, माणसांची जीवनशैली आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा अशा त्रिमितिदर्शनाने वाचकाचे मन प्रफुल्लित होते. केरळच्या निसर्गाची चित्रे जोशी यांनी कलात्मक ताकदीने रेखाटली आहेत-’बिबिंकासाठी’ आणि ‘मुइतु ओब्रिगाद’ हे गोव्याविषयीचे त्यांचे लेख त्यांच्या सौंदर्याभिरुचीवर प्रकाश टाकतात - मेघमेदुर दिल्ली’ या लेखात दिल्लीच्या पावसाळ्याचे वर्णन आहे ‘तेप्पा देखून जा’ मध्ये म्हैसूर परिसरातील धार्मिक स्थळांच्या भ्रमंतीचे वर्णन केलेले आहे. ‘तें ऋद्धिपुर देखिलें पुनरपि’ मध्ये महानुभाव पंथातील गोविंद‌प्रभूंच्या ऋद्धिपूरचे वर्णन केलेले आहे. वाराणसीच्या धार्मिक परिसराचे आणि सांस्कृतिक परंपरेचे त्यांनी दर्शन घडविले आहे. ‘कांतिमत स्वर्गखण्ड’मध्ये काश्मीरच्या निसर्गसौंदर्याचे वर्णन त्यांनी समरसून केले आहे. 

‘घाटशिळेवरी उभी’ हा जोशी यांच्या परिणतप्रज्ञ मनाचा आलेख. त्यांच्या अभिरुचिसंपन्न व्यक्तिमत्त्वाला वाङ्‌मयाबरोबरच संगीत, चित्र, शिल्प यांविषयी किती ओढ वाटते हे अधोरेखित करणारे हे लेखन. वेरुळच्या कैलास लेण्यांतील चित्राकृतींचा त्यांनी तन्मयतेने आस्वाद घेतलेला आहे. ‘रोजनिशी भुवनेश्वरची’, ‘रोजनिशी औरंगाबादची’ व ‘रोजनिशी रत्नागिरीची’ हे लेख त्यांनी दैनंदिनीच्या आकृतिबंधात लिहिलेले आहेत. अन्य लेखांप्रमाणे ही केवळ स्थलवर्णने नाहीत. त्या स्थळाशी निगडित असलेल्या विभूतींचा आणि कृतिशील व्यक्तींचा ते आवर्जुन उल्लेख करताना आपके प्रा.रा. भि. जोशी यांनी समानधर्म स्नेही आणि नामवंत पक्षितज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांच्या सहाय्याने नवेगावबांधच्या रमणीय परिसराला भेट दिली.त्या दिवसांच्या आठवणी त्यांनी दूरदेशचे पाहुणे या लेखात लिहिका आहेत. ‘काळे शिवारत्न’ मध्ये जोशी यांनी तांबडी सूर्व येथील शिवमंदिराच्या शिल्पाचे नितांत रमणीय चिम रेखाटले आहे. ‘काळ्या दगडाचे पैलूदार शिखराचे ते सुबक सुंदर मंदिर म्हणजे भोवताळ्या हिरव्या झाडीच्या कोंदणातील काळे शिलारत्न आहे.’ असे ते उद्‌गारतात. 'गोवे सदैव सुंदर राहो?' हा त्यांचा लेख गोव्याविषयी त्यांच्या मनात असलेल्या ममत्वाचा द्योतक आहे. गोमंतकीयांच्या नैसर्गिक ऐश्वर्याचा, कलाभिरुचीचा आणि सौंदर्दृष्टीचा त्यांनी गौरवपूर्वक उल्लेख केलेला आहे, पण अलीकडच्या काळात भौतिक समृध्दीच्या धबडग्यात येथील पर्यावरणाचा समतोल ढळत चाललेला आहे याविषयीची खंतही त्यांनी प्रकट केलेली आहे.

प्रा. रा. भि. जोशी यांची प्रवासवर्णनात्मक पुस्तके वाचताना त्यांच्या सदभिरुचिसंपन्न व्यक्तिमत्वाचा अमीट ठसा आपला मनावर उमटतो. त्यांच्या प्रगल्भ, गंभीर, संयमी, संयमी, सुसंस्कृत आणि अभिजात मनाचे सांस्कृतिक प्रतिबिंब या लेखनात पुरेपूर दिसून येते. आपल्या चलतच्चित्रपट त्यांनी ज्या सुजाण वृत्तीने उलगडून दाखविलेला आहे, त्याचे पुनर्दर्शन घेताना आपण अंतर्मुख होतो. मराठीत प्रवासवर्णनपर लेखन करणाऱ्या गोडसेभटजी, अनंत काणेकर, काकासाहेब कालेलकर, पं. महादेवशास्त्री जोशी, पु.ल.देशपांडे, प्रभाकर पाध्ये, प्रा. गंगाधर गाडगीळ आणि अलीकडच्या मीना प्रभू यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखक-लेखिकांच्या मालिकेत प्रा. रा. भि. जोशी यांचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे- त्यांच्या काव्यात्म आणि चिंतनशील शैलीविषयीचे विवेचन हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. याशिवाय कथाकार, अनुवादक आणि समीक्षक आणि मनस्वी प्रज्ञावंतांची आणि प्रतिभावंतांची तितक्याच मनस्वीपणे व्यक्तिचित्रे रेखाटणारा सर्जनशील लेखक हेदेखील प्रा. रा. भि. जोशी यांच्या वाङ्‌मयीन व्यकिमत्त्वाचे तेजोमय पैलू आहेत.

- डॉ. सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा.
somnathpant@gmail.com
(लेखक गोवा विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख, ज्येष्ठ समीक्षक आणि मराठी साहित्याचे प्राध्यापक आहेत.)

Tags: मजल दरमजल प्रवासवर्णन प्रवासचित्रे प्रवासलेख महाराष्ट्र प्रवास भारत प्रवास लोक Load More Tags

Add Comment