1951मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे पॅरिसला सहावे अधिवेशन भरलेले होते. या अधिवेशनात उपस्थित असलेल्या प्रतिनिधींपुढे जपानचे तत्कालीन सल्लागार चिओजी नाकागावा यांनी एक आगळीवेगळी संकल्पना मांडली. सारे जग शांततेसाठी आसुसलेले असताना त्या शांतीचा नादमय संदेश देणारी एक घंटा सर्व राष्ट्रांच्या सहकार्याने संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात बसवण्यात यावी असे आवाहन त्यांनी केले. अर्थातच त्या कल्पनेचे स्वागत झाले आणि साठपेक्षा अधिक देशांनी या विशाल घंटेच्या निर्मितीसाठी धातूंची नाणी जमा केली. त्या नाण्यांना वितळवून तयार केलेली ती घंटा न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयामधील गौतम बुद्धाच्या जन्मस्थळाचे स्मरण करून देणाऱ्या एका पुष्पमंदिरात 1954मध्ये बसवण्यात आली. या घंटेवर जपानी भाषेमध्ये 'जगात सदैव शांती नांदो' असे घोषवाक्य कोरण्यात आले. 1994मध्ये या घंटेच्या स्थापनेला 40 वर्षे पूर्ण झाल्याच्या समारंभात संयुक्त राष्ट्र संघाचे तत्कालीन सरचिटणीस बोट्रूस बोट्रूस घाली यांनी मांडलेले विचार खूपच उद्बोधक होते. ते म्हणाले होते, 'या जपानी शांततेच्या घंटानादाने आजवर एक स्पष्ट संदेश दिलेला आहे. हा संदेश सर्व मानवजातीसाठी आहे. शांतता हे अमूल्य तत्त्व आहे. परंतु शांततेसाठी केवळ आसुसलेले राहून चालत नाही तर त्यासाठी दीर्घकालीन, अवघड आणि खडतर कार्य करावे लागते!'
जगात शांतता नांदावी म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने या घंटानादाला 1981मध्ये अजून एका उपक्रमाची जोड दिली. त्यानुसार 21 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून पाळला जाऊ लागला. त्यानंतर ती शांततेची घंटा वर्षातून दोनदा वाजवली जाऊ लागली, एकदा वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय शांततादिनी! जणू जगात शांतता नांदली तरच जग हे वसंताच्या नवचैतन्याने फुलेल असा यामागील गर्भितार्थ असावा.
आंतरराष्ट्रीय शांततादिनाची सुरुवात झाली. त्याला काल, 21 सप्टेंबर रोजी 40 वर्षे पूर्ण झाली. करोना महामारीने संपूर्ण जगाचे रहाटगाडे विसकळीत केल्याच्या पार्श्वभूमीवर या वर्षी या दिवसाला संयुक्त राष्ट्रसंघाने 'Recovering better for an eqitable and sustainable world' असे उचित शीर्षक दिलेले आहे. समानतेवर आणि शांतीवर आधारलेले जग निर्माण करण्यासाठी महत्तम गोष्टींची पुनर्बांधणी करत वैश्विक परिवार स्थापण्याच्या आमच्या प्रयत्नांत सर्व राष्ट्रांनी सहभाग घ्यावा असे आवाहन राष्ट्रसंघाने केले. ऑनलाईन आणि ऑफलाईन असे संवादाचे दोन मार्ग आज उपलब्ध असताना त्या मार्गांद्वारे आपण द्वेषभावनेवर प्रहार करावा आणि दया, करुणा, आशा अशा मूल्यांची पखरण करून हा महामारीचा काळ सुसह्य करावा असा संदेश या शांततादिनानिमित्ताने संयुक्त राष्ट्र संघाने जगाला दिला.
जगाच्या विकासासाठी शांतता अत्यावश्यक आहे हे उघड सत्य आहेच परंतु त्याच वेळी जगाचा इतिहास त्या शांततेला काळिमा फासणारा आहे हेदेखील दुर्दैवाने एक कटू सत्य आहे. स्वार्थाच्या धगधगत्या आगीमध्ये मानवजातीने आजवर वसुंधरेची अपरिमित हानी केलेली आहे. दुसऱ्यांचे दुःख आणि पीडा पाहताना त्यातून पाशवी सुख घेणारा मानवप्राणी या शांततेच्या स्वप्नापुढे सदैव अशिष्टपणे नर्तन करत आलेला आहे. या विकृत नर्तनातून आजवर त्याने हवी तशी निसर्गाची हानी केली. असंख्य युद्धे घडवून आणून या वसुमतीला रक्ताचे कंठस्नान घातले. दारिद्र्याचा महाशाप मानवजातीला दिला.
...परंतु नीतिमूल्यांचे रक्षण करणारे महात्मेदेखील या भूतलावर अवतरले. त्यांनी जगाला शांततेचा राजमार्ग दाखवला. 'सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयः'चा शांतिस्वर त्यांनी मानवजातीला ऐकवत 'मा विद्विषावहै'च्या जागतिक मंत्रात तिला अभ्यंगस्नान घातले. मात्र पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करण्याचे त्यांचे स्वप्न आजही अपूर्णावस्थेतच आहे.
राजकीय प्रश्न, निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल, आंतरराष्ट्रीय वैमनस्य असे प्रश्न आज जगापुढे उभे ठाकलेले आहेत. धर्माचे केवळ राजकारणच होऊ शकत नाही तर त्याहीपलीकडे धर्माच्या नावावर कट्टर मतांचा लेप चढवून संघटना बांधली जाऊ शकते. पुढे ही संघटना आपल्या मूलतत्त्वांचा प्रसार करत एखाद्या राष्ट्राची सत्ता बळकावू शकते आणि सामान्य नागरिकांना दावणीला बांधलेल्या जनावरांप्रमाणे हवालदिल करू शकते. याचा परिचय अफगाणिस्तानची सद्यःस्थिती जगाला करून देत आहे. प्रत्येक दिवस येथील नागरिकांसाठी एक नवे आव्हान घेऊन उगवत आहे. अफगाणिस्तानातील कित्येक दूतावासांनी सध्याच्या तालिबानी सत्तेशी फारकत घेण्याची जोखीम पत्करलेली आहे... अस्तित्वाच्या साऱ्या आशाआकांक्षा विझलेल्या अवस्थेत! करोना महामारीत आवश्यक असलेले लसीकरण, दोन वेळच्या अन्नाची वाणवा हे प्रश्न तर तिथे अगदीच किरकोळ होऊन गेलेले आहेत.
करोनाविरुद्ध चाललेल्या युद्धाबद्दल सांगायचे तर आजही जगात सव्वीसपेक्षा अधिक राष्ट्रांत लसीकरणाचा दर 10 टक्क्यांहून कमी आहे. ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या अलीकडच्या सर्वेक्षणानुसार आजही काँगो, हैती, टांझानिया, दक्षिण सुदान, बुर्किना फासो अशा कित्येक राष्ट्रांत आजही लसीकरणाचा दर एक टक्क्याहून कमी आहे. रॉयल्टी, कॉपीराइट्स यांच्या नियमांनी आणि तेथील संशोधन प्रक्रियेतील उदासीनतेने या विकसनशील अथवा गरीब राष्ट्रांना जगण्याच्या अधिकारापासून पृथक केलेले आहे हे यामागचे भयाण वास्तव!
दुसरीकडे म्यानमार देशात कलम 417चा, 418चा वापर करत 1 फेब्रुवारीपासून लागलेली अणीबाणी आणि लष्करी राजवट या देशात रोगराई आणि गरिबी वाढवण्यास कारणीभूत ठरलेली आहे. एका सर्वेक्षणानुसार या देशातील गरिबी गेल्या काही महिन्यांत 25 टक्क्यांनी वाढलेली आहे. करोनाची इथे येऊ घातलेली लाट महाभयानक असल्याची भीती राष्ट्रसंघाने वर्तवली आहे.
येथील लष्करी उठावात हजारो नागरिकांची हत्या झाली. हजारोंना कैद झाली. हजारोंनी जिवाच्या भीतीने देशातून पलायन केले. सशस्त्र लष्करापुढे गुडघे टेकून नागरिकांच्या जिवासाठी भीक मागणाऱ्या सिस्टर अॅन रोझ यांचा सत्याग्रह तर जगाने पाहिला. परंतु अहिंसक मार्गाबरोबरच नागरिकांनी घरगुती शस्त्रास्त्रे हाती घेतली आहेत. लष्कर विरुद्ध सामान्य नागरिक असा जीवनमरणाचा संग्राम इथे घडत आहे. अशा संग्रामात जिवाच्या भीतीने जंगलात लपलेली रोझमेरीसारखी एक स्त्री तोंडात कापडाचा गोळा कोंबून आपल्या प्रसूतिवेदना सहन करत एका जिवाला जन्म देत आहे.
जगात हिंसेची ही मरूभूमी सजवली जात असताना प्रत्येक महिन्यात येत असलेल्या नवीन जागतिक प्रश्नांत जुने प्रश्न झाकोळले जात आहेत. परंतु पॅलेस्टाइन-इस्रायल, सिरिया, भारत-पाकिस्तान असे किती प्रश्न म्हणावेत जे आजही हिंसेची कट्यार हातात घेऊन उभे आहेत... वसुंधरेचा घात करण्यासाठी!
विनोबाजींनी एके ठिकाणी म्हटले होते की, ‘जसा दिवा विझतो तेव्हा तो शेवटच्या क्षणी थोडा मोठा होऊन मग विझतो तशीच ही शस्त्रांस्त्रांची जी सारी प्रचंड तयारी आहे ती समाप्त होणार आहे आणि भावी काळ अहिंसेचा असणार आहे.’ विनोबाजींच्या याच आशावादाचे प्रत्यंतर देत या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी केलेला जपानी शांततेच्या घंटेचा निनाद साऱ्या जगाला निदान स्वतःच्या अस्तित्वासाठी तरी या शांतीचे महत्त्व सांगणारा ठरेल का?
- मॅक्सवेल लोपीस
maxwellopes12@gmail.com
(लेखक नरसी मोनजी महाविद्यालयात वाणिज्य अध्यापक असून गांधी विचारांचे अभ्यासक आहेत.)
Tags: लेख मॅक्सवेल लोपीस संयुक्त राष्ट्र संघ जपान आंतरराष्ट्रीय शांतता दिवस International Day for Peace United nations Maxwel Lopes Japan Peace Bell Load More Tags
Add Comment