पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील किनारपट्टीवर वसलेल्या 12 गावांत सामवेदी हा समाज पूर्वापर राहत आलेला आहे. पोर्तुगीज काळात या समाजाच्या बहुसंख्य लोकांचे ख्रिस्तीकरण झाल्याने सामवेदी ब्राम्हण आणि सामवेदी ख्रिस्ती असे दोन प्रकार या समाजात पडले. तरीही या दोन्हीही समाजांचे मूळ सामवेदी ब्राम्हणांच्या रामायणीय शाखेशी आणि त्याद्वारे प्रत्यक्ष संगीताचा वेद म्हटलेल्या सामवेदाशी जोडलेले असल्याने त्यांच्या लोकसंगीताबाबत सहज एक कुतूहल निर्माण होणे साहजिकच आहे.
वेदांतील ऋचांचे आलापबद्ध गायन करणारा हा समाज. पौराणिक काळात अगस्ती मुनी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडे आले... त्या वेळी त्यांच्याबरोबर वेदांतील ऋचांचे गायन करणारे या समाजाचे पूर्वज वसईच्या किनारपट्टीत स्थायिक झाले अशी प्रचलित धारणा आहे. पुढे काळाच्या ओघात कृषिसंस्कृतीशी एकरूप होऊन शिक्षण आणि संगीत या दोन्हीही ब्राम्हण समाजाच्या मूळ कर्मांशी त्यांची फारकत झाली.
शास्त्रीय संगीताचा पाया हा लोकसंगीतात बांधलेला असल्याने... तसेच लोकसंगीत हे पिढीजात चालत आले असल्यामुळे मुळात सामगायनाचा वारसा असलेल्या या समाजाचे लोकसंगीत तितकेच समृद्ध असणार असे वाटू शकते... परंतु वास्तव हे आहे की, या समाजाचे लोकसंगीत आज अत्यंत दारिद्र्यावस्थेत आहे. ना त्या संगीतात राजस्थानच्या मांडसारखे वैविध्यपूर्ण राग आहेत... ना विलंबित (संथ) व द्रूत (जलद) लयीत होणारे गायनप्रकार आहेत... त्यामुळे एखाद्या उत्सवात अन्य भाषांतील गीतांवरच त्यांना भागवावे लागते वा स्वतःच्या भाषेत अलीकडे बनलेल्या तर्कहीन गीतांवर ताल धरावा लागतो. दुसरीकडे सामवेदी ब्राम्हण समाज आपल्या सांगीतिक तृप्तीसाठी नाट्यसंगीताचा आधार घेतो.
या सामवेदी ख्रिस्ती लोकसंगीतात ना केरळी कथकलीसारखे समृद्ध नृत्य आहे ना महाराष्ट्राच्या लावणीसारखे एखादे लोकनृत्य... त्यामुळे मनात येतील तशा चित्रविचित्र हालचाली करत नृत्य करावे लागते. वाद्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर कुठले वाद्यही या समाजाच्या संगीताशी निगडित नाही. त्या बाबतीत वसईच्या पूर्वेला डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासींचे लोकसंगीत या सामवेदी समाजापेक्षा समृद्धच म्हणायचे! त्यांच्याकडे तारपा, पुंगी अशी स्वतःची वाद्ये आहेत आणि त्याच्या तालावर धरलेले तारपा नृत्य आहे.
एकूण या समाजाच्या संगीताला ग्रहण लागल्याच्या आजच्या काळात त्या ग्रहणामागची कारणे शोधण्यात फारसा अर्थ नाही. त्यापेक्षा उपलब्ध लोकसंगीतातून दिसणाऱ्या गतकालीन वैभवाच्या खुणा आणि त्यातून भविष्यात होऊ शकणारा या लोकसंगीताचा विकास यांवर लक्ष केंद्रित करणे नक्कीच उपयोगाचे ठरेल.
लोकसंगीताच्या विकासावर लक्ष केंद्रित करायचे कारण व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात 90 टक्के भाग हा लोककलेचा असतो. राजस्थान, कलकत्ता, लखनौ अशा प्रदेशांत लोककलेच्या क्षेत्राचा भरमसाठ विकास झाल्यानेच त्या प्रांतांत अनेक आंतरराष्ट्रीय कलाकार निर्माण झाले... शिवाय लोककलेच्या सूक्ष्म ज्ञानात अभिजात कलेचा डोलारादेखील उभारण्याचे आणि पेलण्याचे विलक्षण सामर्थ्य असते.
सामवेदींच्या दोन्ही समाजांतील लोकसंगीत हे एकाच पायावर आधारलेले असले तरीही सामवेदी ख्रिस्ती समाजाचे लोकसंगीत पोर्तुगीज संस्कृतीशी संकर झाल्याने थोडी वेगळी विशेषता दाखवते. त्यात लोकसाहित्याचा विचार करताना पूर्वापर ब्राम्हण असल्याने श्रावण बाळ, सीता, काशी, नारद अशी हिंदू पौराणिक वर्णने येतात; तर नंतर ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याने येशू, मरिया, पवित्र आत्मा (होली स्पिरीट) अशा बायबलमधील दैवी प्रतिमांवर आधारित भक्तिगीतेदेखील त्यात येतात.
तसेच पवित्र आत्म्यासाठी इस्प्रिसांत, परमेश्वरासाठी सायबा असे अन्य भाषांतील शब्दही त्यात रूढ झालेले आढळतात. पोर्तुगीज फादरांकडून सेक्सोफोन, ट्रम्पेट अशा वाद्यांचा 80-90 वर्षांपूर्वी या समाजात प्रसार झाल्याने आज तीच वाद्ये त्या लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग झालेली आहेत.
(श्रद्धास्थान बदलले तरी भक्तीभाव तोच राहिला. फोटो- सचिन मेंडिस)
सुरांबाबत विचार करताना या लोकसंगीताच्या वैभवाची एक बोथट झालेली खूण मला दिसू लागली. इतर समाजांच्या लोकसंगीताप्रमाणे सामवेदी संगीतदेखील धूनप्रधान आहे. एखाद्या गीतात तीन स्वरांचाच वापर करण्यात येतो... परंतु तेच तीन स्वर जेव्हा दुसऱ्या गीतात वापरले जातात तेव्हा स्वरांचा लगाव असा काही बदलला जातो की, त्या दोन गीतांच्या चालींत तोचतोचपणा जाणवत नाही. (काही लोकसंगीताच्या ध्वनिमुद्रित धून मी खाली दिलेल्या आहेत. आपण हा लेख मोबाईलवर वाचत असाल तर Listen in browser वर क्लिक करून किंवा कॉम्प्युटरवर वाचत असाल तर प्लेच्या चिन्हावर क्लिक करून तुम्हाला या धून ऐकता येतील)
(पेंटिंग सौजन्य - चित्रकार सरोजकुमार रॉड्रिग्ज)
यात लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे 'रमेदाये आये' हे ‘मदर ऑफ रेमेडी’ या ख्रिस्तमाता मरियेच्या एका रूपाला साकडे घालणारे गीत केवळ सा, रे, ग या तीनच स्वरांत बांधलेले आहे आणि त्यातून अपेक्षित भक्तिरस, ममत्वाचा भाव खूपच प्रभावीपणे निर्माण होतो... मात्र त्याच तीन स्वरांना मंद्र सप्तकातील (खालच्या आवाजातील) ध जोडला जातो तेव्हा लग्नप्रसंगात हवा असलेला शृंगार व उत्साह निर्माण होतो.
अशाच प्रकारे मंद्र सप्तकातील नी व मध्य सप्तकातील सा, रे अशा तीन स्वरांचा वापर करून जेव्हा 'दुये सासऱ्या जात्या वेळी' या लग्नप्रसंगातील वधूचे निरोपगीत गायले जाते तेव्हा अपेक्षित विरहाचे वातावरण निर्माण होते... तर सा, कोमल रे, कोमल ग अशा तीन स्वरांची गुंफण करून त्यात योग्य तो कंप देऊन उत्स्फूर्तपणे गायले जाणारे मृत्युगीत भैरवीचे धीरगंभीर वातावरण निर्माण करते आणि जीवनाची सांगता आणि मृत्यू हे एक शाश्वत सत्य असल्याची भावना प्रकट करते. आता ही भावनिर्मिती तसा विचार ठेवल्यामुळे होते की मनुष्याच्या आणि संगीतसुरांच्या नैसर्गिक संबंधातून स्फुरते हादेखील एक कुतूहलाचाच विषय ठरेल...!
यात अजून एक उल्लेखनीय बाब म्हणजे सामवेदी समाजाचे कुठलेही गायन मध्य सप्तकातील म स्वराच्या पुढे जात नाही. तशा अर्थाने ते शास्त्रीय भाषेत पूर्वांगप्रधान गायनच. पोर्तुगीज संगीताच्या प्रभावामुळे 2nd voice ची पद्धत आल्यावर मध्य सप्तकातील म स्वराच्या पुढील स्वरांचा उपयोग या संगीतात होऊ लागला... परंतु तसे संगीत ऐकताना गोव्याच्या संगीताची छाप सहज जाणवते.
भारतीय शास्त्रीय संगीतात स्वरांच्या लगावाला (स्वरांवर दिलेल्या कमीजास्त दाबाला) खूप महत्त्व आहे. स्वरांचे लगाव बदलून एकाच रागात वेगवेगळ्या रचना आपले संगीतकार करत असतात आणि लगावाचा हाच विचार सामवेदी लोकसंगीतात झालेला दिसतो... ज्यामुळे भूप, भैरवी अशा रागांच्या स्वरसंगती असूनही एक वेगळेच अस्तित्व हे लोकसंगीत निर्माण करते... शिवाय काही लोकगीतांत पाच स्वरांचा वापर असल्याने एखादा नवीन राग निर्माण करण्याचे सामर्थ्यही या लोकसंगीतात आहे. (एखाद्या रागात किमान पाच स्वर आवश्यक असतात).
अनेक संक्रमणांचे चटके सोसूनही हे लोकसंगीत आज तग धरून आहे. किंबहुना पोर्तुगीज संगीताचा स्पर्श होऊनदेखील सामवेदी संगीताचा उपजत भाव त्यात दिसून येत आहे. कोण जाणे देवासच्या अशाच लोकसंगीतावर प्रभावित होऊन धूनउगम रागांची रचना करणारे कुमार गंधर्वांसारखे प्रयोगशील गायक या सामवेदी लोकसंगीताच्या प्रभावाने भविष्यात अजून काही धूनउगम रागांची देण आपल्या भारतीय संगीताला देतील!
...परंतु याहीपलीकडे संगीतातून वैश्विक बंधुभाव जोपासण्याचा विचार या संगीताच्या अभ्यासातून मिळतो. सामवेदी ब्राम्हण समाजात बाळासाठी गायीकडून दुधाची मागणी करणाऱ्या मूळ गीतात ख्रिस्ती समाजात गायीऐवजी मरियेचे नाव आले आहे. ‘सिते असता गुंफे’द्वारी या लग्नगीताच्या चालीवर पूर्वजांच्या आशीर्वादाची याचना करणारे 'सांदुलॉ उंगवलॉ' हे गीत ख्रिस्ती समाजात रचले गेले... तर दळण दळताना देवादिकांची स्तुती करत म्हटल्या जाणाऱ्या ओव्यांत 'माउली नऊ मयने गरबार' हे ख्रिस्तजन्माचे वर्णन करणारे गीत रूढ झाले.
संप्रदाय बदलला त्यामुळे शब्ददेखील बदलले... परंतु सुरांनी दोन्ही समाजांमधील एकत्व दाखवण्याचे आपले इमान सोडले नाही. हे सूरच या दोन्ही समाजांच्या एकात्मतेचे बंधन आजवर दाखवत आहेत. या सुरांच्या माध्यमातून या दोन समाजांप्रमाणे सर्व मानवजातदेखील एका सुरात एका लयीत मानवतेचे गीत गात राहो हीच अपेक्षा!
- मॅक्सवेल लोपीस
maxwellopes12@gmail.com
(नरसी मोनजी महाविद्यालयात वाणिज्य अध्यापक असून लेखक गांधी विचार आणि भारतीय संगीत यांचे अभ्यासक आहेत.)
Tags: संगीत मॅक्सवेल लोपीस वसई पोर्तुगीज सामवेदी ब्राम्हण सामवेदी ख्रिस्ती लोकसंगीत भक्तिगीत भारतीय शास्त्रीय संगीत Music Maxwel Lopes Vasai Portuguese Samvedi Brahman Samvedi Christian Folk Music Devotional Music Indian Classical Music Load More Tags
Add Comment