'बिटींग रिट्रीट सेरेमनी'तून वगळलेले गांधीजींचे ते आवडते गीत

प्रजासत्ताक दिनाच्या सांगता सोहळ्यातून ‘अबाइड विथ मी' ही रचना वगळण्यात आली

‘अबाइड विथ मी' ही रचना युद्ध समाप्तीवेळी सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी वाद्यांच्या ताफ्यात वाजवण्याची प्रथा इंग्लडमध्ये सुरू झाली. 1950 पासून भारतातही 29 जानेवारीला 'विजय चौक'वर प्रजासत्ताक दिनाच्या सांगता सोहळ्यानिमित्ताने होणाऱ्या ‘Beating Retreat Ceremony’मध्ये ही रचना वाजवली जाऊ लागली. गेल्या वर्षापासून त्यावर बंदी आणण्याची चिन्हे दिसत होती. शेवटी यावर्षी हे गीत या सोहळ्यातून काढून टाकण्यात आले. हे गीत काढून टाकण्यासंदर्भात समाजमाध्यमांतून वेगवेगळी कारणे दिली जात आहेत. काहींच्या मते भारतासारख्या स्वतःची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख असलेल्या राष्ट्राच्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी एका विदेशी गीताची काय गरज? परंतु हे कारण जर ग्राह्य मानले तर या गीतासोबतच ‘बिटींग रिट्रीट सेरेमनी’ या 17व्या शतकातील विदेशी परंपरेतून आलेल्या प्रथेवरदेखील विचार करावा लागेल. किंबहुना मग राष्ट्राराष्ट्रांतील एकंदरीत सांस्कृतिक देवाणघेवाणीवरच प्रश्नचिन्ह उभे राहील!

महात्मा गांधींच्या राजकीय-सामाजिक संघर्षाला भक्तीसंगीताची किनार होती. ही किनार अत्यंत नाजूक आणि पुसटशी जरी असली तरीही भारताच्या अभ्युदय सरितेला प्रवाहित करण्यासाठी तिच्या दोन किनाऱ्यांप्रमाणे त्या भक्तीसंगीताने महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. साऊथ आफ्रिकेतील लढ्यापासून जेव्हा गांधींनी वैयक्तिक आयुष्य सोडून सामूहिक आयुष्य सुरू केले तेव्हापासून समूहबांधणीसाठी त्यांनी प्रार्थनेचा अवलंब केला. या प्रार्थनेला त्यांनी हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती, पारशी, जैन अशा सर्वधर्मीय गीतांची जोड दिली. ‘नीतिना काव्यो’ हा त्यांचा पहिला आश्रमगीतांचा संग्रह. पुढे कालानुरूप त्यामध्ये अनेक गीते येत गेली.

यामध्ये सुरूवातीपासूनच 'वैष्णव जन तो' या नरसी मेहतांच्या रचनेचा समावेश होता. त्या भजनाचे आणि गांधींजींचे असे काही समीकरण होऊन बसले की, पुढे ते गीत गांधीजींचे अस्तित्व दाखवण्यासाठी सामाजिक सोहळ्यांपासून ते गांधींवरील कलाकृतींपर्यंत आधारभूत बनले. पुढे 1930 साली मीठाच्या सत्याग्रहावेळी ‘नाम रामायणन्’मधील श्री लक्ष्मणशास्त्रींची रामधूनदेखील त्यांनी प्रचारात आणली. त्यामधे आभा गांधी यांनी हिंदु-मुस्लिम ऐक्याचा बापूंचा तत्कालीन नारा डोळ्यासमोर ठेवून 'ईश्वर अल्लाह' अशी जी ओळ समाविष्ट केली त्यामुळे तर हे भजन घराघरांत पोहोचले.

आज काळ बदलत चाललेला आहे. गांधी विरोधाचा विचार आता मोठ्या प्रमाणात आपले डोके वर काढताना दिसत आहे. कित्येक गायक ‘वैष्णव जन तो’ गाण्यास धजत नाहीत; तर काहीजण ‘अल्लाह’ला हिंदूंच्या एका प्रार्थनेमध्ये स्थान देणाऱ्या गांधींवर गरळ ओकताना थकत नाहीत. दुर्दैव हे की, हिंदू शास्त्रांतील गांधींनी आपल्या प्रार्थनेत कुठलाही बदल न करता वापरलेल्या अशा शेकडो रचना आज या विरोधकांना माहीतदेखील नाहीत. मीराबेन (मेडलिन स्लेड) साठी त्यांनी इंग्रजीत अनुवादित केलेल्या कित्येक संस्कृत श्लोकांपासून  आणि ‘गीताबोध’ या भगवद्गीतेच्या मुक्तचिंतनापासून या गटाने स्वतःलाच आजही वंचित ठेवलेले आहे. ‘रघुपती राघव’ यांना माहीत आहे याचे कारणदेखील त्यातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचा घोष करत त्या पूर्ण रचनेला लोकप्रिय करणारी  ती ओळ हेदेखील त्यांना साधे कळू शकत नाही; ना त्यांना कळू शकत  “ईश्वर एक है, किंतु लोग अपनी चित्तवृत्तीके अनुसार अलग अलग नामसे उसकी उपासना करते है” हा हिंदू श्रुतींतील त्या भजनावलींच्या प्रस्तावनेत नारायण खरे यांनी उद्धृत केलेला विचार!

सध्या 'अबाइड विथ मी' या गांधीजींच्या आवडत्या रचनेचा मुद्दा ऐरणीवर आहे. ही रचना 1847मध्ये स्कॉटिश स्तोत्रकार हेन्री फ्रान्सिस लिट यांनी लिहीलेली होती. तर त्या रचनेला विल्यम हेन्री मोन यांनी संगीत दिलेले होते. 1934मध्ये अस्पृश्यतानिवारणासाठी म्हैसूरला गेलेले असताना, तिथल्या महालातील वाद्यवृंदाकडून गांधीजींना हे गीत सर्वप्रथम ऐकायला मिळालेले होते व पुढे ते त्यांचे आवडते गीत बनले. आयुष्याच्या संध्याकाळी कवी हेन्री यांनी लिहीलेली ती अद्भुत रचना,

Abide with me, fast falls the eventide

संध्या ही दाटूनी आली, तुजजवळी मजला घे रे...

तिमिर घनदाट जाहला, देवा मजला जवळी घे रे.

सखेसोबती हतबल झाले... पाखरू सुखाचे उडूनी गेले.

कर मदतीचा मज तू दे रे, देवा मजला जवळी घे रे...

प्रस्तुत गीताचे कवी हेन्री फ्रान्सिस हे क्षयरोगाने ग्रस्त होते. जीवनाच्या अंतिम घटका मोजत असताना, जीवनाची अशाश्वतता डोळ्यांपुढे थैमान घालून उभी असताना त्यांनी हे गीत लिहिले. बायबलमधील लूकच्या शुभवर्तमानात येशूला त्याचे शिष्य म्हणतात, “आमच्या बरोबर राहा. कारण जवळजवळ संध्याकाळ झालीच आहे. आणि दिवसही जवळजवळ मावळला आहे.”(24:29) तसेच करिंथकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रात संत पौल “अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा तुझी नांगी कोठे?” (15:55) असा एक शाश्वत प्रश्न विचारतात. बायबलमधील या दोन संदर्भांवर हे काव्य उभारलेले होते. भौतिक सुखांचा प्रकाश अंधूक झालेला असताना आणि त्याची सर्व चकाकी लयास गेलेली असताना, बदल आणि ऱ्हास यांना समोरासमोर पाहत असताना कवी शाश्वताच्या भगवंताला साद घालतो. कारण तो परमेश्वर ज्याचा हात धरतो त्याला कुणाचे भय! त्याच्या डोळ्यात ना दुःखाश्रू ना जीवनाचा कडवटपणा! तो तर केवळ विजयाचाच भागीदार!


हेही वाचा : 'गांधी खुर्द आणि बुद्रुक'ची प्रस्तावना (संपादित अंश) - रमेश ओझा


खरे तर गांधींजींनीदेखील क्षयरोगाची मरणप्राय पीडा अनुभवलेली होती. 1918 मध्ये एक वेळ अशी आलेली होती की, हेन्री फ्रान्सिसप्रमाणेच त्यांनाही जीवनाची शाश्वती उरलेली नव्हती. मृत्यूच्या दरवाजात ते उभे होते. म्हणून कदाचित ही रचना त्यांना जास्त जवळची वाटलेली असावी.

ख्रिस्ती धर्मातील जॉन न्युमन यांची ‘लीड मी काइड्ली लाईट’ हीदेखील अशाच आशयाची एक रचना. साऊथ आफ्रिकेमध्ये मीर आलम (मीर आलम त्या घटनेनंतर गांधींचे निस्सीम अनुयायी झालेले होते.) या पठाणाच्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावलेले गांधी त्यांचे पहिले चरित्रकार रेव्ह. डोक यांच्याकडे दहा दिवस राहायला होते; त्यावेळी त्यांची कन्या ऑलिव्ह हिने ही रचना गांधींना ऐकवलेली होती,

Lead, kindly light, amid the encircling gloom

 प्रेमळ ज्योती मला दाखवी जीवनपंथ उजाळ,

 दूर राहिले गृह अति हा दाटे अंधकार,

 मार्ग न गवसे मजला आता तुचि प्रभू आधार…

या दोन्हीही रचनांत एक सुक्ष्म परंतु फार महत्त्वाचा फरक आहे, तो म्हणजे पहिली रचना येऊ घातलेल्या मरणाच्या भयप्रद परिस्थितीत शक्ती मागते तर दुसरी मरणानंतरचा दाट काळोख भेदण्यासाठी साद घालते. यामुळेच पहिली रचना युद्ध समाप्तीवेळी सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी वाद्यांच्या ताफ्यात वाजवण्याची प्रथा इंग्लडमध्ये सुरू झाली. 1950 पासून भारतातही 29 जानेवारीला 'विजय चौक'वर प्रजासत्ताक दिनाच्या सांगता सोहळ्यानिमित्ताने होणाऱ्या ‘Beating Retreat Ceremony’मध्ये ही रचना वाजवली जाऊ लागली. गेल्या वर्षापासून त्यावर बंदी आणण्याची चिन्हे दिसत होती. शेवटी यावर्षी हे गीत या सोहळ्यातून काढून टाकण्यात आले.


हेही वाचा : चित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल! - मॅक्सवेल लोपीस


हे गीत काढून टाकण्यासंदर्भात समाजमाध्यमांतून वेगवेगळी कारणे दिली जात आहेत. काहींच्या मते भारतासारख्या स्वतःची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख असलेल्या राष्ट्राच्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी एका विदेशी गीताची काय गरज? परंतु हे कारण जर ग्राह्य मानले तर या गीतासोबतच ‘बिटींग रिट्रीट सेरेमनी’ या 17व्या शतकातील विदेशी परंपरेतून आलेल्या प्रथेवरदेखील विचार करावा लागेल. किंबहुना मग राष्ट्राराष्ट्रांतील एकंदरीत सांस्कृतिक देवाणघेवाणीवरच प्रश्नचिन्ह उभे राहील!

काहींच्या मते हे बापूंचे आवडते गीत असल्याने ते वगळण्यात आले. महात्माजींच्या हत्येनंतर ज्या प्रकारे त्यांच्या विरोधातील एक गट अखंडीतपणे त्यांच्या हत्येचे समर्थन करीत राहिला, ज्याप्रकारे त्यावर आधारित चित्रपट/नाटके आलेली आहेत व येऊ घातलेली आहेत ते सर्व पाहता हे कारणदेखील खरे असेल. परंतु एक गोष्ट सर्वांनाच लक्षात घ्यावी लागेल की, महात्मा गांधी हे इतके दुर्बल व्यक्तिमत्व नाही की, त्यांच्या आवडीचे एखादे गाणे दुर्लक्षित केल्याने वा त्यांच्या विरोधात ढीगभर चित्रपट प्रदर्शित केल्याने ते काळाच्या पडद्याआड जातील. गांधीजींचे खरे अस्तित्व हे त्यांचे विचार आहेत. आणि त्यांचे विचार हे जरी आज ‘गांधीवाद’ या नावाने ओळखले जात असले तरीही त्यांच्याच शब्दांत म्हणायचे तर ते डोंगर अन् पर्वतांइतके प्राचीन आणि शाश्वत आहेत. आता ‘अबाइड विथ मी’ या गीताचेच उदाहरण पाहायचे तर, त्याची धून वगळली गेली; परंतु त्यानंतर गेल्या काही दिवसांत त्या गीताच्या शब्दांचा शोध बहुसंख्य लोकांनी घेतला. त्यामुळे त्यातील विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले. हाच त्या गीताचा खरा गौरव आहे! आणि त्यातच महात्माजींचा विजय आणि अमरत्व सामावलेले आहे.

- मॅक्सवेल लोपीस
maxwellopes12@gmail.com 
(लेखक, नरसी मोनजी महाविद्यालयात वाणिज्य अध्यापक असून गांधी विचारांचे अभ्यासक आहेत.)

Tags: अबाइड विथ मी महात्मा गांधी Load More Tags

Comments:

Anand Gosavi

महात्माजींनी बद्दल विद्वेष आणि त्यापोटी त्यांच्यावर गलिच्छ टीका, हिंसक प्रदर्शन.... हा भारत देश नाही. बहुसंख्यांक मते मिळविणे, हा राजकीय विजय आहे. ह्या विजयामुळे मिळालेल्या सत्तेचा गैरवापर ही लोकशाहीशी आणि गणतंत्र संविधांनाशी बेइमानी आहे.

Add Comment