कथ्थकमधील अखेरचा महामेरू

कथ्थक सम्राट पं. बिरजू महाराज यांना वाहिलेली आदरांजली

प्रसिद्ध कथ्थक सम्राट, पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांचे गेल्या सोमवारी (17 जानेवारी 2022 रोजी) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. शास्त्रीय कथ्थक नृत्यातील 'कालका-बिन्दादीन' घराण्याचे ते नर्तक होते. लखनऊमधील दरबारी कथ्थकपासून ते जगभरच्या नृत्यमहोत्सवातील आधुनिक कथ्थकपर्यंतच्या व्यापक नृत्याविष्काराचा चेहरामोहरा असलेले गुरूतुल्य व्यक्तिमत्व निवर्तल्याची भावना कलाविश्वात व्यक्त होते आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कलेचा परिचय करून देणारा हा लेख.

आजच्या या चक्रवान युगात संगीत कलेचे स्वरूप असे काही बदलताना दिसत आहे की, शास्त्रीय गायनामध्ये खर्जातल्या धीरगंभीर आलापीपेक्षा रसिकांना चकित करून सोडणाऱ्या अगदी जलद गतीच्या ताना, तालासोबत खेळ खेळत समेवर येण्याचा प्रताप अशा किमया करून स्वतःला सिद्ध करण्याकडे गायकांचा कल झुकलेला आहे. मग त्यावर, शास्त्रीय गायनासोबत आम्ही कसे चतुरस्र गायक आहोत हे सिद्ध करण्यासाठी हे गवई आपली मूळ शैली सोडत इतर तऱ्हेची गाणी गाण्याचा खटाटोप करताना दिसतात. अर्थातच, हा सगळा प्रकार शेवटपर्यंत ‘खटाटोप’च राहतो. कारण अभिजात संगीताशी त्या कलाकाराने घेतलेली ती केवळ फारकतच नसते; तर स्वतःच्या कलेचे सत्व विसरत अन्यत्र हिंडण्याचा तो धेडगुजरीपणादेखील असतो. एका विशिष्ट पातळीनंतर या कलाकारांच्या कलेत तोचतोचपणा दिसू लागतो. मग पुन्हा त्यांना, सुरांच्या शक्तीतून विश्व साकारणाऱ्या उस्ताद आमीरखाँसाहेबांना वा पलुस्करांना आठवावेच लागते!

जी गोष्ट गायनाची तीच नृत्याची! नृत्याच्या अनेक ‘रिअ‍ॅलिटी शोज्’मध्ये नृत्य आणि सर्कस यांमधील फरक न ओळखू शकणारे कलाकार पाहून खऱ्या अभिजात कलेची व हाताच्या बोटावर मोजण्याइतपत उरलेल्या काही अभिजात कलावंतांची आठवण होणे साहजिक आहे. अलिकडेच पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाने या सच्च्या कलाकारांतील एक ध्रुवताराच जणू गळून पडला. त्यामुळेच नृत्य आणि जीवन भरभरून जगूनही पंडित बिरजू महाराज यांचे जाणे मनाला चटका लावून गेले.

शालेय वयातली माझी गायनाची आवड लक्षात घेऊन माझे एक हितचिंतक मला दादरच्या नेहरू सेंटरला एका शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला घेऊन गेलेले होते. तोपर्यंत शास्त्रीय गायन, वादन, नृत्य या सगळ्याच गोष्टी मला अपरिचित होत्या. त्या कार्यक्रमात कोणीतरी गायक शास्त्रीय ख्याल अथवा धृपद असा कुठलासा प्रकार गात असावेत इतकेच मला आता स्मरते. कारण त्यावेळी गायनाकडे माझे तितकेसे लक्ष नव्हते; माझ्या पुढील रांगेत अगदी माझ्यासमोर बसलेल्या एका व्यक्तीमत्वाकडे मी मोठ्या कुतूहलाने पाहत बसलो होतो. ‘ताज टी’च्या जाहिरातीमधील कुरळ्या केसाचे, ‘वाह् ताज’ म्हणणारे उस्ताद झाकिर हुसैन होते ते! (त्यावेळी झाकिरजी माहीत होते, ते त्या जाहिरातीमुळेच) आणि या कार्यक्रमात ते चक्क प्रेक्षकांमध्ये बसले होते. त्याचे कारण अवघ्या काही वेळातच समजले. गायनाचा कार्यक्रम संपताच स्टेजवर आपल्या नेहमीच्या नृत्याच्या वेशात बिरजू महाराज प्रकटले आणि झाकिरजी अगदी नम्रपणे उठून व्यासपीठाजवळ गेले. त्यांना पाहून स्तिमीत झालेले महाराज त्यांच्या जवळ गेले. झाकीरजींनी तिथूनच त्यांच्या चरणांना स्पर्श केला आणि महाराजांनी स्टेजवर बसून, स्टेजखाली उभ्या असलेल्या झाकिरजींना आलिंगन दिले.

त्यानंतर महाराजांचे नृत्य सुरू झाले. झाकिरजी देखील ज्यांचे पाय धरतात, ती व्यक्ती नक्कीच कोणीतरी महान असणार इतकीच काय ती महाराजांची मला तोपर्यंत झालेली ओळख. जिथे गायनाची आवड असून गायनातीलच काही कळत नव्हते तिथे नृत्यातील काही कळण्याचा प्रश्नच येत नव्हता. परंतु ज्याप्रकारे महाराजांनी आपल्या प्रस्तुतीला सुरूवात केली त्यातून त्या अवघड वाटणाऱ्या नृत्यातील एक-एक गोष्टी स्पष्ट होऊ लागल्या. महाराज माईकवर एक, दोन, तीन, चार, पाच... असे अंक मोजत वेगवेगळे तुकडे म्हणत होते. मग घुंगराच्या गुंजनात तो तुकडा जसाच्या तसा उतरवत पदन्यास करीत होते आणि मग एकदम समेवर येत होते. त्यानंतर मग तोच तुकडा तबल्याच्या बोलात बोलत होते. तद्पश्चात सतारीवर पलटे सुरू झाले आणि एका विशिष्ट लयीत, कलात्मक पद्धतीने एखाद्या लहान बालकाची झाडावर चढत फळे तोडण्याची उनाडकी, त्याला दम भरणाऱ्या त्याच्या पालकाची कृती असे भाव महाराज साकारू लागले. सर्व काही अद्भूत; परंतु माझ्यासारख्या अतिसामान्य रसिकाच्या आकलनातदेखील येणारे असे!|

त्यादिवशी महाराजांनी आपला नृत्य आखाडा अगदी गाजवला. मग महाराजांच्या जागी आल्या त्यांच्या पट्टशिष्या विदुषी शाश्वती सेन! जणू महाराजांचे स्त्री रूपच! त्या नर्तन करू लागल्या आणि महाराज त्यांच्यासाठी स्वतः रचलेली ठुमरी गाऊ लागले. महाराजांचा समोरासमोर मी पाहिलेला तो पहिला आणि शेवटचा कार्यक्रम.

गायन आणि नृत्याचा काही फारसा संबंध नसावा या गैरसमजुतीपायी मी त्यानंतर कथ्थकडे फारसे लक्ष दिले नाही. परंतु जसजसे वरच्या पातळीवरचे गायन शिकणे सुरू झाले तसतसा त्यातील लयकारीचा विचार परत नृत्याकडे आकर्षित करू लागला. त्यानंतर सितारादेवींचे नृत्य पाहिले आणि कथ्थक हे आपल्याला खूप जवळचे आहे अशी भावना मनात निर्माण झाली. आणि त्यानंतर सुरू झाला कथ्थक समजून घेण्याचा अट्टहास!

तसे पाहिले तर कथ्थक हा स्त्रीप्रधान नृत्यप्रकार! तसे पाहता तांडव, तलवारयुद्ध असे भाव कथ्थकमध्ये मांडून तो पुरूषप्रधानही करता येऊ शकला असता. परंतु कदाचित लोकाग्रहामुळे असेल अथवा नर्तकांच्या आवडीनिवडीमुळे असेल, कथ्थक हा प्रामुख्याने रासलीला, राधाकृष्ण मीलन-वियोग अशा घटनांमध्येच जास्त मांडला गेला. तरीही कथ्थकचे महामेरू पाहिले तर सितारादेवी वगळता पं. उदय शंकर, पं. गोपी कृष्ण, पं. शंभू महाराज, पं. लच्छू महाराज, आणि पं. बिरजू महाराज हे सगळे पुरूषच होते. कथ्थकच्या या महानायकांतील बिरजू महाराज हे शेवटचे नाव!

वयाच्या चौथ्या वर्षी आपले काका शंभू महाराज, लच्छू महाराज आणि वडील अच्छन महाराज यांच्याकडून बिरजूला कथ्थकचे धडे मिळू लागले. त्याच्या अलाहाबादच्या घरात एक नृत्यखाना होता, जिथे दिवसभर नर्तन चाले. कित्येक महान नर्तकांच्या घामाचे सिंचन झालेली जागा होती ती! त्यामुळे पारंपरिक शिक्षण सुरू होण्यापूर्वीच घरातील या नृत्यखान्यातील घुंगरांचा नाद बिरजूच्या नसानसात भरलेला होता. कथ्थक करण्यापूर्वीच बाल बिरजूची बोटे तबल्यावर तालबद्ध नर्तन करू लागली होती. बिरजूला तबला वादन, गायन असे सगळेच निसर्गदत्त लाभलेले होते. त्यातून आता एक कथ्थक नर्तक साकारू लागला. वयाच्या अगदी सातव्या वर्षी बिरजूने आपला पहिला नृत्याविष्कार सादर केला आणि तेराव्या वर्षात पदार्पण करतानाच बिरजू नृत्यगुरू बनले ते शेवटच्या श्वासापर्यंत...

बिरजू महाराजांचा लौकिक वाढू लागला. संगीत भारती, भारतीय कला केंद्र, कथ्थक कला केंद्र अशा संस्थामधून कथ्थकचे गुरू म्हणून कलादान करत ते स्वतः स्थापन केलेल्या ‘कलाश्रम’ या संस्थेचे महागुरू झाले.


हेही वाचा : मीरेचा स्वर - लता! - मॅक्सवेल लोपीस


कथ्थक हा भारतातील एक प्राचीन नृत्यप्रकार. मुघलांच्या काळात त्याचा पूर्णपणे विकास झाला असावा. जयपुर, वाराणसी, लखनऊ ही त्यातील मुख्य घराणी. खरे तर भारताच्या इतर नृत्यप्रकारांच्या तुलनेत कथ्थकचा पेहराव एकदम साधा. केवळ झब्बा घालूनही कथ्थक करता येते. परंतु कथ्थकचे तंत्र मात्र त्याच्या नावाप्रमाणेच क्लिष्ट! महाराजांनी या कथ्थक नृत्यप्रकाराला सामान्य माणसाच्या कक्षेत आणले. कधी त्यांना आगगाडीच्या पळण्यामध्ये कथ्थक दिसले तर कधी पक्ष्यांच्या चिवचिवाटामध्ये. कधी त्यांनी बालकाच्या बालसुलभ चंचल हरकती नर्तनातून दाखवल्या तर कधी पक्ष्यांची आपल्या पिल्लांना अन्न भरवण्याची क्रिया. मंचावर अवतरल्यावर त्यांच्या प्रत्येक संवादातदेखील असा काही ताल जाणवू लागे की प्रत्येक संवाद ते वाजणाऱ्या तालाच्या समेवरच संपवत असत.

जीवनाच्या प्रत्येक हालचालींत, वसुमतीच्या प्रत्येक कणाकणांत नृत्यच पाहण्याचा पंडीतजींचा स्वभाव असावा. म्हणूनच पंडीतजींनी आमरण स्वतःला एक शिष्यच मानले. कित्येक ‘डान्स रिअ‍ॅलिटी शोज्’मध्ये ते परिक्षक म्हणून गेले. महाराजांनी ठरवले असते तर तिथे चालणाऱ्या कसरतींचा तिथल्या तिथे ते समाचार घेऊ शकले असते. परंतु निद्रेलादेखील नृत्यच मानणारे महाराज त्या कसरतींना तरी नृत्यापासून पृथक कसे करणार!

महाराजांनी शतरंज के खिलाडी, विश्वरूपम्, दिल तो पागल है, गदर, देवदास ते अलिकडच्या बाजीराव मस्तानीपर्यंतच्या अनेक चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शन केले. ‘मुघले आझम’चे नृत्यदिग्दर्शक काका लच्छू महाराज यांच्यासोबत त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले. अगदी एखाद्या अनमोल ठेव्याप्रमाणे असलेल्या त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या पूर्वजांच्या रचना त्यांनी काही चित्रपटांसाठी वापरल्या. मुख्य म्हणजे संगीताचे सारे विश्वच ढवळून निघाल्याच्या या काळातदेखील त्या पारंपारिक रचना रसिकांच्या कायमच्याच स्मरणात राहिल्या. मग ती 'काहे छेड मोहे' ही ‘देवदास’मधील ठुमरी असो वा ‘बाजीराव मस्तानी’मधील ‘मोहे रंग दो लाल’. परंतु महाराजांचे खरे यश म्हणजे यशाच्या हव्यासासाठी त्यांनी कधीही कथ्थकच्या आत्म्याशी प्रतारणा केली नाही. अगदी मधुबालापासून ते दीपिकापर्यंत त्यांनी त्या कथ्थकरूपी नटभैरवालाच जिवंत केले. अगदी दीपिका ही भरतनाट्यम् नर्तिका असूनही ‘मोहे रंग दो लाल’मध्ये कथ्थकच्या मुद्रा हुबेहूब याव्यात म्हणून ते आग्रही राहिले. 

ज्याप्रमाणे गुरू-शिष्य परंपरेत त्यांनी आपले पुत्र दीपक महाराज, किशन महाराज, ममता महाराज आणि शाश्वती सेन असे शिष्य घडवले तसेच अनेक सिनेनायिकादेखील त्यांच्या शिष्या बनल्या. परंतु त्यातही माधुरी दीक्षितसोबत त्यांचे समीकरण वेगळेच जुळले. दोन्ही हातांनी चेहरा लपवत मान एका विशिष्ट कोनात वळवून दोन्ही हात बाजूला सारण्याची माधुरीची खास अदा ही तिला बिरजू महाराजाकडून मिळालेली असावी का बिरजू महाराजांनी ती अदा माधुरीकडून घेतलेली असावी असे कुतूहल सिनेरसिकांना वाटावे असे ते समीकरण होते.

महाराज तबला, पखावज, हार्मोनिअम अशी कितीतरी वाद्ये उत्कृष्टपणे वाजवत. परंतु गायन हे महाराजांचे एक विशेष अंग. महाराजांनी काही वेळा गायनाचेदेखील काही कार्यक्रम सादर केलेले आहेत. त्यामधे प्रामुख्याने ठुमरी गायन असायचे. महाराजांचे हे गायन म्हणजे गायनातील लगाव, नृत्यातील चपळता आणि वादनातील लयबद्धता यांचे मिश्रणच! ते इतके वेगळे आणि सशक्त होते की, जर महाराजांनी कथ्थकऐवजी गायनाचे अधिकाधिक शिष्य घडवले असते तर त्यांचे गायनातील एक स्वतंत्र घराणेच निर्माण झाले असते!

बिरजू महाराजांना ‘संगीत नाटक अकादमी’पासून ते ‘पद्मविभूषण’पर्यंत अनेक पुरस्कार मिळाले. अगदी उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा ‘फिल्मफेअर’देखील 2016 साली मिळाला. परंतु लखनौ घराण्याच्या नृत्यशैलीला कुठल्याही फ्युजनशिवाय नित्यनूतन ठेवत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे ही महाराजांची खरी मिळकत आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी इतर नृत्यप्रकारांचा सन्मानही केला. पद्मा सुब्रह्मण्यमसारख्या भरतनाट्यम् नर्तिकेबरोबर त्यांनी केलेले नर्तन हे त्याचे योग्य प्रमाण!

बिरजू महाराजांनी एकदा कलकत्त्याला नृत्य सादर करताना स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेपुढे उभे राहत एक किस्सा ऐकवला होता. त्यांच्या काकांनी ज्यावेळेला त्यांना नृत्याचे पहिले धडे दिले त्यावेळी योग्य पद्धतीने उभे राहण्यास शिकवले होते. असे सांगून महाराजांनी 'ता थै थै तत् अ थै थै तत्' असा एक तुकडा म्हणून समेवर अगदी त्या पद्धतीने उभे राहून दाखवले. आणि प्रेक्षागृह टाळ्यांच्या कडकडाटांनी भरून गेले. कारण महाराज अगदी विवेकानंदांप्रमाणे धिरोदात्त तपस्व्याच्या रूपात दोन्ही हात बांधून उभे राहिलेले होते. राष्ट्रपुरूषांच्या व्यक्तिमत्त्वात संगीत शोधण्याचा हा विचार मला इतका प्रभावित करून गेला की त्यानंतर प्रत्येक वेळी गायनाअगोदर मन शांत करण्यासाठी मी डोळे मिटलेल्या अवस्थेत बसलेल्या महात्माजींना स्मरू लागलो.

काही दिवसांपूर्वी महाराजांना कोविडने ग्रासले. परंतु त्यांचा मृत्यू कोविडने होणार नव्हता. ज्याप्रमाणे त्यांचा जन्म संगीतात झाला त्याप्रमाणे त्यांचा मृत्यूदेखील संगीतातच रमत होणार होता. आपल्या शिष्यांसोबत अंताक्षरी खेळत असताना अचानक हृदयविकाराचा धक्का येऊन, सारे आयुष्य नर्तन केलेल्या या नर्तकाने काळाच्या एका विशिष्ट समेवर आपल्या आयुष्याचा अखेरचा श्वास घेतला. आध्यात्मिक प्रवृत्तीच्या बिरजू महाराजांनी कथ्थकमधून पुरूषार्थ साधला. त्यांना कथ्थक करत मोक्षप्राप्तीपर्यंत पोहोचायचे होते. तसेच झाले... मृत्यूची शांतता महाराजांना बिलगली आणि महाराज तिला. हे महाराजांचे एक महानृत्यच नव्हे का? जीवनाच्या या शेवटच्या समेनंतरही बिरजू महाराजांचे नर्तन चालूच राहील. महाराजांच्या भौतिक अन्-अस्तित्वाच्या शांततेत जोवर त्यांचे शिष्य आणि त्यांच्या प्रेरणेने पायात घुंगरू बांधलेले तमाम कथ्थकगण आपले घुंगरू लयीत नाचवत राहतील तोवर महाराज नृत्य करतच राहतील.

- मॅक्सवेल लोपीस
maxwellopes12@gmail.com 
(लेखक नरसी मोनजी महाविद्यालयात वाणिज्य अध्यापक असून गांधी विचारांचे अभ्यासक आणि भारतीय शास्त्रीय संगीताचे अभ्यासक आहेत.)

Tags: कथ्थक नृत्य स्मृतीलेख माधुरी दीक्षित उदय शंकर गोपी कृष्ण शंभू महाराज लच्छू महाराज झाकीर हुसैन Load More Tags

Comments:

Jostna Vijay Dabre

स्वर्गवासी बिरजू महाराजांबद्दल अतिशय उत्तम लेख आम्हाला वाचायला मिळाला. महाराजांची विस्तृत ओळख त्यामुळे झाली.कलेची उत्तम जाण असणारा कलाकारच बिरजू महाराजांबद्दल सुंदर लेख लिहू शकतो. धन्यवाद मॅक्सवेल.

दिपाली अवकाळे

प्रथम हा लेख लिहिणाऱ्यांचे व तो प्रकाशित करणाऱ्यांचे मनापासून आभार ! बिरजू महाराज आणि नृत्य यांच्या विषयी 'माहिती' व 'अनुभव' अशा दोन्ही ही गोष्टी देणारा हा लेख वाटतो. जीवनाचा व अपल्यातल्या जीवंतपणाचा अनुभवा घेण्यासाठी म्हणून नृत्य करणाऱ्या बिरजू महाराज किंवा सरोज खान सारख्या गुरुंचे शरीराने आपल्यातून निघून जाणे हेच स्वीकारता येणे कठिण होऊन जाते.... त्याबद्दल लगेच एखादा लेख लिहिणे त्याहून अवघड... मात्र आज हा लेख वाचल्यावर आता आपण लिहायची गरज नाही, या लेखातून आपल्याही भावना व्यक्त झाल्या असे वाटले. Deep Gratitude to Maxwell Lopes...

दीपक पाटील

संगीत,नृत्य व नृत्य संगीत या तीनही टप्प्यांवर आपल्या साधना तपाने तेजाळणारे पं.बिरजू महाराज ! संगीत व नृत्याबद्दल किमान ज्ञान नसणा-या माझ्यासारख्या अनेकांना प्रस्तुत लेखकाप्रमाणेच पं.बिरजू महाराजांनी पहिल्याच भेटीत मोहात पाडलं नसेल तरच नवल ! त्यांचा चेहरा कधीच..कोठेही..कुठल्याही कार्यक्रमात गंभीर/उदास दिसणार नाही. मिश्किल आनंदाचे भाव ..जे गोपीकांची छेड काढताना मुरारीचे होते तसेच असायचे. पं.बिरजू महाराज असे कोणी म्हटले तरी रोमांचकता पसरते. मॕक्सवेलजी नी या लेखातून खूप छान शब्दानुभव दिला. स्मरणरंजनाचे असे लेखन दुर्मिळच ! पंडीतजीना सुमनांजली !

Anand Vishnu Patil

छान लेख लिहिला आहे. स्व. पं. बिरजू महाराजांना श्रद्धांजली वाहताना आपण वाचकांना अज्ञात असणाऱ्या अनेक पैलूवर प्रकाश टाकलात. धन्यवाद मॅक्सवेल.

Add Comment