वैष्णव जन तो...

महात्म्याने अंतर्बाह्य कुप्रवृत्तींचा सामना करण्यासाठी एखाद्या हत्याराप्रमाणे या भजनाचा वापर केला. 

केवळ अहिंसेवर आधारित पूर्ण राजकीय स्वातंत्र्य हे महात्मा गांधींच्या सामाजिक जीवनाचे अंतिम उद्दिष्ट नव्हते... तर वैयक्तिक पातळीवर स्वराज्य, ग्रामपातळीवर पंचायत राज आणि वैश्विक पातळीवर सर्वोदय आणण्यासाठी त्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले. अर्थात मानवतेचे हे महावस्त्र विणण्याचे स्वप्न पाहताना त्यांना अनेक सामाजिक पातकांशी सामना करावा लागला. त्यासाठी बहुजनांच्या मनांमध्ये नैतिक मूल्यांची मशागत करणे महत्त्वाचे होते आणि ही सारी मूल्ये नरसी मेहतांच्या 'वैष्णव जन तो...' या भजनात खूपच समर्पकरीत्या मांडलेली असल्याने महात्म्याने अंतर्बाह्य कुप्रवृत्तींचा सामना करण्यासाठी एखाद्या हत्याराप्रमाणे या भजनाचा वापर केला. 

माझ्या मताप्रमाणे गांधीजींच्या आध्यात्मिक प्रवासात तीन गोष्टींचे महत्त्व फार मोठे होते. सर्वप्रथम ईशावास्योपनिषदातील प्रथम श्लोक...

ईशा वास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्‌। 
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम्‌॥

या विश्वाच्या कणाकणांत ईश्वर वसलेला आहे. यथायोग्य दान करून आपल्या संपत्तीचा आनंद घ्या. दुसऱ्याच्या द्रव्याचा लोभ धरू नका.

येरवडा जेलमध्ये असताना गांधीजींनी या श्लोकावर चिंतन केले आणि त्याचा प्रभाव त्यांच्यावर इतका पडला की, हा श्लोक त्यांच्या विश्वस्तनीती तत्त्वाचा आधार झाला. ईश्वराचे सर्वव्यापकत्व मान्य करणाऱ्या, त्यागावर आणि दानधर्मावर भर देणाऱ्या  या श्लोकात त्यांना हिंदू धर्माचे संपूर्ण सार सामावलेले दिसले. एखाद्या व्यक्तीच्या सर्व समस्यांचे आणि शंकांचे निराकरण करण्याची सुवर्णकिल्ली असे या श्लोकाचे वर्णन त्यांनी केले आहे. हिंदू धर्मच काय... ख्रिस्ती आणि ज्यू धर्मांच्या दहा प्रमुख आज्ञांचादेखील सारांश या श्लोकात झालेला दिसत नाही का...!

त्यानंतर ख्रिस्ताचे पर्वतावरील प्रवचन लक्षात घ्यावे लागेल. शक्तिशाली आणि वैभवसंपन्न जगासोबत ओळख दाखवणाऱ्या प्रवृत्तींचे या प्रवचनाद्वारे रंजल्या गांजलेल्यांच्या मदतीला धावून जाण्याच्या विचारसरणीत ख्रिस्ताने महाप्रयाण घडवले होते. या प्रवचनात भगवंत येशू दीनदलितांचा गौरव करत म्हणतात, 'हृदयाने कनवाळू ते धन्य... कारण स्वर्गराज्य त्यांचे आहे, शोक करतील ते धन्य... कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल, मनाने सौम्य ते धन्य... ते पृथ्वीचे वतन भोगतील, नीतिमत्तेसाठी भुकेलेले आणि तहानलेले ते धन्य... ते पूर्णत्व पावतील, दया करणारे ते धन्य... त्यांच्यावर दया केली जाईल, शांती करणारे ते धन्य... त्यांना प्रभूची लेकरे म्हणतील, शुद्ध हृदयाचे ते धन्य... ते देवाला पाहतील आणि न्यायनीतीसाठी ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य... कारण स्वर्गराज्य त्यांचे आहे.' 

विलायतेत कायद्याचा विद्यार्थी असताना मोहनदासने सर्वप्रथम बायबल वाचले. बायबलचा जुना करार त्याला जितका रटाळवाणा वाटला तितकाच नव्या करारामध्ये त्याला शाश्वत जीवनाचा झरा सापडला. त्यातही येशूचे गिरी प्रवचन त्याला इतके भावले की, त्यात त्याला पूर्ण भगवद्गीतेचा आशय सापडला. 'सैतानाचा प्रतिकार करू नका' या ख्रिस्तवचनात लपलेले अहिंसेचे मूळ त्याला लिओ टॉलस्टॉयच्या 'kingdom of God is within you' यावर अभ्यास करण्यापर्यंत घेऊन गेले. 

...आणि पुढचा भाग म्हणजे महात्म्याने प्रत्येक वेळी ‘वैष्णव जन तो...’ भजन ऐकत असताना या सर्व उदात्त विचारांवर कृतियुक्त विचारमंथन केले आणि अगदी त्याच वेळी प्रत्येक डोळ्यात आसवांच्या जागी हसू असलेल्या स्वतंत्र भारताची मनीषा धरली. त्यांनी वरील तीन पैलू असलेला असा एक हिरा घडवला... ज्यात एकाच वेळी पूर्ण गीतेचे, अखंड वेदान्ताचे आणि सर्व धर्मांच्या विचारांचे समग्र दर्शन एका दृष्टीत या जगाला घडले.

स्वातंत्र्याबद्दलचे आणि लोकशाहीबद्दलचे गांधीजींचे विचार संकुचित नव्हते. स्वातंत्र्याची इच्छा बाळगणारा प्रत्येक माणूस त्यांना एखाद्या वैष्णवाप्रमाणे अपेक्षित होता. जो दुसऱ्यांची पीडा जाणून त्यांच्या मदतीला धावून जाईल, अहंभावापासून जो मुक्त असेल, जो कायेने, वाचेने आणि मनाने निर्मळ असेल. जो सत्यस्वरूप परमेश्वरावर विश्वास ठेवून दुसऱ्या व्यक्तीवर वृथा आणि कुत्सित टीका करत बसणार नाही. जो प्रत्येक स्त्रीमध्ये आपल्या मातेचे रूप पाहील. खरा वैष्णव एक जिवंत तीर्थस्थळ असेल आणि सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह अशा मूल्यांच्या वाटेवर तो चालत राहील. 

महात्मा गांधीजींच्या व्यक्तिगत जीवनात या भजनाचा असा काही प्रभाव पडला की, महात्मा आणि ‘वैष्णव जन तो...’ हे एक अविभाज्य अंग झाले. 

इथे अजून एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की, गांधीजींच्या अध्यात्मसाधनेला कर्मयोगाचे अधिष्ठान होते. चरख्यावर सूत कातण्याच्या क्रियेला त्यांनी रोझरीएवढेच किंवा रामनाम जपाएवढेच महत्त्व दिले... त्यामुळेच 14 ऑगस्ट 1924च्या 'यंग इंडिया'मध्ये ते लिहितात की, यज्ञ भावनेने चरख्याच्या चाकाला गतिमान करणारा ब्राम्हण हा अधिक उत्तम ब्राम्हण, मुसलमान हा उत्तम मुसलमान व वैष्णव - एक उत्तम वैष्णव होऊ शकेल. 

'वैष्णव जन तो...' या भजनात केवळ आपल्या अस्तित्वाने जगाला धन्य करणाऱ्या एखाद्या संताची अपेक्षा केलेली नसून वैष्णवाची मांदियाळी असलेल्या अशा एका जगाची कामना केलेली आहे... 'जिथे एक दिवस प्रत्येक दरी बुजवली जाईल, प्रत्येक डोंगरमाथा नमवला जाईल, खडकाळ जमिनी जिथे समतल होतील आणि वाकड्या वाटा सरळ करण्यात येतील आणि परमेश्वराच्या गौरवाची अनुभूती जिथे प्रत्येक सजीवमात्राला घेता येईल. ही तीच प्रार्थना आहे... जी गुरूमाउली ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक परमेश्वराकडे केली होती आणि आज वैमनस्याच्या विळख्यात जखडलेला प्रत्येक जीव ज्यासाठी आक्रोश करत आहे...

     चला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गाव।
     बोलती जे अर्णव, पीयूषांचे ।।
     चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
     ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ।।

नीतिवंतांचा समुदाय हा जणू कल्पतरूंचा बगीचा, चिंतामणी रत्नांचे गाव आणि त्यांचे बोल हे अमृततुल्य सागराप्रमाणे आहेत. ते लांछन नसलेले चंद्र आणि तापहीन असे सूर्य आहेत. अशा सज्जनांचे या समस्त भूमंडळाशी नाते प्रस्थापित होवो.
  
हा देश आणि सारे विश्व अशाच वैष्णवांच्या देदीप्यमान प्रकाशाने उजळून जावो हीच आज गांधीजयंती निमित्ताने मनःकामना...! 

(Supremacy या साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या मूळ इंग्रजी लेखावर केलेल्या या भाषणासाठी लेखकाला गांधी स्मारक निधीकडून शिक्षक वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले होते.)

- मॅक्सवेल लोपीस
maxwellopes12@gmail.com

(लेखक नरसी मोनजी महाविद्यालयात वाणिज्य विभागात अध्यापक असून गांधीविचारांचे आणि भारतीय संगीताचे अभ्यासक आहेत.)

Tags: महात्मा गांधी येशू ख्रिस्त Maxwel Lopes Mahatma Gandhi Jesus Christ Load More Tags

Comments:

दीपक पाटील

म.गांधी यांनी भारतीय समाजमनाचा केलेला सर्वांगीण विचार म्हणजे 'वैष्णव जन तो'..हे भजन ! लेखक मॕक्सवेल यांचा गांधी विषयक अभ्यास अतिशय मोलाची माहिती इथे देतो. गांधींचे चित्र येशू ख्रिस्तांच्या पार्श्वभूमीवर मांडणे यातच सारे आले. दोन कारुण्य मूर्तींना..अहिंसा पूजकांना नमन !

पांडूरंग आत्माराम थोरात

महात्मा गांधी जयंतीनिमित्त श्री मॅक्सवेल लोपीस सरांचे भाषण उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. पसायदान मधील सज्जन सोयरे याबाबतीतला उल्लेखही उचित आहे..आश्रम भजनावलीत पसायदान नसावे हे नेहमी खटकते. वास्तविक आचार्य विनोबा भावे, श्री नारायण खरे व श्री काकासाहेब कालेलकर ही मराठी भाषिक मंडळी असताना पसायदान राहून गेले. श्री लोपीस सरांनी त्याचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद.

Atul Teware

अप्रतिम धन्यवाद.

Add Comment