विनोदातून आत्मपरीक्षण करायला लावणारी ‘टपालकी’ 

सॅबी परेरा लिखित 'टपालकी' या पुस्तकाचा परिचय 

जीवनाच्या छोट्या-छोट्या प्रसंगांतून सकारात्मक गोष्टींचा शोध घेऊन त्यांतून आयुष्यातील खरा आनंद शोधण्याचा उपदेश आजवर बऱ्याच तत्त्वचिंतकांनी केलेला आहे... परंतु याच लहानसहान प्रसंगांतून विनोदी अंगाने टिप्पणी करत त्याद्वारे दैनंदिन जीवनातील समस्यांपासून जागतिक समस्यांपर्यंत भिडण्याचा एक अभिनव प्रयोग लेखक सॅबी परेरा यांनी ‘ग्रंथाली’कडून  प्रकाशित झालेल्या ‘टपालकी’ या पुस्तकाद्वारे केला आहे. गेली वर्षभर 'लोकसत्ता' दैनिकाच्या चतुरंग पुरवणीमध्ये दर पंधरवड्याला ‘टपालकी’ याच नावाने प्रसिद्ध झालेल्या सदरातील लेखकाच्या निवडक पत्ररूपी लेखांचा हा संग्रह आहे. 

‘टपालकी’ या शीर्षकाला अभिप्रेत असलेला पत्रलेखनाचा ढाचा या पुस्तकात वापरलेला आहे. ही 31 पत्रे पाठवली आहेत सदू धांदरफळे यांनी दादू गावकर यांस. पत्रलेखक सदू व पत्रवाचक दादू ही दोन्हीही काल्पनिक पात्रे असली तरीही लेखकाच्या मनातील दोन भावनांना दिलेली ती मानवी रूपे आहेत. एकीकडे आहे आधुनिक जगापासून दूर गावात राहणारा आणि शहरी जीवनाची कधीतरी लालसा दाखवणारा निरागस दादू, दुसरीकडे शहरातील धकाधकीच्या जीवनात रममाण झालेला, वैश्विकीकरणाचा चमचमाट दिवसरात्र अनुभवणारा आणि तरीही आपले ग्रामीण स्वत्व जिंवत ठेवणारा सदू. 

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कळत-नकळतपणे आपल्याकडून आणि आपल्या आवतीभोवतीच्या प्रत्येक व्यक्तीकडून घडणाऱ्या प्रत्येक कृतीचे अवलोकन सदू करतो. त्यातून त्या कृतीतील व्यंग तो शोधून काढतो. एखाद्या आरशात आपले स्वच्छ प्रतिबिंब दिसावे तितका या प्रत्येक समाजघटकाचा वास्तवदर्शी चेहरा तो आपल्या शब्दकुंचल्याने रेखाटतो आणि हलक्याफुलक्या विनोदांच्या रंगाने ते शब्दचित्र रंगवून दादूसमोर ठेवतो. 

उठल्या-उठल्या मॉर्निंग वॉकला जाणारा सदू ‘आपण काही तितकेसे पुरोगामी नसल्याने बिनधास्तपणे वॉकला जाऊ शकतो...’ असे म्हणत सहजपणे या जगात पुरोगामी लोकांचा घात करण्यासाठी पदोपदी दबा धरून बसलेल्या प्रतिगामी विचारांवर भाष्य करून जातो. आजकाल प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात मोबाईल फोन उघडून त्यांतील व्हॉट्‌सअ‍ॅप मेसेजेस, फेसबुक-ट्विटरवरील लाइक्स आणि कमेंट्स पाहण्याने होते. हातात स्मार्ट फोन असलेला निरक्षर ते भरभरून लिहू शकणारा विद्वान हे सर्वच या जीवनशैलीचे भाग झालेले आहेत... परंतु तंत्रज्ञानाचे हे जग इतके रंगीबेरंगी आहे की, त्यात इलेक्ट्रिक वस्तूंत अडकलेल्या आपल्या स्वातंत्र्याकडे आपण स्वतःच दुर्लक्ष केलेले आहे. एखाद्या परिषदेत भाषण करताना स्वतःची विद्वत्ता दर्शवण्यासाठी पतंजलीचा करेला ज्यूस प्यायल्यासारखा चेहरा करणारे विद्वान आणि सहज मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत व्हॉट्‌सअ‍ॅप मेसेजेस फॉरवर्ड करण्यात व्यग्र झाल्यामुळे आपल्या सर्वसामान्य जबाबदारी विसरलेले सामान्य नागरिक अशा सर्वांनाच आपल्या कृत्रिम मुखवट्यामागील खरा चेहरा लेखक या पत्रांद्वारे दाखवून देतात.

गप्पांच्या ओघात लेखक भारतातील प्राचीन भाषांवर बोलू लागतात. आपल्याकडे मागधी, अर्धमागधी, शौरसेनी, पैशाची अशा काही भाषा अस्तित्वात होत्या. लेखकाच्या मते त्यांतील आजवर टिकलेली भाषा म्हणजे ‘पैशाची’. असा गमतीदार शब्दश्लेष साधत पुढे लेखक भागबाजारातील व्यंगावर आपल्या दिलखुलास शैलीत भाष्य करतात. आपल्या शैलीत असे असंख्य श्लेष साधत वाचकांना सुखावतील असे मुद्दे लेखकाने सादर केले आहेत. गणतंत्र दिवसापासून गण (Gun) तंत्रातून आणलेली लोकशाही, हेलीकॉप्टरशिवाय न राहू शकणारे परंतु आज देशोधडीला लागलेले ‘मल्ल’, तुरुंगाच्या ‘सहाऱ्याला’ लागलेले भांडवलदार... अशा किती औपरोधिक रचना सांगाव्यात!

निवडणुकीच्या काळात पैशाला गुरुत्वाकर्षणाचा नियम लागू होतो आणि तो वरून खाली वाहू लागतो. आपली शिक्षणव्यवस्था म्हणजे तोंडाने शेपूट पकडू पाहणाऱ्या कुत्र्याप्रमाणे त्याच जागी गोल गोल फिरत आहे...  यांसारखे मर्मभेद साधत लेखक राजकारण ते शैक्षणिक संस्था या सगळ्यावर हल्ला चढवतात. अगदी त्याच वेळी विद्यार्थ्यांना इतरांची वेदना वाचायला शिकवण्याची सर्वात जास्त गरज असल्याची अपेक्षा ते व्यक्त करतात. राजकीय व्यवस्थेवर भाष्य करताना अंतरात्म्याचा आवाज न ओळखणाऱ्या राजकारणी मंडळींच्या वृत्तीने सदू हताश होतो. ही परिस्थिती बदलवण्यासाठी खूप महान अशी कामगिरी करणे हे आपल्या क्षमतेबाहेरचे आहे हे ओळखून पत्रलेखनाच्या शेवटी स्वतःला ‘तुझा राजकीय मुकबधिर मित्र’ असे शिर्षक लावणे तो पसंत करतो.

जबाबदार नागरिक घडवण्याच्या बाबतीत ‘सैनिकांना आपल्यासाठी लढावेसे वाटेल इतके जबाबदार नागरिक आपल्याला होता आले तरी तेवढं पुरेसं आहे...’ ही लेखकाची साधीसोपी अपेक्षा खूपच समर्पक वाटते. ‘ओ मितवा रे’ हे या पुस्तकातील सदर तर लेखकाच्या लेखणीचा खरा कस दाखवून जाते. यात मित्रासाठी फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाइडचा मराठी अनुवाद मित्र, तत्त्वज्ञ आणि वाटाड्या... मि-त-वा! अशा शब्दावलीने करत लेखक खऱ्या मैत्रीवर भाष्य करतात.

दिवाळीची आठवण करताना लेखकाने खूपच वास्तविक भावना प्रकट करत दिलेला शेरा, ‘भाकरीचा चंद्र शोधायला आपण रॉकेट घेऊन निघालो आणि बालपणीची आवडणारी दिवाळी मात्र मागे धरतीवरच राहून गेली.’ खूपच गहिरा वाटतो. यथायोग्य नॉस्टॅल्जिक शैलीचा वापर करून वाचकांना हसवता-हसवता लेखक त्यांच्या डोळ्यांच्या कडाही अधूनमधून ओल्या करत राहतात हे विशेष! राजकारण आणि समाजकारण यांपासून ते शिक्षणापर्यंत, मैदानी सामन्यांपासून ते सोशल मिडियाच्या शाब्दिक खेळांपर्यंत सर्वच गोष्टींचा समर्पक वेध लेखक ‘टपालकी’तून घेतो.

प्रचलित व्यवस्थेबद्दल असलेली अस्वस्थता आजवर गमतीदार लेखनाद्वारे अथवा कवितांद्वारे मांडण्याची शैली कित्येक साहित्यिकांनी जोपासली आहे. त्याने मोठी सामाजिक क्रांती होते असे काही दाव्याने म्हणता येणार नाही. खरेतर कधीकधी या शैलीच्या अतिवापरामुळे गंभीर गोष्टी विनोद होऊन बसण्याची भीतीच जास्त असते... परंतु त्याचा समतोल वापर झाल्यास तीच शैली समाजातील बहुजनांच्या मनाची मशागत करण्यास कारणीभूत ठरू शकते. या मशागतीतून क्रांतीच्या ठिणग्या बाहेर पडून कधीकधी त्यातून समाजक्रांती होण्याची शक्यतादेखील अमान्य करता येत नाही. अशाच प्रकारे विनोदबुद्धीचा समतोल वापर सदर पुस्तकात झाल्याने ते आदर्श समाज उभारणीसाठी नक्कीच उपयुक्त ठरते. 

जाणकार वाचकवर्ग विनोदी आणि गंभीर यांतून आपापल्या प्रवृत्तीनुसार योग्य लेखनप्रकार निवडत असतो... परंतु टपालकी वाचताना हा दोन्हीही प्रकारचा वाचक समाधान पावेल... किंबहुना त्याच वेळी त्यांना सदू धांदरफळेच्या पत्रांना उत्तरस्वरूपात आलेल्या दादू गावकरांच्या पत्रांच्या वाचनाची उत्सुकतादेखील लागेल हे नक्की...! 

- मॅक्सवेल लोपीस
maxwellopes12@gmail.com

(लेखक नरसी मोनजी महाविद्यालयात वाणिज्य अध्यापक असून भारतीय संगीताचे आणि गांधी विचारांचे अभ्यासक आहेत.)


टपालकी
प्रकाशन - ग्रंथाली
लेखक - सॅबी परेरा
पृष्ठसंख्या - 163
मूल्य - 250 रुपये

Tags: पुस्तक परिचय टपालकी सॅबी परेरा मॅक्सवेल लोपीस Tapalki Sabby Parera Maxwel Lopes Book Introduction Load More Tags

Comments:

Gurjarpadhye

टपालकी(टवाळकी?) सदरलेख चांगलेच होते .ग्रंथालीने पुस्तकरूपाने काढले हेही छान! फक्त किंमत अंमळ जास्तच आहे हे सांगायलाच हवे.

दीपक पाटील

खट्याळ शब्दांतली पण मर्मग्राही विषयांवर लेखांची मालिका लोकसत्त्ता मध्ये येत होती. तीचं उपयुक्त दस्तऐवज म्हणून प्रकाशन / संरक्षण केल्याबद्दल "ग्रंथाली" चे आभार ! आयुष्यातील कठिण पर्वाला धीराने..हसतमुखाने सामोरे जाण्याचे बळ या लेखांनी सर्वसामान्य भारतीयांना मिळो.

Add Comment