एका सूर्याचा अस्त झालेला आहे पण…

भारतरत्न लता मंगेशकर यांना वाहिलेली श्रद्धांजली 

the-radar.in

दीदींचा स्वर म्हणजे अलगद झुळझुळणाऱ्या वाऱ्याची लहर; परंतु त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे एक वादळ. आज हे वादळ शमलेलं आहे. संगीतातील एक तेजस्वी सूर्याचा अस्त झालेला आहे. परंतु त्या सूर्याचा तो अंत नव्हे, आता तर तो सूर्य त्याच्या अस्तानंतर कृष्णविवर बनून गेलेला आहे! तो नजरेला दिसत नसला तरीही त्याचं गुरूत्वाकर्षण हजारो पट वाढलेलं आहे. संगीताच्या निस्सीम चाहत्यांना तो यापुढेही आपल्यात सामावून घेतल्याशिवाय राहणार नाही...

लतादीदी गेल्या. काल दि. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी बरोबर 10.30 वाजता ही बातमी मिळाली आणि क्षणभर काही सुचेनासं झालं. त्यानंतर जिथे पाहावं तिथे दीदींचेच फोटोज्, तेच शोकसंदेश, तशीच हळहळ! ही बातमी एकदा ऐकून खरी वाटली नाही. अजूनही मी पुन्हा पुन्हा दीदींच्या निधनाची बातमी परत परत वाचून खातरजमा करत आहे की, दीदी का खरंच गेल्या? एखाद्या मानसोपचारात सांगितलेल्या ऑटोसजेशन थेरपीप्रमाणे पुन्हा पुन्हा स्वतःशीच 'दीदी गेल्या' असे पुटपुटत मनाला पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे की, दीदी खरंच आता आपल्यात नाहीत. 

भारतरत्न लता मंगेशकर, सर्व पद्मपुरस्कारांच्या मानकरी, अन्य सर्व मोठमोठाल्या पुरस्कारांच्या राशी त्यांच्या चरणाभोवती पसरलेल्या, चित्रपटांत कित्येक हजार गीते गाण्याचा विक्रम, शोभना समर्थ-तनूजा-काजोल अशा तिन्ही पिढ्यांचा काळ पाहिलेली अनभिषिक्त स्वरसम्राज्ञी, घरात सतत एकत्रित नांदणाऱ्या लक्ष्मी आणि सरस्वती, 92 वर्षांचं निरोगी आयुष्य, भावंडांमधील अतूट प्रेम असं, किंबहुना यापेक्षाही संपन्न आयुष्य मिळूनही त्यांचं जाणं माझ्याप्रमाणे लाखो-करोडोंच्या जीवाला चटका लावून गेलं. याचं कारण ज्या दैवी स्वराचा जिवंत इतिहास आपण सर्वांनी इतकी वर्षं अनुभवला तो इतिहास आता पुस्तकांत जमा झालेला आहे. जे स्वर दिवस-रात्र ऐकताना, या स्वरांची मल्लिका आजही आपल्यासोबतच श्वास घेत आहे ही भावना मनी यायची; ती भावनादेखील आज इतिहासजमा झालेली आहे. ज्यांच्या सहवासात येणाऱ्या लोकांना टाइम ट्रॅव्हल केल्याचं सुख घेता येई, त्यांची जीवनयात्रा आता कायमची थांबलेली आहे. महात्मा गांधींनंतरचा सर्वात जास्त जनमानसांच्या मनावर राज्य केलेला इतिहास आज काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. 

लता मंगेशकर यांचं नाव सर्वप्रथम मी कधी ऐकलं हे आता आठवत नाही. ज्याप्रमाणे आपल्या घरातील सदस्य, आपलं कुलदैवत यांची वेगळी ओळख दिली जात नाही; त्याचप्रमाणे लता मंगेशकरांची वेगळी ओळख कधी करून दिली गेली नाही. ते नाव सहजगत्या आयुष्याच्या परिघात येऊन एकरूप झालेलं आहे.

खरंतर बालपणी मी दीदींचा आवाज ऐकला तो त्या काळात प्रदर्शित झालेल्या आणि गाजलेल्या चित्रपटगीतांत. दिल तो पागल है, हम आपके है कौन, दिलवाले दुल्हनिया... अशा चित्रपटांमधील त्यांची गाणी ऐकताना केवळ त्या गाण्यांच्या लोकप्रियतेमुळे ती मी ऐकत असे. तोवर मला ना संगीतातील काही कळत होते; ना दीदींच्या खऱ्या गायकीसोबत परिचय होता. 

दीदींचं खरं गायन मी महाविद्यालयात गेल्यावरच ऐकलं. मुगल-ए-आझम रंगीत स्वरूपात प्रदर्शित झाल्यावर दीदींचं गायन ऐकून मी स्तंभित झालो! पुढे त्या आवाजाचा अभ्यास करण्यासाठी मी दीदींची शेकडो गीते ऐकली, त्यांचा वेध घेतला. त्यातील नजाकती, शब्दोच्चार, व्हाॅइस मोड्युलेशन अभ्यासण्याचा प्रयत्न केला. त्या बदल्यात इतकंच समजून आलं की, लता मंगेशकर म्हणजे केवळ आणि केवळ सृष्टीरचनेच्या प्रक्रियेत योगायोगाने घडून आलेला एक मंजूळ चमत्कार आहे. म्हणजे एखाद्या शास्त्रीय गवयाला वर्षानुवर्षं स्वरसाधना करूनही जो स्वयंभू गंधार लाभत नाही, तो स्वर लता मंगेशकरांना निसर्गदत्तच मिळालेला होता. असा गंधार अन्य व्यक्तींच्याही गळ्यात असू शकतो, ज्यांना त्याची कधी जाणीवच नसते. परंतु इथे त्या गंधाराला ओळखू शकणारे मास्टर दिनानाथ पिता म्हणून लाभणे हा दीदींच्या आयुष्यातला पहिला योगायोग. ज्यांच्या गळ्यात अनेक दुर्मिळ रागरागिण्या निवास करत होत्या, त्या मास्टर दिनानाथांनी गुरू म्हणून दीदींना संगीताचा पहिला धडा देणं आणि तो इतका भक्कम प्रकारे देणं की, त्यांच्या अकस्मात निधनानंतरदेखील त्यांच्याकडून अल्पकाळ शिकलेलं गाणं आयुष्यभर दीदींची सोबत करत राहणं हा दुसरा योगायोग!

वडिलांच्या मृत्यूनंतर गरिबी आणि कष्टाचा काळ पाहणं हा त्यांच्या आयुष्यातला आणखी एक योगायोग. आणि हो! घरात फिल्मी संगीतावर पाबंदी असताना कुन्दनलाल सैगलची गाणी ऐकण्याचं मात्र त्यांना स्वातंत्र्य होतं हाही एक त्या योगायोगाचाच भाग! त्यानंतर मॅडम नूरजहाँची भेट, दीदींचा आवाज पातळ असल्यामुळे 'हा आवाज चालणार नाही' असा मिळालेला शेरा, दिलीपकुमारकडून मराठी गायकांच्या उर्दू उच्चारांवरची टिप्पणी आणि दीदींनी उर्दूचा अभ्यास करणे असे या स्वरकोकिळेच्या जडणघडणीतील असंख्य योगायोग!  त्यानंतर महान संगीतकार, गीतकार, नर्तिका, अमाप लोकप्रियता, तोलामोलाचे सहगायक, कलेची जाण असलेले रसिक असा चित्रपटसृष्टीचा 'गोल्डन इरा' लाभणं हाही एक योगायोग! अशा कितीतरी योगायोगांनी या स्वरकोकिळेला जन्म दिला. या योगांचं महत्त्व सांगायचं तर महाभारतातील एखादं पात्र बाजूला काढावं आणि पूर्ण कथाच पालटावी तसे हे जुळून आलेले सर्व योग!


हेही वाचा : मीरेचा स्वर - लता! - मॅक्सवेल लोपीस


दीदींवर कवितादेखील खूप लिहिल्या गेल्या. त्यामध्ये अतिशयोक्ती या अलंकाराचा वापर होऊनही स्वप्नवत अस्तित्व असलेल्या या गायिकेच्या बाबतीत त्या अतिशयोक्तीदेखील खऱ्याच वाटल्या. साहित्यिकांनी त्यांच्या स्वरांना 'हवेची अलगद झुळूक', 'मोरपिसांचा मऊ स्पर्श', 'पहाटेची कोवळी सूर्यकिरणे' अशी विशेषणं तर दिलीच परंतु शास्त्रीय गवयांनीदेखील दीदींच्या सुरांचं स्वामित्व मान्य केलं. भारतरत्न भीमसेनजी बोलले, 'आप मुझसे सत्तर साल आगे है', भारतरत्न बिस्मिल्ला खां बोलले, 'उसके गले का जादू हर आदमी नही कह सकता!' 

त्यांच्यावर टीकादेखील झाली. कधी राॕयल्टी प्रकरणात, कधी इतर गायिकांवर केलेल्या अन्यायाबाबत, कधी त्यांच्या मग्रूर वागण्याचे किस्से, तर कधी पेडर रोड प्रकरण! परंतु त्यांचे टीकाकारदेखील त्यांची गाणी ऐकल्याखेरीज राहू शकले नाहीत. मार्केटिंगच्या भाषेत म्हणायचं तर लतादीदींचा आवाज म्हणजे आदर्श प्राॕडक्ट मिक्सच! ज्या गायिकांशी दीदींचं शत्रूत्व रंगवलं गेलं त्या गायिकादेखील दीदींच्या मृत्यूमुळे अश्रू ढाळण्यापासून स्वतःला रोखू शकल्या नाहीत. अगदी या गायिकांमध्ये सर्वात पहिलं नाव असलेल्या सुमन कल्याणपूर तर अत्यंत भावूक होऊन म्हणाल्या की, लताताईंचा आणि माझा पूर्वजन्मीचाच संबंध!

दीदींच्या जीवनातील अजून एक विशेष बाब म्हणजे राजकारणातील त्यांचा संबंध. त्या कुठल्याही एका पक्षाच्या होऊन बसल्या नाहीत. त्यांनी स्वा. सावरकरांची गाणी गायली, त्यांना आदर्श मानलं परंतु त्याबरोबरच गांधीजींचं आवडतं भजन 'वैष्णव जन तो'देखील घराघरांत पोहोचवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांचे स्नेहाचे धागे जुळलेच परंतु त्यांचं गीत ऐकून  अश्रू अनावर झालेल्या पं. नेहरू, इंदिरा गांधी अशांसोबतही त्यांनी आपला स्नेह कायम ठेवला. किंबहुना मोदींच्या प्रचारसभेत दीदींनी नेहरूंचीच आठवण जास्त केली. आणि त्या सभेत नेहरूंच्या गौरवोद्गारांनी उपस्थित जमावांकडून टाळ्यादेखील मिळवल्या. दीदी सोडून हे कुणाला जमलं असतं? 

दीदी आणि संपूर्ण मंगेशकर कुटुंबाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, ही मंडळी श्रीमंतीत वावरली. दीदींचं शेवटचं ध्वनिमुद्रित गाणंदेखील अंबानीकन्येच्या विवाहाप्रसंगी त्यांनी गायलं होतं असं म्हटलं जातं. परंतु सर्वसामान्यांशीदेखील त्यांनी आपला धागा जोडलेला ठेवला. कित्येक संस्थानिक, खेळाडू, उद्योगपती त्यांचे मित्र होतेच. परंतु, मराठी साहित्यातील आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य असलेल्या गुणीजणांशीदेखील त्यांनी अतूट मैत्री ठेवली.

दीदींचा स्वर म्हणजे अलगद झुळझुळणाऱ्या वाऱ्याची लहर; परंतु त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे एक वादळ. आज हे वादळ शमलेलं आहे. संगीतातील एक तेजस्वी सूर्याचा अस्त झालेला आहे. परंतु त्या सूर्याचा तो अंत नव्हे, आता तर तो सूर्य त्याच्या अस्तानंतर कृष्णविवर बनून गेलेला आहे! तो नजरेला दिसत नसला तरीही त्याचं गुरूत्वाकर्षण हजारो पट वाढलेलं आहे. संगीताच्या निस्सीम चाहत्यांना तो यापुढेही आपल्यात सामावून घेतल्याशिवाय राहणार नाही...

कवी मजरूह सुल्तानपुरी यांचं गाणं दीदींच्या बाबतीत खरंच ठरलं. दीदी मरणातही यशस्वीच झाल्या...

'जब हम न होंगे तब हमारी
खाक पे तुम रुकोगे चलते चलते
अश्कों से भीगी चांदनी में
इक सदा सी सुनोगे चलते चलते
वहीं पे कहीं, वहीं पे कहीं हम
तुमसे मिलेंगे, बन के कली बन के सबा बाग़े वफ़ा में ...
रहें ना रहें हम, महका करेंगे...'

- मॅक्सवेल लोपीस 
maxwellopes12@gmail.com

(लेखक, नरसी मोनजी महाविद्यालयात वाणिज्य अध्यापक असून भारतीय संगीताचे अभ्यासक आहेत.)

Tags: आदरांजली स्मृतीलेख लता मंगेशकर मजरूह सुल्तानपुरी Load More Tags

Comments:

Anup Priolkar

Well studied in all corner of Didi. To good article.

दत्तात्रय प. जोशी

श्री. मॅक्सवेल लोपीस यांनी हा लेख अतिशय उत्तमरित्या लिहीलेला आहे. मला वाटते त्यांनी आपल्या सगळ्यांच्याच भावना व्यक्त केल्या आहे. लतादीदींचे जाणे म्हणजे आपल्या घरातील एक व्यक्ती गेल्यानंतर जे दु:ख आपल्याला झाले असते तसेच वाटत आहे. अगदी पहाटेपासून आकाशवाणीवरून त्यांचा आवाज आपण ऐकला नाही असा एकही तास जात नसे. आपल्याकडच्या तीन-चार पिढ्यांना लतादीदींच्या आवाजाने मंत्रमुग्ध केले आहे. तसेच तंत्रज्ञानानुसारही लतादीदींचा आवाज सगळ्या यंत्रामधुन आपल्याला ऐकण्यास मिळाला, अगदी सुरवातीला हॅन्डल फिरवून चालणारा ग्रामोफोन, विजेवर चालणारा रेकॉर्ड प्लेअर, व्हॉल असलेले रेडीओ, ट्रॅन्झिसटर वापरलेले रेडीओ, सिनेमा, टिव्ही, स्पुलटेप असणारे टेप रेकॉर्डर, कॉम्पॅक्ट कॅसेट प्लेअर, सी.डी, डी.व्ही.डी, पेनड्राईव्ह आणि सध्या खुप लोकप्रिय असलेले इंटरनेट आधारीत माध्यमे म्हणचे युट्युब इत्यादि. लतादीदींना आपल्यापैकी कोणीही विसरू शकणारच नाही. तसेच पुढे येणाऱ्या भावी पिढ्या देखील त्यांची आठवण सतत काढतील. लतादीदी देहाने आपल्यात नसल्या तरी त्यांच्या आवाजामुळे त्या सतत आपल्या मनात जवळ राहतील.

संदीप रॉड्रिग्ज

भारताच्या दिदी म्हणजे लताजी. ऐ मेरे वतन लोगो हे गीत जेव्हा त्यांनी गायले तेव्हा तमाम भारतीयांच्या डोळ्यात पाणी आले. आज त्या आपल्यातून निघून जाताना प्रत्येकाच्या मनातील हळहळ व्यक्त करताना लेखकाने स्वरसम्राज्ञीस दिलेली उपमा योग्य आहे.

Shakuntala Patil

म्याक्सवेल, संगीताचा उपासक आहे. त्यान्ही लतादीदी विषयी लिहिलेले दोन्ही लेख खुप छान आहेत. ओघवत्या भाषेतील लेख वाचताना, दिदी ही कुटुंबातील व्यक्ती गेल्याचे दुःख वाटले. लतादीदी अमर रहे!

Add Comment