मराठीत आगळीवेगळी शैली आणि आगळे वेगळे विषय यासाठी प्रसिद्ध असलेले दत्तप्रसाद दाभोळकर यांनी विज्ञानातील संशोधनाच्या क्षेत्रांतून निवृत्ती घेतल्यानंतर स्वामी विवेकानंद हे आपल्या अभ्यासाचे मुख्य क्षेत्र बनवले. त्यांना समजलेले विवेकानंद अर्थातच आगळे वेगळे होते. ते सांगण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात शेकडो व्याख्याने दिली. त्याच प्रक्रियेतून त्यांनी 'शोध स्वामी विवेकानंदांचा' आणि 'विवेकानंदांची खरी ओळख' ही दोन पुस्तके लिहिली. ती प्रचंड लोकप्रिय झाली, त्यांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. मात्र नव्या पिढीला लवकरच, म्हणजे कुमार व युवा कालखंडातच विवेकानंद समजले पाहिजेत म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
विवेकानंदांच्या आयुष्याचा प्रवास आपण समजून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक गोष्ट करू या. यश मिळवण्यासाठी माणसाला कोणते चार मंत्र माहीत असावे लागतात, ते प्रथम सांगतो. विवेकानंदांनी ते कुठे कुठे आणि कसे कसे वापरले, हे मग मी तुम्हाला न सांगता, त्यांचं चरित्र वाचताना तुम्हीच मला समजावून द्याल!
1
तुमचा अभ्यास परिपूर्ण हवा; पक्का हवा; प्रचंड हवा; तुमचा पाया मजूबत हवा. ‘मजबूत पाया’ म्हणजे विषय समजून घेणं. विषय समजून घेणं, म्हणजे पाठांतर नव्हे. विषय समजून घेतल्यावर पाठांतर ठीक आहे. म्हणजे विषयाची तुमच्या मनात बसलेली पक्की बैठक, म्हणजे मनातला एक; पाठांतर वगैरे त्याच्यावर चढवलेली शून्यं. पण मुळात, तुमच्याकडे हा एक हवा.
म्हणजे विषय समजून घेताना मनाची पूर्ण एकाग्रता हवी. अर्जुनाला जसा पक्ष्याचा तो डोळा सोडून काहीच दिसत नव्हतं, तसं किंवा विवेकानंदांनी एका पत्रातून आपल्या शिष्यांना सांगितलंय, ‘मी जेव्हा वाचत असतो, तेव्हा माझं मन एवढं एकाग्र असतं की, माझ्या मानेवर त्या वेळी कोणी जळता निखारा जरी ठेवला, तरी मला कळणार नाही’. अभ्यास करताना ‘मनाची एकाग्रता’ ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती प्रयत्नसाध्य गोष्ट आहे. अभ्यास करताना आणखी एक गोष्ट नक्की करा. विषय समजला नसताना, म्हणजे पूर्णपणे समजला नसताना, ‘समजलाय’ अशी मनाची आणि इतरांचीही खोटी समजूत करून देऊ नका. गोरा कुंभार यांनी ‘मडकं कच्चं की पक्कं’ हे मडक्यावर एक थाप मारून सहजपणे सांगितलं होतं. तुम्हाला विषय नीट समजलाय की वरवरचा, हे पाहण्यासाठी एक सोपी गोष्ट करा. विषय समजला असेल, तर तुम्हाला तो समोरच्या माणसाला साध्या-सोप्या शब्दांत समजावून देता आला पाहिजे. आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र अशा कुणालाही विषय समजावून देणं, ही तुमची उजळणी आहे. विषय समजावून देताना किंवा इतरांशी बोलतानाही उगाच भले मोठे, पल्लेदार शब्द वापरू नका. वीर सावरकरांनी सांगितलंय, ‘शब्दांतला गोंधळ हा विचारांतल्या गोंधळाचाच निदर्शक असतो’ आणि विवेकानंदांनी आपल्या शिष्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय, ‘माझं यश हे माझ्या साध्या, सोप्या, सरळ प्रवाही भाषेमुळे मला मिळालंय’
वर जे सांगितलंय, ते तर तुम्ही करालच, पण आजच्या काळात पक्की तयारी इथे थांबत नाही; इथून सुरू होते. विवेकानंदांनी 125 वर्षांपूर्वी अमेरिकेतून आपल्या भारतातल्या शिष्यांना पत्र पाठवून सांगितलं होतं, ‘तुमची मातृभाषा महत्त्वाची आहे; फार महत्त्वाची आहे. मात्र तुम्हाला जगभर नव्हे, अगदी भारतभर हिंडायचं असेल, तर संस्कृत आणि इंग्रजी या दोन्ही भाषा ढाल आणि तलवार म्हणून तुमच्या हातात हव्यात’. आज संस्कृतची जागा हिंदीने घेतली आहे. आज अगदी आपल्याच देशाच्या लोकसभेत तुम्हाला बोलायचं असेल, तर मराठीत बोलून काही फायदा नाही. हे असं नको होतं, हे खरं, पण हे असं आहे आणि ही परिस्थिती काही तुम्ही आणि मी बदलू शकत नाही. तुम्हाला हिंदीत आणि इंग्रजीत बोलता आलं पाहिजे. दुर्दैवाने आज ही या देशातली पूर्वअट आहे. जे आपण बदलू शकत नाही, ते स्वीकारून आयुष्यात सहजपणे पुढे जायचं असतं. हिंदीत आणि इंग्रजीत तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, असं नाही, मात्र सहज-साध्या-सोप्या प्रवाही भाषेत हिंदीत आणि इंग्रजीत संवाद साधता आला पाहिजे. ही अगदी सहज-सोपी, फार कमी वेळात प्रयत्नसाध्य गोष्ट आहे. ‘असे संवाद साधण्याची कला आम्हाला शिकवा’ म्हणून शाळेत हट्ट धरा आणि भोवतालचं कोणी असं काही करणार नसतील, तर एकलव्याला आठवा!
हेही वाचा : विवेकानंद आणि टागोर या दोघांशी मैत्र साधणारा स्कॉटिश - रामचंद्र गुहा
भोवतालचं जग झपाट्याने बदलतंय. विषयावरची पक्की पकड आणि हिंदी-इंग्रजी भाषेत सहजपणे संवाद यांवर आज भागणार नाही. आजचं युग संगणकाचं आहे; तंत्रज्ञानाचं आहे. ‘संगणक म्हणजे स्मार्टफोन आणि मी स्मार्टफोन वापरतो, म्हणजे मला संगणक हाताळता येतोच’ या खोट्या भ्रमात राहू नका. तुमचं काय होतंय, ते सांगू का? एका खेड्यात काही मित्र राहत होते. त्यांच्यापैकी पांडू नावाचा एक मुलगा दोन-तीन वर्षं मुंबईला राहून परत आला. मित्रांनी विचारलं, ‘‘पांडू, तू तिथे काय शिकलास?’’ पांडू म्हणाला, ‘‘इंग्रजी भाषा पूर्णपणे शिकून आलोय’’ मित्र म्हणाले, ‘‘पांडू, हे बघ, आज गावात आलेलं इंग्रजी वृत्तपत्र. ते आम्हाला वाचून दाखव’’ पांडू म्हणाला, ‘‘त्यात काय आहे!’’ आणि त्याने समोरचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’ हे वर्तमानपत्र अगदी सुरुवातीपासून वाचायला सुरुवात केली. त्याने कसं वाचलं माहीत आहे? टी-आय-एम-इ-एस-ओ-एफ अशी चक्क मुळाक्षरं वाचली! त्याचं इंग्रजीचं शिक्षण त्याने मुळाक्षरं शिकून संपवलं होतं! आणि ‘आता आपल्याला इंग्रजी येतं’ असं तो समजून चालला होता. संगणक, कॉम्प्युटर या गोष्टींबाबत असं करू नका. तुमची बैठक पक्की हवी. म्हणजे हिंदी-इंग्रजीत संवाद करता यायला हवा आणि संगणकावर मजबूत पकड हवी. जेव्हा संगणक तुमचा मित्र बनतो, त्या वेळी भोवतालचं अफाट विश्व तुमच्या छोट्या मुठीत बंदिस्त होतं.
2
म्हणजे पहिली गोष्ट - आज गरजेचा असलेला अभ्यास पक्का हवा. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे - तुमचा आत्मविश्वास. ‘ज्याची हिंमत हरली नाही, तो आयुष्यात कधीच हरत नाही’ हे लक्षात ठेवा. ‘माझ्याकडे हे नाही, ते नाही; भोवतालची परिस्थिती एवढी वाईट आहे’ असले विचार चुकूनही मनात आणू नका. तुमच्या मनात तुमच्याबरोबर कायम हवी, हेलन केलर. ही बाई आंधळी होती, बहिरी होती, मुकी होती. यांतली एकही गोष्ट स्वत:जवळ नसल्याची तुम्ही कल्पना केलीत, तरी तुम्ही मनातून कोलमडाल. पण ही बाई म्हणाली, ‘अरे वा! माझ्याकडे स्पर्शज्ञान आहे. मी शिकू शकते.’ ती केवळ शिकली नाही, रवींद्रनाथ टागोरांच्या ओठांवरून बोटं फिरवून तिने त्यांच्या कविता समजून घेतल्या. मरणापूर्वी ती काय म्हणाली, माहीत आहे? ती म्हणाली, ‘‘हे जग किती सुंदर आहे!’’
तुमचा आत्मविश्वास, तुमची हिम्मत हे गुण कायम तुमच्याबरोबर हवेत. लोक काय म्हणतात, याची अजिबात काळजी करायची नाही. महत्त्वाची गोष्ट फक्त एक - ‘आपण करतोय ते बरोबर’ हे एकदा मनाला पटलं पाहिजे. मग ‘हसतील त्याचे दात दिसतील’ म्हणून रुबाबात, आपल्या तंद्रीत, आपल्या मार्गावरून हत्तीसारखं डौलात चालत राहायचं. भोवतालची कुत्री भुंकणार. त्यांना भुंकू देत. मनात बाळ ध्रुव आणा. राजवाडा सोडून 'मी अढळपद मिळवणारच’ म्हणून बाहेर पडलेला; भोवतालचे सारे त्याला त्या वेळी हसले असणार. आपले रामशास्त्री प्रभुणे म्हणजे, माहुलीसारख्या खेड्यात पाणी भरणारा, राम्या नावाचा, सात-आठ वर्षांचा एक पाणक्या! त्याने मनावर घेतलं. पायी चालत काशीला गेला; पंधरा वर्षं तपश्चर्या केली; परत आला, तो पेशव्यांच्या दरबारातला प्रमुख न्यायाधीश म्हणून!
तुमच्या अभ्यासाच्या बैठकीएवढाच तुमचा आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. संकटाकडे डोळे वटारून पाहण्याएवढा आत्मविश्वास तुमच्याकडे हवा.
हा आत्मविश्वास आपण आपल्या मनात कसा रुजवायचा, हे विवेकानंदांनी एके ठिकाणी सांगितलंय. विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेसाठी अमेरिकेला जाण्यापूर्वीची गोष्ट. विवेकानंदांनी घर सोडलं होतं; वराहनगर मठ सोडला होता. ‘भटका संन्यासी’ म्हणून ते भारतभर हिंडणार होते; हा सारा देश समजून घेणार होते. मात्र ते हिंडायला लागले आणि पहिल्या काही दिवसांतच त्यांच्यावर अचानक एक मोठं संकट आलं. एका खेड्याबाहेरच्या पायवाटेने विवेकानंद दुसऱ्या खेड्यात चालले होते. पायवाटेच्या दोन्ही बाजूला दाट झाडी होती. पाठीमागून जोरात आवाज येत असल्याने विवेकानंदांनी मागे वळून पाहिलं. पाठीमागून माकडांचा एक आडदांड कळप येत होता. कळपाच्या पुढे होता, एक बलदंड हुप्प्या! तो ओरडत होता. ‘हा कळप आपल्याला पकडणार’ म्हणून विवेकानंद झपाट्याने चालायला लागले. त्यांनी मागे पाहिलं, तर तो कळपसुद्धा झपाट्याने येत होता. ‘तो कळप आता आपल्याला पकडणार’ असं त्यांना वाटलं. ते घाबरून पळायला लागले आणि तेवढ्यात समोरून आवाज आला, ‘‘साधू महाराज घाबरलेत वाटतं!’’ समोरून एक म्हातारा शेतकरी येत होता. तो म्हणाला, ‘‘साधू महाराज, असं घाबरून कसं चालेल! मागे वळा, डोळे रोखून त्या हुप्प्याकडे बघा, हातवारे करत जोरात ओरडा; तो कळप पाठीमागे वळून पळायला लागेल’’ विवेकानंदांनी लिहिलंय, ‘त्या शेतकऱ्याने मला आयुष्यातला सर्वांत मोठा धडा शिकवला. ‘भ्याला तो मेला!’ संकट बाहेर नसतं; तुमच्या मनात असतं. पराभवसुद्धा तुमच्या मनात असतो. सोनं अग्नीची वाट पाहत असतं. त्याच्या दृष्टीने स्वत:ची झळाळी मोठी असल्याचं साऱ्या जगाला दाखवण्याची ती एक मोठी संधी त्याच्याकडे आलेली असते.’ म्हणजे तुमची तयारी महत्त्वाची आहे आणि त्याला आत्मविश्वासाची जोड हवी.
3
मात्र यश मिळवायचं असेल, तर केवळ तयारी आणि आत्मविश्वास पुरेसा नाही. तुम्ही अस्वस्थ होऊन संधीच्या शोधात हिंडलं पाहिजे. लोकांनी तुम्हाला ‘संधिसाधू’ म्हटलं तरी चालेल. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा :
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः
म्हणजे हरिण काही सिंहासमोर जाऊन ‘तू मला खा’ असं म्हणत नाही. सिंहाला सारी ताकद पणाला लावून त्याच्यामागे पळावं लागतं. सिंहाची ताकद आणि ‘आपण त्याला पकडूच’ हा त्याचा आत्मविश्वास या दोन गोष्टी महत्त्वाच्या; पण त्या पुरेशा नाहीत. हरणाला शोधणं आणि सारी ताकद पणाला लावून त्याच्यामागे जिवाच्या आकान्ताने पळणंही महत्त्वाचं!
पुन्हा थोडं आपल्या विवेकानंदांकडे जाऊ या. तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे - सर्वधर्म परिषदेत फक्त पाच मिनिटं दिलेल्या भाषणाने विवेकानंदांचं नाव एका क्षणात जगभर आदराने घ्यायला सुरुवात झाली. ते पाच मिनिटांचं भाषण म्हणजे एक अद्भुत चमत्कारच होता! पण तुम्हाला फारशी किंवा अजिबात माहीत नसलेली एक गोष्ट आहे. सर्वधर्म परिषद ही त्या वेळच्या अमेरिकेतली नव्हे, तर साऱ्या जगातली एक फार मोठी घटना होती. तीन वर्षं या परिषदेची तयारी सुरू होती. अनेक प्रकारच्या चाचणी परीक्षा घेऊन प्रत्येक धर्मातला प्रतिनिधी निवडला जात होता. त्याला आमंत्रण पाठवलं जात होतं. जाण्या-येण्याचा खर्च, राहण्याची आरामदायी व्यवस्था आणि भरपूर मानधन अशा अनेक गोष्टी या आमंत्रित माणसाला मिळणार होत्या. विवेकानंदांना आमंत्रण नव्हतं! ‘विवेकानंद’ हे नावसुद्धा निवड समितीतल्या कुणीही ऐकलेलं नव्हतं. विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेत भाषण देण्यासाठी जाणं, म्हणजे खेड्यातल्या जत्रेत चमकदार कुस्ती खेळणाऱ्या पैलवानाने परदेशात कुठेतरी ऑलिंपिक सामने असल्याचं ऐकून ‘मलाही ऑलिंपिक सामन्यात कुस्ती खेळायची आहे’ म्हणून ऑलिंपिकच्या मैदानावर जाण्यासारखं होतं.
विवेकानंदांच्या बाबतीतही अगदी तसंच झालं. खूप कष्ट आणि खटपट करून विवेकानंदांनी कसेबसे तिकिटाचे पैसे मिळवले. बोटीचा दीड-दोन महिन्यांचा प्रवास करून ते सर्वधर्म परिषदेच्या स्वागत कक्षात पोहोचले आणि ‘‘मी भाषण द्यायला आलोय’’ म्हटल्यावर त्यांचा अपमान करण्यात आला; त्यांची खिल्ली उडवण्यात आली. स्वागत कक्षात असलेल्या प्रत्येकाने त्यांची चेष्टा केली. त्या वेळी तिथे असलेल्या एका धर्मगुरूने आपल्या भारतातल्या एका मित्राला पत्र पाठवून कळवलं, ‘हा भोंदू माणूस! ‘धर्म आणि भारतातले प्रश्न’ यांची नवी मांडणी करत भारतभर हिंडणारा. आज त्याची फार मोठी फजिती झाली. आता हा काही काळाने अमेरिकेतल्या थंडीने आणि भुकेने व्याकूळ होऊन मरेल...’ हे पत्र तुम्हाला आजही बेलूर मठात पाहायला मिळेल. त्या माणसाचं म्हणणं त्याच्या दृष्टीने बरोबर होतं. कारण त्या वेळी विवेकानंदांच्या खिशात एक दमडीही नव्हती.
मात्र विवेकानंदांच्याबरोबर होता - प्रचंड आत्मविश्वास! ‘आपली तयारी परिपूर्ण आहे’ याची खात्री; आणि ‘आपण योग्य संधी निवडली आहे’ हे लक्षात आल्याने ते मात्र भलतेच खुशीत होते! ते असो. आयुष्यात यश मिळवायचं, तर तीन मंत्र - प्रचंड तयारी, प्रचंड आत्मविश्वास आणि अस्वस्थ होऊन संधीच्या शोधात हिंडणं हे मनावर नीट कोरून घ्या.
4
शेवटची आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘नियती’. नियती म्हणजे काय, ते नीट समजून घ्या. नियती म्हणजे कुंडली नव्हे. नियती म्हणजे भविष्य नव्हे. विवेकानंदांनी भविष्य ठामपणे नाकारलंय. अमेरिकेत भाषण देताना त्यांनी सांगितलं, ‘आकाशात हिंडणारे वायूचे गोळे पृथ्वीवर हिंडणाऱ्या माणसाच्या आयुष्यावर परिणाम करतात, असं समजणं, हा मानवी मनाला झालेला एक रोग आहे. त्या रोगातून स्वत:ची सुटका करा’ आणि दुसऱ्या एका ठिकाणी त्यांनी सांगितलं, ‘तुमचं भविष्य तुमच्या तळहातावरच्या रेषांत नाही, तर तुमच्या मनगटात आहे’
मात्र भविष्य न मानणारे विवेकानंद नियती मानतात. म्हणजे प्रथम ही नियती म्हणजे काय, ते समजून घेऊ या. नियती म्हणजे आपली भगवद्गीता सांगते ते - ‘दैवं पञ्चमम्’- हे दैव म्हणजे नियती. म्हणजे थोडक्यात, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला पाचवा भाग. म्हणजे 20 टक्के गोष्टी तुमचा अभ्यास, आखणी आणि प्रयत्न यांच्या पलीकडच्या असतात आणि केवळ भगवद्गीताच असं सांगते, असं नव्हे, तर आधुनिक विज्ञानातली ‘थिअरी ऑफ प्रॉबेबिलीटी’ म्हणजे ‘योगायोगाचं गणित’ जे सांगतं, ते अगदी नेमकं, ‘डिट्टो’ असंच आहे.
काय आहे हे योगायोगाचं गणित? समजा, तुम्ही शंभर वेळा छाप-काटा केलात, तर पन्नास वेळा छाप आणि पन्नास वेळा काटा असं होणार. अगदी थोडंफार, ‘उन्नीस-बीस’ म्हणजे 47-48 वेळा छाप-काटा असं फार तर काही वेळा होईल! मात्र मध्यंतरी केव्हातरी ओळीने पाच-सहा वेळा छाप किंवा ओळीने पाच-सहा वेळा काटा असंही होणार. ही नियती अशी आहे.
हेही वाचा : विवेकानंद आणि इस्लाम - दत्तप्रसाद दाभोळकर
म्हणजे तुमच्या आयुष्यात मध्येच केव्हातरी ही नियती येणार. ‘तुम्ही काहीही करू शकणार नाही’ अशी परिस्थिती अगदी नकळत निर्माण करणार. एका क्षणात होत्याचं नव्हतं होणार. भोवतालची हिरवळ, बाग वगैरे नाहीसं होऊन भोवताली असेल - वैराण, रखरखतं वाळवंट किंवा तुमच्या हातात असलेल्या मोत्यांचे बनलेले असतील गारगोटे! अशा वेळी धीर अजिबात सोडायचा नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात असं केव्हातरी एकदा घडतंच. अशा वेळी मन शांत हवं; हिंमत शाबूत हवी. आपले पाय जमिनीवर घट्ट रोवलेले हवेत. ‘हेही दिवस जाणारच’ हा ठाम विश्वास मनात हवा.
कारण दैव किंवा योगायोगाचं गणित सांगतं, याच्या अगदी पूर्णपणे उलट तुमच्या आयुष्यात एकदा घडणार! म्हणजे शंभर वेळा छापा-काटा करताना ओळीने पाच-सहा वेळा काटा पडला, तर पुढे एकदा ओळीने पाच-सहा वेळा छाप पडणारच; असं हे आहे. केव्हातरी एकदा बघता बघता समोरच्या वाळवंटाचं फुलबागेत रूपांतर होणार. भोवताली काटे नसतील, तर असतील फुलांच्या पायघड्या! हातातल्या वाळूचे मोती बनलेले असतील.
स्वत:च्या हातात अजिबात नसलेल्या अशा या दोन गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात घडतातच. कोणती गोष्ट आधी घडेल आणि कोणती नंतर, हे सांगता येणार नाही. तुमच्या आयुष्यात कोणत्या वयात, म्हणजे आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर या दोन गोष्टी घडतील, हेपण सांगता येणार नाही. विवेकानंदांच्या आयुष्यातही अशा दोन गोष्टी घडल्या. एक, महाविद्यालयीन शिक्षण संपत असताना; दुसरी, त्यानंतर नऊ वर्षांनी. विवेकानंद सांगतात, ‘पहिल्या वेळी ‘माझ्यावर आभाळ कोसळलंय’ असं माझ्या भोवतालच्या सर्वांना वाटलं. मला मात्र असं अजिबात वाटलं नाही. माझे पाय जमिनीवर घट्ट रोवलेले होते आणि ‘ये भी दिन जायेंगे’ यावर माझा पूर्ण विश्वास होता आणि दुसऱ्या वेळी तर ‘भगवान देता है, तो छप्पर फाड के देता है।’ असा प्रकार होता. मात्र त्या वेळीही माझं डोकं माझ्या मानेवर घट्ट बसलेलं होतं. हवेत उडत नव्हतं!’
विवेकानंदांच्या आयुष्यातले हे दोन प्रसंग कोणते? विवेकानंदांचं चरित्र समजून घेताना हे सारं तुम्हाला समजणार आहे...
- दत्तप्रसाद दाभोळकर
dabholkard155@gmail.com
'मुलांसाठी विवेकानंद' हे पुस्तक अॅमेझॉनवरून खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
Tags: स्वामी विवेकानंद सर्वधर्मपरिषद मराठी साहित्य नवी पुस्तके साधना प्रकाशन बालसाहित्य बालवाङ्मय मुलांसाठीची पुस्तके युवा Load More Tags
Add Comment