गांधींवर गरळ ओकण्याची प्रथा कधी संपणार?

महापुरुषांच्या बदनामीच्या अनावश्यक चर्चासत्रांत गुंतलेल्या समाजाचे अधःपतन निश्चित समजावे!

महात्मा गांधी हे खऱ्या अर्थाने आपल्या देशाचे राष्ट्रपिता आहेत. येथे त्यांना राष्ट्रपित्याचा सन्मान देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची त्यांना तसे संबोधण्यामागील भूमिका थोडावेळ बाजूला ठेवली तरी मग कुठल्या अर्थाने ते राष्ट्रपिता? देशातील कोणीही त्यांना स्वतःची खासगी मालमत्ता समजून त्यांच्याशी व्यवहार करत असतो, या अर्थाने.. अगदी त्यांचे विरोधकदेखील त्यांच्यावर टीका करताना कुठलीही सभ्यता न पाळता हवे तसे बरळत सुटतात! हिंदूंना वाटते, गांधींनी मुस्लीम अनुनय केला. मुस्लीम त्यांना हिंदूंचा नेता मानतात. बहुसंख्य घरांतील भावाबहिणींच्या वादात आईवडिलांची अवस्था जशी व्हावी, तशी या देशात गांधींची व्यथा! 

पराकोटीचा गांधीद्वेष डोके वर काढत असताना 'गांधी आमचे राष्ट्रपिता आहेत' हे मात्र खुलेआम अमान्यही करता येत नाही. महात्मा गांधी ही प्रत्येकाने आपापली जहागीर ठरवून टाकलेली आहे. ही परंपरा अशी काही फोफावलेली आहे की 'चारित्र्य विकास' या शब्दांशी ज्यांचे दूरदूरचे नाते नाही, ते गांधींच्या चारित्र्याची चिकित्सा करतात. ज्यांच्या पूर्ण आयुष्यावर अन् कर्तृत्वावर न मिटणारे प्रश्नचिन्ह लागलेले आहे, ते गांधींच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. 'Please like, share and subscribe' ची दिवसरात्र भीक मागणारे युट्युबर्स गांधी कसे संधीसाधू होते ते पाच-दहा मिनिटांत पटवून देऊ पाहतात. कुणी त्यांना 'ब्रिटिशांचे दलाल' म्हणतो तर कुणी 'आत्माभिमानी नेता'! काहींची मजल इथवर गेलेली आहे की, ते गांधींच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या स्वातंत्र्यावरदेखील प्रश्नचिन्ह उभे करतात. बरे, या विरोधात काही राजकीय पक्ष आणि बोटावर मोजण्याइतके गांधी अभ्यासक वगळता कोणी आक्षेपही घेत नाही. आणि घेणार तरी कसे? गांधींना मानणारा तळागाळातील वर्ग आपल्याच समस्यांत असा काही अडकलेला आहे की गांधींच्या बाजूने आवाज उठवण्याइतके अवसान त्यांच्यापाशी कुठे, आणि आवाज उठवला तरी त्यांचे ऐकणार कोण!

त्यामुळे गांधीवर गरळ ओकण्याची ही प्रथा नित्यनेमाने चालू आहे. किंबहुना आता तर एखादा मोठा सन्मान मिळाल्यानंतर व्यक्त होताना देखील काहीजण गांधींची विटंबना करण्यावरच घसरतात! परंतु यावेळी काही दिवसांपूर्वी गांधींवर चिखल फेकण्याच्या नादात त्यांच्या विरोधकांनी पुतलीबाई आणि करमचंद गांधी यांच्या चारित्र्यावर बिनदिक्कत प्रहार केले. 'श्री शिवप्रतिष्ठान'चे संस्थापक मनोहर भिडे आपल्या विधानांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतात. यावेळी त्यांच्या एका कार्यक्रमात राष्ट्रपित्याची अत्यंत विकृत पद्धतीने खिल्ली उडवण्यात आली. सदर प्रसंग दोन व्यक्तींमधील संवादाच्या स्वरूपात आखण्यात आलेला होता. त्यांचा एक कार्यकर्ता वाचून दाखवत होता. आणि भिडे त्याच्या विधानांना दुजोरा देत बोलत होते. 'मोहनदास गांधी हे करमचंद गांधींसारख्या चौथा विवाह करणाऱ्या चारित्र्यवान बापाचे पुत्र होते. त्यांचा बाप हा एका मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होता. मालकाचे पैसे त्याने चोरले. अशा प्रामाणिक बापाचा हा मुलगा होता. त्यानंतर त्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीला ठेवून घेतले. 'लव्हजिहाद'चा किडा तेव्हापासूनच होता. त्यानंतर दोन वर्षे करमचंद गांधी अज्ञातवासात, अर्थात फरार होते. या काळात मोहनदासचा जन्म झाला… (सभेत प्रचंड टाळ्या आणि हास्यकल्लोळ!)' अशा प्रकारची मुक्ताफळे या सभेत उधळण्यात आली. 

या लांच्छनास्पद प्रकाराला उत्तर देताना सर्वप्रथम महात्मा गांधींच्या परिवाराचा संक्षिप्त वेध घ्यावा लागेल. मुळात मोहनदास करमचंद गांधी आणि त्यांच्या पूर्वजांचा इतिहास हा काही प्राचीन काळातला नाही. त्यांच्या कुटुंबियांबद्दलची पूर्ण माहिती सूर्यप्रकाशाइतकी उघड आहे आणि उपलब्ध आहे. पोरबंदरमधील एका तीन मजली घरात गांधींचे कुटुंबीय 1777 पासून राहत होते. लालजी गांधी हे गांधींचे पोरबंदरमधले, माहीत असलेले पूर्वज. त्यांच्यापासून पोरबंदर दरबारात सेवा देण्याची गांधी कुटुंबियांची परंपरा चालू झाली. लालजींच्या चौथ्या पिढीतील उत्तमचंद गांधी (करमचंद गांधी यांचे वडील) पोरबंदर दरबारात प्रथमतः दिवाण झाले. पोरबंदरचे तत्कालीन राणा खिमोजीराज हलोजी साहेब यांच्या मृत्यूनंतर तेथील राणीसाहेब श्री रूपालिबा कुंवरबा साहिबा गादी सांभाळत होत्या. उत्तमचंदांशी त्यांचे मतभेद झाले व उत्तमचंद पोरबंदर सोडून जुनागढ येथे नवाबांकडे रूजू झाले. परंतु आपली स्वामीनिष्ठा दाखवत त्यांनी नवाबाला डाव्या हाताने सलाम केला आणि ज्यावेळी त्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी आपण आपला उजवा हात आधीच पोरबंदरला दिलेला आहे असे करारी उत्तर दिले. मुस्लीम शासकाच्या हाताखाली काम करण्याची महात्मा गांधींच्या पूर्वजांची ही पहिली आणि शेवटची वेळ. 

पुतलीबाई आणि करमचंद गांधी 

यानंतर 1841 साली पोरबंदरच्या राजमातेचे निधन झाले आणि राणा विक्रमतजी गादीवर आले. त्यामुळे गांधी कुटुंब आपल्या मूळ घरी परत आले. 1847 मध्ये करमचंद गांधी पोरबंदर दरबाराचे दिवाण झाले. 'करमचंद हे तत्त्वनिष्ठ आणि प्रामाणिक असले तरीही संसारी सुखात त्यांना विशेष रस असावा हे त्यांनी केलेल्या चार विवाहांमुळे दिसून येते' असे स्वतः महात्मा गांधींनी म्हटले आहे. करमचंदांच्या पहिल्या दोन पत्नी निःसंतान मरून गेल्या. तिसऱ्या बायकोला मूल न झाल्याने तिच्या परवानगीने करमचंदांनी पुतलीबाईंसोबत विवाह केला. पुतलीबाईंना लक्ष्मीदास (1860), रलियत (कन्या)(1862), करसनदास (1867) व मोहनदास (1869) अशी अपत्ये झाली. 

पोरबंदरचे राणा विक्रमतजी यांचे 1869 मध्ये ब्रिटिश सरकारसोबत वितुष्ट निर्माण झाल्याने त्यांना शासक म्हणून तृतीय दर्जा देण्यात आला. त्यानंतर करमचंद यांनादेखील नोकरीत अस्थिरता जाणवू लागली. तरीही 1874 पर्यंत, म्हणजे मोहनदास पाच वर्षांचा होईपर्यंत ते पोरबंदरलाच राणा विक्रमतजींच्या दरबारी होते. 1874 मध्ये ते राजकोटला सहकुटुंब स्थलांतरीत झाले आणि राजकोटचे अकरावे ठाकूर भावजी राजसिंगजी महाराज यांच्या दरबारी दिवाण म्हणून त्यांनी नोकरी पत्करली. 

महात्मा गांधींच्या जन्मासंबंधात उठवलेल्या पोकळ थापा आणि गांधी कुटुंबाशी संबंधित घटनाक्रमांचा तुलनात्मक वेध घेतानाच भिडेंचे पितळ उघडे पडते. येथे याही गोष्टीची नोंद घेणे महत्त्वाचे ठरते की, राजकोट येथील राजकुमार कॉलेजमध्ये मोहनदासला प्रवेश मिळू शकला नाही. कारण हे कॉलेज केवळ राजपूत आणि काही अपवादात्मक परिस्थितीत मुसलमान शासकांच्या नातलगांनाच प्रवेश देत होते. गांधी मोधबनिया जातीतून असल्याने त्यांना या कॉलेजमध्ये प्रवेश नव्हता. 


हेही वाचा : गांधीजींचे संपूर्ण जीवन सलगपणे मांडणारे एकमेव चरित्र - नरेंद्र चपळगावकर


गेल्या वर्षी अशाच प्रकारे जीवन कुमार शाह नावाच्या एका पत्रकाराने गांधी हे मुसलमान असल्याचा जावईशोध लावला होता. त्यांचा युक्तिवाद तर भिडेंहून भिन्न! त्यांच्या मते, मोहनदास गांधी निजारी इस्लामी संप्रदायाचे शियापंथीय. आपल्या मताचे स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटले आहे की, 'पुतलीबाई या परनामी संप्रदाय मानत होत्या असे मोहनदासने स्वतः आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे. कुलजाम शरीफ हा या संप्रदायाचा धर्मग्रंथ.' मुळात गांधींच्या आत्मचरित्रात जीवन कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे कुठलाही उल्लेख नाही. उल्लेख जो आहे तो पुतलीबाई निस्सीम वैष्णवभक्त असल्याचा! त्या प्रतिदिन 'हवेली'त (वैष्णव मंदिर) जात असत. चान्द्रायण आणि चातुर्मास्याचे कठोर उपवास करून पालन करत असत. पावसाळ्यात सूर्याचे दर्शन न झाल्याने त्यांचा उपवास कित्येक दिवस लांबला जाई. उपोषण करण्याचा वारसा मोहनदास गांधींना त्यांच्याकडूनच मिळालेला होता. मोहनदास विलायतेला जाताना याच माऊलीने त्यांना मद्यपान, परस्त्री संग आणि मांसाहार यांपासून परित्यक्त राहण्याची तीन व्रते घ्यायला लावलेली होती. साऊथ आफ्रिकेत असताना गांधींच्या गळ्यात असलेली वैष्णवांची तुळशी माळ पाहून त्यांचे तेथील सहकारी मिस्टर कोट्स यांनी गांधींना 'ही अंधश्रद्धा आहे' असे म्हणून ती माळ काढण्यास सांगितले. त्यावेळी गांधींनी सांगितले की, ही माळ त्यांना त्यांच्या आईकडून मिळालेली आहे. आणि ती परिधान करण्यात त्यांना काहीही हानी नाही. तसेच आईने मोठ्या प्रेमाने व श्रद्धेने दिलेली असल्याने ती काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 

गांधींच्या जीवनातील असे कितीतरी प्रसंग त्यांच्या आणि त्यांच्या आईवडिलांच्या हिंदू धर्मपरायणतेची साक्ष देतात. अशा वेळी गांधींना सरसकट मुस्लीम ठरवणे हा केवळ त्यांचाच नव्हे तर सनातन हिंदू धर्माचा अपमान आहे. वर त्यासाठी आपल्याकडे ठोस पुरावा असल्याचा कांगावा करणे म्हणजे तर एखाद्या निरक्षर व्यक्तीने माझ्याकडे ऑक्सफर्ड विद्यापीठाची पदवी आहे अशा वल्गना करण्यासारखे आहे!

मुळात गांधी असोत वा अन्य महापुरूष... त्यांच्या चारित्र्यहननामुळे त्या महापुरूषांना काहीही फरक पडत नाही. गांधी मारून मरत नाहीत हे तर आता त्यांच्या विरोधकांनादेखील कळून चुकले आहे. मात्र या विखारी निंदेमुळे मूळ नीतीमूल्यांना हादरा बसत असेल तर ती कुठल्याही समाजासाठी गंभीर बाब आहे. आता सध्याच्याच प्रसंगात पाहिले तर भिडेंच्या सभेत गांधींवर ओकलेली गरळ केवळ गांधी आणि त्यांचे मातापिता यांच्यापुरती मर्यादित राहत नाही. त्यातून गांधीद्वेषासोबतच विशिष्ट जाती-धर्माबाबत द्वेषही पसरवला जातो. एखाद्या आदर्श स्त्रीला कलंकित करून स्त्रीला भोगवादाचे साधन मानणाऱ्या विचाराला खतपाणी मिळते. देशातील महत्त्वाचे विषय भरकटवले जातात. कुठल्याही मताची शास्त्रीय मिमांसा करणाऱ्या विचाराला अवरोध निर्माण केला जातो. धार्मिक कलह आणि स्त्रीला भोग्य वस्तू मानणाऱ्या विचारांना एकदा का (त्यांना) हवे तसे वळण लागले की, त्याची परिणती काय होऊ शकते हे सांप्रत काळात नव्याने सांगण्याची गरज नाही. 

आजच्या अशांततेच्या काळात जगाला गांधी विचारांची सर्वात जास्त गरज आहे. तुम्ही मोहनदास गांधी यांना मानत असाल वा नसाल; परंतु वैमनस्याने ग्रासलेल्या जगात 'डोळ्यास डोळा' हा विचार मानवजातीचा पूर्ण ऱ्हास घडवून आणू शकतो हे सूज्ञ समाजास कळायला हवे. म्हणून महापुरूष आणि त्यांच्या आदर्श विचारांबाबत समाजात जागृती व्हावी. त्यांच्या तत्कालीन विचारांची अर्वाचीन परिस्थितीशी सांगड घातली जावी. जर असे झाले तरच समाज पुढे वाटचाल करू शकेल, अन्यथा महापुरुषांच्या बदनामीच्या अनावश्यक चर्चासत्रांत गुंतलेल्या समाजाचे अधःपतन निश्चित समजावे.

- मॅक्सवेल लोपीस
maxwellopes12@gmail.com
(लेखक, नरसी मोनजी महाविद्यालयात वाणिज्य अध्यापक असून गांधीविचारांचे अभ्यासक आहेत.)


 

Tags: महात्मा गांधी मोहनदास करमचंद गांधी धर्मद्वेष रा स्व संघ मनोहर भिडे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान Load More Tags

Comments: Show All Comments

अशोक वासुदेव बक्षी

गेली सत्तर वर्षे गांधींची बदनामी हेच काम चालू आहे. यावर प्रतिक्रिया म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्री हेरंब कुलकर्णी यांच्या अस्वस्थ क्षणांच्या नोंदी या कविता संग्रहातील "या गांधींच आता करावं तरी काय.." हि कविता आठवली. ज्यांच्या जाणीव अजूनही जिवंत आहेत त्यांनी हा कवितासंग्रह आवर्जून वाचावा. जाळूनही जळत नाही संपवूनही संपत नाही मारूनही मारत नाही या गांधीच आता करावं तरी काय ? पुतळे फोडून फुटेना विटंबनेने तुटेना रतीब घालून बदनामीचा जनमाणसातून उतरेना चारित्र्याशी खेळून पाहिलं विचारांना टाळून पाहिलं भगव्या रंगात घोळून पाहिलं थकून गेलो सत्तर वर्षे या गांधीच आता करावं तरी काय ? झाड छाटावं किती वेळा मुळ जातात खोल खोल संपला संपला म्हणता म्हणता चर्चा वाढते बोल बोल तुला ओढता खोडता बापू आम्हीच गाडले गेलो खोल सत्तर वर्षे एकच प्रश्न या गांधीच आता करावं तरी काय ?

Dr. Anil Khandekar

परिवारातील सर्व संघटनांच्या एक महत्त्वाची गोष्ट समजली आहे.... महात्मा गांधी , महात्मा फुले , आणि स्वातंत्र्य लढ्यातील महापुरुषांच्या वर हल्ला करूनच आपलं नाकर्तेपणा लपविला जाऊ शकतो.. आणि पर्यायी इतिहासाचे पुनर्लेखन करू शकतो. काही महापुरुषांचे अपहरण करायचे , काहींची बदनामी करायची. स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करायचा , स्वातंत्र्य लढ्यातील -- संविधानातील मूल्ये भ्रष्ट करण्यासाठी प्रयत्न करायचा.

Komal Kelkar

लेख तंतोतंत पटला. अचूक लिखाण.

Anup Priolkar

Within limited and well studied article .

Dr .Cecilia Carvalho

खूप चांगला लेख.समतोल अन् अभ्यासपूर्ण लेख.अशा विचारांची आज नितांत आवश्यकता आहे.महात्मा गांधीजींचे विचारच आजच्या भारताला वाचवू शकतात.

दीपक पाटील

नेमक्या शब्दांतील लेखन. संयमपूर्वक विचार मांडले आहेत. कुठेही गांधींच्या महात्मापणाचा डोलारा वाटत नाही. गांधी समजून घेणे ही आपली नागरिक म्हणून घडताना पार पाडायची जबाबदारी आहे. सुंदर लेखाबद्दल धन्यवाद !

Add Comment