ख्रिस्ती धर्माची आद्य विचारसरणी ज्या महामानवाने सर्वप्रथम या जगास दिली तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्ताचा जीवनपरिचय करून घेण्यासाठी बायबलचा नवा करार हा सर्वमान्य धर्मग्रंथ. ज्या समाजात येशूचा जन्म झाला त्या समाजाचा ज्यु धर्म आणि त्यांची संस्कृती कळणे ही गोष्ट नवा करार कळण्यासाठी आवश्यक ठरते आणि त्यामुळे बायबलचा जुना करार अभ्यासणेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरते.
...मात्र या परंपरागत मार्गाने येशूचा जीवनपरिचय करून घेतल्यास समजून येते ते येशूचे दैवी रूप! येशूला कृतीत आणण्यासाठी येशूचे फक्त दैवी रूप समजणे पुरेसे नाही. महात्मा येशूने पीटर या त्याच्या शिष्यास स्वतःविषयी एकदा विचारले असता पीटरने दिलेले उत्तर फारच समर्पक होते, ‘प्रभूजी, तुम्ही खरा देव व खरा मनुष्य आहात.’ येशूच्या अलौकिकतेतील देवत्व आणि लौकिकतेतील मानवत्व पीटरने खूप प्रगल्भतेने ओळखले होते... म्हणूनच ख्रिस्ताच्या नावाने सुरू झालेल्या धर्माची कोनशिला पीटर झाला असावा. (संत पीटर किंवा पेत्र हे रोमन कॅथलिक चर्चचे पहिले पोप होते.)
...परंतु ख्रिस्ताची ही दोन्हीही गुढ रूपे ज्या चर्चने अधिक सुबोधपणे पुढे स्पष्ट करायला हवी होती ते चर्च या कामात कुठे तरी कमी पडले आणि ख्रिस्ताच्या दैवी रूपाचाच महिमा आजवर गायला गेला. बरेऽ हे दैवी रूपदेखील त्याच्या अपूर्व विचारांमुळे कमी आणि त्याच्या चमत्कारांमुळे, त्याच्या आधीच्या यहुदी भविष्यवाद्याच्या भाकितातील साधर्म्यामुळे जास्तच रंगवले गेले... त्यामुळे समाजाच्या कृतियुक्त जगण्यातून दीनबंधू येशू नाहीसा झाला आणि भव्यदिव्य गिरीजाघरांत बंदिस्त होऊन गेला. त्यात ख्रिस्ताने कुठलाही ग्रंथ स्वतः लिहिला नाही किंवा आपली शिकवण कुणा ज्ञानी जनांना दिली नाही. ख्रिस्ताचे शिष्य हे सर्वसामान्य आणि अशिक्षित वर्गातून आलेले असल्याने त्यांच्यामार्फत लिहिलेल्या साहित्यातील व्याकरणाच्या कित्येक चुकांतून अनेक संदर्भांचे वेगवेगळे अर्थ घेण्यात आले.
आपल्या अपूर्व विचारांमुळे आणि त्या विचारांनी प्रचलित धर्मसत्तेला आव्हान देत पत्करलेल्या बलिदानामुळे अलौकिकार्थाने ख्रिस्त चिरंजीवी तर झाला... परंतु राजसत्तेशी हातमिळवणी केलेल्या धर्ममार्तंडांनी त्याचे जगणे हे अश्वत्थाम्याप्रमाणे वणवण भटकंतीचे करून ठेवले. घायाळ, शोषित असा तो प्रत्येक हृदयाचे दार ठोठावू लागला... परंतु त्याला सम्राटाच्या रूपामध्ये पाहण्याचा सराव झालेल्यांना त्याच्यातील जीवंत, यज्ञासाठी नाही तर प्रेमासाठी भुकेलेला ईशपुत्र कसा दिसणार...!
अठराव्या शतकातील थोर तत्त्वज्ञानी लिओ टॉलस्टॉय यांनी आपल्या व्यासंगी लेखनाद्वारे या ख्रिस्ताची खरी आणि काल सुसंगत ओळख जगाला करून दिली. टॉलस्टॉयच्या या महान कार्याचा अभ्यास करण्याची सुरुवात ज्या ग्रंथापासून करणे योग्य ठरते... किंबहुना ख्रिस्त माहीत नसलेल्यांना ख्रिस्त ज्या ग्रंथातून खरा आकळू शकतो तो ग्रंथ म्हणजे ‘गॉस्पल इन ब्रिफ’.
टॉलस्टॉयने ख्रिस्तासंबधीच्या माहितीची आणि त्याद्वारे जीवनाला अर्थ प्राप्त करून देणाऱ्या या शोधमोहिमेची विभागणी चार टप्प्यांत केलेली आहे. या शोधात ग्रीक, हिब्रू अशा भाषांचा अभ्यास करून बायबलच्या प्रत्येक शब्दाच्या व्युत्पत्तीचादेखील मागोवा टॉलस्टॉय यांनी घेतला. त्यातील ‘ख्रिस्ताच्या ख्रिस्ती श्रद्धेची तपासणी’ हा तिसरा टप्पा म्हणजे ‘गॉस्पल इन ब्रिफ’.
सदर ग्रंथात टॉलस्टॉयने ख्रिस्ताच्या चमत्कारांना अनावश्यक ठरवून त्यांच्या विचारांवर दृष्टिक्षेप टाकला आहे. त्यासाठी ख्रिस्ताने शिकवलेल्या ‘आमच्या स्वर्गीय बापा’ या एकमेव प्रार्थनेचे बारा भाग करून त्यांत ख्रिस्ताचा जीवनप्रवास गुंफलेला आहे. हे बारा भाग म्हणजे कार्यकारणभाव दाखवणारे सहा खंडच. तसा ख्रिस्ताचा जीवनप्रवास नवीन करारात चार (मत्तय, मार्क, लूक, योहान या) शुभ वर्तमानकारांनी आपापल्या खुबीनुसार मांडलेला होता. यांपैकी योहानचे शुभवर्तमान टॉलस्टॉय यांना आपल्या शोधकार्यानुसार अधिक सुसंगत आणि क्रमवार वाटले.
वास्तविक योहान किंवा जॉन हा येशूचा सर्वाधिक लाडका शिष्य होता. येशूच्या मृत्यूसमयी भीतीने इतर सर्व शिष्य पांगले असताना योहान शेवटपर्यंत त्याच्या सोबत होता. बायबलमधील दैवी प्रकटीकरण हेदेखील योहाननेच अनुभवले असे वर्णन आहे. योहानच्या शुभवर्तमानात त्याच्या चिंतनाचा आणि ख्रिस्ताच्या निकट सहवासाचा खूप प्रभाव जाणवतो. त्या शुभवर्तमानाची प्रस्तावना आणि शेवट ख्रिस्ताचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खूपच मार्गदर्शक ठरतात... त्यामुळे ही प्रस्तावना टॉलस्टॉय आपल्या शुभवर्तमानातदेखील समाविष्ट करतात. अर्थात योहानाच्या मूळ शुभवर्तमानात सांगितलेल्या देवाची खूपच प्रभावी अशी व्याख्या टॉलस्टॉय आपल्या प्रस्तावनेत करतात आणि ‘जीवनाचे आकलन म्हणजे ईश्वर’ असे म्हणत ते त्यास सत्याचा प्रकाश संबोधतात आणि पुढे लिहितात...
‘सत्याचा प्रकाश जगात नेहमी अस्तित्वात आहे आणि या जगात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला तो सज्ञानी करतो. तो जगात होता आणि तो आकलनाचा प्रकाश होता म्हणून जग जिवंत आहे.’ योहानची ही प्रस्तावना म्हणजे जणू आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंबच. ही प्रस्तावना वाचताना उपनिषदातील ‘पूर्णमिदं पूर्णमदः’ या श्लोकाची आठवण ते द्वैत तत्त्वज्ञानाचीदेखील आठवण ठायी ठायी होते.
ख्रिस्ताचे शुभवर्तमान जितक्या चिंतनशीलतेतून योहानने लिहिले तितक्याच विवेकाने ते टॉलस्टॉयने अभ्यासले आणि जगापुढे ठेवले. मूळ रशिअन भाषेतील हे टॉलस्टॉयचे शुभवर्तमान इंग्लीशमध्ये अगदी चपखलपणे अनुवादित केले ते 'Aylmer Maude' (ऐल्मर मौदे) यांनी... मात्र तरीही टॉलस्टॉय यांच्या क्लिष्ट शब्दरचनेचा प्रभाव या अनुवादित इंग्लीश साहित्यावर राहिलाच... त्यामुळे सामान्य वर्ग या महान साहित्याचा आस्वाद हवा तसा घेऊ शकला नाही. त्यात मराठी वाचकांचादेखील समावेश आहेच... परंतु रेव्ह. फ्रान्सिस आल्मेडा या विवेकवादी आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील एका जेष्ठ विज्ञान शिक्षकाने ही गैरसोय दूर करत ‘संक्षिप्त शुभवर्तमान’ या नावाने या ग्रंथाचा अनुवाद केला आहे आणि तो ई साहित्य प्रतिष्ठानने pdf स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून दिलेला आहे. (हा ग्रंथ डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा)
रेव्ह. आल्मेडा यांनी हा अनुवाद करताना स्वतःचे मत, टीपा अशा गोष्टी टाळलेल्या असल्याने टॉलस्टॉय यांचा हा ग्रंथ जसाच्या तसा मराठीत उतरलेला जाणवतो. तथापि हा अनुवाद करताना केवळ इंग्लीश रचनेचे शब्दशः मराठी रूपांतर होणार नाही आणि वाचकांना कळेल असे अनुसर्जन या रचनेत होईल ही काळजी अनुवादकाने घेतली आहे... (सदर लेखात वापरलेला गॉस्पल इन ब्रिफचा मराठी मजकूर हा त्याच अनुवादाचा भाग आहे...) शिवाय ही मराठी भाषा शक्य तितक्या सुबोधपणे मांडली गेल्याने त्याद्वारे टॉलस्टॉयचे साहित्य आणि ख्रिस्ताची शिकवण मराठमोळी होऊन जाते.
येशूने सांगितलेला जीवनाचा जीवंत झरा टॉलस्टॉयला बहुमूल्य रत्नांप्रमाणे भासला होता. मराठी वाचकांसाठी रेव्ह. फ्रान्सिस आल्मेडा यांनी उघडलेला या खजिन्याचा दरवाजा नक्कीच जीवनाचे खरे आकलन होण्यास मार्गदर्शक ठरो आणि ख्रिस्तविचारांच्या पुनरुत्थानाचे यथार्थ दर्शन साऱ्या जगाला घडो हीच या इस्टरच्या दिवशी शुभेच्छा.
- मॅक्सवेल लोपीस
maxwellopes12@gmail.com
(लेखक नरसी मोनजी महाविद्यालयात वाणिज्य अध्यापक असून भारतीय संगीताचे आणि गांधी विचारांचे अभ्यासक आहेत.)
साधना अर्काईव्हमधील हा लेखही वाचा :
टॉलस्टॉयच्या नजरेतून येशू - डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस
Tags: लेख मॅक्सवेल लोपीस येशू ख्रिस्त ख्रिश्चन ख्रिस्ती लिओ टॉलस्टॉय रेव्ह. फ्रान्सिस आल्मेडा Maxwel Lopes Jesus Christ Christanity Leo Tolstoy Rev Francis Almeida Load More Tags
Add Comment